Pages

Showing posts with label नाटक-सिनेमा-सीरिअल. Show all posts
Showing posts with label नाटक-सिनेमा-सीरिअल. Show all posts

Saturday, January 4, 2020

पर्सन ऑफ इन्टरेस्ट: उहापोह आणि चिंतन (भाग १)

        
 
(Image From: https://cutt.ly/drhUAXm)
  जोनाथन नोलन हा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा भाऊ. ख्रिस्तोफर नोलनचा गाजलेल्या पहिल्या सिनेमाची- 'मेमेंटो'ची मूळ कथा जोनाथनची होती. नंतर 'द प्रेस्टिज', 'डार्क नाईट', 'डार्क नाईट रायझेस', आणि 'इंटरस्टेलर' अशा ख्रिस्तोफर नोलनच्या कित्येक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथांवर त्याने काम केलंय. जोनाथनच्या या सगळ्या कामांचा उल्लेख इथे करण्याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या तोडीस तोड असूनही, त्याची संकल्पना असणाऱ्या 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' (POI)ला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. निव्वळ करमणूक सोडून बुद्धिजीवी लोकांना विचार करायला लावणारा, प्रचंड गुंतागुंत असणारा, भविष्याचा वेध घेणारा, प्रसंगी अचाट वा अशक्य गोष्टी आणि त्या गोष्टी करणाऱ्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा असणारा शो म्हणून मला POI कायमच खूप आवडलाय. तो का आवडला किंवा त्यातल्या विचार करायला लावणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल लिहायचं खूप महिने मनात होतं. आज फायनली मुहूर्त सापडलाय...
            ११ सप्टेंबर २००१ ला न्यूयॉर्कच्या 'ट्विन टॉवर्स'वर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिका हादरली आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण, सुरक्षा, दळणवळण अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर दूरगामी परिणाम झाले. मध्य पूर्वेतली युद्धं अमेरिकेला नवीन नव्हती पण देशांतर्गत सुरक्षाप्रणालीत घोषित-अघोषित अनेक बदल झाले ते ९/११ नंतर. 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' हा टीव्ही शो सुरु झाला २०११ मध्ये पण त्यात दाखवलेल्या गोष्टीची सुरुवात झाली ती २००१ मध्ये. शोच्या 'पायलट' अर्थात पहिल्या पर्वाच्या/सिझनच्या पहिल्या भागात आपण भेटतो जॉन रीसला. हा जॉन आधी सैन्यात होता, मध्यपुर्वेचे दौरे करून आला, नंतर सीआयएचा हेरसुद्धा होता- आता मात्र तो स्वतःला दारूमध्ये बुडवून, कुठलंतरी न सांगता येण्यासारखं दुःख कवटाळून बेघर भटकतोय. कुठल्याश्या लहानश्या मारामारीत त्याला पोलीस पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. तेव्हा त्याची सुटका एक अनोळखी, एकलकोंडा आणि काहीसा अनाकलनीय माणूस- हॅरल्ड फिंच करतो. हॅरल्ड फिंच या माणसाची सरकारदफ्तरी कुठली नोंद नाही, त्यालासुद्धा जॉनसारखा कुणीही जवळचा नातेवाईक नाही. POIला शीर्षक गीत नाही. त्याऐवजी या हॅरल्डच्याच आवाजातलं एक निवेदन आहे जे साधारण शोची संकल्पना आपल्याला सांगतं. ते निवेदन ढोबळमानाने असं-

"तुमच्यावर पाळत ठेवली जातेय.
सरकारकडे एक गुप्त यंत्रणा, एक 'मशीन' आहे जे दर क्षणाला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.
मला मशीनबद्दल माहितीय कारण ते मीच बनवलंय.
मी मशीन बनवलं ते दहशतवादी घातपातांच्या घटनांवर लक्ष ठेवायला,
पण मशीनचं लक्ष तर सगळ्या(जगा)वरच आहे, सगळ्या हिंसक गुन्ह्यांवर!
असे गुन्हे ज्यात तुमच्यासारखे लोक गुंतलेले असू शकतात,
असे गुन्हे ज्याला सरकार काही महत्व देत नाही,
सरकार काही करत नाही म्हणून मी (गुन्हे थांबवायला) काहीतरी करायचं ठरवलं..
पण मला या कामात एक जोडीदार हवा होता (जॉन रीस इथे पडद्यावर दिसतो), ज्याच्याकडे असे गुन्हे थांबवण्यासाठी लागणारी तंत्रं असतील...
यंत्रणा आमच्या मागावर आहेत, (म्हणून) आम्ही गुप्तपणे काम करतो..
तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही....
पण तुम्ही जर का (संभाव्य) गुन्हेगार किंवा गुन्ह्याला बळी पडणार असाल तर आम्ही तुम्हाला शोधू..."


