Pages

Monday, January 28, 2013

लिंग्वा फ्रांकाच्या दिशेने!

बायबलमधली एक खूप जुनी गोष्ट आहे. फार फार पूर्वी, महाप्रलय झाल्यावर जगातली सगळी माणसं एकत्र जमली. त्यांनी सगळ्यांनी मिळून एक उंचच उंच इमारत 'बेबल' बांधायचं ठरवलं. इतकी उंच की त्याचं शिखर (टॉवर) स्वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे. देवाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो चपापला. ही माणसं खरंच स्वर्गापर्यंत येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. माणूस स्वर्गात पोहोचून त्याची जागा घेईल अशी भीती वाटली त्याला बहुतेक. जर का ही इमारत बांधणं थांबवायचं असेल तर लोकांमध्ये फुट पाडणं आवश्यक होतं. त्याने आवश्यक ती पावलं उचलली,इमारत तोडून टाकली आणि वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. तोपर्यंत एकाच भाषेत बोलणारी सगळी माणसं वेगवेगळ्या भाषा बोलायला लागल्यावर त्यांच्यात फुट पडली. देवाचा हेतू साध्य झाला आणि बेबलचं काम अर्धवट राहिलं. एकमेकांशी संपर्क करण्याचं माध्यमचं माणसामध्ये गट निर्माण व्हायला कारणीभूत ठरलं हा सगळ्यात मोठा विरोधाभास. देवाने तेव्हा किती भाषा निर्माण केल्या याची मला कल्पना नाही, पण बायबलमधल्या या गोष्टीकडे वस्तुनिष्ठपणे पाहिलं की मला गंमत वाटते. सध्या जगभरात ६००० हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत (इति विकिपीडिया). 

जगातील इतर सर्व सजीव (प्राणी) आणि माणूस यांच्यातल्या मुलभूत फरकांपैकी एक म्हणजे 'वाचा' त्याहीपेक्षा 'भाषा'..मार्क पॅगल या बायोलॉजीस्टच्या मतानुसार भाषा हे माणसाकडे असणारं सर्वाधिक धोकादायक हत्यार आहे. "तुम्ही तुमच्या डोक्यातली एखादी कल्पना भाषेच्या माध्यमातून कोणतीही शस्त्रक्रिया न करता दुसऱ्याच्या डोक्यात इम्प्लांट करू शकता" असं ते म्हणतात. भाषा ही मानवी उत्क्रांतीतली सगळ्यात महत्वाची पायरी असल्याचं ते नमूद करतात. 'होमो सेपियन' अर्थात आधुनिक माणूस जेव्हा भाषा बोलायला लागला, तेव्हा त्याचं सामाजिक शिक्षण इतर पूर्वजांच्या मानाने खूप चटकन झालं. पॅगल पुढे म्हणतात की असं असताना त्याने खूप विचित्र, अनाकलनीय कृत्य केलं- त्याने वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. सेपियनच्या उदयानंतर गेल्या २ लाख वर्षांच्या काळात माणूस जगभर पसरला. काळानुसार, प्रदेशानुसार भाषेत काही अंशी होणारे बदल जरी गृहीत धरले तरी एखाद्या मोठ्या भूभागात साधारण एकच भाषा बोलणारी माणसं असायला हवीत. पण आकडे काहीतरी वेगळंच सांगतात. जगात जिथे जिथे जास्त लोकसंख्येची घनता जास्त आहे तिथे तिथे भाषांची विविधता जास्त आहे..भारत देश हे याचं उत्तम उदाहरण आहे. दोन अडीच लाख वर्षात प्रादेशिक गरजांनुसार, कधी एखाद्या विषयाशी संबंधित ज्ञान जपून ठेवायला, कधी सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या ही परिस्थिती सत्य मानली तरी गेल्या शे-दोनशे वर्षात हाच मायग्रेट झालेला माणूस पुन्हा जागतिकीकरणाच्या निमित्ताने जवळ येतोय..आणि या जवळ येण्याच्या प्रक्रियेत अडसर असणारा सगळ्यात मोठा घटक ठरतोय 'भाषा'. यावर उपाय- लिंग्वा फ्रांका! जगभरात सगळीकडे फक्त एकच भाषा अधिकृतपणे वापरण्यात यावी. कार्यालयीन, सामाजिक किंवा राजकीय व्यवहार हे त्या एकाच भाषेतून होतील. ही भाषा जागतिक शिक्षणाचं माध्यम असेल. एक विश्व..एक बोलीभाषा, कर्मभाषा! (पॅगल यांचा या संदर्भातला व्हिडीओ इथे पाहता येईल)

