Pages

Saturday, November 12, 2011

तारखा!

तारखा! लोकांना अलीकडे कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटायला लागलं आहे! ११-११-११ या तारखेत नाविन्य किंवा कौतुक वाटण्यासारखं काय आहे असा मला प्रश्न पडतो. मान्य आहे की ११-११-११ ही तारीख एकदाच येते पण त्याच लॉजिकने ११-१२-११ ही तारीख पण किंवा इतर कुठलीही तारीख एकदाच येते नाही का? मध्यंतरी बातमी वाचली की भारतात लोकांना लग्न करायला, मुलांना जन्म द्यायला (?) हीच तारीख हवी होती. आधी लोकांच्या वेडेपणाची चेष्टा केली आणि मग सहज जुन्या आठवणींमध्ये हरवून मी गेल्या काही वर्षातल्या महत्वाच्या तारखा आठवत बसलो. बऱ्याच गोष्टींची वर्षंपण आठवत नाहीयेत पण त्या तारखा लक्षात राहिल्या...त्यातल्या काहींचा हा लेख-जोखा!!

२६ जानेवारी..बहुदा २०००..भारताच्या लक्षात राहिला त्याचं कारण गुजरातमध्ये झालेले भूकंप. माझ्या लक्षात राहिला कारण त्यादिवशी मी शाळेच्या दोन दिवसाच्या कॅम्पसाठी कर्जतला निघालो होतो. आम्ही चर्चगेट स्टेशन का व्हीटी स्टेशनला असताना भूकंपाची बातमी कळली. मी तेव्हा नववीत असेन. तेव्हा त्या भूकंपाच महत्व कळायचं किंवा त्या भूकंपामुळे झालेल्या जीव-वित्तहानीबद्दल हळहळ करायची अक्कल असायचं वय नव्हतं. मला आणि माझ्याबरोबरच्या कित्येकांना आता कॅम्प जाणार का नाही हाच प्रश्न पडला असेल. जुन्या बॅचच्या मुलांनी त्यांच्या कॅम्पस मध्ये केलेले किस्से सगळ्यांनी ऐकले होते. वर्गातली अमुक मुलगी किंवा मुलगा रात्र झाली की भेटणार आहेत, हे हे सर रात्री दारू पितात वगैरे वगैरे गोष्टींबद्दल आम्ही काथ्याकुट केली होती. शाळेतल्या ओळखीच्या लोकांबरोबर अनोळखी ठिकाणी राहायला जाण्याचा, कॅम्पफायरचा, शाळेतल्या सरांना आणि बाईंना जेवण करताना बघण्याचा, त्यांच्याच बरोबर बसून जेवण्याचा पहिला अनुभव म्हणून २६ जानेवारी नेहमी लक्षात राहिला.

२००४ चा १५ ऑगष्ट...वर्ष नीट आठवतंय कारण त्याच वर्षी १२वी पूर्ण झालं. सगळे लोक स्वातंत्रदिनाची सुट्टी एन्जॉय करत असताना मीसुद्धा स्वातंत्राच्या वाटेवर होतो. याचं दिवशी पुढच्या जवळपास चार वर्षांसाठी अस्मादिक शिरूर नामक गावी दाखल झाले. तेव्हा डोक्यात घराबाहेर पडल्याच्या, आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करण्याच्या कल्पना होत्या. पुढच्या चार वर्षात सगळं सगळं बदललं. त्या दिवशी मात्र या गोष्टीची पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. श्री. विशाल मधुकर शिंदे यांना खाबिया हॉस्टेलवर पहिल्यांदा भेटलो तो याच दिवशी!