गुन्हेविश्वावर आधारित टीव्ही शो अर्थात 'Crime Procedural' ही संकल्पना अजिबातच नवीन नाही. आजपर्यंत जगभरात शेकड्याने असे कार्यक्रम बनले असावेत ज्यात भागाच्या सुरुवातीला खून (कधीतरी चोरी) वगैरे होतो आणि वेगवेगळे स्टायलिश लोक आपापल्या पद्धतीने खुनी, चोर वगैरे शोधतात. POI चा पहिला सिझन हा एकूणच प्रत्येक भागाची स्वतंत्र कथा असणाऱ्या 'Crime Procedural' प्रकारात येत असला तरी गुन्ह्याची उकल करण्यापेक्षा 'गुन्हा थांबवणं' हा त्याची मुख्य 'थीम' आहे. त्यात 'मशीन'च्या कार्यपद्धतीमुळे नेहमी गुन्ह्याशी 'संलग्न व्यक्ती' अर्थात 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' गुन्हा करणारे की गुन्ह्याला बळी पडणारे हे रीस किंवा फिंचला माहित नसतं. तेव्हा ते शोधणं हा ही एक रहस्याचा भाग! जॉन रीस फिंचच्या मदतीनं, निनावी राहून, पोलिसांपासून लपत-छपत, टिपटॉप सुटाबुटात फिरून न्यूयॉर्क शहरात घडणारे गुन्हे थांबवायला सुरुवात करतो. न्यूयॉर्कच्या पोलीस, गुन्हेगारांपासून ते पार एफबीआय, सीआयएपर्यंत 'सुटातला माणूस' अशा हास्यास्पद (पण चपखल) नावाने प्रसिद्ध होतो. सोबतच्या उपकथानकांमध्ये दोन पोलीस अधिकारी सहकारी पात्रं म्हणून दर भागात दिसतात. यातली एकजण 'जोस कार्टर' प्रामाणिक, निष्ठावंत डिटेक्टिव्ह आहे जिला 'सुटातल्या माणसाला' पकडायचंय आणि दुसऱ्या काहीश्या चांगल्या वृत्तीच्या पण भ्रष्ट्र डिटेक्टीव्ह 'लायनल फस्को'ला जॉनने त्याच्याविरुद्धचे काही पुरावे लपवून ठेवत स्वतःच्या बाजूला करून घेतलंय. न्यूयॉर्कमधल्या भ्रष्ट पोलिसांची एक संघटना जिचं नाव HR, तिथल्या गुन्हेगारी फॅमिलीज आणि त्यांच्यातला संघर्ष हेसुद्धा अगदी सहज या सिझनमध्ये येतं. मी वर लिहिलेली गुंतागुंत, भविष्याचा वेध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्याचा आयुष्यावर होऊ शकणारा परिणाम असे क्लिष्ट मुद्दे या पहिल्या सिझनमध्ये नाहीत. यातली लहान-मोठी उपकथानकं, इतर पात्रं चांगली असली तरी तोंड भरून कौतुक वगैरे करण्याजोगी नाहीत. जवळपास सगळे भाग स्वतंत्र आहेत आणि फक्त कार्यक्रमाची संकल्पना माहित असेल तर आधीचा भाग बघितलाच पाहिजे असं नाही. यातही 'जजमेंट', 'विटनेस', आणि 'बेबी ब्लु' हे माझे आवडते एपिसोड्स आहेत.

