Pages

Sunday, April 7, 2013

खिडक्या, यंत्रमानव, सफरचंद आणि काळबेरं!

दहा-एक वर्षांपूर्वी बिल्डींगमध्ये कुणी नवीन टीव्ही, मशीन, फ्रीझ असं काही घेतलं की त्याची चर्चा सुरु व्हायची! 'पहिल्या मजल्यावरच्या शिंदेंकडे आलेल्या नव्या टीव्हीला १०० चॅनेल्स आहेत' किंवा 'बाजूच्या नाडकर्णीनीपण आपल्यासारखंच सिंगल टब ऑटोमॅटिक मशीन घेतलंय' हे साधारण गप्पांचे विषय! (या सगळ्या वाक्यांमध्ये कौतुकाचा भाग कमी आणि असूया किंवा अपेक्षा जास्त हे आलंच!) मग 'काळ बदलतो' का काय म्हणतात ते झालं आणि फ्रीझ, मशीन अशा गृहोपयोगी वस्तू एकूणच कॉमन आणि अशा चर्चांसाठी दुय्यम झाल्या..असूया, अपेक्षा तशाच होत्या पण गप्पांचे विषय, वस्तू मात्र चंगळवादी झाले. 'मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघणं', 'परफ्युम्स आणि गॉगल्स' किंवा 'मोबाइल फोन्स' हे मिरवायचे, खिजवायचे विषय झाले. यापैकी मोबाईल फोनचा उल्लेख चंगळवादी वस्तूंमध्ये करायचा की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो पण मोबाईल फोन हा लोकांच्या चर्चेचा, लाईफस्टाईलचा अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन' बरं का!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.

'खिडक्या,यंत्रमानव….' असं वरकरणी अर्थहीन वाटणारं शीर्षक वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा विषय लक्षात आलाच असेल. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं का!) त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे! खिडक्या अर्थात 'विंडोस' फोन, यंत्रमानव म्हणजे ऍन्ड्रोइड फोन्स, सफरचंद म्हणजे ऍपलचा iफोन (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं) आणि काळबेरं हा मी ब्लॅकबेरी फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती: माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त व्हायचा. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं (इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा iगवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण iफोन प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला हवा! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला हवा" असं विधान iफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा पहिल्यांदा iफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त अमेरिकेला आलो आणि स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात नमस्कार केला. 

सर्वप्रथम काळबेरं फोन आणि खिडक्या फोन याविषयी- आकडे काहीही सांगोत, मी तरी यंत्रमानव आणि सफरचंद फोन्सच्या तुलनेत बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांनी हे दोन प्रकारचे फोन वापरणारे लोक पाहिले आहेत! काळ्याबेऱ्या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे कॉम्प्युटरला असतो तसा अख्खा 'की-बोर्ड' या फोन्सला असायचा! या 'की-बोर्ड' च्या बटनांच्या रचनेमुळेच त्या फळाचं नाव या फोनला दिलं गेलं. २०१० च्या शेवटाकडे आयफोनने बाजारपेठ व्यापून टाकण्यापूर्वी हे फोन्स अनेक सरकारी, कॉर्पोरेट जगात ऑफिशिअली वापरले जायचे. 'काळ्याबेऱ्या संवाद'प्रकारची जबर हवा होती. या फोनच्या वेडाची तुलना अमली पदार्थांच्या व्यसनाशी केली गेली. हे फोन घेऊन फिरणारे लोक 'श्या…तुझ्याकडे बीबी मेसेजिंग नाहीये?' वगैरे विचारायचे! पण काळाच्या ओघात (म्हणजे अवघ्या वर्ष-दीड वर्षात) ह्या फोनची बाजारपेठ कमी झाली. आता हे फोन घेऊन फिरणाऱ्या लोकांना 'श्या…तुझ्याकडे अजून बीबीच आहे?' असं ऐकून घ्यावं लागतं! नवीन आलेल्या काही काळ्याबेऱ्या फोन्सना पारंपारिक 'की-बोर्ड नाही'…आता याला व्यावसायिक स्पर्धेत स्वतःची ओळख विसरणं म्हणायचं की स्पर्धेत टिकण्यासाठी बदलणं म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! खिडक्या फोन या प्रकाराविषयी मला तशी बरीच कमी माहिती आहे! या प्रकारचे फोन्स गेली कित्येक वर्ष अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत पण आधुनिक म्हणता येतील असे खिडक्या फोन गेल्या दोन-तीन वर्षातले! गेल्या सहा महिन्यात आपली लाडकी कंपनी 'नोकिया' ने खिडक्या सिस्टम असलेले काही चांगले फोन बाजारात आणलेत आणि निव्वळ सफरचंद किंवा यंत्रमानव फोन घ्यायचा नाही म्हणून मी लोकांना हे नोकियाचे फोन विकत घेताना बघतोय!निव्वळ तांत्रिक बाबींबाबत बोलायचं तर खिडक्यावाले फोन्स तोडीस तोड नसले तरी बऱ्यापैकी आधुनिक आहेत! सफरचंद आणि यंत्रमानव फोन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक नव्या 'फिचर'ला सिमिलर 'फिचर' या फोन्समध्ये आहे. पण या इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात या फोन्सनी आघाडी घेणं सध्यातरी अवघडच दिसतंय!    