११ जुलै..मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले हे सगळ्यांच्या लक्षात आहे. पुणे विद्यापीठातसुद्धा त्याच दिवशी झालेल्या स्फोटांचा फारसा कुणाला पत्ता नव्ह्ता. त्याच दिवशी संध्याकाळी पुणे विद्यापीठाने फार्मसीचे रिझल्ट्स नेटवर डिक्लेअर केले होते. मी तेव्हा वसईत होतो. बाकी सगळे वर्गातले लोक शिरूरमध्ये. सेकंड यीअर हे फार्मसीमधलं काळं वर्षं आहे. आमच्या वर्गातली १३ मुलं नापास झाली. अनेकांना केट्या लागल्या. मलासुद्धा रिझल्टचं भयानक टेन्शन होतं. घरी न सांगताच मी सायबर कॅफेला पळालो होतो. सगळ्यात आधी माझा रिझल्ट बघितला. फर्स्ट क्लासमध्ये नंबर पाहिल्यावर जीवात जीव आला. शिरूरमध्ये पहिला फोन मी कुणाला केला ते आठवत नाही पण रिझल्ट लागलाय आणि मी सायबरमध्ये आहे हे कळल्यावर शिरुरमधून मला फोनवर फोन यायला सुरुवात झाली. ज्यांचे नंबर्स फर्स्ट क्लास, सेकंड क्लासच्या लिस्टमध्ये होते त्यांना आनंदाची बातमी द्यायला काही वाटत नव्हतं पण ज्यांचे नंबर सापडत नव्हते (म्हणजे अर्थातच हे सगळे ...) त्यांना उत्तर द्यायला मात्र जाम वाईट वाटत होतं. घरी आलो तेव्हा आई-बाबा मी कुठे गेलोय याचा विचार करत बसले होते. टीव्ही सुरु होता आणि मुंबई लोकलमधल्या स्फोटाच्या बातम्या सुरु होत्या.

२६ जुलै. पावसाने फायनली एकदाची मुंबई सपशेल बंद पाडली. २५ जुलैपासून धो-धो पाउस कोसळत होता. मी मुंबईहून शिरूरला जायला नेमका हाच दिवस निवडला होता. पावसामुळे हवा थंड होती. मला पुण्याला जायला कुठलीतरी ट्रेन मिळाली होती. बहुदा मुंबईतून पुण्याला आलेली ती त्या दोन दिवसातली शेवटची ट्रेन असावी. लोणावळा स्टेशन जवळपास पाण्याखाली होतं. मला ट्रेनमध्ये झोप लागली. पुण्यात पोहोचलो तेव्हा पाउस होता का ते आठवत नाही..पण आईने कौतुकाने करून दिलेली चिवडा आणि शंकरपाले असलेली पिशवी गायब झाली होती. नंतर आईने कधीतरी फोनवर विचारलं- कसा झाला होता चिवडा?मी काय उत्तर देणार? २६ जुलै आजही आठवला की मला आठवतं ते पाण्यात बुडलेलं लोणावळा स्टेशन आणि आईने दिलेला आणि मी कधीच न खाल्लेला चिवडा!

३० नोवेम्बर..कारण आठवत नाही पण लोकांनी डेक्कन क्वीन पेटवली होती. दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईत फार्मसीच्या एका इवेन्टला जायचं होतं. बहुतेक पुण्यात दंगली झाल्या किंवा तत्सम काहीतरी घडलं होतं खरं!!मुंबई-पुणे बसेस चालू आहेत की नाही ते माहित नाही! पण मला आणि स्नेहाला मुंबईला एकत्र जायची ती पाहिलीच संधी मिळाली होती. आम्ही अट्टाहास करून निघालो. स्वारगेटला चक्क बससुद्धा मिळाली. या घटनेचे संपूर्ण डीटेल्स या ब्लॉगच्या आवाक्याबाहेरचे आहेत पण हो..तुम्ही असलेल्या बसवर दगडफेक झाली तर साधारण मनःस्थिती, वातावरण काय असू शकतं याचा अंदाज त्या दिवशी आला. कर्वे रोड का कुठेतरी आमची बस अचानक रस्त्यात थांबली. "झुको झुको" असा कुणीतरी ओरडलं आणि बसच्या काचा फुटण्याचा आवाज, बायकांचं किंचाळणं, लहान मुलांचं रडणं या सगळ्या प्रकारात घाबरलेलं नसतानासुद्धा स्वतःच्या छातीचे ठोके स्वतःलाच जाणवतात. मला तिथे थांबायचं होतं, तो दगडफेक करणारा हरामखोर कोण ते पहायचं होतं, त्याला लोकांनी धरला आणि हाणला तर हात साफ करायची इच्छासुद्धा होती. पण तसं काहीच झालं नाही. स्नेहाने बाजूच्या कुठल्यातरी बोळात मला ऑलमोस्ट ओढत नेलं. त्या बोळात, संध्याकाळच्या त्या वेळी आम्हाला एक रिक्षासुद्धा मिळाली. पुढच्या दोन मिनिटात आम्ही संपूर्ण सुरक्षित आणि पापभिरू सदाशिव पेठेच्या वाटेला होतो. सदाशिव पेठेसारखा पुण्यातला भुलभुलैय्या असणारा भाग, शनिवार पेठेतल्या मोदी गणपतीपासून नातुबागेत स्नेहाच्या घरी पायी रस्ता शोधात पोहोचणं मी त्या रात्री केलं. नंतरच्या वर्षांमध्ये पुण्यातले रस्ते ओळखीचे झाले. माणसं ओळखीची झाली, पण त्या सगळ्याची लौकिकार्थाने सुरुवात त्या दिवशी झाली.

