Pages

Saturday, February 25, 2012

म.मि.वा.

         डॉक्टर सलील कुलकर्णी नेमके कोण आहेत? म्हणजे नाव वाचून वाटतं की ते डॉक्टर आहेत, मग असं लक्षात येतं की ते संदीप खरेंच्या कवितांना चाली लावतात..(हां तेच ते संगीतकार वगैरे!)ते गायक असल्याचं देखील स्मरतं (नसतेस घरी तू जेव्हा, हे भलते अवघड असते वगैरे वगैरे)...मग ते सारेगमपचे परीक्षक म्हणून भेटतात..एकीकडे मराठी संगीताला पुन्हा बरे दिवस आले आहेत(?) म्हणत असताना सध्या मराठी संगीतकारांनी सूत्रसंचालन करण्याचा ट्रेंड आलाय!त्यामुळे कुलकर्णींनीसुद्धा सूत्रसंचालन सुरु केलेलं दिसतंय! "मधली सुट्टी" अशा नावाच्या एका नवीन कार्यक्रमाचा एक भाग नुकताच पहिला. कार्यक्रम पाहून बरेच प्रश्न पडले..पडलेला पहिला प्रश्न मी पहिल्या ओळीत लिहिला आहे..आता बाकीचे आणि महत्वाचे प्रश्न..(ज्या मंडळींना हा ब्लॉग या कार्यक्रमाची चिरफाड करायला लिहिला आहे असं वाटतंय त्यांनी कृपया इथेच वाचन थांबवावं)..एपिसोडच्या पहिल्या काही मिनिटात 'डॉ.कु' काही मुलांशी संवाद साधत होते. नाशिकसारख्या शहरात दिल्ली बोर्डाची शाळा दाखवून, अमराठी मुलांना मराठीत संवाद साधायला लावायचं प्रयोजन कळलं नाही.काही महाराष्ट्रीयन वाटणाऱ्या मुलांचं 'मराठी' ऐकून मराठीच्या भविष्याविषयी काळजी वाटायला लागली. 
         माझी मावस बहिण दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवीत शिकते. तिला मराठी मिडीयममध्ये न घालता इंग्लिश मिडीयम आणि त्यातही दिल्ली बोर्डाच्या शाळेत घाल असा सल्ला मीच मावशीला दिला होता.  मी मराठी माध्यमातून शिकलो असलो तरी मी मराठीबद्दल फारसा आग्रही वगैरे नव्हतो.  मराठी माध्यमात शिकून धड मराठी येत नाही आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षणात इंग्रजीत शिकलो नाही म्हणून बोंब होते. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता 'कालाय तस्मै नमः' म्हणत इंग्रजी शाळा बरी असा साधा, सोप्पा दृष्टीकोण होता. हे 'इंग्रजी माध्यमातून शिक्षण' वालं विधान जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा श्री आणि सौ तीर्थरूप चिडले होते. 'तुला मराठी शाळेत घालून तुझं नुकसान झालं का?' असा अपेक्षित प्रश्न त्यांनी विचारला. "नुकसान झालं नाही पण फायदाही झाला नाही" असं उलट विधान करून मी मोकळा झालो. पण आज तो कार्यक्रम पहिला आणि थोडं टेन्शन आलं-काही महिन्यांपूर्वी पाचवीतल्या बहिणीशी झालेलं बोलणं आठवलं-तिने बोलता बोलता वाक्य टाकलं होतं- "आम्ही फ्रेंड्स 'हमेशाच' मस्ती करतो"- माझी विकेट गेली होती तेव्हा! 'हमेशा?'..आज तो कार्यक्रम पहिला आणि  लगबगीने मावशीला फोन केला. तिला बाकी सगळं सोडून 'मुक्ताला मराठी वाचायला/बोलायला शिकवते आहेस ना?' हाच प्रश्न विचारला. त्यावर मिळालेलं उत्तर काहीसं आनंदी धक्का देणारं होतं- दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवी इयत्तेला मराठी विषयाला 'पाठ्यपुस्तक' म्हणून 'शामची आई' आहे!पाचवी-सहावी 'शामची आई' आणि सातवीत 'बनगरवाडी' असल्याचं कळलं.प्रत्येक धड्याच्या शेवटी प्रश्नोत्तरं नसतात आणि सबंध पुस्तकच अभ्यासक्रम म्हणून वर्षभर असतं हे कळलं. 'तिला हळूहळू चिं.वि. जोशी किंवा पुलं दे वाचायला' असं म्हणून मी फोन ठेवला. मग मराठी माध्यमात शिकूनही मी बंडखोर विचारांचा कसा झालो ते माझं मला जाणवलं.
