Pages

Showing posts with label उपहास. Show all posts
Showing posts with label उपहास. Show all posts

Monday, March 11, 2013

न-लोकोत्तर! अ-आदरणीय!!

                                      ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।  

गेल्या अनेक शतकांच्या इतिहासात कला-क्रीडा-राजकारण या सगळ्या क्षेत्रात अनेक श्रेष्ठ मंडळी भारताच्या इतिहासात होऊन गेली. आपल्या राजकारणाला आर्यचाणक्याचा वारसा आहे, कलेच्या क्षेत्रात कालिदासाच्या ग्रंथसंपदेपासून ते दादासाहेब फाळकेंच्या सिनेसृष्टीपर्यंत आपल्याकडे मिरवण्यासारख्या खंडीभर गोष्टी आहेत! क्रीडा क्षेत्रात खूप प्राचीन नावं नसली तरी हॉकीचा जादुगार ध्यानचंद ते क्रिकेटचा देवबाप्पा सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडू या देशासाठी खेळले आहेत! मात्र गेल्या दशकाकडे जरा तिरकस नजरेने पाहिलं की या सगळ्या क्षेत्रात काही अफाट 'न-लोकोत्तर', 'अ-आदरणीय' मंडळी वावरताना दिसतायत (मराठी व्याकरणात न-लोकोत्तर आणि अ-आदरणीय हे शब्द नाहीत हे मला माहितीय पण तरी मी मुद्दाम लिहिलेत. स्पष्टीकरण पुढे लिहीनच). यातल्या काही  'रत्नां'बद्दल लिहिण्याचा हा खटाटोप! राजकारण क्षेत्रात राजपुत्र चि. राहुल गांधी, क्रीडा क्षेत्रात श्री श्री श्री सर रवींद्रसिंहजी जडेजा, आणि कलाक्षेत्रात (?) थुसार कपूर (यांना श्री. , कु., चि. यातलं नेमकं काय लागू होतं याची कल्पना नसल्याने ? लिहिलं असून एका आकडेज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावाचा उच्चार आम्ही 'थुसार' असा करतो) हीच ती न-लोकोत्तर, अ-आदरणीय मंडळी! (मी हे नमूद करू इच्छितो की या तिन्ही क्षेत्रात अशी माणसं शेकड्याने असतील पण या तिघांवर माझा 'विशेष जीव' आहे)

या प्रत्येकाने काहीही विशेष करतासुद्धा यांच्याबद्दल जेवढं लिहिलं, बोललं जातं ते पाहून मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रीय स्तरावर लोकांना माहीत असलेली ही तिन्ही माणसं निष्क्रिय माणसं आहेत का? उत्तर 'नाही'..पण यातल्या कुणीतरी प्रचंड कौतुकास्पद कामगिरी केलीय का? उत्तर 'नाही'..ही सगळी हुशार, जिनियस माणसं आहेत का? उत्तर 'नाही'.. ही सगळी मठ्ठ माणसं आहेत का? तर याचंही उत्तर 'नाही'! यातल्या कुणीच अनादर वाटावा, चीड यावी अशी कामगिरी (अजूनतरी) केलेली नाही पण म्हणून त्यांच्यातल्या कुणाबद्दलच मला जरासुद्धा आदर वाटत नाही म्हणून अ-आदरणीय. या सगळ्यांचीच आत्तापर्यंतची कामगिरी पाहून, वक्तव्यं ऐकून कधी गालातल्या गालात तर कधी पोट धरधरून हसायला येतं, यदाकदाचित यातल्या कुणीही काही कर्तुत्व गाजवलं तरी ते 'लक बाय चान्स' असेल असं मला वाटतं म्हणून हे तिघे एकविसाव्या शतकातले 'न-लोकोत्तर' पुरुष आहेत!  

चि. राहुल गांधी हे राजघराण्यात जन्माला आले हे त्यांचं कर्तुत्व नाही (मणिशंकर अय्यर यांना तसं वाटू शकतं). दाढीचे खुंट वाढलेला चेहरा घेऊन आणि खादीचे कपडे घालून आजी-पणजोबांच्या पुण्याई(?)वर संपूर्ण देशभर भटकणाऱ्या ४३ अ-संसारी, युवा पुढाऱ्यामध्ये आदर वाटावा असं काहीच नाही! त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्यांच्या नागरिकत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत. देशाच्या अजून अस्तित्वात असलेल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची धुरा (उपाध्यक्ष) त्यांना देण्यात आली आणि या पक्षाच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी जीव- तोडून उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला पण पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही. त्यांनी या पराभवाची जबाबदारी मान्य केली (लॉल) आणि पुन्हा त्यांचा उदोउदो झाला. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काही चांगलं केलं तरी कौतुक होत नाही..पण राजपुत्राची गोष्टच वेगळी..त्याच्या हरण्याचं पण कौतुक करायला लोक तयार असतात ही शोकांतिका! भ्रष्टाचार, दहशतवाद या महत्वाच्या विषयांवर त्यांनी कधीच ठोस मतं मांडलेली नाहीत. तूर्तास ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी तयारी करत असल्याचं समजतं. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशातल्या निकालांची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होवो अशी माझी अपेक्षा आहे (पण याचबरोबर मुलायम-माया-करुणा-ममता असे सोज्वळ शब्द नावात असलेल्या कोणत्याही नेत्याच्या पक्षाकडे देशाच्या राजकारणाच्या नाड्या जाऊ नयेत ही कळकळीची प्रार्थनासुद्धा आहे)