दुसऱ्या पर्वात POI मालिका म्हणून हळूहळू 'सीरियलाईज्ड' व्हायला लागते. ज्याला 'आर्टिफिशियल सुपरइंटेलिजन्स' (ASI) म्हणता येईल असं मशीन अस्तित्वात असल्याची चाहूल लागलेले लोक, मशिनचं अस्तित्व जगाला कळू नये म्हणून सरकारी यंत्रणांचे चालू असणारे अथक प्रयत्न (ज्यात मुखत्वे मशीनबद्दल ठाऊक असलेल्या लोकांना जीवे मारणं  हेच त्याचं अस्त्रित्व लपवण्याचा मार्ग आहे हे मानणारे अधिकारी) ही मुख्य उपकथानकं इथे येतात. फिंचचा भूतकाळ, त्याने नेमक्या रीसलाच का जोडीदार म्हणून नेमलं, मशीन फिंचशी किंवा फिंच मशीनशी संपर्क कसे साधतात? या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मशीनचा शोध लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हेतू आहेत- कुणाला ते नष्ट करायचं आहे, कुणाला त्याच्यावर ताबा हवाय वगैरे वगैरे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक 'मशीन' या यंत्रणेला एक पात्र म्हणून बघायला लागतो. दरम्यान पहिल्या पर्वात असणारी सहकारी पात्रं- कार्टर, फस्को, एलायस, रूट आता जास्त महत्वाची होतात. 'टीम मशीन' विस्तारते ज्यात आता रीस, फिंच सोडून कार्टर, फस्को, समीन शॉ सुद्धा सहभागी होतात. दुसऱ्या सिझनमध्येसुद्धा जवळपास प्रत्येक भागाला एक 'स्वतंत्र' कथानक आहे आणि काही प्रमाणात वर लिहिलेली उपकथानकं पुढे नेण्यावर भर आहे (जे पुढच्या सीझन्समध्ये अधिकाधिक होतं). एकूणच दुसरा सिझन मला आवडला असला तरी विशेष करून रीसला 'सुटातला माणूस' म्हणून एफबीआयचे लोक पकडतात तेव्हाचे २ भाग '2PiR' आणि 'प्रिसनर्स डायलेमा' मला खूपच आवडतात. सगळ्या १०३ एपिसोड्सपैकी जोनथन नोलनने दिग्दर्शित केलेला एकमेव, समीन शॉच्या पात्राची ओळख करून देणारा 'रिलेव्हन्स' नावाचा भागही जबर आहे!
२०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेन हे नाव जगाला माहित झालं. स्नोडेनने अमेरिकची 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' जगभरात लोकांवर बेकायदेशीर पाळत ठेवायचे कार्यक्रम राबवत असल्याचे उल्लेख असणारी कागदपत्रं जगजाहीर केली. स्नोडेनच्या या कामगिरीचे पडसाद अमेरिकेतच नाही तर जगभरात उमटले. त्याने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये कित्येक टेलिकॉम कंपन्या आणि युरोपियन देशातल्या सरकारांचादेखील उल्लेख होता. हा सगळाच विषय 'POI' च्या मध्यवर्ती संकल्पनेला इतका 'रिलेवंट' असल्याने त्यावर उहापोह होणं अपेक्षित होतं आणि तो झालासुद्धा. दुसऱ्या सीझनमध्ये आपण 'मशीन'ला पात्र म्हणून ओळखायला लागतो तेव्हा त्याच्या 'कोडिंग'मध्ये अर्थात जडणीघडणीमध्ये हॅरल्डच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनाचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात यायला लागलेलं असतं. तिसऱ्या सीझनपासून हे जास्तच अधोरेखित होतं. या सिझनमध्ये न्यूयॉर्क मधल्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेला संपुष्टात आणण्यासाठी कार्टर करत असलेली धडपड, लोकांवर सरकारने बेकायदेशीर पाळत ठेवायच्या बातम्या/अफवा पसरायला लागल्यावर त्याच्या विरोधात सक्रिय झालेली सशस्त्र नागरी संघटना आणि 'मशीन'वर ताबा मिळवणं अवघड आहे याची जाणीव झाल्यावर तसंच दुसरं मशीन बनवायच्या मागे लागलेले लोक ही तीन मुख्य कथानकं आहेत. तिसऱ्या सीझनमधला 'डेविल्स शेअर' हा भाग अफलातून आहे. याच सीझनमधला ४C नावाच्या एपिसोडचं लिखाण हे मला त्यातल्या एक-दोन अचाट सीन्समुळे थोडं वीक वाटतं. पण एकूणच या सीझनपर्यंत POI ची 'मायथॉलॉजी' आणि रीस-फिंचचं 'सुपरहिरो' असणं मी प्रेक्षक म्हणून मान्य केलेलं असतं सो निदान मनोरंजनात खंड पडत नाही.