आज ११-११-११..आज माझ्या दृष्टीने विशेष असं काही घडलं नाही. काल रात्री म्हणजे जवळपास आज पहाटे झोपल्यामुळे मी लौकर उठायची शक्यता नव्हती. दुपारी साडेबाराच्या सुमारास रॉकी उठवायला आला ते 'टेक स्टेशन'चं पाणी गेल्याची बातमी घेऊन!( मी राहतो त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं नाव टेक स्टेशन आणि हो अमेरिकेत पाणी जातं!!). स्विमिंग पूलवर अंघोळ करायला जायचं का विचारायला तो आला होता. गेल्याच आठवड्यात एका लेक्चरमध्ये आमचे एक प्राध्यापक जीन गोर्ड म्हणाले होते- "कतरिना येऊन गेल्यावर मी वीज, फोन, गॅस अशा सगळ्याशिवाय राहायला शिकलो..(कतरिना हे लुझियाना राज्यात काही वर्षापूर्वी झालेल्या वादळाचं नाव आहे..गैरसमज नकोत) पण वाहत्या पाण्याशिवाय राहणं मला नाही शक्य"...काल रात्री कुणाचं तोंड बघून झोपलो असा विचार करत उठलो. रॉकी आणि मी पूलवर आंघोळ करून आलो. नंतरचा दिवस नेहमीसारखाच होता...आत्ता रात्रीचे बारा वाजून गेलेत..अजून पाणी आलेलं नाही..ते कधी येईल ते ठाऊक नाही..पण ११-११-११ ही तारीख लक्षात ठेवायची ठरवलंच तर या पाणी प्रश्नासाठी लक्षात राहील.

उगाचच काहीतरी लिहावं म्हणून हा ब्लॉग लिहिला नाही! हेतू इतकाच आहे की सगळ्यांना ही जाणीव व्हावी की जगासाठी एखाद्या तारखेचे काहीही दिनविशेष असोत..आपल्याकडे काय आहे?याचा विचार करूया! जर का आपले 'पर्सनालाईझड' दिनविशेष असतील तर आठवूयात आणि नसले तर आठवणींमध्ये अशा अजब गोष्टींची मोलाची भर पाडता येईल का ते पाहूया!! 


