Pages

Tuesday, June 12, 2012

त्यांचा दृष्टीकोण

              भारतातली सगळ्यात प्राचीन विद्यापीठे आजच्या बिहार राज्यात आहेत तर सगळ्यात प्राचीन धर्मक्षेत्रे उत्तर प्रदेशमध्ये! पण इतिहासाकडे थोडं कानाडोळा करून जर का वर्तमान पाहिलं तर महान संस्कृती असणारी  ही दोन्ही राज्यं गेल्या तीस चाळीस वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या दृष्टीने डोकेदुखीच ठरलीयत किंबहुना महाराष्ट्रात काही राजकीय पक्ष आज या उप्र आणि बिहार मुद्द्याचा प्रमुख पक्षीय अजेंडा म्हणून सर्रास वापर करताना दिसतायत. खरंच बिहारी किंवा उत्तर प्रदेशी 'भैय्ये' या प्रश्नाकडे कसं पाहतात याचा विचार कुणी करत नाही. आपल्याकडचे राजकीय पक्ष त्यांना 'मारहाण' करायची संधी शोधत असतात तर तिथले नेते आणि या मंडळींच्या संघटना त्यांचं वैचारिक दारिद्र्य चव्हाट्यावर मांडत असतात. मी कोणत्याही प्रादेशिक राजकीय पक्षाचा पुरस्कार करत नसलो तरी मला शिवसेना किंवा मनसेसारखे पक्ष त्यांच्या भूमिकांमध्ये योग्य वाटतात कारण आपल्या संविधानाने भाषावार प्रांतरचना करून त्यांना ती संधी दिलीय त्यामुळे संविधान रचना विचारपूर्वक करायला हवी होती अशी कमेंट या विषयावर मी केली तर कुणाला राग येता कामा नये. तर..मुळ मुद्दा..उत्तर प्रदेशी आणि बिहारी यांचा 'महान राष्ट्री' किंवा मुंबई नगरी येण्याविषयी आणि इथल्या विरोधाला असणाऱ्या दृष्टिकोनाबद्दल! मला गेल्या तीन चार वर्षात दोन बिहारी भेटले. त्यांनी मांडलेले विचार प्रातिनिधिक म्हणून योग्य वाटले म्हणून लाऊड प्रमोशन करायला या पोस्टचा घाट घातला. माझा त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा भाग आठवतोय तसा लिहितोय. 

                 पहिले सद्गृहस्थ भेटले एका पुणे-मुंबई प्रवासात पुण्याहून परत येताना. सहज ओळख होऊन गप्पा सुरु झाल्या. बोलताना मुंबईतले बिहारी आणि युपीच्या भैयांचा विषय निघाला. तो म्हणाला "मला राज ठाकरे योग्य वाटतात..त्यांचा बिहारी आणि युपीच्या लोकांना असणारा विरोधदेखील योग्य आहे. आमच्याकडची माणसं येतात ती एकटी येत नाहीत, बरोबर अख्खा परिवार, अख्खा गाव घेऊन येतात. स्वच्छ राहत नाहीत. त्यांच्याकडे इथली कागदपत्रं नाहीत, रेशन कार्ड नाहीत. मी गेले पंधरा वर्ष विरारमध्ये राहतो आहे. मला एका चांगल्या पॅकेजिंग मटेरियल बनवणाऱ्या कंपनीत नोकरी आहे. माझं रेशन कार्ड इथलं आहे. मी माझ्या गावाहून कुणालाही नोकरी देतो म्हणून माझ्याकडे बोलावून घेतलेलं नाही. माझ्या घरात मी, माझी बायको आणि दोन मुलं असे चौघेच जण राहतो. एका खुराड्यासारख्या खोलीत १०-१२ माणसांमध्ये मी राहिलेलो नाही आणि राहणाऱ्या लोकांना माझा विरोध आहे"
मी म्हटलं की "तुमची स्पष्टं मतं मला आवडली पण मग बिहारमधून येणारे लोक का कमी होत नाहीत?" त्याचं उत्तर आशादायक म्हणायचं की निराशाजनक हे मला अजून समजलं नाहीये. तो म्हणाला- "अर्धा अधिक बिहार नदीला येणाऱ्या पुराने वैतागलेला असतो. उरलेला राजकीय आणि सामाजिक परिस्थितीने खचून गेलाय. सध्या नितीशचं सरकार आहे. पण आधीच्या लालू सरकारने गेल्या काही वर्षात इतकी वाट लावून ठेवलीय की नितीशला निदान १५ वर्षं तरी जातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात..विकास वगैरे तर त्याच्या नंतरच्या गोष्टी झाल्या. गुंडाराज आणि राजकीय दबावात कोण राहील तिथे?" 

