Pages

Saturday, August 11, 2012

जस्ट लाईक दॅट ७


आत्तापर्यंत:

जवळपास महिना उलटून गेला. आदित्य आणि रमाचा घरात आणि कॉलेजमध्ये बऱ्यापैकी जम बसला होता. शिक्षणात आणि एकूणच आयुष्यात असणारी फ्लेक्झीबिलीटी रमाला खूप आवडली होती. अमेरिकेत पाउल टाकण्यापूर्वी रमाचं विषय कुठले घ्यायचे इथपासून ते कुठल्या प्रोफेसरकडे काम करायचं सगळं नक्की होतं आणि आदित्यबरोबर राहणं ही एकमेव प्लान न करता केलेली गोष्ट सोडून ती सगळं ठरवल्याप्रमाणे करतसुद्धा होती. आदित्यचा नेमका उलटा प्रॉब्लेम झाला होता. त्याने आजपर्यंत कुठलेही निर्णय स्वतःचे स्वतः न घेतल्याने त्याला सेमेस्टरला विषय निवडण्यापासून फोन घेईपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी जीत-राज-रमा आणि बाकी सगळ्यांवर विसंबून राहावं लागत होतं.   
"आदित्य, तू त्या डॉक्टर मरेला भेटणार होतास ना?" रमाने सकाळी चहा घेताना विचारलं.
"हो..मी मेल केली आहे..येईल त्यांचा रिप्लाय..मग बघू"
"मग बघू काय? तुला त्यांचं काम आवडलं म्हणालास ना? मग पुढच्या रोटेशनला त्यांच्याकडे काम कर" 
"तसं मला डेव्हिसनचं कामसुद्धा आवडलं आहे.."
"मग त्यांना भेट..आणि ठरव लौकर"
"रमा, मला असं पटकन नाही जमत...खरंतर हा पटकनवाला प्रश्न नाहीये..मला जनरलच डिसीजनस नाही घेता येत.."
"यात कौतुकाने सांगण्यासारखं काही नाहीये..."
"कौतुक नाही करते मी.." आदित्य थोडसं चिडून म्हणाला. रमा गप्प बसली.
"तू चिडलीस का?" तिने काहीच उत्तर दिलं नाही.
"रमा, सॉरी..पण-"
"पण काय आदित्य?? हे बघ, मला अर्थार्थी तुला काही बोलायचा अधिकार नाही..आपण एक घर शेअर करतो..सो म्हणून मी तुला सहज प्रश्न विचारला..तुला नाही जमत डिसिजन घ्यायला..ओके...मी त्यात बदल नाही करू शकत.."
"बदल नको करू..पण मला मदत कर ना..तुला काय वाटतं? मरे की डेव्हिसन?"
"काम मला करायचं आहे की तुला?हे बघ, यु आर अ पी.एचडी स्टुडंट..बिहेव लाईक वन...तुला तुझे निर्णय घेता आले पाहिजेत..त्या निर्णयाच्या परिणामाची जबाबदारी घेता आली पाहिजे..." एवढं बोलून ती उठुन गेली. आदित्यला अमृताशी झालेली शेवटची भेट आठवायला लागली.  
"दुपारी बाहेरच खाऊ काहीतरी..मी फोन करते तुला..ठरव कुठे खायचं ते" रमा घरातून बाहेर पडताना म्हणाली. तो तसाच बसून राहिला होता.
"अ..चालेल..तूच ठरव कुठे जायचं ते..किंवा दुपारी ठरवू तेव्हाचं तेव्हा" तो फोनशी चाळा करत म्हणाला.
"आदित्य..यु आर इम्पोसिबल" ती थोडीशी चिडूनच बाहेर पडली.
'आता ही का चिडली?' तो विचार करायला लागला.