थुसार कपूर हेसुद्धा घराणेशाही कोट्यातून सिनेसृष्टीत आलेल्या फरदीन-उदय-झायेद-हर्मन यांच्यातलं एक नाव, जे बालाजीच्या कृपेने आजही तग धरून आहे! 'मुझे कूच कहना है' अशा नावाच्या सिनेमातून चंदेरी दुनियेत आलेल्या थुसारला काय सांगायचं होतं ते अजून इतक्या वर्षांनीसुद्धा कुणाच्या बहुतेक लक्षातच आलेलं नाहीये. गोलमाल नामक चित्रपट मालिकेत केलेली मूक-बधिर 'लकी'ची भूमिका लोकांमध्ये बरीच फ़ेमस आहे. या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा पुरस्कार वगैरे पण मिळालाय जे बघून त्याच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे आपण पाहिलंय (लॉल). खरंतर त्याचा केकाटणे-गोंगाट स्वरूपी अभिनय पाहून 'अभी नय' भाई बस करो असं म्हणायची खूप इच्छा होते पण पुन्हा एकदा आपलं ऐकायला कुणीच नसतं ही शोकांतिका! 'खाकी' हा त्याची  भूमिका असलेला एकमेव चित्रपट सोडून मी त्याचा एकही चित्रपट सिरीयसली बघू शकलेलो नाही..'शूटआउट एट लोखंडवाला' नामक सिनेमात त्याला कुख्यात शार्प शूटर दिलीप बुवाची भूमिका करताना पाहणं हा माझ्या मते त्या गुंडाचा अपमान होता. तर असे गुंडाचे आणि हिरोचे 'जबरदस्त' रोल करणाऱ्या थुसारला अमेरिकेत कुठल्यातरी पब का क्लबच्या बाहेर तो 'अंडर-एज' असल्याचा संशय येउन अडवलं होतं हे वाचल्याचं आठवून पण मी 'लोळतो'! स्वतःच्या नावामध्ये एक निष्कारण 'h' घालून तो थांबलेला नाही..नुकतंच त्याच्या सांगण्यावरून एका चित्रपटाचं नाव "ब"जाते रहो ऐवजी "भ"जाते रहो केलं गेलंय… (पुन्हा लॉल). सरतेशेवटी थुसार हा एक 'अभिनेता'(?) आहे आणि तो ज्या कुठल्या भूमिका करेल त्याला तो त्याच्या अनोख्या,विनोदी शैलीतच करणार हे मी गृहीत धरलंय आणि त्याला कधीतरी काहीतरी जमेल ही शक्यता बाद केली आहे.      

सरतेशेवटी, लास्ट बट ऑफकोर्स नॉट द लीस्ट- श्री श्री श्री सर रविन्द्रजी जडेजा! मुळात मी या महा-पुरुषांबद्दल आत्ता अचानक लिहायला घेतलं याचं मुख्य कारण 'सर' आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतर्क्य, अचाट, अफाट, अबब कामगिरीने मला इतक्या दिवसांनी लिहायला प्रोत्साहन दिलंय! त्यांच्या केशरचनेपासून त्यांच्या नृत्यकौशल्यापर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालंय. निव्वळ ३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'बॉल ऑफ द सेन्चुरी' टाकलाय आणि समस्त क्रिकेट विश्वाला 'आर्ट ऑफ लिविंग' चा धडा घालून दिलाय! स्थानिक कसोटी सामन्यात त्यांनी ३०० धावांचा बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी धावा केल्या नाहीत की त्यांची चेष्टा होते जी त्यांच्या पंख्यांना मान्य नाही! सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 'जड्डू' नावाचं एक हॉटेल पण काढलंय. सर बहुचर्चित IPLच्या पहिल्या सिझनमध्ये विजेत्या राजस्थान रॉयल संघात होते. हा संघ इतर सगळ्यांपेक्षा 'लिंबूटिंबू' मानला गेला होता पण तेव्हा सरांबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. सरांमुळे राजस्थान जिंकलं. सर भारतीय संघात आल्यापासून आपण एकही कसोटी सामना हरलेलो नाही. थुसार आणि चि. गांधी यांची इतकी थट्टा केल्यावर मी सर जडेजा यांच्याबद्दल असं काहीतरी लिहू शकेन अशी मला अपेक्षा होती. पण माझी हिम्मतच होत नाहीये..शेन वॉर्न सारखा महान खेळाडू सरांना 'रॉकस्टार' म्हणतो तर मी बापडा त्यांना काय विशेषणं लावणार? (मराठीत 'रॉक' म्हणजे दगड नाही का?)  

