Pages

Sunday, June 24, 2012

जस्ट लाईक दॅट ३


आत्तापर्यंत :
                                                                          **
काही पेपरवर्क पूर्ण करायला आदित्यला दुसऱ्या दिवशी लगेच युनिवर्सिटीत  जायचं होतं. जीत आणि राज दोघेही बिझी होते. रमाला घेऊन मेघा जाणार आहे हे कळल्यावर त्यांनी आदित्यची त्या दोघींबरोबर जायची व्यवस्था करून टाकली. राजने त्याला अपार्टमेंटची एक किल्ली देऊन ठेवली. ते त्याला दुपारनंतर भेटणार होते.  
"ही मेघा..हा आदित्य" राजने ओळख करून दिली आणि तो पळाला. 
"हाय..झोप झाली का?" मेघाने पहिला प्रश्न विचारला.
"हो व्यवस्थित.."
"गुड..रमा आवरून खाली उतरते आहे..राजला घाईत जायचं होतं म्हणून त्याने मला लौकर बोलावून घेतलं..आपलं हार्डली १० मिनिटांचं काम आहे..मग परत येऊ आपण"
"अ..हो..मला कितीही वेळ लागला तरी चालेल..काही कामच नाहीये.."
"हो ते बरोबरच...तिथे ऑफिसमध्ये काही तमिळ आणि तेलगु पब्लिक पण येणारे..या सेमलाच आलेले लोक आहेत...तुम्ही दोघे भेटून घ्या..."
"हो..नक्की"
"नितीन येणार नाहीये या सेमला..त्याला एक्स्टेन्शन मिळालं आहे..तुला राज-जीत काही बोलले का?"
"हो..सकाळीच त्यांनी बॉम्ब टाकला..पण म्हणाले टेन्शन नको घेऊ..काहीतरी सोय होईल"
"हो रे..टेन्शन नको घेऊ..रमाचाही तोच घोळ होणारे...तिची पार्टनर म्हणून जी मुलगी येणार होती तिचा विसा रिजेक्ट झाला"
"ओह.."
"तुझा विसा झाला ना नीट?"
"अ..हो...काहीच प्रॉब्लेम नाही आला मला.." उत्तर देताना आदित्यच्या मनाने पुन्हा सगळ्या गोष्टींची उजळणी केली. 'छे! आपल्या आयुष्यातलं सगळंच इतकं निवांत झालं आहे...मग विसा कीस झाड की पत्ती??आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्लान केल्यासारखी निवांत झाली आहे!'
तितक्यात रमा आली. 
'काल माझी खरंच अर्धवट झोप झाली असेल किंवा ही मुलगी पण प्रवासामुळे दमून जास्त वेंधळी वाटली असेल..खरंच छान दिसते ही...अमुपेक्षा थोडीशी जास्तच!' आदित्यने मनात म्हटलं.
"हाय" रमाने सुरुवात केली. 
"तुम्ही भेटला आहात ना एकमेकांना?" मेघाने विचारलं.
"ओह..येस येस!!" आदित्यने उत्तर देऊन रमाकडे हसून पाहिलं.  
आपापसात तमिळ आणि तेलगुमध्ये बोलणारे तीन-चार लोक त्यांना इंडियन स्टुडन्टस कमिटीच्या ऑफिसमध्ये भेटले. काही मास्टर्सला आले होते. त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था नक्की झाली होती. त्यातल्या एका मुलाने आदित्यला रूम-मेट हवाय का विचारलंसुद्धा. त्याने राज-जीतशी बोलून सांगतो असं उत्तर दिलं. परत येताना मेघाने दोघांना वाटेत सोडलं आणि ती कॉलेजला गेली.
"सो..आता काय करणारेस?" आदित्यने रमाला विचारलं.
"काहीच नाही..मेघाच्या घरी जाईन..दर्शुपण नाहीये..काहीतरी वाचत बसेन..त्या दोघी येतील दोन तासात..मग त्या अपार्टमेंटसच्या केअर टेकरकडे जायचंय.."
"ओह..ओके ओके..मला तो राघव म्हणत होता की इथला केअरटेकर खूप फ्रेंडली नाहीये.."
"अवघड आहे मग..एकट्याला एक अख्खं अपार्टमेंट खूप खर्चिक होईल ना..."
"हो. पण हे सगळे म्हणतायत ना की होईल काहीतरी.."
"ते पण खरंच..तू काय करणारेस आत्ता?"
"विशेष काहीच नाही...मी पण बसून बोर होणारे..तू येतेस का? बसून काहीतरी विचार करू.."
