Pages

Saturday, January 4, 2020

पर्सन ऑफ इन्टरेस्ट: उहापोह आणि चिंतन (भाग १)

        
 
(Image From: https://cutt.ly/drhUAXm)
  जोनाथन नोलन हा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा भाऊ. ख्रिस्तोफर नोलनचा गाजलेल्या पहिल्या सिनेमाची- 'मेमेंटो'ची मूळ कथा जोनाथनची होती. नंतर 'द प्रेस्टिज', 'डार्क नाईट', 'डार्क नाईट रायझेस', आणि 'इंटरस्टेलर' अशा ख्रिस्तोफर नोलनच्या कित्येक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथांवर त्याने काम केलंय. जोनाथनच्या या सगळ्या कामांचा उल्लेख इथे करण्याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या तोडीस तोड असूनही, त्याची संकल्पना असणाऱ्या 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' (POI)ला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. निव्वळ करमणूक सोडून बुद्धिजीवी लोकांना विचार करायला लावणारा, प्रचंड गुंतागुंत असणारा, भविष्याचा वेध घेणारा, प्रसंगी अचाट वा अशक्य गोष्टी आणि त्या गोष्टी करणाऱ्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा असणारा शो म्हणून मला POI कायमच खूप आवडलाय. तो का आवडला किंवा त्यातल्या विचार करायला लावणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल लिहायचं खूप महिने मनात होतं. आज फायनली मुहूर्त सापडलाय...
            ११ सप्टेंबर २००१ ला न्यूयॉर्कच्या 'ट्विन टॉवर्स'वर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिका हादरली आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण, सुरक्षा, दळणवळण अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर दूरगामी परिणाम झाले. मध्य पूर्वेतली युद्धं अमेरिकेला नवीन नव्हती पण देशांतर्गत सुरक्षाप्रणालीत घोषित-अघोषित अनेक बदल झाले ते ९/११ नंतर. 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' हा टीव्ही शो सुरु झाला २०११ मध्ये पण त्यात दाखवलेल्या गोष्टीची सुरुवात झाली ती २००१ मध्ये. शोच्या 'पायलट' अर्थात पहिल्या पर्वाच्या/सिझनच्या पहिल्या भागात आपण भेटतो जॉन रीसला. हा जॉन आधी सैन्यात होता, मध्यपुर्वेचे दौरे करून आला, नंतर सीआयएचा हेरसुद्धा होता- आता मात्र तो स्वतःला दारूमध्ये बुडवून, कुठलंतरी न सांगता येण्यासारखं दुःख कवटाळून बेघर भटकतोय. कुठल्याश्या लहानश्या मारामारीत त्याला पोलीस पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. तेव्हा त्याची सुटका एक अनोळखी, एकलकोंडा आणि काहीसा अनाकलनीय माणूस- हॅरल्ड फिंच करतो. हॅरल्ड फिंच या माणसाची सरकारदफ्तरी कुठली नोंद नाही, त्यालासुद्धा जॉनसारखा कुणीही जवळचा नातेवाईक नाही. POIला शीर्षक गीत नाही. त्याऐवजी या हॅरल्डच्याच आवाजातलं एक निवेदन आहे जे साधारण शोची संकल्पना आपल्याला सांगतं. ते निवेदन ढोबळमानाने असं-

"तुमच्यावर पाळत ठेवली जातेय.
सरकारकडे एक गुप्त यंत्रणा, एक 'मशीन' आहे जे दर क्षणाला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.
मला मशीनबद्दल माहितीय कारण ते मीच बनवलंय.
मी मशीन बनवलं ते दहशतवादी घातपातांच्या घटनांवर लक्ष ठेवायला,
पण मशीनचं लक्ष तर सगळ्या(जगा)वरच आहे, सगळ्या हिंसक गुन्ह्यांवर!
असे गुन्हे ज्यात तुमच्यासारखे लोक गुंतलेले असू शकतात,
असे गुन्हे ज्याला सरकार काही महत्व देत नाही,
सरकार काही करत नाही म्हणून मी (गुन्हे थांबवायला) काहीतरी करायचं ठरवलं..
पण मला या कामात एक जोडीदार हवा होता (जॉन रीस इथे पडद्यावर दिसतो), ज्याच्याकडे असे गुन्हे थांबवण्यासाठी लागणारी तंत्रं असतील...
यंत्रणा आमच्या मागावर आहेत, (म्हणून) आम्ही गुप्तपणे काम करतो..
तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही....
पण तुम्ही जर का (संभाव्य) गुन्हेगार किंवा गुन्ह्याला बळी पडणार असाल तर आम्ही तुम्हाला शोधू..."


गुन्हेविश्वावर आधारित टीव्ही शो अर्थात 'Crime Procedural' ही संकल्पना अजिबातच नवीन नाही. आजपर्यंत जगभरात शेकड्याने असे कार्यक्रम बनले असावेत ज्यात भागाच्या सुरुवातीला खून (कधीतरी चोरी) वगैरे होतो आणि वेगवेगळे स्टायलिश लोक आपापल्या पद्धतीने खुनी, चोर वगैरे शोधतात. POI चा पहिला सिझन हा एकूणच प्रत्येक भागाची स्वतंत्र कथा असणाऱ्या 'Crime Procedural' प्रकारात येत असला तरी गुन्ह्याची उकल करण्यापेक्षा 'गुन्हा थांबवणं' हा त्याची मुख्य 'थीम' आहे. त्यात 'मशीन'च्या कार्यपद्धतीमुळे नेहमी गुन्ह्याशी 'संलग्न व्यक्ती' अर्थात 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' गुन्हा करणारे की गुन्ह्याला बळी पडणारे हे रीस किंवा फिंचला माहित नसतं. तेव्हा ते शोधणं हा ही एक रहस्याचा भाग! जॉन रीस फिंचच्या मदतीनं, निनावी राहून, पोलिसांपासून लपत-छपत, टिपटॉप सुटाबुटात फिरून न्यूयॉर्क शहरात घडणारे गुन्हे थांबवायला सुरुवात करतो. न्यूयॉर्कच्या पोलीस, गुन्हेगारांपासून ते पार एफबीआय, सीआयएपर्यंत 'सुटातला माणूस' अशा हास्यास्पद (पण चपखल) नावाने प्रसिद्ध होतो. सोबतच्या उपकथानकांमध्ये दोन पोलीस अधिकारी सहकारी पात्रं म्हणून दर भागात दिसतात. यातली एकजण 'जोस कार्टर' प्रामाणिक, निष्ठावंत डिटेक्टिव्ह आहे जिला 'सुटातल्या माणसाला' पकडायचंय आणि दुसऱ्या काहीश्या चांगल्या वृत्तीच्या पण भ्रष्ट्र डिटेक्टीव्ह 'लायनल फस्को'ला जॉनने त्याच्याविरुद्धचे काही पुरावे लपवून ठेवत स्वतःच्या बाजूला करून घेतलंय. न्यूयॉर्कमधल्या भ्रष्ट पोलिसांची एक संघटना जिचं नाव HR, तिथल्या गुन्हेगारी फॅमिलीज आणि त्यांच्यातला संघर्ष हेसुद्धा अगदी सहज या सिझनमध्ये येतं. मी वर लिहिलेली गुंतागुंत, भविष्याचा वेध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्याचा आयुष्यावर होऊ शकणारा परिणाम असे क्लिष्ट मुद्दे या पहिल्या सिझनमध्ये नाहीत. यातली लहान-मोठी उपकथानकं, इतर पात्रं चांगली असली तरी तोंड भरून कौतुक वगैरे करण्याजोगी नाहीत. जवळपास सगळे भाग स्वतंत्र आहेत आणि फक्त कार्यक्रमाची संकल्पना माहित असेल तर आधीचा भाग बघितलाच पाहिजे असं नाही. यातही 'जजमेंट', 'विटनेस', आणि 'बेबी ब्लु' हे माझे आवडते एपिसोड्स आहेत.

दुसऱ्या पर्वात POI मालिका म्हणून हळूहळू 'सीरियलाईज्ड' व्हायला लागते. ज्याला 'आर्टिफिशियल सुपरइंटेलिजन्स' (ASI) म्हणता येईल असं मशीन अस्तित्वात असल्याची चाहूल लागलेले लोक, मशिनचं अस्तित्व जगाला कळू नये म्हणून सरकारी यंत्रणांचे चालू असणारे अथक प्रयत्न (ज्यात मुखत्वे मशीनबद्दल ठाऊक असलेल्या लोकांना जीवे मारणं  हेच त्याचं अस्त्रित्व लपवण्याचा मार्ग आहे हे मानणारे अधिकारी) ही मुख्य उपकथानकं इथे येतात. फिंचचा भूतकाळ, त्याने नेमक्या रीसलाच का जोडीदार म्हणून नेमलं, मशीन फिंचशी किंवा फिंच मशीनशी संपर्क कसे साधतात? या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मशीनचा शोध लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हेतू आहेत- कुणाला ते नष्ट करायचं आहे, कुणाला त्याच्यावर ताबा हवाय वगैरे वगैरे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक 'मशीन' या यंत्रणेला एक पात्र म्हणून बघायला लागतो. दरम्यान पहिल्या पर्वात असणारी सहकारी पात्रं- कार्टर, फस्को, एलायस, रूट आता जास्त महत्वाची होतात. 'टीम मशीन' विस्तारते ज्यात आता रीस, फिंच सोडून कार्टर, फस्को, समीन शॉ सुद्धा सहभागी होतात. दुसऱ्या सिझनमध्येसुद्धा जवळपास प्रत्येक भागाला एक 'स्वतंत्र' कथानक आहे आणि काही प्रमाणात वर लिहिलेली उपकथानकं पुढे नेण्यावर भर आहे (जे पुढच्या सीझन्समध्ये अधिकाधिक होतं). एकूणच दुसरा सिझन मला आवडला असला तरी विशेष करून रीसला 'सुटातला माणूस' म्हणून एफबीआयचे लोक पकडतात तेव्हाचे २ भाग '2PiR' आणि 'प्रिसनर्स डायलेमा' मला खूपच आवडतात. सगळ्या १०३ एपिसोड्सपैकी जोनथन नोलनने दिग्दर्शित केलेला एकमेव, समीन शॉच्या पात्राची ओळख करून देणारा 'रिलेव्हन्स' नावाचा भागही जबर आहे!
२०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेन हे नाव जगाला माहित झालं. स्नोडेनने अमेरिकची 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' जगभरात लोकांवर बेकायदेशीर पाळत ठेवायचे कार्यक्रम राबवत असल्याचे उल्लेख असणारी कागदपत्रं जगजाहीर केली. स्नोडेनच्या या कामगिरीचे पडसाद अमेरिकेतच नाही तर जगभरात उमटले. त्याने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये कित्येक टेलिकॉम कंपन्या आणि युरोपियन देशातल्या सरकारांचादेखील उल्लेख होता. हा सगळाच विषय 'POI' च्या मध्यवर्ती संकल्पनेला इतका 'रिलेवंट' असल्याने त्यावर उहापोह होणं अपेक्षित होतं आणि तो झालासुद्धा. दुसऱ्या सीझनमध्ये आपण 'मशीन'ला पात्र म्हणून ओळखायला लागतो तेव्हा त्याच्या 'कोडिंग'मध्ये अर्थात जडणीघडणीमध्ये हॅरल्डच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनाचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात यायला लागलेलं असतं. तिसऱ्या सीझनपासून हे जास्तच अधोरेखित होतं. या सिझनमध्ये न्यूयॉर्क मधल्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेला संपुष्टात आणण्यासाठी कार्टर करत असलेली धडपड, लोकांवर सरकारने बेकायदेशीर पाळत ठेवायच्या बातम्या/अफवा पसरायला लागल्यावर त्याच्या विरोधात सक्रिय झालेली सशस्त्र नागरी संघटना आणि 'मशीन'वर ताबा मिळवणं अवघड आहे याची जाणीव झाल्यावर तसंच दुसरं मशीन बनवायच्या मागे लागलेले लोक ही तीन मुख्य कथानकं आहेत. तिसऱ्या सीझनमधला 'डेविल्स शेअर' हा भाग अफलातून आहे. याच सीझनमधला ४C नावाच्या एपिसोडचं लिखाण हे मला त्यातल्या एक-दोन अचाट सीन्समुळे थोडं वीक वाटतं. पण एकूणच या सीझनपर्यंत POI ची 'मायथॉलॉजी' आणि रीस-फिंचचं 'सुपरहिरो' असणं मी प्रेक्षक म्हणून मान्य केलेलं असतं सो निदान मनोरंजनात खंड पडत नाही.

POIच्या जवळपास प्रत्येक एपिसोडसमध्ये प्रभावी कथानकं, उपकथानकं आहेत. रोचक वाटावेत असे 'पर्सन्स ऑफ इंटरेस्ट' आहेत आणि प्रत्येक मुख्य पात्राचा शोमध्ये पहिल्यांदा दिसण्यापूर्वीचा भूतकाळसुद्धा वेगवेगळ्या एपिसोड्सच्या कथानुकानुसार दाखवला गेलाय. याच अनुषंगाने आता POI च्या पात्रांबद्दल थोडं (खरंतर POI चे एकूण पाच सीझन्स आहेत पण उरलेल्या दोन सीझन्सबद्दल नंतर लिहिणारे आणि त्याचं कारणसुद्धा तेव्हाच देईन). जिम कवीझल POIच्या आधी 'पॅशन ऑफ द ख्राईस्ट' या सिनेमातल्या जिझस ख्राईस्टच्या भूमिकेमुळे लोकांना माहीत होता. त्या 'जिझस'ला सुटाबुटात मारामाऱ्या करताना, सराईतपणे बंदुका वापरताना बघणं हे काही लोकांना धक्कादायक वाटल्याचं वाचलेलं आठवतंय. एका अर्थी ही व्यक्तिरेखा एककल्ली आहे, पहिल्या एपिसोडमधली काही मिनिटं सोडल्यास आपल्याला प्रेक्षक म्हणून रीस काय करेल किंवा भूतकाळात त्याने काय केलं असेल याचा पुरेपूर अंदाज येतो. त्याला असणारं, न सांगता येणारं दुःख कोणतं आहे याचा उलगडा नंतर होतो पण याच अनुषंगाने लहान मुलं किंवा छळ होणाऱ्या बायकांशी संबंधित गुन्हा असला तर रीसचे आविर्भाव पाहण्यासारखे आहेत. कवीझलची इथली भूमिका जिझसच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली तरी एखाद्या एपिसोडच्या शेवटी कुणालातरी सल्ला किंवा नैतिक बळ देणारा कवीझल पाहिला की 'पॅशन'ची थोडीशी आठवण होतेच. एकीकडे सतत लोकांमध्ये असूनही एकाकी असणारा रीस आणि दुसरीकडे निव्वळ एखाद्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपपुढे बसून रीसशी फोनवर बोलताना दिसणारा 'अक्षरशः एकाकी' फिंच. फिंचची भूमिका करणाऱ्या मायकल इमर्सनला त्याच्या 'लॉस्ट' मधल्या नकारात्मक भूमिकेसाठी एमी मिळालं होतं. लॉस्टमधली त्याची आधी खलनायकी आणि शेवटी चांगुलपणाकडे झुकलेली भूमिका त्याने जबर केलीच होती पण इथे तो मला अभिनेता म्हणून प्रचंड आवडलाय. हॅरल्ड फिंचचं पात्र हे एका अर्थी 'POI' विश्वाची आणि पर्यायाने मशीनची नैतिकता ठरवतं . तो वस्तुनिष्ठ आहे तरी आशावादीसुद्धा आहे. जीवापाड प्रेम करणारी माणसं असूनसुद्धा एकाकी आहे. आपण मशीन बनवून चूक केलं का बरोबर या चिरंतर मानसिक द्वंदात आहे. हे द्वंद चौथ्या-पाचव्या सीझनमध्ये जास्त ठळकपणे  येतं. इमर्सनला ही भूमिका करताना बऱ्याचदा नुसते कॉम्प्युटरपुढे बसून संवाद म्हणायचे असायचे, फोनवर दुसऱ्या बाजूला रीस आहे असं आपण जरी एडिटेड एपिसोडमध्ये पाहिलं तरी इमर्सनचे हे सिन्स एकट्यानेच शूट व्हायचे हे लक्षात घेतलं तर त्याच्या फोनवरच्या संभाषणामधल्या 'रिऍक्शनस' अजून आवडायला लागतात. फिंचच्या पात्राला एका अपघातामुळे आलेलं अपंगत्व दाखवायला त्याने घेतलेलं बेरिंग फ्लॅशबॅकमधले, अपघाताआधीचे सीन्स आले की जास्त अधोरेखित होतं आणि दाद मिळवून जातं. 
                                                       (Image from: https://cutt.ly/SrhUHp1)
या दोघांशिवाय सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे सगळेच अभिनेते कमाल आहेत. एमी एकर अर्थात 'रूट'ची भूमिका ही सुरुवातीला केवळ एक-दोन स्वतंत्र भागांपुरती लिहिली होती पण पुढे तिची लांबी वाढून तिसऱ्या सीझनमध्ये तिला महत्व येतं. या व्यक्तिरेखेच्या परिस्थितीला रिऍक्ट व्हायच्या पद्धती अगदी शेवटपर्यंत काहीशा बेभरवशाच्या राहतात पण 'तुमच्या काम करण्याच्या पद्धतींपेक्षा काम करण्याचा हेतू किती शुद्ध आहे ते महत्वाचं' अशा साधारण तत्वांवर ती 'टीम मशीन'ची मेंबर बनते. अजून एक- एन्रिको कोलांटनीचा कार्ल एलायस- याच्या व्यक्तिरेखेचा ग्राफसुद्धा काहीसा रूटसारखा.आधी 'टीम मशीन' च्या विरोधात असणारा हा न्यूयॉर्कच्या गुन्हेगारी विश्वाचा बादशाह नंतर अज्ञातवासात राहून रीस-फिंचची मदत करतो ते काही सीन्स छान जमलेत. सरतेशेवटी उल्लेख लायनल फस्को अर्थात केविन चॅपमनचा. वाईट संगतीत राहून भ्रष्ट्र झालेला, पण वृत्तीने चांगला असणारा, सगळ्याच लार्जर दॅन लाईफ, जिनियस' पात्रांमध्ये काहीसा अर्धवट वाटणारा, 'टीम मशीन'साठी खूप सुरुवातीपासून मदत करूनही मशीनच्या अस्तित्वाबद्दल अगदी शेवटपर्यंत अनभिज्ञ असणारा फस्को हा सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करतो असं मानायला हरकत नाही. स्वतःतले गुण आणि मुख्यत्त्वे मर्यादा त्याला पुरेपूर ठाऊक आहेत आणि त्या बोलून दाखवायला त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी POIचे सगळे भाग ५-६ वेळा तरी पहिले असतील, पण लक्षात राहणाऱ्या बऱ्याचश्या पंचलाईन्स फस्कोच्या वाट्याला आल्यायत. आता हे खरंच संवांदांचं क्रेडिट आहे की केविन चॅपमनच्या अभिनयाचं हे पाहणाऱ्याने ठरवायचं. याशिवाय कार्टरच्या भूमिकेत तराजी हेन्सन उत्तम पण POI नंतर तिने इतर अनेक चांगल्या भूमिका केल्यामुळे आता मला तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक वाटत नाही. सारा शाहीच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख टाळत नाहीये पण मला त्यातल्या त्यात कमी आवडलेल्या व्यक्तिरेखांमध्ये ती येते एवढंच लिहीन. इथेही नमूद करण्याचा मुद्दा हा की POI च्या काही लँडमार्क एपिसोड्समध्ये (रिलेव्हन्स, इफ-देन-एल्स, ६,७४१) सारा शाहीची व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे.
        २१व्या शतकातली पहिली दोन दशकं संपली. आधीच्या २ शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाची जेवढी प्रगती झाली नसेल तेवढी गेल्या दोन दशकात झाली. आज जगातले बहुतांश लोक या न त्या मार्गाने टेक्नॉलॉजीवर दैनंदिन गरजांसाठी अवलंबून आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोन्स या दोन गोष्टींनी संपूर्ण जग लिटरली आपल्या बोटांशी आणून ठेवलंय. मित्रांशी संपर्कात राहण्यासारख्या मानसिक गरजांपासून ते बँकेचे व्यवहार करण्याच्या आर्थिक गरजांपर्यंत इंटरनेटवर आपण विसंबून आहोत. 'तुमच्या आईपेक्षा गुगलला तुमच्याबद्दल जास्त माहीतीय' असा आशयाचा मेसेज आपण काहीतरी नक्कीच वाचलाय! म्हणजे खरंच- गुगलला किंवा तत्सम कुठल्या सिस्टमला अशी खरंच पाळत ठेवता येत असेल? पाळत ठेवायची म्हणजे आपल्याविषयीची ही सगळी माहिती नुसती जमा नाही करायची तर तिचा सारासार अभ्यास करून त्यातून अनुमानं काढायची, पुढे काय घडू शकेल याचे ठोकताळे बांधायचे आणि त्याप्रमाणे पुढच्या घडामोडींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. या सिस्टमचं सर्वमान्य नाव म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच साधारण माहिती असेल. आपण मित्राला 'प्रायव्हेट' चॅटवर विचारलं की नवीन 'प्लेस्टेशन'चा रिव्ह्यु काय ए? या वर्षी चांगला सेल असेल तर घ्यायचा विचार आहे' की लगेच आपल्याला गुगल, फेसबुकवर प्लेस्टेशन, एक्सबॉक्स वगैरे जाहिराती दिसायला लागतात. आपल्या लाईफमध्ये काही 'प्रायव्हसी' राहिलीच नाहीये वगैरे सात्विक संताप करण्यापलीकडे आपली मजल जात नाही. काही लोक 'टेक्नॉलॉजी कसली डेव्हलप झालीये' म्हणून कौतुकंसुद्धा करतात. नाही म्हणजे कौतुक वाटायला काही हरकत नाहीये पण हे किती 'भीतीदायक' आहे याचा सिरियसली विचार केलाय का आपण? POIचा चौथा आणि पाचवा सिझन साधारण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. POI बद्दल भरभरून लिहावंसं वाटत होतं त्याला एकूणच एक चांगला टीव्ही शो बघितल्याचं कौतुक हा एक भाग होता आणि AI वर थोडं लाऊड थिंकिंग हा दुसरा हेतू होता.
काही वेळापूर्वी जाणवलं की हेच लिखाण बरंच लांबलंय म्हणून थोडा  ब्रेक घेऊन चौथ्या-पाचव्या सिझनबद्दल एक वेगळा भाग लिहितो. तूर्तास एवढंच पुरे!

