Pages

Tuesday, June 2, 2015

नाईटमेअर भाग ४ (अंतिम)

सूचना: कथेचा या आधीचा भाग लिहून बराच काळ उलटून गेलाय. मधल्या काळात लिहायला अनेक कारणांनी वेळ झाला नाही. उरलेली कथा आणखी दोन भागात लिहून पूर्ण करायची असा मुळात विचार होता. परंतु एकूणच झालेला उशीर पाहता मी एकच भाग लिहिलाय-- आणि अर्थात तो बराच मोठा झालाय! एखादी कथा ब्लॉगवरून अनेक भागांत लिहिताना कथेचा दर्जा आणि वाचकांचा इंटरेस्ट कायम ठेवणं  थोडं अवघड असतं याची मला कल्पना आहे. मी शेवटच्या भागात सर्व कथा एकसंध राहील हा प्रयत्न केलाय. तो यशस्वी झालाय की नाही हे वाचकांनी ठरवायचं आहे. आधीचे भाग वाचलेले लोक शेवटचा भाग वाचतीलच परंतु नवीन वाचकसुद्धा पूर्ण कथा वाचून प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे. चुभूद्याघ्या!

भाग १, भाग २, भाग ३
                                                                           **
"श्रीकांत…मित्रा…रडू नकोस असा!" श्रीकांत खूप वेळ रडायचं थांबत नाहीये हे जाणवल्यावर अनुपम पुढे होत म्हणाला. त्याने पहिल्यांदाच श्रीकांतचा एकेरीत उल्लेख केला होता. श्रीकांतसुद्धा क्षणभर चपापला. 'आपल्याला ब्लू लेबल पाजून अनुपमने आपला एकेरी उल्लेख करण्याचा अधिकार प्राप्त केला आहे' अशी त्याने मनाची परस्पर समजूतसुद्धा घातली.
"ते तुम्हाला म्हणणं सोप्पं आहे हो…'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' असं उगाच नाही म्हणत!"
"बरोबरे…पण मला पूर्ण गोष्ट ऐकायची आहे…गेल्या महिन्यातल्या अपघातापासून ते आज तुम्ही इथे कसे पोहोचलात पर्यंत!"
त्याचा प्रश्न ऐकून श्रीकांत मागे वळला. त्याने डोळे पुसले. दारूचा बऱ्यापैकी अंमल त्याला स्वतःच्या चालण्यात-बोलण्यात जाणवत होता. अनुपमने केलेली चौकशीसुद्धा बरी वाटत होती. 'नाहीतरी आपल्या दीड दमडीच्या आयुष्याची कथा आणि चिल्लर तत्वज्ञान एरव्ही कोण ऐकून घेतो??' त्याने पुढे सांगायला सुरुवात केली.
"अपघात झाला तेव्हा मोठा गदारोळ झाला…कंडक्टर माझा दोस्त…जमावाने मला शोधून मारण्याआधी त्याने मला तिथून पळ काढायचा सल्ला दिला. त्याची पण फाटली होती म्हणा…पण मला नंतर कळलं की मी पळून गेलोय सांगून त्याने स्वतःचा मार वाचवला आणि मला अजून खड्ड्यात पाडलं. मला कामावरून सक्तीची सुट्टी दिली गेली…पोलिसांनी माझ्या नावाचं वोरंट काढलं. पेपरवाल्यांनी माझ्या नावाने बोंबाबोंब सुरु केली. बसवाल्यांनी आधी माझं नाव लीक केलं नव्हतं. पण शेवटी प्रेशरमध्ये येऊन त्यांनी माझं आडनाव मिश्रा असल्याचं प्रेसला सांगितलं…मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना मोकळं रानच मिळालं…कुठल्यातरी चौकात माझ्या नावाचा चिंध्यांचा पुतळापण जाळला म्हणे कुठल्यातरी कार्यकर्त्यांनी!"
"बापरे…मला मुंबईत राहून एवढे डीटेल्स माहित नव्हते"
"अजून संपलं नाही इथे…मला महिनाभराची कोठडी मिळाली…केस हिअरिंगला जायला वेळ लागणार होता…उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे खूप केसेस पेण्डिंग असतात म्हणे! म्हणून मी कोठडीत…आता तुम्हाला हे सगळं सांगताना एक गोष्ट जाणवली…कोठडीत असताना मी ३-४ दिवस नुसते झोपून काढले…खूप दिवसांनी दगदग नव्हती, कामाचा रगाडा नव्हता, खायला काय मिळेल याची चिंता नव्हती. दिवस-रात्र झोपत होतो…अनेक वर्षांनी शांत झोप लागत होती मला. पण शेवटी झोपेला पण लिमिट असते…आयुष्यभर निव्वळ अंगमेहनत केलेल्या शरीराला विश्रांतीचा कंटाळा आला…त्याला चलनवलन हवं होतं. मग मेंदूही जागा झाला…वास्तवात आलो. आपल्या हातून काय घडलंय याची खरी जाणीव मला तेव्हा झाली. तुम्हाला कुणाचा जीव घेण्याचा काही अनुभव आहे का हो कामत?" श्रीकांतने एकदम प्रश्न टाकला.
