Pages

Tuesday, April 8, 2014

नाईटमेअर भाग १

                                                                            ***
जुलै महिन्यातली अमावस्येची रात्र होती. तिन्हीसांजा उलटून कित्येक तास झाले होते. संध्याकाळी कधीतरी पावसाची रिपरिप सुरु झाली आणि अंधार पडल्यावर त्याला चेव आल्यासारखा तो जोरात कोसळायला लागला. एरव्ही अमावस्येला चंद्रप्रकाश नसला तरी चांदण्यांचा प्रकाश असतो- पण मुसळधार पावसामुळे त्या प्रकाशाचासुद्धा फारसा उपयोग नव्हता. आधीच अमावस्या आणि त्यात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे हायवेवरची वाहतूक गेल्या तासाभरात अगदीच कमी झाली होती. अशा अंधारात आडवाटेला कुठेतरी आडोसा घेऊन थांबायचं म्हणजे खरं तर भीती वाटायला हवी- एखाद्या जनावराची….हायवेवर अपघात होऊन गेलेल्या भटक्या अतृप्त मृतात्म्यांची….अज्ञाताची…! पण त्या अक्राळ-विक्राळ वरुणदेवाने या क्षणाला बहुतेक अशा सगळ्यांनाच पळवून लावलेलं होतं. उलट तो अंधार, तो पाऊस यांच्यात एक विचित्र सिक्युरिटी जाणवत होती. ढगांचा कडकडाट सुरूच होता. अचानक वीज कडाडली आणि सगळा परिसर 'उजळून' गेला. त्याने त्या वीजेच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिलं. ती एक सिमेंटचा पत्रा टाकलेली शेड होती. तो उभा होता त्याच्या मागेच एक बाकसुद्धा होता. शेडच्या एका कोपऱ्यात पाण्याचा एक उघडा मोठा हंडा होता- जो एव्हाना दुधडी भरून वाहत होता. अंधारात पुन्हा अंदाज घेत तो त्या बाकावर बसला. पावसाच्या सरींनी शेडमधला बाक भिजवला आहे हे त्याला बसल्यावर कळलं. पाण्याचा थंडपणा मेंदूपर्यंत पोहोचला आणि तो 'भानावर' आला. कुठे आहोत आपण? इथे कसे पोहोचलो?

'आपण तर वाट फुटेल तिथे पळत सुटलो होतो, कुणी आपला पाठलाग केला असेल का? आपण निघून गेल्याचं कुणाच्याच लक्षात आलं असेल? नसेल आलं तरी काही विशेष नाही त्यात- ज्यांना आपली किंमत वाटायला पाहिजे त्यांना वाटत नाही तर मग 'ह्यांना' तरी कशाला वाटायला हवी? काय करावं समजत नाही- जे विसरायचं आहे ते साला प्रयत्न करून विसरता येत नाही…ज्याचं भान असायला हवं ते वास्तव हातातून निसटून गेलंय…काय करायचं अशा वेळी? सगळं संपवून टाकलं असतं पण तिथेसुद्धा नशीब आड आलं-' त्याचं लक्ष मनगटावरच्या पट्टीकडे गेलं. तो पुन्हा हताश झाला. अंगातली शक्ती खूप कमी झाली होती.

पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं दिसत नव्हती. तास-दोन तास उलटून गेले असतील.त्याचा ग्लानी येउन डोळा लागला होता.-

तो आणि सायली सीफेसला बसले होते-सायलीचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. 'आपण कायम असेच एकत्र असू ना रे? तू मला सोडून नाही ना जाणार?' सायलीने त्याला विचारलं. 'सायली, तुला दरवेळी असा प्रश्न का बरं पडतो? तुला खात्री वाटत नाही का माझी? तुला मी इतका बेभरवशाचा वाटतो का?'. 'बरं बाबा, सॉरी पुन्हा नाही विचारणार…आपण सनसेट बघणार होतो ना? ते बघ… तो सुर्य किती भारी दिसतोय?'