क्रमशः

Friday, December 25, 2015

लागी करेजवा कटार!

मी अकरावी-बारावीत असताना कधीतरी 'झी मराठी' ही तशी नवखीच असणारी वाहिनी एक अप्रतिम प्रयोग करायची- त्याचं नाव 'नक्षत्रांचे देणे'. आरती प्रभू, पुल, विंदा करंदीकर, श्रीनिवास खळे, पं. जितेंद्र अभिषेकी अशा कित्येक थोर थोर लोकांच्या समग्र कारकीर्दीची काही तासाची सफर! 'नक्षत्रांचे देणे'मुळे आमच्या पिढीच्या कित्येकांची नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताशी नव्याने ओळख झाली. मग जाणवलं- शास्त्रीय संगीत लहान असताना वाटायचं तेवढं काही बोरिंग नाहीये! पुढे काही वर्ष मराठी सारेगमप बघताना जुनी मराठी गाणी, नाट्यपदं पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायला लागली आणि मग त्यात मजा यायला लागली! मग एखादा राहुल सक्सेनासारखा सुरेख आवाज असणारा अमराठी माणूस जेव्हा 'दाटून कंठ येतो' किंवा 'सुरत पिया की' गायचा तेव्हा आजी म्हणायची- "अरे वसंतरावांची सर कशी येईल त्याला?" मग घरातल्या मोठ्या पिढीकडून संगीत नाटकं, त्याचे तासनतास चालणारे प्रयोग, मंत्रमुग्ध करणारी गाणी वगैरे सगळं ऐकायला मिळायचं! तेव्हा कधीतरी प्रश्न पडला होता- की आपल्याला यातलं काही कधीच बघायला मिळणार नाही का? आणि मिळालं तर ते त्या तोडीचं, ताकदीचं असेल का? आज चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'च्या निमित्ताने त्या प्रश्नाला उत्तर मिळालंय! आणि उत्तर साधसुधं नाही- चांगलंच दमदार आहे!

वसंतराव नाही पण 'क्लोसेस्ट पॉसिबल'* चंद्रकांत लिमयेंच्या खांसाहेबांच्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकाचा व्हिडीओ 'प्रिझम' कंपनीमुळे 'युट्युबवर' मोफत उपलब्ध आहे! त्यातली गाणी ऐकायला नाटक मागे कधीतरी पाहिलं होतं. संगीताच्या बाबतीत तर कधी वाद नव्हताच पण तेव्हा नाटकाच्या कथेत काही मी विशेष रस घेतला नव्हता. नाटकातल्या सदाशिव या पात्राच्या शब्दबंबाळ लाडिकपणामुळे नाटकाची गोष्ट भिडली वगैरे नाहीच कधी! सिनेमा कट्यार आला-- डल्लास-फोर्टवर्थच्या महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने अमेरिकेत पहायलाही मिळाला! गाणी त्याआधी महिनाभर 'युट्युब' कृपेने घरात वाजत होतीच! सिनेमा बघून झाल्यावर पुन्हा एकदा घरी येउन नाटक पाहिलं-- यावेळी निव्वळ कथेसाठी! मग कळत-नकळत मनात दोन्हीची तुलना झाली- नाटक त्याच्याजागी कितीही श्रेष्ठ असलं तरी सिनेमा जास्त का आवडला, किंवा नाटकात काय जास्त चांगलं होतं  हे लक्षात आलं. सो डोक्यातलं सगळं काढून वैश्विक पटलावर मांडायला हा खटाटोप!

सर्वप्रथम मराठी चित्रपटाचा एवढा भव्य-दिव्य अवतार बघून कौतुक वाटलं- छायाचित्रण, पेहराव, ब्रिटीशपूर्व भारताचं चित्रण (इन्क्लुडिंग शाही दरबारातला इंग्रज अधिकारी), पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा** सर्वच काही अप्रतिम! पात्रं आणि लोकेशन्सच नव्हे तर नाटकात कुठल्याही बाजूने पाहिली तरी 'शाही' न वाटणारी कट्यार सिनेमात मात्र सुरेख सादर केलीय- तिला शाही म्हणावसं वाटतं! नाटकाच्या कथेत खांसाहेब सर्वेसर्वा आहेत तर चित्रपटात पंडितजींनाही जवळपास बरोबरीचा रोल मिळालाय. मगाशी लिहिलं तसं- नाटकातला सदाशिव त्याच्या निरागसपणामुळे डोक्यात जातो- तर सिनेमातला काहीसा आक्रमक सदाशिव 'हिरो' म्हणून आवडून जातो! नाटकाची संपूर्ण कथा जरी दोन घराण्यांच्या द्वंदाबद्दल असली तरी त्यात संगीत 'जुगलबंदी' प्रकार फारसा वापरलेला नाही-- त्यामुळे दोन्ही गायकीतला फरक ठळकपणे अधोरेखित व्हायला माझ्यासारख्या शास्त्रीय संगीतात निरक्षर असणाऱ्या माणसाला जड जातं- उलट चित्रपटात दोन प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष जुगलबंदी झकास झालीय. संगीत शैलीतला फरक, कव्वालीतल्या शब्दांमुळे सहज स्पष्ट होणारा दोन्ही व्यक्ती-प्रवृत्तीमधला फरक हे छानच अधोरेखित झालंय! 'आफताब हुसेन बरेलीवाले' नाटकात छान मराठी मराठी बोलतात- 'या भवनातील गीत पुराणे', 'तेजोनिधी लोहगोल' वगैरे अस्खलित मराठी गाणी गातात हेच न पटण्याजोगं आहे! याउलट सिनेमात खांसाहेब एकही वाक्य मराठीत बोलत नाहीत, 'घेई छंद'चा अपवाद सोडल्यास मराठी गाणंही गात नाहीत-- हे रेट्रोस्पेक्टीव्ह तुलना करताना जास्त आवडून जातं. मोजक्या ठिकाणी खांसाहेबांचा अपवाद सोडला तर नाटकातली सगळीच पात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एककल्ली-एकमितीय वाटतात- सिनेमात मात्र पंडितजी, सदाशिव आणि खांसाहेबांचे भावनिक चढ-उतार कमी-अधिक प्रमाणात ठळकपणे येतात. शाही मैफिली असोत किंवा पंडितजींच्या गाणं न म्हणता निघून जाण्यातलं गूढ असो- यांनी सिनेमा मनोरंजक करण्यात, त्यातल्या नाट्यमयतेत भरच पडलीय! दरबारातल्या इंग्रजाचा, आपल्याकडे कुप्रसिद्ध ब्रिटीश नीतीचा झकास वापर सिनेमात झालाय- त्यासाठी पटकथाकारांचं विशेष अभिनंदन. सिनेमाची कथा पाहता त्यात खांसाहेबांच्या बेगमचं पात्र आवश्यक होतं- आणि त्या पात्राला स्क्रीनटाईम मिळाल्यामुळे निदान आपल्याला त्याचा 'पॉइन्ट ऑफ व्यू' कळतो (चुकीचा वाटला तरीही). सदाशिवाने खांसाहेबांकडे 'गडी' म्हणून काम करत गाणं 'शिकणं' हा धागा जरी सिनेमा आणि नाटकात सारखा असला तरी कथेला त्या वळणापर्यंत आणणाऱ्या घटना वेगळ्या आहेत आणि पुन्हा एकदा चित्रपटातलं स्पष्टीकरण- कथेच्या आणि पात्रांच्या दृष्टीकोनातून योग्य वाटतं- उलट नाटकातला सदाशिवाला गळ्याच्या वर कुठला अवयव आहे की नाही असा प्रश्न पडावा असा त्याचा वावर आहे. नाटक आणि सिनेमाच्या शेवटाचा भावार्थ जरी सारखा असला तरी नाटकात ना खांसाहेबांबद्दल सहानभूती वाटते ना सदाशिवबद्दल- उलट सिनेमात कडूगोड शेवट आहेच पण खांसाहेबांना पण माफ करून टाकायची इच्छा होते.

निव्वळ सिनेमातल्या अभिनयाबद्दल बोलायचं तर सगळ्यांची कामं चोख--पण विशेष आणि पहिला उल्लेख सचिन पिळगावकरांचा-- गेल्या ५-६ वर्षात त्यांची आत्मकेंद्री, अहंकारी 'महागुरू' म्हणून जेवढी थट्टा झाली असेल तेवढंच या अहंकारी, आत्मकेंद्री भूमिकेसाठी त्यांचं भरभरून कौतुक करायला हवं- सचिन यांच्या उर्दू अभ्यासाचा एखाद्या भूमिकेसाठी एवढा योग्य वापर याआधी कधीच झाला नसेल- सो कास्टिंग टीमचं विशेष कौतुक! शंकर महादेवन यांचा अभिनय त्या ताकदीचा वगैरे नसला तरी या सिनेमापुरता उत्तम आहे. बाकी सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे यांना अभिनय जमतोच! अमृता खानविलकर मला एरवीही आवडतेच-- सो वेगळं बोलायला नकोच! सुबोध भावेंचं दिग्दर्शकीय पदार्पण जबरदस्त- त्यांना एक पूर्ण लांबीची भूमिका असल्याने असेल किंवा मी चित्रपटाच्या प्रमोशन्सबद्दल खूप वाचलं, पाहिलं आहे म्हणून असेल पण त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'वावर' चित्रपट पाहताना जाणवतो. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट- संगीत!! सगळंच लिहायचं, बोलायचं झालं तर गीतं आणि संगीत यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागेल- पण थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर जुनी गाणी अप्रतिम आणि नवीन गाणी त्यात चपखल बसतात- शंकर-एहसान-लॉयची गाणी पं. जितेंद्र अभिषेकींच्या गाण्यांबरोबर बेमालूम मिसळून एका चित्रपटात किंवा अल्बममध्ये एकसंध वाटू शकतात हे मला काही वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर माझा अजिबात विश्वास बसला नसता-पण 'मन मंदिरा', 'दिल की तपिश', कव्वाली ही गाणी अफाट आहेत! 'या भवनातील गीत पुराणे' ऐवजी त्याच इमोशनचं 'सूरसंगिनी' सुंदरच! शेवटचा उल्लेख शंकर महादेवन, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचा--हे तिघं जर गायला नसते तर 'कट्यार-' आहे त्या उंचीचा सिनेमा झाला नसता. महेश काळेच्या आवाजातलं शेवटचं गाणं, त्याचे शब्द, संगीत यांनी केलेला शेवट जबर! मराठी शास्त्रीय संगीतातलं पहिलं 'RAP' गाणं म्हणून या गाण्याचा यापुढे उल्लेख करायला हरकत नाही!

अर्थात सिनेमात सगळंच भारी होतं असंही नाही! सिनेमातल्या खांसाहेबांना आवाज वसंतरावांचा डायरेक्ट वारसा असणाऱ्या राहुल देशपांडेंचा- पण नाटकाच्या तुलनेत त्यांच्या पात्राला गाणी कमी! राहुल देशपांडेंचा चाहता म्हणून त्यांच्या आवाजात अजून एखाद गाणं आवडलं असतं- अर्थात इथेही लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा 'दिल की तपीश', 'सूरसंगिनी' अशी दोन नवीन गाणी त्यांनी सुपर्ब गायली आहेत तर नाटकातली जवळपास सगळी जुनी गाणी शंकर महादेवन (पंडितजी) गातात! सिनेमात स्त्री पात्रांना व्यवस्थित भूमिका जरी असल्या तरी कुठलीही गाणी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीत- उलट फातिमा नाचताना दिल की तापिश गुणगुणते तेव्हाचं 'लीप सिंक' अजिबात जमलेलं नाही! इतर आलाप आणि ताना असलेल्या सगळ्या गाण्यांना इतकं व्यवस्थित 'लीप सिंक' असल्याचं कौतुक वाटत असतानाच अशी चूक खटकते आणि लक्षात राहते! सदाशिवचं एकूण पात्र जरी इथे जास्त पटणारं असलं तरी त्याची पार्श्वभूमी चित्रपटात फारशी नाही- तो मधली वर्षं कुठे होता वगैरेचा उल्लेख नाही! नाटकातले चांद-उस्मान निदान साथ द्यायला का होईना पण गातात, सिनेमातले चांद-उस्मान खुनशी, बिनडोक वाटतात- ते कधीच गाताना दिसत नाहीत. उमा, सदाशिव, झरिना पात्रांमधला व्यक्त-अव्यक्त प्रेम त्रिकोण थोडा अनावश्यक वाटतो. युट्युबवर वारंवार गाण्याचे व्हिडिओ पाहताना कळलेली आणि मग कायम खटकलेली गोष्ट- हे अगदीच बारीक आहे पण-- 'सूर निरागस हो' मधील गणपतीचं जानवं 'अपसव्य' आहे आणि I have seen it so I can't 'unsee' it!

अजून बरंच काही आठवतंय, लिहावसं वाटतंय पण तूर्तास एवढं पुरे! या चित्रपटाची खूप प्रशंसा, समीक्षा आधीच झालीय आणि पुढेही होत राहील तेव्हा त्यात माझ्या इतक्याच पोस्टची भर पुरे! नाटक, सिनेमा हा रंगभूमीच्या किंवा कॅमेराच्या चौकटीत बसवायचा असतो आणि मग लेखक-दिग्दर्शक म्हणून व्यक्त होण्यावर बंधनं असतात. नाटकाला ही बंधनं सर्वाधिक लागू होतात. एखादी कथा-कल्पना नाटकातून लोकांपुढे मांडताना त्याला असणारी रंगभूमीच्या लांबी-रुंदीची बंधनं, नाटक किती प्रेक्षकांकडे पोहोचू शकतं याची बंधनं, दीर्घकाळ प्रयोग करायला नट-नट्यांच्या उपलब्धतेवर बंधनं, लांबवर खेड्यापाड्यात जाऊन नाटक करायचं तर दळणवळणाच्या साधनांची बंधनं! कपडेपट, नेपथ्य यांची मेंटेनन्स-- एक ना दोन शेकडो प्रश्न! नाटकाचं यशापयश हे या सगळ्या-सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं--कधी नाटकाचे विषय कालबाह्य होतात कधी कलाकार-- आणि मग पुढच्या पिढीला सांगायला फक्त आठवणी असतात! चित्रपट हा त्या मानाने दीर्घायुषी प्रकार आहे- एकदाच काय ते काम करायचं पण ते अशा दर्जाचं हवं की अजून काही दशकांनी तो चित्रपट तेव्हाच्या पिढ्यांना तेवढ्याच ताकदीचा वाटायला हवा! 'कट्यार काळजात घुसली' सारख्या कलाकृतीचा चित्रपट होण्याचा मला सगळ्यात मोठा हाच फायदा वाटतो. ही कलाकृती बनवल्याबद्दल सुबोध भावे, झी मराठी आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
सुबोध भावे, तुम्ही बालगंधर्व, लोकमान्य टिळक मध्ये अभिनयाने आणि कटयारच्या दिग्दर्शनाने स्वतःकडून खूप अपेक्षा वाढवून घेतल्या आहेत! सो पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! 


तळटीपा:
*राहुल देशपांडेंनी साकारलेले (भावेंनीच दिग्दर्शित केलेले) खांसाहेबसुद्धा 'एज क्लोस एज इट गेट्स'-- पण तो प्रयोग पाहण्याचा योग अजून आलेला नाही!
**पुष्कर श्रोत्रींच्या काविराजाच्या केशभुषेवर मात्र कमीत कमीत वेळ आणि पैसा खर्च झालाय असं वाटलं एवढाच एक न-सन्माननीय अपवाद!

Tuesday, June 2, 2015

नाईटमेअर भाग ४ (अंतिम)

सूचना: कथेचा या आधीचा भाग लिहून बराच काळ उलटून गेलाय. मधल्या काळात लिहायला अनेक कारणांनी वेळ झाला नाही. उरलेली कथा आणखी दोन भागात लिहून पूर्ण करायची असा मुळात विचार होता. परंतु एकूणच झालेला उशीर पाहता मी एकच भाग लिहिलाय-- आणि अर्थात तो बराच मोठा झालाय! एखादी कथा ब्लॉगवरून अनेक भागांत लिहिताना कथेचा दर्जा आणि वाचकांचा इंटरेस्ट कायम ठेवणं  थोडं अवघड असतं याची मला कल्पना आहे. मी शेवटच्या भागात सर्व कथा एकसंध राहील हा प्रयत्न केलाय. तो यशस्वी झालाय की नाही हे वाचकांनी ठरवायचं आहे. आधीचे भाग वाचलेले लोक शेवटचा भाग वाचतीलच परंतु नवीन वाचकसुद्धा पूर्ण कथा वाचून प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे. चुभूद्याघ्या!