आपल्या देशाबद्दल बोलायचं तर भारताच्या सामाजिक वैविध्यातला महत्वाचा घटक आहे 'भाषा'! हिंदी ही राष्ट्रभाषा सोडून वीसच्यावर अधिकृत, आणि शेकड्याने अनधिकृत भाषा आपल्याकडे आहेत..इतकंच काय तर आपल्या राज्यसीमा या भाषांवर आधारित आहेत (आणि अर्थात सीमावाद्सुद्धा). कित्येक भाषांमध्ये विपुल प्रमाणात काव्य,शास्त्र, साहित्य, कला निर्मिती होते. प्रत्येक राज्याचं, त्यातल्या लोकांचं अमुक-एक भाषेवर प्रेम आहे आणि या प्रेमातूनच कित्येक प्रादेशिक राजकीय पक्षसुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. धर्म, जात, वर्ण या सगळ्यांवरून भांडण्याच्या भानगडीत हा भाषेचा मुद्दा थोडा दुर्लक्षित झाला असं म्हणावं लागेल. पण सोशियल नेटवर्किंग, व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या हायटेक जगात 'विविध भाषा' हा प्रकार खरंच अनावश्यक वाटतो. मला माहितीय की या विधानाला कित्येक संस्कृती 'रक्षकांची' एक भुवई ऑलरेडी वर झाली असेल. पण यासंदर्भात जॉन मॅकव्होर्टर नावाच्या भाषाशास्त्राच्या प्राध्यापकाचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो- 'भाषा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ही गोष्ट खरी. संस्कृती संपली की भाषा संपते पण भाषा संपली की संस्कृती संपत नाही.' तसं असतं ज्ञानेश्वरांनी लोकांना कळावी म्हणून 'सोप्प्या' मराठीत लिहिलेली 'ज्ञानेश्वरी' पुढच्या चार-पाच शतकात बदललेल्या मराठीबरोबर कालबाह्य झाली असती. संस्कृती नष्ट होणं आणि संस्कृती विकसित होणं या दोन गोष्टीतला फरक बदलत्या काळात समजून घेणं अत्यावश्यक आहे. बदलती भाषा, कालबाह्य होणारी भाषा या गोष्टींकडे संस्कृती विकासाच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं! यालाच जोडून अजून एक मुद्दा- भाषेच्या नाशाबरोबर संस्कृतीचा ऱ्हास होणं अटळ असतं तर संस्कृत, लॅटीन, पाली, अर्धमागधी या भाषा नष्ट झाल्या तेव्हा मनुष्य प्राणीच नष्ट झाला असता. 'भाषा संस्कृतीवर अवलंबून असते...संस्कृती भाषेवर नाही!' सो संस्कृतीचा जवळपास ९०% लोकांच्या दृष्टीने 'मुख्य' असणारा मुद्दा जर का बाजूला ठेवला तर मग भाषेच्या वैविध्याचा अट्टाहास बाजूला ठेवता येईल. त्याचे फायदेसुद्धा कित्येक आहेत. भारतातला 'अधिकृत राज्यभाषा' हा प्रकार काढून टाकला तर भारतातले कित्येक सीमाप्रश्न संपतील. जगाचा विचार करायचा तर युरोपियन युनियन दर वर्षाकाठी त्यांच्या चर्चांसाठी निव्वळ भाषांतरावर करत असलेला कोट्यावधींचा खर्च कमी होईल. अमेरिकन्सच्या दृष्टीने म्हटलं तर चायनीज आणि मेक्सिकन लोकांशी किमान आवश्यक संवाद सहज साधता येईल. लोकांची धर्म, जात वर्ण यांच्या नावाखाली जगभर होणारी गटबाजी एक भाषा या छत्राखाली कदाचित काही अंशी कमी होईल.  