"अ…काय? असं का विचारतोयस?" अनुपमने चाचरत प्रतिप्रश्न केला.
"एवढ्यासाठी विचारलं की मी तुम्हाला जे काही सांगणारे ते तुम्हाला खरंच झेपेल, पटेल की नाही याची मला अजिबात खात्री नाहीये म्हणून…"
'आई-बाप मुलाचं वागणं बघून हाय खाऊन गेले…तर मुलाने त्यांचा जीव घेतला असं म्हणता येईल का? तसं असेल तर मग मला आहे अनुभव' अनुपम मनात म्हणाला.
"तू बोल…मी तुला समजून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करेन" अनुपमने अंधारातच श्रीकांतने फेकलेला कप उचलून त्यात थोडी ब्लू लेबल ओतली आणि त्याच्या हातात पुन्हा कप दिला. पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. आजूबाजूने रातकिड्यांचा अस्पष्ट आवाज अधूनमधून यायला लागला होता.
"मला असं जाणवलं की कळत-नकळत एखाद्याचा जीव घेणं ही खरंच जगातली सगळ्यात भयंकर गोष्ट आहे…पेपरात दहशतवादाच्या बातम्या वाचून, सिनेमात पाहिलेला रक्तपात बघून आपल्या जाणीवा अलीकडे इतक्या बधिर झालेल्या असतात की डोळ्यादेखत एखादा जीव गेलाय आणि तो आपण घेतलाय हे कळायलासुद्धा वेळ जातो…पण एकदा ते जाणवलं की आयुष्य अवघड होतं- डोळे मिटायचा प्रयत्न केला तरी तीच तीच दृश्य डोळ्यापुढे येत राहतात--एरव्ही आपल्या डोक्यात चांगल्या आठवणींची सुरेख दृश्य असतात पण आता आपला तोच मेंदू त्या भीषण घटनेची अधिकाधिक बिभत्स, भीतीदायक चित्रं निर्माण करून दाखवत राहतो--"
"म्हणजे तो आत्महत्येचा प्रयत्न त्या दृश्यांमुळे?"
"छे छे. तुम्ही कुणाचा जीव घेतलात की त्या कृत्याबद्दल तुम्हाला कितीही बरं-वाईट वाटत असेल तरी स्वतःच्या जीवाची किंमत जास्त जाणवायला लागते. आपला सर्व्हायवल इन्स्टीक्ट तेव्हा सर्वात जास्त तीव्र असतो"
"मी असा विचार कधीच केला नव्हता" अनुपम भांबावून म्हणाला.
"तुम्ही कधी कुणाचा जीवसुद्धा घेतला नव्हता!!" श्रीकांतने शांतपणे उत्तर दिलं. ब्लू लेबलच्या 'चालू' पेगने तो बराच शांत झाला होता.
"मग पुढे? तुमच्या सर्व्हायवल इन्स्टीक्टचा तीव्रपणा इतका कमी झाला की तुम्ही आयुष्यातून व्होलेंटरी रिटायरमेंट घेतलीत?" अनुपमने प्रश्न विचारणं थांबवलं नव्हतं.