अशा काही घटना आहेत ज्या कधीच घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. १) सर जाडेजांना 'विस्डेन' चा 'क्रिकेटर ऑफ द यिअर' पुरस्कार मिळणं २) थुसार कपूरला अभिनयाचं ऑस्कर मिळणं..आणि ३) चि. राहुल गांधींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणं. या सर्व अ-आदरणीय लोकांची गेल्या पाच-सात वर्षातली कामगिरी आणि मी उल्लेख केलेल्या सर्व पुरस्कारांची गेल्या कित्येक दशकांमधली क्रेडिबिलीटी पाहता या सगळ्या गोष्टी अशक्यच वाटतायत..पण काही गोष्टी मात्र नक्की शक्य आहेत. १) सर जडेजा १५-२० कसोट्या आणि अजून ३०-४० वन डे खेळून आधी कमेंटेटर आणि नंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष बनणार २) थुसार कपूरला २०२० साली पद्म पुरस्कार आणि २०३५ सालचा अभिनयाचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळणार आणि ३) चि. गांधींना इतर जवळपास सर्व माजी 'खांग्रेस' पंतप्रधानांसारखा 'भारतरत्न' मिळणार (ही शेवटची गोष्ट कधीच होऊ नये अशी खरंच खूप खूप जास्त इच्छा आहे म्हणून ती लिहिणार पण नव्हतो पण गेल्या सहा-सात दशकातला कारभार पाहता या सगळ्या विनोदी कल्पनांमध्ये भीषण वास्तवाचा उल्लेख असावा असं वाटलं म्हणून लिहिली) 

मला शाळेत नेहमी शिकवलं गेलंय की कोणत्याही लिखाणाची सुरुवात आणि शेवट चांगला असला तर वाचणाऱ्यांच्या मनात त्याचा 'ठसा' उमटतो. हे डोक्यात ठेवून लिहायची सुरुवात करताना चाणक्य, तेंडुलकर ही नावं लिहिली. पण शेवट गोड कसा करू? कडू, खारट असं काही चुकून खाल्लं गेलं की साखर खाऊन तोंड गोड करता येतं पण चुकून खूप गरम चहा-कॉफीचा घोट घेऊन जीभ भाजली की काहीच करता येत नाही…पुढचे काही तास, दिवस कशालाच चव लागत नाही. थुसार, सर जडेजा आणि चि. गांधी यांची इतकी स्तुती वाचून कुणी शेवटपर्यंत हे सगळं वाचणारे का याचीच खात्री नाहीये! पण इतकंच म्हणतो की आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात एकतरी अशी व्यक्ती सापडते जिच्याशी आपलं कधीच पटत नाही. जिव्हाळा नसतो, भांडणंदेखील नसतात पण तरी उगाचच आपल्याला काहीतरी खटकत राहतं! अशा मला खटकणाऱ्या माणसांबद्दल जाहीर मंचावर 'स्तुती' करण्याची माझी हौस मी भागवून घेतली. त्यांची उघडपणे थट्टा करण्यात कोणाच्याही आणि 'कोणत्याही' भावनांना ठेच लागली असली तर सॉरी पण 'नो सॉरी'!! येत्या काळात ही मंडळी देशाचं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचं अतोनात नुकसान न करता आपल्याला (स्पेसिफिकली मला) अशीच हसवत राहतील अशी बालाजीचरणी प्रार्थना!

पुन्हा एकदा-
                             ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।

Friday, April 27, 2012

प्रेम..वेल...अ..प्रेम..हं..