          साधारण चौथीपर्यंतचा बालभारतीचा काळ मला नीटसा आठवत नाही. चौथीत 'आई' कविता होती. तिचा अर्थ सांगताना गवाणकर बाई रडल्या होत्या आणि कारण माहित नसताना वर्गात सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आल्याचं आठवतंय!पाचवीत काय मराठी शिकलो ते अजिबात आठवत नाही. सहावीत 'दमडी' नावाचा पहिला धडा होता. 'दमडी' नावाच्या एका मुलीची जगण्यासाठीची धडपड वगैरे, तिला बाजारात तळली जाणारी शेव दिसणं, स्वप्नात डोक्यावर गवताच्या पेंडीच्या जागी शेवेचा भारा दिसणं असा काहीसा धडा होता. निव्वळ कथा म्हणून त्याहूनही जास्त मुल्यकथा म्हणून ही गोष्ट वाचणं, शिकणं वेगळं आणि दमडीच्या फाटक्या कपड्यांची वर्णनं करायला लागणारी उत्तरं गृहपाठाला किंवा पेपरात लिहिणं वेगळं. सहावीत हे कळायचं वय नव्हतं. सहावी वसईतल्या शाळेतलं शेवटचं वर्ष! शिकवायला जोशी बाई होत्या. त्या प्रत्येक कवितेला छान चाल लावायच्या. त्यामुळे सहावीतल्या कविता आजही बऱ्यापैकी पाठ आहेत.अगदी 'सोबती तुम्ही मिळुनी चालणे' पासून ते 'मी फुल तृणातील इवले' पर्यंत बहुतेक सगळ्या. पण त्यातला अर्थ तेव्हा कितपत 'कळला' हा खूप महत्वाचा प्रश्न आहे..(यात सावरकरांची अजरामर 'सागरास' सुद्धा होती). सातवीपासून दहावीपर्यंतच्या मराठीत उल्लेखनीय असं काही विशेष आठवतच नाही. हां...एक शैली होती या सगळ्या पुस्तकांची..गद्य विभाग कुठल्यातरी बखर किंवा इतिहासकालीन कठीण मराठीतल्या धड्याने सुरु व्हायचा आणि 'नवसाहित्य' गटात मोडणाऱ्या कुठल्यातरी निबंधाने वगैरे संपायचा. पद्य विभाग सुद्धा असाच..कुठलातरी अभंग वगैरे आणि फटके, सुनितं करत मुक्तछंद टाईप कवितेत संपायचा. शिक्षण बोर्डाला आम्ही नेमकं काय शिकणं अपेक्षित होतं? शोकांतिका हीच आहे की मराठीच्या पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा किंवा कविता एखादा अपवाद वगळता लक्षात नाही. ना.सि. फडके हे कितीही थोर लेखक असले तरी त्यांचा 'काळे केस' हा लेख आम्ही अभ्यास म्हणून का वाचला?त्यावर प्रश्नोत्तरं का लिहिली? आज मागे वळून पाहताना वाटतं की मराठीच्या पेपरमध्ये एका वाक्यात उत्तरं, दिर्घोत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण हे प्रश्न असणंच फोल होतं. पत्रलेखन शिकताना आमचा पत्राच्या तपशिलावर कमी भर आणि निरर्थक गोष्टींकडे जास्त लक्ष..उदा. उजव्या कोपऱ्यात अ.ब.क. असे लिहून पत्ता लिहिणे, आईला पत्र लिहिताना प्रिय आणि बाबांना, शिक्षकांना आदरणीय लिहिणे जणू काही बाबा, शिक्षक प्रिय नसतातच! सहावी ते दहावीच्या काळात एकतरी आवडीचा पक्षी, प्राणी, अभिनेता, प्रवास असं सगळं असणं ही परीक्षेची गरज होती. अकरावी-बारावीत मराठी 'सेकंड लॅंग्वेज' होती. साठ्येमध्ये मराठीला 'ट्युटोरियल' नावाचा एक लेक्चर प्रकार चिकटवला होता. त्यात व्याकरण, अलंकार वगैरे शिकवायचे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरला मास्तर गोष्ट सांगायला लागले-'बालकवी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता डोंगरावर फिरायला गेले. तिथे त्यांना बगळे उडताना दिसले आणि मग त्यांना अचानक सुचलं- बलाकमाला उडता भासे...' त्या गोष्टीतली सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न न करता मी ती ट्युटोरियलस अटेंड करणं बंद केलं.