त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी लकाकलं. 'आपण खरंच सायलीबरोबर सूर्यास्त बघत नाहीये ना?' …छे छे…आपण तर कुठल्याशा निर्मनुष्य ठिकाणी पावसापासून वाचायला थांबलोय….पुन्हा वीज कडाडली असेल' म्हणून त्याने झोपेच्या ग्लानीतच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो उजेड काही डोळ्यापुढून जात नव्हता- त्याने डोळे किलकिले करत समोर पाहिलं. तो वीजेचा प्रकाश नव्हता- टॉर्चचा होता. कुणीतरी त्याच्याकडे रोखून पाहत उभं होतं. तो ताडकन उठला. उठल्याक्षणी 'अंगाला चिकटलेले' ओलेते कपडे 'सुटले' आणि पुन्हा एक शिरशिरी डोक्यापर्यंत पोहोचली.

"क…क….कोण?"

समोर उभी असणारी व्यक्ती त्याला त्या अंधारात नीट दिसत नव्हती आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याचे मळलेले-चुरगळलेले कपडे, दाढीचे खुंट वाढलेला, अर्धवट भिजून पिंजारलेल्या केसांचा अवतार मात्र समोरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसत असणारे हे त्याला समजलं.

"तुम्ही इथे जवळपास राहणारे आहात का?' समोरच्या व्यक्तीने विचारलं.
"क-क-का? तुम्ही का चौकशी करताय?' त्याच्या घशाला कोरड पडली.
"नाही..इथे जवळपास एखादा पेट्रोलपंप किंवा कुठलं कार रिपेअर दुकान आहे का हे विचारायचं होतं?" समोरच्या माणसाने विचारलं.
"अ….माहित नाही…मी या भागात राहत नाही…पावसापाण्याचा आडोसा घ्यायला थांबलोय…"
"अच्छा…" असं म्हणून तो माणूस तिथेच उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश अजूनही 'त्याच्या' तोंडावर मारलेला होता.
'आपल्याला शोधायला पोलिसांनी यालाच तर पाठवला नसेल ना?' त्याच्या मनात विचार आला. समोरच्या माणसाचा चेहरासुद्धा त्याला स्पष्ट दिसला नव्हता. आता जरा चौकशी करणं जरुरीचं होतं- हा चुकून पोलिस असलाच तर या क्षणाला अंगात ताकद आहे की नाही, पावसाचा जोर कमी आहे की जास्त याचा विचार न करता पळत सुटायचं असं त्याने मनाशी ठरवलं.
"तुम्ही कोण आहात? तुम्हाला कुणी पाठवलं आहे इथे? आणि त्या टॉर्चने आंधळा कराल मला" त्याने मोठ्या आवाजात सुनवलं. समोरच्या माणसाला त्याच्या आवाजातला फरक चटकन जाणवला. त्याने लगबगीने टॉर्चचा झोत स्वतःकडे घेतला.
"ओह…रिअली सॉरी…मी माझ्याच विचारात होतो आणि हा टॉर्च बाजूला करायचा राहिला….आणि हां…तुमची झोपमोड केली म्हणून पण सॉरी बरं का! मला खरंतर या अंधारात, मुसळधार पावसात कुणी भेटेल याचीच खात्री नव्हती- तुम्ही असे इथे झोपलेले बघून कुणीतरी माणूस दिसल्याचा आनंद व्हायच्या आधी मला भीतीच वाटली. जवळपास १० मिनिटं तुमच्या जवळ येउन तुम्हाला उठवावं की नाही हा विचार करण्यात गेलाय"
"ते सगळं ठीके हो…पण तुम्ही आहात कोण? आणि इथे काय करताय?"
"मी हायवेवरून जात असताना माझी गाडी बंद पडली…सो मी रिपेअर शॉप शोधायला या पावसात निघालो…."
"खरंच??काय नाव काय तुमचं? तुमच्याकडे काही आयडेंटीटी कार्ड वगैरे आहे का?"
"अ….आहे ना? दाखवतो की….पण अहो माझी गाडी बंद पडलीय ते बघायला मला मदत कराल का प्लीज?" त्याने तो टॉर्च काखेत धरून मागच्या खिशातून पाकीट काढलं आणि त्यातलं ड्रायविंग लायसन्स दाखवत तो म्हणाला- "मी अनुपम…अनुपम कामत!" त्याने टॉर्च त्या लायसन्सवर मारला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याकडे फिरवला.