चैतन्य 

Sunday, August 21, 2011

युगंधर

शिवाजी सावंतांनी लिहिलेलं सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणतं? असं विचारलं तर बरेचसे मराठी वाचक 'मृत्युंजय' असं नाव क्षणात घेतील. पण माझ्या मते त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणजे "युगंधर". भगवान श्रीकृष्णाची जीवनगाथा सांगणारी ही जवळपास १००० पानांची गोष्ट! मी खूप वाचन केलंय वगैरे दावा मला करायचा नाही पण मी वाचलेल्या पुस्तकांपैकी खूप अभ्यास करून लिहिलेली, गुंतवून ठेवणारी, कधी चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा आणणारी तर शेवटी डोळे पाणावायला लावणारी अफाट कादंबरी म्हणून मी नेहमी युगंधराचा उल्लेख करतो. भगवान श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा संपूर्ण वेगळ्या परिमाणांमध्ये आपण वाचतो. पुस्तक खाली ठेवायची इच्छा तर नसतेच पण डोकं, मन कृष्णाने व्यापून टाकलेलं असतं. आजपर्यंत अनेकदा मी हे पुस्तक वाचलं. दरवेळी काहीतरी नवीन शिकलो. आज गोकुळाष्टमी, दहीकाल्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाचे खूप फोटो पाहायला मिळाले आणि मला खूप जास्त भावलेल्या कृष्णाच्या जीवनकालाबद्दल लिहायची इच्छा झाली.
         आपल्यापैकी बरेचजण लहानपणी नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी यांनी साकारलेला श्रीकृष्ण पाहून मोठे झालोय. दुपारच्या वेळी सिरिअल्स पाहणाऱ्या बायकांना "सारथी" मधला राजेश शृंगारपुरे आठवेल. त्यामुळे पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हीच मंडळी होती. पहिली काही पानं वाचल्यावर मनातल्या या प्रतिमा पुसल्या गेल्या होत्या आणि तिथे कधीच न पाहिलेल्या एका अपूर्व व्यक्तिमत्वाचं अनोखं चित्र साकार झालं होतं. मी कालियामर्दन, पुतनावध, कंसवध इथपासून ते अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणाऱ्या सुदर्शनधारी श्रीकृष्णाच्या सगळ्या गोष्टी वाचल्या होत्या. माझ्या डोक्यात कृष्ण म्हणजे एक 'चमत्कार करणारा देव' अशीच कल्पना होती.