दोघांनाही विशेष काम नव्हतं. खरंतर बसून काही विचार, चर्चा वगैरे उपयोगी नव्हत्या, कारण त्यांना तिथलं विशेष काहीच माहित नव्हतं. नवीन देशात, नवीन वातावरणात कुणीतरी सोबतीला हवं असतं हेच खरं..रमा हो म्हणाली आणि दोघे राज-जीतच्या अपार्टमेंटवर गेले. 
मग दोघांनी एकमेकांची पार्श्वभूमी, इथे कसे पोचले अशा सगळ्या गोष्टी शेअर केल्या. गप्पांची गाडी पुन्हा राहायची व्यवस्था या स्टेशनवर येऊन थांबली. 
"मला काल राज आणि जीत सांगत होते की इथे आलं की शक्यतो आपली भाषा बोलणाऱ्या माणसांमध्येच रहावं..आपल्या सवयी, कल्चर वगैरे सेम असतं..मला ते फारसं पटलं नव्हतं..म्हणजे अमेरिकेत येऊ स्वतःला इंडियन म्हणवून घेत पुन्हा इथे प्रांतिक वाद घातल्यासारखं झालं हे.."
"खरंय तू म्हणतोस ते..पण काल मेघाच्या घरी मनीषा आणि प्रिया आल्या होत्या. एकटी प्रिया कन्नड. आम्ही सगळे ती संभाषणात असावी म्हणून हिंदीत बोलत होतो. तू तुझ्या घरच्यांशी हिंदीत बोलला आहेस का कधी?"
"नाही गं..पण मला वाटलं की तू मुंबईत राहतेस म्हणजे तुला हिंदी भाषेचं काही वावगं नसावं."
"प्रश्न मी कुठे राहते किंवा मला किती भाषा येतात हा नाहीये..आता अमेरिकन्सच बघ..त्यांना फक्त इंग्लिश येतं. त्यांच्यासमोर इतर भाषिकांनी इंग्लिशमध्ये म्हणजे त्यांच्या भाषेतच बोलावं अशी त्यांची अपेक्षा असते..मग आपण ती अपेक्षा आपण ज्या घरात २४ तास राहतो तिथे का ठेवू नये..??" 
"खरं आहे तू म्हणतेस ते..मी आधी सोलापूरला होतो लहानपणी त्यामुळे तिथे खूप कानडी पहिले. नंतर मुंबईत २ वर्षं होतो इथे सगळे गुजराती आणि राजस्थानी. आणि आता पुण्यात तर मला ३-४ टाईपचं मराठी ऐकायला मिळतं...त्यामुळे मला सवय आहे बहुभाषिक समाजात राहण्याची"
"मग चांगलं आहे की..तुला त्या राघवने विचारलं आहेच रूम-पार्टनरबद्दल ..तू हो म्हणून टाक त्याला..प्रश्न माझाच येणारे..मेघा आणि दर्शनाकडे राहिले तरी मी कुणाची बेडरूम शेअर करायची यावरून त्यांच्यात कुरकुर होईल..आणि मला ते नकोय..पण बहुतेक काही पर्यायच नसणारे"
"हे बघ...फार काही झालं ना..आणि एकट्या-एकट्याने अपार्टमेंट घेउन खूप खर्च होणार असेल तर आपण एकत्र अपार्टमेंट शेअर करू" आदित्य चटकन बोलून गेला. रमा एव्हाना त्याच्याशी बोलून थोडी 'सैलावली' होती. ती पुन्हा सावध झाली आणि गप्प बसून राहिली. आदित्यला अचानक आपण काहीतरी मुर्खासारखं बोललो आहोत याची आयडिया आली. 
'तुला कुणीच मुलगी मदत करणार नसेल तर मी तुला हेल्प करेन..लेट्स बी पार्टनर्स' श्रीसुद्धा सेकंड यीअरला हेच बोलला होता. रमाच्या मनात विचार येऊन गेला.
"सॉरी..अगं मी गम्मत करत होतो..पण असे राहतात इथे लोक..मुव्हीसमध्ये वगैरे पाहिलंय मी अशी मुलं-मुली एकत्र राहिलेली..तू बघत असशील ना इंग्लिश मुव्हीस?" आदित्यने विषय बदलायला प्रश्न टाकला.
"होरे..मला माहितीय...आणि काहीच पर्याय नसेल तर आपण करू बरं का या ऑप्शनचा विचार.." रमा हसत म्हणाली. आता गप्प व्हायची पाळी आदित्याची होती. पुढचे काही सेकंद दोघे एकमेकांकडे पाहत, कसेनुसे हसत तसेच बसले होते. नवीन देशात, नवीन वातावरणात एकमेकांबद्दल अजिबात माहिती नसलेले दोन लोक काही वेळाच्या गप्पांमध्येच अचानकच वर्षानुवर्ष ओळख असल्यासारखे वागायला लागतात. 'जस्ट लाईक दॅट!'
"काय रे झालं का काम?" राज आत येत म्हणाला. त्याने रमाला पाहिलं आणि तो सावध झाला.
"हाय मी राज"
"मी रमा"