POIच्या जवळपास प्रत्येक एपिसोडसमध्ये प्रभावी कथानकं, उपकथानकं आहेत. रोचक वाटावेत असे 'पर्सन्स ऑफ इंटरेस्ट' आहेत आणि प्रत्येक मुख्य पात्राचा शोमध्ये पहिल्यांदा दिसण्यापूर्वीचा भूतकाळसुद्धा वेगवेगळ्या एपिसोड्सच्या कथानुकानुसार दाखवला गेलाय. याच अनुषंगाने आता POI च्या पात्रांबद्दल थोडं (खरंतर POI चे एकूण पाच सीझन्स आहेत पण उरलेल्या दोन सीझन्सबद्दल नंतर लिहिणारे आणि त्याचं कारणसुद्धा तेव्हाच देईन). जिम कवीझल POIच्या आधी 'पॅशन ऑफ द ख्राईस्ट' या सिनेमातल्या जिझस ख्राईस्टच्या भूमिकेमुळे लोकांना माहीत होता. त्या 'जिझस'ला सुटाबुटात मारामाऱ्या करताना, सराईतपणे बंदुका वापरताना बघणं हे काही लोकांना धक्कादायक वाटल्याचं वाचलेलं आठवतंय. एका अर्थी ही व्यक्तिरेखा एककल्ली आहे, पहिल्या एपिसोडमधली काही मिनिटं सोडल्यास आपल्याला प्रेक्षक म्हणून रीस काय करेल किंवा भूतकाळात त्याने काय केलं असेल याचा पुरेपूर अंदाज येतो. त्याला असणारं, न सांगता येणारं दुःख कोणतं आहे याचा उलगडा नंतर होतो पण याच अनुषंगाने लहान मुलं किंवा छळ होणाऱ्या बायकांशी संबंधित गुन्हा असला तर रीसचे आविर्भाव पाहण्यासारखे आहेत. कवीझलची इथली भूमिका जिझसच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली तरी एखाद्या एपिसोडच्या शेवटी कुणालातरी सल्ला किंवा नैतिक बळ देणारा कवीझल पाहिला की 'पॅशन'ची थोडीशी आठवण होतेच. एकीकडे सतत लोकांमध्ये असूनही एकाकी असणारा रीस आणि दुसरीकडे निव्वळ एखाद्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपपुढे बसून रीसशी फोनवर बोलताना दिसणारा 'अक्षरशः एकाकी' फिंच. फिंचची भूमिका करणाऱ्या मायकल इमर्सनला त्याच्या 'लॉस्ट' मधल्या नकारात्मक भूमिकेसाठी एमी मिळालं होतं. लॉस्टमधली त्याची आधी खलनायकी आणि शेवटी चांगुलपणाकडे झुकलेली भूमिका त्याने जबर केलीच होती पण इथे तो मला अभिनेता म्हणून प्रचंड आवडलाय. हॅरल्ड फिंचचं पात्र हे एका अर्थी 'POI' विश्वाची आणि पर्यायाने मशीनची नैतिकता ठरवतं . तो वस्तुनिष्ठ आहे तरी आशावादीसुद्धा आहे. जीवापाड प्रेम करणारी माणसं असूनसुद्धा एकाकी आहे. आपण मशीन बनवून चूक केलं का बरोबर या चिरंतर मानसिक द्वंदात आहे. हे द्वंद चौथ्या-पाचव्या सीझनमध्ये जास्त ठळकपणे  येतं. इमर्सनला ही भूमिका करताना बऱ्याचदा नुसते कॉम्प्युटरपुढे बसून संवाद म्हणायचे असायचे, फोनवर दुसऱ्या बाजूला रीस आहे असं आपण जरी एडिटेड एपिसोडमध्ये पाहिलं तरी इमर्सनचे हे सिन्स एकट्यानेच शूट व्हायचे हे लक्षात घेतलं तर त्याच्या फोनवरच्या संभाषणामधल्या 'रिऍक्शनस' अजून आवडायला लागतात. फिंचच्या पात्राला एका अपघातामुळे आलेलं अपंगत्व दाखवायला त्याने घेतलेलं बेरिंग फ्लॅशबॅकमधले, अपघाताआधीचे सीन्स आले की जास्त अधोरेखित होतं आणि दाद मिळवून जातं. 
                                                       (Image from: https://cutt.ly/SrhUHp1)
या दोघांशिवाय सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे सगळेच अभिनेते कमाल आहेत. एमी एकर अर्थात 'रूट'ची भूमिका ही सुरुवातीला केवळ एक-दोन स्वतंत्र भागांपुरती लिहिली होती पण पुढे तिची लांबी वाढून तिसऱ्या सीझनमध्ये तिला महत्व येतं. या व्यक्तिरेखेच्या परिस्थितीला रिऍक्ट व्हायच्या पद्धती अगदी शेवटपर्यंत काहीशा बेभरवशाच्या राहतात पण 'तुमच्या काम करण्याच्या पद्धतींपेक्षा काम करण्याचा हेतू किती शुद्ध आहे ते महत्वाचं' अशा साधारण तत्वांवर ती 'टीम मशीन'ची मेंबर बनते. अजून एक- एन्रिको कोलांटनीचा कार्ल एलायस- याच्या व्यक्तिरेखेचा ग्राफसुद्धा काहीसा रूटसारखा.