"त्या मुलाचे वडील मला भेटायला आले. त्यांच्या वकिलाने त्यांना तसं करण्यास सक्त नकार दिला होता तरी ते आले. त्यांची गोष्ट माझ्यापेक्षा जास्त दारुण होती. त्यांचा मुलगा सहा महिन्यांपूर्वीच एका मोठ्या आजारातून बरा झाला होता. त्यांनी त्याच्या वाचण्याची आशा जवळपास सोडली होती. 'मुलगा नसला तर आयुष्य कसं काढायचं याचे प्लान्सपण आम्ही बनवले होते' असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याहातून घडलेला अपघात उद्दामपणे झाला, निष्काळजीपणाने झाला की निव्वळ दुर्दैवाने झाला हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. 'आजारात तो गेला असता तर आम्ही उपचाराला कमी पडलो या विचाराने आमचं आयुष्य खंत करण्यात गेलं असतं, आता निदान ते ओझं घेऊन तरी आम्हांला जगावं लागणार नाही. तुम्ही आमच्या मुलाला उद्दामपणे किंवा निष्काळजीपणे मारलं नाहीत एवढंच तुमच्या तोंडून ऐकायचं आहे- आमच्या जीवाला शांतता मिळण्यासाठी. माझ्या समाधानासाठी तुम्ही खोटं बोललात तरी चालेल, तुमच्या केसचा निकाल काय लागतोय याच्याशी मला अजिबात देण-घेणं नाही' असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या आवाजात, वर्तनात एक प्रकारचा थंडपणा होता. माझ्या अंगावर काटा आला. त्या क्षणाला मला माझ्या आयुष्याचा तुच्छपणा जाणवला. जीवाची किंमत जेव्हा सगळ्यात जास्त जाणवते तोपर्यंतच सर्व्हायवल इन्स्टीक्ट खरं, पण एकदा त्यातला फोलपणा, तुच्छ्पणा कुणी असा अनपेक्षितपणे उलगडून दाखवला की कोलमडायला होतं. आणि मग निराशेच्या परमोच्च क्षणांना माणूस तत्ववेत्ता होतो किंवा प्रवासी संन्यासी होतो किंवा आत्महत्या करतो. माझ्याकडे पहिले दोन पर्याय उपलब्ध नव्हते. सो मी तिसरा पर्याय निवडला"
अनुपमने हातातला पेग संपवला. तो बोलायचं टाळत होता. बाजूला ठेवलेली बाटली उचलून त्याने अंधारात डोळ्यापुढे धरली. आतमध्ये किती दारू उरलीय याचा अंदाज घेत थोडी पुन्हा कपात ओतली आणि पुन्हा प्यायला लागला.
"काय कामत? तुम्ही चक्क गप्प? संपले तुमचे प्रश्न?" अनुपम गप्प बसलेला पाहून श्रीकांतने हातातला कप पुढे करत त्याला विचारलं.
"खरं सांगू का?--तुम्हाला राग येईल कदाचित- पण मला आत्महत्या करण्यात खूप शौर्य असतं असं वाटायचं. पण तुमची गोष्ट ऐकल्यावर आत्महत्या करणं म्हणजे मला भेकडपणाचं लक्षण वाटायला लागलं आहे" अनुपमने शांतपणे उत्तर दिलं.
"सहाजिक आहे म्हणा ना- आयुष्याच्या क्षणभंगुरपणाचं कौतुक असणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाला आत्महत्या म्हणजे भेकडपणाच वाटणार. पण आयुष्याचा, त्यातल्या माणसांचा, घटनांचा क्षणभंगुरपणा मान्य करण्याचं मोठेपण माझ्याकडे नाही. तसं असतं तर कदाचित मला माझ्याहातून कुणी मेलंय याचंही काही वाटलं नसतं. मी प्रेसेंटइतकाच पास्टमध्ये जगतो, एवढं खडतर आयुष्य काढल्याने असेल पण कुठलीशी लहान-मोठी गोष्ट मिळाली की ती मिळाल्याचा आनंद साजरा करायच्या आधी ती गोष्ट मिळायची माझी लायकी होती का याचा विचार करतो. मेहनतीने जपलेली, कमावलेली गोष्ट गमावली की सुतक असल्यासारखा निराश होतो. म्हणूनच आयुष्यापुढे जेव्हा माझ्या अस्तित्वाचं खुजेपण मला जाणवलं तेव्हा मला ते नष्ट करणं जास्त श्रेयस्कर वाटलं"
"मी मगाशी म्हटलं तसं- तुमची कथा शोकांतिका नसून विनोदी आहे" अनुपम काहीसं छदमी हसला. श्रीकांतच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली पण तो गप्प बसून राहिला.
पाऊस बराच कमी झाला होता. पण अजूनही अधूनमधून ढग गडगडण्याचा आवाज येतच होता.
"किती वाजलेत?" श्रीकांतने विचारलं.
"पावणे तीन-- मला अजून एक प्रश्न पडलाय खरा-- एकीकडे तुम्हाला आयुष्यासमोर स्वतःच्या अस्तित्वाचं खुजेपण मान्य आहे पण तरी मगाशी 'आयुष्य खडतर असू नये' असं तुम्ही मगाशी म्हणालात- हा विरोधाभास का? तुम्ही आयुष्य जसं आहे तसं कबुल का नाही करू शकत?"