         युगंधरातल्या कृष्णाने जन्माला आल्यापासून एकही चमत्कार केला नाही. त्याला नंदाघरी आणल्यावर गर्ग मुनींना बोलवून त्याची पत्रिका मांडली गेली. गोकुळातल्या गोपजनांमध्ये त्याचं थाटामाटात बारसं झालं आणि त्याचं नाव "कृष्ण" ठेवण्यात आलं. पहिल्यांदाच मला कृष्ण शब्दाचा कधीच माहित नसलेला अर्थ कळला- आकर्षून टाकणारा, मोहून टाकणारा! दिसामासी मोठा झाल्यावर बलरामदादा आणि बाकीच्या मित्र-मंडळींबरोबर त्यानेही अनेक गमती-जमती केल्या. अगदी शिंकाळ्यावर हंडीत असणारं लोणी, दही मित्रांबरोबर चोरून खाल्लं. त्याने खोड्या केल्या की आई त्याला ओरडायची, त्याने यमुनेच्या डोहाकडे जाऊ नये म्हणून त्याला वारंवार सांगायची. यमुनेचा डोह कृष्णाला कायम आकर्षित करायचा.आपल्यापैकी कित्येक लोकांना पाणी आवडतं, पोहायला आवडतं. गोष्टीतल्या श्रीकृष्णाला यमुना आवडणं तितक्याच सहजपणे पटून गेलं. यमुनेच्या डोहात एक मोठा साप का नाग राहतो म्हणून गोकुळातले लोक तिथे जायला घाबरायचे.  पण या कृष्णाने डोहात उडी मारून 'कालियामर्दन' वगैरे केलं नाही. नदीच्या बाजूला एक कुरण होतं म्हणे. थंडीत एका दिवशी त्या कुरणातल्या गवतात तो साप दिवसा उन खायला येऊन पडला होता. कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी ते कुरण पेटवून दिलं आणि तो साप जळून मेला. लहानपणी एखाद्या चावऱ्या, बेवारशी कुत्र्याला फटाके वाजवून, काठ्या दाखवून, पळवून लावलं होतंत का कधी? कृष्ण तितक्याच गमतीत त्या सापाचा निकाल लावतो. गावाजवळच्या एका मोठ्ठ्या झाडाचे "भांडीरवृक्षा"चे संदर्भ गोष्टीत अधेमध्ये येतात. त्या झाडाचं महत्व गोकुळात खूप पाउस पडल्यावर अधोरेखित होतं. गोकुळात एकदा खूप पाऊस पडतो, यमुनेला पूर येतो. आपल्याकडे २६ जुलै झालं होतं अगदी तसंच! आणि मग सगळे गावकरी त्या भांडीरवृक्षाच्या आश्रयाला जाऊन राहतात. इतकं मोठं झाड हे निव्वळ साहित्यिक लिबर्टी असली तरी गोवर्धन उचलून चमत्कार करणाऱ्या कृष्णापेक्षा ही लिबर्टी दाद घेऊन जाते.  कृष्णाला गोपदीक्षा दिली जाते तो प्रसंग, त्याचं गाई-गुरांना घेऊन जाणं, बासरी शिकणं, वाजवणं हे सगळं एका छान लाडात वाढत असलेल्या आपल्यासारख्या मुलासारखं वाटत. त्याला काका-काकू, आजी-आजोबा, दादा अशी सगळी माणसं आहेत! आणि या सगळ्यात राधासुद्धा आहे. पण कृष्ण कधीच लंपटपणा करत कुणाचे कपडे पळवत नाही की राधेबरोबर डोळ्यात डोळे घालून बसत नाही! कृष्ण आणि राधा वृन्दावनात रास खेळतात पण त्यात कुठेही त्याच्या "रासलीला" वगैरे लिहिलेल्या नाहीत. राधा इतर अनेक गोप-स्त्रियांसारखी एक बाई आहे. कृष्ण आणि ती एकमेकांच्या समोर असणारे काही खूप मोजके प्रसंग आहेत. राधेच्या नवऱ्याला कृष्णापासून "इनसिक्यूरीटी" वाटत असल्याचा उल्लेखसुद्धा गमतीत येतो. पण या कशालाच अवाजवी महत्व नाही. कृष्ण आणि त्याचे मित्र एक शिवलिंग बनवून त्याची नित्य-नेमाने पूजा करतात. तुम्हालासुद्धा लहानपणी केलेला मातीचा किल्ला, शिवपिंड, कॉलनीत कुठेतरी बांधलेलं देऊळ आठवतंच! त्याचे पोशाख, त्याला आवडणारा दही-भात, त्याच्या गाई, त्याची बासरी आपल्याला गुंगवून टाकतं.