आधी 'टीम मशीन' च्या विरोधात असणारा हा न्यूयॉर्कच्या गुन्हेगारी विश्वाचा बादशाह नंतर अज्ञातवासात राहून रीस-फिंचची मदत करतो ते काही सीन्स छान जमलेत. सरतेशेवटी उल्लेख लायनल फस्को अर्थात केविन चॅपमनचा. वाईट संगतीत राहून भ्रष्ट्र झालेला, पण वृत्तीने चांगला असणारा, सगळ्याच लार्जर दॅन लाईफ, जिनियस' पात्रांमध्ये काहीसा अर्धवट वाटणारा, 'टीम मशीन'साठी खूप सुरुवातीपासून मदत करूनही मशीनच्या अस्तित्वाबद्दल अगदी शेवटपर्यंत अनभिज्ञ असणारा फस्को हा सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करतो असं मानायला हरकत नाही. स्वतःतले गुण आणि मुख्यत्त्वे मर्यादा त्याला पुरेपूर ठाऊक आहेत आणि त्या बोलून दाखवायला त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी POIचे सगळे भाग ५-६ वेळा तरी पहिले असतील, पण लक्षात राहणाऱ्या बऱ्याचश्या पंचलाईन्स फस्कोच्या वाट्याला आल्यायत. आता हे खरंच संवांदांचं क्रेडिट आहे की केविन चॅपमनच्या अभिनयाचं हे पाहणाऱ्याने ठरवायचं. याशिवाय कार्टरच्या भूमिकेत तराजी हेन्सन उत्तम पण POI नंतर तिने इतर अनेक चांगल्या भूमिका केल्यामुळे आता मला तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक वाटत नाही. सारा शाहीच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख टाळत नाहीये पण मला त्यातल्या त्यात कमी आवडलेल्या व्यक्तिरेखांमध्ये ती येते एवढंच लिहीन. इथेही नमूद करण्याचा मुद्दा हा की POI च्या काही लँडमार्क एपिसोड्समध्ये (रिलेव्हन्स, इफ-देन-एल्स, ६,७४१) सारा शाहीची व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे.
        २१व्या शतकातली पहिली दोन दशकं संपली. आधीच्या २ शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाची जेवढी प्रगती झाली नसेल तेवढी गेल्या दोन दशकात झाली. आज जगातले बहुतांश लोक या न त्या मार्गाने टेक्नॉलॉजीवर दैनंदिन गरजांसाठी अवलंबून आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोन्स या दोन गोष्टींनी संपूर्ण जग लिटरली आपल्या बोटांशी आणून ठेवलंय. मित्रांशी संपर्कात राहण्यासारख्या मानसिक गरजांपासून ते बँकेचे व्यवहार करण्याच्या आर्थिक गरजांपर्यंत इंटरनेटवर आपण विसंबून आहोत. 'तुमच्या आईपेक्षा गुगलला तुमच्याबद्दल जास्त माहीतीय' असा आशयाचा मेसेज आपण काहीतरी नक्कीच वाचलाय! म्हणजे खरंच- गुगलला किंवा तत्सम कुठल्या सिस्टमला अशी खरंच पाळत ठेवता येत असेल? पाळत ठेवायची म्हणजे आपल्याविषयीची ही सगळी माहिती नुसती जमा नाही करायची तर तिचा सारासार अभ्यास करून त्यातून अनुमानं काढायची, पुढे काय घडू शकेल याचे ठोकताळे बांधायचे आणि त्याप्रमाणे पुढच्या घडामोडींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. या सिस्टमचं सर्वमान्य नाव म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच साधारण माहिती असेल. आपण मित्राला 'प्रायव्हेट' चॅटवर विचारलं की नवीन 'प्लेस्टेशन'चा रिव्ह्यु काय ए? या वर्षी चांगला सेल असेल तर घ्यायचा विचार आहे' की लगेच आपल्याला गुगल, फेसबुकवर प्लेस्टेशन, एक्सबॉक्स वगैरे जाहिराती दिसायला लागतात. आपल्या लाईफमध्ये काही 'प्रायव्हसी' राहिलीच नाहीये वगैरे सात्विक संताप करण्यापलीकडे आपली मजल जात नाही. काही लोक 'टेक्नॉलॉजी कसली डेव्हलप झालीये' म्हणून कौतुकंसुद्धा करतात. नाही म्हणजे कौतुक वाटायला काही हरकत नाहीये पण हे किती 'भीतीदायक' आहे याचा सिरियसली विचार केलाय का आपण? POIचा चौथा आणि पाचवा सिझन साधारण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. POI बद्दल भरभरून लिहावंसं वाटत होतं त्याला एकूणच एक चांगला टीव्ही शो बघितल्याचं कौतुक हा एक भाग होता आणि AI वर थोडं लाऊड थिंकिंग हा दुसरा हेतू होता.
काही वेळापूर्वी जाणवलं की हेच लिखाण बरंच लांबलंय म्हणून थोडा  ब्रेक घेऊन चौथ्या-पाचव्या सिझनबद्दल एक वेगळा भाग लिहितो. तूर्तास एवढंच पुरे!

