Pages

Tuesday, September 4, 2012

लेहानच्या कथांचे शिणेमे

               आपल्याकडे 'हार्डकोर' इंग्लिश नोव्हेल्स वाचणारे लोक तसे कमी आहेत पण त्या मानाने हॉलीवूडचे शिणेमे 'भयंकर' आवडीने पाहणारे असंख्य आहेत..अस्मादिक अशाच लोकांपैकी एक! (हे सांगण्यात मला कोणताही अभिमान किंवा वैषम्यही वाटत नाही). प्रसिद्ध पुस्तकांवरून शिणेमा बनवणं हा प्रकार नवीन नाही. बऱ्याच वेळा 'पुस्तकच भारी आहे रे..मुव्ही ओके' अशा कमेंट्ससुद्धा आपण सर्रास ऐकतो. मराठमोळ्या 'शाळा'पासून 'दा विन्ची कोड' पर्यंत सगळीकडे हाच प्रकार. पुस्तक वाचताना आपल्या मनाचा पडदा असतो आणि वाचणारा त्याला वाटेल तसं कथानकाचं काल्पनिक चित्र मनात उभं करत असतो. लेखकांच्या दृष्टीकोनातून बोलायचं तर प्रदीप दळवींनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं- 'नाटक, सिनेमा या माध्यमांना बरीच बंधनं असतात..सगळ्या कल्पना चित्रित करणं, सादर करणं शक्य नसतं..म्हणून कादंबरी हे माध्यम मला आवडतं..त्यात मनसोक्तपणे हवं ते लिहिता येतं'. निव्वळ याचं कारणाने आपली कल्पना पूर्ण ताकदीने पडद्यावर मांडता यायला तेवढं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर जेम्स कॅमेरोन 'अवतार' बनवायला काही वर्षं थांबला होता. मग पुस्तकांवरून चांगले सिनेमे बनतच नाहीत का? असं मुळीच नाहीये! नाहीतर 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' मालिकेतले ३ आणि 'हॅरी पॉटर' मालिकेतले ८ सिनेमे बनले नसते, त्यांचा उदोउदो झाला नसता! डेनिस लेहान हा 'नवीन जगा'तला प्रसिद्ध 'बेस्टसेलर' लेखकु. त्याची बोस्टन शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली जवळपास डझनभर पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने ती वाचायचा योग कधी आला नाही पण त्याच्या तीन पुस्तकांवरून बनलेले सिनेमे मात्र मी आवडीने पहिले आणि पुस्तकांवरून नक्कीच चांगले सिनेमे बनू शकतात हे जाणवलं. मिस्टिक रिव्हर, गॉन बेबी गॉन आणि शटर आयलंड हे ते तीन सिनेमे. तिन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवलेले! कथावस्तू वेगळ्या! कलाकार वेगळे. मुळात हॉलीवूडचा 'शिणेमा' पाहत असताना त्याचा लेखकू कोणे याचा फार कुणी विचार करतो का हेसुद्धा मला माहित नाही. केलाच तर त्या लेखकुचं एकही पुस्तक न वाचता त्याच्या पुस्तकांवर आणि त्यांच्यावर बनलेल्या 'शिणेमां'वर असा ब्लॉग लिहावा की नाही तेसुद्धा माहित नाही! पण तरी मी लिहितोय. 


'गॉन बेबी गॉन' हे लेहानने पॅट्रिक किंझी आणि  ऍन्जलो जेनेरो या गुप्तहेर द्वयींवर लिहिलेलं चौथं पुस्तक (टोटल अर्धा डझन आहेत). अमेंडा नावाच्या चार वर्षाच्या मुलीचं अपहरण होतं. मुलीची मामी परिस्थितीचं गांभीर्य वाढवून पोलीस तपास करत असतानासुद्धा ही केस पॅट्रिक आणि  ऍन्जलोला देते आणि पोलिसांना या दोघांना सहकार्य करणं भाग पडतं. मुलीची आई 'सिंगल मॉम', ड्रग्स घेणारी, सिगरेट-दारू पिणारी थोडक्यात मुलीबद्दल फारशी आपुलकी नसणारी बाई आहे. मामा आणि मामीने आईच्या गैरहजेरीत अमेंडाची पोटच्या पोरीसारखी काळजी घेतलीय. दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी या केसमध्ये तपास करतायत. पॅट्रिक आणि ऍन्जीने केसवर काम करायला सुरुवात केल्यावर बोस्टनच्या ड्रग सर्कलमधले काही व्यवहार आणि त्यातली अमेंडाच्या आईची गुंतवणूक असे मुद्दे प्रकाशझोतात येतात. वरकरणी अमेंडाचा तपाससुद्धा लागतो परंतु तिला ताब्यात घेण्याच्या वेळी अनपेक्षित घटना घडतात आणि छोट्या अमेंडाला एका कड्यावरून संशयास्पद रीतीने फेकून देण्यात येतं. या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षीला असतात. कड्याखालच्या पाणवठ्यात अमेंडाचा मृतदेह मिळत नाही पण तिला मृत घोषित करतात. लहानग्या मुलीच्या झालेल्या अपहरण आणि मृत्यूमुळे गुंतलेले सगळेच पोलीस अधिकारी, पॅट्रिक, ऍन्जी सगळेच अस्वस्थ होतात. काही काळ जातो आणि अजून एका लहान मुलाचं अपहरण होतं. त्याचाही तपास लागतो. पण तो तरी जिवंत परत येतो का? हे सगळं पहायचं असेल तर शिणेमा पाहायला हवा! मी कथानक फारच ढोबळ लिहिलं आहे, मुख्य चित्रपट (कथा) मी लिहिलंय त्याच्या नंतर येते..पण तो भाग सस्पेन्स ओपन करेल म्हणून लिहिला नाही. गांभीर्याने विचार केला तर व्यक्तिरेखा एककल्ली आहेत असं लक्षात येतं आणि कदाचित म्हणून कथानकाचा शेवट पटला नाही तरी योग्य वाटतो. बेन अफ्लेक मला अभिनेता म्हणून कधीच थोर वाटला नव्हता..पण इथे त्याने दिग्दर्शक म्हणून चांगलं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही!  बाकी अभिनयाचं म्हणायचं तर फ्रीमन आजोबा, एड हॅरीस ही बाप मंडळी आहेत..त्यांचं वेगळं काय कौतुक करणार? एमी रायनला हेलीनच्या (अमेंडाची आई) भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं म्हणून तिचा विशेष उल्लेख! 