            पूर्वीच्या हिंदी-मराठी सिनेमांमध्ये, मालिकांकडे बरेचदा 'नाक्यावरचे प्रेमवीर' असायचे. गळ्यात लाल किंवा तसलासा भडक रुमाल, तोंडात सिगरेट नाहीतर 'ईस्टाइल' म्हणून धरलेली काडी, कसातरी खोचलेला शर्ट, डोक्यावर टोपी किंवा बांधलेला रुमाल वगैरे! अनिल कपूर (राम-लखन), जॅकी श्रॉफ (हिरो), आमीर खान (रंगीला), सलमान खान (तेरे नाम) या मंडळींनी अशा भूमिका लोकप्रिय केल्या. आपल्या प्रेयसीवर किती उदात्त, वेड्यासारखं प्रेम करावं याचं या व्यक्तिरेखा मूर्तिमंत उदाहरणं होती. 'प्रेम करावं भिल्लासारखं...' वगैरे वगैरे कविता सूट होतील त्यांच्या प्रेमाला! मी 'तेरे नाम' पहिला नाहीये म्हणजे 'मी प्रेम करायला नालायक आहे' असं देखील मला माझ्या एका मित्राने सांगितलं होतं. मग शारूक, सैफ यांच्यासारखं चकचकीत, पॉश प्रेम करणारे नायक आले. प्रेम व्यक्त करायच्या पद्धती बदलल्या. पण सगळं सुरळीत चालू होतं. मग ऑर्कुट आलं, फेसबुक आलं आणि प्रेम या विषयावर लोकांचा एकूणच व्यासंग भयंकर वाढला. नाक्यावरच्या प्रेमवीरांपासून आपली 'तांत्रिक' आणि 'सांस्कृतिक' प्रगती होऊन आज 'वर्चुअल' प्रेमवीर अशी एक नवीन e-literate जमात उदयाला आलीय. या जमातीचे आणि त्यांच्या व्यासंगाचे माझ्यासारख्या अल्पमती माणसाच्या 'सामाजिक गुंत्यावर' (सोशिअल नेटवर्क हो!!) होणाऱ्या भल्या-बुऱ्या परिणामांची नोंद करायला हा खटाटोप..!     

जीवनावश्यक वस्तू खूप महाग होत चालल्यात असं म्हणून एकीकडे आपण हळहळत असतो दुसरीकडे प्रेम मात्र दिवसेंदिवस इतकं स्वस्त होत चाललंय की काही वर्षांनी खरंच प्रेम खाऊन-पिऊन जगायची तयारी करावी लागणारे. लोक 'सिंगल' ते 'इन अ रिलेशनशिप' इतक्या सहज जातात की ही माणसं लहानपणी डोक्यावर पडली होती अशी मला शंका आहे. 'इट्स कॉम्पलिकेटेड' म्हणजे नेमकं काये? एखादं सर्टीफिकेट मिरवल्यासारखं लोकांना रिलेशनशिप स्टेटस ही गोष्ट मिरवण्यात काय मजा येते हेही मला अजून उमगलेलं नाहीये. आपल्या प्रेयसीला नुसतं हृद्य नाही पण डोळा, किडनी, यकृत, फुफुस्से असे ऑलमोस्ट सगळे अवयव दिलेल्या प्रियकरांच्या गोष्टी मी 'Please Read Carefully' किंवा 'जगातली सगळ्यात दुर्दैवी प्रेमकथा' अशा शीर्षकाखाली वाचल्या आहेत. एक मुलगा छातीशी हात घट्ट धरून उभा आहे, खाली रक्ताचं थारोळ झालंय आणि एक मुलगी त्याचं 'हार्ट' घेऊन पाठमोरी जातेय अशा प्रकारची कित्येक हिंसक चित्रं लोकप्रिय आहेत. गुलाब, लाल बदाम, टेडी बेअर्स, चॉकलेट्स ही पारंपारिक प्रेम व्यक्त करणारी प्रतीकं मागे पडली आहेत आणि त्यांची जागा आता हातावर 'ब्लेड्बाजी' केलेल्या, नसा कापून घेतलेल्या फोटोंनी घेतली आहे. ‘ऍबस्ट्रॅक्ट’ आर्ट का काय म्हणतात ते पूर्वी लोकांना कळायला कठीण जायचं, शतकानुशतकं पिकासोसारख्या मंडळींनी या कलाप्रकारावर अधिराज्य गाजवलं. पण आता- 'वर्चुअल' प्रेमवीरांचा विजय असो! त्यांच्यामुळे आपल्याला समजलं आहे की ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे काय! एखाद्या स्वच्छ पृष्ठभागावर पडलेले चार पाण्याचे थेंब किंवा एकत्र जळणाऱ्या दोन काड्या असे फोटोस जर का आपण काही वर्षांपूर्वी पाहिले असते तर 'रोल वाया घालवला' असं म्हणून आपण त्या फोटोसची थट्टा केली असती किंवा न कळणारं ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणून विषय सोडून दिला असता. पण आता आपण खात्रीने सांगू शकतो की ते पाण्याचे चार थेंब म्हणजे 'प्रेम', दोन जळणाऱ्या काड्या म्हणजे 'प्रेम', वाळूवर उमटलेली पावलं म्हणजे 'प्रेम', समुद्राच्या लाटा, आकाश, जेवण, दगड, विमान, बोटी, सगळं सगळं म्हणजे....करेक्ट कळलंय सगळ्यांना नाही का? प्रेमाचं मूर्तिमंत प्रतिक म्हटलं की सगळं जग 'ताजमहाल' असं नाव घेतात पण ज्या लोकांवर वर्चुअल प्रेमवीरांच्या व्यासंगाचा पगडा आहे ते चीनमधल्या कुठल्यातरी टेकडीत खोदलेल्या पायऱ्यांचीसुद्धा गोष्ट सांगतील. 'प्रेम पुरेसे आहे' किंवा 'दुसरे काळीज देईन तोडायला' अशा वैविध्यपूर्ण नावांचे गट आज फेसबुकावर अस्तित्वात आहेत आणि त्यांचा अभ्यास दांडगा आहे. माहितीचा अतिरेक म्हणजे गुगल किंवा विकिपीडिया नाहीच पण हे सगळे गट आहेत. तुम्हाला एखादी मुलगी/मुलगा आवडत असेल तर तुम्ही कसं वागलं, बोललं पाहिजे याचं प्रतीकात्मक प्रशिक्षण आज फुकट उपलब्ध आहे. तुम्ही प्रेमाची कबुली दिल्यावर तुम्हाला मिळू शकणारी आदर्श उत्तरं, नकारात्मक उत्तरं, त्यावर तुम्ही द्यायची उत्तरं हेसुद्धा तुम्हाला इथे कळतं. 