           हे सगळं निव्वळ मराठी या विषयापुरतं..शाळेत विज्ञान आणि गणित मराठीतून शिकणं ही शिक्षा होती हे नंतर कॉलेजला गेल्यावर जाणवलं. नववी-दहावीतलं बरचसं जीवशास्त्र, रसायन, भौतिक, बीजगणित, भूमिती अकरावी-बारावीत थोडं थोडं येतं. 'हायपोटेनीयस' म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून त्रिकोणाचा 'कर्ण' किंवा 'फर्न' हे 'नेचे' या कठीण शब्दाचं सोप्पं नाव आहे हे कळण्यात अकरावी गेलं. आम्हाला अकरावीत एक लेक्चरर होते.त्यांनी मराठी मिडीयममधून अकरावीत आलेल्या मुलांचा प्रॉब्लेम नेमक्या शब्दात मांडला होता. "मराठी माध्यमाची मुलं दर वेळी 'मराठी'तून विचार करतात- म्हणजे फिजिक्सचा किंवा वेक्टरचा एखादा कन्सेप्ट इंग्रजीतून ऐकायचा, मनातल्या मनात भाषांतर करून भाषांतर समजून घ्यायचं, समजलेल्या भागाची पुढच्या भागाशी लिंक लागावी म्हणून परत मनातल्या मनात त्या भागाचं इंग्रजीकरण करायचं- या सगळ्यामध्ये शिकण्याची, विचार करण्याची क्रिया मंदावते किंवा थांबते" हे जेव्हा पटलं तेव्हापासून ठरवून टाकलं की जेव्हा कधी कुठल्या लहान भावंडांना किंवा पुढच्या पिढीतल्या कुणालाही शाळेत घालायची वेळ येईल तेव्हा इंग्रजीचा आग्रह धरायचा. मी तसा नशीबवान कारण घरी सगळ्यांना वाचायची सवय असल्याने पाहिली कादंबरी मी सहावीत असताना वाचली, पण ज्यांच्या घरी आई-वडील वाचत नसत त्या लोकांना कुसुमाग्रजांची 'कणा' सारखी अप्रतिम कविता अभ्यासाला असूनही पेपरच्या दिवशी सोडून इतर दिवशी त्यांचं पूर्ण नाव सांगता येत नाही हे माझ्या लक्षात आलं. या उलट माझा एक इंग्लिश मिडीयमला शिकणारा मित्र घरची मंडळी वाचक असल्याने मला जाडजूड 'मृत्युंजय' घेऊन बसलेला सापडला तेव्हा मी 'मराठी घरी शिकवलं जाऊ शकतं, शाळा मात्र इंग्रजी हवी' या मताशी अजूनच ठाम झालो.  