'गॉन बेबी गॉन'च्या चारेक वर्ष आधी अजून एक 'लीजंड' क्लिंट इस्टवूड आजोबांनी लेहानच्या एका बेस्टसेलर पुस्तकावर, 'मिस्टिक रिव्हर' वर, त्याच नावाचा शिणेमा बनवला. बऱ्याच ऑस्कर्ससाठी नामांकन मिळालेल्या या चित्रपटासाठी अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता हे दोन पुरस्कार अनुक्रमे शॉन पेन आणि टीम रॉबिन्स यांना मिळाले. गोष्ट तीन मित्रांची! लहानपणी गल्लीत खेळत असताना त्यातल्या एकाला दोन विकृत लोक धरून नेतात आणि त्याचं लैंगिक शोषण करतात. तो तिथून कसाबसा पळून जातो पण त्या घटनेने अर्थातच त्याचं आयुष्य बदलून जातं. गोष्ट २५ वर्षं पुढे जाते. आता त्यातला एकजण पोलीस ऑफिसर आहे, दुसरा काही लहानसहान गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊन जेलची हवा खाऊन आलाय आणि एक दुकान चालवतो. तिसरा (हो..तोच..लहानपणी....) आपल्या बायको आणि एका मुलाबरोबर राहतोय..त्याचा व्यवसाय नीटसा कळला नाही. दुकान चालवणाऱ्या मित्राच्या १९ वर्षाच्या मुलीचा खून होतो. त्याचा तपास पोलीस मित्र करत असतो. खून झालेल्या रात्री तिसरा मित्र रक्तबंबाळ होऊन घरी येतो. बायकोने विचारल्यावर एका पाकीटमाराने हल्ला केला आणि आपणही विरोध म्हणून त्याला मारून आलो म्हणून सांगतो..पण त्याची उत्तरं त्याच्या बायकोला विश्वासार्ह वाटत नाहीत. एव्हाना अंदाज आलाच असेल की गोष्ट पुढे कशी सरकणारे? बट लेम्मी टेल यु ऑल..हे सगळं दिसतं तितकं सोप्पं नाही..असतं तर ते लेहानने लिहिलं नसतं आणि इस्टवूडने  त्याच्यावर शिणेमा बनवला नसता! चित्रपट/कथा अर्थात मर्डर मिस्ट्री आहे पण त्याहीपेक्षा तिघांची भिन्न जीवनशैली, एकमेकांशी इतक्या वर्षांनी बदललेले संबंध, लहानपणी  घडलेली ती घटना आणि याशिवाय इतरही अनेक उप-कथानकं कथेत येतात आणि उत्तरार्धात ती महत्वाची होत जातात. गोष्ट संघर्षाबद्दल आहे..मित्राशी मित्राच्या, बायकोशी नवऱ्याच्या, बाप-लेकीच्या, आणि सगळ्यात महत्वाचं..स्वतःशी स्वतःच्या! लेहानच्या मिस्टिक कथानकाला आपला सलाम बुवा!