क्रमशः 

भाग ४ इथे वाचा

Wednesday, June 13, 2012

जस्ट लाईक दॅट २

जस्ट लाईक दॅट १ इथे वाचा
                                                                               **
आदित्यची टेम्पररी व्यवस्था जीत आणि राजच्या अपार्टमेंटमध्ये केली होती. तेवढे दोघेच महाराष्ट्रीयन..बाकी भारतीय होते पण सगळे साउथचे. आदित्यला आश्चर्य वाटलं.
"आपण भारतीय असल्याची जाणीव जरी परदेशात गेल्यावर खऱ्या अर्थाने होत असली तरी इथेही स्थानिक पातळीवर हा भाषेचा प्रश्न आणि भेद येतोच.." राज म्हणाला.
"हो ना..मी मुंबईत वाढलो..मला मेट्रो क्राउडमध्ये राहून कधी भाषेचं महत्व जाणवलं नव्हतं..ते कळायला अमेरिकेला यावं लागलं" जीत हसत म्हणाला.
"जेवून घे...याने भात आणि कांदा-बटाट्याचा रस्सा केलाय" राज किचनकडे हात करत म्हणाला.
"ग्रेट...तुम्ही जेवलात?"
"तू सुरुवात कर..मी जॉईन करतो तुला..याला जरा बाहेर जाऊन यायचं आहे" राजने उत्तर दिलं.
"तू शिकून आलास की नाही काही जेवायला करायला?"
"चहा, कॉफी, नुडल्स आणि खिचडी.." आदित्यने चार टिपिकल पदार्थ सांगितले. 
"शिकावं लागेल तुला सगळं! नाहीतर अवघड आहे" 
"बाय द वे..तुझ्याबरोबर आली तिचं नाव रमा ना?" जीतने शूज घालत विचारलं.
"हं..रमा फडके!" आदित्य भातावर रस्सा ओतत म्हणाला.
"भारी बेब आहे रे..तुम्ही बरोबरच आलात का?"
"हो रे..म्हणजे हे मला इथे कस्टम्स झाल्यावर कळलं की ती माझ्या फ्लाईटला होती..रस्सा छान आहे"
"लई वाईट नशीब राव..तुला ती येणारे माहित नव्हतं?" जीतला रस्स्याच्या कौतुकाशी काही देणं-घेणं नव्हतं.
"नाहीरे मला इतका वेळच नव्ह्ता. तुला मेल करायचो तेवढंच."
"म्हणजे तुला तिच्याबद्दल काहीच माहित नाही?म्हणजे ती सिंगल आहे की..."
आदित्यला एकदम त्याने तिच्या सिंगल असण्यावर प्रश्न विचारल्यावर थोडं नवल वाटलं.
"माहित नाही रे..मला कुठे तिच्याशी लग्न करायचंय?" त्याने हसत विषय संपवायचा प्रयत्न केला. 
"तसं नाही रे..आजकाल जेवढ्या मुली येतात ना त्यांची लग्न झालेली असतात किंवा ठरलेली असतात..एखादी इतकी चांगली दिसणारी मुलगी आली की ती सिंगल आहे का हा पहिला प्रश्न असतो"
"असो..माझ्याबरोबर जो अपार्टमेंट शेअर करणार होता तो आला का??" आदित्यने विषयांतर केलं. जीत आणि राजने एकमेकांकडे पाहिलं.
"तू सावकाश जेवून घे...आराम कर आज रात्री..दमून आला आहेस..आपण बोलू उद्या निवांत..घरी फोन करायचा असेल तर याचा मोबाईल वापर" आदित्यला ते काहीतरी सांगता सांगता थांबले असं वाटत राहिलं. 
त्याला त्यांची अपार्टमेंट आवडली होती. दोघांनी आदित्यपेक्षा रमाची जास्त चौकशी केली होती. दोघांनाही गल्फ्रेंड नसावी म्हणून ते एवढे हातघाईला आलेत अशी त्याने मनाशी खुणगाठ बांधली.