मग पुढचा प्रश्न येतो...की जगातल्या सगळ्या लोकांनी एकाच भाषेत बोलायचं तर ती भाषा कुठली? इंग्लिशचा नंबर अर्थात सगळ्यात वर असेल...चायनीज दोन नंबर वगैरे वगैरे...म्हणजे पुन्हा एकदा मेजोरीटीने हे ठरणार..उत्तर आहे 'नाही'..जगभरात जर का एकच भाषा बोलीभाषा म्हणून वापरायचं ठरलं तर ती भाषा इंग्लिश असलीच पाहिजे असं नाही..त्यातले कित्येक शब्द, वाक्प्रचार हे जगभरातल्या तमाम भाषांवरून ठरवले जातील. कदाचित मूळ पाया म्हणून इंग्लिशचा वापर करावा लागेल..पण त्यात सर्व युरोपियन, आशियाई, आफ्रिकन भाषांमधले शब्द असतील. अशी भाषा अस्तित्वात आली तर मग सगळ्या  जुन्या किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांचं काय? उत्तर सोप्पं आहे! आज संस्कृत,पाली, अर्धमागधी, लॅटीन या भाषांची जी काही स्थिती आहे ती अजून पाचशे वर्षांनी मराठी, तमिळ, हिब्रू, जर्मन भाषांची असेल. सध्याच्या काळात लोक नुसता नाच शिकत नाहीत- भरतनाट्यम,कुच्चीपुडी, वेस्टर्न, साल्सा असे त्यातले प्रकार शिकतात तसे अजून काही शतकांनी लोक वेगवेगळ्या भाषा शिकतील...तसे तर लोक आजही भाषा शिकतात पण भाषा हा पोटापाण्याचं साधन असण्यापेक्षा आर्ट फॉर्म,हॉबी म्हणून मान्य होईल. कम्युनिकेशन अर्थात संवाद घडणं या एका अनोख्या गुणधर्मामुळे माणूस पृथ्वीवर श्रेष्ठ ठरला. पॅगल या प्रकाराला सोशियल लर्निंग म्हणतात.माणूस एक भाषा बोलायला लागला. मग त्याने अनेकविध भाषा निर्माण केल्या. आजही नवीन भाषा तयार होण्याची प्रक्रिया अव्याहत सुरु आहे. पण हे कुठेतरी थांबायला हवं! नवीन भाषा निर्माण होण्याने खरंच सोशियल लर्निंगमध्ये भर पडतेय की समाजामध्ये फुट पडतेय हे भाषाकर्त्यांनी आणि तिच्या रक्षकांनी ठरवायला हवं! ( या नोटवर माझ्या डोक्यात जाती, धर्म 'निर्माण' करणाऱ्या लोकांचाही विचार आलाच...पण त्याच्यावर उहापोह नंतर कधीतरी) 

