Pages

Saturday, April 14, 2012

जळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'

जात, धर्म, भाषा यांच्या नावाखाली माणसांमध्ये सतत होणारा संघर्ष हा काही नवीन विषय नाही! भारतात जन्माला आलो की या सगळ्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणतो की गेल्या काही दशकांमध्ये समाजसुधारणा झाली. प्रथा-परंपरा बदलल्या. कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले. पण खरंच आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला शिकलो आहे का? या प्रश्नाला १००% होकारार्थी उत्तर मिळणं कठीण आहे! याच विषयावर चर्चा सुरु असताना एक मित्र म्हणाला "आपण फक्त ठणाणा बोंबा मारायच्या बघ..आपण मारे कितीही सुधारणांच्या गप्पा मारल्या तरी वर्षानुवर्षांचे संस्कार (चुकीचे असले तरी) पार 'जीन्स' (GENES)मध्ये इतके भिनलेले असतात की हिंदूंना मुसलमानांबद्दल आणि मुसलमानांना हिंदूंबद्दल तेढ कायम राहणार; ब्राह्मणाची गांधी, आंबेडकर यांच्याबद्दलची मतं बदलायची नाहीत की शेड्युल कास्टवाल्यांची ब्राह्मणांबद्दलची आणि सावरकरांबद्दलची! कधी राजकारण, कधी समाजकारण आड येणार आणि हे असंच चालू राहणार! ब्राह्मण म्हणून तुझ्या घरी तुझ्यावर 'शाखेचे'च संस्कार होणार..तुझ्या आई-वडिलांनी केले नाहीत तर इतर लोक करणार" वगैरे वगैरे..तेव्हा वाटलं होतं की या देशात जन्माला येऊन फार मोठी चूक झाली. तिकडे दूर देशी (म्हणजे अर्थात अमेरिकेत वगैरे) जन्माला आलो असतो तर निदान हे प्रश्न तरी सहन करावे लागले नसते..आडनाव वाचून लोकांनी संस्कार आणि स्वभाव यांचे ताळेबंद तरी बांधले नसते. पण धत तेरे की-..तेव्हा तिकडे दूर देशी अस्तित्वात असणाऱ्या 'वर्ण द्वेषाच्या' दाहक वास्तवाची कल्पनाच नव्हती मुळी!अर्थात तिथे देखील संघर्ष झाला, सुधारणा झाल्या, प्रथा बदलल्या, कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले आणि आज दिसायला तरी वर्णभेद नसणारा, सगळ्या जगाला प्रेमाने आपलंसं करणारा देश म्हणून अमेरिका आपल्याला माहितीय! हे सगळं रिकामटेकडं तत्वज्ञान सुचण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'मिसिसिपी बर्निंग' हा सिनेमा.अमेरिकेत १९६० च्या सुमारास जो नागरी लढा झाला त्यादरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेचं काल्पनिक-वास्तव चित्रण करणारा हा सिनेमा. 

१९६०चा काळ. वर्णद्वेष दक्षिणेकडील विशेषतः मिसिसिपी, अलाबामा या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात होता. कृष्णवर्णियांना हीन, अस्पृश्य वागणूक मिळायची! मग सर मार्टिन ल्युथर किंग सारखी माणसं आली आणि त्यांनी वर्णभेद नष्ट करायला राष्ट्रीय नागरी लढा सुरु केला. अमेरिकेतील निग्रोंना, आफ्रिकन-अमेरिकन लोकांना मतदानाचा हक्क मिळावा, इतर हक्क मिळावे यासाठी हा लढा होता. (इथे मुद्दाम नमूद करावसं वाटतं की हा लढा समान हक्कांसाठी होता, शैक्षणिक किंवा सरकारी सवलती मिळाव्या म्हणून नाही आणि हे वाक्य संस्कारापेक्षा जास्त बुद्धीवादातून आलं आहे.)  गौरवर्णीयांचे सामाजिक, राजकीय अधिपत्य कायम राहावे म्हणून झटणाऱ्या 'कु क्लक्स क्लान' नावाच्या संस्था अस्तित्वात होत्या (खरंतर आजही आहेत) ज्यांचे मिसिसिपीमधले गट नागरी लढ्यादरम्यान कार्यरत होते.मिसिसिपी राज्यातल्या नेशोबा कौंटीतले काही वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील या गटांचे सदस्य होते. कौंटीमध्ये १९६४च्या जून महिन्यात तीन समाजसेवकांची निर्घृण हत्या करण्यात आली. यातले दोन गौरवर्णी, ज्यू होते आणि एक कृष्णवर्णी होता. दोन्ही ज्यू मुलं उत्तरेकडून वर्ण समानता काँग्रेसकडून वर्णभेदाविरुद्ध प्रचार करायला आली होती. क्लानचे सदस्य आणि पोलीस अधिकारी यांनी मिळून या हत्या घडवून आणल्या. यासंबंधीची विस्तृत माहिती इथे वाचायला मिळेल. या हत्यानंतर राष्ट्रीय गहजब झाला. हत्यांची चौकशी करायला देशाच्या सरकारला मिसिसीपीला फेडरल ब्युरोचे लोक पाठवायला लागले आणि याच दरम्यान अमेरिकेतला वर्णभेदावर बंदी आणणारा 'कायदा' मंजूर झाला. इकडे मिसिसिपीत ब्युरोच्या लोकांनी जंगजंग पछाडूनदेखील काही तपास लागत नव्हता. शेवटी माहिती मिळवण्यासाठी पैशांच्या बक्षिसाचं आमिष दाखवायला लागलं. समाजसेवकांचे मृतदेह सापडले. नंतर सुरु झालेला खटला अनेक महिने चालला, गाजला, बंद पडला, पुन्हा सुरु झाला, शेवटी एकदाची काही लोकांना शिक्षा झाली. उणी-पुरी ४० वर्षं गेली या सगळ्यात. या सत्यघटनांवर बेतलेल्या काल्पनिक सिनेमात सगळा भर सामाजिक विषमता, वर्णद्वेष आणि त्याचे लोकांवर होणारे परिणाम यावर आहे. सिनेमामध्ये गुन्हेगार शेवटी पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते असं दाखवलं आहे.'गुड कॉन्कर्स इवील' असा सकारात्मक संदेश पोहोचणं अपेक्षित असावं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा घटनेमागे असलेली राजकीयता लक्षात ठेवून त्यात कोणतीच मुळ नावं वापरलेली नाहीत. 