अनुपम कामत. अंगावरच्या फॉर्मल कपड्यांवरून कुठल्याश्या कॉर्पोरेट फर्ममधला माणूस वाटत होता- मोठ्या हुद्द्यावरचा! गळ्यात लूज केलेला टाय होता. पावसात कपडे भिजूनही अंगाला कलोनचा वास येत होता. गुळगुळीत दाढी केलेली होती. फक्त चेहरा आणि डोळे थकलेले वाटत होते. दिवसभराच्या दगदगीने असेल किंवा एकूणच कामाच्या रहाटगाडग्याने असेल- तो त्रासलेला, दमलेला वाटत होता!
"पटली ना खात्री तुमची? मी जेन्युइन माणूस आहे आणि मला आत्ता खरच मदत हवीय…कराल प्लीज" अनुपमने विचारलं.
"तुमच्याकडे गाडी आहे ना? मग तुम्ही ही बॅग बरोबर घेऊन का हिंडताय?" त्याने संशयाने त्याच्या हातातल्या बॅगेकडे पाहत विचारलं.
"गाडी बंद पडल्याचं लक्षात आल्यावर मी मदत मिळतेय का ते शोधायला निघालो…पण या भयंकर पावसात मदत मिळायची खात्री नव्हतीच…मग कुठे आडोसा, आसरा मिळाला तर निदान जुजबी सामान असावं बरोबर म्हणून घेतली मी बॅग बरोबर" 
"हे सगळं ठीके हो! पण मी तुमची काय मदत करणार? मलासुद्धा हा भाग नवखा आहे आणि त्यात हा अंधार आणि हा धो-धो पाउस"
"अहो इथून १० मिनिटं चाललात ना माझ्याबरोबर तर आपण गाडीजवळ पोहोचू! मग तुम्ही जरा धक्का वगैरे द्यायला मदत केलीत तर कदाचित गाडी सुरुदेखील होइल...."
"पण या अघोरी पावसाचं काय करायचं? तुम्ही पूर्ण भिजला आहात....आपल्याकडे छत्री नाही! त्यात मला बरं वाटत नाहीये....सकाळपासून मी धड काही खाल्लेलं नाही...आणि तुम्ही माझी मदत मागताय? नाही...नकोच हे सगळं..माफ करा पण मी आपल्याला काहीच मदत करू शकत नाही"
"मला माहितीय की मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं चूक आहे..पण गरजवंताला अक्कल नसते म्हणतात हेच खरं. मी...मी तुम्हांला खायला-प्यायला देतो की! माझ्याकडे बॅगेत आहे थोडंसं...आणि तुम्हांला हवं असेल तर गाडीने सोडेन जवळच्या बसडेपोला…तिथे जाण्यापूर्वी आपण वाटेत अजून खाऊ हवं तर"
"तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला…पण खरंच शक्य होईल असं वाटत नाही! आजच मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलोय. हे पहा…" त्याने हातावरची हॉस्पिटलची पट्टी अनुपमला दाखवली. अनुपमने निराश होऊन नकारार्थी मान डोलावली.
"अरेरे….सॉरी माझ्या लक्षात आलं नव्हतं…" अनुपम अस्वस्थपणे तिथेच उभा राहिला. काही वेळ असाच गेला. 'आपण एवढं निर्धाराने नाही म्हटल्यावर अनुपम लगेच निघून जाईल' ही त्याची अपेक्षा होती पण तसं व्हायची काही चिन्हं दिसेनात!
"हा पाउससुद्धा थांबेल असं वाटत नाहीये…या निर्मनुष्य ठिकाणी, अमावास्येच्या रात्री बहुतेक आपण इथे अडकून पडणारोत" अनुपम मागच्या बाकावर जाउन बसत म्हणाला. त्याने हातातला टॉर्च बंद केला.
"आपण? म्हणजे तुम्हीसुद्धा इथेच थांबताय?" त्याने आवाजातली नाराजी शक्य तितकी लपवत विचारलं.
"अ….हो…मला एकट्याला गाडीला धक्का देणं, ती सुरु करायचा प्रयत्न करणं शक्य नाही…गाडी बंद पडलीय तिथपासून इथपर्यंत येतानाच्या दहा मिनिटांच्या अंतरात मला किर्र काळोख आणि दाट झाडी सोडून काही दिसलेलं नाही. त्यापेक्षा तुमची सोबत तरी असेल इथे! आय मीन तुम्हाला झोपायचं असेल तर झोप बिनधास्त या बाकावर…बरं नाहीये ना तुम्हाला? मी इथे बाजूला थांबेन…"
अनुपम जरा अधिकाराने म्हणाला. ती शेड ना त्याच्या बापाची होती ना अनुपमच्या…तो काय म्हणणार? तो बाकाच्या एका कडेला निमूट बसून राहिला.
अनुपम सांगतोय ते खरंय की त्याला कुणीतरी आपल्या मागावर पाठवलं आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता.
"तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना? काही सिरिअस?" पाचेक मिनिटांनी अनुपमने विचारलं.
"नाही काही विशेष नाही" त्याने तुटकपणे उत्तर दिलं.
"ओह…आपलं नाव माझ्या लक्षात आलं नाही" अनुपमने पुन्हा प्रश्न विचारला.
"कारण मी नाव सांगितलंच नाही" पुन्हा तुटक उत्तर!
"अ…सॉरी…तुम्हाला माझ्या प्रश्न विचारण्याचा खूपच त्रास होतोय का?" अनुपमच्या आवाजातही थोडा ताठरपणा आला.
तो चपापला. "नाही हो…तसं काही नाही"
"मग…तुम्ही मला पार माझं आयडेन्टीटी कार्ड दाखवायला लावलं आणि आता तुम्ही मला तुमचं नावपण सांगायला तयार नाहीये…."
पुन्हा शांतता! तो अनुपमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळून दुसरीकडे बघत राहिला. अनुपमने वैतागून दुसरीकडे पाहायला सुरुवात केलीय का हे बघायला त्याने दोनेक मिनिटांनी अनुपमकडे पाहिलं तर अनुपम त्याच्याकडेच बघत होता.
"श्रीकांत मिश्रा" त्याने फायनली नाव सांगितलं.
"……मिश्रा?…अरे वा…मग मराठी चांगलं बोलता की तुम्ही"
"का मराठी खूप अवघड भाषा आहे का बोलायला? की मिश्रा, शर्मा, यादव अशा आडनावाच्या माणसांनी शुद्ध मराठी बोलायचंच नाही असा नियम आहे?" श्रीकांतने खवचटपणे विचारलं.
"अ…माफ करा…मला असं म्हणायचं नव्हतं! पण एखादा सरदार जर का तमिळ बोलताना दिसला की थोडं कन्फ्युस व्हायला होईल ना….तसं झालं…खुळचटपणा आहे खरा……पण आपली सांस्कृतिक जडणघडणच अशी खुळचट आहे त्याला कोण काय करणार?"
श्रीकांतला हसायला आलं.

