Pages

Friday, September 28, 2012

जस्ट लाईक दॅट ११

नोंद: कथा म्हटली की ती ३-४, गेला बाजार १० भागात संपावी अशी अपेक्षा असते साधारण. इतकीच नोंद करू इच्छितो की जस्ट लाईक दॅट 'चार दिवस सासूचे'सारखी (मारुतीच्या शेपटासारखी लिहिणार होतो पण दुर्दैवाने 'चार दिवस..' जास्त योग्य वाटलं) पाणी ओतून मी लांबवत नाहीये. लोक वाचतायत याची मला कल्पना आहे आणि म्हणून त्याचा दर्जा (?) आणि फ्लो शेवटपर्यंत कायम राहील असा प्रयत्न करून योग्य ठिकाणी मी ती थांबवेन. आत्तापर्यंत कथा फॉलो करणाऱ्या सगळ्यांचे आभार! गोष्ट आवडत असेल तर प्रतिक्रिया जरूर द्या..धन्यवाद्स :)  

आत्तापर्यंत:


"तुला अजूनही हे खरं वाटतं की रमा आणि आदित्य इंडियापासून एकमेकांना अजिबात ओळखत नव्हते?" राजने गॅस* भरून रिसीट कलेक्ट करत विचारलं.
"ते असं म्हणतात..म्हणजे मान्य केलं पाहिजे..आणि त्यात तो पुण्याचा...ती मुंबईची...सो असेल..." जीत
"आज दिवसभर बघितलंस त्यांना?? त्या जपानी वेट्रेसनेसुद्धा कपल असल्यासारखी त्यांना ऑर्डर एकत्र विचारली..त्यांची दोन महिन्यांचीच ओळख आहे हे मला खरंच नाही वाटत..म्हणजे हे असलं आपल्या बाबतीत का नाही होत?" राजने असूयेने प्रश्न विचारला.
"हां...हा प्रश्न मला पण पडतो कधीकधी...असो..ते बघ आले दोघे...या मेघा आणि दर्शु किती वेळ लावणार काय माहित?" जीत गाडीचं दार उघडत म्हणाला.
"ही तुमच्या दोघांची कॉफी...राज गाडी चालवतो आहे...त्यामुळे तो जागा राहायला हवा...आणि तू त्याचा नेव्हीगेटर..सो तुला पण कॉफी..." आदित्य त्यांच्या हातात कॉफीचे कप देत म्हणाला. 
"अजून किती वेळ लागेल पोहोचायला?" रमाने विचारलं. 
"अजून दोन-अडीच तास...तुम्ही झोपून घ्या शांत...पोहोचलो की कळेलच" 
"हं..पण भारी झाली राव ट्रीप...म्हणजे गणपती दर्शन ओके होतं...त्यात काही फार गम्मत नाही आली...गणपतीच्या मखराशी गेलं ना की असा फुलं, पानं, अत्तर, अष्टगंध, कापूर असा सगळ्याचा जो एक वास येतो ना तेव्हा कळतं की गणपती बसवला आहे...इथे काय...जेमतेम दोन चार फुलं वाहिलेला, हळद-कुंकू लावलेला, डॉलरच्या नोटांमध्ये बुडलेला गणपती...पण नवीन शहर बघायला मिळालं...सकाळी आयतं इंडियन जेवण आणि रात्रीचं थाई फूड..मजा आली.."  
"आदित्य...हाच प्रॉब्लेम असतो...म्हणजे गणपती म्हटलं की तो आपल्याला आपण भारतात बघतो तसा हवा...का बरं? तर आपलीच कल्पना...जर का लहानपणापासून इथे पाहिलास तसाच गणपती पाहिला असतास तर भारतात गणपतीवरच्या ढीगभर फुलांना 'शॅबी' म्हणाला असतास!ही तुलना करणंच चूक आहे" राज रमाकडे बघत म्हणाला. तिचं अजिबात लक्ष नव्हतं. 
"चुकतोयस राज..मी तसं मुळीच म्हणणार नाही...मान्य आहे की जुन्याला सोनं म्हणून कवटाळून बसुच नये...पण म्हणून जे बुद्धीला, संस्कारांना पटत नाही त्याला ते नवीन आहे, पुरोगामी आहे म्हणून कौतुकसुद्धा करू नये...त्याच काये की आपण विशिष्ट पद्धतीमध्ये, माणसांमध्ये वाढतो...काळाच्या ओघात नवीन पद्धती समजतात, नवीन माणसं भेटतात...मग आपण कळत-नकळत जुन्या-नव्याची तुलना करायला लागतो...जस्ट लाईक दॅट! माणसाचा मुलभूत गुणधर्म आहे तो...ते त्याच्या चौकसपणाचं लक्षण आहे..." 
"वा..सॉलिड वाक्य आहेत बरं का!! कुठे ऐकतोस कुठे तू हे असलं?" 
"ते महत्वाचं नाहीये..." 
"आदित्य, ही तुलना वस्तूंच्या बाबतीत ठीके पण माणसांच्या बाबतीत करू नये असं मला वाटतं.." जीतने कॉफीची सिप घेत म्हटलं. 
"खरंय तू म्हणतोयस ते...अजून तरी तुलना करायची वेळ आलेली नाही...आली की बघून घेऊ" आदित्य हसत म्हणाला. तेवढ्यात मेघा आणि दर्शना आल्या. 
"तुमचं आटपलं आहे ना सगळं...?? आता घरी पोहोचेपर्यंत गाडी कुठेही थांबवणार नाहीये मी.." राज गाडीत बसत म्हणाला.  
"मेघा, तुम्हाला चिप्स, च्युविंग गम, पाणी, कॉफी असं काहीही घ्यायचं असेल तरीसुद्धा इथेच घ्या...जरा डिसेंट गॅस स्टेशन वाटतंय.."  
"घेतलंय सगळं..निघूया आता..." 
"गणपती बाप्पा..." राज मोठ्या आवाजात म्हणाला. 
"मोरया.." सगळे एकसुरात म्हणाले आणि गाडी परतीच्या वाटेला लागली.