सिनेमा सुरु होतो तेव्हा दोन पाण्याचे नळ (फाउंटन्स) दिसतात. एक चांगल्या स्थितीत आहे आणि त्यावर 'व्हाईट' असा फलक आहे, दुसरा जुनाट नळ वाहतोय, त्यावर 'कलर्ड' असा फलक आहे. एक गौरवर्णी चांगल्या नळावर पाणी पिऊन जातो आणि एक लहान कृष्णवर्णी मुलगा वाहत्या नळावर. पुढे साधारण काय बघायला मिळणारे याची पुसटशी कल्पना इथेच येऊन जाते. श्रेयनामावली सुरु होते तेव्हा एक जळतं घर दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळी नावं दिसतात. सुरुवातीला त्या जळक्या घराचं महत्व फारसं अधोरेखित होत नाही पण नंतर संपूर्ण सिनेमात जेव्हा अशी घरं जाळण्याचे प्रसंग येतात तेव्हा ते दर वेळी जास्त जास्त अंगावर येतात. पहिल्याच प्रसंगात तीन किशोरवयीन समाजसेवक मुलांचा होणारा पाठलाग आणि त्यांचा खून चित्रित केलाय. पुढच्या प्रसंगात फेडरल ब्युरोचे दोन अधिकारी मिसिसिपीतल्या काल्पनिक 'जेसप' कौंटीला यायला निघालेले असतात. सिनेमामधलं नाट्य निर्माण झालंय ते दोन्ही अधिकाऱ्यांच्या वैचारिक मतभेदांमधून! तरुण वाटणारा अधिकारी 'लन वॉर्ड' इन्चार्ज आहे,त्याला ब्युरोत तीनेक वर्षंच झाली आहेत, त्याचा पुस्तकी क्लुप्त्या, पद्धतींवर भर असणारे असं त्याच्या बोलण्यातून समजतं. दुसरीकडे वयस्कर वाटणारा अधिकारी रुपर्ट ऍन्डरसन निवांत आहे, तो कधी काळी मिसिसिपीमध्ये कुठल्यातरी कौंटीचा शेरीफ (वरिष्ठ पोलीस अधिकारी) होता. त्याला पुढे काय वाढून ठेवलं असणारे याची कल्पना आहे, तो वॉर्डला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की सरळसोट मार्गांनी या केसचा निकाल लागणं शक्य नाही. जेसपमध्ये सगळे पोलीस अधिकारी गौरवर्णी आहेत आणि ते फेडरल ब्युरोकडून आलेल्या या दोन लोकांना अक्षरशः 'फाट्यावर' मारतात.(ब्युरोच्या लोकांना अशी वागणूक मिळालेली शक्यतो कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही.) मुलं गायब झाली आहेत किंवा त्यांचं अपहरण, खून असं काही झाल्याची शक्यतादेखील लोकल पोलीस मान्य करत नाहीत. ऍन्डरसन पेलनावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोशी मैत्री(?) करण्याचा प्रयत्न करतो. तिची भूमिका सिनेमात हळूहळू मध्यवर्ती होत जाते.