'स्मार्टफोन' ही किती मोठी बाजारपेठ होऊ शकते हे सर्वप्रथम सिद्ध करणारी कंपनी अर्थात सफरचंद! iफोनने २००७ मध्ये रिलीज झाल्यापासून विक्रीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले. 'टचस्क्रीन' अर्थात बोटाच्या स्पर्शाने वापरायचा फोन! स्टायलस वापरायचे फोन्स नवीन असताना टचस्क्रीनने लोकांना अचंबित व्हायला लावलं (मी गेल्या काही महिन्यात अनेक टचस्क्रीन फोन पहिले पण जो सहजपणा 'सफरचंदाच्या स्पर्शात' आहे तो कुठल्याच फोनमध्ये नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो). बँकिंगपासून सोशियल नेट्वर्किंगपर्यंत सगळं या फोनने लोकांच्या अक्षरशः हाताशी आणून ठेवलं. अन्न, वस्त्र, निवारासारखी फोनला गरज बनवण्याचं श्रेय माझ्यामते iफोनलाच! iफोनचे खंदे समर्थक आहेत तसे विरोधकसुद्धा आहेत. गमतीचा भाग असा की या विरोधकांपैकी अर्ध्या लोकांनी तो कधी वापरलेलासुद्धा नाही. iफोनची किंवा सफरचंद कंपनीची मिळेल तेव्हा टीका करणारे लोक मला माहितीयत आणि त्यांच्या अतिशहाणपणाची मला गम्मत वाटते. माझ्या मते iफोन हा जगातला सगळ्यात सोप्पा फोन आहे. iफोनमध्ये किती फीचर्स कमी आहेत आणि वापरायला किती कटकट आहे वगैरे iफोन न वापरणारे अधिकाराने बोलले की मला 'गेल्या अनेक वर्षात घराबाहेर न पडलेल्या माणसाने वाढत्या ट्राफिकबद्दल चर्चा केल्यासारखं वाटतं!' आजघडीला 'एलेगन्स,क्लास, सिम्पलीसिटी' हे तिन्ही शब्द जर कुठल्या एका फोन प्रकाराला लागू होत असतील तर तो म्हणजे सफरचंद फोन! हेसुद्धा नमूद करायला हवं की विरोधक करतायत ती सगळीच टीका निरर्थक नाहीये. गेल्या ६ वर्षात सहा नवीन iफोन मॉडेल्स बाजारात आली पण त्यांच्या एकूण बाह्यरूपात आणि अंतर्रुपात काहीच मोठे फरक पडलेले नाहीत! या फोनमार्फत केलेल्या कित्येक गोष्टींवर कंपनीचं नियंत्रण आहे. फोन वापरण्यात काही बंधनं आहेत. पण असं सगळं असतानासुद्धा एकूणच बाजारात सफरचंदी फोन्स लोकप्रिय आहेत हे खरं! 


सफरचंदी फोनची इतकी स्तुती केल्यावर मी अर्थात सफरचंदी फोन वापरत असेन याचा तुम्ही अंदाज बांधला असेलच. पण तुमचा अंदाज चुकलाय…मी सफरचंदी नाही तर यंत्रमानव फोन वपरतो. गेल्या दहा वर्षात आयटी क्षेत्राशी संबंधित बहुतेक धंद्यांच्या यशात 'गुगल' नावाच्या अचाट कंपनीचा खूप मोठा वाटा आहे! त्यामुळे स्मार्टफोन्स क्षेत्राशी गुगल संलग्न नसलं असतं तर नवल होतं. यंत्रमानव फोन तंत्रज्ञान बनवणारी कंपनी गुगलने ८ वर्षांपूर्वी विकत घेतली आणि जवळपास ५ वर्षांपूर्वी 'एचटीसी'नावाच्या कंपनीमार्फत या फोन्सनी पदार्पण केलं. गेल्या पाच वर्षांत या फोन्सनी मागे वळून पाहिलेलंच नाही! यंत्रमानव तंत्रज्ञान असलेले फोन्स आज अनेक महत्वाच्या कंपन्या बनवून बाजारात आणतायत! यात सगळ्यात आघाडीवर आहे 'सॅमसंग'! सॅमसंग कंपनीचा फोन घ्यायला लोक कधीकधी तयार नसतात कारण दर दोन महिन्यात जास्त आधुनिक नवा फोन बाजारात येतो आणि 'आपण अत्याधुनिक किंवा लेटेस्ट फोन घेतला' या आपल्या 'अभिमाना'ला (वाचा: 'गर्व/माज') तडा जातो. गुगलचे जीमेल, गुगल प्लस, गुगल टॉक, युट्युब असे अनेक प्रोडक्टस वापरताना मिळणारी फ्लेक्सिबिलीटी हे फोन्स वापरताना मिळते. वेळ आल्यास फोन कोणत्याही कॉम्प्युटरला जोडून आपल्याला डेटा ट्रान्स्फर करता येतो. आयफोनच्या तोडीस तोड किंवा कांकणभर सरस तंत्रज्ञान या फोन्समध्ये दिसतंय! सॅमसंग आणि सफरचंद कंपन्यांमध्ये या स्मार्टफोन प्रकाराशी संबंधित 'एकाधिकारा'वर (पेटंट) चाललेला खटला प्रसिद्ध आहे. त्यात सफरचंदाने बाजी मारून अनेक कोटी डॉलर्स नुकसान भरपाई म्हणून वसूल केलं. मात्र या प्रकाराने सॅमसंग जणू पेटून उठलं आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काही 'जबर' (दुसरा शब्दच नाही) फोन बाजारात आणले आहेत. आयफोनने प्रस्थापित केलेली मक्तेदारी मोडून काढण्याची अपेक्षा फक्त यंत्रमानव फोनकडून होतेय यातच सगळं आलं.
 