"कारण स्वतःच्या अस्तित्वाची आयुष्याच्या अथांगपणाशी तुलना करताना मी माझ्याशी नकळत जोडलेल्या इतर लोकांचं अस्तित्व नाकारून, झिडकारून टाकू शकत नाही म्हणून! म्हणजे बघा- माणूस लैंगिक संबंधांमधून जन्माला न येता स्वयंभू प्रकट झाला असता तर नातेसंबंध, भाव-भावना वगैरे प्रकार निर्माण झालेच नसते. तुम्ही म्हणता तसं सगळंच क्षणभंगुर असलं असतं. पण दुर्दैवाने तसं नाही. माणूस जन्माला येतो तेव्हा फिसिकली, मेंटली तो आईशी जोडलेला असतो. जेनेटिक्समुळे बापाशी, नातलगांशी जोडलेला असतो. मग प्रेम-वैर, आनंद-दुःख, आशा-निराशा, राग-लोभ अशा सगळ्या भावना ज्या थोड्या क्षणांसाठी उत्कट, पराकोटीच्या असतात तेव्हा तो आणखी माणसांशी जोडला जातो- मेंटली, फिसिकली! मग त्याच्या काडीमोल अस्तित्वाला किंमत येते- मग वाटतं- आपल्याला सुखी, समाधानी जगता यावं. पण ही इच्छा झाली, अट्टाहास नव्हे! म्हणून  तुम्ही म्हणताय तो विरोधाभास मला मान्य नाही"
"आणि मग हीच इच्छा, अट्टाहास संपून माणूस अचानक आत्महत्या करतो किंवा करायचं ठरवतो तेव्हा त्या माणसांचं काय?" अनुपमने पुढे प्रश्न टाकलाच!
"माझ्या बाबतीत विचाराल तर हा मुद्दा निकालात लागला होता- बाप माझ्या लहानपणीच गेला, आई दोन वर्षांपूर्वी कावीळ होऊन गेली. राहता राहिली साय--" त्याने वाक्य अर्धवट सोडलं.
"साला--मुल्लाकी दौड मस्जिदतक…उगाच मला आयुष्याचा अथांगपणा वगैरे सांगितलात. मी काही क्षण विचारात पडलोसुद्धा होतो. एक साधा बाष्कळ प्रेमभंग आणि त्याचं किती कौतुक करायचं? तुम्हाला आई-बापाच्या जाण्याचं जेवढं दुःख नाही तेवढं प्रेमभंगाचं झालंय असं मला लक्षात आलंय…हाहाहा" अनुपम मोठ्याने हसला. श्रीकांतला प्रचंड राग आला.
"कामत, तुम्ही मला दारू पाजलीत, माझं बोलणं ऐकून घेतलंत म्हणजे मी तुम्हाला माझी थट्टा करण्याचा हक्क दिला असं होत नाही. मी कुणाची मस्करी करत नाही आणि कुणी माझी केलेली मला सहन होत नाही! त्यात माझ्या आई-वडलांसारख्या खाजगी विषयात तर नाहीच नाही" श्रीकांत चिडून म्हणाला.
"तुम्हाला इतका राग येत असेल तर सॉरी. पण मला अजूनही वाटतं की हा तुमचा राग येणारा, थट्टा सहन न होणारा स्वभाव खरा- कारण मी जे बोलत होतो ती मस्करी नव्हती ते सत्य होतं. पण तुम्हाला त्यापासून पळण्याची सवय आहे. म्हणूनच तुम्ही केलेली आत्महत्यासुद्धा मला निव्वळ पळपुटेपणाचा हास्यापद प्रकार वाटतो" अनुपमने बेफिकीरपणे उत्तर दिलं. तो पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचं जाणवत होतं. श्रीकांतने रागाने मुठ आवळली. त्याच्या मनगटात कळ उठली. त्याने खालचा ओठ आधी त्वेषाने आणि कळ आल्यावर वेदनेने वरच्या दाताखाली दाबून धरला. तो जागचा उठत पुन्हा शेडच्या कडेला जाऊन उभा राहिला.
"बाय द वे, मगाशी तुम्ही म्हणालात की त्या बसखाली एक म्हातारापण गेला. त्याच्याबद्दल काही वाचायला मिळालं नाही पेपरात" अनुपमने पुन्हा श्रीकांतला बोलतं करायला प्रश्न विचारला.
"कुणास ठाऊक…अपघात झाला तेव्हा तो गाडीपुढे येउन जखमी झाल्याचं मला माहिती होतं. नंतर मी कोठडीत असेपर्यंत त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्याला व्हेन्टीलेटरवर टाकलाय असं मला वकिलाने सांगितलं होतं. मग मीच काही दिवस हॉस्पिटलला होतो-- पोलिसांच्या देखरेखीत! आणि मग दोन दिवसांपूर्वी पळालो. त्या म्हाताऱ्याचं काय झालं कुणास ठाऊक!"
"अस्सं- जर तो मेला असं आपण गृहीत धरलं तर तुला कुणाला मारण्याचं--" श्रीकांतने मागे चपापून पाहिलं-- "आय मीन तुमच्या हातून अपघात होऊन गेल्याचं जास्त दुःख आहे? एक लहान मुलगा की एक म्हातारा?"