दुसरीकडे रमाची राहायची सोय मेघा आणि दर्शनाकडे केली होती. रमा पोहोचली आहे कळल्यावर तिथे राहणाऱ्या अजून दोघी मनिषा आणि प्रियासुद्धा तिच्याशी ओळख करून घ्यायला आल्या. मुलांप्रमाणे महाराष्ट्रीयन मुलीदेखील कमीच होत्या. मेघा, दर्शना आणि मनिषा अशा तिघीच. प्रिया बँगलोरची होती. त्यामुळे ती असताना सगळे हिंदीत बोलायचे.  
"फ्लाईट कैसी थी??" 
"ओके..जर्मनी में ४ घंटे का ले-ओवर था.."
"ओह..तुने घर फोन कर लिया?" 
"हां..एअरपोर्ट पे लेने जो लोग आये थे उनके फोन से फोन किया था"
"गुड, अगर वापस करना हो तो बोलना.."
"तुम लोगोंका खाना हो गया?" 
"नही..ये आने का वेट कर रहे थे...अभी खाएंगे" 
"ओह गुड..तो तुम लोग खाना खा लो..सुबह मिलेंगे" म्हणून मनिषा आणि प्रिया निघून गेल्या.
"तुम्ही माझ्यासाठी जेवायला थांबलात?"
"थांबलो वगैरे नाही गं...रोज साधारण याच वेळी जेवतो आम्ही..त्या दोघी लौकर जेवतात..त्यांना आपण जेवायला थांबलोय असं म्हटलं नसतं तर अजून बसून राहिल्या असत्या.." मेघा म्हणाली. 
तेवढ्या वेळात दर्शुने प्लेट्स, पाणी घेतलं होतं आणि भात पानांमध्ये वाढायला सुरुवात केली होती. जेवायला सुरुवात केल्यावर पहिला हमखास प्रश्न दर्शुनेच विचारला-
"तुला जेवण करता येतं ना गं?" 
"हो..येतं"
"ग्रेट..पोळ्या येतात?"
"हो..म्हणजे मी टाईमपास म्हणून काही थाई आणि इटालियन कुकिंगचे क्लास पण केलेत.." मेघा आणि दर्शुने एकमेकींकडे विक्षिप्तपणे पाहिल्याचं रमाच्या नजरेतून सुटलं नाही. तिला पुन्हा आपण 'गर्दीतून' बाहेर उभे राहतो आहोत असं फिलिंग यायला लागलं.
"अगं हिला त्या अनिताचं सांगितलं का?" मेघाने विचारलं.
"काय झालं तिचं?" रमाने विचारलं.
"अगं तिचा विसा रिजेक्ट झालाय..सो ती येणार नाहीये.." 
"मग आता??ती माझ्याबरोबर अपार्टमेंट शेअर करणार होती ना?"  
"हो..पण ती येत नाहीये..आम्ही दुसरं कुणी येतंय का त्याची चौकशी करायला लावली आहे...इथल्या केअर टेकरशी थोडे दिवस तुला थर्ड रूम-मेट म्हणून घेण्याबद्दल उद्या बोलूच आपण.." 
"तो हो म्हणेल ना?"
"नाही का म्हणेल तो? आपण सांगू की काही ऑप्शन नाहीये म्हणून...मुलांकडे पण तेच होणारे..."
"का?"
"तुझ्याबरोबर तो आदित्य परचुरे आलाय ना..त्याच्याबरोबर अपार्टमेंट नितीन शेअर करणार होता. पण नितीन गेलाय इंटर्नशिपला आणि त्याला तिथे एक्स्टेन्शन मिळालं आहे आणि तो अजून ६ महिने तरी येणार नाहीये..सो  आदित्यलाही कुणी पार्टनर नाहीये..." 
"मग आता?"
"आता तू टेन्शन घेऊ नको..सगळं होईल नीट..विचार नको करू..काही वेळी आपण उगाच फार विचार करत बसतो..गोष्टी व्हायच्या तशा होणारच आहेत... 'जस्ट लाईक दॅट!'..डोन्ट वरी..!