शेवटी भाषा भाषा म्हणजे तरी काय? आपल्या भावना,विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यमच नाही का? आपण लहानपणापासून एक सर्टन भाषा शिकतो,बोलतो म्हणून आपल्याला तिचा अभिमान,कौतुक वाटतं! आपल्या भावना आपल्याला त्या सर्टन भाषेत सहज व्यक्त करता येतात ('एक वैश्विक भाषा' या विषयावर मी मराठीत का लिहितोय असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला असेल त्याचं उत्तर हेच). उद्या प्रत्येक भारतीयाला त्याच्या भावना स्वाहिलीमध्ये व्यक्त करता आल्या तर आपण स्वाहिली बोलायला लागू. अगदी आजच्या मराठी बोलीभाषेतले आपले कित्येक शब्द फारसी, उर्दू, हिंदी आणि अशा कित्येक परकीय भाषांमधून आले आहेत. 'बांधिलकी भावनांशी,विचारांशी आधी आणि भाषेशी नंतर असायला हवी' हा साधा,सरळ, व्यावहारिक दृष्टीकोन आहे! आज इंग्लिशमध्ये सहज वापरले जाणारे कित्येक शब्द, वाक्प्रचार इतर भाषांमधून आले आहेत. उदाहणार्थ- 'कर्म/कर्मा' हा शब्द आपल्या साहित्यात जेवढा वापरला जात नाही तेवढा अमेरिकन सिनेमांमध्ये वापरला जातो. 'बॉन अपेटित' हा फ्रेंच वाक्यप्रयोग 'वदनी कवळ घेता' चं जागतिक व्हर्जन आहे. 'बॉन वोयेज' सगळं जग सहजपणे वापरतं. 'के सेरा सेरा' हा रोमन वाक्प्रयोग जगभरातल्या अनेक वक्त्यांनी त्याच्यातल्या व्याकरणाच्या चुकांसकट वापरला आहे. 'हमाल दे धमाल' मधलं लक्ष्याचं 'मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं' हे गाणं प्रसिद्ध ' आय केम, आय सॉ, आय कॉनकर्ड' या वाक्प्रचारावर आधारित. हा वाक्प्रचार 'व्हीनी व्हीडी व्हीची' या लॅटीन वाक्यावरून घेतलेला..खूप लोक वापरतात. ही सगळी उदाहरणं मला जगातल्या भाषांचं किती ज्ञान आहे हे सांगायला लिहिलेली नाहीत...उलट 'के सेरा सेरा'ची भाषा कोणती हे मला शोधायला लागलं. इतकी वर्षं वापरताना हा प्रश्न पडला नव्हता. अर्थ माहितीय...कुठे वापरायचा कळलं...विषय संपला!   
मी अमेरिकेला आलो तेव्हा मी नॉर्थ इंडिअन असल्याचा शोध मला लागला. महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या रांगेतली आणि वरची सगळी राज्य नॉर्थ इंडिया आणि खालची सगळी राज्य साउथ इंडिया (त्यातही वर्चस्व हैद्राबादी लोकांचं..हा मूळ शोधसुद्धा बहुतेक त्यांचाच) असं इथे वर्गीकरण असतं. शांतपणे विचार केला तेव्हा जाणवलं की भाषेचा एक फरक सोडला तर काही फरक नाही जगात कुणातच..भारतीयांचं सोडाच! सण-वार, खाद्य संस्कृती वेगळी असणं हा सपशेल गौण मुद्दा आहे..बाजुबाजुच्या महाराष्ट्रीयन घरात एकाच दिवशी जेव्हा एकीकडे उकडलेल्या बटाट्याची आणि दुसरीकडे कांदा घालून रस्सा भाजी होते तेव्हा त्यांची खाद्य संस्कृती लगेच वेगळी होत नाही आणि झालीच तर ती सामाजिक दृष्टीने बाधक किंवा घातक नाही..पण दोन घरात लोक वेगळ्या भाषा बोलत असतील तर किमान संवाद, विचारांची देवाणघेवाण या सामाजिक गरजा भागवल्या जात नाहीत..जागतिक एकता,'एक विश्व-एक राष्ट्र' वगैरेचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी जात, धर्म, वर्ण बाजूला ठेवून या भाषेच्या मुद्द्याकडे जरा बघाच! सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने 'भाषेचा ऱ्हास' आणि जागतिक 'लिंग्वा फ्रांका'चा अर्थात एकाच अधिकृत बोलीभाषेचा,कार्यभाषेचा उदय होणं हे लोकांनी जवळ यायचं लक्षण ठरणारे!  येत्या चार-पाचशे वर्षांच्या काळात काय घडतंय ते बघायला आपल्यातलं कुणीच नसेल पण 'वाढ आणि विकास' ही जीवनाची लक्षणं ध्यानात ठेवली तर जागतिक लिंग्वा फ्रांका अस्तित्वात येणं नक्की घडेल असं मला वाटतं! एक दिवस असा असेल की एकाच वर्गात गुप्ते, शर्मा, सुब्रमन्यम, खान, डिकास्टा, पॉवेल, अल-नझर, एबरहर्ट, गोर्बाचेव्ह, मोरेना, ताओ चंग, कुरोसावा, अरमानी अशा सगळ्या आडनावांची मुलं एकाच वर्गात (अर्थात वर्चुअल क्लासरूम), एकाच भाषेत शिकत असतील..!