          वय वाढलं आणि समज आली(?) तसं अजून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या.धर्म आणि जात यांचा संदर्भ काळाच्या ओघात 'संस्कार' आणि 'जीवनशैली' वगैरे गोष्टींपुरता मर्यादित न राहता जसा राजकीय झाला तसंच काहीसं भाषेच्या विशेषतः मराठी भाषेच्याबाबतीत महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालं आहे. एक राजकीय मुद्दा म्हणून मराठीकडे पाहिलं जातं. वर्षाकाठी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 'अध्यक्षीय भाषणं' गेल्या काही वर्षात उगाळून उगाळून 'मराठीत बोला, मराठी जगवा' हे तेच तेच मुद्दे मांडताना दिसतात....विषय खूप भरकटलाय का? हां...तर...मुद्दा असा की मराठी जगवण्याचा आपला अट्टाहास कितीही प्रामाणिक असला तरी त्यासाठी कुठल्या पद्धती अवलंबवायच्या हा खूप महत्वाचा प्रश्न आहे! मराठी शाळा जगवणं हा मला मुळीच योग्य पर्याय वाटत नाही. चांगलं साहित्य लिहिलं जाणं, असलेलं आणि नवीन लिहिलं जाणारं साहित्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. मराठी कशी वाचवावी वगैरे ब्लॉगचा मुळ विषय नाहीचे..विषय होता म.मि.वा. अर्थात 'मराठी मिडीयमचं वास्तव'!!(म.मि.वा.चा अर्थ समजून घ्यायला ब्लॉग वाचायला घेतला असेल आणि डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचं फीलिंग आलं असेल तर सॉरी बरं का!!)- मराठी माध्यमातून शिकणं म्हणजे नेमकं काय होतं हे सांगायची इच्छा होती. भा. पो. असतील अशी अपेक्षा. 

(एक प्रामाणिकपणे नमूद करतो की माझी शाळा या प्रकाराबद्दल किंवा कुठल्याही शिक्षकांबद्दल अजिबात तक्रार नाही..कदाचित चांगल्या शिक्षकांमुळेच यंत्रणेतला फोलपणा लक्षात यायला इतकी वर्ष लागली).

चैतन्य 

Monday, February 6, 2012

कोल्हा आणि द्राक्षं

इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून त्यांचा मोठेपणी व्यवहारात काही फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात आलेले अनुभव, भेटलेली माणसं लक्षात घेता पंचतंत्र, इसापनीतीमधले धडे न घेता त्यात लिहिल्याच्या उलट किंवा अजूनच काहीतरी भलतं जगात घडतं या मताचा मी झालोय.. म्हणून या वर्षी एक नवीन प्रयोग सुरु केला. वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नवीन स्वरूपात! आवडतायत का ते नक्की सांगा आणि आपल्या भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवायची जबाबदारी मी वाचणाऱ्या लोकांवर सोपवतो आहे! या प्रयोगातली  ही दुसरी गोष्ट. (पहिली गोष्ट इथे वाचा)
                                                                              **
कोल्हा आणि द्राक्षं (ईशान्यनिती  )


'लबाडी-धूर्तपणा आणि हुशारी-चतुरपणा यांच्यातला फरक नेमका कसा ठरवायचा बरं?' कोल्हा सकाळपासून याच विचारात गुंतला होता. कोल्हा या प्राण्याची जगात काय इमेज आहे हे अलीकडेच त्याला एका घुबडाकडून कळलं होतं. मागे एकदा त्याच्या एका पूर्वजाने जेव्हा एका सिंहाच्या गुहेबाहेरचे पायाचे ठसे पाहून आपला जीव वाचवला तेव्हा कोल्ह्यांना सगळे 'चतुर कोल्हा' म्हणायला लागले पण जेव्हा त्यांच्याच एका दुसऱ्या भाऊबंदाने कुठल्यातरी दोन प्राण्यांच्या भांडणानंतर त्यांची शिकार पळवली तेव्हा त्यांच्या जमातीचं नाव 'लबाड', 'धूर्त' असं पडलं. बुद्धिवादी कोल्ह्याला कुठल्यातरी एका प्रसंगामुळे त्याच्या जमातीची झालेली बेअब्रू सहन होत नव्हती. 
"बाळा, कसल्या विचारात गुंतला आहेस?" त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं.
त्याने वडिलांना घुबडाने सांगितलेली हकीकत सांगितली. ते ऐकून वडील विचारात पडले. 
"आपण कोल्ह्यांनी कधीच काही का केलं नाही? जंगलात आपली प्रतिमा किती मलीन झालीय माहितीय?" त्याने तावातावाने विचारलं.