मला सगळ्यात जास्त अचंबित करतात ते वर्चुअल प्रेमकवी. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या दिवसात 'प्रेम' म्हणजे काय असतं ही अक्कल जरी नसली तरी पाडगावकरांची 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं' ही कविता माहित होती. कवितेतल्या 'पाच मुलं झाली तरी प्रेम कधीच केलं नाही' या ओळीला कोपरखळ्या व्हायच्या. नंतर खरे बुवा आले, त्यांची 'लव्ह लेटर' गाजली. नंतर या वर्चुअल वर्ल्डमध्ये प्रेमकवितांचा पाउस पडायला सुरुवात झाली. गद्यकविता, स्फुटे, चारोळ्या, गजल अशा प्रकारांनी उच्छाद मांडला. आधी लिहिल्याप्रमाणे दगड, माती, पाणी सगळं प्रेम असल्यामुळे या कवितादेखील तशाच..सुखं-दुःखं, ऊन-पाउस अशी साहित्यात पूर्वी सर्वसाधारण आयुष्याला उद्देशून वापरली जाणारी रुपकं प्रेमासाठी वापरली जायला लागली. चारोळी या काव्यप्रकाराने तर प्रत्येक इंग्लिश मिडीयमवाल्या मुलातसुद्धा दडलेला, त्याला कधीच न उमगलेला आणि उमगण्याची शक्यता नसलेला कवीदेखील जिवंत केला. या चारोळ्या वाचल्या की पुलंच्या 'असा मी असामी' मधलं 'यात काही यमक आहे का काव्य आहे?' हे वाक्य आठवलं नाही तर शपथ!!

तर या सर्व प्रेमवीरांबद्दल माझ्या मनात राग, लोभ, करुणा, प्रेम (?), दया, क्षमा अशा सगळ्या भावना आहेत. त्यांच्या भावनांबद्दल मला आदरयुक्त राग आणि भीती आहे. त्यांनी प्रेमाच्या जगातली त्यांची मुसाफिरी अशीच चालू ठेवावी आणि जगातल्या सगळ्या प्रेमेच्छुक तरुण-तरुणींच्या ज्ञानात भर घालत राहावी. मात्र माझ्यासारख्या पामर आणि प्रेमेच्छुक नसलेल्या माणसांच्या सामाजिक गुंत्यामधली गुंतागुंत अधिक वाढवू नये ही प्रार्थना ही क्युपिडच्या (हो तोच तो प्रेमाचा 'उडता' एंजल) चरणी मी करत आहे. 