ता.क. मागे मी मराठी माध्यम, मराठी भाषेत शिक्षणाची अवस्था या विषयावर लिहिलं होतं. आता जागतिक बोलीभाषेबद्दल लिहितोय...या सगळ्यातून मराठीचा 'उपमर्द' करण्याचा माझा हेतू नाही. मला मराठी आवडत नाही असं तर मुळीच नाही! मराठीसारखी इतकी 'शब्दसंपदा' असणारी भाषा माझी मातृभाषा आहे याचा मला अभिमान आहे! मराठीत व्यक्त होणं सोप्पं वाटतंय तोपर्यंत मराठीतच लिहीत राहीन..पण माझी बांधिलकी लेखनाशी आणि त्यातल्या भावनांशी जास्त असेल एवढं मात्र नक्की! 

Thursday, January 3, 2013

उपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून!

अल्बर्ट आईनस्टाईनचं एक वाक्य आहे- "माझ्याकडे एखादा प्रश्न सोडवायला जर का एक तास असेल तर मी ५५ मिनिटं प्रश्नावर विचार करेन आणि ५ मिनिटं त्याच्या उत्तरावर विचार करण्यात घालवेन..." आपल्या इथे थोडं वेगळं आहे! आपल्याला प्रश्न ५ मिनिटात नाही १ मिनिटातच कळलाय आणि उत्तरसुद्धा ५ नाहीतर १० गेला बाजार २० मिनिटात मिळेल...पण सगळं संपून जाइल ना? मिडीयाला ब्रेकिंग न्युज कशा मिळतील? आम्ही जागरूकता कशी दाखवणार? फेसबुकवर, ट्विटरवर आम्ही आमचा संताप, आमच्या परसेप्शनस कशा काय पोस्ट करणार? हो मी दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेबद्दल बोलतोय! मी या विषयावर लिहायचं मुद्दाम टाळत होतो कारण घटनेचे डीटेल्स वाचून काहीही लिहायचं धारिष्ट्यच होत नव्हतं. वाढत्या प्रसारमाध्यमांमुळे आणि आपल्या हक्काच्या वैश्विक गुंत्यांमुळे (फेसबुक, ट्विटर इत्यादी) अलीकडे बातमी चटकन जुनी होत नाही. त्यात ही घटना लौकर जुनी होण्यासारखी नव्हतीच. स्त्रीला स्वतःच्या 'असण्याचीच' असुरक्षितता वाटावी यासारखी शरमेची गोष्ट नाही. सगळे दोषी  नराधम पकडले गेले आणि त्या दुर्दैवी मुलीवर दिल्लीमध्ये उपचार सुरु झाले. देशातला असंतोष, चीड, उद्वेग बाहेर यायला लागला. त्या मुलीला वाचवण्यासाठी सिंगापोरला पाठवलं गेलं. मग ती दुर्दैवी मुलगी 'गेली' आणि इथे गोंधळ सुरु झाला. तसा तो हे प्रकरण समोर आल्यापासून सुरूच होता पण गेल्या चार दिवसात तो वाढला आणि मूळ मुद्दा भरकटला. मला आठवते आहे तशी गोंधळाची यादी-

१) 'सचिन तेंडुलकरची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती' हे सरकारने त्याला करायला लावलेलं बलिदान असून बलात्कार प्रकारावरचा मिडिया फोकस कमी व्हावा म्हणून म्हणे सरकारने त्याला तसं करायला लावलं.     मुळात क्रिकेट, तेंडुलकर, बलात्कार प्रकरण, सरकार हे चारही सर्वस्वी भिन्न मुद्दे आहेत. (येस..क्रिकेट आणि 'सचिन तेंडुलकर' हेसुद्धा एका अर्थाने भिन्न मुद्देच!त्याबद्दल पुन्हा केव्हातरी). पण काहीतरी बातमी काढायची म्हणून ट्विटरवर कुणीतरी पिल्लू सोडतं आणि चर्चा सुरु! ट्विटर या माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी किती होतो आणि त्यातून वादग्रस्त छायाचित्र, कमेंट्स किती पोस्टल्या जातात हासुद्धा एक चांगला सामाजिक संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो.असो! जर हे दुर्दैवी प्रकरण घडलं नसतं तर मोदींच्या गुजरात विजयाला कमी कव्हरेज मिळावं म्हणून सरकारने सचिनला निवृत्ती घ्यायला लावली असा सूर याच माणसांनी लावला असता!