भाग १, भाग २, भाग ३
                                                                           **
"श्रीकांत…मित्रा…रडू नकोस असा!" श्रीकांत खूप वेळ रडायचं थांबत नाहीये हे जाणवल्यावर अनुपम पुढे होत म्हणाला. त्याने पहिल्यांदाच श्रीकांतचा एकेरीत उल्लेख केला होता. श्रीकांतसुद्धा क्षणभर चपापला. 'आपल्याला ब्लू लेबल पाजून अनुपमने आपला एकेरी उल्लेख करण्याचा अधिकार प्राप्त केला आहे' अशी त्याने मनाची परस्पर समजूतसुद्धा घातली.
"ते तुम्हाला म्हणणं सोप्पं आहे हो…'ज्याचं जळतं त्यालाच कळतं' असं उगाच नाही म्हणत!"
"बरोबरे…पण मला पूर्ण गोष्ट ऐकायची आहे…गेल्या महिन्यातल्या अपघातापासून ते आज तुम्ही इथे कसे पोहोचलात पर्यंत!"
त्याचा प्रश्न ऐकून श्रीकांत मागे वळला. त्याने डोळे पुसले. दारूचा बऱ्यापैकी अंमल त्याला स्वतःच्या चालण्यात-बोलण्यात जाणवत होता. अनुपमने केलेली चौकशीसुद्धा बरी वाटत होती. 'नाहीतरी आपल्या दीड दमडीच्या आयुष्याची कथा आणि चिल्लर तत्वज्ञान एरव्ही कोण ऐकून घेतो??' त्याने पुढे सांगायला सुरुवात केली.
"अपघात झाला तेव्हा मोठा गदारोळ झाला…कंडक्टर माझा दोस्त…जमावाने मला शोधून मारण्याआधी त्याने मला तिथून पळ काढायचा सल्ला दिला. त्याची पण फाटली होती म्हणा…पण मला नंतर कळलं की मी पळून गेलोय सांगून त्याने स्वतःचा मार वाचवला आणि मला अजून खड्ड्यात पाडलं. मला कामावरून सक्तीची सुट्टी दिली गेली…पोलिसांनी माझ्या नावाचं वोरंट काढलं. पेपरवाल्यांनी माझ्या नावाने बोंबाबोंब सुरु केली. बसवाल्यांनी आधी माझं नाव लीक केलं नव्हतं. पण शेवटी प्रेशरमध्ये येऊन त्यांनी माझं आडनाव मिश्रा असल्याचं प्रेसला सांगितलं…मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना मोकळं रानच मिळालं…कुठल्यातरी चौकात माझ्या नावाचा चिंध्यांचा पुतळापण जाळला म्हणे कुठल्यातरी कार्यकर्त्यांनी!"
"बापरे…मला मुंबईत राहून एवढे डीटेल्स माहित नव्हते"
"अजून संपलं नाही इथे…मला महिनाभराची कोठडी मिळाली…केस हिअरिंगला जायला वेळ लागणार होता…उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे खूप केसेस पेण्डिंग असतात म्हणे! म्हणून मी कोठडीत…आता तुम्हाला हे सगळं सांगताना एक गोष्ट जाणवली…कोठडीत असताना मी ३-४ दिवस नुसते झोपून काढले…खूप दिवसांनी दगदग नव्हती, कामाचा रगाडा नव्हता, खायला काय मिळेल याची चिंता नव्हती. दिवस-रात्र झोपत होतो…अनेक वर्षांनी शांत झोप लागत होती मला. पण शेवटी झोपेला पण लिमिट असते…आयुष्यभर निव्वळ अंगमेहनत केलेल्या शरीराला विश्रांतीचा कंटाळा आला…त्याला चलनवलन हवं होतं. मग मेंदूही जागा झाला…वास्तवात आलो. आपल्या हातून काय घडलंय याची खरी जाणीव मला तेव्हा झाली. तुम्हाला कुणाचा जीव घेण्याचा काही अनुभव आहे का हो कामत?" श्रीकांतने एकदम प्रश्न टाकला.
"अ…काय? असं का विचारतोयस?" अनुपमने चाचरत प्रतिप्रश्न केला.
"एवढ्यासाठी विचारलं की मी तुम्हाला जे काही सांगणारे ते तुम्हाला खरंच झेपेल, पटेल की नाही याची मला अजिबात खात्री नाहीये म्हणून…"
'आई-बाप मुलाचं वागणं बघून हाय खाऊन गेले…तर मुलाने त्यांचा जीव घेतला असं म्हणता येईल का? तसं असेल तर मग मला आहे अनुभव' अनुपम मनात म्हणाला.
"तू बोल…मी तुला समजून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करेन" अनुपमने अंधारातच श्रीकांतने फेकलेला कप उचलून त्यात थोडी ब्लू लेबल ओतली आणि त्याच्या हातात पुन्हा कप दिला. पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. आजूबाजूने रातकिड्यांचा अस्पष्ट आवाज अधूनमधून यायला लागला होता.
"मला असं जाणवलं की कळत-नकळत एखाद्याचा जीव घेणं ही खरंच जगातली सगळ्यात भयंकर गोष्ट आहे…पेपरात दहशतवादाच्या बातम्या वाचून, सिनेमात पाहिलेला रक्तपात बघून आपल्या जाणीवा अलीकडे इतक्या बधिर झालेल्या असतात की डोळ्यादेखत एखादा जीव गेलाय आणि तो आपण घेतलाय हे कळायलासुद्धा वेळ जातो…पण एकदा ते जाणवलं की आयुष्य अवघड होतं- डोळे मिटायचा प्रयत्न केला तरी तीच तीच दृश्य डोळ्यापुढे येत राहतात--एरव्ही आपल्या डोक्यात चांगल्या आठवणींची सुरेख दृश्य असतात पण आता आपला तोच मेंदू त्या भीषण घटनेची अधिकाधिक बिभत्स, भीतीदायक चित्रं निर्माण करून दाखवत राहतो--"
"म्हणजे तो आत्महत्येचा प्रयत्न त्या दृश्यांमुळे?"
"छे छे. तुम्ही कुणाचा जीव घेतलात की त्या कृत्याबद्दल तुम्हाला कितीही बरं-वाईट वाटत असेल तरी स्वतःच्या जीवाची किंमत जास्त जाणवायला लागते. आपला सर्व्हायवल इन्स्टीक्ट तेव्हा सर्वात जास्त तीव्र असतो"
"मी असा विचार कधीच केला नव्हता" अनुपम भांबावून म्हणाला.
"तुम्ही कधी कुणाचा जीवसुद्धा घेतला नव्हता!!" श्रीकांतने शांतपणे उत्तर दिलं. ब्लू लेबलच्या 'चालू' पेगने तो बराच शांत झाला होता.
"मग पुढे? तुमच्या सर्व्हायवल इन्स्टीक्टचा तीव्रपणा इतका कमी झाला की तुम्ही आयुष्यातून व्होलेंटरी रिटायरमेंट घेतलीत?" अनुपमने प्रश्न विचारणं थांबवलं नव्हतं.
"त्या मुलाचे वडील मला भेटायला आले. त्यांच्या वकिलाने त्यांना तसं करण्यास सक्त नकार दिला होता तरी ते आले. त्यांची गोष्ट माझ्यापेक्षा जास्त दारुण होती. त्यांचा मुलगा सहा महिन्यांपूर्वीच एका मोठ्या आजारातून बरा झाला होता. त्यांनी त्याच्या वाचण्याची आशा जवळपास सोडली होती. 'मुलगा नसला तर आयुष्य कसं काढायचं याचे प्लान्सपण आम्ही बनवले होते' असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याहातून घडलेला अपघात उद्दामपणे झाला, निष्काळजीपणाने झाला की निव्वळ दुर्दैवाने झाला हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. 'आजारात तो गेला असता तर आम्ही उपचाराला कमी पडलो या विचाराने आमचं आयुष्य खंत करण्यात गेलं असतं, आता निदान ते ओझं घेऊन तरी आम्हांला जगावं लागणार नाही. तुम्ही आमच्या मुलाला उद्दामपणे किंवा निष्काळजीपणे मारलं नाहीत एवढंच तुमच्या तोंडून ऐकायचं आहे- आमच्या जीवाला शांतता मिळण्यासाठी. माझ्या समाधानासाठी तुम्ही खोटं बोललात तरी चालेल, तुमच्या केसचा निकाल काय लागतोय याच्याशी मला अजिबात देण-घेणं नाही' असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या आवाजात, वर्तनात एक प्रकारचा थंडपणा होता. माझ्या अंगावर काटा आला. त्या क्षणाला मला माझ्या आयुष्याचा तुच्छपणा जाणवला. जीवाची किंमत जेव्हा सगळ्यात जास्त जाणवते तोपर्यंतच सर्व्हायवल इन्स्टीक्ट खरं, पण एकदा त्यातला फोलपणा, तुच्छ्पणा कुणी असा अनपेक्षितपणे उलगडून दाखवला की कोलमडायला होतं. आणि मग निराशेच्या परमोच्च क्षणांना माणूस तत्ववेत्ता होतो किंवा प्रवासी संन्यासी होतो किंवा आत्महत्या करतो. माझ्याकडे पहिले दोन पर्याय उपलब्ध नव्हते. सो मी तिसरा पर्याय निवडला"
अनुपमने हातातला पेग संपवला. तो बोलायचं टाळत होता. बाजूला ठेवलेली बाटली उचलून त्याने अंधारात डोळ्यापुढे धरली. आतमध्ये किती दारू उरलीय याचा अंदाज घेत थोडी पुन्हा कपात ओतली आणि पुन्हा प्यायला लागला.
"काय कामत? तुम्ही चक्क गप्प? संपले तुमचे प्रश्न?" अनुपम गप्प बसलेला पाहून श्रीकांतने हातातला कप पुढे करत त्याला विचारलं.
"खरं सांगू का?--तुम्हाला राग येईल कदाचित- पण मला आत्महत्या करण्यात खूप शौर्य असतं असं वाटायचं. पण तुमची गोष्ट ऐकल्यावर आत्महत्या करणं म्हणजे मला भेकडपणाचं लक्षण वाटायला लागलं आहे" अनुपमने शांतपणे उत्तर दिलं.
"सहाजिक आहे म्हणा ना- आयुष्याच्या क्षणभंगुरपणाचं कौतुक असणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाला आत्महत्या म्हणजे भेकडपणाच वाटणार. पण आयुष्याचा, त्यातल्या माणसांचा, घटनांचा क्षणभंगुरपणा मान्य करण्याचं मोठेपण माझ्याकडे नाही. तसं असतं तर कदाचित मला माझ्याहातून कुणी मेलंय याचंही काही वाटलं नसतं. मी प्रेसेंटइतकाच पास्टमध्ये जगतो, एवढं खडतर आयुष्य काढल्याने असेल पण कुठलीशी लहान-मोठी गोष्ट मिळाली की ती मिळाल्याचा आनंद साजरा करायच्या आधी ती गोष्ट मिळायची माझी लायकी होती का याचा विचार करतो. मेहनतीने जपलेली, कमावलेली गोष्ट गमावली की सुतक असल्यासारखा निराश होतो. म्हणूनच आयुष्यापुढे जेव्हा माझ्या अस्तित्वाचं खुजेपण मला जाणवलं तेव्हा मला ते नष्ट करणं जास्त श्रेयस्कर वाटलं"
"मी मगाशी म्हटलं तसं- तुमची कथा शोकांतिका नसून विनोदी आहे" अनुपम काहीसं छदमी हसला. श्रीकांतच्या डोक्यात संतापाची तिडीक गेली पण तो गप्प बसून राहिला.
पाऊस बराच कमी झाला होता. पण अजूनही अधूनमधून ढग गडगडण्याचा आवाज येतच होता.
"किती वाजलेत?" श्रीकांतने विचारलं.
"पावणे तीन-- मला अजून एक प्रश्न पडलाय खरा-- एकीकडे तुम्हाला आयुष्यासमोर स्वतःच्या अस्तित्वाचं खुजेपण मान्य आहे पण तरी मगाशी 'आयुष्य खडतर असू नये' असं तुम्ही मगाशी म्हणालात- हा विरोधाभास का? तुम्ही आयुष्य जसं आहे तसं कबुल का नाही करू शकत?"
"कारण स्वतःच्या अस्तित्वाची आयुष्याच्या अथांगपणाशी तुलना करताना मी माझ्याशी नकळत जोडलेल्या इतर लोकांचं अस्तित्व नाकारून, झिडकारून टाकू शकत नाही म्हणून! म्हणजे बघा- माणूस लैंगिक संबंधांमधून जन्माला न येता स्वयंभू प्रकट झाला असता तर नातेसंबंध, भाव-भावना वगैरे प्रकार निर्माण झालेच नसते. तुम्ही म्हणता तसं सगळंच क्षणभंगुर असलं असतं. पण दुर्दैवाने तसं नाही. माणूस जन्माला येतो तेव्हा फिसिकली, मेंटली तो आईशी जोडलेला असतो. जेनेटिक्समुळे बापाशी, नातलगांशी जोडलेला असतो. मग प्रेम-वैर, आनंद-दुःख, आशा-निराशा, राग-लोभ अशा सगळ्या भावना ज्या थोड्या क्षणांसाठी उत्कट, पराकोटीच्या असतात तेव्हा तो आणखी माणसांशी जोडला जातो- मेंटली, फिसिकली! मग त्याच्या काडीमोल अस्तित्वाला किंमत येते- मग वाटतं- आपल्याला सुखी, समाधानी जगता यावं. पण ही इच्छा झाली, अट्टाहास नव्हे! म्हणून  तुम्ही म्हणताय तो विरोधाभास मला मान्य नाही"
"आणि मग हीच इच्छा, अट्टाहास संपून माणूस अचानक आत्महत्या करतो किंवा करायचं ठरवतो तेव्हा त्या माणसांचं काय?" अनुपमने पुढे प्रश्न टाकलाच!
"माझ्या बाबतीत विचाराल तर हा मुद्दा निकालात लागला होता- बाप माझ्या लहानपणीच गेला, आई दोन वर्षांपूर्वी कावीळ होऊन गेली. राहता राहिली साय--" त्याने वाक्य अर्धवट सोडलं.
"साला--मुल्लाकी दौड मस्जिदतक…उगाच मला आयुष्याचा अथांगपणा वगैरे सांगितलात. मी काही क्षण विचारात पडलोसुद्धा होतो. एक साधा बाष्कळ प्रेमभंग आणि त्याचं किती कौतुक करायचं? तुम्हाला आई-बापाच्या जाण्याचं जेवढं दुःख नाही तेवढं प्रेमभंगाचं झालंय असं मला लक्षात आलंय…हाहाहा" अनुपम मोठ्याने हसला. श्रीकांतला प्रचंड राग आला.
"कामत, तुम्ही मला दारू पाजलीत, माझं बोलणं ऐकून घेतलंत म्हणजे मी तुम्हाला माझी थट्टा करण्याचा हक्क दिला असं होत नाही. मी कुणाची मस्करी करत नाही आणि कुणी माझी केलेली मला सहन होत नाही! त्यात माझ्या आई-वडलांसारख्या खाजगी विषयात तर नाहीच नाही" श्रीकांत चिडून म्हणाला.
"तुम्हाला इतका राग येत असेल तर सॉरी. पण मला अजूनही वाटतं की हा तुमचा राग येणारा, थट्टा सहन न होणारा स्वभाव खरा- कारण मी जे बोलत होतो ती मस्करी नव्हती ते सत्य होतं. पण तुम्हाला त्यापासून पळण्याची सवय आहे. म्हणूनच तुम्ही केलेली आत्महत्यासुद्धा मला निव्वळ पळपुटेपणाचा हास्यापद प्रकार वाटतो" अनुपमने बेफिकीरपणे उत्तर दिलं. तो पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचं जाणवत होतं. श्रीकांतने रागाने मुठ आवळली. त्याच्या मनगटात कळ उठली. त्याने खालचा ओठ आधी त्वेषाने आणि कळ आल्यावर वेदनेने वरच्या दाताखाली दाबून धरला. तो जागचा उठत पुन्हा शेडच्या कडेला जाऊन उभा राहिला.
"बाय द वे, मगाशी तुम्ही म्हणालात की त्या बसखाली एक म्हातारापण गेला. त्याच्याबद्दल काही वाचायला मिळालं नाही पेपरात" अनुपमने पुन्हा श्रीकांतला बोलतं करायला प्रश्न विचारला.
"कुणास ठाऊक…अपघात झाला तेव्हा तो गाडीपुढे येउन जखमी झाल्याचं मला माहिती होतं. नंतर मी कोठडीत असेपर्यंत त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्याला व्हेन्टीलेटरवर टाकलाय असं मला वकिलाने सांगितलं होतं. मग मीच काही दिवस हॉस्पिटलला होतो-- पोलिसांच्या देखरेखीत! आणि मग दोन दिवसांपूर्वी पळालो. त्या म्हाताऱ्याचं काय झालं कुणास ठाऊक!"
"अस्सं- जर तो मेला असं आपण गृहीत धरलं तर तुला कुणाला मारण्याचं--" श्रीकांतने मागे चपापून पाहिलं-- "आय मीन तुमच्या हातून अपघात होऊन गेल्याचं जास्त दुःख आहे? एक लहान मुलगा की एक म्हातारा?"
"ओ कामत, तुम्ही काय मुलाखती घेण्याच्या व्यवसायात आहात का? म्हणजे मगाचपासून तुमचे अखंड प्रश्न सुरूच आहेत! आत्महत्या का? प्रेमभंग कसा? आपको कैसा लग राहा है? वगैरे वगैरे. त्यापेक्षा आता मी प्रश्न विचारतो- तुम्ही उत्तर द्या- तुम्ही कुठे निघाला होतात? काय व्यवसाय करता?"
"अरेच्या आधी प्रश्न मी विचारलाय- मला आधी उत्तर द्या मग मी देईन तुमच्या प्रश्नांची उत्तरं….तसंही मगाशी तुम्ही माझा आयडी बघून चौकशी करून झाली होती आणि माझी स्टोरी इतकी भारी नाहीचे मुळी"
"हो…पण आता माझी गोष्ट ऐकल्यावर माझा सावधपणा रास्त होता हे तुमच्या लक्षात आलं असेलच आणि तुमचा विचित्र प्रश्न. मला उत्तर माहित नाही! कदाचित मी आत्तापर्यंत त्याचा विचारच केला नव्हता म्हणून असेल"
"मग आता करा"
"अहो काय जबरदस्ती आहे का?"
"नाही तसं नाही पण तुम्ही इतक्या रात्री, या पावसात, अर्धी ब्लू लेबल पिउन रिकामटेकडे बसला आहात. विचार करायला यापेक्षा सोयीची वेळ असूच शकत नाही"
श्रीकांतला आता वैताग यायला लागला होत. दारू रक्तात भिनली होती. झोप, अशक्तपणा, भुकेने ग्लानी यायला लागली होती. पण अनुपम काही त्याला स्वस्थ झोपून देणार नव्हता.
"अ…खरंतर कुणाच्या जीवाची किंमत किंवा तुलना करू नये पण अगदीच तसा विचार करायचा झाला तर तो मुलगा गेल्याचं जास्त वाईट वाटलं मला. त्याचा बाप मला भेटला म्हणून असेल. त्याचं वय कमी होतं म्हणून असेल, किंवा तो म्हातारा जिवंत आहे आणि माझ्या हातून दोन जीव गेले नाहीयेत अशी अगदी अंधुकशी आशा मनात आहे म्हणून असेल"
"मी हा प्रश्न विचारला कारण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांमध्ये तिचा एकावर जास्त जीव असतो असं लोक म्हणतात पण आई तसं मानत नाही-- तसंच दोन लोकांना तुम्ही मारलं तर त्यातल्या एखाद्याला मारण्याचं तुम्हाला जास्त वाईट वाटतं की आई जन्म दिलेल्या जीवात भेदभाव करत नाही तसा मारणारादेखील करत नाही हे मला जाणून घ्यायचं होतं"
"तुम्ही उदाहरणं छान देता हां…शिक्षक व्हा नसाल तर" श्रीकांतने मिळालेली थट्टेची संधी साधून घेतली.
"ते जाऊ द्या हो--- म्हणजे बघा हं-- मला तुमच्या उत्तराच नवल नाही वाटलं- कुठल्या सामान्य माणसाला हा प्रश्न विचारला असता तरी त्याने कदाचित हेच उत्तर दिलं असतं. अपघात होऊन गेलेला एक म्हातारा आणि एक शाळकरी मुलगा- एकाच्या मागे त्याचा मोठा परिवार असेल, त्याने उभारलेलं घर असेल, तो असा अचानक गेला तर त्याचा आत्मा अतृप्त राहील की एका शाळकरी मुलाचा?? ज्याला अजून आयुष्यात काय करायचं आहे हेसुद्धा नीट उमगलं नसेल? पण आपण मात्र म्हातारा सगळं भोगून गेला अशी कॉमेंट करून मोकळे होतो-- आणि ज्याला भोग-उपभोग याची अक्कलसुद्धा नव्हती त्या कोवळ्या जीवाच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करतो. हासुद्धा तुम्ही रीप्रेसेंट करत असलेल्या, आयुष्याचा क्षणभंगुरपणा मान्य न करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीमधला मोठा विरोधाभासच झाला की"
"मी रीप्रेसेंट करत असलेले लोक? म्हणजे तुम्ही काय चंद्रावर असता वाटतं? की कुठल्या अजून ग्रहावर?"
"मी असतो इथेच…स्वतःला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत! पण नाही जमत- तुम्हाला मगाशी बोललो तसं- मला एकूणच हास्यापद वाटते ही विचारसरणी"
"तुम्ही पुन्हा थट्टा करण्याच्या मनःस्थितीत गेलात वाटतं??"
"छे छे…मी तुमची काय थट्टा करणार? ज्याला तुम्ही अथांग, अनंत समजता--त्या आयुष्यानेच तुमची इतकी मोठी मस्करी केलीय की मला अजून काही करायची गरजच नाहीये मुळी…साला, तुम्ही तर या जॉनी वॉकरपेक्षापण कमनशिबी…निदान त्याने घडवलं ते पुढच्या पिढ्यांनी चाखलं, मिरवलं पण तुम्ही आयुष्यापुढे स्वतःला कमी लेखण्यात एवढे मश्गुल होतात की आत्महत्येचा एक हास्यास्पद प्रयत्न सोडून तुमच्याकडे सांगण्यासारखं, मिरवण्यासारखं काहीच नाही" अनुपमच्या स्वरात पुन्हा आधीचा बेफिकिरी बेदरकारपणा आला होता.
"कामत, तुम्ही फार बोलताय…आपण नाही बोललो तर बरं होईल कदाचित…आणि हो-- मी फक्त स्वतःचा जीव घेण्याचा हास्यास्पद असफल प्रयत्न केलेला नाही--तर अपघाताने का होइना पण दोन इतर लोकांचे जीव घेतले आहेत हे विसरू नका--" श्रीकांतने वरच्या आवाजात उत्तर दिलं.
"बाप रे! ही मी धमकी समजायची की काय?" अनुपमने भुवया उंचावत हसत विचारलं.
"धमकी समजायची असेल तर खुशाल समजा…मी निव्वळ सूचना देतोय"
"ओ श्रीकांत राव…कशाच्या जीवावर धमक्या देताय? तुमच्या पोटात अर्धी बाटली दारू सोडून काही नाहीये…तुमच्या शरीरात रक्त कमी आहे-- गेले दोनेक दिवस पोलिसांपासून पळून तुमच्या अंगात हात उगारण्याचा जोर नाहीये--आणि जरी असता तरी तुम्ही काय काहीही करू शकला नसतात याची खात्री आहे मला…बसा शांत--नेमकी ही ब्लू लेबलपण आत्ताच संपायची होती?" अनुपम पूर्ण नशेत होता.
श्रीकांतला भयंकर राग आला होता.
"कामत, तुमचा हा माज स्वतःजवळ ठेवा. मला विनाकारण चिथावण्याचा प्रयत्न करू नका~"
"काही चिथावत नाहीये हो मी तुम्हाला-- साला मला वाटलं होतं की तुमच्याशी बोलताना मला काही उत्तरं सापडतील--लोक जीव का देतात? त्यांना मरताना मागे उरलेल्या लोकांचं काहीच वाटत नसेल का? पण नाही-- सगळेच साले एकजात भेकड पळपुटे लोक तुम्ही---"
"तुम्हाला कशाला पाहिजे होती ही उत्तरं?? तुम्हालापण जीव द्यायचा होता का?" श्रीकांतने विचारलं.
"कारण माझ्या बापाने जीव का दिला हे समजून घ्यायचा मी प्रयत्न करतोय--" अनुपमने निर्विकारपणे उत्तर दिलं.
"काय?" श्रीकांत अनपेक्षित उत्तराने चपापला.
"यस…माझ्या बापाने गाडीखाली उडी मारून जीव दिला-- लहान असताना कधीतरी माणसं गेली की त्यांचा आकाशात 'स्टार' होतो असं मला बाबाने सांगितलं होतं. त्या एका घटनेमुळे असेल कदाचित पण 'मृत्यू' या प्रकाराचं मला विलक्षण आकर्षण वाटलं होतं-- आपल्याला पण स्टार होता आलं पाहिजे वगैरे! नंतर कधीतरी मी 'मेल्यानंतर माणसाचं काय होत असेल?' यावर एक सहज निबंध लिहिला तेव्हा त्याच बाबाने 'किती भयंकर लिहितोस' म्हणून काळजी व्यक्त केली होती. त्याच माझ्या बाबाने शेवटी गाडीखाली उडी मारून जीव दिला."
आता गप्प होण्याची पाळी पुन्हा श्रीकांतची होती. त्याला अचानक काहीतरी सुचलं--
"म्हणजे माझ्या बसखाली आलेला म्हातारा म्हणजे तुमचे वडील---"
"छे छे…असले टुकार योगायोग असायला आपलं आयुष्य काही हिंदी सिनेमासारखं नाहीये…बाबाला जाऊन झाली चारेक वर्षं…" अनुपमने त्याचं वाक्य अर्धवट तोडलं आणि क्षणभर श्रीकांतच्या पोटात उठलेला मोठा गोळा नाहीसा झाला.
"योगायोग म्हणायचा तर तो एवढाच की गावी त्याचा एक विधी करायलाच निघालो होतो आणि वाटेत तुम्ही भेटलात" अनुपम खिन्न हसत म्हणाला. 'हा पुन्हा नॉर्मलला आला बहुतेक' श्रीकांतने मनात विचार केला.
"तुमचे वडील…त्यांनी का केलं असं?"
"शॉर्ट व्हर्जन-- मी जुगारात त्यांचा धंदा बुडवला- त्यांनी हाय खाउन जीव दिला"
श्रीकांत शांत बसून राहिला. बराच वेळ कुणीच काही बोलत नव्हतं.
"तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीयेत?" शेवटी अनुपमनेच त्याला विचारलं.
"नाही…एकीकडे अपघाताने माझ्या हातून जीव एक जीव गेला म्हणून मी जीव द्यायचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे तुम्ही- तुम्ही अप्रत्यक्षपणे वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आणि तुम्हाला आत्महत्या पळपुटेपणा वाटतो…एका अत्यंत विचित्र लॉजिकने विचार केला तर आपण एकाच नाण्याच्या भिन्न बाजू आहोत" श्रीकांतने खिन्न आवाजात उत्तर दिलं.
"गेल्या कित्येक तासात तुम्ही बोललेली ही पहिली गोष्ट आहे जी मला पटलीय" अनुपम खजील होत म्हणाला.
"अरे वा--- म्हणजे मला आता मेडलच मिळालं पाहिजे" श्रीकांत मान डोलवत बोलला.
"पावसाने शेवटी विश्रांती घ्यायची ठरवली आहे बहुतेक--" अनुपमने शेडच्या कडेला येउन पावसाचा अंदाज घेतला.
"हं…कामत, बाकी तुमचं इतर तत्वज्ञान मला माहित असूनही विचारतोय-- वडिलांच्या जाण्याचा तुम्हाला कधीच त्रास झाला नाही?? "
"झाला ना…त्याने अशी हार का मानली हा विचार करून त्रास झाला मला- अजूनही होतो. हां म्हणजे तुमच्यासारखी दृश्य-बिश्य नाही यायची माझ्या डोळ्यापुढे-- बाबा दिसायचा मला- अजूनही दिसतो- घरात, त्याच्या खोलीत त्याचं अस्तित्व जाणवत राहतं- त्याच्या पिंडाला कावळा शिवला नव्हताच. त्याचा आत्मा माझ्याच आसपास भटकत असतो असं वाटतं मला. पण माझ्या स्वभावामुळे मी त्याचं 'असं' असणं मान्य करून टाकलंय केव्हाच--"
"पण मग त्याच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून तुम्हाला काही करावसं वाटलं नाही?"
"तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे त्यासाठी? त्याचा धंदा मी पुन्हा जवळपास उभा केलाय-- पैसे लावून जुगार खेळणं बंद केलंय-- मी दारू, सिगारेट पिऊ नये ही त्याची इच्छा होती पण ती पूर्ण करण्याइतका मी लहान राहिलेलो नाही-- त्याचे श्राद्ध-वार मी नेमाने करतो--तरी याचा आत्मा अडकलेलाच--मेल्यानंतर पण माणसाला मोह सुटत नसेल तर अवघड आहे"
"तुमचा इतका बेफिकीर स्वभाव त्याला कारण आहे असं मला वाटतं"
"ते कसं काय?"
"कामत, इतर प्राण्यांना असतात तशा सगळ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक गरजा माणसाला आहेत.…पण इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा त्याच्या भावनिक गरजा जास्त आहेत. तो समुहात राहतो, स्वतःचं विश्व वसवतो. एक अज्ञात दैवी शक्ती जग चालवते यावर विश्वास ठेवतो, अशा वेळी तुमच्यासारखा माणूस या कुठल्याही गोष्टी मान्य करत नाही म्हणजे 'आपला मुलगा सोशिओपाथ तर नाही ना?' या शंकेने तुमच्या बापाचा आत्मा तळमळत असणार"
"ओह…सो एक क्षणात आयुष्य संपवण्याचा आत्मघातकी निर्णय घेतलेली माणसं नंतर भूत बनून अतृप्तपणे हिंडण्यात धन्यता मानतात? ती मुक्त का होऊ नयेत?"
"विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा-- मला उत्तर सुचलं तर नक्की सांगेन…तुर्तास तुम्हाला एवढंच सांगू शकतो--जमलंच तर मनापासून वडिलांची माफी मागा, ते गेले याचं तुम्हाला खरंच वाईट वाटलंय हे त्यांना जाणवू देत-"
"असं केल्याने तो जाईल??"
"कदाचित जातीलसुद्धा. तुम्हीच म्हणता ना की जगातल्या सगळ्याच भावना फार थोड्या क्षणांसाठी उत्कट असतात. असं समजा की निराशेचं टोक गाठल्यावर काही लोक जीव देतात-तीच माणसं कदाचित  त्यांना टोकाचं समाधान मिळाल्यावर मुक्तसुद्धा होतील--तुमच्यासारखी" श्रीकांत समजावण्याच्या स्वरात बोलला. 
"खरंय तुम्ही म्हणताय ते- कदाचित म्हणून तर त्या मुलाच्या वडिलांना तुमच्या तोंडून कबुली हवी होती-- तुम्ही जाणूनबुजून त्यांच्या मुलाला मारलं नाहीये याची--पण त्यांना टोकाचं समाधान मिळवून देताना तुम्ही निराशेत बुडून जीव द्यायचा प्रयत्न केलात"
दोघेही एकमेकांकडे बघून खिन्न हसले.