        कृष्ण मोठा झाल्यावर त्याला मथुरेला यायचं बोलावणं येतं. तेव्हा तो गोकुळातून निघताना सगळ्या घरच्या लोकांचं दुःख, त्याला न जाण्याबद्दल सांगणं वाचून डोळ्याच्या कडा पाणावतात. मथुरेत त्याच्या स्वागताला उद्धव हजर असतो. तोच उद्धव जो पुढे अखंड आयुष्य त्याचा "भावविश्वस्त" बनतो. मथुरेत आल्यावर त्याचं झालेलं स्वागत, त्याला सामोरं जायला लागलेल्या मुष्टियुद्धाचा प्रसंग सुरेख रंगतात. कृष्ण आणि बलराम यांचं मुष्टियुद्ध जिंकणं अजिबात खटकत नाही कारण 'केलीनंद' काकाने घोटवून गेलेले कसरतीचे, व्यायामाचे, कुस्तीचे धडे आपण आधीच वाचलेले असतात. मग एक जाणीवेचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसा कृष्णाच्या आयुष्यात येतो आणि तो कंसाला सिंहासनावरून खेचून त्याचा 'वध' करतो. नंतर आई-बाबांना सोडवणं, आजोबांना पुन्हा सिंहासनावर बसवणं वाचलं की लहानपणी आई-वडिलांच्या छळ केलेल्या व्हीलनचा बदल घेण्याची गोष्टी हिंदी सिनेमात कशा रूढ झाल्या असतील याचं उत्तर मिळतं. कृष्ण सांदिपनी ऋषींच्या आश्रमात जातो, वर्गात बसून इतर मुलांसारखा शिकतो.वर्ग सुरु असताना इतर सगळ्यांसारखा शंका, प्रश्न विचारतो. त्याला मित्र आहेत त्यात एक गरीब सुदामा आहे, मोठा भाऊ बरोबर शिकतोय. सगळा अभ्यासक्रम तो इतरांबरोबर पूर्ण करतो. एक दिवस घरी जायची वेळ येते, तेव्हा तोसुद्धा भाव-विवश होतो. सकाळी-सकाळी पोहताना खुडून आणलेली कमळं तो गुरूंना देतो. मित्रांना निरोप देऊन घरी येतो. हा संपूर्ण कालखंड श्रीकृष्ण या व्यक्तिरेखेच्या तोंडून वाचायला खूप मस्त वाटलं. एका आदर्श मित्रासारखा कृष्ण मनात उभा राहिला जो आजतागायत तसाच आहे! 
      पुढे खूप मोठी गोष्ट आहे. कृष्णाच्या अंत्यसंस्कारापर्यंतची! त्याबद्दल लिहायचं तर एक वेगळं पुस्तक लिहावं लागेल. असो! पाहिली-दुसरीत असताना 'छान छान' गोष्टींमधून चमत्कार करणारा श्रीकृष्ण भेटला तरी हरकत नाही पण युगंधरमधला श्रीकृष्ण मोठं झाल्यावर वाचायलाच हवा. मूल्यशिक्षण, व्यक्तीमत्व विकास, कर्मयोग, राजकारण या सगळ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायला युगंधरासारखं समर्पक पुस्तक दुसरं कुठलं नाही असं मला वाटतं! जमलं तर नक्की वाचा. मला खात्री आहे की स्वतः शिवाजी सावंतांना लिहिताना जसे त्याच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पदर उमगत गेले तसे तुम्हालासुद्धा नक्की सापडतील.
||इति श्रीकृष्णार्पणमस्तु||