'घरात कुत्री असून त्याच्याबद्दल न बोलणारा मालक किंवा मालकीण मला अजून भेटायचा आहे' हे जसं पुलंनी म्हटलंय तसंच स्मार्टफोन असून त्याचं अजिबात कौतुक न करणारा किंवा करणारी व्यक्ती मला भेटायची आहे. याला मीसुद्धा अपवाद नाही. माझ्या सॅमसंग एस थ्रीचं मी उठसूट कौतुक करत असतो आणि कुणाला नवीन फोन घ्यायचा असेल तर 'एस थ्रीच घे' असे फुकटचे सल्लेपण देत असतो. पण अलीकडे अत्यावश्यक झालेला फोनचा वापर काही बेसिक प्रश्न उपस्थित करतो- फोनला जीवनशैलीचा भाग मानलं तर तुमचा फोन तुमच्याविषयी काय सांगतो? तुम्हाला तुमचा कमी फीचर्स असलेला जुना फोन परत वापरावा लागला तर तुमची तयारी असेल का? आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्टफोन लोकांची बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता खालावायला कारण ठरतो आहे का? या प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर मग स्मार्टफोनला चांगलं म्हणायचं का वाईट? (कुणी मराठी शाळेत शिक्षक असाल तर पुढच्या चाचणी परीक्षेत निबंधाला हा एक विषय जरूर ठेवा 'मोबाइल फोन: शाप की वरदान?'). पहिल्या प्रश्नाला कोणतंही तर्कशुद्ध उत्तर नाही! फोनकडे बघून माणसाच्या व्यक्तीमत्वाविषयी तर्क करणं म्हणजे 'कुणी कुठले कपडे घातलेत याच्यावरुन तो सिगरेट ओढतो का नाही?' या असंबद्ध प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं आहे! नवीन फोन वापरायला सुरुवात केली आणि अचानक कुणाकडेतरी आपला जुना फोन दिसला की आपल्याला हसायला येतं. आपण एकेकाळी हा 'फडतूस' फोन वापरायचो हे फिलिंग आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा फोन बदलेल्या लोकांना नक्की येउन गेलं असणारे. पण अशा वेळी दोन क्षण थांबून विचार करायला हरकत नाही. नवीन फोन घेऊन एक अचिव्हमेंट पूर्ण केल्याचा आनंद साजरा करायला आणि वेळ आलीच तर जुना फोन परत वापरायला लागेल याबाबतीत मनाची तयारी करायला हे दोन क्षण पुरेसे आहेत! शेवटचा प्रश्न- खालावती बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता. या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने 'हो' असं आहे. स्मार्टफोन प्रकाराचा मी कितीही चाहता, पंखा असलो तरी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी फोनच्या वापरावर वयाची आणि आय.क्यू. यांची किमान मर्यादा ठेवण्याची सोय करावी असं माझं वैयक्तिक मत आहे! "सहा-सात वर्षांच्या आमच्या मुलाला आय-फोन हवा म्हणून तो हट्ट करतोय आणि त्याला आयफोन थ्री दिला तर त्याला तो नकोय, आयफोन फोरच हवाय" हे कौतुकाने सांगणारी अमेरिकन बाई मला भेटली तेव्हा 'लटकनेसे हाईट नाही बढेगी,मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाये' सारखं मला तिला 'स्मार्टफोन इस्तेमाल करनेसे अकल नही बढेगी, अपने बच्चे को बेकार आदते ना लगाये' असं म्हणावसं वाटलं. स्मार्टफोनचा वापर जेवढा चांगल्या गोष्टींसाठी होतो तेवढाच वाईट गोष्टींसाठी होतोय. स्मार्टफोन आणि सोशियल नेटवर्किंग यांच्या कॉम्बीनेशनमुळे 'इंट्रोवर्ट' हा शब्द इंग्रजी डिक्शनरीतून आणि 'अंतर्मुख' हा शब्द मराठी शब्दकोशातून काढून टाकायला हरकत नाही. जगाला आरडाओरडा करून काय सांगायचं? काय दाखवायचं? याच्यावर निर्बंध राहिलेले नाहीत. मोबाईल फोन हे या सगळ्या बदलाचं(?) मोठं कारण आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खत येत नाही तसंच स्मार्ट वाटला म्हणून आयुष्य फोनच्या स्वाधीन करता येत नाही किंबहुना करूच नये! फोन, कॉर्डलेस फोन,मोबाईल फोन, स्मार्ट फोन या बदलाचे आपण साक्षीदार आहोत आणि याचं मला कौतुक आणि अभिमान आहे! पण मग अचानक नारळीकरांचं 'वामन परत न आला' आठवतं आणि मग सहजच विचारसुद्धा येतो…नवीन कोनाद** तयार होण्याची स्मार्ट फोन ही सुरुवात तर नाहीये ना? 

**ज्यांनी 'वामन परत न आला' किंवा 'Return of Vaman" वाचलं नाहीये त्यांना हा संदर्भ कदाचित लक्षात येणार नाही… त्याबद्दल क्षमस्व!! पण मराठी ब्लॉग वाचणाऱ्या बहुतेकांनी नारळीकरांची पुस्तकं वाचली असावीत असा अंदाज आहे.

Monday, March 11, 2013

न-लोकोत्तर! अ-आदरणीय!!

                                      ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।  

गेल्या अनेक शतकांच्या इतिहासात कला-क्रीडा-राजकारण या सगळ्या क्षेत्रात अनेक श्रेष्ठ मंडळी भारताच्या इतिहासात होऊन गेली. आपल्या राजकारणाला आर्यचाणक्याचा वारसा आहे, कलेच्या क्षेत्रात कालिदासाच्या ग्रंथसंपदेपासून ते दादासाहेब फाळकेंच्या सिनेसृष्टीपर्यंत आपल्याकडे मिरवण्यासारख्या खंडीभर गोष्टी आहेत! क्रीडा क्षेत्रात खूप प्राचीन नावं नसली तरी हॉकीचा जादुगार ध्यानचंद ते क्रिकेटचा देवबाप्पा सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडू या देशासाठी खेळले आहेत! मात्र गेल्या दशकाकडे जरा तिरकस नजरेने पाहिलं की या सगळ्या क्षेत्रात काही अफाट 'न-लोकोत्तर', 'अ-आदरणीय' मंडळी वावरताना दिसतायत (मराठी व्याकरणात न-लोकोत्तर आणि अ-आदरणीय हे शब्द नाहीत हे मला माहितीय पण तरी मी मुद्दाम लिहिलेत. स्पष्टीकरण पुढे लिहीनच). यातल्या काही  'रत्नां'बद्दल लिहिण्याचा हा खटाटोप! राजकारण क्षेत्रात राजपुत्र चि. राहुल गांधी, क्रीडा क्षेत्रात श्री श्री श्री सर रवींद्रसिंहजी जडेजा, आणि कलाक्षेत्रात (?) थुसार कपूर (यांना श्री. , कु., चि. यातलं नेमकं काय लागू होतं याची कल्पना नसल्याने ? लिहिलं असून एका आकडेज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावाचा उच्चार आम्ही 'थुसार' असा करतो) हीच ती न-लोकोत्तर, अ-आदरणीय मंडळी! (मी हे नमूद करू इच्छितो की या तिन्ही क्षेत्रात अशी माणसं शेकड्याने असतील पण या तिघांवर माझा 'विशेष जीव' आहे)