"सो आता काय करणारात, कुठे जाणारात?" अनुपमने थांबलेला पाऊस बघून श्रीकांतला विचारलं.
"अ माहित नाही…तुम्हाला भेटल्यावर आता मी फार विचार करणं सोडून द्यायचं ठरवलं आहे"
"तुमचा पुन्हा पोलिसांकडे जायचा विचार तर नाही ना? किंवा जीव देण्याचा?"
"आत्महत्येचा विचार मुळीच नाहीये. पण किती दिवस पळत राहणार? कायम मागच्या रस्त्यावर डोळा ठेवून? पोलिसांकडे परत जायचा विचार करतोय मी"
"हं" अनुपमने मान डोलावली.
"तुमचं काय?"
"गावी जातो- विधी आटपतो. तुम्ही म्हणता तसा बाबा असेलच घुटमळत, तर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन" आपलं बोलणं अनुपमने मान्य केलंय हे जाणवून श्रीकांतचा अभिमान सुखावला.
सकाळी श्रीकांतला जाग आली तेव्हा आजूबाजूला उजाडलं होतं. आकाश निरभ्र होतं. दूरवर तांबडं फुटत होतं. त्याला हळूहळू रात्री काय घडलं ते आठवायला लागलं. अनुपम आठवला तसं त्याने एकदम आजूबाजूला पाहिलं. अनुपमचा कुठेही पत्ता नव्हता. आपल्याला स्वप्न पडलं होतं की खरंच काल रात्रीच्या सगळ्या घटना खऱ्या होत्या हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. रात्रीच्या अंधारात अजिबात न दिसलेला परिसर आता स्वच्छ दिसत होता. पावसाने धुवून निघालेलं आजूबाजूचं जंगल हिरवंगार झालं होतं. स्वतःच्या श्वासाला असलेला दारूचा वास त्याला जाणवला. पण रात्री त्याने अनुपम कामत नावाच्या माणसाबरोबर बसून दारू पिऊन गप्पा मारल्या होत्या याची बाकी कुठलीही खुण आजूबाजूला नव्हती. अनुपम हा खरंच जिवंत माणूस होता का आपल्याला कुठलातरी प्रेतात्मा, मुंज्या भेटून गेला याचा विचार तो पुढची काही मिनिटं करत राहिला. आजूबाजूला इतर कुठल्याही मनुष्य वावराच्या खुणा जाणवत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मोठ्या कष्टाने तो जागचा उठला आणि रात्री झालेल्या गप्पा आठवत हात-पाय ओढत वस्तीच्या दिशेने चालायला लागला.


'बोल अनु काय म्हणतोस?'
'काय बोलू बाबा? मला मनापासून वाईट वाटलंय, तू बरोबर नसल्याचं दुःख झालंय असं मी तुला सांगितलं तर तू जाशील म्हणे इथून??'
'बोलून बघ अनु, कदाचित मी तुझ्या बोलण्यासाठी थांबलो असेन, तुझ्यासाठी थांबलो असेन…'
'ठीके बाबा, तसं असेल तर मी करतो कबुल!अगदी मनापासून-- तू गेलास मला खूप खूप वाईट वाटलं-- खूप रागही आला-- जमेल ते  सगळे प्रयत्न करून तू असं का केलंस ते समजून घ्यायचा मी प्रयत्न केला. पण मी खरंच नाही समजून घेऊ शकलो तुला! कदाचित इथे येऊन हा असा कबुलीजवाब दिल्यावर तूच सांगशील मला'
'सांगतो की…नक्की सांगतो!! तू हे विचारायची, माझ्याशी बोलायचीच मी वाट बघत होतो' 

समाप्त
                                                                          ***

Thursday, October 23, 2014

"भाई, एक 'यो यो' हो जाये!"

                                                                                       **
गेल्या महिन्यात आमच्या युनिवर्सिटीतल्या १०-१५ जणांना घेऊन आम्ही सहलीला गेलो होतो. साधारण तास-दीड तासाचा प्रवास! संध्याकाळी परत येताना साहजिकच 'अंताक्षरी'चा कार्यक्रम झालाच. किती वर्ष लोटली असतील अंताक्षरी खेळून…पण भसाड्या आवाजात गाणारे (??) आम्ही सगळेच ९०च्या दशकात मोठे झालेलो आहोत आणि मेंटली आम्ही अजूनही ९०च्याच दशकात अडकलोय (निदान अंताक्षरी खेळण्याच्या बाबतीत तरी) हे आमचं आम्हालाच जाणवलं-- 'मैने प्यार तुम्ही से किया है', 'रात के बारा बाजे दिन निकलता है' अशी एकूणच दुय्यम आणि कालबाह्य गाणीच आम्हाला आठवत होती. ९०च्या गाण्यांचा कोटा संपल्यावर सगळे ढेपाळले. मग काही चांगली गाणी म्हणून झालीच नाहीत असा विचार करून आम्ही राजेश खन्नाची गाणी म्हणायला लागलो.
अचानक एक जण म्हणाला--"जरा छान गाणी म्हणूया की…"
"अजून छान गाणी?म्हणजे कुठली बाबा?" मी विचारलं. 'कहीं दूर जब दिन ढल जाये' नुकतंच म्हणून झालं होतं.   
"भाई, एक 'यो यो' हो जाये" त्याचं उत्तर! मग मी बंद पडलो…डोकं बधीर झालं होतं!! बाकी सगळ्यांनी त्याला हो म्हणून 'बिभत्स' रसातलं कुठलंसं गाणं म्हणून होईपर्यंत मी बंदच होतो. त्याच्या त्या एका वाक्याचा गेले महिनाभर विचार करूनही 'क्लोजर' मिळू शकलेलं नाही म्हणून मी शेवटी ते इथे वैश्विक चव्हाट्यावर मांडायचं ठरवलं---

'भाई, एक यो यो हो जाये?'….आय मीन सिरीयसली? तर--यो यो म्हणजे 'हनी सिंग अर्थात यो यो हणी सिंग' नावाचा स्वतःला गायक-संगीतकार म्हणवणारा एक इसम! हनी सिंग काय मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार वगैरे आहे का की त्याच्या गाण्याची 'फर्माईश' व्हावी? जगातले सगळे गायक, संगीतकार संपलेत का? गेला बाजार तो 'एक अन्नू मलिक किंवा बाबा सेहगल हो जाये' असं म्हणाला असता तरी चाललं असतं असं मला वाटायला लागलं. मग मला अन्नू मलिक 'बरा' पर्याय वाटावा हे जाणवून स्वतःचाच राग आला! मग पुन्हा शांतपणे विचार केला-- मला हनी सिंगची गाणी का आवडू नयेत? का? का? ज्या अमेझिंग माणसाच्या तुफान गाण्यांनी लाखो लोकांना वेड लावलंय त्या तानसेनाच्या आधुनिक अवताराचं संगीत मला का आवडू नये? ज्या काही गोष्टी सुचल्या त्या शक्य तितक्या सुटसुटीतपणे मांडायचा प्रयत्न करतोय!
१. गाणं किंवा एकूणच संगीतावर अधिकाराने टिप्पणी करायला मी तानसेन तर नाहीच पण चांगला 'कान'सेन तरी आहे का माहित नाही---पण मला हणी सिंगची कुठलीही गाणी आवडत नाहीत. माझ्यामते एखादं गाणं आवडण्याची मुख्य कारणं असतात गाण्याची चाल आणि त्याचे शब्द!! 'चार बोतल वोडका काम मेरा रोज का' किंवा 'लुंगी डान्स' वगैरे शब्दात आवडण्यासारखं काय असू शकतं हे मला अजूनही कळलेलं नाही! राहता राहिला गाण्यांच्या चालींचा प्रश्न-- तर सार्वजनिक गणपतीला जमलेले शेकडो लोक जास्त सुरात, चालीत आरत्या म्हणतात हे माझं मत आहे. मॉरल ऑफ द स्टोरी- यो यो हणी सिंगच्या गाण्यांशी मी इमोशनली कनेक्ट होऊच शकत नाही!
२. मला असं जाणवलं की त्या १०-१५ लोकांच्या घोळक्यात हनी सिंगची गाणी न आवडणारा किंवा त्याचं हिंग्लिश गाणं माहित नसणारा मी एकटाच होतो. मला हनी सिंगची बिभत्स रसातली गाणी आवडत नाहीत म्हणजे मी कालबाह्य झालोय का असा प्रश्न मला पडला. उडत्या चालीची, फार मतितार्थ नसलेली किंवा यमक जुळवण्यासाठी वाटेल ते शब्द वापरलेली कुठलीच गाणी मला आवडत नाहीत का? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे! 'मुन्नी बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली', 'बिडी जलाइले', 'प्यार की पुंगी' अशी कित्येक गाणी मी ऐकतो. काही आवडीने तर काही निव्वळ सवयीने! मग मला हनी सिंगच का आवडू नये? त्याच्या गाण्याच्या चाली आरती म्हणण्यापेक्षा सोप्प्या आहेत, मतितार्थाचं म्हणायचं तर 'छोटे ड्रेस में बॉम्ब लगदी मेनू' यासारख्या गाण्यात खोल दडलेला अर्थ वगैरे शोधण्याची गरजही नाहीये पण तरी मला ती गाणी आवडत नाहीत!

३. लहानपणापासून घरातले संस्कार होते म्हणा, पुढे मित्रसुद्धा तसेच भेटले म्हणून असेल पण माझा 'ऐकीव' गाण्यांच्या आवाका बऱ्यापैकी होता म्हणायला हरकत नाही. म्हणजे फार नाही पण मराठीत पंडित अभिषेकी बुवा ते स्वप्नील बांदोडकर, हृदयनाथ मंगेशकर ते अवधूत गुप्ते, हिंदीत किशोर कुमार ते अलीकडे शफकत अमानत अली, किंवा एस.डी. बर्मन ते अमित त्रिवेदी अशा अशा सगळ्या सगळ्या लोकांची गाणी ऐकत मी मोठा झालो, अजूनही ऐकतो. कळायला लागल्यावर आपल्याला गाणं किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकत आलं नाही याची खंतसुद्धा वाटली कधी कधी. प्रभाकर जोगांची व्हायोलीन ऐकताना मिळणारं समाधान किंवा फ्युझोनचं शफकत अमानत अलीने गायलेलं 'मोरा सैय्या' ऐकताना जाणवणारा आर्त स्वर म्हणजे संगीत, गाणं अशी माझी साधारण कल्पना होती, आहे! पण हनी सिंगचं गाणं ऐकताना मला समाधानसुद्धा मिळत नाही आणि कुठलीही चांगली भावना जाणवत नाही.…दुर्दैवाने त्यातला नकारात्मक स्वर किंवा हपापलेला भाव म्हणजे संगीत अशी मी स्वतःची समजूत करून घेऊच शकत नाही! सॉरी पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत.

४. पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न मिळालं, रेहमानला ऑस्कर मिळालं--इतरही अनेकांना कित्येक राष्ट्रीय किंवा आंतर-राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.…पण 'मी यातला अमुक पुरस्कार मिळवणारच आहे' हे आजपर्यंत कुणीच जाहीर मुलाखतीत छातीठोकपणे सांगितलेलं मला माहीत नाही! याउलट 'यो यो मधाळ सिंग'ने मात्र 'मी ग्रॅमी अवोर्ड मिळवणार आहे' हे जाहीरपणे सांगितलं आहे! 'पार्टी ऑल नाईट', 'चार बोतल वोडका' आणि 'अल्कोहोलिक' अशी गाणी लिहून ग्रॅमी मिळवण्याची वल्गना करणाऱ्या या महापुरुषाबद्दल मला अत्यादर वाटायला हवा, त्याची गाणी आवडायला हवीत पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!

५. मी हनी सिंगला पर्सनली ओळखत नाही. त्याच्याबद्दल माझा काही पूर्वग्रहसुद्धा नाही! मागे दिल्ली दुर्घटनेच्या वेळी कुणातरी लोकांना अचानक साक्षात्कार झाला की हनी सिंगच्या 'मै बलात्कारी' अशा काहीतरी गाण्याने हिंसक प्रवृत्ती बळावते म्हणून त्याला अटक व्हावी. तेव्हा त्या लोकांची खिल्ली उडवून मी हनी सिंगच्या बाजूने माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंसुद्धा होतं. वैयक्तिक आयुष्यात तो माणूस म्हणून कसा आहे याची मला अजिबात कल्पना नाही. एकूणच त्याच्या गाण्यांचा मी व्यक्तीसापेक्ष विचार केलेला नाही! पण कितीही प्रयत्न करून मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!

६. हनी सिंगने खरंतर सध्याच्या पिढीतल्या पालकांचं काम सोप्पं केलं आहे. त्यांच्या मुलांना अगदी लहान वयातच विविध प्रकारची मद्यं, मद्यपानाशी संबंधित गैरसमज, पार्ट्या, मुलींचे कपडे अशा कित्येक कित्येक गोष्टींबद्दल कोणतीही माहिती त्यांना पुरवावी लागणार नाहीये….अ-पंजाबी (अ-मराठी सारखं) मुलांना त्यांची मातृभाषा सोडून पंजाबी भाषा, मोडकी-तोडकी इंग्लिश, हिंग्लिश अशा तीन भाषा शिकायला मिळणार आहेत. त्यांची मुलं उद्या जगात 'कुह्हल' (KEWL) म्हणवली जाणार आहेत. त्याच्या गाण्यांचे समाजावर एवढे उपकार असूनही मला त्याची गाणी आवडत नाहीत.