"तू रॉजर्सने दिलेली असाईनमेंट कम्प्लीट केलीस का??" आदित्यने सकाळी विचारलं.
"हो..लास्ट वीक पूर्ण झालेली..ट्रीपला जाण्यापूर्वी मी काहीही काम पेंडिंग ठेवलं नव्हतं..तुझी नाही झाली का?"
"नाही गं..मी ट्रीप झाल्यावर पूर्ण करायचा प्लान केलेला...पण काल आपण खूप लेट आलो..पण ठीके..मी तुझी असाईनमेंट रिफर करू शकतो..." आदित्य हसत म्हणाला.
"आणि मी तुला ती देईन असं तुला का वाटलं?" रमाने शांतपणे विचारलं.
"कारण तू माझी मैत्रीण आहेस...मैत्रीमध्ये हेल्प करणं आलं नाही का?"
"मला नाही वाटत?"
"काय नाही वाटत? मैत्री असणं? हेल्प करणं?"
"तुला असाईनमेंट रिफर करायला देणं मला हेल्प नाही वाटत"
"म्हणजे?"
"आदि..तुला इतकं नाही कळत का? आपल्याला कोर्सची ग्रेड या रिपोर्टवर डिपेंड आहे..मी बऱ्यापैकी वेळ घालवून रिपोर्ट लिहिला..तुला मी डायरेक्ट कॉपी करायला तो का द्यावा?" रमा वैतागली.
"शांत हो...इतकं काही झालेलं नाही...पाहिली गोष्ट मी तुझ्याकडे असाईनमेंट रिफर करायला मागितली. कॉपी करायला नाही...तुला इतकाच फरक पडत असेल तर ठीके..मी मेघाला विचारतो..तिच्याकडे लास्ट यीअरच्या नोट्स असतील..त्यात सापडेल मे बी..."
"पण तू स्वतः का लिहित नाहीयेस?" रमा अजूनही चिडलेली होती.
"रमा, तुला मदत करायची नाहीये ना...मग मी मेघाला विचारल्यावर तुला काय प्रॉब्लेम आहे?" आदित्यसुद्धा वैतागला.
"मला तुझ्या डिपेंडन्स चा राग येतो..."
"डिपेंडन्स?रमा काहीही बोलतेयस...हे बघ, माझी मुळीच इच्छा नाही की मला मिळालेले मार्क्स दुसऱ्याच्या मेहनतीने मिळालेले असावेत...ते माझे असतील याची काळजी मी घेईन..मला फक्त एक सुरुवात म्हणून कुणीतरी मदत करायला हवीय..तेसुद्धा मी मूर्खपणा करून वेळेवर काम सुरु केलं नाही म्हणून...आणि माझा तो मूर्खपणा मी मान्य करतोय.."
"आदि..तू कधीकधी स्वतःच्या नेगेटिव्ह गोष्टी कौतुकाने सांगतोस तेव्हा तुला काय म्हणावं तेच मला कळत नाही..." रमा निर्विकारपणे म्हणाली.
"रमा, हा विषय पुरे...तुला उशीर होतोय...दुपारी सबमिशन आहे...तोपर्यंत मी लिहितो काहीतरी...आणि मी मेघाला न विचारता मला जमेल तेवढंच लिहीन...ओके...??" तिच्या उत्तराची वाट न बघता तो त्याच्या खोलीत निघून गेला. ती काही वेळ तिथेच बसून राहिली.