क्रमशः

Friday, December 25, 2015

लागी करेजवा कटार!

मी अकरावी-बारावीत असताना कधीतरी 'झी मराठी' ही तशी नवखीच असणारी वाहिनी एक अप्रतिम प्रयोग करायची- त्याचं नाव 'नक्षत्रांचे देणे'. आरती प्रभू, पुल, विंदा करंदीकर, श्रीनिवास खळे, पं. जितेंद्र अभिषेकी अशा कित्येक थोर थोर लोकांच्या समग्र कारकीर्दीची काही तासाची सफर! 'नक्षत्रांचे देणे'मुळे आमच्या पिढीच्या कित्येकांची नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताशी नव्याने ओळख झाली. मग जाणवलं- शास्त्रीय संगीत लहान असताना वाटायचं तेवढं काही बोरिंग नाहीये! पुढे काही वर्ष मराठी सारेगमप बघताना जुनी मराठी गाणी, नाट्यपदं पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायला लागली आणि मग त्यात मजा यायला लागली! मग एखादा राहुल सक्सेनासारखा सुरेख आवाज असणारा अमराठी माणूस जेव्हा 'दाटून कंठ येतो' किंवा 'सुरत पिया की' गायचा तेव्हा आजी म्हणायची- "अरे वसंतरावांची सर कशी येईल त्याला?" मग घरातल्या मोठ्या पिढीकडून संगीत नाटकं, त्याचे तासनतास चालणारे प्रयोग, मंत्रमुग्ध करणारी गाणी वगैरे सगळं ऐकायला मिळायचं! तेव्हा कधीतरी प्रश्न पडला होता- की आपल्याला यातलं काही कधीच बघायला मिळणार नाही का? आणि मिळालं तर ते त्या तोडीचं, ताकदीचं असेल का? आज चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'च्या निमित्ताने त्या प्रश्नाला उत्तर मिळालंय! आणि उत्तर साधसुधं नाही- चांगलंच दमदार आहे!