वेटर प्लेट्स उचलायला आला. त्याने टेबलवरच्या दोघांकडे नजर टाकली. दोघांचही एकमेकांकडे लक्ष नव्हतं. तो बील ठेवून निघून गेला. 
"तू इतका उतावीळ का झाला आहेस?" तिने पर्स उचलत विचारलं. तो टीप म्हणून सुट्टे पैसे टाकत तिच्या मागे बाहेर आला.
"रमा मी गेली ३ वर्षं वाटच बघतोय..आणि आता तू अमेरिकेला निघाली आहेस..आणि आत्ताही तुला मी उतावीळ झालोय असंच का वाटतंय?"
"श्री, मी रिलेशनमध्ये पडणं ही गोष्ट कधीही कंसीडर केली नव्हती आणि आता तू मला एकदम विचारल्यावर मी काय उत्तर देऊ?"
"एकदम? रमा..आपण एकमेकांना जवळपास गेली ६ वर्षं ओळखतो...तू माझ्या घरी येऊन गेली आहेस..मी तुझ्या घरी नेहमी येतो..माझे आई-वडील तुला त्यांची होणारी सून म्हणून गृहीत धरतात..कॉलेजमध्ये सगळ्यांना असंच वाटतं की पीजी झालं की आपण लग्न करू...माझं मास्टर्स संपेल सहा महिन्यात..मग मुंबईत चांगला जॉब मिळाला की तुला लग्नाचं विचारायचं ठरवलं होतं मी..पण तू हा अमेरिका विषय काढलास म्हणून मला आज अचानक तुला लग्नाचं विचारावं लागलं"
"मला मान्य आहे की तू हे सगळं गृहीत धरलंस त्यात माझी चूक आहे..मला कल्पना असताना मी तुला अडवलं नाही..पण आता नाबर सर मागे लागले आहेत..यु.एसला अप्लाय कर म्हणून..श्री..मला ही संधी मिळते का ते पहायचं आहे...मी अमेरिकेला जाऊ शकले नाही तर अर्थात मला माझं प्लानिंग बदलावं लागेल आणि तेव्हा मी नक्की लग्न, अफेअर या गोष्टींचा विचार करेन.."
"अच्छा..म्हणजे तुझ्या तूर्तास असणाऱ्या अंदाजपत्रकात माझा नंबर नाही?" श्रीने चिडून विचारलं.
"मला माहित होतं..की तू हे वाक्य बोलणार श्री...पण हेच विधान तुझ्या 'अंदाजपत्रकाला' लागू होत नाही का? तू पीजी होणार, मग तू मुंबईत नोकरी मिळवणार आणि मग तुला माझ्याशी लग्न करायचंय..श्री, तुझ्या या प्लानिंगमध्ये तरी मी कुठेय? तुला हे सगळं करायचं आहे...आणि तू माझा विचार केलास असं विधान करू नकोस..मी करीअरीस्टिक मुलगी आहे याची तुला कल्पना आहे"
"अच्छा, म्हणजे जे चुकलंय ते माझंच चुकलंय..."
"असं नाही म्हटलं मी..पण श्री, आपण आपलं नातं सोशियली डिफाईन केलंसुद्धा नाही आणि एकमेकांना गृहीत धरायला सुरुवात केली..आपण दोघेही चुकतोय बहुतेक..."
"मग सध्या तुझा प्लान काय?"
"आत्ता वर्षभरात एम.एस्सी संपवणं..मग यु.एसला चार वर्ष पी.एचडी..मग नोकरी आणि मग लग्न वगैरे.."
"बरं..म्हणजे जवळपास ६-७ वर्षांचं प्लानिंग तयार आहे"
"हो..मला शक्य असतं ना..तर मी २० वर्षांचं प्लानिंग करून ठेवलं असतं..." रमा घड्याळ बघत म्हणाली.
"दोन गोष्टी लक्षात ठेव रमा- पहिली गोष्ट मला अनुभवाने शिकवली आणि दुसरी इतिहासाने!" त्याने पॉझ घेतला. ती आपल्याकडे बघते आहे याची खात्री झाल्यावर तो पुन्हा बोलायला लागला.  
"पहिली गोष्ट- फार लांबचं प्लानिंग करू नये..कारण ते आपण आपल्या दृष्टीकोनातून करतो..आपले दृष्टीकोण बदलतात..आजूबाजूची माणसं, परिस्थिती सगळंच बदलतं आणि मग नकळत प्लानिंग बदलतं..."
"टोमणा कळला मला..इतिहासाने तुला काय शिकवलं?" तिनेसुद्धा टोमणा मारायच्या स्वरात विचारलं.
"दूरदृष्टीने रचलेले सामाजिक कल्याणाचे मनसुबे पूर्ण होतात..पण 'वैयक्तिक' कल्याणाचे होत नाहीत.." 
"लक्षात ठेवेन मी!"