"ओ कामत, तुम्ही काय मुलाखती घेण्याच्या व्यवसायात आहात का? म्हणजे मगाचपासून तुमचे अखंड प्रश्न सुरूच आहेत! आत्महत्या का? प्रेमभंग कसा? आपको कैसा लग राहा है? वगैरे वगैरे. त्यापेक्षा आता मी प्रश्न विचारतो- तुम्ही उत्तर द्या- तुम्ही कुठे निघाला होतात? काय व्यवसाय करता?"
"अरेच्या आधी प्रश्न मी विचारलाय- मला आधी उत्तर द्या मग मी देईन तुमच्या प्रश्नांची उत्तरं….तसंही मगाशी तुम्ही माझा आयडी बघून चौकशी करून झाली होती आणि माझी स्टोरी इतकी भारी नाहीचे मुळी"
"हो…पण आता माझी गोष्ट ऐकल्यावर माझा सावधपणा रास्त होता हे तुमच्या लक्षात आलं असेलच आणि तुमचा विचित्र प्रश्न. मला उत्तर माहित नाही! कदाचित मी आत्तापर्यंत त्याचा विचारच केला नव्हता म्हणून असेल"
"मग आता करा"
"अहो काय जबरदस्ती आहे का?"
"नाही तसं नाही पण तुम्ही इतक्या रात्री, या पावसात, अर्धी ब्लू लेबल पिउन रिकामटेकडे बसला आहात. विचार करायला यापेक्षा सोयीची वेळ असूच शकत नाही"
श्रीकांतला आता वैताग यायला लागला होत. दारू रक्तात भिनली होती. झोप, अशक्तपणा, भुकेने ग्लानी यायला लागली होती. पण अनुपम काही त्याला स्वस्थ झोपून देणार नव्हता.
"अ…खरंतर कुणाच्या जीवाची किंमत किंवा तुलना करू नये पण अगदीच तसा विचार करायचा झाला तर तो मुलगा गेल्याचं जास्त वाईट वाटलं मला. त्याचा बाप मला भेटला म्हणून असेल. त्याचं वय कमी होतं म्हणून असेल, किंवा तो म्हातारा जिवंत आहे आणि माझ्या हातून दोन जीव गेले नाहीयेत अशी अगदी अंधुकशी आशा मनात आहे म्हणून असेल"
"मी हा प्रश्न विचारला कारण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांमध्ये तिचा एकावर जास्त जीव असतो असं लोक म्हणतात पण आई तसं मानत नाही-- तसंच दोन लोकांना तुम्ही मारलं तर त्यातल्या एखाद्याला मारण्याचं तुम्हाला जास्त वाईट वाटतं की आई जन्म दिलेल्या जीवात भेदभाव करत नाही तसा मारणारादेखील करत नाही हे मला जाणून घ्यायचं होतं"
"तुम्ही उदाहरणं छान देता हां…शिक्षक व्हा नसाल तर" श्रीकांतने मिळालेली थट्टेची संधी साधून घेतली.
"ते जाऊ द्या हो--- म्हणजे बघा हं-- मला तुमच्या उत्तराच नवल नाही वाटलं- कुठल्या सामान्य माणसाला हा प्रश्न विचारला असता तरी त्याने कदाचित हेच उत्तर दिलं असतं. अपघात होऊन गेलेला एक म्हातारा आणि एक शाळकरी मुलगा- एकाच्या मागे त्याचा मोठा परिवार असेल, त्याने उभारलेलं घर असेल, तो असा अचानक गेला तर त्याचा आत्मा अतृप्त राहील की एका शाळकरी मुलाचा?? ज्याला अजून आयुष्यात काय करायचं आहे हेसुद्धा नीट उमगलं नसेल? पण आपण मात्र म्हातारा सगळं भोगून गेला अशी कॉमेंट करून मोकळे होतो-- आणि ज्याला भोग-उपभोग याची अक्कलसुद्धा नव्हती त्या कोवळ्या जीवाच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करतो. हासुद्धा तुम्ही रीप्रेसेंट करत असलेल्या, आयुष्याचा क्षणभंगुरपणा मान्य न करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीमधला मोठा विरोधाभासच झाला की"
"मी रीप्रेसेंट करत असलेले लोक? म्हणजे तुम्ही काय चंद्रावर असता वाटतं? की कुठल्या अजून ग्रहावर?"
"मी असतो इथेच…स्वतःला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत! पण नाही जमत- तुम्हाला मगाशी बोललो तसं- मला एकूणच हास्यापद वाटते ही विचारसरणी"
"तुम्ही पुन्हा थट्टा करण्याच्या मनःस्थितीत गेलात वाटतं??"