चैतन्य

Friday, July 29, 2011

...गुल्लू भाई!!!!

            फेसबुकवर नाळेशी बोलताना शिरूरचा विषय निघाला आणि इच्छा नसतानासुद्धा डोळ्यासमोरून तिथे घालवलेली चार वर्षं सरकून गेलीच!! तिथे असताना 'इथून कधी बाहेर पडतोय?' असं प्रत्येकाला होतं आणि आता ते दिवस आठवून खंत व्यक्त करणं हे बहुदा सगळ्याच नोकरीच्या रहाट-गाडग्यात अडकलेल्या लोकांचं होत असावं!असो. शिरूरने आम्हाला किती दिलं, किती शिकवलं याबद्दल निबंध लिहिण्यात मला गम्मत वाटत नाही. एवढंच म्हणेन की तिथे राहून 'फार्मसी'बद्दल फारसा शिकलो असं कधीच वाटलं नाही पण दुनियादारी, अक्कलदाढ, झोल-झाल या सगळ्या सगळ्या प्रकारांचं 'मास्टर्स' लेवलचं शिक्षण तिथे मिळालं. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलपासून गावात फिरणाऱ्या एका वेड्या माणसापर्यंत अनेकविध प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. शिरूर आजही आठवतं ते तिथल्या माणसांमुळे आणि या माणसांशी संबधित घटनांमुळे!
            असाच एक शिरूरला भेटलेला आणि आयुष्यभर लक्षात राहील असा माणूस म्हणजे गुल्लू भाई! गुल्लू-भाईची नम्रताच्या चौकात दाबेलीची गाडी! शेवटची जवळ जवळ दोन वर्षं मी नित्य नेमाने त्याच्याकडे जायचो! येणाऱ्या जाणाऱ्या कित्येक लोकांसारखा मी एक. पण मी त्याच्या का लक्षात राहिलो हे मलाही माहित नाही! गुल्लू भाई मुळचा UP चा. तिथे त्याचे दोन मोठे भाऊ आणि आई-वडील असतात. मोठा भाऊ शाळेत शिक्षक आहे. गुल्लू भाई तेव्हा संध्याकाळची दाबेलीची गाडी चालवायचा आणि सकाळी पावाचा धंदा करायचा. त्याला स्वतःची बेकरी सुरु करायची होती. मी त्याला चांगला श्रोता वाटलो बहुदा म्हणून त्याने मला त्याच्या घरची परिस्थिती, तो धंद्यातून किती कमवतो आणि त्याला या पैशातून बेकरी कशी विकत घेता येईल हे सगळं सगळं सांगितलं त्या काळात! मी बरेचदा खात खात स्नेहाशी फोनवर बोलत असायचो. एक दिवस त्याने विचारलंच- "किस्से बात करते रेहते हो?" मी त्यावर हसून नकारार्थी मान डोलावली. मग तो स्वतःच म्हणाला- "भाभी है?" मी पुन्हा हसून होकारार्थी मान डोलवली. मी कुठल्यातरी मुलीशी गप्पा मारतोय कळल्यावर तर मला त्याने त्याच्याबद्दल अजून पर्सनल गोष्टी सांगायला सुरुवात केली- एक दिवस त्याने विचारलं "भाभी सुंदर है?" आता यावर मी काय उत्तर देणार?? मग थोडसं लाजत म्हणाला- "मै इस साल गाव जाऊंगा तो घरवाले मेरा निकाह करने की सोच रहे है", मी विचारलं- "लडकी देख के रखी है?" त्यावर म्हणाला- "हां, मेरे ही गाव की है, पास ही में रेहती है, उसके घर पे बात करने गयी थी मेरी दीदी!" मी हसत म्हणालो- "क्या बात है गुल्लू भाई, तो अगले साल भाभी को लेके आओगे आप!कैसी है भाभी?" मग त्याने मला ती कशी दिसते त्याचं त्याच्या शब्दात वर्णन केलं. एका UP च्या खेड्यात टिपिकल मुसलमान कुटुंबात वाढलेल्या, महाराष्ट्रात येऊन शिरूरसारख्या ठिकाणी दाबेलीचा धंदा करणाऱ्या एका पंचवीस-तीस वर्षाच्या माणसाचे लग्न, प्रेम, होणारी बायको याबद्दल विचार नेमके काय असतील याबद्दल मला थोडीशी उत्सुकता होती! आणि त्याच्या तोंडून हे सगळं ऐकायला गम्मत पण वाटली. त्याच्या मते त्याच्या घरच्यांनी पाहिलेली मुलगी ही त्यांच्या गावातली सगळ्यात भारी दिसणारी मुलगी होती, त्याला यावर्षी तिच्याशी लग्न करायचं होतं आणि दोन वर्षात शिरूरमध्ये बेकरी काढून सेटल व्हायचं होतं, तिला इथे आणायचं होतं. त्याच्याबरोबर त्याचा बारा-चौदा वर्षांचा एक भाचा इथेच रहाट होता. घरी अभ्यास करत नाही म्हणून त्याच्या आईने त्याला या 'मामू' कडे पाठवलं होतं. गुल्लू भाईची इच्छा होती की त्याच्या भाच्याने गावी परत जावं, अभ्यास करावा. प्रायमरी शाळेत शिक्षक झालेल्या त्याच्या मोठ्या भावाचा त्याला खूप अभिमान होता. मध्यंतरी कधीतरी गुल्लू भाई गावाला गेला. तो गावी असताना इथे त्याचा धंदा सांभाळायला त्याचा गावचा कुणीतरी भाऊ इथे आला. गावी जाताना त्याला गुल्लू भाईने माझ्यासाठी स्पेशल दाबेली, sandwich बनवायची सूचना देऊन ठेवली होती. मला खूप शेवटी शेवटी कळलं की त्याने दाबेलीचा भाव वाढवलेला असूनही माझ्या कडून जास्त पैसे कधीच घेतले नाहीत. मी आग्रह करूनसुद्धा नाही!