लन पार्कर या दिग्दर्शकाने सिनेमाचा वेग व्यवस्थित सांभाळला आहे. कुठलाच प्रसंग कंटाळवाणा किंवा अनावश्यक नाही. वॉर्ड इन्चार्ज असल्याने तो आणि ऍन्डरसन सुरुवातीला त्याच्याच मार्गांनी शोध घेत राहतात. त्यांच्यात त्यावरून उडणारे खटके हा एक भाग, दुसरीकडे ऍन्डरसन आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोमध्ये निर्माण होणारी जवळीक हाही एक महत्वाचा भाग आहे. तीन मुलांची गाडी सापडते पण प्रेतं सापडत नाहीत. वॉर्ड ब्युरोची १००-१५० माणसं कामाला लावून गाडी सापडलेल्या दलदलीच्या भागात शोधाशोध सुरु करतो. एकीकडे कृष्णवर्णीयांच्या घरांवर हल्ले सुरु असतात. अख्खं घर जाळून टाकायचं आणि लोकांना बेघर करायचं ही कुटील कल्पना. लोकल पोलिसांच्या आणि क्लानच्या भीतीने स्वतःचं घर जळताना पाहिलेली माणसंसुद्धा काही बोलायला तयार नाहीत हे बघून कीव येते. दोन्ही अधिकारी राहत असलेल्या हॉटेलवर देखील हल्ला होतो. तेव्हा वॉर्ड काम करायला शहरातलं एक थेटर भाड्याने घेतो. एका रात्री गायब असलेल्या तीन लोकांसारखं आणखी एका कृष्णवर्णीयाला त्रास द्यायचा प्रयत्न होतो. ऍन्डरसनला बातमी मिळालेली असते. तो आणि वॉर्ड त्या मुलाला पळवणाऱ्या गाडीचा पाठलाग करतात. पण वॉर्डच्या बुजऱ्या पद्धतींमुळे त्यांना उशीर होतो आणि मुलाचा शारीरिक छळ होऊन त्याला टाकून देण्यात येतं. तरी तो मुलगा अधिकृत तक्रार करायला तयार नसतो. सिनेमावर टीका झाली ती त्यातल्या 'कृष्णवर्णी लोकांचं इतकं भेदरलेलं असणं' खुप टोकाचं (आणि अर्थातच अतिशयोक्त) दाखवलं आहे म्हणून. आजचे अमेरिकन कृष्णवर्णी पहिले तर ही टीका रास्त वाटते, अर्थात सिनेमात मात्र वेगवेगळ्या प्रसंगात वर्णभेदाविरुद्ध चाललेल्या एका मोर्चाला शिवीगाळ करणारे लोक, प्रार्थना करत असणाऱ्या एका लहान मुलाला मारणारे लोक, जाहीर सभांमध्ये गौरवर्णीयांचा आणि त्यांच्या वर्णश्रेष्ठपणाचा उदोउदो करणारे लोक पाहिले की गौरवर्णीय लोकांबद्दलची चीड वाढत राहते. एकीकडे वॉर्ड लोकल पोलिसांची तीन मुलं बेपत्ता असण्यासंदर्भात उलट तपासणी घ्यायला सुरुवात करतो. यावर उत्तर म्हणून शहराचा महापौर (मेयर) येऊन त्याला धमकावून जातो. वॉर्डची सहनशक्ती संपायला लागलेली असते. त्याला ऍन्डरसनचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. अजून एका घरावर हल्ला होतो. एक स्थानिक कृष्णवर्णी मुलाच्या साक्षीने तीन लोकांविरुद्ध खटला उभा राहतो पण कोर्ट त्यांना मुक्त करतं हा प्रसंग पाहून चीड येते. खटल्याचा निकाल लागल्यावर पुन्हा एक हल्ला होतो. यावेळी घर तर जाळलं जातंच शिवाय घराच्या मालकाला एका झाडाला लटकावून गळफास लावून मारतात. दुसरीकडे सगळ्या घटनांनी सैरभैर झालेली, ऍन्डरसनशी जवळीक निर्माण झालेली पेलची बायको त्याला तीन मुलांची प्रेतं कुठे पुरली आहेत ते सांगते. प्रेतं सापडतात आणि निव्वळ बेपत्ता असण्याची केस अधिकृतपणे 'मर्डर'ची केस बनते. पेलला सत्य कळल्यावर तो बायकोला मारहाण करतो. तिला हॉस्पिटलला ऍडमिट करतात. ऍन्डरसनचं डोकं फिरतं आणि तो वॉर्डच्या पद्धतींवर चिडत पेलला मारायला निघतो. दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला असंतोष उफाळून येतो आणि एक लहानशी मारामारी होते. शेवटी वॉर्ड ऍन्डरसनच्या पद्धतींनी केस पुढे चालवायला तयार होतो. त्या पद्धती काय असतात ते सांगितलं तर चित्रपट पाहण्याची गम्मत जाईल. पण मी आधी सांगितलं तसं- सत्य घटनेतला आणि सिनेमातला मुख्य फरक म्हणजे इथे गुन्हेगारांना शिक्षा झालेली दाखवली आहे त्याने सिनेमात गुंतलो असू तर 'सुख' वाटतं. शेवटच्या प्रसंगात मरण पावलेल्या समाजसेवकाच्या थडग्यासमोर शोकगीत गाणारे लोक उभे असल्याचं दृश्य आहे. लोकांमध्ये कृष्णवर्णी आणि गौरवर्णीसुद्धा आहेत. त्याच्याकडे लांबून पाहत काहीसे सर्द आणि भावूक वॉर्ड आणि ऍन्डरसन परत जायला निघतात. 


वॉर्डच्या भूमिकेत विलेम डॅफो (स्पायडरमनचा सिनियर ग्रीन गॉबलीन) आणि ऍन्डरसनच्या भूमिकेत जीन हॅकमन आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका अर्थात सुरेख वठवल्या आहेत. सिनेमा वेगवेगळ्या ऑस्करससाठी नामांकित झाला. त्यापैकी सर्वोत्कृष्ठ छायाचित्रणाचं ऑस्कर त्याला मिळालं. उत्तम पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन या अजून काही जमेच्या बाजू. ऑस्कर सोहळ्याला बहुतेक कायम वर्णद्वेष या विषयाचं आकर्षण वाटत आलेलं आहे. म्हणूनच की काय २००४ मध्ये क्रॅ नावाच्या याचं विषयावरच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला. या वर्षी, याचं विषयाशी, याचं काळाशी (१९६०, मिसिसिपी) संबंधित गोष्टीवर बनलेला 'द हेल्प' ऑस्करच्या शर्यतीत होता. आपल्याकडे मिसिसिपी बर्निंगवर आधारित 'आक्रोश' बनवला (जुना नाही, प्रियदर्शनचा २०१०चा सिनेमा), क्रॅशवर बेतलेला 'ये मेरा इंडिया' एन. चंद्रांनी बनवला. हे चित्रपट चांगले नव्हते की ते कुणी पाहिलेच नाहीत कुणास ठाऊक!!(मी पण आक्रोश पहिला नाहीये). पण त्यांना खूप थंड प्रतिसाद मिळाला. याउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.