"छे छे…मी तुमची काय थट्टा करणार? ज्याला तुम्ही अथांग, अनंत समजता--त्या आयुष्यानेच तुमची इतकी मोठी मस्करी केलीय की मला अजून काही करायची गरजच नाहीये मुळी…साला, तुम्ही तर या जॉनी वॉकरपेक्षापण कमनशिबी…निदान त्याने घडवलं ते पुढच्या पिढ्यांनी चाखलं, मिरवलं पण तुम्ही आयुष्यापुढे स्वतःला कमी लेखण्यात एवढे मश्गुल होतात की आत्महत्येचा एक हास्यास्पद प्रयत्न सोडून तुमच्याकडे सांगण्यासारखं, मिरवण्यासारखं काहीच नाही" अनुपमच्या स्वरात पुन्हा आधीचा बेफिकिरी बेदरकारपणा आला होता.
"कामत, तुम्ही फार बोलताय…आपण नाही बोललो तर बरं होईल कदाचित…आणि हो-- मी फक्त स्वतःचा जीव घेण्याचा हास्यास्पद असफल प्रयत्न केलेला नाही--तर अपघाताने का होइना पण दोन इतर लोकांचे जीव घेतले आहेत हे विसरू नका--" श्रीकांतने वरच्या आवाजात उत्तर दिलं.
"बाप रे! ही मी धमकी समजायची की काय?" अनुपमने भुवया उंचावत हसत विचारलं.
"धमकी समजायची असेल तर खुशाल समजा…मी निव्वळ सूचना देतोय"
"ओ श्रीकांत राव…कशाच्या जीवावर धमक्या देताय? तुमच्या पोटात अर्धी बाटली दारू सोडून काही नाहीये…तुमच्या शरीरात रक्त कमी आहे-- गेले दोनेक दिवस पोलिसांपासून पळून तुमच्या अंगात हात उगारण्याचा जोर नाहीये--आणि जरी असता तरी तुम्ही काय काहीही करू शकला नसतात याची खात्री आहे मला…बसा शांत--नेमकी ही ब्लू लेबलपण आत्ताच संपायची होती?" अनुपम पूर्ण नशेत होता.
श्रीकांतला भयंकर राग आला होता.
"कामत, तुमचा हा माज स्वतःजवळ ठेवा. मला विनाकारण चिथावण्याचा प्रयत्न करू नका~"
"काही चिथावत नाहीये हो मी तुम्हाला-- साला मला वाटलं होतं की तुमच्याशी बोलताना मला काही उत्तरं सापडतील--लोक जीव का देतात? त्यांना मरताना मागे उरलेल्या लोकांचं काहीच वाटत नसेल का? पण नाही-- सगळेच साले एकजात भेकड पळपुटे लोक तुम्ही---"
"तुम्हाला कशाला पाहिजे होती ही उत्तरं?? तुम्हालापण जीव द्यायचा होता का?" श्रीकांतने विचारलं.
"कारण माझ्या बापाने जीव का दिला हे समजून घ्यायचा मी प्रयत्न करतोय--" अनुपमने निर्विकारपणे उत्तर दिलं.
"काय?" श्रीकांत अनपेक्षित उत्तराने चपापला.
"यस…माझ्या बापाने गाडीखाली उडी मारून जीव दिला-- लहान असताना कधीतरी माणसं गेली की त्यांचा आकाशात 'स्टार' होतो असं मला बाबाने सांगितलं होतं. त्या एका घटनेमुळे असेल कदाचित पण 'मृत्यू' या प्रकाराचं मला विलक्षण आकर्षण वाटलं होतं-- आपल्याला पण स्टार होता आलं पाहिजे वगैरे! नंतर कधीतरी मी 'मेल्यानंतर माणसाचं काय होत असेल?' यावर एक सहज निबंध लिहिला तेव्हा त्याच बाबाने 'किती भयंकर लिहितोस' म्हणून काळजी व्यक्त केली होती. त्याच माझ्या बाबाने शेवटी गाडीखाली उडी मारून जीव दिला."
आता गप्प होण्याची पाळी पुन्हा श्रीकांतची होती. त्याला अचानक काहीतरी सुचलं--
"म्हणजे माझ्या बसखाली आलेला म्हातारा म्हणजे तुमचे वडील---"
"छे छे…असले टुकार योगायोग असायला आपलं आयुष्य काही हिंदी सिनेमासारखं नाहीये…बाबाला जाऊन झाली चारेक वर्षं…" अनुपमने त्याचं वाक्य अर्धवट तोडलं आणि क्षणभर श्रीकांतच्या पोटात उठलेला मोठा गोळा नाहीसा झाला.