Tuesday, June 12, 2012

त्यांचा दृष्टीकोण

              भारतातली सगळ्यात प्राचीन विद्यापीठे आजच्या बिहार राज्यात आहेत तर सगळ्यात प्राचीन धर्मक्षेत्रे उत्तर प्रदेशमध्ये! पण इतिहासाकडे थोडं कानाडोळा करून जर का वर्तमान पाहिलं तर महान संस्कृती असणारी  ही दोन्ही राज्यं गेल्या तीस चाळीस वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या दृष्टीने डोकेदुखीच ठरलीयत किंबहुना महाराष्ट्रात काही राजकीय पक्ष आज या उप्र आणि बिहार मुद्द्याचा प्रमुख पक्षीय अजेंडा म्हणून सर्रास वापर करताना दिसतायत. खरंच बिहारी किंवा उत्तर प्रदेशी 'भैय्ये' या प्रश्नाकडे कसं पाहतात याचा विचार कुणी करत नाही. आपल्याकडचे राजकीय पक्ष त्यांना 'मारहाण' करायची संधी शोधत असतात तर तिथले नेते आणि या मंडळींच्या संघटना त्यांचं वैचारिक दारिद्र्य चव्हाट्यावर मांडत असतात. मी कोणत्याही प्रादेशिक राजकीय पक्षाचा पुरस्कार करत नसलो तरी मला शिवसेना किंवा मनसेसारखे पक्ष त्यांच्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात कारण आपल्या संविधानाने भाषावार प्रांतरचना करून त्यांना ती संधी दिलीय त्यामुळे संविधान रचना विचारपूर्वक करायला हवी होती अशी कमेंट या विषयावर मी केली तर कुणाला राग येता कामा नये. तर..मुळ मुद्दा..उत्तर प्रदेशी आणि बिहारी यांचा 'महान राष्ट्री' किंवा मुंबई नगरी येण्याविषयी आणि इथल्या विरोधाला असणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल! मला गेल्या तीन चार वर्षात दोन बिहारी भेटले. त्यांनी मांडलेले विचार प्रातिनिधिक म्हणून योग्य वाटले म्हणून लाऊड प्रमोशन करायला या पोस्टचा घाट घातला. माझा त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा भाग आठवतोय तसा लिहितोय. 

                 पहिले सद्गृहस्थ भेटले एका पुणे-मुंबई प्रवासात पुण्याहून परत येताना. सहज ओळख होऊन गप्पा सुरु झाल्या. बोलताना मुंबईतले बिहारी आणि युपीच्या भैयांचा विषय निघाला. तो म्हणाला "मला राज ठाकरे योग्य वाटतात..त्यांचा बिहारी आणि युपीच्या लोकांना असणारा विरोधदेखील योग्य आहे. आमच्याकडची माणसं येतात ती एकटी येत नाहीत, बरोबर अख्खा परिवार, अख्खा गाव घेऊन येतात. स्वच्छ राहत नाहीत. त्यांच्याकडे इथली कागदपत्रं नाहीत, रेशन कार्ड नाहीत. मी गेले पंधरा वर्ष विरारमध्ये राहतो आहे. मला एका चांगल्या पॅकेजिंग मटेरियल बनवणाऱ्या कंपनीत नोकरी आहे. माझं रेशन कार्ड इथलं आहे. मी माझ्या गावाहून कुणालाही नोकरी देतो म्हणून माझ्याकडे बोलावून घेतलेलं नाही. माझ्या घरात मी, माझी बायको आणि दोन मुलं असे चौघेच जण राहतो. एका खुराड्यासारख्या खोलीत १०-१२ माणसांमध्ये मी राहिलेलो नाही आणि राहणाऱ्या लोकांना माझा विरोध आहे"
मी म्हटलं की "तुमची स्पष्टं मतं मला आवडली पण मग बिहारमधून येणारे लोक का कमी होत नाहीत?" त्याचं उत्तर आशादायक म्हणायचं की निराशाजनक हे मला अजून समजलं नाहीये. तो म्हणाला- "अर्धा अधिक बिहार नदीला येणाऱ्या पुराने वैतागलेला असतो. उरलेला राजकीय आणि सामाजिक परिस्थितीने खचून गेलाय. सध्या नितीशचं सरकार आहे. पण आधीच्या लालू सरकारने गेल्या काही वर्षात इतकी वाट लावून ठेवलीय की नितीशला निदान १५ वर्षं तरी जातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात..विकास वगैरे तर त्याच्या नंतरच्या गोष्टी झाल्या. गुंडाराज आणि राजकीय दबावात कोण राहील तिथे?" 