दुपारी आदित्य भेटला. ती सकाळी त्याच्यावर चिडून बाहेर पडली होती. एकीकडे तिला गृहीत न धरता आयुष्याचे प्लान करणारा श्री आणि दुसरीकडे 'खायला कुठे जायचं' हेसुद्धा ठरवायला तयार नसणारा आदित्य. आदित्य सकाळी ती गेल्यापासून मनातल्या मनात तिची आणि अमृताची तुलना करत होता. तसं तर तो हे रमाला भेटल्या दिवसापासून करत होता म्हणा पण सकाळच्या संभाषणानंतर जरा जास्तच..'आजकाल सगळ्या मुली सारख्याच असतात बहुतेक..निर्णय घ्या..जबाबदाऱ्या घ्या..असं थोडीच असतं? माझ्या घरात कित्येक निर्णय आई घेते..बाबांचे कपडे आणण्यापासून ते बटाट्याची रस्साभाजी करायची की सुक्की भाजी करायची ते ठरवेपर्यंत सगळे..वरून म्हणतेसुद्धा..'तुझे बाबा सरकारी नोकर..त्यांना कुणीतरी दुसऱ्याने सांगितल्यावर कामं करायची सवय आहे'.. बाबांनी कधी आक्षेप घेतल्याचं आठवत नाही..पण आता बघितलं तर अमृता..रमा..त्यांना निर्णय घेणारी मुलं पाहिजेत..अवघड आहे!'
"हाय.." 
"हाय..तू काही बोलायच्या आत सांगतो की मी मरेला भेटून आलो..तो मला त्याच्याकडे काम करायला देणार आहे! आपण कुठे जायचं ते मी ठरवलं आहे..तिथे मी काय खाणारे ते पण मी आत्ताच ठरवलं आहे..नाहीतर तिथे गेल्यावर मी मेनू पाहत बसलो तर तू संतापशील...तू काय खायचं ते मात्र मी ठरवलेलं नाही...मी तुला सजेस्ट करू शकतो...पण तुझ्यावर मी काही लादत नाहीये..कारण ते माझ्या स्वभावातच नाही..आणि तसं लादण्याचा मला अर्थार्थी अधिकारपण नाही" 
"हो..हो..ठीके...सॉरी..मी थोडी चिडचीड केली..पण आदित्य..तुम्ही मुलं खूप टोकाची असता..सकाळी तू कुठलाच निर्णय घ्यायला तयार नव्हतास..आणि आत्ता तू सगळं ठरवलं आहेस..आर यु शुअर?"
"रमा, मी शांत विचार केला..मला जाणवलं की आयुष्यातले बरेचसे प्रश्न ओब्जेक्टीव टाईप असतात...तुमच्याकडे उत्तर निवडायला बरोबर वाटणारे एकापेक्षा जास्त पर्याय असतात आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा..तोच पर्याय का निवडला याची स्पष्टीकरणं द्यायला लागली की गडबड होते...उत्तर बरोबर असेल तर कुणी स्पष्टीकरण वाचतही नाही पण चुकलं तर हमखास वाचतात.."
"वा..कोणतं पुस्तक?" रमाने हसत विचारलं.
"छे..छे..हे पुस्तकातलं नाही..हे सेल्फ क्वोटेड आहे" त्याने उत्तर दिलं.
"बरं..आदित्य आत्ता जेवायला जायचं ठीके..पण मरे की डेव्हिसन हा निर्णय खरंच नीट विचार करून घे"
"तुम्ही मुली अशा का असता?? म्हणजे निर्णय नाही घेत म्हणून आरडा-ओरडा आणि आता घेतला तर नीट विचार कर..आय जस्ट डोंट गेट इट..मला स्वतःला काही ठरवायची सवय नाहीये तेच बरं आहे..निदान असं तरी होत नाही.."
"तुम्ही मुली?असा किती मुलींचा अनुभव आहे तुला?" आयुष्यात पहिल्यांदा तिची इतर मुलींशी समान पातळीवर तुलना झाली होती. जेव्हा ते व्हायला हवं होतं तेव्हा ती कायम गर्दीतून उठुन दिसायची आणि आदित्यने इतर मुलींशी तिची तुलना केल्यावर तिला अजिबात आवडलं नव्हतं. 
"हा प्रश्न मी तुला विचारू शकतो..तू पण 'तुम्ही मुलं' असं म्हणालीस मगाशी बोलताना..पण आपण हा विषय बोलायचा नाही म्हणून हा प्रश्न मी टाळला.तसंच तुही टाळावा असं मला वाटतं.."
"माझा प्रश्न फ्रेस करताना चुकलंय...माझा आक्षेप तू माझी तुलना इतर मुलींशी केल्याबद्दल होता..तू माझी कुणाशी तुलना केलीस हे मला अजिबात विचारायचं नाहीये.."
"बरं...सॉरी अबाउट इट" बोलून आदित्य पुढे चालायला लागला.
तिच्या डोक्यात खरंतर काहीच नव्हतं पण आदित्यने उल्लेख केल्यावर तिला मनोमन उत्सुकता वाटायला लागली.
'आदित्यला पास्ट आहे? विचारावं का त्याला? तो एक वेळ सांगेल..मग मलाही सांगायला लागेल..मग तो श्रीची बाजू घेईल..नकोच..हा विषय टाळलेला बरा..' तिने विचार झटकला.