या प्रत्येकाने काहीही विशेष करतासुद्धा यांच्याबद्दल जेवढं लिहिलं, बोललं जातं ते पाहून मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रीय स्तरावर लोकांना माहीत असलेली ही तिन्ही माणसं निष्क्रिय माणसं आहेत का? उत्तर 'नाही'..पण यातल्या कुणीतरी प्रचंड कौतुकास्पद कामगिरी केलीय का? उत्तर 'नाही'..ही सगळी हुशार, जिनियस माणसं आहेत का? उत्तर 'नाही'.. ही सगळी मठ्ठ माणसं आहेत का? तर याचंही उत्तर 'नाही'! यातल्या कुणीच अनादर वाटावा, चीड यावी अशी कामगिरी (अजूनतरी) केलेली नाही पण म्हणून त्यांच्यातल्या कुणाबद्दलच मला जरासुद्धा आदर वाटत नाही म्हणून अ-आदरणीय. या सगळ्यांचीच आत्तापर्यंतची कामगिरी पाहून, वक्तव्यं ऐकून कधी गालातल्या गालात तर कधी पोट धरधरून हसायला येतं, यदाकदाचित यातल्या कुणीही काही कर्तुत्व गाजवलं तरी ते 'लक बाय चान्स' असेल असं मला वाटतं म्हणून हे तिघे एकविसाव्या शतकातले 'न-लोकोत्तर' पुरुष आहेत!  

चि. राहुल गांधी हे राजघराण्यात जन्माला आले हे त्यांचं कर्तुत्व नाही (मणिशंकर अय्यर यांना तसं वाटू शकतं). दाढीचे खुंट वाढलेला चेहरा घेऊन आणि खादीचे कपडे घालून आजी-पणजोबांच्या पुण्याई(?)वर संपूर्ण देशभर भटकणाऱ्या ४३ अ-संसारी, युवा पुढाऱ्यामध्ये आदर वाटावा असं काहीच नाही! त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्यांच्या नागरिकत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत. देशाच्या अजून अस्तित्वात असलेल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची धुरा (उपाध्यक्ष) त्यांना देण्यात आली आणि या पक्षाच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी जीव- तोडून उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला पण पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही. त्यांनी या पराभवाची जबाबदारी मान्य केली (लॉल) आणि पुन्हा त्यांचा उदोउदो झाला. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काही चांगलं केलं तरी कौतुक होत नाही..पण राजपुत्राची गोष्टच वेगळी..त्याच्या हरण्याचं पण कौतुक करायला लोक तयार असतात ही शोकांतिका! भ्रष्टाचार, दहशतवाद या महत्वाच्या विषयांवर त्यांनी कधीच ठोस मतं मांडलेली नाहीत. तूर्तास ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी तयारी करत असल्याचं समजतं. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशातल्या निकालांची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होवो अशी माझी अपेक्षा आहे (पण याचबरोबर मुलायम-माया-करुणा-ममता असे सोज्वळ शब्द नावात असलेल्या कोणत्याही नेत्याच्या पक्षाकडे देशाच्या राजकारणाच्या नाड्या जाऊ नयेत ही कळकळीची प्रार्थनासुद्धा आहे)

थुसार कपूर हेसुद्धा घराणेशाही कोट्यातून सिनेसृष्टीत आलेल्या फरदीन-उदय-झायेद-हर्मन यांच्यातलं एक नाव, जे बालाजीच्या कृपेने आजही तग धरून आहे! 'मुझे कूच कहना है' अशा नावाच्या सिनेमातून चंदेरी दुनियेत आलेल्या थुसारला काय सांगायचं होतं ते अजून इतक्या वर्षांनीसुद्धा कुणाच्या बहुतेक लक्षातच आलेलं नाहीये. गोलमाल नामक चित्रपट मालिकेत केलेली मूक-बधिर 'लकी'ची भूमिका लोकांमध्ये बरीच फ़ेमस आहे. या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा पुरस्कार वगैरे पण मिळालाय जे बघून त्याच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे आपण पाहिलंय (लॉल). खरंतर त्याचा केकाटणे-गोंगाट स्वरूपी अभिनय पाहून 'अभी नय' भाई बस करो असं म्हणायची खूप इच्छा होते पण पुन्हा एकदा आपलं ऐकायला कुणीच नसतं ही शोकांतिका! 'खाकी' हा त्याची  भूमिका असलेला एकमेव चित्रपट सोडून मी त्याचा एकही चित्रपट सिरीयसली बघू शकलेलो नाही..'शूटआउट एट लोखंडवाला' नामक सिनेमात त्याला कुख्यात शार्प शूटर दिलीप बुवाची भूमिका करताना पाहणं हा माझ्या मते त्या गुंडाचा अपमान होता. तर असे गुंडाचे आणि हिरोचे 'जबरदस्त' रोल करणाऱ्या थुसारला अमेरिकेत कुठल्यातरी पब का क्लबच्या बाहेर तो 'अंडर-एज' असल्याचा संशय येउन अडवलं होतं हे वाचल्याचं आठवून पण मी 'लोळतो'! स्वतःच्या नावामध्ये एक निष्कारण 'h' घालून तो थांबलेला नाही..नुकतंच त्याच्या सांगण्यावरून एका चित्रपटाचं नाव "ब"जाते रहो ऐवजी "भ"जाते रहो केलं गेलंय… (पुन्हा लॉल). सरतेशेवटी थुसार हा एक 'अभिनेता'(?) आहे आणि तो ज्या कुठल्या भूमिका करेल त्याला तो त्याच्या अनोख्या,विनोदी शैलीतच करणार हे मी गृहीत धरलंय आणि त्याला कधीतरी काहीतरी जमेल ही शक्यता बाद केली आहे.      