            ही घटना जवळपास ३ वर्षांपूर्वीची. मला त्या गृहस्थाचं नाव आठवत नाही. त्याने मला त्याचं कार्डसुद्धा दिलं होतं. मला त्याच्या कंपनीत नोकरी हवी असेल तर मदत करेन हेसुद्धा म्हणाला होता. परदेशी जायच्या धावपळीत त्याचं कार्डही हरवलं आणि त्याचं नाव पण विस्मृतीत गेलं. पण त्याची मतं मला प्रातिनिधिक वाटल्यामुळे मी जेव्हा जेव्हा गप्पांमध्ये हा विषय निघाला तेव्हा कित्येक लोकांपुढे मांडली. 

             गेल्या आठवड्यात भारतात परतल्यावरच्या पहिल्याच रिक्षाप्रवासात रिक्षाचालक अवलिया निघाला. तो पहिल्या बिहारीपेक्षा जास्त सडेतोड आणि मुद्देसूद होता. मी एका रिक्षावाल्याला एका कंपनीत काम करणाऱ्या ऑफिसरच्या तुलनेत उजवं का म्हणतोय ते त्याच्याशी झालेलं संभाषण वाचल्यावर लक्षात येईल. आमच्या गप्पांची सुरुवात मुंबईतल्या रिक्षावाल्यांची सायकॉलॉजीपासून होऊन युपी, बिहारी भैय्यांवर येऊन पोहोचली. अतिशय शुद्ध हिंदीत तो बोलत होता. मला त्याचे संवाद तसेच लिहायला आवडलं असतं पण दुर्दैवाने माझं बम्बैया कम पुणेरी कम अमेरिकेत आंध्रच्या लोकांबरोबर बोलून सवय झालेलं हैद्राबादी हिंदी मिश्रित धेडगुजरी हिंदी काही उपयोगाचं नाही. त्यामुळे तूर्तास मराठीवर भागवतोय-

"तुम्ही कुठले? युपी की बिहार?" मी विचारलं.
"मी बिहारचा"
"बरं..छान...?" हा विषय सुरु व्हायला त्यानेच काढलेला गुजराती मालक आणि त्यांच्या भाषेला प्राधान्य देणाऱ्या पद्धती हा विषय कारणीभूत होता. मी आधी म्हटल्याप्रमाणे मला त्याची बोलायची स्टाइल आवडल्यामुळे मी त्याला बोलता करायला नवीन विषय काढला. "तुम्हाला युपीच्या लोकांबद्दल काय वाटतं हो???म्हणजे वाद नेहमी युपी आणि बिहारच्या लोकांवर असतो म्हणून विचारलं" त्यावर त्याने दिलेलं उत्तर- "सर, महाराष्ट्रात युपीचे भैय्ये आणि बिहारी यांना एकाच काट्यात धरतात. कदाचित ५ वर्षांपूर्वी असं करणं योग्यही होतं पण आता परिस्थिती बदलली आहे. मुंबई किंवा महाराष्ट्राला बिहारमधून येणारा माणूस सरासरी २६% कमी झालाय"
"असं काय बरं झालं बिहारमध्ये? नितीशचं सरकार इतकं चांगलं आहे?"
"सरकार बरं आहे. पूर्वीचं खूप वाईट होतं हे जास्त खरं. बिहारची आजची अवस्था मुंबईसारखी आहे!!"
"ती कशी काय?"