"अ….किती वाजलेत सांगू शकाल का?" पहिल्यांदाच श्रीकांतने अनुपमला प्रश्न विचारला.
"बारा दहा" अनुपमने हातातला टॉर्च सुरु करून त्याचा झोत मनगटावरच्या घड्याळावर मारत उत्तर दिलं.
श्रीकांत निराश होत उठला. शेडच्या कडेला उभं राहून डोकं वर बघत बाहेर काढून तो 'पाउस' पिण्याचा प्रयत्न करायला लागला. आधी अनुपमचं लक्ष नव्हतं. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने श्रीकांतला हाक मारली.
"अहो मिश्रा भैय्या, तुम्हाला पाणी हवं असेल तर आहे माझ्याकडे! तुम्हाला ताप आहे म्हणालात ना…तिकडे कडेला उभे राहून भिजू नका" श्रीकांतने वैतागून त्याच्याकडे पाहिलं.
"काय हो, मिश्रा म्हटलं की पुढे भैय्या म्हटलंच पाहिजे का? त्यापेक्षा श्रीकांत म्हणा मला…श्रीकांत भैय्या म्हणू नका फक्त…श्रीकांत साहेब, श्रीकांत राव….नुसतं श्रीकांत म्हणा हवं तर"
"सॉरी श्रीकांत सर…हे पाणी घ्या…" अनुपमने श्रीकांतला पाण्याची बाटली दिली.
 