सरतेशेवटी, लास्ट बट ऑफकोर्स नॉट द लीस्ट- श्री श्री श्री सर रविन्द्रजी जडेजा! मुळात मी या महा-पुरुषांबद्दल आत्ता अचानक लिहायला घेतलं याचं मुख्य कारण 'सर' आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतर्क्य, अचाट, अफाट, अबब कामगिरीने मला इतक्या दिवसांनी लिहायला प्रोत्साहन दिलंय! त्यांच्या केशरचनेपासून त्यांच्या नृत्यकौशल्यापर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालंय. निव्वळ ३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'बॉल ऑफ द सेन्चुरी' टाकलाय आणि समस्त क्रिकेट विश्वाला 'आर्ट ऑफ लिविंग' चा धडा घालून दिलाय! स्थानिक कसोटी सामन्यात त्यांनी ३०० धावांचा बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी धावा केल्या नाहीत की त्यांची चेष्टा होते जी त्यांच्या पंख्यांना मान्य नाही! सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 'जड्डू' नावाचं एक हॉटेल पण काढलंय. सर बहुचर्चित IPLच्या पहिल्या सिझनमध्ये विजेत्या राजस्थान रॉयल संघात होते. हा संघ इतर सगळ्यांपेक्षा 'लिंबूटिंबू' मानला गेला होता पण तेव्हा सरांबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. सरांमुळे राजस्थान जिंकलं. सर भारतीय संघात आल्यापासून आपण एकही कसोटी सामना हरलेलो नाही. थुसार आणि चि. गांधी यांची इतकी थट्टा केल्यावर मी सर जडेजा यांच्याबद्दल असं काहीतरी लिहू शकेन अशी मला अपेक्षा होती. पण माझी हिम्मतच होत नाहीये..शेन वॉर्न सारखा महान खेळाडू सरांना 'रॉकस्टार' म्हणतो तर मी बापडा त्यांना काय विशेषणं लावणार? (मराठीत 'रॉक' म्हणजे दगड नाही का?)  

अशा काही घटना आहेत ज्या कधीच घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. १) सर जाडेजांना 'विस्डेन' चा 'क्रिकेटर ऑफ द यिअर' पुरस्कार मिळणं २) थुसार कपूरला अभिनयाचं ऑस्कर मिळणं..आणि ३) चि. राहुल गांधींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणं. या सर्व अ-आदरणीय लोकांची गेल्या पाच-सात वर्षातली कामगिरी आणि मी उल्लेख केलेल्या सर्व पुरस्कारांची गेल्या कित्येक दशकांमधली क्रेडिबिलीटी पाहता या सगळ्या गोष्टी अशक्यच वाटतायत..पण काही गोष्टी मात्र नक्की शक्य आहेत. १) सर जडेजा १५-२० कसोट्या आणि अजून ३०-४० वन डे खेळून आधी कमेंटेटर आणि नंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष बनणार २) थुसार कपूरला २०२० साली पद्म पुरस्कार आणि २०३५ सालचा अभिनयाचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळणार आणि ३) चि. गांधींना इतर जवळपास सर्व माजी 'खांग्रेस' पंतप्रधानांसारखा 'भारतरत्न' मिळणार (ही शेवटची गोष्ट कधीच होऊ नये अशी खरंच खूप खूप जास्त इच्छा आहे म्हणून ती लिहिणार पण नव्हतो पण गेल्या सहा-सात दशकातला कारभार पाहता या सगळ्या विनोदी कल्पनांमध्ये भीषण वास्तवाचा उल्लेख असावा असं वाटलं म्हणून लिहिली) 

मला शाळेत नेहमी शिकवलं गेलंय की कोणत्याही लिखाणाची सुरुवात आणि शेवट चांगला असला तर वाचणाऱ्यांच्या मनात त्याचा 'ठसा' उमटतो. हे डोक्यात ठेवून लिहायची सुरुवात करताना चाणक्य, तेंडुलकर ही नावं लिहिली. पण शेवट गोड कसा करू? कडू, खारट असं काही चुकून खाल्लं गेलं की साखर खाऊन तोंड गोड करता येतं पण चुकून खूप गरम चहा-कॉफीचा घोट घेऊन जीभ भाजली की काहीच करता येत नाही…पुढचे काही तास, दिवस कशालाच चव लागत नाही. थुसार, सर जडेजा आणि चि. गांधी यांची इतकी स्तुती वाचून कुणी शेवटपर्यंत हे सगळं वाचणारे का याचीच खात्री नाहीये! पण इतकंच म्हणतो की आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात एकतरी अशी व्यक्ती सापडते जिच्याशी आपलं कधीच पटत नाही. जिव्हाळा नसतो, भांडणंदेखील नसतात पण तरी उगाचच आपल्याला काहीतरी खटकत राहतं! अशा मला खटकणाऱ्या माणसांबद्दल जाहीर मंचावर 'स्तुती' करण्याची माझी हौस मी भागवून घेतली. त्यांची उघडपणे थट्टा करण्यात कोणाच्याही आणि 'कोणत्याही' भावनांना ठेच लागली असली तर सॉरी पण 'नो सॉरी'!! येत्या काळात ही मंडळी देशाचं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचं अतोनात नुकसान न करता आपल्याला (स्पेसिफिकली मला) अशीच हसवत राहतील अशी बालाजीचरणी प्रार्थना!