या सगळ्या गोष्टींमध्ये वरकरणी निव्वळ खवचटपणा दिसत असला तरी त्यातली माझी कळकळ खरंच प्रामाणिक आहे!! अजून किती कारणं देऊ? किती गोष्टींचा विचार करू? हनी सिंगची गाणी न आवडायला जर का एवढ्या गोष्टी पुरेश्या असल्या तर मग मला पडलेले पुढचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.

१. संगीत, गायन या जगातल्या सर्वोत्तम कला आहेत. त्यात कलाकाराला मुक्तपणे व्यक्त व्हायला अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे. पण मग नकारात्मक स्वराची किंवा हपापलेला भाव असलेली गाणी लिहिणाऱ्या कलाकाराचं कौतुक होणं बरोबर का चुकीचं? ज्या अर्थी हजारो लोकांना ही गाणी आवडतायत त्या अर्थी ती बनवणारा हनी सिंग १००% चुकीचा असूच शकत नाही. मग माणूस म्हणून, समाज म्हणून, रसिक म्हणून लोकांचा प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने सगळ्यांनी जाणं बरोबर आहे का? ती दिशा चुकीची असली तरी??

२. माझ्या पिढीने निदान कळत-नकळत का होईना पण 'चाहुंगा मै तुझे सांज सवेरे' किंवा 'एक धागा सुखाचा' वगैरे गाणी ऐकली. सांगीतिक संस्कार, सांस्कृतिक जडणघडण अशा गोष्टी व्यक्तिमत्व विकासाला किती आवश्यक असतात हे मी अधिकाराने सांगू शकत नाही पण लहानपणी 'पार्टी ऑल नाईट' ऐकून येत्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायची गरज आहे. नुसतं वाईट वाटून उपयोग नाही कारण खरंतर आपलीच जबाबदारी वाढतेय. विचार करा--काही वर्षांनी एखादा मुलगा आपल्या आजोबांना विचारेल--" ग्रॅन्डपा, व्हू इस थिस पंचम गाय? हिज म्युसिक साउन्डस सो आउटडेटेड…वॉझ ही फेमस ऑर समथिंग विथ दॅट काइन्डा म्युसिक?". या संवादातला भयाणपणा जाणवतोय?

सो इथे एकदा नमूद करू इच्छितो की हा ब्लॉग निव्वळ एक हनी सिंगच्या गाण्यांवर टीका करायची या हेतूने लिहिलेलाच नाही! त्यामुळे त्याच्या कोणत्याही पंख्यांनी जर का धीर करून हा ब्लॉग इथपर्यंत वाचला असेल तर अजून त्रागा करून घेऊ नये! हनी सिंगच्या गाण्यांमध्ये ज्यांना गेय, अर्थ, संगीत दिसतं त्यांनी ते जरूर ऐकावं. माझ्या बाबतीत दुर्दैवाने  "एक यो यो हो जाये" हे एक वाक्य ट्रिगर ठरलं आणि मला एवढा मोठा उहापोह करावासा वाटला. हे लिखाण निव्वळ वैतागातून आलं असल्याने ते एकांगी, बायस्ड वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं असल्यास तसं वाटणाऱ्या मंडळींनी दुसरी बाजू जरूर मांडावी…मी अतिशय फ़्लेक्सिबलपणे विचार करायला, ओपन एन्ड चर्चा करायला तयार आहे!    

वाचणाऱ्या सर्व लोकांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! येणाऱ्या वर्षात सर्वावर हनी सिंगची किंवा त्याच्या गाण्यांशी चाल-भाव-शब्द अशा सगळ्या बाबतीत साधर्म्य असणारी कमीत कमी गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना!!

Tuesday, October 14, 2014

नाईटमेअर भाग ३

भाग १, भाग २ वरून पुढे--

"असं झालं काय श्रीकांत राव की तुमच्यावर पार आत्महत्या करण्याची पाळी यावी?" अनुपमने श्रीकांतला बोलतं करायला पुन्हा प्रश्न विचारला.
फायनली श्रीकांत बोलायला लागला-- "आता काय सांगणार आणि किती सांगणार? ते म्हणतात ना की ती सटवाई पाचवी पुजल्यावर काहीतरी लिहून जाते आपल्या नशिबात…माझ्या वेळी नशीब लिहायला ती पेन-पेन्सिल आणण्याऐवजी काळ्या रंगात बुडवलेला बोळा घेऊन आली होती बहुतेक…कारण जन्माला आल्यापासून माझ्याबाबतीत काही चांगलं घडलेलं मला आठवतच नाही! कायम स्ट्रगल…गरिबी…निराशा…आरोप"
"स्ट्रगल प्रत्येकाच्याच नशिबात असतो हो…तो कुणाला चुकलाय?" श्रीकांतने सुरुवातच अशा डिप्रेसिव्ह टोनमध्ये केल्यावर अनुपमने त्याला सावरायचा प्रयत्न केला.
"माफ करा कामत पण मी सहमत नाही! आयुष्य अवघड असलं तर ठीके पण खडतर असायला नको असं मला वाटतं"
"हम्म…" अनुपमने मान डोलावली.
"मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचं टाळतोय असं समजू नका पण मला खरंच माझी कर्मकहाणी उगाळायची नाहीये! आपण तुमच्याबद्दल बोलू!!" आपण आत्महत्येचा प्रयत्न केला हे दारूच्या नशेत सांगून बसलो खरं पण आता जास्त डीटेल्स द्यायला नको असा विचार करून श्रीकांतने विषय बदलायचा प्रयत्न केला.
"हातिच्च्या…तुम्ही तर झकास जुन्या हिंदी पिच्चरसारखी सुरुवात केली होती राव…हिरोची गरिबी, स्ट्रगल, प्रेमभंग, आरोप वगैरे! मी रिअल लाईफ मनमोहन देसाई ऐकायला रेडी झालो होतो--"
"थट्टा सुचतेय तुम्हाला…घ्या करून थट्टा…आता तुमचं मीठ नाही खाल्लं पण दारू प्यायली म्हणजे ऐकून घ्यायलाच हवं…पण…माझ्या स्टोरीत प्रेमभंग असल्याचं मी तुम्हाला कधी बोललो?" श्रीकांतने विचारलं.
"अहो तुम्ही स्ट्रगल, गरिबी, निराशा म्हणाला होतात त्यामुळे मी ते स्ट्रगल, गरिबी, प्रेमभंग असं समजून घेतलं-- आणि हो मला अचानक आठवलं-- मगाशी मी पहिल्यांदा तुम्हांला उठवायला आलो ना तेव्हा तुम्ही सायली-सायली म्हणून झोपेत हाक मारलेली मी ऐकली होती" 
श्रीकांत चपापला. त्याला सायलीचा उल्लेख अनपेक्षित होता. 'आपण झोपेत तिचं नाव घेत होतो आणि या कामतने ते ऐकलं? शक्यच नाही! पण हा खोटं बोलतोय असं वाटत तर नाहीये!! माझ्यापेक्षा जास्त प्यायलाय…इतकी दारू पिउन माणूस खोटं तर बोलत नाही…'
"ओ भाऊ…किधर हरवलात? मनातल्या मनात नका बोलु…मोठ्याने बोला राव"
"तुम्ही मला खरंच सायलीचं नाव घेताना ऐकलंत?"
"हो"
"म्हणजे नाहीतर तुम्हाला सायली माहित असण्याचं काहीच कारण नाही…बरोबर?"
"मुळीच नाही…हां पण तुम्ही आता इतक्यांदा विचारताय म्हणून जाणून घ्यायची इच्छा आहे हे नक्की" अनुपम घोट घेत म्हणाला.
श्रीकांतने हातातला उरलेला पेग एक घोटात संपवला. तोंडाची कडवट चव सहन करत तो बोलायला लागला--
"मी म्हटलं ना सांगण्यासारखं विशेष काहीच नाही! टिपिकल फेल्ड लव्ह स्टोरी! मुलगा-मुलगी भेटले, प्रेमात पडले…पण मुलाकडे स्वतःचं घर नाही, पैसा नाही…सायली पण फार श्रीमंत होती अशातला भाग नाही. आयुष्यात काही कमी पडलं नाही याचा आनंद नव्हता तिला पण हौसमौज करायला मिळाली नाही याची खंत जरूर होती…आणि लग्नानंतर तरी तसं असावं अशी तिची अपेक्षा! कसं आहे ना कामत…तिने केलं तेव्हा माझ्यावर उत्कट प्रेम केलं…मानसिक, आर्थिक अगदी शारीरिकसुद्धा! पण जेव्हा तिला चांगल्या स्थळाकडून मागणी आली तेव्हा तिने माझी फार वाट न बघता होकार कळवून टाकला त्यांना!! आजकाल साला पोरी खूप हिशोबी असतात बघा!"
"मग? सगळं भारीच झालं की! माशी शिंकली कुठे?"
"भारी? तुम्हाला नशेत कळलं नाहीये कदाचित मी काय बोललो ते---सायलीने दुसऱ्या एका माणसाशी लग्न केलं…माझा विचार न करता….कळतंय का?"
"अहो कळलं की…पहिल्यांदा सांगितलंत तेव्हाच कळलं…तुम्हीच म्हणालात की तिने तुमच्यावर केलं तेव्हा उत्कट मानसिक, आर्थिक, शारीरिक प्रेम केलं! तुमची तेव्हाची गरज भागली की! आता ती तिच्या वाटेने गेली तुम्हाला कुठलाही मोडता न घालता!! जियो मेरे लाल…जगात सगळेच लोक इतके समजूतदारपणे वागायला लागले तर भारीच होईल" अनुपम दारूच्या नशेत होता पण त्याच्यामधला तत्ववेत्ता रंगात आला होता.
"वा म्हणजे माझ्या भावनांना, प्रेमाला काहीच किंमत नाही?"
"अहो नाही कोण म्हणतंय? पण एक लक्षात घ्या…प्रेम-वैर, आनंद-दुःख, आशा-निराशा, राग-लोभ अशा सगळ्याच मानवी भावना फार थोड्या क्षणांसाठी उत्कट, पराकोटीच्या वगैरे असतात. मग त्या अनुभवताना मिळणारं समाधान असो किंवा होणारा त्रास असो-- दोन्ही हे त्या त्या क्षणापुरतं आहे हे समजून घ्यायला हवं! श्रीकांत राव, आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतात…माझं विचाराल तर मी नुसता इमोशन्सचाच नाही तर एकूणच आयुष्याचा क्षणभंगुरपणा त्याच्या बऱ्या-वाईट बाजुंसकट मान्य केला आहे….मोर ओव्हर मी तो अप्रीशियेट करायला शिकलो आहे"
"कामत---तुम्ही हे नेहमी असंच बोलता की हा जॉनी वॉकर बोलतोय? नाही कारण तोच बोलत असेल तर हरकत नाही पण नाहीतर तुम्ही बोलताय ते सगळं एकूण युजलेसच आहे"
"आता तुम्हाला तसं वाटतंय तसं…पण हां…तशी तुमच्या गोष्टीत काही ट्रजेडी नाही पण कॉमेडी नक्की आहे" अनुपम हसत म्हणाला.
श्रीकांतला आता त्याचा थोडा राग यायला लागला होता. 'मी याला माझी शोकांतिका सांगतोय तर याला त्यात हसरा शेवट दिसतोय??'
"म्हणूनच मी माझ्याबद्दल तुम्हाला काही सांगत नव्हतो…माझ्या कर्मकहाणीत नाविन्य नाही हे मलाही ठाऊक आहे पण म्हणून त्याची थट्टा होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती" तो काहीसा चिडून म्हणाला.
"चुकलं सरकार…मी मुद्दामहून थट्टा नाही केली खरंच! मी तुम्हाला चिअर अप करण्याचा प्रयत्न करत होतो" अनुपम नवीन पेग बनवत म्हणाला.
"हा असा? अहो जरा वेळ, काळ बघून तरी ठरवत चला…या भिकारचोट पावसानेसुद्धा काय काळ-वेळ निवडलीय कुणास ठाऊक? जगातल्या एक-दोन समुद्रांच्या पाण्याची एकदम वाफ झाली बहुतेक…नाहीतर ढगात इतकं पाणी येणारे कुठून?" श्रीकांतने ग्लास उचलून ओठाला लावला तेव्हा त्याचं लक्ष व्हिस्कीच्या बाटलीकडे गेलं. "हे काय अर्धी संपली?" त्याने चाचरत विचारलं.
"संपली कसली? आपण संपवली!!गेले दोन पेग 'निट' प्यायलोय आपण!" अनुपम घोट घेत थाटात म्हणाला.
"च्यामायला…तरीच माझा घसा जळतोय…थोडं पाणी घेतो घालुन…" श्रीकांत उठून शेडच्या कडेला आला आणि त्याने कप बाहेरच्या पावसात धरला. तो मागे वळला तसं अनुपमने त्याला विचारलं--
"…. म्हणजे तुम्ही केलेला आत्महत्येचा प्रयत्न सायलीमुळे की---?"
"छे छे…तुमचा तो भावनांचा क्षणभंगुरपणा मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे नसला तरी त्यांना कवटाळून जीव देण्याचा करंटेपणा करण्याइतका मूर्खसुद्धा मी नाही"
"क्या बात है…जियो मेरे लाल…जबरी वाक्य होतं…पण हा जॉनी वॉकर होता की तुम्ही स्वतः?"
"आपलं चिल्लर तत्वज्ञान!! दारू प्यायल्यावर सुचतं---कुणीतरी म्हणून ठेवलंय-समाधान-असमाधानाच्या परमोच्च क्षणांना सर्वोत्तम तत्वज्ञान जन्माला येतं"
"वाह! पण मग ते आत्मह---"
"आयला तुम्ही त्याला चिकटूनच बसलात राव"
"सॉरी सॉरी सॉरी…मला कळतंय की तुम्हाला तो विषय नकोय…पण मी पहिल्यांदाच असा आत्महत्या करायला ट्राय केलेल्या माणसाला भेटलोय ना.…स्वतःचाच जीव घेण्याची हिम्मत अशी कुणात कशी काय असू शकते हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे"
"च्यामायला हे अजब आहे…आयुष्याचा काय बरं---हां--क्षणभंगुरपणा अप्रिशियेट करणाऱ्या माणसाला आत्महत्येचं कुतूहल?"
"आत्महत्येचं कुतूहल नाही हो…कौतुक वाटलं मला…आय मीन आपल्याला बुवा काही वाटेल ते झालं तरी असलं काही करायची हिम्मत होणार नाही…."
"काहीवेळी अशा काही घटना घडतात की आपल्याला आपल्या असण्याचीच लाज वाटायला लागते--मग भीती वाटो, निराशा वाटो किंवा अजून काही पण जीव देणं फार सोप्पं वाटायला लागतं--" श्रीकांत भकासपणे समोरच्या पावसाकडे बघत म्हणाला. काहीतरी आठवत तो हरवून गेला होता.
अनुपम चक्क गप्प झाला. काही वेळाने अनुपम काही बोलत नाहीये हे बघून श्रीकांत भानावर आला.
"गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या पीएमटीच्या अपघाताबद्दल ऐकलयंत का?" त्याने अनुपमला विचारलं.
"हे कुठून मधूनच?" अनुपमची तंद्री भंगली. त्याला थोडी झोप यायला लागली आहे असं श्रीकांतच्या लक्षात आलं.
"मध्येच नाही हो…ऐकलंय का ते सांगा आधी!"
"हो ऐकलं की…एक शाळकरी मुलगा गाडीखाली आला…तो ड्रायव्हर पिउन बस चालवत होता म्हणे"
"नुसता शाळकरी मुलगाच नाही तर एक म्हातारापण दगावला…सकाळी आठ-साडेआठ वाजले होते. रस्त्याला नेहमीसारखी खूप-खूप रहदारी होती. कुणीतरी सकाळ-सकाळ वैकुंठाकडे रिक्षातून एका तिरडीसाठी सामान नेत होता-- त्या तिरडीचे बांबू वाकडे-तिकडे बाहेर आले होते. आत बसलेला त्याचं कुणीतरी गेल्याच्या दुःखात असेल- पण शाळेच्या उशीर झालेल्या मुलाच्या सायकलच्या वाटेत ते बांबू येत होते म्हणून त्याने वाट बदलून सिग्नल चुकवून एका ठिकाणी चौकात कट मारला. तो मुलगा वळणावरून येणाऱ्या बसच्या समोर येतोय हे बघून कडेला सकाळी बाजारहाट करायला निघालेला म्हातारा त्याला अडवायला मध्ये आला…बस ताब्यात घेतानाचं पेपरवर्क करताना उशीर झाला म्हणून ड्रायव्हर घाईत--त्याला बारापर्यंत चार रिटर्न खेपा घालायच्या होत्या" श्रीकांत न थांबता बोलत होता--
"त-त-तुम्हाला एवढे डीटेल्स कसे माहिती? मला पेपरमध्ये काही वाचल्याचं आठवत नाही"
"कारण त्या बसचा ड्रायव्हर मी होतो" श्रीकांत पावसाकडे बघत म्हणाला. त्याने कपातला शेवटचा घोट संपवून तो कप जमिनीवर फेकला. शेडच्या कडेच्या खांबाला जाउन तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
अनुपम कामत सुन्न होऊन बसला होता. त्याला काय बोलायचं सुचतच नव्हतं--

"इस थिस मिस्टर अनुपम कामत?"
"स्पिकिंग…व्हू इस दिस?"
"सर…सॉरी टू से पण तुम्हाला एक वाईट बातमी द्यायची होती"
"वाईट? काय झालं??"
"सर, तुमचे वडील-- आज--- अ-- आज तुमचे वडील आज सकाळी एका अपघातात गेले…रिअली सॉरी सर…माय कंडोलन्सेस"

क्रमश:

Wednesday, June 11, 2014

नाईटमेअर भाग २

भाग १ वरून पुढे-

श्रीकांत एकटक त्याच्याकडे बघत होता. अनुपम दचकला.
"अहो श्रीकांत सर….घाबरलो ना मी…कधी जागे झालात तुम्ही?" त्याने क्षणात स्वतःला सावरलं.
"झोपलो नव्हतोच मी…झोप कसली येणारे? हा भिकारचोट पाऊस थांबतोय कुठे? आणि त्यात या वीजा…." श्रीकांतचा सूर अजूनही वैतागलेलाच होता.
"पाऊस नाही हो… आपण भिकारचोट…माझं नशीबच भिकारचोट जे अडकलो या पावसात…कुठला मुहूर्त शोधून मी बाहेर पडलो होतो कुणास ठाऊक?" अनुपमने एक घोट घेत म्हटलं.
'चांगल्या घरचा दिसतोय….असल्या भयाण काळोखाची, एकटेपणाची सवय नसेल त्याला' श्रीकांत मनात म्हणाला. 'आता ही ब्याद पाऊस थांबेपर्यंत आपल्याला चिकटली आहेच तर आपणही थोडं सैल व्हायला काय हरकते…?? नाहीतर एरव्ही आपल्याशी बोलायला कुणाला रस असतो?' असा विचार त्याने केला.
"मुहूर्त योग्यच होता की…अमावास्या आहे आज…." श्रीकांत मंद हसत बोलला.
"क्काय?ककक्कशावरून?…." अनुपमने आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत विचारलं. त्याला क्षणात अमावस्या, भुतं, प्रेतात्मे, हडळी अशा सगळ्या गोष्टी आठवल्या. श्रीकांतला त्याच्या आवाजातला बदल जाणवला…
"म्हणजे काय? नाहीतर आज मी इथे या भयाण शेडखाली तुम्हाला का भेटलो असतो! आजचाच दिवस तर असतो माझ्यासारख्या भूताखेतांना मोकळं हिंडायला…झपाटायला एखादं झाड शोधायला…" श्रीकांत हसत म्हणाला.
अनुपमला घाम फुटला. त्याच्या हातातला ग्लास खाली पडला.
"त…तत…तु…तुम्ही खरंच भूत आहात?" त्याने भेदरलेल्या आवाजात विचारलं.
श्रीकांतने अनुपमला झटक्यात घाबरलेलं पाहिलं आणि त्याला हसू फुटलं-
"अहो कामत, एवढे बिचकू नका…मी नाहीये भूत-बित…मी गंमत करत होतो" श्रीकांत हसत म्हणाला. त्याचा एकूण अवतार आणि त्याचं खदाखदा हसणं यांच्या एकत्रित परिणामाने अनुपम शांत व्हायच्या ऐवजी अजूनच अस्वस्थ झाला. गेले एक-दीड तास त्याच्याबरोबर शेडमध्ये असणारा माणूस आणि गेल्या अर्ध्या मिनिटातला माणूस यांच्यात खूप जास्त फरक होता. असा फरक सध्या माणसात नाही होऊ शकत…'हा म्हणतो तसा खरंच मुंज्या किंवा अतृप्त प्रेतात्मा स्पिरीट वगैरे काहीतरी असला पाहिजे'
"अ..अ.…आधी थट्टा करत होतात क….की आत्ता थ…थट्टा करताय?" त्याने घाबरून विचारलं.
"कामत अहो…मी खरंच थट्टा करत होतो…"
"म…म…मग आज अमावस्या आहे हे तुम्हाला कसं ठाऊक?"
"अहो त्यात काय अवघड आहे? जरा आकाशाकडे बघा…दिसतोय का कुठे चंद्र किंवा चंद्राच्या आकाराचं काही??" श्रीकांतने विचारलं.
अनुपमने मागे वळून वाकून मान वर करत शेडच्यावर आकाशात पाहिलं. चंद्र काही दिसला नाही पण आपण नेमके कोणत्या दिशेला पाहतोय हेही त्याला माहित नव्हतं. त्याने त्या सुसाट पावसात आकाशात चंद्र शोधण्याचा निर्णय रद्द केला.
"हट…चंद्र कसला बघू??…इतक्या पावसात चंद्र दिसतो का?" अनुपमची भीती थोडी कमी झाल्यासारखी वाटली.
"बरं मग माझ्यावर विश्वास ठेवा….आज आहे अमावास्या…पण मी भूत नाहीये…घाबरू नका एवढे…" श्रीकांतने पुढे होत त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जवळ जायचा प्रयत्न केला. अनुपम दचकुन मागे सरकला.
"कामत…अहो माझ्या हातात काही नाहीये!"
"हातात काही असायची गरजच काये? तुम्ही ते झपाटायला झाड वगैरे शोधत असता ना?"
अनुपमच्या शंकांनी श्रीकांतला अजूनच हसायला येत होतंच पण हळूहळू त्याला अनुपमच्या भेकडपणाचा रागही यायला लागला होता…'समजा आलंच एखाद्याच्या समोर भूत…तर काय एवढं आचरटासारखं वागायचं असतं का? आणि ही अनुपमसारखी उच्चभ्रू व्हाईट कॉलर मंडळी म्हणे देश बदलणार आहेत!'
"अहो… असं काही नसतं हो…मी क्षणापुरती थट्टा केली तर तुम्ही आता इतके बिचकताय की मला माझ्याच थट्टेचा राग येतोय…चुकलंच माझं!"