सिनेमा बघितल्यावर तो आवडणं वेगळं, तो पटणं वेगळं, त्याच्याशी रिलेट करता येणं अजून वेगळं! मिसिसिपी बर्निंगशी रिलेट व्हायला अर्थात गेल्या ४-५ वर्षात फार प्रतिष्ठेचा असलेला आरक्षणाचा मुद्दा होता. आपण भारतातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेबद्दल हळहळतो. मी आधी लिहिलं तसं- आडनाव वाचून माणसांबद्दल भली-बुरी मतं बनवून टाकतो. नावं बदलता येतात, धर्म बदलता येतो, पण शरीराच्या रंगाचं काय करायचं? तो कसा बदलणार? आणि तो बदलणं जर का शक्य नाही यावर सगळ्यांचं एकमत असेल तर शरीरांच्या आतली गोरी-काळी-तपकिरी-पिवळी माणसं कधी बदलणार?
***

*सारी चित्रे विकिवरून साभार.

Monday, April 9, 2012

एक सुस्त रविवार

ब्लॉग वाचण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा 
                                                                             **
"सर, सगळे गेलेत, आता साधारण तासभर आम्ही कुणाला आत येऊन देणार नाही..तुमचं सावकाश आटपू द्या" एक सफारी घातलेला माणूस येऊन सांगून गेला. झरूनी त्याचं कौतुक करायला त्याचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला पण अहं..त्यांना काही नाव आठवलं नाही.
"चलिये आसिफ भाई" मागून मन्नुजींनी येऊन पाठीवर थाप मारली.."सगळे खोळंबलेत"
"अ हो.. हो..चला" म्हणत दोघे प्रशस्त डायनिंग टेबलकडे आले. 
"हा तुमचा मिडिया फार तापदायक प्रकार आहे हो..आम्ही तिकडे बसून नुसते ऐकतो..आज पाहिलं बुवा" झरु म्हणाले.
"सगळे आगाऊ, लबाड आहेत हो..मी तर त्यांच्यासमोर काही बोलायलाच जात नाही..पराचा कावळा करतात हो.." मन्नुजी हतबल होत म्हणाले.
"तुम्ही आता बोलतच बसणार आहात की जेवणार पण आहात? या राजकारण, मिडिया असल्या वायफळ चर्चा होत राहतील..मन्नू काका, मम्मी नाहीये तर तुमची बडबडच सुरु झाली" प्लेटवर काटे-चमचे आपटत राहुल्या बोलला.
"अरे मी कधीचं तेच विचारणार होतो, मॅडम कुठे गेल्या?" झरुनी विचारलं.
"मॉम इस्टरच्या प्रोग्रॅमला गेलीय..तिने तुम्हाला वेलकम विशेस पाठवल्या आहेत, मी सांगायलाच विसरलो"
"ओके ओके.."
"जेवायचं का? मला तर खूप भूक लागलीय" म्हणत राहुल्याने अधाशासारखे पानात पदार्थ वाढून घेतले.
'याची मम्मी समोर असती तर आत्ता तिने डोळे मोठे केले असते..मेला पोट भरायला खातो की साठवून ठेवायला खातो हे मला अजून कळलेलं नाही..' मन्नूनी मनातल्या मनात म्हटलं.
झरूंनी अल्लातालाचं नाव घेतलं आणि बिस्मिल्लाह केला. दोन तीन घास खाऊन झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मन्नुजी काही खातच नाहीयेत.
"मन्नूजी, आजचा मेनू तुमच्या विशेष आवडीचा दिसत नाही.."
"अ..नाही नाही..जेवतो की.."
"कसला विचार करताय?"
"तुमच्याशी एक-दोन मुद्द्यांवर चर्चा करायची होती..ती कधी करता येईल त्याचा विचार करत होतो.."
"काय मन्नू साहेब? मी तुमच्याशी चर्चा-बिर्चा करायला इथे आलेलो नाहीये..काल मुद्दाम मिडीयाला स्टेटमेंट दिलं मी तसं..मी संडे एन्जॉय करायला आलोय..आपण आत्ता मस्त जेवूया..मग थोडावेळ टीव्ही बघू वेळ असेल तर..तुमचा तो डान्स इंडिया डान्स नावाचा कार्यक्रम आमच्याकडे फार लोकप्रिय आहे..तुम्ही पाहता का?"