            ही घटना जवळपास ३ वर्षांपूर्वीची. मला त्या गृहस्थाचं नाव आठवत नाही. त्याने मला त्याचं कार्डसुद्धा दिलं होतं. मला त्याच्या कंपनीत नोकरी हवी असेल तर मदत करेन हेसुद्धा म्हणाला होता. परदेशी जायच्या धावपळीत त्याचं कार्डही हरवलं आणि त्याचं नाव पण विस्मृतीत गेलं. पण त्याची मतं मला प्रातिनिधिक वाटल्यामुळे मी जेव्हा जेव्हा गप्पांमध्ये हा विषय निघाला तेव्हा कित्येक लोकांपुढे मांडली. 

             गेल्या आठवड्यात भारतात परतल्यावरच्या पहिल्याच रिक्षाप्रवासात रिक्षाचालक अवलिया निघाला. तो पहिल्या बिहारीपेक्षा जास्त सडेतोड आणि मुद्देसूद होता. मी एका रिक्षावाल्याला एका कंपनीत काम करणाऱ्या ऑफिसरच्या तुलनेत उजवं का म्हणतोय ते त्याच्याशी झालेलं संभाषण वाचल्यावर लक्षात येईल. आमच्या गप्पांची सुरुवात मुंबईतल्या रिक्षावाल्यांची सायकॉलॉजीपासून होऊन युपी, बिहारी भैय्यांवर येऊन पोहोचली. अतिशय शुद्ध हिंदीत तो बोलत होता. मला त्याचे संवाद तसेच लिहायला आवडलं असतं पण दुर्दैवाने माझं बम्बैया कम पुणेरी कम अमेरिकेत आंध्रच्या लोकांबरोबर बोलून सवय झालेलं हैद्राबादी हिंदी मिश्रित धेडगुजरी हिंदी काही उपयोगाचं नाही. त्यामुळे तूर्तास मराठीवर भागवतोय-