श्रीकांत पुन्हा बाकावर जाउन बसला. अनुपम अस्वस्थपणे विचार करत तिथेच उभा राहिला. पुन्हा काही वेळ असाच गेला. श्रीकांत पुन्हा पेंगायला लागल्याचं बघून अनुपमला थोडं हायसं वाटलं.
"ओ श्रीकांत सर….पुन्हा झोपलात का?" अनुपमने कंटाळून त्याला हाक मारली.
"झोपलो नाहीये हो मी….किती वेळा सांगितलं….काही हवंय का तुम्हाला?"
"नाही हो…ते आपलं एकटं बसून कंटाळा आला म्हणून--"
"हो पण मी भूत आहे नाही का? मग भूताशी बोलायला तुम्हाला भीती नाही वाटते? मी तुम्हाला झपाटलं तर-" श्रीकांत वैतागल्या सुरात म्हणाला.
"सॉरी बरं का…पण रात्रीच्या अंधारात निरर्थकपणे बसून राहिलं की स्वतः 'भूत' असल्यासारखं वाटतं…त्या एकटेपणापेक्षा एखाद्या खऱ्या भुताची कंपनी काय वाईट?" अनुपमने पावसाकडे बघत उत्तर दिलं.
"आयला…म्हंजे मी भूत आहे हे तुम्ही पक्कं केलेलं दिसतंय…आणि तसं असेल तर तुम्ही हा तुमचा भूतासारखा एकांत कवटाळून बसा….माझ्या वाटेला येऊ नका" --श्रीकांत.
"अहो सॉरी…मला तसं नव्हतं म्हणायचं…तुम्ही भूत-बित कुणी नाही आहात याची खात्री पटलीय माझी"
"अरे वा तुमचं हार्दिक अभिनंदन" श्रीकांतच्या आवाजातला खोचकपणा पुन्हा बाहेर आला पण यावेळी तो चेहऱ्यावरून बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत होता.
"आता तुम्ही अभिनंदन करताच आहात तर माझा गाढवपणा सेलिब्रेट करूयात….घेणार का थोडी थोडी?" अनुपमने हसत विचारलं.
"छान…कुणाचातरी गाढवपणा सेलिब्रेट करायला पहिल्यांदा पिणारे मी…चालेल थोडीशी" श्रीकांतने उत्तर दिलं.
अनुपमने बाटली बाहेर काढली. श्रीकांतसाठी अजून एक ग्लास काढला. दोघांचे पेग भरले आणि शेडच्या कडेला उभं राहून त्यात पावसाचं पाणी पडू दिलं.
"घ्या….चीअर्स" त्याने श्रीकांतला ग्लास पुढे केला.
"ब्लू लेबल….? तुम्ही खूपच शौकीन दिसताय…" श्रीकांतने बाटलीवरचं नाव बघून ग्लास घेत प्रश्न विचारला.
"असं शौक वगैरे काही मी मानत नाही हो…असं काही नसतंच…चांगल्या प्रतीच्या वस्तू वापरायच्या म्हणजे त्यांची जास्त किंमत द्यावी लागते…आता याला लोक 'शौक' वगैरे शब्द जोडून समोरच्याला चंगळवादी डिक्लेअर करून टाकतात हा भाग वेगळा…आता मला साधं सांगा…तुम्हाला सिनेमा पहायचा आहे…सुंदर, नेत्रसुखद सिनेनट्या असणारा 'जवानी दिवानी' अशा काहीतरी नावाचा सिनेमा जवळच्या मल्टीप्लेक्समध्ये लागलाय आणि बाजूच्या जुन्या टॉकीजमध्ये 'वैनीचं मंगळसूत्र'वाली रडारड सुरु आहे…तुम्हाला करमणूक हवी आहे…तुम्ही एक वेळ दोन पैसे जास्त खर्चून मल्टीप्लेक्समध्ये जाल किंवा सिनेमा पहायला जाणारच नाही… जर का तुम्ही मल्टीप्लेक्समध्ये गेलात ते चंगळ करायच्या हेतूने गेलात का? नाही! तुम्ही सिनेमाचे दर्दी 'शौकीन' आहात म्हणून गेलात का? नाही!  निखळ करमणूक करून घेणं हा तुमचा हेतू होता जो तुम्ही साध्य केलात…चांगल्या करमणुकीला चांगली किंमत…हे ब्लू लेबलचं म्हणाल तर तसंच आहे…असो…आपण सेलिब्रेशन डिले नको करायला…चीअर्स" अनुपम बाकाच्या एका कडेला बसत म्हणाला.
श्रीकांतला त्याचा क्षणभर हेवा वाटला- 'करमणूक करून घ्यायची इच्छा असो वा नसो…आमच्या नशिबात कायम 'वैनीच्या मंगळसूत्रा'ची रडारडच' त्याच्या मनात विचार आला.
त्याने ब्लू लेबलचा कप तोंडाला लावला. दारूचा गरम स्पर्श त्याच्या जिभेला जाणवला. एकीकडे दारूचा घोट घसा आणि अन्ननलिका जाळत पोटात गेला आणि लगोलग एक शिरशिरी मेंदूपर्यंत पोहोचली. डोळ्यांची बुब्बुळं मोठी झाली, खांद्याचे स्नायू ताठरले आणि त्याने घट्ट डोळे मिटून मान जोरात हलवली.
"काय आवडली का?" अनुपमने श्रीकांतचे हावभाव बघत प्रश्न विचारला.
"झकास…मझा आ गया…तुमचं ते 'जवानी दिवानी'चं उदाहरण खरं आहे राव….आम्ही साला भिकारचोट क्वालिटीचंच कायम पीत आलो…कर्मदळिद्र म्हणायचं दुसरं काय!" श्रीकांतच्या डोक्यातली शिरशिरी अजून कमी झाली नव्हती.
"एक गंमत सांगतो- ही ब्लू लेबल म्हणजे जॉनी वॉकरचा ब्रांड! हा जॉनी खरंतर एक किराणा माल विक्रेता होता…पण सुरेख दारू बनवायचा…त्याने बनवलेली दारू पंचक्रोशीत प्रसिद्ध होती…तो मेल्यावर त्याच्या पुढच्या पिढ्यांनी दारूचा धंदा वाढवला, जगप्रसिद्ध केला. पण ज्याच्या नावाने आज ही मंडळी धंद्याचं दुकान चालवतायत त्या जॉनी वॉकरने कधीच दारू प्यायली नाही! बोला- आता कर्मदळीद्री कोण?तुम्ही का तो?"
"यडा म्हणायचा का खुळा?? ज्याला आयुष्यात आपण काय घडवलं ते साधं चाखून पाहता आलं नाही तो खरा कमनशिबी…जॉनी वॉकर" श्रीकांतने एक मोठ्ठा घोट घेऊन पेग संपवला. अनुपम हळूहळू घुटके घेत होता. त्याचा पेग संपून त्याने पुन्हा 'पेग भरू का?' विचारेपर्यंत त्याचं तोंड बघत बसणं भाग होतं.
"हां…तर या एवढ्या पावसात निघाला कुठे होतात तुम्ही?" अनुपमने पुन्हा नको तो प्रश्न विचारला.
अलीकडच्या काळात एकवेळ खाल्या मिठाला माणूस जागला नाही तर चालतं पण प्यायला दारूला तो जागलाच पाहिजे!
'काय सांगायचं याला? खरं सांगायचं…? पण याला खरंच आपल्या शोधात कुणी पाठवलं असेल तर?? ही दारू पाजणं वगैरे सगळा बहाणा तर नाहीये ना आपल्याला अडकावायचा? छे छे…याला कुणी पाठवला असेल असं नाही वाटत…नाहीतर मगाशी मी भूत आहे असं सांगितल्यावर ढुंगणाला पाय लावून पाळायची तयारी केली नसती त्याने. आणि याला सगळं सांगितलंच तरी काय फरक पडणारे? कुणीतरी म्हटलंच आहे…अनोळखी माणसाला आपले प्रॉब्लेम्स सांगण्यासारखं बेस्ट काही नाही… आपल्या आयुष्यातल्या इतर कुणालाच तो ओळखत नसल्याने तो आपल्या गोष्टीकडे आपण सांगू त्याच दृष्टीकोनातून पाहतो…त्याला आपलं दुःख कळू शकतं…आपल्यालासुद्धा हलकं वाटतं…सांगूयात….फार खोलात जाउन विचारायला लागला तर मग संशयी वाटेल थोडं…हट साला…मगाशी बोबडी वळली होती तेव्हाच पळवून लावलं असतं तर- काय करावं सुचत नाहीये हेच खरं"
"तुमचा काही सांगायचा मूड दिसत नाही! जाउद्यात…आपण अजून एक पेग घेऊया…" श्रीकांत तंद्रीत असताना अनुपमने पुन्हा ग्लास भरले होते  आणि तो उठून पुन्हा पाणी भरायला शेडच्या कडेला जायला निघाला.
"तसं नाही हो…सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटायचं…आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला सांगायला लाज वाटतेय…" श्रीकांतने शरमिंदा होत ग्लास हातात घेतला.
"तुम्ही फार विचार करता हो…लाज वाटणं, अपराधी वाटणं या फार सापेक्ष भावना आहेत…जगाचा, आजूबाजूच्या लोकांचा फार विचार करत राहिलं की हे असं होतं.…इथे त्याची काही गरज नाही…माझ्यासमोर कसली लाज? त्यात तुम्ही दोन पेग डाऊन आणि मी तीन!! अशा वेळी जगजेत्ता असल्याचं माजोराडं वाटणारं फिलिंग आलं पाहिजे! दारू प्यायची कशाला…अशाच सापेक्ष क्षणांना विसरायला…जगाचा अजिबात विचार न करता मनात येईल ते बोलायला लावते दारू! बरोबर की नाही??" अनुपम जगज्जेता नाही पण तत्ववेत्ता नक्की झाला होता. म्हणजे तो नेहमीच असा असतो की हा दारूचा परिणाम आहे हे मात्र त्याला खात्रीने ठाऊक नव्हतं. शिरवळकरांच्या दुनियादारीत एक वाक्य होतं- 'दारू प्यायल्याच्या पहिल्या स्टेजला माणूस जगज्जेता असतो, दुसऱ्या स्टेजला महान तत्वज्ञ आणि तिसऱ्या स्टेजला स्वतःचं हगलं-मुतलं न कळणारं लहान मुल असतो'. म्हणजे अनुपम हा पेग संपता संपता ओकायला लागणार का काय? आणि त्याचं जाऊ दे पण आपल्याला ते 'फील्स लाइक्स दी किंग्स ऑफ दी वर्ल्डस' असं फिलिंग येतंय खरं! सांगूनच टाकू याला! काय फरक पडणारे….
"काय सांगू कामत साहेब तुम्हाला? मलाच ठाऊक नाही मी कुठे चल्लो---चाललोय….आठवतंय तेव्हापासून पळतोच आहे…कुठून निघालो धड आठवत नाही! कुठे जायचंय माहित नाही!"
"एवढा गोंधळ करू नका श्रीकांत राव…सोप्पं बोलू…मी तुम्हाला आठवायला मदत करतो-मगाशी तुम्ही बोल्लात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात--तुअम्च्य मनगटावर ही पट्टी…हे कसं काय बुवा?"
"हे?" श्रीकांत खिन्न हसला."साला….जगाची पण गंमत आहे नाही…जगणं नकोसं करून टाकतात आणि आपण आत्महत्येचा प्रयत्न केला की वाचवतात आणि पुन्हा कायद्याने शिक्षा करतात"
"म्हणजे?? ही पट्टी?" अनुपमने आश्चर्याने विचारलं.
"करेक्ट…मी जीव द्यायचा प्रयत्न केला होता…आत्महत्या…खुद की ख़ुशी के लिये खुद्खुशी….सुसाईड…."
"पण का??"
"खूप मोठ्ठी स्टोरी आहे"
"मग चालेल की…आपल्याकडे वेळ पण आहे आणि ब्लू लेबलपण" अनुपमने हातात बाटली नाचवत पावसाकडे बोट दाखवत म्हटलं.

''हे काय लिहिलं आहेस तू अनु?'' अनुपमची डायरी हातात धरून बाबाने विचारलं होतं-
'
आयुष्य. जीवन. जिंदगी. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास! माणूस अकाली गेला की लोक म्हणतात- 'मरण कुणाला चुकलंय बाबा?' पण माणूस जास्त जगला की 'जगणं कुणाला चुकलंय' असं कुणी का म्हणत नाही? उलट 'म्हातारा मस्त जगतोय…मेला की सोनं होईल त्याचं' वगैरे म्हणून कौतुकच जास्त होतं! असं का? कशासाठी? जगण्याचा एवढा अट्टाहास का? मेल्यावर काय होतं पाहिलंय कुणी? Seriously......Who has seen the other side? कदाचित खूप प्लेझंट असेल ती बाजू आणि त्या बाजूचे लोक कदाचित आपण करतो त्याच्या एकदम विरुद्ध विचार करत असतील!'
''हे असलं काहीतरी लिहितोस तू? मला तुझी फार काळजी वाटते बुवा''
म्हातारा गेला. काळजी करत करत गेला एकदाचा!!

'हा श्रीकांत काय गोष्ट सांगणारे कुणास ठाऊक?' पुढचा घोट घेताना अनुपमच्या मनात विचार आला.


क्रमशः

Tuesday, April 8, 2014

नाईटमेअर भाग १

                                                                            ***
जुलै महिन्यातली अमावस्येची रात्र होती. तिन्हीसांजा उलटून कित्येक तास झाले होते. संध्याकाळी कधीतरी पावसाची रिपरिप सुरु झाली आणि अंधार पडल्यावर त्याला चेव आल्यासारखा तो जोरात कोसळायला लागला. एरव्ही अमावस्येला चंद्रप्रकाश नसला तरी चांदण्यांचा प्रकाश असतो- पण मुसळधार पावसामुळे त्या प्रकाशाचासुद्धा फारसा उपयोग नव्हता. आधीच अमावस्या आणि त्यात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे हायवेवरची वाहतूक गेल्या तासाभरात अगदीच कमी झाली होती. अशा अंधारात आडवाटेला कुठेतरी आडोसा घेऊन थांबायचं म्हणजे खरं तर भीती वाटायला हवी- एखाद्या जनावराची….हायवेवर अपघात होऊन गेलेल्या भटक्या अतृप्त मृतात्म्यांची….अज्ञाताची…! पण त्या अक्राळ-विक्राळ वरुणदेवाने या क्षणाला बहुतेक अशा सगळ्यांनाच पळवून लावलेलं होतं. उलट तो अंधार, तो पाऊस यांच्यात एक विचित्र सिक्युरिटी जाणवत होती. ढगांचा कडकडाट सुरूच होता. अचानक वीज कडाडली आणि सगळा परिसर 'उजळून' गेला. त्याने त्या वीजेच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिलं. ती एक सिमेंटचा पत्रा टाकलेली शेड होती. तो उभा होता त्याच्या मागेच एक बाकसुद्धा होता. शेडच्या एका कोपऱ्यात पाण्याचा एक उघडा मोठा हंडा होता- जो एव्हाना दुधडी भरून वाहत होता. अंधारात पुन्हा अंदाज घेत तो त्या बाकावर बसला. पावसाच्या सरींनी शेडमधला बाक भिजवला आहे हे त्याला बसल्यावर कळलं. पाण्याचा थंडपणा मेंदूपर्यंत पोहोचला आणि तो 'भानावर' आला. कुठे आहोत आपण? इथे कसे पोहोचलो?

'आपण तर वाट फुटेल तिथे पळत सुटलो होतो, कुणी आपला पाठलाग केला असेल का? आपण निघून गेल्याचं कुणाच्याच लक्षात आलं असेल? नसेल आलं तरी काही विशेष नाही त्यात- ज्यांना आपली किंमत वाटायला पाहिजे त्यांना वाटत नाही तर मग 'ह्यांना' तरी कशाला वाटायला हवी? काय करावं समजत नाही- जे विसरायचं आहे ते साला प्रयत्न करून विसरता येत नाही…ज्याचं भान असायला हवं ते वास्तव हातातून निसटून गेलंय…काय करायचं अशा वेळी? सगळं संपवून टाकलं असतं पण तिथेसुद्धा नशीब आड आलं-' त्याचं लक्ष मनगटावरच्या पट्टीकडे गेलं. तो पुन्हा हताश झाला. अंगातली शक्ती खूप कमी झाली होती.

पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. तास-दोन तास उलटून गेले असतील.त्याचा ग्लानी येउन डोळा लागला होता.-

तो आणि सायली सीफेसला बसले होते-सायलीचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. 'आपण कायम असेच एकत्र असू ना रे? तू मला सोडून नाही ना जाणार?' सायलीने त्याला विचारलं. 'सायली, तुला दरवेळी असा प्रश्न का बरं पडतो? तुला खात्री वाटत नाही का माझी? तुला मी इतका बेभरवशाचा वाटतो का?'. 'बरं बाबा, सॉरी पुन्हा नाही विचारणार…आपण सनसेट बघणार होतो ना? ते बघ… तो सुर्य किती भारी दिसतोय?'

त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी लकाकलं. 'आपण खरंच सायलीबरोबर सूर्यास्त बघत नाहीये ना?' …छे छे…आपण तर कुठल्याशा निर्मनुष्य ठिकाणी पावसापासून वाचायला थांबलोय….पुन्हा वीज कडाडली असेल' म्हणून त्याने झोपेच्या ग्लानीतच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो उजेड काही डोळ्यापुढून जात नव्हता- त्याने डोळे किलकिले करत समोर पाहिलं. तो वीजेचा प्रकाश नव्हता- टॉर्चचा होता. कुणीतरी त्याच्याकडे रोखून पाहत उभं होतं. तो ताडकन उठला. उठल्याक्षणी 'अंगाला चिकटलेले' ओलेते कपडे 'सुटले' आणि पुन्हा एक शिरशिरी डोक्यापर्यंत पोहोचली.

"क…क….कोण?"

समोर उभी असणारी व्यक्ती त्याला त्या अंधारात नीट दिसत नव्हती आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याचे मळलेले-चुरगळलेले कपडे, दाढीचे खुंट वाढलेला, अर्धवट भिजून पिंजारलेल्या केसांचा अवतार मात्र समोरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसत असणारे हे त्याला समजलं.