"योगायोग म्हणायचा तर तो एवढाच की गावी त्याचा एक विधी करायलाच निघालो होतो आणि वाटेत तुम्ही भेटलात" अनुपम खिन्न हसत म्हणाला. 'हा पुन्हा नॉर्मलला आला बहुतेक' श्रीकांतने मनात विचार केला.
"तुमचे वडील…त्यांनी का केलं असं?"
"शॉर्ट व्हर्जन-- मी जुगारात त्यांचा धंदा बुडवला- त्यांनी हाय खाउन जीव दिला"
श्रीकांत शांत बसून राहिला. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं.
"तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीयेत?" शेवटी अनुपमनेच त्याला विचारलं.
"नाही…एकीकडे अपघाताने माझ्या हातून जीव एक जीव गेला म्हणून मी जीव द्यायचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे तुम्ही- तुम्ही अप्रत्यक्षपणे वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आणि तुम्हाला आत्महत्या पळपुटेपणा वाटतो…एका अत्यंत विचित्र लॉजिकने विचार केला तर आपण एकाच नाण्याच्या भिन्न बाजू आहोत" श्रीकांतने खिन्न आवाजात उत्तर दिलं.
"गेल्या कित्येक तासात तुम्ही बोललेली ही पहिली गोष्ट आहे जी मला पटलीय" अनुपम खजील होत म्हणाला.
"अरे वा--- म्हणजे मला आता मेडलच मिळालं पाहिजे" श्रीकांत मान डोलवत बोलला.
"पावसाने शेवटी विश्रांती घ्यायची ठरवली आहे बहुतेक--" अनुपमने शेडच्या कडेला येउन पावसाचा अंदाज घेतला.
"हं…कामत, बाकी तुमचं इतर तत्वज्ञान मला माहित असूनही विचारतोय-- वडिलांच्या जाण्याचा तुम्हाला कधीच त्रास झाला नाही?? "
"झाला ना…त्याने अशी हार का मानली हा विचार करून त्रास झाला मला- अजूनही होतो. हां म्हणजे तुमच्यासारखी दृश्य-बिश्य नाही यायची माझ्या डोळ्यापुढे-- बाबा दिसायचा मला- अजूनही दिसतो- घरात, त्याच्या खोलीत त्याचं अस्तित्व जाणवत राहतं- त्याच्या पिंडाला कावळा शिवला नव्हताच. त्याचा आत्मा माझ्याच आसपास भटकत असतो असं वाटतं मला. पण माझ्या स्वभावामुळे मी त्याचं 'असं' असणं मान्य करून टाकलंय केव्हाच--"
"पण मग त्याच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून तुम्हाला काही करावसं वाटलं नाही?"
"तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे त्यासाठी? त्याचा धंदा मी पुन्हा जवळपास उभा केलाय-- पैसे लावून जुगार खेळणं बंद केलंय-- मी दारू, सिगारेट पिऊ नये ही त्याची इच्छा होती पण ती पूर्ण करण्याइतका मी लहान राहिलेलो नाही-- त्याचे श्राद्ध-वार मी नेमाने करतो--तरी याचा आत्मा अडकलेलाच--मेल्यानंतर पण माणसाला मोह सुटत नसेल तर अवघड आहे"
"तुमचा इतका बेफिकीर स्वभाव त्याला कारण आहे असं मला वाटतं"
"ते कसं काय?"
"कामत, इतर प्राण्यांना असतात तशा सगळ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक गरजा माणसाला आहेत.…पण इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा त्याच्या भावनिक गरजा जास्त आहेत. तो समुहात राहतो, स्वतःचं विश्व वसवतो. एक अज्ञात दैवी शक्ती जग चालवते यावर विश्वास ठेवतो, अशा वेळी तुमच्यासारखा माणूस या कुठल्याही गोष्टी मान्य करत नाही म्हणजे 'आपला मुलगा सोशिओपाथ तर नाही ना?' या शंकेने तुमच्या बापाचा आत्मा तळमळत असणार"
"ओह…सो एक क्षणात आयुष्य संपवण्याचा आत्मघातकी निर्णय घेतलेली माणसं नंतर भूत बनून अतृप्तपणे हिंडण्यात धन्यता मानतात? ती मुक्त का होऊ नयेत?"
"विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा-- मला उत्तर सुचलं तर नक्की सांगेन…तुर्तास तुम्हाला एवढंच सांगू शकतो--जमलंच तर मनापासून वडिलांची माफी मागा, ते गेले याचं तुम्हाला खरंच वाईट वाटलंय हे त्यांना जाणवू देत-"
"असं केल्याने तो जाईल??"