२) २६ जानेवारीचं सेलिब्रेशन आणि मग न्यू-यिअर सेलिब्रेशन: बलात्काराच्या निषेधार्थ २६ जानेवारी साजरा करायचा नाही असा फतवासुद्धा निघाला होता. मुळात गेल्या ६२ वर्षात कधी नवीन कपडे घालून, फटाके फोडून, कौतुकाने आपण २६ जानेवारी साजरा करत होतो की आता एकदम निषेध म्हणून त्याच्या साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उभी करतोय? मी मुद्दाम २६ जानेवारी आणि ६२ वर्षं लिहिलं....कारण २६ जानेवारी म्हणजे नेमका स्वातंत्र दिन असतो की प्रजासत्ताक दिन असतो हेसुद्धा कित्येकांना माहित नसतं...मी दर वर्षी १५ ऑगस्टला लोकांना रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना बघतो आणि २६ जानेवारीला इंडिपेंडस डे! मग सोशियल नेटवर्क नावाचं कोलीत हातात मिळाल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली हीच सगळी माणसं(कडं) जेव्हा बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून २६ जानेवारी साजरा 'न' करण्याचं ठरवतात तेव्हा त्या घटनेइतकाच संताप होतो. मग कुणीतरी असंही सुचवलं की करायचाच आहे तर ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला विरोध करा म्हणून म्हणे यंदा ३१ च्या रात्री मुंबईत काही 'हजार' तळीराम कमी पकडले गेले. मलातरी दिल्ली घटनेच्या निषेधार्थ ३१ डिसेंबर साजरा केला नाही असं जाहीर करणारा कुणी दिसला नाही.

३) हनी सिंगची हानी: हनी सिंग नावाच्या एका गायकाचं मात्र मला विशेष वाईट वाटलं. त्याने सहा सात वर्षांपूर्वी काही खूप अश्लील, असभ्य शब्द असलेली काही गाणी गायली होती. त्यात 'मै बलात्कारी' नावाचं एक गाणं होतं. दिल्ली घटनेनंतर कुठल्यातरी 'समाजाभिमुख' मंडळींना हे जाणवलंय. अशा गाण्यांमुळे बलात्काराला प्रोत्साहन मिळतं म्हणून त्याच्यावर एक खटला दाखल करण्यात आलाय! ही गाणी गेले सहा वर्ष लोक लपून-छपून ऐकतायत मात्र ती अश्लील, असभ्य आहेत हे कळायला 'या' सद्पुरुषांना मात्र दिल्लीची घटना घडायची वाट बघावी लागली?? कालचीच अजून एक बातमी होती की मुंबईतल्या कुठल्यातरी बारमध्ये 'बलात्कारी' नावाचं ड्रिंक मिळतं म्हणून कुठल्यातरी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा काढला. याच लॉजिकने कित्येक गोष्टींवर निर्बंध आणावे लागतील, कित्येक लोकांवर खटले भरावे लागतील. प्रश्न असा आहे की हा सगळा खरंच संताप म्हणायचा की लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न??   