"तुला काय वाटलं की आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्रयत्न केले नाहीत? आपण काहीही बोलायला गेलो तर सगळ्यांना आपण धूर्तपणे काहीतरी योजना आखतोय असलंच काहीतरी वाटतं. तुला सांगतो, ती शिकार 'चोरण्याची' दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी आपल्या जातीला, आपल्या बुद्धीला खूप मान होता. एका अर्थाने त्या अस्वल आणि लांडग्याच्या भांडणाचा फायदा घेणारा आपला भाईबंद आपल्यामध्ये उपजत असणाऱ्या बुद्धिमत्तेचं उदाहरण नाही का?" 
"ते सगळं जरी खरं असलं तरी हा युक्तिवाद तर्कशुद्ध नाही ना?जी आपल्याला हुशारी वाटते ती जगाला लबाडी वाटते.."
"बाळा, जगातल्या प्रत्येक प्रकारच्या जाती-जमातीच्या प्रत्येक श्रद्धा, समजुती, विचार तर्कशुद्ध आहेत असं वाटतं तुला?"
त्याने थोडा विचार केला. वडील म्हणतायत ते बरोबर आहे हे त्याला पटलं. 
"मला कळतंय बाबा तुम्ही म्हणताय ते..पण मला प्रश्न पडलाय की आपल्या बाबतीतल्या या संकल्पना, समजुती वगैरे आल्या कुठूनआणि त्याचं मुळ तरी तर्कशुद्ध होतं का?"
"हे सगळं जे काही घडलंय ना ते त्या इसाप नावाच्या एका माणसामुळे घडलंय..काही हजार वर्षांपूर्वी तो जंगलात राहायला आला, प्राण्यांनी त्याचं गोड बोलणं ऐकून त्याला इथे आश्रय दिला, नंतर त्याने इथल्या गोष्टी इतर मनुष्यांना जाऊन सांगितल्या. तरी नशीब त्या वेळी ते 'हे' नव्हतं..काय म्हणतात ते..ग्लोबल-"
"वॉर्मिंग??" कोल्ह्याने भाबडेपणाने विचारलं.
"वॉर्मिंग नाहीरे...ग्लोबल-लाय..झे...शन..हं..ग्लोबलायझेशन झालं नव्हतं ना तेव्हा....!त्यामुळे इसापच्या या बातम्या जगभर पोहोचायला काही शतकं लागली...आधी जगभरातल्या माणसांपर्यंत इथल्या गोष्टी पोहोचल्या आणि मग हळूहळू जगातल्या इतर प्राण्यांपर्यंत..बरं झालं असं की- इसापने एकाला 'एक' गोष्ट सांगितली..एकाने दुसऱ्याला सांगताना स्वतःच्या अकलेने त्यात भर घातली..असं करत इसापच्या मुळ गोष्टी भलत्याच तात्पर्यांसकट लोकांनी ऐकल्या.."   
"आता याला माणसांची लबाडी म्हणायचं की चतुरपणा?" 
"तुला आपल्या अजून एका पूर्वजाची गोष्ट सांगतो..ती ऐकून तुझं तूच ठरव की माणूस चतुर आहे की लबाड??की मूर्ख?"
"ओके" कोल्हा मान डोलवत म्हणाला. त्याचे बाबा गोष्ट सांगायला लागले.
"एक कोल्हा एकदा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात पोहोचला.."
"द्राक्षं?म्हणजे माणूस दारू का वाईन बनवायला वापरतो तीच फळं ना?"
"हो हो..तीच! तर तो बिचारा खूप थकला होता. त्याला तहान-भूक लागली होती आणि माणसांच्या प्रदेशात असल्याने 'मुक्तपणे' खायला-प्यायला काही मिळायची सोय नव्हती. त्या द्राक्षाच्या मळ्यात उंचावर द्राक्षं लागली होती. आता आपल्याकडे ना जिराफासारखी उंच मान आणि ना माकडांसारखी उड्या मारण्याची कला. तरी त्याने बिचाऱ्याने बराच वेळ उड्या मारून पंजाला काही द्राक्षं लागतात का ते पाहिलं. बराच वेळ प्रयत्न करून अपयश आल्याने तो तिथून निघून गेला. जाताना तो स्वतःशीच पुटपुटला- 'तशीही ती द्राक्षं आंबटच होती'. मग मळ्यातल्या कुठल्याशा कावळ्याकडून ही गोष्ट इसापला कळली. हुशार इसापने जाऊन जगाला सांगितली. जगातल्या थोर विचारवंतांनी निष्कर्ष काढला की कोल्ह्याला द्राक्षं खायला जमली नाहीत म्हणून तो त्यांना 'आंबट' म्हणून मोकळा झाला"
"ही गोष्ट तर त्या शिकार-चोरीच्या वर झाली" छोटा कोल्हा संतापला होता "मुळात आपण कोल्हे द्राक्षं खायला का जाऊ हा विचार कुणी केला नाही का?"