"कदाचित जातीलसुद्धा. तुम्हीच म्हणता ना की जगातल्या सगळ्याच भावना फार थोड्या क्षणांसाठी उत्कट असतात. असं समजा की निराशेचं टोक गाठल्यावर काही लोक जीव देतात-तीच माणसं कदाचित  त्यांना टोकाचं समाधान मिळाल्यावर मुक्तसुद्धा होतील--तुमच्यासारखी" श्रीकांत समजावण्याच्या स्वरात बोलला. 
"खरंय तुम्ही म्हणताय ते- कदाचित म्हणून तर त्या मुलाच्या वडिलांना तुमच्या तोंडून कबुली हवी होती-- तुम्ही जाणूनबुजून त्यांच्या मुलाला मारलं नाहीये याची--पण त्यांना टोकाचं समाधान मिळवून देताना तुम्ही निराशेत बुडून जीव द्यायचा प्रयत्न केलात"
दोघेही एकमेकांकडे बघून खिन्न हसले.


"सो आता काय करणारात, कुठे जाणारात?" अनुपमने थांबलेला पाऊस बघून श्रीकांतला विचारलं.
"अ माहित नाही…तुम्हाला भेटल्यावर आता मी फार विचार करणं सोडून द्यायचं ठरवलं आहे"
"तुमचा पुन्हा पोलिसांकडे जायचा विचार तर नाही ना? किंवा जीव देण्याचा?"
"आत्महत्येचा विचार मुळीच नाहीये. पण किती दिवस पळत राहणार? कायम मागच्या रस्त्यावर डोळा ठेवून? पोलिसांकडे परत जायचा विचार करतोय मी"
"हं" अनुपमने मान डोलावली.
"तुमचं काय?"
"गावी जातो- विधी आटपतो. तुम्ही म्हणता तसा बाबा असेलच घुटमळत, तर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन" आपलं बोलणं अनुपमने मान्य केलंय हे जाणवून श्रीकांतचा अभिमान सुखावला.
सकाळी श्रीकांतला जाग आली तेव्हा आजूबाजूला उजाडलं होतं. आकाश निरभ्र होतं. दूरवर तांबडं फुटत होतं. त्याला हळूहळू रात्री काय घडलं ते आठवायला लागलं. अनुपम आठवला तसं त्याने एकदम आजूबाजूला पाहिलं. अनुपमचा कुठेही पत्ता नव्हता. आपल्याला स्वप्न पडलं होतं की खरंच काल रात्रीच्या सगळ्या घटना खऱ्या होत्या हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. रात्रीच्या अंधारात अजिबात न दिसलेला परिसर आता स्वच्छ दिसत होता. पावसाने धुवून निघालेलं आजूबाजूचं जंगल हिरवंगार झालं होतं. स्वतःच्या श्वासाला असलेला दारूचा वास त्याला जाणवला. पण रात्री त्याने अनुपम कामत नावाच्या माणसाबरोबर बसून दारू पिऊन गप्पा मारल्या होत्या याची बाकी कुठलीही खुण आजूबाजूला नव्हती. अनुपम हा खरंच जिवंत माणूस होता का आपल्याला कुठलातरी प्रेतात्मा, मुंज्या भेटून गेला याचा विचार तो पुढची काही मिनिटं करत राहिला. आजूबाजूला इतर कुठल्याही मनुष्य वावराच्या खुणा जाणवत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मोठ्या कष्टाने तो जागचा उठला आणि रात्री झालेल्या गप्पा आठवत हात-पाय ओढत वस्तीच्या दिशेने चालायला लागला.


'बोल अनु काय म्हणतोस?'
'काय बोलू बाबा? मला मनापासून वाईट वाटलंय, तू बरोबर नसल्याचं दुःख झालंय असं मी तुला सांगितलं तर तू जाशील म्हणे इथून??'
'बोलून बघ अनु, कदाचित मी तुझ्या बोलण्यासाठी थांबलो असेन, तुझ्यासाठी थांबलो असेन…'
'ठीके बाबा, तसं असेल तर मी करतो कबुल!अगदी मनापासून-- तू गेलास मला खूप खूप वाईट वाटलं-- खूप रागही आला-- जमेल ते  सगळे प्रयत्न करून तू असं का केलंस ते समजून घ्यायचा मी प्रयत्न केला. पण मी खरंच नाही समजून घेऊ शकलो तुला! कदाचित इथे येऊन हा असा कबुलीजवाब दिल्यावर तूच सांगशील मला'
'सांगतो की…नक्की सांगतो!! तू हे विचारायची, माझ्याशी बोलायचीच मी वाट बघत होतो' 

समाप्त
                                                                          ***