४) मुलीच्या नावाचा कायदा: या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी सत्ताधारी पक्षाबद्दल काहीही लिहिलं नाही. कारण बलात्कारासारखी घटना कोणत्याही पक्षाचं सरकार असताना होऊ शकते असं मी (नाईलाजाने) गृहीत धरलंय आणि पकडलेल्या दोषी लोकांना शिक्षा देण्याचा प्रश्न असला की सरकार लोकशाहीच्या नावाखाली त्यांच्या (संथ) प्रक्रियेने जाणार हे मी आता (वैतागून) मान्य केलं आहे! तर- सरकार आता बलात्कार विरोधी कायदा कडक करणार आहे. म्हणजे नेमकं काय होणारे हे जाणून घेण्यात कुणाला रस नाहीये पण त्या नवीन कडक कायद्याला त्या मुलीचं नाव द्यायचं की नाही यावरून नवीन वाद सुरु झालाय. शशी थरूर नावाने वावरणाऱ्या एका इसमाने हा वाद सुरु केला आहे. किरण बेदींनी त्याला सपोर्ट पण केलाय. (तसं तर त्या अण्णा हजारेंना पण सपोर्ट करत होत्या पण तेव्हा त्यांच्या सपोर्टला काही किंमत नव्हती) या सगळ्यात मुलीच्या आई-वडिलांनी या कल्पनेला संमती दिलीय आणि आता या गोष्टीचा राजकीय मुद्दा करून त्याचं श्रेय लाटण्याचा एक नवीन खेळ सुरु झालाय. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही कित्येक लोक आरोपींना फाशी द्या, त्यांना नपुसंक करा या मागण्यांवर ठाम आहेत. मानवाधिकारवाल्यांनी ऑलरेडी बलात्काराचा निषेध करून फाशीला विरोध केला आहे (खरंतर मानवाधिकार ऐवजी पेटावाल्यांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं). स्वातंत्रलढावाले हजारे, आंबा माणूस पार्टीचे केजरीवाल, योगावाले रामदेव सगळी मंडळी गायब आहेत. भाजपचा एखादा नेता नेहमीप्रमाणे काहीतरी बालिश कमेंट देऊन पूर्ण पक्षाचं हसं करतोय. देशात अजूनही बलात्कार होणं सुरूच आहे. किंवा कदाचित या घटनांना आता जास्त मिडिया कव्हरेज मिळतंय. सध्याची पत्रकारिता ही इतकी हीन दर्जाची झालीय की सगळं असंच चालू राहिलं तर व्हेदर फोरकास्ट सारखी ही मंडळी रेप फोरकास्ट करायला पुढे मागे पाहणार नाहीत. बलात्कार झाला हे दुर्दैवी सत्य आहे हे मान्य करून भविष्यात या घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या आहेत याचा कुणीच डोळसपणे, व्यापकपणे विचार करताना दिसत नाहीये. मीसुद्धा इथे निव्वळ माझ्या सामाजीक संवेदना प्रखर आहेत अशी बोंबाबोंब करून मुळीच थांबणार नाहीये. मला काही प्रतिबंध सुचवणं जास्त महत्वाचं वाटतं.