संध्याकाळी आदित्य राज आणि जीतकडे गेला. गप्पा मारताना रॉजर्सच्या असाईनमेंटवरून झालेला वाद आदिने जीतला सांगितला. 
"सो तुझं आणि रमाचं भांडण झालंय.." जितने उसासा टाकत म्हटलं. इतका वेळ त्याच्या खोलीत झोपलेला राज बाहेर आला.
"भांडण...क्या बात है...फायनली...वाजलं आहे तर..." तो टाळ्या वाजवत म्हणाला.
"तुला मस्करी सुचतेय?"
"मस्करी नाहीरे...उलट सिरीअसली..तुम्ही आता नवरा-बायको व्हायला परफेक्ट आहात...म्हणजे तुमचं भांडण झालंय आणि काल अख्ख्या ट्रीपमध्ये आम्हाला जाणवलं पण नाही...उलट तू चिकन न खाता तिच्याबरोबर काहीतरी वेज भाजी शेअर केलीस...गाडीत काही न बोलता पण बाजू-बाजूला बसून राहिलात...कमाल आहे राव..."
"ओ पंडित...पहिली गोष्ट आमचं काही भांडण झालं नाहीये...थोडा वाद झालाय...दुसरी गोष्ट..तो आज सकाळी झालाय..तुम्ही अर्धवट झोपेतून उठुन या..मग काहीतरी अर्धवट ऐका आणि काहीतरी बोला...म्हणून म्हणतो..वेळेवर झोपावं!"
"वा..साहेब..काल दिवसभर गाडी कुणी चालवली?? हा हरामखोरपण झोपून गेलेला....मी शेवटचे २० मैल झोपेत पोहोचवलं आहे तुम्हाला...त्यात आज त्या चिंकी प्रोफेसरचा क्लास सकाळ सकाळ..."
"सॉरी साहेब..चूक झाली.."
"ठीके रे..ते जाऊ दे...तुझं का भांडण झालंय?" राजने उत्सुकतेने विचारलं. आदिने त्याला सगळं थोडक्यात सांगितलं.
"...मला राग आलेला की एका असाईनमेंटला मदत करायला इतके आढेवेढे...बरं एवढं सगळं होऊन त्या सबमिशनला डेडलाईन एक आठवडा एक्स्टेंड केली त्या रॉजर्सने..." 
"तो लास्ट पार्ट आवडला मला....चहा घेणारेस?" राज हसत जागचा उठत म्हणाला.
"आत्ता चहा? नको...तू घे..तुझा दिवस सुरु झालाय" 
"सौ बात की एक बात आदित्य...लाईफ पार्टनर, रूम पार्टनर कधीही आपल्या प्रोफेशनमधला निवडू नये...म्हणजे हे असाईनमेंट निमित्त झालं रे...पण इन जनरल...असं गृहीत धर की तुझी कामाच्या ठिकाणी तुझ्या रूम पार्टनरशी किंवा गल्फ्रेंडशी तुलना होतेय..आपल्या पुरुषी अहंकाराला ते नाही सहन होत..घोळ असा असतो की आपली इमोशनल बांधिलकी प्रोफेशनल बांधिलकीपेक्षा जास्त महत्वाची आहे हेसुद्धा कळत असतं...पण प्रोफेशनल फ्रंटवर इभ्रतीचा प्रश्न असतो...त्यामुळे तोसुद्धा टाळता येत नाही..."
"जीत..तू हे असलं काहीतरी बोलत असतोस...हे अनुभव आहेत की माझे असतात तसे इनफॉर्मड ओपिनियन्स?"  
"या बाबतीत तरी अनुभव...." राज किचनमधून डोकावत म्हणाला. आदित्यने प्रश्नार्थक चेहऱ्याने जीतकडे पाहिलं.
"प्रांजली मोहिते...माझ्याबरोबर होती..एकाच वेळी जॉईन झालो..एकत्र काम केलं दोन वर्ष..मग एका प्रमोशनसाठी दोघेही एलिजिबल होतो..ते तिला मिळालं..ऑन-साईट जॉब म्हणून ती युकेला दोन वर्षासाठी गेली..मी ती आणि प्रमोशन दोन्ही गेल्याच्या निराशेत जॉब सोडला..वर्षभराने इकडे आलो. म्हणजे आमचं काही अफेअर वगैरे नव्हतं...एकत्र काम करत होतो, एकमेकांशी पटतं होतं, एकमेकांची कंपनी आवडत होती एवढंच...पण आदित्य, ते प्रमोशन मला मिळालं असतं तरी मीसुद्धा तिचा विचार न करता गेलो असतो...तिचं कदाचित लग्न झालं असतं एव्हाना..आता वाटतं की बरं झालं तिला जायला मिळालं...नाहीतर मी इथे कधीच आलो नसतो...पण त्या क्षणापुरता का होईना..माझा पुरुषी अहंकार आड आला हे खरं!" आदित्यने ऐकून सुस्कारा सोडला. तो हसला.
"ही गोष्ट इतकी कॉमेडी होती की तू हसतो आहेस?" 
"कॉमेडी नाही रे...भारतात एक समज आहे..अमेरिकेला दर वर्षी लाखांच्या संख्येने येणारे लोक फक्त पैसा कमवायला येतात...पैसा हे कारण महत्वाच नसतं अशातला भाग नाही पण तरी जर का नीट आजूबाजूला पाहिलं की जाणवतं की पैसा केवळ निमित्त होतं...डिप डाऊन काहीतरी वेगळीच कारणं सापडतील.." तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
"नवरा वेळेवर घरी आला नाही की बायको त्रास द्यायला लागते..." राज किचनमधून ओरडला.
"ए गप रे..." त्याने फोन उचलला. "बोल"
"घरी येतोयस ना?"
"आलो थोड्या वेळात..काही अर्जंट काम आहे का?"
"नाही जनरल..संध्याकाळी जेवायला काय करायचं विचार करत होते आणि मी चहा पण घेतला नाहीये संध्याकाळी...आत्ता करणार होते...तू घेणारेस?"
"चहा? अ..ठीके...जास्त नको..एकदम थोडा...आलो पाच मिनिटात" त्याने फोन ठेवला.
"आम्ही चहा म्हणून गोमुत्र प्राशन करत नाही..." राजने टोमणा मारलाच. आदित्यने नकारार्थी मान डोलवत जीतकडे पाहिलं. जितने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या.
"इमोशनल बांधिलकी प्रोफेशनल बांधिलकीपेक्षा जास्त महत्वाची असते असं कुणीतरी म्हणून ठेवलंय" तो हसत म्हणाला.
"जाता जाता हे ऐकून जा...तुझ्या या सगळ्या इनफॉर्मड ओपिनियन्सना आम्ही परचुरीझम्स असं नाव ठेवलंय...फक्त परचुरीझम्स कुठे पब्लिश नाही करता येणार कारण कॉपीराईटचे लई घोळ होतील"
"ही कॉम्प्लिमेंट समजतो मी...बाय" आदित्य तिथून बाहेर पडला.