"तुम्ही कुठले? युपी की बिहार?" मी विचारलं.
"मी बिहारचा"
"बरं..छान...?" हा विषय सुरु व्हायला त्यानेच काढलेला गुजराती मालक आणि त्यांच्या भाषेला प्राधान्य देणाऱ्या पद्धती हा विषय कारणीभूत होता. मी आधी म्हटल्याप्रमाणे मला त्याची बोलायची स्टाइल आवडल्यामुळे मी त्याला बोलता करायला नवीन विषय काढला. "तुम्हाला युपीच्या लोकांबद्दल काय वाटतं हो???म्हणजे वाद नेहमी युपी आणि बिहारच्या लोकांवर असतो म्हणून विचारलं" त्यावर त्याने दिलेलं उत्तर- "सर, महाराष्ट्रात युपीचे भैय्ये आणि बिहारी यांना एकाच काट्यात धरतात. कदाचित ५ वर्षांपूर्वी असं करणं योग्यही होतं पण आता परिस्थिती बदलली आहे. मुंबई किंवा महाराष्ट्राला बिहारमधून येणारा माणूस सरासरी २६% कमी झालाय"
"असं काय बरं झालं बिहारमध्ये? नितीशचं सरकार इतकं चांगलं आहे?"
"सरकार बरं आहे. पूर्वीचं खूप वाईट होतं हे जास्त खरं. बिहारची आजची अवस्था मुंबईसारखी आहे!!"
"ती कशी काय?"
"मुंबई गेल्या काही वर्षात उजळून निघाली. लोकांकडे पैसा आला पण हिशोबाची गणितं बदलली. पूर्वी अपर मिडल क्लासचं इन्कम आज लोवर क्लासचं इन्कम आहे. महिन्याच्या बेरजा-वजाबाक्या सामान्य माणसाला आहेतच की..थोडक्यात काय तर लखलखाट आहे पण कंडीशन तीच. बिहारमध्येही तसंच..लखलखाट आहे आता पण कंडीशन तीच. युपीबद्दल विचाराल तर लखलखाट तर नाहीच..कंडीशन पण तशीच!"
"मग असं असूनही बिहारमधून येणाऱ्या माणसाची सरासरी घटली??"
"सर, पूर्वी एक-दीड हजार मिळायचे तिथे आता ३-४ मिळतात. पण त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात मुंबईत येऊन राहिलेल्या आमच्याकडच्या लोकांचे घटस्फोट वाढले, तब्येतीच्या कुरकुरी वाढल्या. पोटाच्या आणि शरीराच्या गरजा असतात ना...इथे पुरुष घरचं पौष्टिक जेवण खायच्या ऐवजी बाहेर खाणार आणि बाईची लफडी करणार..तिकडे बायका गावात उरल्या सुरल्या पुरुषांकडे आपल्या गरजा भागवायला जाणार. चूक कुणाची म्हणायची?? माझा भाऊ होता मुंबईत..सगळं जाणवलं तेव्हा परत गेला. मी सुद्धा जाईन वर्षभरात.."
"मग या गोष्टी युपिवाल्याना लागू होत नाहीत? ते नाही जात परत...?"
"युपीचं काय घेऊन बसलात साहेब..या गोष्टी तिथेही आहेतच..पण शेवटी पैशांचा प्रश्न आला तर बिहारची स्थिती आशादायक आहे आत्ता..युपीचं काय? आत्तापर्यंत आठ वेळा देशाला पंतप्रधान देणारं राज्य असून त्याची कधी प्रगती झाली नाही तर आता काय खाक होणार?राजीव गांधी आणि व्ही.पी.सिंगच्या काळात सगळ्यात जास्त भैय्ये मुंबईत आले यातच सगळं आलं. काँग्रेसला गेल्या २५ वर्षात कधी सत्ता नाही मिळवता आली. तिथल्या प्रादेशिक पक्षांचे लागेबांधे आहेत आणि काय...जीवाचं रान करतात पण काँग्रेसचं सरकार येऊन देत नाहीत. मायावती स्वतःचे पुतळे बनवून फसली. आता अखिलेशने काही केलं तर पाहू" मला जिथे पोहोचायचं होतं ते ठिकाण आलं होतं आणि म्हणून आमचं संभाषण थांबलं. रिक्षाचा मीटर बंद असता आणि मला खूप वेळ असला असता तर मला त्याच्याशी अजून बोलायला आवडलं असतं. अर्थात इतक्या वेळात मारलेल्या गप्पा अजून काही मिनिटं विचाराधीन ठेवण्यास सक्षम होत्या. 
            दृष्टीकोण!! बिहारींचा दृष्टीकोण! होतं असं की बिहारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भेळवाला, भाजीवाला किंवा अगदीच सोफेस्टीकेटेड विचार करायचा तर लोकसभेत पथेटिक इंग्रजी बोलणारा लालू आठवतो. त्यामुळे त्यांचा काही सेन्सिबल अप्रोच असू शकतो हे कधी कधी चटकन स्वीकारणं होत नाही. असो..पण असे एक-दोन लोक भेटले की आपला दृष्टीकोण थोडा वस्तुनिष्ठ आणि वास्तववादी  होतो हे खरं..!!



चैतन्य 


2 comments:

Panchtarankit said...

एकेकाळी तक्षशीला व नालंदा ह्या जगातील प्राचीन महाविद्यालये असणारा बिहार
पाटलीपुत्राच्या प्रभावाला घाबरून सिकंदर बिहारवर चाल करून गेला नाही.
अश्या महान भूमीची आजच्या काळात खनिजे व नैसर्गिक साधन संपत्ती असून
जी वाताहत झाली आहे ती उघड्या डोळ्याने पाहवत नाही.

Chaitanya Joshi said...

खरंय निनाद..पण ही वाताहत होण्याला राज्यकर्ते आणि अर्थात लोक कारणीभूत आहेत..सांप्रत बिहारची अवस्था सुधारते आहे..सो चित्र आशादायक आहे! :)