पुन्हा एकदा-
                             ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।

Monday, January 28, 2013

लिंग्वा फ्रांकाच्या दिशेने!

बायबलमधली एक खूप जुनी गोष्ट आहे. फार फार पूर्वी, महाप्रलय झाल्यावर जगातली सगळी माणसं एकत्र जमली. त्यांनी सगळ्यांनी मिळून एक उंचच उंच इमारत 'बेबल' बांधायचं ठरवलं. इतकी उंच की त्याचं शिखर (टॉवर) स्वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे. देवाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो चपापला. ही माणसं खरंच स्वर्गापर्यंत येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. माणूस स्वर्गात पोहोचून त्याची जागा घेईल अशी भीती वाटली त्याला बहुतेक. जर का ही इमारत बांधणं थांबवायचं असेल तर लोकांमध्ये फुट पाडणं आवश्यक होतं. त्याने आवश्यक ती पावलं उचलली,इमारत तोडून टाकली आणि वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. तोपर्यंत एकाच भाषेत बोलणारी सगळी माणसं वेगवेगळ्या भाषा बोलायला लागल्यावर त्यांच्यात फुट पडली. देवाचा हेतू साध्य झाला आणि बेबलचं काम अर्धवट राहिलं. एकमेकांशी संपर्क करण्याचं माध्यमचं माणसामध्ये गट निर्माण व्हायला कारणीभूत ठरलं हा सगळ्यात मोठा विरोधाभास. देवाने तेव्हा किती भाषा निर्माण केल्या याची मला कल्पना नाही, पण बायबलमधल्या या गोष्टीकडे वस्तुनिष्ठपणे पाहिलं की मला गंमत वाटते. सध्या जगभरात ६००० हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत (इति विकिपीडिया). 

जगातील इतर सर्व सजीव (प्राणी) आणि माणूस यांच्यातल्या मुलभूत फरकांपैकी एक म्हणजे 'वाचा' त्याहीपेक्षा 'भाषा'..मार्क पॅगल या बायोलॉजीस्टच्या मतानुसार भाषा हे माणसाकडे असणारं सर्वाधिक धोकादायक हत्यार आहे. "तुम्ही तुमच्या डोक्यातली एखादी कल्पना भाषेच्या माध्यमातून कोणतीही शस्त्रक्रिया न करता दुसऱ्याच्या डोक्यात इम्प्लांट करू शकता" असं ते म्हणतात. भाषा ही मानवी उत्क्रांतीतली सगळ्यात महत्वाची पायरी असल्याचं ते नमूद करतात. 'होमो सेपियन' अर्थात आधुनिक माणूस जेव्हा भाषा बोलायला लागला, तेव्हा त्याचं सामाजिक शिक्षण इतर पूर्वजांच्या मानाने खूप चटकन झालं. पॅगल पुढे म्हणतात की असं असताना त्याने खूप विचित्र, अनाकलनीय कृत्य केलं- त्याने वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या. सेपियनच्या उदयानंतर गेल्या २ लाख वर्षांच्या काळात माणूस जगभर पसरला. काळानुसार, प्रदेशानुसार भाषेत काही अंशी होणारे बदल जरी गृहीत धरले तरी एखाद्या मोठ्या भूभागात साधारण एकच भाषा बोलणारी माणसं असायला हवीत. पण आकडे काहीतरी वेगळंच सांगतात. जगात जिथे जिथे जास्त लोकसंख्येची घनता जास्त आहे तिथे तिथे भाषांची विविधता जास्त आहे..भारत देश हे याचं उत्तम उदाहरण आहे. दोन अडीच लाख वर्षात प्रादेशिक गरजांनुसार, कधी एखाद्या विषयाशी संबंधित ज्ञान जपून ठेवायला, कधी सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या ही परिस्थिती सत्य मानली तरी गेल्या शे-दोनशे वर्षात हाच मायग्रेट झालेला माणूस पुन्हा जागतिकीकरणाच्या निमित्ताने जवळ येतोय..आणि या जवळ येण्याच्या प्रक्रियेत अडसर असणारा सगळ्यात मोठा घटक ठरतोय 'भाषा'. यावर उपाय- लिंग्वा फ्रांका! जगभरात सगळीकडे फक्त एकच भाषा अधिकृतपणे वापरण्यात यावी. कार्यालयीन, सामाजिक किंवा राजकीय व्यवहार हे त्या एकाच भाषेतून होतील. ही भाषा जागतिक शिक्षणाचं माध्यम असेल. एक विश्व..एक बोलीभाषा, कर्मभाषा! (पॅगल यांचा या संदर्भातला व्हिडीओ इथे पाहता येईल)