तो घरी आला. दोघांनी समोरासमोर बसून चहा प्यायला. पहिलं कुणी बोलायचं हा प्रश्न होता. कारण आदित्यच्या दृष्टीने त्याचं आणि रमाच्या दृष्टीने तिचं काही चुकलंच नव्हतं. बोलायला सुरुवात करणाऱ्याची चूक त्याला उमगलेली असते म्हणून तो बोलायला येतो हा अशा भांडणांच्या वेळी सर्वसाधारण समज असतो. मग आदित्यला आठवलं की मगाशी रमाने त्याला फोन केलाय. तिने ऑलरेडी बोलायला सुरुवात केलीय. म्हणजे आता जर का तो बोलला तर चालणारे!
"जेवायला करायचंय ना?" 
"हं..काय करायचं तेच विचारायला फोन केलेला मी..."
"कालच आपण लई भारी जेवलोय..आज काहीतरी सिम्पलच करू..मला काम पण आहे रात्री बरंच...हेवी जेवलो तर झोप येईल.."
"ओके" जेवण होईपर्यंत दोघे नॉर्मल झाले होते. दुसऱ्या दिवशीचे प्लान्स एकमेकांशी डिस्कस करून दोघे झोपायला गेले तेव्हा सकाळी त्यांचं भांडण झालं होतं हा इतिहास झाला होता.

