Pages

Tuesday, April 26, 2011

भय भगव्याच..

नुकतीच सत्य साईबाबांच्या निधनाची बातमी वाचली आणि फेसबुकच्या निमित्ताने त्यांच्या भक्तांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली, आणि विरोधकांनी केलेली टीका अशा दोन्ही गोष्टी वाचायला मिळाल्या..या Social Networking प्रकाराने एक बरं झालंय..क्रिकेट सामन्याच्या लाइव स्कोरपासून ते अण्णा हजारेच्या उपोषणापर्यंतच्या सगळ्या बातम्या पेपर न वाचता कळतात.."समाज कुठे चाललाय??" सारख्या गहन प्रश्नाचं उत्तर हवंय??Join Facebook. असो..मूळ मुद्दा भलताच आहे..तर- सत्यसाईबाबा गेले आणि माझ्यासारख्या त्यांच्या विरोधकांना टीका करायची संधी देऊन...मुळात माझा विरोध सत्य साईबाबा या व्यक्तीला नाहीये तर सत्यसाईबाबा या प्रवृत्तीला आहे..मर्त्य जगात जन्माला येऊन जो माणूस मी देव असल्याच घोषित करतो अशा सगळ्याच लोकांना माझा विरोध आहे! अर्थात एक नम्रपणे नमूद करू इच्छितो की ज्या ज्या लोकांच्या श्रद्धा सत्यसाई किंवा अशा कोणत्याही "देवमाणसां"मध्ये एकवटल्या असतील तर त्यांना दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही!


सत्यसाई काय किंवा अजून कुणी काय?? अशा सगळ्याच लोकांबद्दल आपण सगळ्यांनीच भलं-बुरं ऐकलेलं आहे! या मंडळींची सामाजिक बांधिलकी देखील किती तीव्र आहे या नावाखाली आपण अलीकडे यातल्या बऱ्याच जणांनी सुरु केलेले दवाखाने, वृद्धाश्रम अशा गोष्टीबद्दलही कौतुक ऐकलं आहे! निव्वळ सामाजिक कार्याचाच विचार करायचा तर ही मंडळी नक्कीच काही चांगलं काम करतही असतील पण मग त्यासाठी आपण त्यांना देव मानून मोकळं व्हायचं? आपण एका अशा समाजात राहतो जिथे अंधश्रद्धा निर्मुलन करण्यावर शेकडो समाज सेवक कळकळीने गावोगाव हिंडतात आणि मोठेमोठे नेते, खेळाडू इतकंच काय तर शात्रज्ञसुद्धा अशा लोकांचे भक्त होण्यात धन्यता मांडतात? बाबा आमटे किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी, अण्णा हजारेंनी, मेधा पाटकरांनी कधी 'आम्हाला देव म्हणा' बोलल्याच माझ्या ऐकिवात नाही! महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात वास्तव्य असणारी दोन वेगवेगळी "संत" मंडळी मी पाहिलीयेत जे स्वतःला विष्णू आणि लक्ष्मीचे अवतार मानतात..सत्ययुगापासून आत्तापर्यंत कुठल्याही पुराणांमध्ये विष्णूने एकाच वेळी दोन अवतार घेतल्याचं लिहिलेल मला माहित नाही (धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी काही चुकलं असल्यास क्षमा करावी)! मला प्रश्न पडतो की या लोकांना त्या विष्णूची जरासुद्धा भीती वाटत नाही?? खरी गम्मत तर पुढे आहे.."दक्षिण भारतातल्या "लक्ष्मी-विष्णू" चं सगुण सदेह दर्शन घ्यायचं तर काही हजार मोजावे लागतात..आणि जर का तुम्ही तुमच्याबरोबर असे काही हजार खर्च करण्याची तयारी असलेले पाच लोक घेऊन गेलात तर तुम्हाला दर्शन Free!" ऐकलं तेव्हा क्षणभर मला प्रश्नच पडला होता की मी नेमकं देव दर्शनाबद्दल ऐकतोय की कुठली Chain marketing ची नवीन scheme आलीय मार्केटला?? कुणी प्रवचन करतो तर कुणी व्याखाने देतो, कुणी तुम्हाला ब्रह्मविद्या पण शिकवतो..(एकही देव सोडला नाहीये या लोकांनी)! आणि या मंडळींना हातपाय पसरायला देणारे कुणी अशिक्षित, खेडेगावात वाढलेले लोक नाहीयेत तर हे सगळे सुशिक्षित, शहरी लोक आहेत! हे सगळे विचार डोक्यात आले याला कारण नुकताच वाचलेला एक ब्लॉग: "India would have been a better place without Sathya Sai Baba". http://indianrationalists.blogspot.com/2011/04/sanal-edamaruku-on-sathya-sai-baba.html  
एका बुद्धिवादी माणसाने लिहिलेला एक बुद्धिवादी लेख.

मुळात मी लिहायला सुरुवात केली ती त्यातलाच एक प्रश्न वाचून- " सत्यसाई यांच्या गैर कायदेशीर कृत्यांविरुद्ध पुष्कळसे पुरावे आणि साक्षीदार असताना देखील त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का झाली नाही? भगवा रंग आपल्या लोकशाहीला इतका निष्क्रिय करतो का??". भगवा रंग! हिरवा रंग! निळा रंग! आधी आपण देशाला भाषांमध्ये वाटलं, धर्म होतेच आणि आता धर्माचं नाव नाही काढायचं म्हणून आपण सोयीस्करपणे रंगाचा आधार घेतला..! एकूण काय तर परिस्थितीमध्ये सुधारणा झालीच नाही पण गोंधळ मात्र वाढला! एकीकडे देशाच्या सरकारला अशा भगव्या कपड्यांमागे लपलेल्या लोकांना गजाआड करणं जड जातं कारण लक्षावधी लोकांच्या श्रद्धा आड येतात आणि भगव्या रंगाची कास धरलेल्या राजकीय पक्षांनाही दुर्लक्षित करणं शक्य नाही करणं पुन्हा एकदा लक्षावधी लोकांच्या निष्ठा आड येतात! आणि खूप प्रामाणिकपणे मला असं वाटत की या (आरंभ)शूर जनतेला यातला कुठलाच भगवा रंग देव, देश आणि धर्म अशा कशाच्याच वाटेला लावू शकलेला नाही! जाज्वल्य देशाभिमान नाही, विरक्तीच्या वाटेने जाणारी संतवृत्ती नाही आणि देश पडला secular त्यामुळे धर्म ही कालबाह्य गोष्ट आहे असंच काही शाळेतून शिकतो आपण! 

हिरव्याबद्दल पूर्वी चीड होती आणि आता धास्ती आहे. निळ्याबद्दल पूर्वी तेढ होती आता राग आहे, पण धास्तीही आहे! आणि भगव्याच काय? भगव्याचा लोकांनी कधी प्रामाणिकपणे विचारच केला कुठे? Infact मला भीती वाटायला लागलीय.. दोन्ही प्रकारच्या भगव्यांपासून! जोपर्यंत समाजाच्या जाणीवा "देशधर्मा"बद्दल प्रखर होत नाहीत तोपर्यंत सगळ्याच रंगांपासून भीती आहे आपल्याला असं मला वाटत!!

चैतन्य