"मुंबई गेल्या काही वर्षात उजळून निघाली. लोकांकडे पैसा आला पण हिशोबाची गणितं बदलली. पूर्वी अपर मिडल क्लासचं इन्कम आज लोवर क्लासचं इन्कम आहे. महिन्याच्या बेरजा-वजाबाक्या सामान्य माणसाला आहेतच की..थोडक्यात काय तर लखलखाट आहे पण कंडीशन तीच. बिहारमध्येही तसंच..लखलखाट आहे आता पण कंडीशन तीच. युपीबद्दल विचाराल तर लखलखाट तर नाहीच..कंडीशन पण तशीच!"
"मग असं असूनही बिहारमधून येणाऱ्या माणसाची सरासरी घटली??"
"सर, पूर्वी एक-दीड हजार मिळायचे तिथे आता ३-४ मिळतात. पण त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात मुंबईत येऊन राहिलेल्या आमच्याकडच्या लोकांचे घटस्फोट वाढले, तब्येतीच्या कुरकुरी वाढल्या. पोटाच्या आणि शरीराच्या गरजा असतात ना...इथे पुरुष घरचं पौष्टिक जेवण खायच्या ऐवजी बाहेर खाणार आणि बाईची लफडी करणार..तिकडे बायका गावात उरल्या सुरल्या पुरुषांकडे आपल्या गरजा भागवायला जाणार. चूक कुणाची म्हणायची?? माझा भाऊ होता मुंबईत..सगळं जाणवलं तेव्हा परत गेला. मी सुद्धा जाईन वर्षभरात.."
"मग या गोष्टी युपिवाल्याना लागू होत नाहीत? ते नाही जात परत...?"
"युपीचं काय घेऊन बसलात साहेब..या गोष्टी तिथेही आहेतच..पण शेवटी पैशांचा प्रश्न आला तर बिहारची स्थिती आशादायक आहे आत्ता..युपीचं काय? आत्तापर्यंत आठ वेळा देशाला पंतप्रधान देणारं राज्य असून त्याची कधी प्रगती झाली नाही तर आता काय खाक होणार?राजीव गांधी आणि व्ही.पी.सिंगच्या काळात सगळ्यात जास्त भैय्ये मुंबईत आले यातच सगळं आलं. काँग्रेसला गेल्या २५ वर्षात कधी सत्ता नाही मिळवता आली. तिथल्या प्रादेशिक पक्षांचे लागेबांधे आहेत आणि काय...जीवाचं रान करतात पण काँग्रेसचं सरकार येऊन देत नाहीत. मायावती स्वतःचे पुतळे बनवून फसली. आता अखिलेशने काही केलं तर पाहू" मला जिथे पोहोचायचं होतं ते ठिकाण आलं होतं आणि म्हणून आमचं संभाषण थांबलं. रिक्षाचा मीटर बंद असता आणि मला खूप वेळ असला असता तर मला त्याच्याशी अजून बोलायला आवडलं असतं. अर्थात इतक्या वेळात मारलेल्या गप्पा अजून काही मिनिटं विचाराधीन ठेवण्यास सक्षम होत्या. 
            दृष्टीकोण!! बिहारींचा दृष्टीकोण! होतं असं की बिहारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भेळवाला, भाजीवाला किंवा अगदीच सोफेस्टीकेटेड विचार करायचा तर लोकसभेत पथेटिक इंग्रजी बोलणारा लालू आठवतो. त्यामुळे त्यांचा काही सेन्सिबल अप्रोच असू शकतो हे कधी कधी चटकन स्वीकारणं होत नाही. असो..पण असे एक-दोन लोक भेटले की आपला दृष्टीकोण थोडा वस्तुनिष्ठ आणि वास्तववादी  होतो हे खरं..!!चैतन्य 