आपल्या देशाबद्दल बोलायचं तर भारताच्या सामाजिक वैविध्यातला महत्वाचा घटक आहे 'भाषा'! हिंदी ही राष्ट्रभाषा सोडून वीसच्यावर अधिकृत, आणि शेकड्याने अनधिकृत भाषा आपल्याकडे आहेत..इतकंच काय तर आपल्या राज्यसीमा या भाषांवर आधारित आहेत (आणि अर्थात सीमावाद्सुद्धा). कित्येक भाषांमध्ये विपुल प्रमाणात काव्य,शास्त्र, साहित्य, कला निर्मिती होते. प्रत्येक राज्याचं, त्यातल्या लोकांचं अमुक-एक भाषेवर प्रेम आहे आणि या प्रेमातूनच कित्येक प्रादेशिक राजकीय पक्षसुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. धर्म, जात, वर्ण या सगळ्यांवरून भांडण्याच्या भानगडीत हा भाषेचा मुद्दा थोडा दुर्लक्षित झाला असं म्हणावं लागेल. पण सोशियल नेटवर्किंग, व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या हायटेक जगात 'विविध भाषा' हा प्रकार खरंच अनावश्यक वाटतो. मला माहितीय की या विधानाला कित्येक संस्कृती 'रक्षकांची' एक भुवई ऑलरेडी वर झाली असेल. पण यासंदर्भात जॉन मॅकव्होर्टर नावाच्या भाषाशास्त्राच्या प्राध्यापकाचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो- 'भाषा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ही गोष्ट खरी. संस्कृती संपली की भाषा संपते पण भाषा संपली की संस्कृती संपत नाही.' तसं असतं ज्ञानेश्वरांनी लोकांना कळावी म्हणून 'सोप्प्या' मराठीत लिहिलेली 'ज्ञानेश्वरी' पुढच्या चार-पाच शतकात बदललेल्या मराठीबरोबर कालबाह्य झाली असती. संस्कृती नष्ट होणं आणि संस्कृती विकसित होणं या दोन गोष्टीतला फरक बदलत्या काळात समजून घेणं अत्यावश्यक आहे. बदलती भाषा, कालबाह्य होणारी भाषा या गोष्टींकडे संस्कृती विकासाच्या दृष्टीने पाहणं महत्वाचं! यालाच जोडून अजून एक मुद्दा- भाषेच्या नाशाबरोबर संस्कृतीचा ऱ्हास होणं अटळ असतं तर संस्कृत, लॅटीन, पाली, अर्धमागधी या भाषा नष्ट झाल्या तेव्हा मनुष्य प्राणीच नष्ट झाला असता. 'भाषा संस्कृतीवर अवलंबून असते...संस्कृती भाषेवर नाही!' सो संस्कृतीचा जवळपास ९०% लोकांच्या दृष्टीने 'मुख्य' असणारा मुद्दा जर का बाजूला ठेवला तर मग भाषेच्या वैविध्याचा अट्टाहास बाजूला ठेवता येईल. त्याचे फायदेसुद्धा कित्येक आहेत. भारतातला 'अधिकृत राज्यभाषा' हा प्रकार काढून टाकला तर भारतातले कित्येक सीमाप्रश्न संपतील. जगाचा विचार करायचा तर युरोपियन युनियन दर वर्षाकाठी त्यांच्या चर्चांसाठी निव्वळ भाषांतरावर करत असलेला कोट्यावधींचा खर्च कमी होईल. अमेरिकन्सच्या दृष्टीने म्हटलं तर चायनीज आणि मेक्सिकन लोकांशी किमान आवश्यक संवाद सहज साधता येईल. लोकांची धर्म, जात वर्ण यांच्या नावाखाली जगभर होणारी गटबाजी एक भाषा या छत्राखाली कदाचित काही अंशी कमी होईल.  

मग पुढचा प्रश्न येतो...की जगातल्या सगळ्या लोकांनी एकाच भाषेत बोलायचं तर ती भाषा कुठली? इंग्लिशचा नंबर अर्थात सगळ्यात वर असेल...चायनीज दोन नंबर वगैरे वगैरे...म्हणजे पुन्हा एकदा मेजोरीटीने हे ठरणार..उत्तर आहे 'नाही'..जगभरात जर का एकच भाषा बोलीभाषा म्हणून वापरायचं ठरलं तर ती भाषा इंग्लिश असलीच पाहिजे असं नाही..त्यातले कित्येक शब्द, वाक्प्रचार हे जगभरातल्या तमाम भाषांवरून ठरवले जातील. कदाचित मूळ पाया म्हणून इंग्लिशचा वापर करावा लागेल..पण त्यात सर्व युरोपियन, आशियाई, आफ्रिकन भाषांमधले शब्द असतील. अशी भाषा अस्तित्वात आली तर मग सगळ्या  जुन्या किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांचं काय? उत्तर सोप्पं आहे! आज संस्कृत,पाली, अर्धमागधी, लॅटीन या भाषांची जी काही स्थिती आहे ती अजून पाचशे वर्षांनी मराठी, तमिळ, हिब्रू, जर्मन भाषांची असेल. सध्याच्या काळात लोक नुसता नाच शिकत नाहीत- भरतनाट्यम,कुच्चीपुडी, वेस्टर्न, साल्सा असे त्यातले प्रकार शिकतात तसे अजून काही शतकांनी लोक वेगवेगळ्या भाषा शिकतील...तसे तर लोक आजही भाषा शिकतात पण भाषा हा पोटापाण्याचं साधन असण्यापेक्षा आर्ट फॉर्म,हॉबी म्हणून मान्य होईल. कम्युनिकेशन अर्थात संवाद घडणं या एका अनोख्या गुणधर्मामुळे माणूस पृथ्वीवर श्रेष्ठ ठरला. पॅगल या प्रकाराला सोशियल लर्निंग म्हणतात.माणूस एक भाषा बोलायला लागला. मग त्याने अनेकविध भाषा निर्माण केल्या. आजही नवीन भाषा तयार होण्याची प्रक्रिया अव्याहत सुरु आहे. पण हे कुठेतरी थांबायला हवं! नवीन भाषा निर्माण होण्याने खरंच सोशियल लर्निंगमध्ये भर पडतेय की समाजामध्ये फुट पडतेय हे भाषाकर्त्यांनी आणि तिच्या रक्षकांनी ठरवायला हवं! ( या नोटवर माझ्या डोक्यात जाती, धर्म 'निर्माण' करणाऱ्या लोकांचाही विचार आलाच...पण त्याच्यावर उहापोह नंतर कधीतरी) 