वसंतराव नाही पण 'क्लोसेस्ट पॉसिबल'* चंद्रकांत लिमयेंच्या खांसाहेबांच्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकाचा व्हिडीओ 'प्रिझम' कंपनीमुळे 'युट्युबवर' मोफत उपलब्ध आहे! त्यातली गाणी ऐकायला नाटक मागे कधीतरी पाहिलं होतं. संगीताच्या बाबतीत तर कधी वाद नव्हताच पण तेव्हा नाटकाच्या कथेत काही मी विशेष रस घेतला नव्हता. नाटकातल्या सदाशिव या पात्राच्या शब्दबंबाळ लाडिकपणामुळे नाटकाची गोष्ट भिडली वगैरे नाहीच कधी! सिनेमा कट्यार आला-- डल्लास-फोर्टवर्थच्या महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने अमेरिकेत पहायलाही मिळाला! गाणी त्याआधी महिनाभर 'युट्युब' कृपेने घरात वाजत होतीच! सिनेमा बघून झाल्यावर पुन्हा एकदा घरी येउन नाटक पाहिलं-- यावेळी निव्वळ कथेसाठी! मग कळत-नकळत मनात दोन्हीची तुलना झाली- नाटक त्याच्याजागी कितीही श्रेष्ठ असलं तरी सिनेमा जास्त का आवडला, किंवा नाटकात काय जास्त चांगलं होतं  हे लक्षात आलं. सो डोक्यातलं सगळं काढून वैश्विक पटलावर मांडायला हा खटाटोप!