ऑन अ सिरीयस नोट, मला खरंच असं वाटतं की सोशिअल नेट्वर्किंगमुळे एकूणच समाजभान वाढलं आहे की सुटत चाललंय याचा विचार प्रत्येकाने करायला हवाय. 'प्रेम' इतकं स्वस्त नसतं यार!! जगात खूप समंजस लोक आहेत यावर माझा विश्वास आहे आणि जर का काही समंजस लोकांना प्रेमासारख्या गोष्टी चव्हाट्यावर मांडाव्याशा वाटतात..तर-...वेल..सामाजिक गुंते वाढवताना भावनिक खच्चीकरण होतंय असं समजावं लागेल. माझं रिलेशनशिप स्टेटस ध्यानात घेता मी हे नमूद करू इच्छितो की हा लेख मी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता किंवा पक्षपातीपणा न करता एक साधारण मनुष्य या नात्याने लिहिला आहे. तो विरंगुळा म्हणूनच वाचावा. त्यातून कुणाच्याही भावनेचा अपमान करायची इच्छा नाही. कुणी अपमान करून घेतल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.    

ता. क: हा ब्लॉग लिहिताना मी 'मैने तेरे लिये ही सात रंग के' ऐकत होतो. मजा आली. बरेच दिवसात ऐकलं नसेल तर नक्की ऐका. आणि आता 'P.S. I love you' बघायचा बेत केलाय. खूप सुंदर 'लव-इस्टोरी' आहे ती! खाली एक चित्र देतोय...त्या चित्रातून मला काय म्हणायचं आहे हे लेख वाचून तुम्हाला कळलं असेलच!