शेवटी भाषा भाषा म्हणजे तरी काय? आपल्या भावना,विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यमच नाही का? आपण लहानपणापासून एक सर्टन भाषा शिकतो,बोलतो म्हणून आपल्याला तिचा अभिमान,कौतुक वाटतं! आपल्या भावना आपल्याला त्या सर्टन भाषेत सहज व्यक्त करता येतात ('एक वैश्विक भाषा' या विषयावर मी मराठीत का लिहितोय असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला असेल त्याचं उत्तर हेच). उद्या प्रत्येक भारतीयाला त्याच्या भावना स्वाहिलीमध्ये व्यक्त करता आल्या तर आपण स्वाहिली बोलायला लागू. अगदी आजच्या मराठी बोलीभाषेतले आपले कित्येक शब्द फारसी, उर्दू, हिंदी आणि अशा कित्येक परकीय भाषांमधून आले आहेत. 'बांधिलकी भावनांशी,विचारांशी आधी आणि भाषेशी नंतर असायला हवी' हा साधा,सरळ, व्यावहारिक दृष्टीकोन आहे! आज इंग्लिशमध्ये सहज वापरले जाणारे कित्येक शब्द, वाक्प्रचार इतर भाषांमधून आले आहेत. उदाहणार्थ- 'कर्म/कर्मा' हा शब्द आपल्या साहित्यात जेवढा वापरला जात नाही तेवढा अमेरिकन सिनेमांमध्ये वापरला जातो. 'बॉन अपेटित' हा फ्रेंच वाक्यप्रयोग 'वदनी कवळ घेता' चं जागतिक व्हर्जन आहे. 'बॉन वोयेज' सगळं जग सहजपणे वापरतं. 'के सेरा सेरा' हा रोमन वाक्प्रयोग जगभरातल्या अनेक वक्त्यांनी त्याच्यातल्या व्याकरणाच्या चुकांसकट वापरला आहे. 'हमाल दे धमाल' मधलं लक्ष्याचं 'मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं' हे गाणं प्रसिद्ध ' आय केम, आय सॉ, आय कॉनकर्ड' या वाक्प्रचारावर आधारित. हा वाक्प्रचार 'व्हीनी व्हीडी व्हीची' या लॅटीन वाक्यावरून घेतलेला..खूप लोक वापरतात. ही सगळी उदाहरणं मला जगातल्या भाषांचं किती ज्ञान आहे हे सांगायला लिहिलेली नाहीत...उलट 'के सेरा सेरा'ची भाषा कोणती हे मला शोधायला लागलं. इतकी वर्षं वापरताना हा प्रश्न पडला नव्हता. अर्थ माहितीय...कुठे वापरायचा कळलं...विषय संपला!   
मी अमेरिकेला आलो तेव्हा मी नॉर्थ इंडिअन असल्याचा शोध मला लागला. महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या रांगेतली आणि वरची सगळी राज्य नॉर्थ इंडिया आणि खालची सगळी राज्य साउथ इंडिया (त्यातही वर्चस्व हैद्राबादी लोकांचं..हा मूळ शोधसुद्धा बहुतेक त्यांचाच) असं इथे वर्गीकरण असतं. शांतपणे विचार केला तेव्हा जाणवलं की भाषेचा एक फरक सोडला तर काही फरक नाही जगात कुणातच..भारतीयांचं सोडाच! सण-वार, खाद्य संस्कृती वेगळी असणं हा सपशेल गौण मुद्दा आहे..बाजुबाजुच्या महाराष्ट्रीयन घरात एकाच दिवशी जेव्हा एकीकडे उकडलेल्या बटाट्याची आणि दुसरीकडे कांदा घालून रस्सा भाजी होते तेव्हा त्यांची खाद्य संस्कृती लगेच वेगळी होत नाही आणि झालीच तर ती सामाजिक दृष्टीने बाधक किंवा घातक नाही..पण दोन घरात लोक वेगळ्या भाषा बोलत असतील तर किमान संवाद, विचारांची देवाणघेवाण या सामाजिक गरजा भागवल्या जात नाहीत..जागतिक एकता,'एक विश्व-एक राष्ट्र' वगैरेचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी जात, धर्म, वर्ण बाजूला ठेवून या भाषेच्या मुद्द्याकडे जरा बघाच! सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने 'भाषेचा ऱ्हास' आणि जागतिक 'लिंग्वा फ्रांका'चा अर्थात एकाच अधिकृत बोलीभाषेचा,कार्यभाषेचा उदय होणं हे लोकांनी जवळ यायचं लक्षण ठरणारे!  येत्या चार-पाचशे वर्षांच्या काळात काय घडतंय ते बघायला आपल्यातलं कुणीच नसेल पण 'वाढ आणि विकास' ही जीवनाची लक्षणं ध्यानात ठेवली तर जागतिक लिंग्वा फ्रांका अस्तित्वात येणं नक्की घडेल असं मला वाटतं! एक दिवस असा असेल की एकाच वर्गात गुप्ते, शर्मा, सुब्रमन्यम, खान, डिकास्टा, पॉवेल, अल-नझर, एबरहर्ट, गोर्बाचेव्ह, मोरेना, ताओ चंग, कुरोसावा, अरमानी अशा सगळ्या आडनावांची मुलं एकाच वर्गात (अर्थात वर्चुअल क्लासरूम), एकाच भाषेत शिकत असतील..!


ता.क. मागे मी मराठी माध्यम, मराठी भाषेत शिक्षणाची अवस्था या विषयावर लिहिलं होतं. आता जागतिक बोलीभाषेबद्दल लिहितोय...या सगळ्यातून मराठीचा 'उपमर्द' करण्याचा माझा हेतू नाही. मला मराठी आवडत नाही असं तर मुळीच नाही! मराठीसारखी इतकी 'शब्दसंपदा' असणारी भाषा माझी मातृभाषा आहे याचा मला अभिमान आहे! मराठीत व्यक्त होणं सोप्पं वाटतंय तोपर्यंत मराठीतच लिहीत राहीन..पण माझी बांधिलकी लेखनाशी आणि त्यातल्या भावनांशी जास्त असेल एवढं मात्र नक्की!