वाटेत राज आणि मनीषा भेटले.
"अरे..काय दोघे कुठे भटकताय?"
"लंचला जातोय..तुम्ही येताय?" आदित्यने विचारलं.
"कुठे?"
"बर्गर खायला.." आदित्यने उत्तर दिलं.
"अगं, आम्ही पिझ्झा खायला जातोय..तुम्ही जॉईन होता का?" मनीषाने रमाला विचारलं. तिने आदित्यकडे पाहिलं. तो खाली बघत जागच्या जागी बूट आपटत रमा प्रतिक्रिया द्यायची वाट बघत होता. तिला पिझ्झा आवडतो हे त्याला माहित होतं. रमाने चांगलाच पॉझ घेतला. राजला वातावरणातला तणाव जाणवला.
"अरे जाऊ देत..तुम्ही जा बर्गर खायला...आपण जाऊ परत कधीतरी.." तो खाली पाहणाऱ्या आदित्यकडे पाहत म्हणाला. आदित्यने वर पाहिलं. रमाला थोडं हायसं वाटलं.
"अरे नाहीरे..तुमची हरकत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर..हिला पिझ्झा आवडतो.." तो हसत म्हणाला.
"ओके..मग चला..." मनीषा रमाला पुढे घेऊन चालायला लागली. रमाने हळूच मागे वळून आदित्यकडे बघितलं. दोघांची नजरानजर झाली. त्याने हलकं हसत मान डोलावली.  
रमा स्वतःशीच हसत पुढे चालायला लागली.

क्रमशः

भाग ८ इथे वाचा

2 comments:

SUMIT KHADILKAR said...

"दूरदृष्टीने रचलेले सामाजिक कल्याणाचे मनसुबे पूर्ण होतात..पण 'वैयक्तिक' कल्याणाचे होत नाहीत.." आवडलं!!!

Chaitanya Joshi said...

@Sumit:
धन्स!! :)