"तुम्ही इथे जवळपास राहणारे आहात का?' समोरच्या व्यक्तीने विचारलं.
"क-क-का? तुम्ही का चौकशी करताय?' त्याच्या घशाला कोरड पडली.
"नाही..इथे जवळपास एखादा पेट्रोलपंप किंवा कुठलं कार रिपेअर दुकान आहे का हे विचारायचं होतं?" समोरच्या माणसाने विचारलं.
"अ….माहित नाही…मी या भागात राहत नाही…पावसापाण्याचा आडोसा घ्यायला थांबलोय…"
"अच्छा…" असं म्हणून तो माणूस तिथेच उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश अजूनही 'त्याच्या' तोंडावर मारलेला होता.
'आपल्याला शोधायला पोलिसांनी यालाच तर पाठवला नसेल ना?' त्याच्या मनात विचार आला. समोरच्या माणसाचा चेहरासुद्धा त्याला स्पष्ट दिसला नव्हता. आता जरा चौकशी करणं जरुरीचं होतं- हा चुकून पोलिस असलाच तर या क्षणाला अंगात ताकद आहे की नाही, पावसाचा जोर कमी आहे की जास्त याचा विचार न करता पळत सुटायचं असं त्याने मनाशी ठरवलं.
"तुम्ही कोण आहात? तुम्हाला कुणी पाठवलं आहे इथे? आणि त्या टॉर्चने आंधळा कराल मला" त्याने मोठ्या आवाजात सुनवलं. समोरच्या माणसाला त्याच्या आवाजातला फरक चटकन जाणवला. त्याने लगबगीने टॉर्चचा झोत स्वतःकडे घेतला.
"ओह…रिअली सॉरी…मी माझ्याच विचारात होतो आणि हा टॉर्च बाजूला करायचा राहिला….आणि हां…तुमची झोपमोड केली म्हणून पण सॉरी बरं का! मला खरंतर या अंधारात, मुसळधार पावसात कुणी भेटेल याचीच खात्री नव्हती- तुम्ही असे इथे झोपलेले बघून कुणीतरी माणूस दिसल्याचा आनंद व्हायच्या आधी मला भीतीच वाटली. जवळपास १० मिनिटं तुमच्या जवळ येउन तुम्हाला उठवावं की नाही हा विचार करण्यात गेलाय"
"ते सगळं ठीके हो…पण तुम्ही आहात कोण? आणि इथे काय करताय?"
"मी हायवेवरून जात असताना माझी गाडी बंद पडली…सो मी रिपेअर शॉप शोधायला या पावसात निघालो…."
"खरंच??काय नाव काय तुमचं? तुमच्याकडे काही आयडेंटीटी कार्ड वगैरे आहे का?"
"अ….आहे ना? दाखवतो की….पण अहो माझी गाडी बंद पडलीय ते बघायला मला मदत कराल का प्लीज?" त्याने तो टॉर्च काखेत धरून मागच्या खिशातून पाकीट काढलं आणि त्यातलं ड्रायविंग लायसन्स दाखवत तो म्हणाला- "मी अनुपम…अनुपम कामत!" त्याने टॉर्च त्या लायसन्सवर मारला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याकडे फिरवला.

अनुपम कामत. अंगावरच्या फॉर्मल कपड्यांवरून कुठल्याश्या कॉर्पोरेट फर्ममधला माणूस वाटत होता- मोठ्या हुद्द्यावरचा! गळ्यात लूज केलेला टाय होता. पावसात कपडे भिजूनही अंगाला कलोनचा वास येत होता. गुळगुळीत दाढी केलेली होती. फक्त चेहरा आणि डोळे थकलेले वाटत होते. दिवसभराच्या दगदगीने असेल किंवा एकूणच कामाच्या रहाटगाडग्याने असेल- तो त्रासलेला, दमलेला वाटत होता!
"पटली ना खात्री तुमची? मी जेन्युइन माणूस आहे आणि मला आत्ता खरच मदत हवीय…कराल प्लीज" अनुपमने विचारलं.
"तुमच्याकडे गाडी आहे ना? मग तुम्ही ही बॅग बरोबर घेऊन का हिंडताय?" त्याने संशयाने त्याच्या हातातल्या बॅगेकडे पाहत विचारलं.
"गाडी बंद पडल्याचं लक्षात आल्यावर मी मदत मिळतेय का ते शोधायला निघालो…पण या भयंकर पावसात मदत मिळायची खात्री नव्हतीच…मग कुठे आडोसा, आसरा मिळाला तर निदान जुजबी सामान असावं बरोबर म्हणून घेतली मी बॅग बरोबर" 
"हे सगळं ठीके हो! पण मी तुमची काय मदत करणार? मलासुद्धा हा भाग नवखा आहे आणि त्यात हा अंधार आणि हा धो-धो पाउस"
"अहो इथून १० मिनिटं चाललात ना माझ्याबरोबर तर आपण गाडीजवळ पोहोचू! मग तुम्ही जरा धक्का वगैरे द्यायला मदत केलीत तर कदाचित गाडी सुरुदेखील होइल...."
"पण या अघोरी पावसाचं काय करायचं? तुम्ही पूर्ण भिजला आहात....आपल्याकडे छत्री नाही! त्यात मला बरं वाटत नाहीये....सकाळपासून मी धड काही खाल्लेलं नाही...आणि तुम्ही माझी मदत मागताय? नाही...नकोच हे सगळं..माफ करा पण मी आपल्याला काहीच मदत करू शकत नाही"
"मला माहितीय की मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे..पण गरजवंताला अक्कल नसते म्हणतात हेच खरं. मी...मी तुम्हांला खायला-प्यायला देतो की! माझ्याकडे बॅगेत आहे थोडंसं...आणि तुम्हांला हवं असेल तर गाडीने सोडेन जवळच्या बसडेपोला…तिथे जाण्यापूर्वी आपण वाटेत अजून खाऊ हवं तर"
"तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला…पण खरंच शक्य होईल असं वाटत नाही! आजच मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलोय. हे पहा…" त्याने हातावरची हॉस्पिटलची पट्टी अनुपमला दाखवली. अनुपमने निराश होऊन नकारार्थी मान डोलावली.
"अरेरे….सॉरी माझ्या लक्षात आलं नव्हतं…" अनुपम अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला. काही वेळ असाच गेला. 'आपण एवढं निर्धाराने नाही म्हटल्यावर अनुपम लगेच निघून जाईल' ही त्याची अपेक्षा होती पण तसं व्हायची काही चिन्हं दिसेनात!
"हा पाउससुद्धा थांबेल असं वाटत नाहीये…या निर्मनुष्य ठिकाणी, अमावास्येच्या रात्री बहुतेक आपण इथे अडकून पडणारोत" अनुपम मागच्या बाकावर जाउन बसत म्हणाला. त्याने हातातला टॉर्च बंद केला.
"आपण? म्हणजे तुम्हीसुद्धा इथेच थांबताय?" त्याने आवाजातली नाराजी शक्य तितकी लपवत विचारलं.
"अ….हो…मला एकट्याला गाडीला धक्का देणं, ती सुरु करायचा प्रयत्न करणं शक्य नाही…गाडी बंद पडलीय तिथपासून इथपर्यंत येतानाच्या दहा मिनिटांच्या अंतरात मला किर्र काळोख आणि दाट झाडी सोडून काही दिसलेलं नाही. त्यापेक्षा तुमची सोबत तरी असेल इथे! आय मीन तुम्हाला झोपायचं असेल तर झोप बिनधास्त या बाकावर…बरं नाहीये ना तुम्हाला? मी इथे बाजूला थांबेन…"
अनुपम जरा अधिकाराने म्हणाला. ती शेड ना त्याच्या बापाची होती ना अनुपमच्या…तो काय म्हणणार? तो बाकाच्या एका कडेला निमूट बसून राहिला.
अनुपम सांगतोय ते खरंय की त्याला कुणीतरी आपल्या मागावर पाठवलं आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता.
"तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना? काही सिरिअस?" पाचेक मिनिटांनी अनुपमने विचारलं.
"नाही काही विशेष नाही" त्याने तुटकपणे उत्तर दिलं.
"ओह…आपलं नाव माझ्या लक्षात आलं नाही" अनुपमने पुन्हा प्रश्न विचारला.
"कारण मी नाव सांगितलंच नाही" पुन्हा तुटक उत्तर!
"अ…सॉरी…तुम्हाला माझ्या प्रश्न विचारण्याचा खूपच त्रास होतोय का?" अनुपमच्या आवाजातही थोडा ताठरपणा आला.
तो चपापला. "नाही हो…तसं काही नाही"
"मग…तुम्ही मला पार माझं आयडेन्टीटी कार्ड दाखवायला लावलं आणि आता तुम्ही मला तुमचं नावपण सांगायला तयार नाहीये…."
पुन्हा शांतता! तो अनुपमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळून दुसरीकडे बघत राहिला. अनुपमने वैतागून दुसरीकडे पाहायला सुरुवात केलीय का हे बघायला त्याने दोनेक मिनिटांनी अनुपमकडे पाहिलं तर अनुपम त्याच्याकडेच बघत होता.
"श्रीकांत मिश्रा" त्याने फायनली नाव सांगितलं.
"……मिश्रा?…अरे वा…मग मराठी चांगलं बोलता की तुम्ही"
"का मराठी खूप अवघड भाषा आहे का बोलायला? की मिश्रा, शर्मा, यादव अशा आडनावाच्या माणसांनी शुद्ध मराठी बोलायचंच नाही असा नियम आहे?" श्रीकांतने खवचटपणे विचारलं.
"अ…माफ करा…मला असं म्हणायचं नव्हतं! पण एखादा सरदार जर का तमिळ बोलताना दिसला की थोडं कन्फ्युस व्हायला होईल ना….तसं झालं…खुळचटपणा आहे खरा……पण आपली सांस्कृतिक जडणघडणच अशी खुळचट आहे त्याला कोण काय करणार?"
श्रीकांतला हसायला आलं.

"अ….किती वाजलेत सांगू शकाल का?" पहिल्यांदाच श्रीकांतने अनुपमला प्रश्न विचारला.
"बारा दहा" अनुपमने हातातला टॉर्च सुरु करून त्याचा झोत मनगटावरच्या घड्याळावर मारत उत्तर दिलं.
श्रीकांत निराश होत उठला. शेडच्या कडेला उभं राहून डोकं वर बघत बाहेर काढून तो 'पाउस' पिण्याचा प्रयत्न करायला लागला. आधी अनुपमचं लक्ष नव्हतं. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने श्रीकांतला हाक मारली.
"अहो मिश्रा भैय्या, तुम्हाला पाणी हवं असेल तर आहे माझ्याकडे! तुम्हाला ताप आहे म्हणालात ना…तिकडे कडेला उभे राहून भिजू नका" श्रीकांतने वैतागून त्याच्याकडे पाहिलं.
"काय हो, मिश्रा म्हटलं की पुढे भैय्या म्हटलंच पाहिजे का? त्यापेक्षा श्रीकांत म्हणा मला…श्रीकांत भैय्या म्हणू नका फक्त…श्रीकांत साहेब, श्रीकांत राव….नुसतं श्रीकांत म्हणा हवं तर"
"सॉरी श्रीकांत सर…हे पाणी घ्या…" अनुपमने श्रीकांतला पाण्याची बाटली दिली.
 
"तुम्ही काय या शेडमध्ये राहायच्या तयारीत आला होतात की काय?" पाणी पिउन झाल्यावर श्रीकांतने विचारलं-
"असं का विचारताय?"
"नाही म्हणजे…अशा भर पावसात गाडी चालू करायला मदत शोधायला निघालात…बरोबर ती बॅग आणि बॅगेत 'पाण्याची' बॉटल?"
"छे छे… बॅगेत खरंतर 'ही' बाटली होती…दुकानदाराने त्याच्याबरोबर पाण्याची बॉटल फ्री दिली म्हणून राहिली चुकून" अनुपमने व्हिस्कीची बाटली हातात धरून त्याच्यावर टॉर्चचा झोत मारला. 
"ओके….आता तुमच्याकडे ही एवढी 'बॅग' का आहे हा प्रश्न मला पुन्हा नाही पडणार" श्रीकांत मंद हसत म्हणाला.

अनुपमने घड्याळ पाहिलं. एक वाजला होता. विजा कडाडणं बंद झालं असलं तरी पावसाचा जोर अजून तसाच होता. श्रीकांत बाकाच्या दुसऱ्या कडेला बसून पेंगत होता. अनुपमने कितीही आव आणला तरी त्याला श्रीकांतच्या अवताराची थोडी भीती वाटली होती. दाढीचे खुंट, पिंजारलेले केस, मळकट कपडे, मनगटावरची मलमपट्टी…कोण आहे हा माणूस? हा इथे कसा? हे जे सगळं घडतंय ते खरं आहे की मी स्वप्न पाहतोय? हा श्रीकांत जिवंत माणूस आहे ना? की हा माणूस नसून-
अचानक वीज कडाडली आणि अनुपम दचकला. त्याने श्रीकांतकडे पाहिलं तर त्याला त्या आवाजाने आणि प्रकाशाने काहीच फरक पडला नव्हता. तो मान खांद्यावर टाकून झोपला होता.

मनावरचा ताण घालवायचं रामबाण औषध अनुपमच्या बॅगेत होतं. त्याने एकदाची व्हिस्कीची बाटली बाहेर काढली. थोडीशी व्हिस्की एका प्लास्टिकच्या छोट्या कपात ओतली आणि एका घोटात कप रिकामा केला. व्हिस्की त्याचा घसा आणि अन्ननलिका जाळत पोटापर्यंत पोहोचली.…मेंदूला झिणझिण्या आल्या आणि सबंध शरीर थरारलं. कडवट तोंडाने त्याने पुन्हा थोडी व्हिस्की कपात ओतली. पुन्हा एका दमात घोट घेण्यासाठी कप तोंडापाशी नेला. पहिल्या घोटामुळे झालेली घशाची जळजळ अजून कमी झाली नव्हती. तो जागचा उठला. शेडच्या कडेला येउन त्याने व्हिस्कीचा कप पावसात धरला.


"अनु, तुला कळत नाहीये की तुला समजून घ्यायचं नाहीये? मला ठाऊके की तू तुझ्या त्या छछोर मित्रांबरोबर जाऊन सिगारेटी ओढतोस….काही दिवसांनी दारू पिशील…पुढे अजून काय दिवे लावणारेस कुणास ठाऊक? हे सगळं बघायला मी नसलो म्हणजे झालं" बाबा वैतागून बोलला होता. आपण नाहीच ऐकलं त्याचं! तसाच त्रागा करत गेला. त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही…कसा शिवणार? माझ्यात जीव अडकला होता ना त्याचा! 

पाण्याने व्हिस्कीचा कप पूर्ण भरला तेव्हा अनुपम भानावर आला. 'छ्या…खूप जास्त पाणी झालं' त्याने मनाशी म्हटलं. त्याने मागे वळून पाहिलं तर-

क्रमशः

Thursday, December 5, 2013

'अटी, अपेक्षा': आफ्टर मॅट्रीमनी

**प्लीज नोट: हा जरी स्वतंत्र ब्लॉग असला तरी या आधीचा एक ब्लॉग वाचला असेल तर हा वाचायला जास्त मजा येईल असं मला वाटतं.

ती: पप्पांचा फोन येउन गेला दुपारी!
तो: हं! काय म्हणतायत ते?
ती: सहज फोन केला म्हणाले! पण मला माहितीय कशासाठी केला होता फोन.

(३० सेकंदानंतर!)
तो: तुला माहितीय मला अर्धवट वाक्य आवडत नाहीत! एकतर तू मला बातम्या बंद करायला लावून तुझ्याशी बोलायला म्हणून बसवलं आहेस!
ती: (चिडून) हो आणि टीव्हीवर बघता येत नाहीत म्हणून तू माझ्याशी बोलायच्या नावाखाली पेपर हातात घेऊन बातम्या वाचतो आहेस! उपयोग काय झाला टीव्ही बंद करायचा?
तो: (हसत) बाई गं, माझं सगळं लक्ष तुझ्या बोलण्याकडेच आहे! तू एक अर्धवट वाक्य बोलून थांबली आहेस. तुला पप्पांचा फोन आला होता! सहजच केला असं ते म्हणाले पण तुला माहितीय की त्यांनी का फोन केलेला…तर आता मला प्लीज सांगतेस का? मी पेपर बाजूला ठेवून तुझ्याशी बोलतो आहे!
ती: (हसून) अच्छा! म्हणजे लक्ष होतं तुझं!
तो: हो बाईसाहेब…आता बोल प्लीज!
ती: बाबांनी बोलण्याच्या ओघात शेजारच्या सलीलची बायको प्रेग्नंट आहे ही बातमी पुरवली मला!
तो: ओके…
ती: सहाच महिने झाले त्यांच्या लग्नाला…पण त्यांनी किती पटकन चान्स घेतला वगैरे वगैरे!
तो: ओके…मग?
ती: तुला कळत नाहीये का? गेल्या आठवड्यात मम्मीने कुणाच्यातरी डोहाळजेवणाचं सांगितलं होतं. माझा स्वभाव कसा आहे हे त्यांना माहितीय म्हणून मला डायरेक्ट काही बोलत नाहीयेत पण त्यांनी मागे लागायला सुरुवात केलीय!
तो: मग तुझं काय म्हणणं आहे या सगळ्यावर?
ती: फक्त माझं म्हणणं इंपॉटंट आहे का? तुला काहीच बोलायचं नाहीये? आपल्या लग्नाला दीड वर्ष झालंय. तुला यंदा प्रमोशन मिळालंय..थोडसं लांब का असेना पण आपलं स्वतःचं घर आहे! आता नातवंड कधी होणार म्हणून मम्मी-पप्पा मागे लागणं सहाजिक नाहीये का? शेवटी त्यांनाही लोक प्रश्न विचारत असतीलच की!
तो: सगळं तूच बोलतेयस! मी काय ठरवायचं आहे यात? आपण रेडी आहोत असं वाटतंय का तुला?
ती: मला काही प्रश्न आहेत! माझं चान्स घ्यायला रेडी असणं तुझ्या उत्तरांवर अवलंबून असणारे!
तो: फर्स्ट थिंग्स फर्स्ट- 'चान्स घेणे' हा फालतू वाक्प्रचार वापरणं मला अजिबात मान्य नाहीये…त्या प्रोसेसला एकदम क्षुल्लक केल्यासारखं वाटतं ते! आणि तुला कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय?
ती: उत्तर नाही! उत्तरं म्हटलं मी! अनेकवचन!
तो: देजा वु…आपण लग्न करायचं ठरवलं तेव्हा तू सेम वाक्य वापरलं होतंस….आठवतंय? म्हणजे आता आपल्याला मुल व्हायला तू रेडी आहेस की नाही हे ठरवायला पण मी एक क्विझ आन्सर करायची आहे?
ती: (हसत) येस! माझ्याशी लग्न करताना या गोष्टीची कल्पना आली होतीच की तुला! सो…करूयात सुरुवात?
तो: (खांदे उडवत) ओके!
ती: मी बाळंत असताना माहेरी जाणार नाहीये! माझी मम्मी आणि तुझी आई दोघीही आपल्याबरोबर येउन राहतील!
तो: काय?
ती: हो, तुला बहिण नाही…त्यामुळे तुझ्या आईला माझं बाळंतपण करण्याची इच्छा असणारे! आणि मला बहिण असली तरी माझ्या आईचा तो हक्क मी नाकारू शकत नाही! सो मला दोघीही हव्या आहेत! तुला चालणारे का?
तो:यस…तू इतका विचार करतेयस याचं मला कौतुक वाटतंय!
ती: इतक्यात कौतुक नको! अजून प्रश्न राहिलेत! दुसरा प्रश्न- आपल्याला होणाऱ्या मुलाच किंवा मुलीचं नाव तू आणि मी ठरवायचं! पत्रिका बघून अक्षर ओळखा, मग नाव शोधा हा खेळ नको!
तो: (हसत) तरी मला प्रश्न पडलाच होता की तू अजून नावाबद्दल कसं काही बोलली नाहीस? माझी काहीच हरकत नाहीये याला! फक्त आपल्या बाळाच्या पूर्ण नावात माझं नाव असेल ना?
ती: हो असेल!
तो: मग हरकत नाही…पण माझ्यामते हा खूप नंतरचा प्रश्न आहे. आपण आत्ता काय करायचं आहे किंवा नाही ते ठरवत होतो!
ती: नाही…काही गोष्टी नंतरच्या आहेत पण त्या आत्ता बोलणं महत्वाचं आहे.
तो: कुठल्या शाळेत घालायचं हे पण ठरवून टाकूया का?
ती: चेष्टा करू नकोस. माझा महत्वाचा प्रश्न राहिलाय.
तो: विचारून टाक. माझं उत्तर होच असणारे नेहमीसारखं
ती: आपल्याला बाळ झालं की तीन-चार महिन्यांनी तू सहा महिने-वर्षभर सुट्टी घ्यायचीस!
तो: क्काय? ते कशाला?
ती: बाळाकडे लक्ष द्यायला!
तो: आणि मग तू काय करणारेस?
ती: मी जॉबवर रिझ्युम होणार! मलाही माझं करिअर आहे ना??
तो: आणि मी का घरी बसायचंय?
ती: आपल्याला बाळ झालं की माझ्या एकटीचं नसणारे ना ते? बाळ होईपर्यंत तू काहीच करू शकणार नाहीयेस…मग बाळ झाल्यावर तर तू काहीतरी करू शकतोस की!
तो: काहीतरी करणं म्हणजे नोकरी सोडून घरी बसणं? मला तुझा मुद्दा कदाचित नीट समजलाच नाहीये!
ती: सुट्टी घे म्हणाले मी! नोकरी सोड असं नाही म्हणते! 'वर्क फ्रॉम होम' कर! पार्ट टाईम ऑफिसला जा! आपण आत्तापासून विचार केला तर नक्की सोल्युशन निघू शकतं…पण आपलं बाळ जेवढं माझं असेल तेवढं तुझही असेल ना? मग त्याची काळजी घेणं, त्याला मोठं करणं या जबाबदाऱ्या फक्त मी का घ्यायच्या?
तो: कारण तू त्याची किंवा तिची आई असशील! आईच करते सगळं मुलांचं.…आणि हो, तो जॉब ऑफ चॉइस असतो,जॉब बाय फोर्स नव्हे! 
ती: म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की पुरुषांसाठी त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांना मोठं करणं हा जॉब ऑफ चॉइस नसतो?
तो: असं कुठे म्हणतोय मी?
ती: तू मला मागे विचारलं होतंस आठवतंय-आज विमेन डॉमिनन्सचा काळ येऊनही पुरुषांना आर्थिक, सामाजिक गरजांसाठी का जबाबदार धरतात? हे कधी बदलणार? वेल,मला असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथेच आहे! मी तुला म्हणतेय की फक्त आर्थिक, सामाजिक जबाबदारी घ्यायच्या ऐवजी घरगुती जबाबदारी घे! मी तुला गृहविष्णू व्हायला सांगतेय!
तो: गृहविष्णू? अगं पण मला जमणारे का ते? मी हे कधीच केलेलं नाहीये…आणि आधी कुणाला करताना पाहिलं नाहीये!
ती: मग आता कर. शिक. आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे! …हे बघ- गेल्या काही वर्षात जग इतकं फास्ट बदललं आहे की 'फास्ट' हा शब्द पण स्लो वाटावा. आपल्या राहण्याच्या पद्धती बदलल्या, मेडिकल सायन्स डेव्हलप झालं, जग जवळ आलं..पण जे बदललं नाहीये ते म्हणजे शिक्षण, नोकरी-करिअर, लग्न आणि शेवटी कुटुंब हा क्रम. आणि तो कधीच बदलणार नाही. पण मग या क्रमात लग्न आणि कुटुंब आलं की नेहमी बायकांनाच मागे पडावं लागतं असं नाही वाटत तुला?
तो: मुलांची काळजी घेणं, त्यांना मोठं करणं म्हणजे मागे पडणं वाटतं तुला?
ती: करिअरच्या दृष्टीने म्हणालास तर 'हो'…तसं वाटतं मला! आणि तुला हा विचार स्वार्थी वाटेल पण जेव्हा मी तुला म्हणतेय की तूसुद्धा आपल्या बाळाच्या मोठं होण्यात जास्त चांगला हातभार लावू शकतोस तेव्हा तुला ते पटत नाहीये?
तो: मी कबुल करतो की तू मला कन्फ्युस केलं आहेस!
ती: ठीके! मग थोडा वेळ घे! सावकाश विचार कर! मला खात्री आहे की तुला माझं बोलणं पटेल…आणि आपण काहीतरी चांगला सुवर्णमध्य काढू शकू.
तो: हं…करतो विचार!
ती: ठीके! मी तुला गरमागरम चहा करून देते…आलं घालून! फ्रेश होशील.