चैतन्य

Monday, April 9, 2012

एक सुस्त रविवार

ब्लॉग वाचण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा 
                                                                             **
"सर, सगळे गेलेत, आता साधारण तासभर आम्ही कुणाला आत येऊन देणार नाही..तुमचं सावकाश आटपू द्या" एक सफारी घातलेला माणूस येऊन सांगून गेला. झरूनी त्याचं कौतुक करायला त्याचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला पण अहं..त्यांना काही नाव आठवलं नाही.
"चलिये आसिफ भाई" मागून मन्नुजींनी येऊन पाठीवर थाप मारली.."सगळे खोळंबलेत"
"अ हो.. हो..चला" म्हणत दोघे प्रशस्त डायनिंग टेबलकडे आले. 
"हा तुमचा मिडिया फार तापदायक प्रकार आहे हो..आम्ही तिकडे बसून नुसते ऐकतो..आज पाहिलं बुवा" झरु म्हणाले.
"सगळे आगाऊ, लबाड आहेत हो..मी तर त्यांच्यासमोर काही बोलायलाच जात नाही..पराचा कावळा करतात हो.." मन्नुजी हतबल होत म्हणाले.
"तुम्ही आता बोलतच बसणार आहात की जेवणार पण आहात? या राजकारण, मिडिया असल्या वायफळ चर्चा होत राहतील..मन्नू काका, मम्मी नाहीये तर तुमची बडबडच सुरु झाली" प्लेटवर काटे-चमचे आपटत राहुल्या बोलला.
"अरे मी कधीचं तेच विचारणार होतो, मॅडम कुठे गेल्या?" झरुनी विचारलं.
"मॉम इस्टरच्या प्रोग्रॅमला गेलीय..तिने तुम्हाला वेलकम विशेस पाठवल्या आहेत, मी सांगायलाच विसरलो"
"ओके ओके.."
"जेवायचं का? मला तर खूप भूक लागलीय" म्हणत राहुल्याने अधाशासारखे पानात पदार्थ वाढून घेतले.
'याची मम्मी समोर असती तर आत्ता तिने डोळे मोठे केले असते..मेला पोट भरायला खातो की साठवून ठेवायला खातो हे मला अजून कळलेलं नाही..' मन्नूनी मनातल्या मनात म्हटलं.
झरूंनी अल्लातालाचं नाव घेतलं आणि बिस्मिल्लाह केला. दोन तीन घास खाऊन झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मन्नुजी काही खातच नाहीयेत.
"मन्नूजी, आजचा मेनू तुमच्या विशेष आवडीचा दिसत नाही.."
"अ..नाही नाही..जेवतो की.."
"कसला विचार करताय?"
"तुमच्याशी एक-दोन मुद्द्यांवर चर्चा करायची होती..ती कधी करता येईल त्याचा विचार करत होतो.."
"काय मन्नू साहेब? मी तुमच्याशी चर्चा-बिर्चा करायला इथे आलेलो नाहीये..काल मुद्दाम मिडीयाला स्टेटमेंट दिलं मी तसं..मी संडे एन्जॉय करायला आलोय..आपण आत्ता मस्त जेवूया..मग थोडावेळ टीव्ही बघू वेळ असेल तर..तुमचा तो ‘डान्स इंडिया डान्स’ नावाचा कार्यक्रम आमच्याकडे फार लोकप्रिय आहे..तुम्ही पाहता का?"
"अहो झरु अंकल, अख्ख्या इंडियातल्या लोकांना वाटतं की माझी मम्मी यांनाच गेली कित्येक वर्ष डान्स करायला लावतेय..ते कसला प्रोग्रॅम बघणारेत??" राहुल्याने पुन्हा थट्टा करायची संधी सोडली नाही. 
"गोश तो एकदम टेस्टी बना है..मला तर जामच आवडलं" इतका वेळ शांत बसलेला बिल्लू बाळ बडबडला.
"सेम पिंच.." राहुल्याने त्याच्या हाताला चिमटा काढत म्हटलं.  
"मन्नुजी तुम्ही आत्ता जेवून घ्या..नंतर आमच्यासाठी अरेंज केलेलं कॉप्टर थोडं १०-१५ मिनिटं थांबवू आणि तेवढ्या वेळात करू काय ती चर्चा..नेहमीचेच तर विषय असणारेत.."
"मन्नू काका, जेवून घ्या..मम्मी नाहीये म्हणून नीट तोंड उघडून जेवता येईल तुम्हाला" (हे वाक्य कोण बोललं असेल हे.सां. न.)
बिल्लू बाळ जेवताना मच-मच आवाज करत जेवतो हे मन्नुजींच्या लक्षात आलं होतं पण डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळे त्याला काही बोलता येत नव्हतं. दुसरीकडे राहुल्या उगाच त्यांची चेष्टा करत होता पण मॅटर्नल इम्युनिटीमुळे त्यालाही काही बोलता येत नव्हतं. त्यांची चिडचीड झाली होती. 
गेला दीडेक आठवडा मिडीयाने झरुंच्या या ट्रीपची जरा जास्तच हाईप केली होती. त्यात अमेरिकेने हफिझ सैद असं नवीन नाव जागतिक चर्चेला पुरवलं होतं. ‘आधीच काय प्रॉब्लेम्स कमी आहेत? त्यात नुकतंच सियाचीनमधल्या हिमवादळात काहीशे पाकिस्तानी सैनिक सापडल्याचं त्यांना कळलं होतं. हा झरू त्यांना सोडवायला मदत करा असं सांगणार याची त्यांना खात्री होती. झरूने येताना मोठी शक्कल लढवली होती. दिलेल्या वेळेपेक्षा तो तब्बल दिडेक तास उशिरा आला होता. त्यामुळे ठरलेल्या वेळेतला उरलासुरला वेळ हा वेळ काढत जेवणार आणि काढता पाय घेणार हे त्यांच्या लक्षात आलं. बरं त्याला जास्त वेळ थांबवला तर मिडिया बोंबलणार, राहुल्या चुगल्या करणार आणि मग मॅडम काहीतरी बोलणार! मॅडम पण लई हुशार आहेत, स्वतः इस्टरचं नाव काढून आल्या नाहीत आणि या बिंडोकला दिलं पाठवून! चीनकडून पण या भेटीबद्दल काहीतरी भोचक विधान होणार! आता काहीतरी डोकं लावायलाच पाहिजे.’ मांडीवर घेतलेला रुमाल बाजूला करत गुडघा खाजवत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली. तो लगबगीने पळत आला. त्याच्या कानात काहीतरी कुजबुजत त्यांनी त्याला परत पाठवलं. झरुने त्यांच्याकडे पाहत मान हलवत, भुवई वर करून 'काय?' असा प्रश्न विचारला.