"अहो झरु अंकल, अख्ख्या इंडियातल्या लोकांना वाटतं की माझी मम्मी यांनाच गेली कित्येक वर्ष डान्स करायला लावतेय..ते कसला प्रोग्रॅम बघणारेत??" राहुल्याने पुन्हा थट्टा करायची संधी सोडली नाही. 
"गोश तो एकदम टेस्टी बना है..मला तर जामच आवडलं" इतका वेळ शांत बसलेला बिल्लू बाळ बडबडला.
"सेम पिंच.." राहुल्याने त्याच्या हाताला चिमटा काढत म्हटलं.  
"मन्नुजी तुम्ही आत्ता जेवून घ्या..नंतर आमच्यासाठी अरेंज केलेलं कॉप्टर थोडं १०-१५ मिनिटं थांबवू आणि तेवढ्या वेळात करू काय ती चर्चा..नेहमीचेच तर विषय असणारेत.."
"मन्नू काका, जेवून घ्या..मम्मी नाहीये म्हणून नीट तोंड उघडून जेवता येईल तुम्हाला" (हे वाक्य कोण बोललं असेल हे.सां. न.)
बिल्लू बाळ जेवताना मच-मच आवाज करत जेवतो हे मन्नुजींच्या लक्षात आलं होतं पण डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळे त्याला काही बोलता येत नव्हतं. दुसरीकडे राहुल्या उगाच त्यांची चेष्टा करत होता पण मॅटर्नल इम्युनिटीमुळे त्यालाही काही बोलता येत नव्हतं. त्यांची चिडचीड झाली होती. 
गेला दीडेक आठवडा मिडीयाने झरुंच्या या ट्रीपची जरा जास्तच हाईप केली होती. त्यात अमेरिकेने हफिझ सैद असं नवीन नाव जागतिक चर्चेला पुरवलं होतं. आधीच काय प्रॉब्लेम्स कमी आहेत? त्यात नुकतंच सियाचीनमधल्या हिमवादळात काहीशे पाकिस्तानी सैनिक सापडल्याचं त्यांना कळलं होतं. हा झरू त्यांना सोडवायला मदत करा असं सांगणार याची त्यांना खात्री होती. झरूने येताना मोठी शक्कल लढवली होती. दिलेल्या वेळेपेक्षा तो तब्बल दिडेक तास उशिरा आला होता. त्यामुळे ठरलेल्या वेळेतला उरलासुरला वेळ हा वेळ काढत जेवणार आणि काढता पाय घेणार हे त्यांच्या लक्षात आलं. बरं त्याला जास्त वेळ थांबवला तर मिडिया बोंबलणार, राहुल्या चुगल्या करणार आणि मग मॅडम काहीतरी बोलणार! मॅडम पण लई हुशार आहेत, स्वतः इस्टरचं नाव काढून आल्या नाहीत आणि या बिंडोकला दिलं पाठवून! चीनकडून पण या भेटीबद्दल काहीतरी भोचक विधान होणार! आता काहीतरी डोकं लावायलाच पाहिजे. मांडीवर घेतलेला रुमाल बाजूला करत गुडघा खाजवत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली. तो लगबगीने पळत आला. त्याच्या कानात काहीतरी कुजबुजत त्यांनी त्याला परत पाठवलं. झरुने त्यांच्याकडे पाहत मान हलवत, भुवई वर करून 'काय?' असा प्रश्न विचारला.
"आपलं ते १०-१५ मिनिटं उशीर करायचं हो.." म्हणत त्यांनी विषय थांबवला. झरूजी परत जेवणात बिझी झाले. 
बिल्लू आणि राहुल्या जेवता-जेवता एकमेकांशी आय-फोनची प्स डिस्कस करत होते. अनेक गोड पदार्थांपैकी झरूंना बासुंदी आवडल्याचं दिसत होतं. पण ती ते भातात घालून खायला लागल्याचं मन्नुजींना दिसताच त्यांनी बाकी काही न खाता शेवटचा दही-भात पानात वाढून घेतला. 
**
"फार छान सुपारी आहे हो..मला थोडी पार्सल देता का?" झरूंनी विचारलं. त्यांनी ऑलरेडी तीन-चार वेळा सुपारी खाऊन झाली होती. 
"हो हो..आमच्याकडून भारतभेटीनिमित्त तुम्हाला तेवढीच भेट" मन्नु हसत म्हणाले आणि त्यांनी मागे उभ्या माणसाला खूण केली. तो सुपारीची पाकिटे अरेंज करायला पळाला.