शटर आयलंड हा लेहानच्या पुस्तकावरून बनलेला लेटेस्ट (२०१०) सिनेमा. मिस्टिक रिव्हर लिहून झाल्यावर लेहानला जाणवलं की आपण बोस्टनच्या पार्श्वभूमीवर एखादी खून, अपहरण अशी गोष्ट लिहिणार हे बहुतेक वाचकांना अपेक्षित असावं. म्हणून त्याने भिन्न स्थळ, काळ, हॉरर आणि रोमान्स कम्बाईन करणारं 'गॉथिक' जॉनर अशी सगळी भट्टी जमवून शटर आयलंड लिहिल्याचं म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो की 'या कथानकाचं वेगळेपण म्हणजे मी ही संपूर्ण कथा एका रात्रीतच कशी पूर्ण करायची हे लिहायला सुरुवात केल्यावर लगेच ठरवलं होतं जे मी आधी कधीच केलं नव्हतं.' गोष्ट अशी की १९५४ साली टेडी हा यु.एस. मार्शल ऑफिसचा अधिकारी त्याच्या नवीन साथीदारासह, 'चक' सह, बोस्टनजवळ एका बेटावर असणाऱ्या मनोरुग्णालयात येतो. तिथली रेचल नावाची रुग्ण हरवल्यासंदर्भात चालू असणाऱ्या चौकशीसाठी दोघे आलेले असतात. दोघे तिथल्या डॉक्टर कॉलीला भेटतात. त्यांच्याकडून किंवा इतर कुणाकडूनच त्या दोघांना तपासकार्यात कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. वादळ येऊन गेल्याने वातावरण खराब झालेलं असतं म्हणून त्या दोघांना बेट सोडून परतसुद्धा जाता येत नसतं. या दरम्यान टेडीला विचित्र स्वप्नं पडायला लागतात. स्वप्नात त्याला त्याची बायको दिसते जी लेडीस नावाच्या माणसाने लावलेल्या आगीत जाळून मेलीय, ती स्वप्नात त्याला लेडीस त्याच रुग्णालयात असल्याचं सांगते. त्याला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो. अचानक रेचलच्या सापडण्याने वातावरण निवळायच्या ऐवजी अजून गूढ होत जातं. टेडीला रुग्णालयात चालणाऱ्या चित्र-विचित्र प्रयोगांबद्दल समजतं, आपण खरी रेचल आहोत सांगणारी बाई भेटते, चक गायब होतो. या सगळ्यामुळे आपण कुठल्यातरी मोठ्या गुप्त कटाचा बळी ठरतो आहोत हे त्याला जाणवतं. मग खरं काय असतं? ते कळायला हवं तर पुस्तक वाचा किंवा शिणेमा बघा! पुन्हा एकदा मी ढोबळ कथाच सांगितलीय. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीचा लिओनार्डो कॅप्रीओ बरोबरचा अजून एक चित्रपट. बरोबर मार्क रफेलो, सर बेन किंग्सले अशी तगडी स्टारकास्ट..स्वतः लेहान चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक! शिणेमा वाईट असेलच कसा...?? 


तीन चांगले चित्रपट काही न ठरवता थोड्या कालावधीत पाहिले गेले. आवडले म्हणून गुगलिंग केलं तर लेहान हा त्यातला समान धागा सापडला. इथे चित्रपटांचं किंवा पुस्तकांचं समीक्षण करण्याचा माझा हेतू नाहीये पण लेहानचे (त्याच्या पुस्तकांवर बनलेले) सगळे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या कथानकात बोस्टन हा समान धागा सोडला तर विशेष सारखं काही नाही. सारांश म्हणून विचार केला तेव्हा लेहानच्या कथांबद्दल लक्षात आलं ते हे की 'बरेचदा एखादी गोष्ट चूक का बरोबर ते परिस्थिती ठरवते..मग परिस्थिती चूक का बरोबर ते नितीमुल्य ठरवतात..नितीमुल्य चूक का बरोबर ते माणूस ठरवतो..आणि माणूस चूक की बरोबर हे पुन्हा परिस्थिती ठरवते. न संपणारं चक्र आहे! आयुष्यातले शेवट कधीच काळे-पांढरे असे टोकांचे नसतात..त्याला नेहमीच ग्रे (राखाडी) छटा असते हे खरं.' मागे एकदा झालेल्या चर्चेत असा मुद्दा डिस्कस झालेला की कथेतून लेखक दिसला पाहिजे, कथेतल्या पात्रांपेक्षा तो मोठा वाटला पाहिजे! लेहानचे चित्रपट पाहून तरी मी त्यातल्या लेखकाच्या प्रेमात आहे. देव करो आणि त्याची पुस्तकं लौकर वाचायला मिळोत ही अपेक्षा! 


~सारी चित्रे विकीवरून साभार .

3 comments:

Alhad Mahabal said...

अच्छा... शटर आयलंड त्याचा आहे तर... भारीच आवडलेला सिनेमा आहे तो तर... डिकॅप्रियो याच सिनेमा नंतर अभिनेता म्हणून आवडायला लागला!


alhadmahabal.wordpress.com
वर्डप्रेसवाल्यांसाठीही कमेंट्स ओपन ठेवा की!

Chaitanya Joshi said...

@नितीन: धन्यवाद!

Chaitanya Joshi said...

@आल्हाद: शटर आयलंड भारी होताच..पण इतर दोन्ही 'शिणेमे' पण भारीच आहेत! गॉन बेबी गॉन विशेष आवडला मला..:)
आणि --> 'वर्डप्रेसवाल्यांसाठीही कमेंट्स ओपन ठेवा की' ..आत्तापर्यंत लक्षातच आलं नव्हतं माझ्या..सूचनेबद्दल धन्यवाद! योग्य ती पाउलं उचलली आहेत :D
अशीच भेट देत राहा!