या घटनेचे एकूणच तीव्र पडसाद उमटल्यामुळे पोलिस संख्येत वाढ, गुन्हेगारांच्या मनात भीती,स्त्रियांच्या मानसिक आणि काही अंशी शारीरिक सबलीकरणासाठी सामाजिक उपक्रम येत्या काही महिन्यात राबवले जातील हे निश्चित. (नाही गेले तर मात्र खरंच २१ डिसेंबरला जग बुडायला हवं होतं अशी परिस्थिती निर्माण होईल) दूरदृष्टीने विचार करता, बलात्कारासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा तीन मुद्दे विचारात घ्यावेसे वाटतात- शिक्षण, संस्कार, आणि संस्कृती. तिन्ही जड आणि व्यापक शब्द आहेत त्यामुळे थोडे सोप्पे करून उलगडण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणाचा अभाव ही आपल्याकडे कित्येक समस्या निर्माण होण्याच्या मागचं मूळ कारण आहे. नैतिक मुल्यशिक्षण नावाचा विषय अभ्यासात आणला गेला हे खरं पण तो शिकवला जात नाही आणि आचरणात आणणं होत नाही.  संस्कार ही यापुढची पायरी. आज कित्येक ग्रामीण आणि काही शहरी घरांमध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तिथे वाढणाऱ्या पिढ्या काय स्त्रीचा आणि तिच्या चारित्र्याचा आदर करणार? या मुद्द्यावर राहवत नाहीये म्हणून विषयांतर करतोय- सावंतांच्या युगंधरमध्ये कृष्णाच्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे- 'स्त्री म्हणजे कन्या, पुत्र जन्माला घालणारं यंत्र नव्हे, स्त्री म्हणजेच वात्सल्य आणि वात्सल्य म्हणजेच स्त्री. स्त्री माता, भगिनी, पत्नी, कन्या, काकी, मामी, आत्या, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणून सर्वदा वंदनीयच असते' कदाचित असंच शिक्षणाचं, संस्कारांचं बाळकडू जर का प्रत्येकाला मिळालं तर काहीतरी चांगलं निश्चित होऊ शकतं.  शेवटचा मुद्दा संस्कृती. हा तर फार मोठा शब्द आहे. पण आपली संस्कृती -तेच ते इंग्लिशमधलं कल्चर- आपल्याला कुठलीही सामाजिक भीती घालत नाही. देशावर,देशाच्या संसदेवर हल्ला केलेले दहशतवादी अनेक वर्ष सरकारी पाहुणचार घेतात, राष्ट्रपती दयेच्या अर्जांकडे वर्षानुवर्ष ढुंकून बघतसुद्धा नाहीत तिथे बलात्कार करण्याची भीती कशाला वाटली पाहिजे? आमच्याकडच्या सिनेमांमध्ये रेप होतो आणि मग रेप करणारा त्या मुलीशी लग्न करतो. आमचा कायदापण अशी काहीतरी सूट देतो. हे झालं कायद्याचं, सरकारचं. दुसरीकडे अमेरिकन सिनेमे बघून त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे समाज म्हणून कळायला पाहिजे. ग्लोबलाईझ होणं म्हणजे कुठल्या बाबींमध्ये प्रगती आणि कुठे अधोगती झाली पाहिजे हेसुद्धा ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि हो, हा मुद्दा स्त्रियांना (टू बी स्पेसिफिक मॉडर्न तरुणींना) सुद्धा काही अंशी लागू होतो. स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या मुलभूत क्षमता आणि मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय, उपक्रम वगैरे करूनही काही करंट्या लोकांची सदसतविवेक बुद्धी त्यांना अशी हीन, बिभत्स कृत्य करायला प्रवृत्त करणार हे दुर्दैवी सत्य आहे. त्यावेळी शिक्षा काय असली पाहिजे याचं मात्र निःपक्ष उत्तर माझ्याकडे नाही हे मी कबूल करतो. मिडल-इस्टमधल्या अनेक देशातल्या शिक्षा मी वाचल्या आहेत पण लोकशाहीचं बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशाला हे करणं शक्य होणार नाही. देहांत शिक्षा देणं कदाचित योग्य पर्याय ठरणार नाही तर लिंग-छाटणं हा अघोरी पर्याय ठरेल. दिल्लीसारख्या अघोरी घटनांना कदाचित असा अघोरी उपाय करावासुद्धा लागेल पण योग्य शिक्षा नेमकी काय असली पाहिजे हे मी ठरवू शकलेलो नाही.

सरतेशेवटी, सर्व प्रकारच्या वैश्विक गुंत्यांवर या विषयावरील आपला संताप शिव्या देऊन, विरोध करून, काळ्या वर्तुळाचे फोटो लावून व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी कोणताही विरोध केला नाहीये किंवा ज्यांना या घटनेबद्दल काहीच माहित नाहीये त्यांच्याबद्दल मला कोणतीही सहानभूती, कौतुक किंवा रागसुद्धा नाही. पुन्हा एकदा डोळसपणे या घटनेकडे बघून मुळ विषयापासून न भरकटता, मुद्द्याला धरून काही सुचत असेल, लिहायचं असेल, करायचं असेल तर जरूर करा. हा मुद्दा राजकीय, भाषिक, पक्षीय, भ्रष्टाचारविषयक नसून त्यात प्रत्येक सुजाण माणसाने किमान जागरूकता, संवेदनशीलता आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन या मुद्द्यांबद्दल स्वतःकडेच सिंहावलोकन करावं अशी अपेक्षा आहे.
आणि हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष सर्वाना आर्थिक भरभराटीचं आणि सुरक्षिततेचं जावो!


चैतन्य