मागून एकमेकांना टाळ्या देत, खिदळत बिल्लू आणि राहुल्या आले. 
"मन्नु अंकल, मला जेवण फार आवडलं..एक नंबर..मी आत्ताच हिंदुस्तानात अमन राहो म्हणून ट्विटपण केलं"
"बेटा, तुम्ही खुश तर आम्ही खुश..काय झरू साहेब बरोबर ना...??"
"अलबत..शेवटी आमची गद्दी तुम्हीच तर चालवणार आहात.." झरूंनीही दाद दिली. 
('माझी गादी टिकेल का नाही तेच माहित नाही..बिल्लुला आयुष्यभर झोपायला गादी मिळाली तरी खूप झालं' झरूच्या डोक्यात आलेला विचार, 'या राहुल्याला सायकल चालवता येत नाही, गादी काय चालवणार?' मन्नुच्या डोक्यातला विचार)
''चलो अंकल, आम्ही जातो जरा पुढे..आमच्या जरा वेगळ्या गप्पा चालल्या आहेत" म्हणत बिल्लू राहुल्याचा हात धरून निघाला. राहुल्या जाताना आपल्याकडे डोळे वटारून बघत आपल्याला दटावतो आहे असं मन्नुजींना वाटत राहिलं.
मुलं पुढे गेल्याचं बघून झरूंनी विचारलं-
"बोला साहेब, तुम्हाला कसली चर्चा करायची होती? दारापर्यंत चालता चालता बोलू..."
"अ..ते आपलं हे..असं म्हणत त्यांनी मागेमागे चालणाऱ्या सेक्रेटरीच्या हातातून एक कागद घेतला. "हे आमचं मिडिया स्टेटमेंट..आमचे पक्ष प्रवक्ते आपण 'या' गोष्टी बोललो म्हणून सांगतील.." म्हणत तो कागद झरूंना दिला. झरूनी कोटाच्या खिशातून चाळीशी काढली आणि डोळ्यावर चढवत तो कागद वाचला. 
"ठीके..चालतंय..तेवढा कसाबवाला मुद्दा काढून टाका..जुना झालाय हो तो..आमच्याकडे खात्रीशीर रिपोर्ट आहेत की हिंदुस्तानी लोक विसरलेत त्याला.."
"अहो पण.."
"अहो कसलं पण आणि काय...हा हफिझ सैदवाला मुद्दा आपण का मांडलाय? लोकांनी त्या कसाबला विसरून जावा म्हणून..मुळात हा हफिझ सैद अस्तित्वात तरी आहे का मला सांगा..?" झरू डोळा मारत म्हणाले.
"अ..तेही खरंच.."
"आणि हो, त्या सियाचीनच्या दुर्घटनेचं कानावर आलं असेल तुमच्या..त्याचं काहीतरी पहा.."
"अ..हो..मॅडमशी बोलेन मी त्याच्याबद्दल"
"मॅडमसमोर तोंड उघडणार नसाल तर त्यांना लिहून कळवा" झरुंनीही मन्नुजींची थट्टा केली. मन्नुजी ओशाळून हसले.
"आणि हो, अजून एक..राहुल्या आणि बिल्लूचं चांगलं जमलेलं दिसतंय..एखादं वाक्य ते पण टाकून द्या...मॅडमपण खुश होतील" 
मन्नुजींनी मागे उभ्या सेक्रेटरीला खूण केली, त्याने मुद्दा हातातल्या नोटपॅडवर खरडला.
"असेच बोलवा परत कधीतरी..पुढच्या वेळी आल्यासारखे राहून जाऊ २-३ दिवस काय.?" झरू म्हणाले.
हो हो जरूर.."
"आणि तुम्हीसुद्धा या कधीतरी..आमच्याकडे बघायला जाम भारी काय काय आहे.."
"खरंच??" मन्नुजींनी एक निसटता वार करायची संधी साधली. पण तोपर्यंत झरू समोर आलेल्या मिडीयाच्या लोकांना अभिवादन करण्यात गुंतले होते.
**
तो दुपारचं जेवण जेवून निवांत पडला होता. रविवारी सगळ्यांना एक स्वीट मिळतं. आजूबाजूच्या दोन-तीन लोकांच्या पानातलं हात घालून घालून त्याने खाल्लं होतं. एका हवालदाराने येऊन काठी गजांवर आपटली. त्याने त्रासून हवालदाराकडे पाहिलं-
"काये?" 
"चिठ्ठी!!"
त्याने उडी मारत उठुन ते चिठोरं घेतलं. आणि उघडून वाचायला सुरुवात केली-
"जनाब
रविवारची मेजवानी यशस्वी..निघायची वेळ जवळ आलीय...तयार व्हा"
*** 