"आपलं ते १०-१५ मिनिटं उशीर करायचं हो.." म्हणत त्यांनी विषय थांबवला. झरूजी परत जेवणात बिझी झाले. 
बिल्लू आणि राहुल्या जेवता-जेवता एकमेकांशी आय-फोनची ऍप्स डिस्कस करत होते. अनेक गोड पदार्थांपैकी झरूंना बासुंदी आवडल्याचं दिसत होतं. पण ती ते भातात घालून खायला लागल्याचं मन्नुजींना दिसताच त्यांनी बाकी काही न खाता शेवटचा दही-भात पानात वाढून घेतला. 
**
"फार छान सुपारी आहे हो..मला थोडी पार्सल देता का?" झरूंनी विचारलं. त्यांनी ऑलरेडी तीन-चार वेळा सुपारी खाऊन झाली होती. 
"हो हो..आमच्याकडून भारतभेटीनिमित्त तुम्हाला तेवढीच भेट" मन्नु हसत म्हणाले आणि त्यांनी मागे उभ्या माणसाला खूण केली. तो सुपारीची पाकिटे अरेंज करायला पळाला.
मागून एकमेकांना टाळ्या देत, खिदळत बिल्लू आणि राहुल्या आले. 
"मन्नु अंकल, मला जेवण फार आवडलं..एक नंबर..मी आत्ताच हिंदुस्तानात अमन राहो म्हणून ट्विटपण केलं"
"बेटा, तुम्ही खुश तर आम्ही खुश..काय झरू साहेब बरोबर ना...??"
"अलबत..शेवटी आमची गद्दी तुम्हीच तर चालवणार आहात.." झरूंनीही दाद दिली. 
('माझी गादी टिकेल का नाही तेच माहित नाही..बिल्लुला आयुष्यभर झोपायला गादी मिळाली तरी खूप झालं' झरूच्या डोक्यात आलेला विचार, 'या राहुल्याला ‘सायकल’ चालवता येत नाही, गादी काय चालवणार?' मन्नुच्या डोक्यातला विचार)
''चलो अंकल, आम्ही जातो जरा पुढे..आमच्या जरा वेगळ्या गप्पा चालल्या आहेत" म्हणत बिल्लू राहुल्याचा हात धरून निघाला. राहुल्या जाताना आपल्याकडे डोळे वटारून बघत आपल्याला दटावतो आहे असं मन्नुजींना वाटत राहिलं.
मुलं पुढे गेल्याचं बघून झरूंनी विचारलं-
"बोला साहेब, तुम्हाला कसली चर्चा करायची होती? दारापर्यंत चालता चालता बोलू..."
"अ..ते आपलं हे..” असं म्हणत त्यांनी मागेमागे चालणाऱ्या सेक्रेटरीच्या हातातून एक कागद घेतला. "हे आमचं मिडिया स्टेटमेंट..आमचे पक्ष प्रवक्ते आपण 'या' गोष्टी बोललो म्हणून सांगतील.." म्हणत तो कागद झरूंना दिला. झरूनी कोटाच्या खिशातून चाळीशी काढली आणि डोळ्यावर चढवत तो कागद वाचला. 
"ठीके..चालतंय..तेवढा कसाबवाला मुद्दा काढून टाका..जुना झालाय हो तो..आमच्याकडे खात्रीशीर रिपोर्ट आहेत की हिंदुस्तानी लोक विसरलेत त्याला.."
"अहो पण.."
"अहो कसलं पण आणि काय...हा हफिझ सैदवाला मुद्दा आपण का मांडलाय? लोकांनी त्या कसाबला विसरून जावा म्हणून..मुळात हा हफिझ सैद अस्तित्वात तरी आहे का मला सांगा..?" झरू डोळा मारत म्हणाले.
"अ..तेही खरंच.."
"आणि हो, त्या सियाचीनच्या दुर्घटनेचं कानावर आलं असेल तुमच्या..त्याचं काहीतरी पहा.."
"अ..हो..मॅडमशी बोलेन मी त्याच्याबद्दल"
"मॅडमसमोर तोंड उघडणार नसाल तर त्यांना लिहून कळवा" झरुंनीही मन्नुजींची थट्टा केली. मन्नुजी ओशाळून हसले.
"आणि हो, अजून एक..राहुल्या आणि बिल्लूचं चांगलं जमलेलं दिसतंय..एखादं वाक्य ते पण टाकून द्या...मॅडमपण खुश होतील" 
मन्नुजींनी मागे उभ्या सेक्रेटरीला खूण केली, त्याने मुद्दा हातातल्या नोटपॅडवर खरडला.
"असेच बोलवा परत कधीतरी..पुढच्या वेळी आल्यासारखे राहून जाऊ २-३ दिवस काय.?" झरू म्हणाले.
“हो हो जरूर.."
"आणि तुम्हीसुद्धा या कधीतरी..आमच्याकडे बघायला जाम भारी काय काय आहे.."
"खरंच??" मन्नुजींनी एक निसटता वार करायची संधी साधली. पण तोपर्यंत झरू समोर आलेल्या मिडीयाच्या लोकांना अभिवादन करण्यात गुंतले होते.
**
तो दुपारचं जेवण जेवून निवांत पडला होता. रविवारी सगळ्यांना एक स्वीट मिळतं. आजूबाजूच्या दोन-तीन लोकांच्या पानातलं हात घालून घालून त्याने खाल्लं होतं. एका हवालदाराने येऊन काठी गजांवर आपटली. त्याने त्रासून हवालदाराकडे पाहिलं-
"काये?" 
"चिठ्ठी!!"
त्याने उडी मारत उठुन ते चिठोरं घेतलं. आणि उघडून वाचायला सुरुवात केली-
"जनाब, 
रविवारची मेजवानी यशस्वी..निघायची वेळ जवळ आलीय...तयार व्हा"
***