चहाचं आधण ठेवून तिने हॉलमध्ये हळूच डोकावून पाहिलं. तो चक्क पेपर न वाचता, टीव्ही न पाहता शांतपणे विचार करत बसला होता! ती स्वतःशीच हसली!
'नक्की पटेल त्याला…आम्ही नक्की चांगले आई-बाप होऊ'

Saturday, May 25, 2013

'अटी, अपेक्षा' मॅट्रीमनी

तो: आज आपण भेटलोय खरे...पण गेल्या चार भेटीत मला तुला विचारायचं सगळं विचारून झालंय!! मी 'हो' म्हणायचा निर्णय घेतलाय! अनलेस तुला काही प्रॉब्लेम असेल तर बोलू आपण! तुला मला अजून काही विचारायचं आहे का?
ती: एकदम भेटल्या-भेटल्या विचारू का? तुला घाई आहे का? नाहीतर आधी जरा कुठेतरी जाऊन बसुयात का?
(अनपेक्षित उत्तर मिळाल्यामुळे हिरमुसलेला 'तो' काहीच न बोलता तिच्याबरोबर चालायला लागतो)
ती: मी फोन केला होता लंचटाईममध्ये! फोन डेस्कवर विसरून गेलेलास का?
तो: नाही! सॉरी पण खूप बिझी होतो! क्लाएंटची अर्जंट रिक्वेस्ट आलेली! मी लंच केलाच नाहीये! नंतर सावेने खालच्या टपरीवरून वडा-सांबार मागवलं!
(ऑफिसजवळच्या टपरीवरचा तेलकट वडा आणि पांचट सांबार त्याला आवडत नाही हे गेल्या चार भेटीत गप्पांच्या ओघात तिला माहीत झालंय…ती चालायचं थांबून रिक्षाला हात करते)
तो (भांबावून): कुठे?
ती: तू काही खाल्लं नाहीयेस ना नीट? काहीतरी खाऊ…तिथेच बसून बोलू!
(दोघे रिक्षात बसतात. आपण या मुलीला होकार देऊन काहीच चूक करत नाहीये याची त्याला स्वतःच्याच मनाशी पुन्हा खात्री पटते. हिला मला अजून काय विचारायचं आहे या विचारात त्याचा रिक्षा प्रवास संपतो)

तो: तुला लेट होतोय ना माझ्यामुळे घरी पोहोचायला? हॉटेलमध्ये पण खूप वेळ गेला!
ती: घरी माहितीय की मी तुला भेटणारे! मम्मी-पप्पा पण माझ्या 'हो' म्हणण्याची वाट बघतायत. सो त्यांना हवं ते उत्तर मिळणार असेल तर उशीर झाल्याचं चालेल त्यांना!
तो: मग तू काय उत्तर द्यायचं ठरवलं आहेस?
ती: ते तुझ्या उत्तरांवर अवलंबून आहे!
तो: माझं उत्तर सांगितलं मी तुला!
ती: उत्तर नाही! 'उत्तरं' म्हटलं मी…'अनेकवचन'
तो गोंधळून बघत राहतो. मग काहीतरी कळल्यासारखं म्हणतो-
तो: ठीके! तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? पार्टनर म्हणून? नवरा म्हणून? काहीही न संकोच करता विचार! मी जमेल तेवढ्या प्रामाणिकपणे 'उत्तरं' देईन….'अनेकवचन'
ती: अपेक्षा…अ...तसंही म्हणायला हरकत नाही! एक सांगते… माझ्या अपेक्षा फार माफक आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल रिजीड आहे!
तो: ओके! ते मीसुद्धा ठरवू का प्लीज?
ती: नक्कीच! पहिला प्रश्न किंवा अपेक्षा- आपण लग्न करायचं ठरवल्यावर आणि केल्यावरसुद्धा- बाहेर जेवायला गेलो, लग्नाला गेलो, फंक्शनला गेलो तर मला कुठेही ऑकवर्ड 'पब्लिक डिसप्लेज ऑफ अफेक्शन' चालणार नाहीत! तुझं काय मत आहे याच्यावर?
तो: अ….लग्न होईपर्यंत ठीके म्हणजे मला १००% मान्य पण आहे पण लग्न झाल्यावरसुद्धा?
ती: हो! नातं आपल्या दोघांचं असणारे! ती जगाला दाखवणं मला मान्य नाही! चालणारे का तुला?
तो: मला आधी बाकीचे प्रश्न ऐकायचेत!
ती: म्हणजे तुझं आधीच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर आहे?
तो: मुळात 'पब्लिक डिसप्लेज ऑफ अफेक्शन' म्हणजे तुला नेमकं काय अभिप्रेत आहे हेच मला समजून घ्यायचंय! पण मग विषय पर्सनल मोरओव्हर 'प्रायव्हेट' होतो…म्हणून त्याच्यावर शेवटी चर्चा करू…कारण आपण एकमेकांशी लग्न करायचंय की नाही हे त्या एका उत्तरावर डिपेंड असेल तर तशी चर्चा करता येईल!
(तिला थोडं कौतुक वाटलं! त्याने दिलेलं उत्तर ठोस नसलं तरी उडवून लावण्यासारखं पण नव्हतं)
ती: हरकत नाही! पुढचा मुद्दा- माझ्या मागे माझी लग्नाची बहिण आहे! अजून चार-दोन वर्षात तिचं लग्न होईल! तेव्हा तिच्या लग्नात मला आर्थिक हातभार लावायचाय!
तो: सो?
ती: म्हणजे? तुझी या गोष्टीला काहीच हरकत नसेल?
तो: का असावी? तुझी बहिण! तुम्ही दोघी एकत्र मोठ्या झालात! तिच्या लग्नात, तिची हौस-मौज करून द्यायची तुझी इच्छा असू शकते….
ती: तुझ्या घरच्यांचं काय?
तो: वेल…पप्पांना काही घेणं-देणं नाही! आई काही म्हणाली तर बघता येईल!
ती: तिने विरोध केला तर? तुझा सपोर्ट असेल मला?
तो: हे बघ! आपल्या घरचे आपलं लग्न ठरवतायत त्याचा अर्थ आपल्या आयुष्यातले निर्णयसुद्धा तेच घेणारेत असा नाही! तुझ्याशी लग्न 'मी' करतोय!
ती: गुड! पुढचा प्रश्न-
तो: एक मिनिट! जेव्हा मी म्हटलं की तुझ्या निर्णयांना माझा सपोर्ट असेल तेव्हा मला वाटलं होतं की तुझे प्रश्न संपले असतील…
ती: अजून एक महत्वाचा प्रश्न उरलाय! तुला डिवचायला नाही सांगत पण आपण भेटण्याआधी मी ज्या मुलाला भेटले त्याने निव्वळ या प्रश्नामुळे नकार दिला!
तो: व्हॉट डू यु मीन?
ती: सांगते- लग्नानंतर मी कागदोपत्री माझं नाव बदलणार नाही! चालेल तुला?
तो: नाव बदलणार नाही? म्हणजे?
ती: म्हणजे नाव बदलणार नाही!
तो: असं करता येतं?
ती: अर्थात! लग्नाविषयीचे कुठलेच कायदे मुलीला नाव बदलायला सांगत नाहीत!
तो: आणि मग लग्नात नाव बदलायला सांगतात ते?
ती: ते शास्त्र झालं! आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बंधनकारक पण नाहीये!
(तो काही न बोलता विचारात पडला)
ती: नाही पटलं नां?
तो: वेल…मीसुद्धा तुला भेटण्याआधी तीन मुली पाहिल्या! कुणाला जेवण करता येत असणारा नवरा हवा होता, कुणाला मी राहत असलेलं घर माझ्या नावावर झालेलं पाहिजे होतं, एकीला तर माझ्याकडे बघून तिच्या एका बॉयफ्रेंडची आठवण यायची आणि ती ते मला सारखं ऐकवत होती, मी ते ऐकून घ्यावं अशी तिचीही 'माफक' अपेक्षा होती! बट, आय मस्ट से….'हे' मी अजिबात एक्स्पेक्ट केलं नव्हतं आणि आता तू हा विषय काढला आहेस आणि त्यातला सिरीयसनेस जाणवून मला एकूणच लग्नसंस्थेची गम्मत वाटायला लागलीय!
ती: ती का?
तो: लग्न संस्थेने, ती बनवणाऱ्या लोकांनी कधी 'मुलीचं नाव' या विषयाचा गांभीर्याने विचार केलाच नसेल का? तुला असं एकदम हे 'लग्नानंतरचं नाव' हा विषय कधी जाणवला?
ती: नक्की नाही माहीत…पण एक इंसिडंस आठवतोय! माझ्या एका शाळेतल्या मैत्रीणीने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली! खूप वर्षं आमची काहीच भेट नव्हती! तिचं लग्न झालेलं मला माहित नव्हतं आणि लग्न तिला बरंच मानवलं होतं त्यामुळे मी तिला फोटोतून ओळखलं नाही! अशा वेळी ती माझी बाल मैत्रीण आहे हे मला कळायचा एकच सोर्स होता…तिचं नाव! पण मानसी कुलकर्णी नावाने मला माहित असलेली माझी शाळेतली मैत्रीण मला तिचं नाव अश्विनी देशमुख सांगायला लागली तर मी ओळखणार कसं तिला?
तो: (कपाळावर हात मारत) सोशल नेटवर्क! कुणाचं काय? नी कुणाचं काय?
ती: का? तुला पटलं नाही?
तो: पटलं की! पण मला तुझा दृष्टीकोण ऐकायचाय!
ती: एक उदाहरण पुरे नव्हतं का? अरे सिम्पल- तुला नाही वाटत का की मी माझं नाव बदलून माझी आयडेन्टीटी बदलतेय! तू मला लग्नात ठेवलेलं नाव! तुझं आडनाव! मानसी कुलकर्णी ते अश्विनी देशमुख! तू जिच्याशी लग्न करायला कधीचाच होकार दिला आहेस ती मुलगी मी राहणारच नाही!
तो: हा निव्वळ तुझा विचार झाला! नाव बदललं तरी तुझा स्वभाव नाही ना बदलणार? तू आहेस तशीच राहशील….तुझी आयडेन्टीटी बदलेल अशी भीती का वाटतेय तुला?
ती: मला वाटतेय…पण मला नाव बदलायचं नाही हे ऐकल्यावर तू का कावरा-बावरा झालायस? लग्नानंतर तुझी बायको तुझं नाव तिच्या नावापुढे लावणार नाही याने तुझ्या 'आयडेन्टीटी' मध्ये काही फरक पडतोय का?
तो: फरक पडत नाहीये! पण-
ती: पण काय?
तो: तुला असं नाही वाटत की तुला वयाच्या पंचविशीनंतर एक नवीन आयडेन्टीटी निर्माण करायचा चान्स मिळतोय! कित्येकदा होतं की आपल्याला आपल्या नावाशी जोडली गेलेली एखादी गोष्ट, घटना, व्यक्ती नको असते पण निव्वळ आपल्या नावामुळे ती आपल्याला चिकटून गेलेली असते! मग ते नावच राहिलं नाही तर? तू या सगळ्याकडे या बाजूने का नाही बघू शकत?
ती: म्हणजे नावाशी माणसाची पर्सनलिटी, आयडेन्टीटी जोडलेली असते हे तू मान्य करतो आहेस?
तो: आपण फक्त एकमेकांना प्रश्न विचारतोय! त्यापेक्षा मी उत्तर देतो!! येस, मी तुझा मुद्दा मान्य करतो! नावाशी पर्सनलिटी जोडलेली असते! पण लग्नानंतर खूप काही बदलतं मुलींच्या आयुष्यात! आता फक्त मुलींच्याच का? हा प्रश्न तुला पडणार असेल तर आपल्या गेल्या चार भेटी व्यर्थ होत्या! असो! तर लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप काही बदलतं हे तू मान्य केलंस तर नाव बदलणं खूप क्षुल्लक वाटायला लागेल- पूर्वी बायका नाव बदलायच्या की! आपलं माहेरचं नाव त्यांनी कधी टाकलं नव्हतं पण नवीन घर, नवीन नाव, नवीन संसार या सगळ्यात तितक्याच रमायच्या!! आपल्या आई-आजीने हेच केलं…पूर्वी कशाला लग्न मानवल्यामुळे तुला ओळखता न आलेली बाई अश्विनी देशपांडेच होती…कुलकर्णी नाही!
ती: अश्विनी देशमुख…देशमुख… देशपांडे नाही!
तो: करेक्ट! मला माहित होतं की तू मी चुकीचं घेतलेलं आडनाव मला बरोबर करून सांगणारेस! तुझ्याही ती आता तशीच लक्षात राहिली ना? आता ती खऱ्या अर्थाने 'देशमुख' झाली असं म्हणायला हरकत नाही!
ती: (खजील होत) ओह सो यु ट्रिक्ड मी?
तो: डीड आय?
ती: यु नो यु डीड!! पूर्वी लग्न लौकर व्हायची! मुली फारशा घराबाहेर पडत नव्हत्या! शिकत नव्हत्या! त्यामुळे त्यांना ते ट्रान्झिशन खूप सोप्पं वाटत असेल! आता परिस्थिती तशी नाही! आता मी शिकले, घराबाहेर पडले, नोकरी करायला लागले, मला माझं स्वतंत्र विश्व आहे! त्यात माझी स्वतःची एक ओळख आहे! या पोझिशनला मला माझ्या आई-वडिलांनी शिकवून, मला मोठं करून पोहोचवलं- त्यांचं नाव मी एकदम बदलून टाकायचं?? का?
तो: तू आई-वडिलांचं म्हणू नकोस…फक्त वडिलांचं म्हण! आणि मग तसं तरी का? कशाला? आय मीन आपण त्या श्रीलंकन नावांसारखी आपल्या चाळीस पिढ्यांची नावंच जोडू मागे!
ती: तू विषय बदलतो आहेस!! माझा मुद्दा खूप सोप्पा आहे! लग्नानंतर मला फक्त माझ्या नावाने ओळखलं जावं अशी माझी अपेक्षा आहे! माझं नाव म्हणजे जे नाव घेऊन मी गेली २५-२६ वर्षं वावरते आहे ते! बँकेपासून ड्रायव्हिंग लायसन्सवर सगळीकडे नावं बदलत मी नाही हिंडणार! तुला पटत नसेल तर सॉरी!
तो: पण मला तुझा मुद्दा मान्य आहे!
ती: काय?
तो: हो… मला तुझा मुद्दा मान्य आहे! तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये! लग्नानंतरचं तुझा नाव काहीही असो त्याने तू माझी बायको असशील हे बदलणार तर नाहीये! की तुझं आणि माझं आडनाव वेगळं आहे म्हणून आपलं नातं तुला अमान्य असणारे? आणि राहता राहिला तुझ्या आयडेन्टीटीचा मुद्दा- तुला आत्ता ओळखणारे लोक लग्नानंतर तुला एकदम वेगळ्या नावाने हाक मारणारच नाहीत! त्यांच्यासाठी तुझं नाव जे आत्ता आहे तेच राहील…अर्थात तुला लग्न मानवणार नसेल तर! बाकी- लग्नानंतर माझी बायको म्हणून लोकांना काय नाव सांगायचं याची लिबर्टी मी तुला आत्ताच देतो! आर वि ओके नाऊ??
ती: तुझी मतं नंतर बदलणार नाहीत ना?
तो: माझी मतं आहेत ती! इंडियन क्रिकेट टीमचा फॉर्म नाही!!
ती: क्रिकेटवरून आठवलं-
तो: आता तुला क्रिकेट आवडत नसेल तर मग मीच नकार देईन तुला!
ती: नाहीरे! उलट दर वर्षी आपण एकदातरी स्टेडीयममधेच मॅच बघायला जायचं असं म्हणणार होते मी!
तो: मलाही तुला एक प्रश्न विचारायचाय!! आणि तुला उत्तर देणं अजिबात कंपल्सरी नाहीये! फक्त विचार कर आणि सांग कधीतरी! मे बी लग्नानंतर!!
ती: काय प्रश्न?
तोः प्रश्न म्हणजे गम्मतच आहे खरं तर! आपली पुरुषप्रधान संस्कृती…आजच्या ग्लोबलाइझ्ड जगात त्याला आपण 'मेल चाऊनिस्ट कल्चर' म्हणायला लागलो…मग विमेन राईट्स आले, रिझर्वेशन्स आली, विमेन इक्वालिटी झाली आणि आता विमेन डॉमिनंसचा काळ आला! तू मगाशी मला म्हणालीस की विवाह कायद्यात मुलीने नाव बदलायची सक्ती नाही! पण तोच विवाह कायदा आजच्या विमेन डॉमिनंसच्या जमान्यात नवऱ्याला आर्थिक, सामाजिक गरजांसाठी जबाबदार मानतो!! हो ना? मग हेसुद्धा बदलायला नको? 
त्याच्या अचानक अशा प्रश्न विचारण्याने ती थोडी सैरभैर होऊन विचारात पडली! त्याने तिच्या डोळ्यापुढे हात फिरवून तिचं त्याच्याकडे लक्ष आहे याची खात्री केली आणि 'आत्ता विचार नको करूस' अशा अर्थाने नकारार्थी मान डोलावली. त्याने हसून तिच्याकडे पाहिल्यावर तीसुद्धा हसली!
तो: आणि हां, तुझा तो मगाचचा प्रश्न अर्धवट राहिलाय नाही का? बाकी सगळ्या उत्तरांवर आपलं एकमत आहे हे गृहीत धरून बोलायचं का त्यावर आता?

घराच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढताना तिला धाकधूक वाटत होती. घरी आनंदाला पारावर उरणार नव्हता. त्याने तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली होती! पण त्याने विचारलेल्या प्रश्नाचं काहीतरी समाधानकारक उत्तर शोधायला हवं असा विचार करतच तिने घराची बेल वाजवली!