           शिरूर सोडायचा आदला दिवस! सगळ्या मित्रांचा निरोप घेणं सुरु होतं. त्या शेवटच्या दिवसात रात्री दारूच्या पार्ट्या व्हायच्या, रडारड व्हायची! जुनी उणी-दुणी निकालात निघत होती. शिरूरमध्ये भेटलेल्या लोकांना, ठिकाणांना अलविदा म्हणणं सुरु होतं! आज शिरूरच्या आठवणी काढून हळहळणारे  करणारे आम्ही सगळेच तेव्हा मात्र परत इथे परत यायचं नाही हे ठरवूनच आवरा-आवरी करत होतो. मी रात्री निघणार होतो, संध्याकाळी अर्धवट "बुंगलेल्या" सुश्याला घेऊन मी गुल्लू भाईला भेटायला गेलो. मी शिरूरमधून निघून जाणारे याची कल्पना त्याला होती आणि मी भेटायला गेल्यावर त्याला ते चटकन लक्षात आलं. "क्या खाओगे?" त्याने विचारलं. त्या वेळी मला अजिबात भूक नव्हती. पण त्याचं मनही मोडवत नव्हतं. मी त्याला एक दाबेली द्यायला सांगितलं. त्याने आम्हाला दोघांना एक एक दाबेली दिली आणि sandwich करायला घेतलं. मी नको नको म्हणत असतानाही त्याने ते आमच्या पुढ्यात ठेवलंच. खाऊन झाल्यावर मी त्याला पैसे देऊ केले आणि अर्थात ते त्याने घेतले नाहीत जे मला अपेक्षित होतं. मी फारसा आग्रहसुद्धा केला नाही. पण खरी गोष्ट नंतर घडली. त्याने खिशातून शंभरची नोट काढून मला दिली. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. "ये किसलीये?" मी भारावून जात विचारलं. तो म्हणाला- " हम लोगो में रिवाज है, जब भी कोई छोटा भाई घर से बाहर निकलता है बडा भाई उसे कुच मदत करता है और आप मेरे छोटे भाई जैसे हो..मना मत करना" आता यावर मी काय उत्तर देणार? माझं आजूबाजूला लक्ष गेलं. बाजूला एक-दोन रिक्षावाले हा प्रकार बघत होते! येणाऱ्या-जाणाऱ्या एक दोघांनी त्याचं बोलणं ऐकलं होतं. एकीकडे माझं 'सोफेस्टीकेटेड' मन त्याच्याकडून पैसे घेणं कबूल करत नव्हतं."दाबेलीवाल्या भैय्याकडून पैसे?" तर दुसरीकडे आधीच सगळ्या मित्रांना निरोप देऊन हळवं झालेलं मन म्हणत होतं- "घे ते पैसे!" मी निमुटपणे पैसे घेतले आणि त्याला म्हटलं-" हम लोगो में भी एक रिवाज है, जब भी बडा कोई कुच देता है तो हम उसके पैर छुते है!" असं म्हणत मी शिरूरच्या त्या चौकात त्याच्या पाया पडलो. मला वर घेत तो म्हणाला- "एक बार गले मिलोगे?" मी काही ना बोलता त्याला मिठी मारली. बरोबर चार वर्षं शिकलेल्या प्रत्येक मित्राला निरोप देताना मनात ज्या भावना होत्या त्यापेक्षा काहीशा वेगळ्या भावना मनात आल्या होत्या! आज जवळजवळ ३ वर्षं उलटून गेलीयत पण त्या शब्दात नाही मांडता येणार! सुश्यानेसुद्धा पुढे होत त्याला मिठी मारली. 'फिर मिलेंगे' म्हणत निघालो. बोलायला काहीच सुचत नव्हतं. 

             नंतरच्या दिडेक वर्षात चार-पाचदा शिरूरला चकरा झाल्या. बहुतेक सगळ्याच कुठल्यातरी कागदपत्रांसाठी! बाकी सगळ्यांशी भेट झाली पण गुल्लू भाई काही भेटला नाही. कधी मी खूप घाईत होतो तर दोनदा तो गावी गेला होता. त्याला माझा इतकाच निरोप आहे की त्याच्यासारख्या लोकांमुळेच शिरूरला कधीतरी जायची माझी इच्छा अजूनही कायम आहे!आणि हो शिरूरला कधीतरी जावच लागेल, मगाशीच सागर म्हणत होता- 'भाईजानला मी ३ चहाचे पैसे द्यायचे आहेत म्हणे!!!"

चैतन्य