"तुम्ही काय या शेडमध्ये राहायच्या तयारीत आला होतात की काय?" पाणी पिउन झाल्यावर श्रीकांतने विचारलं-
"असं का विचारताय?"
"नाही म्हणजे…अशा भर पावसात गाडी चालू करायला मदत शोधायला निघालात…बरोबर ती बॅग आणि बॅगेत 'पाण्याची' बॉटल?"
"छे छे… बॅगेत खरंतर 'ही' बाटली होती…दुकानदाराने त्याच्याबरोबर पाण्याची बॉटल फ्री दिली म्हणून राहिली चुकून" अनुपमने व्हिस्कीची बाटली हातात धरून त्याच्यावर टॉर्चचा झोत मारला. 
"ओके….आता तुमच्याकडे ही एवढी 'बॅग' का आहे हा प्रश्न मला पुन्हा नाही पडणार" श्रीकांत मंद हसत म्हणाला.

अनुपमने घड्याळ पाहिलं. एक वाजला होता. विजा कडाडणं बंद झालं असलं तरी पावसाचा जोर अजून तसाच होता. श्रीकांत बाकाच्या दुसऱ्या कडेला बसून पेंगत होता. अनुपमने कितीही आव आणला तरी त्याला श्रीकांतच्या अवताराची थोडी भीती वाटली होती. दाढीचे खुंट, पिंजारलेले केस, मळकट कपडे, मनगटावरची मलमपट्टी…कोण आहे हा माणूस? हा इथे कसा? हे जे सगळं घडतंय ते खरं आहे की मी स्वप्न पाहतोय? हा श्रीकांत जिवंत माणूस आहे ना? की हा माणूस नसून-
अचानक वीज कडाडली आणि अनुपम दचकला. त्याने श्रीकांतकडे पाहिलं तर त्याला त्या आवाजाने आणि प्रकाशाने काहीच फरक पडला नव्हता. तो मान खांद्यावर टाकून झोपला होता.

मनावरचा ताण घालवायचं रामबाण औषध अनुपमच्या बॅगेत होतं. त्याने एकदाची व्हिस्कीची बाटली बाहेर काढली. थोडीशी व्हिस्की एका प्लास्टिकच्या छोट्या कपात ओतली आणि एका घोटात कप रिकामा केला. व्हिस्की त्याचा घसा आणि अन्ननलिका जाळत पोटापर्यंत पोहोचली.…मेंदूला झिणझिण्या आल्या आणि सबंध शरीर थरारलं. कडवट तोंडाने त्याने पुन्हा थोडी व्हिस्की कपात ओतली. पुन्हा एका दमात घोट घेण्यासाठी कप तोंडापाशी नेला. पहिल्या घोटामुळे झालेली घशाची जळजळ अजून कमी झाली नव्हती. तो जागचा उठला. शेडच्या कडेला येउन त्याने व्हिस्कीचा कप पावसात धरला.


"अनु, तुला कळत नाहीये की तुला समजून घ्यायचं नाहीये? मला ठाऊके की तू तुझ्या त्या छछोर मित्रांबरोबर जाऊन सिगारेटी ओढतोस….काही दिवसांनी दारू पिशील…पुढे अजून काय दिवे लावणारेस कुणास ठाऊक? हे सगळं बघायला मी नसलो म्हणजे झालं" बाबा वैतागून बोलला होता. आपण नाहीच ऐकलं त्याचं! तसाच त्रागा करत गेला. त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही…कसा शिवणार? माझ्यात जीव अडकला होता ना त्याचा! 

पाण्याने व्हिस्कीचा कप पूर्ण भरला तेव्हा अनुपम भानावर आला. 'छ्या…खूप जास्त पाणी झालं' त्याने मनाशी म्हटलं. त्याने मागे वळून पाहिलं तर-

क्रमशः

4 comments:

gajanan chavan said...

khup chan...
waiting for part 2

Chaitanya Joshi said...

@Gajanan Chavan:
Sorry for the late reply!Thanks!

Have just posted the next part. Hope you'd like it! :) :)

Unknown said...

chan

Chaitanya Joshi said...

@Hanumant Jadhavrao:
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!