"तू विचारलं नाहीस मला..मी आजतरी रॉजर्सची असाईनमेंट नीट पूर्ण केलीय का?" आदित्यने क्लासला जाताना विचारलं.
"मला विचारणं महत्वाचं नाही वाटलं..मी असं अझ्युम केलं की आठवडाभराने तरी तू ती पूर्ण केली असशील..." रमाने उत्तर दिलं.
"वेल, मी ती लास्ट वीक पूर्ण करून सबमिट पण केलेली...रॉजर्सने मला ऑलरेडी 'ए' ग्रेडपण दिलीय..."
"मी याच्यावर काय प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे?" रमाने चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवायचा प्रयत्न करत विचारलं. 
"कन्फ्युस आणि अनप्रिपेअर्ड असणं हे माझं काम आहे नाही का?"
"खरंय...पण तू बदलतो आहेस...फॉर गुड..मला तुझी मैत्रीण आणि रूम पार्टनर म्हणून या गोष्टीचं कौतुक आहे"
"नुसतं कौतुक करू नको...काहीतरी चांगलं खायला करून घाल..."
"बरं...तसंही या विकेंडला आपण काहीतरी गोड करूच..."
"का काही विशेष आहे का??"
"हं.."
"काये? तुझा वाढदिवस वगैरे आहे का?"
"सांगेन नंतर..तुला कळेलच तसंही"
"तारीख काये या विकेंडला?
"६ ऑक्टोबरला शनिवार आहे"
आदित्य ऐकून एकदम गप्प झाला. ६ ऑक्टोबर! अमृताचा वाढदिवस..तिला फोन करायचा का? ती फोन उचलेल का? काय बोलायचं तिच्याशी? त्याने बाजूला चालणाऱ्या रमाकडे पाहिलं. हिचाही वाढदिवस ६ ऑक्टोबरला असतो की काय? त्याने आठवायचा प्रयत्न केला. तो तिच्याशी कधी या विषयावर बोललाच नव्हता. 'रमाचाही वाढदिवस शनिवारीच असेल तर? आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट प्लान केल्याप्रमाणे घडते खरी...पण बहुतेक प्लानचा चांगला पार्ट संपलाय...आणि वाईट पार्ट सुरु झालाय' त्याने स्वतःशीच विचार करत खांदे झटकले आणि रमाच्या पाठोपाठ क्लासमध्ये शिरला.


क्रमशः 

*गॅस: अमरिकेत पेट्रोलला गॅस म्हणतात. 

5 comments:

bendre said...

अजय आजगावकर पुन्हा एकदा कल्ला !

nik said...

कथा लाम्बली तरी चालेल पण पुर्न करा.
कथा छान जमतीये.

Maithili said...

मजा येतेय वाचायला... Carry on :-)

Unknown said...

Chalu dya....mast chalu aahe..
Khar tar aadhich comment karayala hawi hoti...
Keep it up!!!

Chaitanya Joshi said...

@All: Thanks a ton!!