Monday, June 11, 2012

जस्ट लाईक दॅट १

                                                                              *** 
               अमेरिकन एअरपोर्टवर उतरताना सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. सर्वसाधारणपणे लोकांना युनिवर्सिटीला अप्लाय केल्यापासूनचे क्षण आठवतात पण त्याला सगळंच आठवत होतं. वडील सरकारी नोकरदार असल्यामुळे शाळा तीन वेळा बदलली गेली. एका शाळेत खेळाला प्राधान्य होतं, एका ठिकाणी शिक्षणबाह्य स्पर्धांना तर एका ठिकाणी अभ्यासाला. त्यामुळे विशेष अशी कुठल्या गोष्टीची आवड निर्माण होणं वगैरे निदान शालेय जीवनात झालंच नाही. मित्र, घरं, वातावरण सतत बदलत राहिलं! त्यात सुदैव की दुर्दैव ठाऊक नाही पण त्याची शाळा संपली आणि दोन वर्षात वडिलांनी नोकरीतून व्होलेंटरी रिटायरमेंट घेऊन पुण्यात जागा घेतली आणि लहानसं पुस्तकं विकायचं दुकान सुरु केलं. पुण्यात कॉलेज करायचं म्हणून त्याने ओघानेच आधी स.प. मध्ये बी.एस्सी आणि मग फर्ग्युसनमधून एम. एस्सी. केलं. सगळं विशेष काही न ठरवताच होत गेलं. आई-वडील पुण्यात रमले होते. नातेवाईक सुद्धा बरेच होते. त्यातल्याच कुणीतरी त्याला अमेरिकेला जायला प्रयत्न करायला सुचवलं. मार्क बरे होते म्हणून की डॉक्युमेंट्स बरोब्बर मिळाली म्हणून की निव्वळ वेळ जुळून आली म्हणून ते माहित नाही पण त्याला एका चांगल्या विद्यापीठाकडून प्रवेश मिळाला. पहिल्या वर्षाची फीसुद्धा स्कॉलरशिप म्हणून मिळणार होती! विसाचं काम विनसायास होऊन आदित्य परचुरे अमेरिकेला निघाला. त्याला जाणवलं की त्याच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट अशीच न ठरवता, प्लान न बनता घडली होती. 'जस्ट लाईक दॅट!' त्यामुळे अमेरिकन ऑफिसरने त्याला जेव्हा विचारलं- 'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट?' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय?) त्यावर त्याने नादानादात उत्तर दिलं- 'आय डोंट नो' (मला माहित नाही). अमेरिकन अधिकारी गोंधळला. त्याने भुवया उंचावत विचारलं- 'सॉरी?'..आदित्य भानावर आला आणि त्याने उत्तरं द्यायला सुरुवात केली. 
       साधारण चार ते पाच 'बूथ ' पलीकडे एका बूथमध्ये बसलेला एक जाडजूड गोरा अधिकारी त्याच्या हातात समोरच्या इंडियन मुलीने दिलेला पासपोर्ट चाळून पाहत होता. 'प्रीटी गर्ल '  तो मनात म्हणाला. त्यानेही तिला सेम प्रश्न विचारला-  'व्होट इस द पर्पस ऑफ युअर व्हिसीट?' (तुमचा या देशात येण्याचा हेतू काय?). रमा फडकेचं उत्तर तयार होतं. 'एजुकेशन'. तिचं कायम असंच असायचं. उत्तरं तिच्याकडे कायम तयार असायची. शाळेत वाद-विवाद आणि क्विझ जेव्हा जेव्हा व्हायच्या तेव्हा रमाचा पार्टनर कोण इतकंच काय ते ठरवलं जायचं. आठवीत असेपर्यंत मुलं-मुलींमध्ये स्पर्धा व्हायची त्या दुसऱ्या जागेसाठी. पण सगळं फुटेज रमालाच मिळतं हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं आणि रमाला माणसं लांब करायला लागली. दहावीत बोर्डात येणं असो किंवा भरतनाट्यममध्ये बक्षिसं मिळवणं असो, गर्दीतून वेगळं उठुन दिसणं हे जणू काही तिच्या पाचवीला पूजलं होतं. लहान वयातच तिला याची कल्पना आली आणि मग सुरु झाला आजपर्यंत न संपलेला प्रवास: 'गर्दीतलीच एक  सर्वसामान्य मुलगी होऊन राहण्याचा'. घरून करिअर कशात करायचं याचं बंधन नव्हतं. रमाने मेडिकल  केलं नाही याचं दुःख फडकेंना असलं तरी त्यांनी तिला कायम हवं तसं वागू दिलं.मुळात हुशात असणं ही काही चुकीची गोष्ट नव्हती पण रमाने स्वतःच्या हुशारीचं दडपण घेऊन ठेवलं..'जस्ट लाईक दॅट!'. मुंबई युनिवर्सिटीमध्ये एम. एस्सिला नंबर आल्यावर एच.ओ.डी. नी मागे लागून तिच्याकडून अमेरिकन युनिवर्सिटीसना ऍपलीकेशनस करून घेतली. पुन्हा एकदा रमाचा गर्दीत 'फिट इन' होण्याचा चान्स गेला आणि तिला एका मोठ्या युनिवर्सिटीमध्ये सरळ पी. एच. डीला ऍड्मिशन मिळाली. भारतापासून अमेरिकेत येण्यापर्यंतच्या प्रवासात तिने विचार करून झाला होता की 'आता मी अमेरिकेत शिकणारे..इथे मुळातच गर्दी नाही, प्रत्येक माणूस स्वतःची ओळख जपूनच वावरतो. इथे आपण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करायचं..नो मोर एफर्टस टू फिट इन"
   सगळे सोपस्कार आटपले तेव्हा आदित्यने नवीन वेळ सेट केलेल्या घड्याळात पाहिलं. त्याला घ्यायला येणारी मुलं येऊन १५-२० मिनिटं तरी झाली असणारेत. तो त्यांनी सांगितलेल्या गेट नंबर बद्दल  चौकशी करायला लागला. तिथल्या एका लेडी ऑफिसरने त्याला पुढे जात असलेल्या एका पाठमोऱ्या मुलीच्या मागे जायला सांगितलं. आदित्यने थोडं पुढे होत तिला हाक मारली.
"हाय..यु गोईन टू गेट १७?"
"येस"
"ओके..आय ऍम हेडिंग द सेम वे"
"ओके"
पुढे चालत जाताना आदित्य परचुरे आणि रमा फडकेची एकमेकांशी पहिल्यांदाच ओळख झाली. तेव्हा पुढे काय होणारे याची त्यांनाच कल्पना नव्हती.