"अरे बाळा, त्या काळी म्हणे आपण सगळं खायचो..आपल्याला द्राक्षं तर विशेष आवडत असत म्हणे..महत्वाचा मुद्दा हा आहे की ही गोष्ट घडली की नाही याचा पुरावा नाहीयेच काही"
"म्हणजे??असं काही घडलंच नव्हतं?"
"त्याबद्दल पण खूप रुमर्स आहेत..कुणी म्हणतं ती कोल्ह्याने द्राक्षं खाल्ली आणि ती खरंच आंबट होती पण लोकांना काहीतरी मूल्यशिक्षण मिळावं म्हणून त्यांना खोटी गोष्ट सांगितली गेली.कुणी म्हणतं की तो कोल्हा खूप उपाशी होता, त्याला द्राक्षं मिळाली नाहीत म्हणून त्याने स्वतःची समजूत काढण्यासाठी 'द्राक्षं आंबट होती' असा शेरा मारला. आता जर का असं झालं असेल तर त्या बिचाऱ्या उपाशी कोल्हयाचं काय चुकलं? मग जगात नवीन विचारांचं वारं आलं, द्राक्षं न मिळालेल्या कोल्ह्याची गोष्ट 'बौद्धिक विरोधाभास सिद्धांता'चं सर्वोत्तम उदाहरण ठरलं. त्याला द्राक्षं हवी तर होती पण ती न मिळू शकल्याने अपराधी भावनेने किंवा चिडून आपली कमजोरी झाकायला त्याने मार्ग शोधला अशी आपल्या कोल्ह्यांच्या मनोवृत्तीची विश्लेषणं माणसाने केली"
"पण बाबा, नक्की यातली कुठली गोष्ट किंवा थिअरी खरी मानायची??"
"ते ज्याचं त्याने ठरवायचं...तू जगातल्या समजुतींची पाळं-मुळं तर्कशुद्ध आहेत का विचारलंस ना? म्हणून तुला हे सगळं सांगितलं. पण इतका विचार कर की सिंहाच्या गुहेच्या समोरचे पावलाचे ठसे पाहून स्वतःचा जीव वाचवणारा चतुर कोल्हा, लांडगा आणि अस्वलाच्या भांडणाचा फायदा घेणारा धूर्त कोल्हा असं म्हणता म्हणता तोच कोल्हा हा प्राणी द्राक्षांसाठी इतका हतबल होईल का?मला माणूस या प्राण्याची खूप गम्मत वाटते..आकाश निळ्या रंगाचं का ते त्याने शोधलं, झाडं हिरवी का ते त्याने शोधलं, पण आपल्या मुलांना इतर प्राणिमात्रांच्या गोष्टी सांगताना हवी तशी लिबर्टी घेतली. असो! आपल्या लहान पिलांना इतर प्राणी संस्कार वर्गांमध्ये वगैरे येऊन देत नाहीत. आज तूच विषय काढलास आणि आपल्या गप्पांमध्ये मी तुझ्यावर करायचे बऱ्यापैकी संस्कार आज पूर्ण झाले असं मला वाटतं...ओढ्यावर जाऊन यायचं का?अंधारसुद्धा पडलाय आणि मला खूप बोलून तहान लागलीय.."
विचारात गढलेला छोटा कोल्हा शून्यात पाहत वडिलांच्या मागे ओढ्याच्या दिशेने चालायला लागला. त्याचा प्रश्न अजून तसाच होता-
'लबाडी-धूर्तपणा आणि हुशारी-चतुरपणा यांच्यातला फरक नेमका कसा ठरवायचा बरं?' 
                                                                          ***