Wednesday, March 28, 2012

४७ सेकंद

         "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, जरी तर्कशुद्ध नसला तरी असतो! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?" कॅसल बेकेटला विचारतो. 


मी पाहत असलेल्या अनेक सीरिअल्समधली एक सीरिअल- 'कॅसल'. एक खून-रहस्यकथा लिहिणारा लेखक एका शहरातल्या पोलिसांच्या टीमला गुन्हे सोडवायला मदत करतो ही त्या शोची जनरल थीम. काल त्याचा '४७ सेकंद' नावाचा एपिसोड पाहिला. न्यूयॉर्कमधल्या कुठल्याशा निदर्शनांच्या दरम्यान एक बॉम्ब फुटतो आणि ५ लोक ठार आणि २८ जखमी होतात. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांमध्ये बॉम्ब फुटलेल्या ठिकाणी काढला गेलेला एक ४७ सेकंद आधीचा फोटो असतो. नेमकं त्या ४७ सेकंदात काय घडलं? बॉम्ब कुणी ठेवला? का ठेवला? वगैरे वगैरे शोधून काढणं म्हणजे सगळा एपिसोड. कॅसलचे या आधी मी कित्येक चांगले एपिसोड पहिले आहेत मग अचानक कालच्या एपिसोडवर अख्खा ब्लॉग का?    
कालच्या एपिसोडने मला थोडं अंतर्मुख केलं. माझ्याबरोबर हा शो पाहणाऱ्या कुणाला काही विशेष वाटलं नसावं कारण शोच्या फेसबुक पेजवर भलतीच चर्चा सुरु होती. म्हणून ब्लॉग लिहिण्यापूर्वीसुद्धा खूप विचार केला. खरंच लिहावं का म्हणून?असं तर वाटणार नाही की उगाच काहीतरी विषय काढायचा आणि लिहित सुटायचं म्हणून लिहिलंय? सध्या मराठी ब्लॉगिंग हा प्रकार थोडासा वादग्रस्त झाला असल्याने साशंकता होती. पण मग म्हटलं की कुणाला काय वाटायचं आहे ते वाटून दे..मी माझ्या डोक्यात येतंय ते सांगायचा प्रयत्न करतोय. ज्यांना पटेल ते वाचतील इतरांनी फु.गो.घ्या.
तर- कॅसलचा काल भर जितका तपासावर होता तितकाच स्फोटामुळे व्यक्तिरेखांच्या मनावर होणाऱ्या परिणामांबद्दल होता. स्फोट मेलेल्या लोकांपैकी कुणाला टार्गेट करून तर झाला नाही ना याचा तपास करण्याचा प्रयत्न होतो. मरण पावलेल्या पाच लोकांमध्ये एक शहर फिरायला आलेला टूरिस्ट असतो, एक दोन मुलांची आई असते, एक त्याच्या कुटुंबातला कॉलेजला गेलेला पहिलाच मुलगा असतो वगैरे. सगळ्यातून हाच निष्कर्ष निघतो की सगळे मरण पावलेले लोक अहेतुक गेले. निराश होऊन कॅसल बेकेटला म्हणतो "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, काहीवेळी तर्कशुद्ध नसला तरी हेतू असतोच! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?एका क्षणात त्यांचं भविष्य, त्यांचे प्लान्स सगळे नाहीसे झालेत."
मला त्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या सिरिअस होण्याने आधी नवल वाटलं. ५ ठार २८ जखमी? मुंबईत गेल्या काही वर्षात आपण इतके स्फोट अनुभवले आहेत त्यामुळे स्फोट झाला ना?त्यात काय एवढं?अमेरिकन शो असला म्हणून एका स्फोटाचं इतकं काय उदात्तीकरण सुरु आहे असे सगळे विचार डोक्यात येऊन गेले. मग अचानक स्वतःच्याच निर्ढावलेपणाचा राग आला. शांतपणे बसून आठवत होतो की आपल्याकडे हल्ला झाला की किती दडपण असतं ते! कळायला लागल्यापासून ११ जुलै, २६ नोव्हेंबर अशा मुंबईत झालेल्या सगळ्या हल्ल्यांच्या वेळी मी तो अनुभव खूप जवळून घेतलाय. वर्षाच्या काही ठराविक तारखा दिनविशेष असल्यासारख्या आपण एखाद्या बॉम्ब-स्फोटासाठी लक्षात ठेवतो याला दुर्दैव म्हणायचं की करंटेपणा? अमेरिकेत बॉम्ब-स्फोट होत नाहीत का काय याचा शोध घ्यायला मी विकिची मदत घेतली. गेल्या साधारण तीन वर्षात सगळ्या अमेरिकेत मिळून निव्वळ एका हल्ल्याची नोंद अशी होती जिथे काही लोक मरण पावले. कित्येक नोंदी तर अशादेखील होत्या की बॉम्ब सापडला आणि डिफ्युस केला गेला, फक्त एका माणसाचा एक पाय गेला वगैरे. याउलट त्याच लिस्टमध्ये भारतात जवळपास दर महिन्याला होणाऱ्या एका स्फोटाची नोंद आहे. दर स्फोटात लोक मेले आहेत, जखमी झाले आहेत. 
फार जास्त लिहिण्यापूर्वी मी स्पष्ट नमूद करतो की मला या ब्लॉगमधून कुठलेही निष्कर्ष काढायचे नाहीत. उलट प्रश्न पडलेत आणि त्यांचा फार गुंता झालाय. निदान लोकांनी वाचून काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. मुंबईत गेल्या वर्षी दादरमध्ये झालेल्या स्फोटानंतर शी. चीडब्रम (नावाचा असा उल्लेख टाईप करतानाच्या चुकीने झालेला नाही) या आपल्या गृहमंत्र्यांनी उधळलेली मुक्ताफळं आठवली आणि भारतीय असण्याची लाज वाटली (वाक्य लिहायला खूप जड गेलं पण दुर्दैवाने ते खरं आहे). अमेरिकन लोकांचा खूप हेवा वाटला मला. वेनसडेमधला नसीर आठवला जो म्हणतो की सकाळी कामाला बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का याची खात्री घरातल्या बाईला नसते. हे सगळं कधी थांबणार? अमेरिकेत एक ९/११ चा हल्ला झाला आणि त्यांनी आज दहा वर्षांनीसुद्धा अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णपणे हलवलेलं नाही. आपण मात्र कसाबची सरकारी पाहुणा असल्याच्या थाटात सरबराई करतोय. अमेरिकेच्या धोरणाचं कौतुक करण्याचा अजिबात हेतू नाहीये पण याच ब्लॉगच्या अनुषंगाने आठवलं- माझ्याबरोबर जॉन नावाचा एक अमेरिकन काम करतो. त्याच्याशी परवा गप्पा सुरु होत्या. अमेरिकन राजकारणाचा विषय निघाला. लौकरच निवडणुका होतील. इथे अध्यक्ष निवडून येण्यापूर्वी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीसुद्धा प्रत्येक पक्षातर्फे वेगळी निवडणूक होते. प्रत्येक उमेदवार त्याचे अजेंडे मांडतो वगैरे. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. तो बोलता बोलता सहज म्हणाला- "चैतन्य, सामान्य अमेरिकन माणसाला कुठल्या उमेदवाराची आंतरराष्ट्रीय धोरणं काय आहेत याच्याशी घेणं-देणं नाही. ९/११ झाल्यानंतर अगदी आजपर्यंत आमचे अधिकारी एखाद्याला दहशदवादाच्या निव्वळ संशयाखाली अटक करताना दिसतात.सामान्य माणसाला पुरेपूर कल्पना आहे की आमचं सैन्य इराक किंवा अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून बसलंय. आम्हाला मात्र असंच वाटतं की त्यांनी त्यांच्या देशात सुरक्षित असावं. माझ्या देशाची दहशतवादाविरुद्ध काहीही धोरणं असोत मला माझ्या सरकारने माझ्या देशात फक्त सुरक्षित ठेवणं अपेक्षित आहे." मी मनात म्हटलं होतं- "आम्हा भारतीयांना तरी काय वेगळं वाटतं असणारे? पण आमच्या सरकारची ना दहशतवादाबद्दल काही ठोस धोरणं असल्याचं आम्हाला जाणवतं आणि सुरक्षितता? वेल, कल्पना चांगली वाटते नाही ऐकायला?" पाश्चात्य संस्कृती (वाचा अमेरीकन) कायम चंगळवाद आणि भौतिक सुखं यांच्यावर भर देणारी असल्यामुळे त्याची तांत्रिक भरभराट जास्त झाली या अर्थाचं वाक्य कुठेतरी वाचलं. पण अमेरिकेत आल्यापासून गेल्या दोन वर्षात जे जाणवलं ते हेच की इथे माणसाला, त्याच्या जीवाला किंमत आहे ज्यामुळे चंगळवाद आणि भौतिक सुखं सारख्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष होतं. ब्लॉग लिहिताना एकीकडे लोकसत्ता उघडला तर गडचिरोलीमध्ये नक्षलवादी स्फोटात १२ जवान शहीद झाल्याची बातमी वाचली आणि अजूनच निराश झालो. 
लिहिता लिहिता २६ नोव्हेंबर आणि ११ जुलैच्या घटना आठवल्याच. ९३चे स्फोट झाले तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण या दोन घटना नीट आठवतायत. ११ जुलैला स्फोट झाले आणि १२ जुलैला सगळे चाकरमानी जीव मुठीत धरून कामावर रुजू झाले. भीती, दुःख व्यक्त करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. आजपर्यंत त्या हल्ल्यामागे हात असणाऱ्या कुणाला ठोस पुराव्यानिशी पकडून शिक्षा झाल्याचं माहित नाही. २६ नोव्हेंबरनंतर आठवडाभराने गेटवेला झालेला 'पीस-मार्च' आठवतो आहे. 'पीस-मार्च' असला तरी जमाव इतका संतप्त झाला होता की पोलिसांना परिस्थिती ताब्यात घ्यावी लागली होती. आणि आज साडेतीन वर्षांनी? कसाबला शिक्षा होईल ही आशा हळूहळू लोकांनी सोडून दिलीय. मिडीयाला कव्हर करायला सध्या इतर अनेक ब्रेकिंग न्युज आहेत. पेपरला स्फोटाची बातमी वाचली की आपण ४७ सेकंदसुद्धा विचार करतो का नाही हा प्रश्न आहे! अक्षरधाम, भारतीय संसदेपासून दिल्ली, वाराणसी, आसामपर्यंत झालेल्या कुठल्याही हल्ल्यासाठी कुणालाच ठोस शिक्षा झालेली मला माहित नाही. इथे मला धर्म, देश, राजकीय पक्ष अशा कोणत्याच गोष्टी उपस्थित करायच्या नाहीत कारण माझ्या मते सुरक्षिततेचा मुद्दा असला की कोणत्याही धर्माच्या लोकांच्या, राजकीय पक्षाशी संबंधित लोकांच्या आणि कुठल्याही देशाच्या लोकांच्या भावना सारख्याच असतात.  प्रॉब्लेम असा आहे की सध्या कोणत्याही सज्जन माणसासमोर  महागाई, भ्रष्टाचार, गर्दी असे इतके प्रश्न असतात की सुरक्षितता या मुलभूत गरजेचा आणि हक्काचा विचार करायला वेळ आहेच कुठे? 
               कॅसलपासून विषय सुरु करून तो भरकटवत कुठेतरी नेऊन सोडण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण कालपासून डोक्यात वर लिहिलेलं वाक्य घोळत होतं आणि राहून राहून वाटत होतं की आजपर्यंत झालेले हल्ले, त्यात गेलेले लोक, त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न, भविष्य यांचा विचार करायलासुद्धा आज आपल्याला वेळ नाहीये. इतकं निर्ढावलेलं असून चालणार नाही. कारण जर का जो दगडपणा मला ४७ सेकंदांसाठी का होईना माझ्यात आलेला मला जाणवला तो जर का प्रत्येकामध्ये आला तर अवघड आहे. आणि माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न तसाच आहे- खरंच आपण सुरक्षित आहोत का? 


ता. क. : अजून एक: वाचणाऱ्या काही लोकांच्या डोक्यात एक मुद्दा येईल की हा माणूस अमेरिकेला गेलाय आणि तिथे बसून उगाच हे असले लेख लिहितो आहे. त्याला इथल्या सुरक्षिततेशी काय देणं-घेणं आहे? तर अशा लोकांना माझा इतकाच निरोप आहे की भारतात नसलो तरी नाळ शेवटी तिथेच जोडलेली आहे. माझे आई-वडील, नातेवाईक, मित्र, शेजारी-पाजारी आजही त्याच वातावरणात राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीने हे सगळं लिहिलं असं समजा. हेही खोटं वाटत असेल तर खड्ड्यात जा! 

चैतन्य