सर्वप्रथम मराठी चित्रपटाचा एवढा भव्य-दिव्य अवतार बघून कौतुक वाटलं- छायाचित्रण, पेहराव, ब्रिटीशपूर्व भारताचं चित्रण (इन्क्लुडिंग शाही दरबारातला इंग्रज अधिकारी), पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा** सर्वच काही अप्रतिम! पात्रं आणि लोकेशन्सच नव्हे तर नाटकात कुठल्याही बाजूने पाहिली तरी 'शाही' न वाटणारी कट्यार सिनेमात मात्र सुरेख सादर केलीय- तिला शाही म्हणावसं वाटतं! नाटकाच्या कथेत खांसाहेब सर्वेसर्वा आहेत तर चित्रपटात पंडितजींनाही जवळपास बरोबरीचा रोल मिळालाय. मगाशी लिहिलं तसं- नाटकातला सदाशिव त्याच्या निरागसपणामुळे डोक्यात जातो- तर सिनेमातला काहीसा आक्रमक सदाशिव 'हिरो' म्हणून आवडून जातो! नाटकाची संपूर्ण कथा जरी दोन घराण्यांच्या द्वंदाबद्दल असली तरी त्यात संगीत 'जुगलबंदी' प्रकार फारसा वापरलेला नाही-- त्यामुळे दोन्ही गायकीतला फरक ठळकपणे अधोरेखित व्हायला माझ्यासारख्या शास्त्रीय संगीतात निरक्षर असणाऱ्या माणसाला जड जातं- उलट चित्रपटात दोन प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष जुगलबंदी झकास झालीय. संगीत शैलीतला फरक, कव्वालीतल्या शब्दांमुळे सहज स्पष्ट होणारा दोन्ही व्यक्ती-प्रवृत्तीमधला फरक हे छानच अधोरेखित झालंय! 'आफताब हुसेन बरेलीवाले' नाटकात छान मराठी मराठी बोलतात- 'या भवनातील गीत पुराणे', 'तेजोनिधी लोहगोल' वगैरे अस्खलित मराठी गाणी गातात हेच न पटण्याजोगं आहे! याउलट सिनेमात खांसाहेब एकही वाक्य मराठीत बोलत नाहीत, 'घेई छंद'चा अपवाद सोडल्यास मराठी गाणंही गात नाहीत-- हे रेट्रोस्पेक्टीव्ह तुलना करताना जास्त आवडून जातं. मोजक्या ठिकाणी खांसाहेबांचा अपवाद सोडला तर नाटकातली सगळीच पात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एककल्ली-एकमितीय वाटतात- सिनेमात मात्र पंडितजी, सदाशिव आणि खांसाहेबांचे भावनिक चढ-उतार कमी-अधिक प्रमाणात ठळकपणे येतात. शाही मैफिली असोत किंवा पंडितजींच्या गाणं न म्हणता निघून जाण्यातलं गूढ असो- यांनी सिनेमा मनोरंजक करण्यात, त्यातल्या नाट्यमयतेत भरच पडलीय! दरबारातल्या इंग्रजाचा, आपल्याकडे कुप्रसिद्ध ब्रिटीश नीतीचा झकास वापर सिनेमात झालाय- त्यासाठी पटकथाकारांचं विशेष अभिनंदन. सिनेमाची कथा पाहता त्यात खांसाहेबांच्या बेगमचं पात्र आवश्यक होतं- आणि त्या पात्राला स्क्रीनटाईम मिळाल्यामुळे निदान आपल्याला त्याचा 'पॉइन्ट ऑफ व्यू' कळतो (चुकीचा वाटला तरीही). सदाशिवाने खांसाहेबांकडे 'गडी' म्हणून काम करत गाणं 'शिकणं' हा धागा जरी सिनेमा आणि नाटकात सारखा असला तरी कथेला त्या वळणापर्यंत आणणाऱ्या घटना वेगळ्या आहेत आणि पुन्हा एकदा चित्रपटातलं स्पष्टीकरण- कथेच्या आणि पात्रांच्या दृष्टीकोनातून योग्य वाटतं- उलट नाटकातला सदाशिवाला गळ्याच्या वर कुठला अवयव आहे की नाही असा प्रश्न पडावा असा त्याचा वावर आहे. नाटक आणि सिनेमाच्या शेवटाचा भावार्थ जरी सारखा असला तरी नाटकात ना खांसाहेबांबद्दल सहानभूती वाटते ना सदाशिवबद्दल- उलट सिनेमात कडूगोड शेवट आहेच पण खांसाहेबांना पण माफ करून टाकायची इच्छा होते.

निव्वळ सिनेमातल्या अभिनयाबद्दल बोलायचं तर सगळ्यांची कामं चोख--पण विशेष आणि पहिला उल्लेख सचिन पिळगावकरांचा-- गेल्या ५-६ वर्षात त्यांची आत्मकेंद्री, अहंकारी 'महागुरू' म्हणून जेवढी थट्टा झाली असेल तेवढंच या अहंकारी, आत्मकेंद्री भूमिकेसाठी त्यांचं भरभरून कौतुक करायला हवं- सचिन यांच्या उर्दू अभ्यासाचा एखाद्या भूमिकेसाठी एवढा योग्य वापर याआधी कधीच झाला नसेल- सो कास्टिंग टीमचं विशेष कौतुक! शंकर महादेवन यांचा अभिनय त्या ताकदीचा वगैरे नसला तरी या सिनेमापुरता उत्तम आहे. बाकी सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे यांना अभिनय जमतोच! अमृता खानविलकर मला एरवीही आवडतेच-- सो वेगळं बोलायला नकोच! सुबोध भावेंचं दिग्दर्शकीय पदार्पण जबरदस्त- त्यांना एक पूर्ण लांबीची भूमिका असल्याने असेल किंवा मी चित्रपटाच्या प्रमोशन्सबद्दल खूप वाचलं, पाहिलं आहे म्हणून असेल पण त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'वावर' चित्रपट पाहताना जाणवतो. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट- संगीत!! सगळंच लिहायचं, बोलायचं झालं तर गीतं आणि संगीत यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागेल- पण थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर जुनी गाणी अप्रतिम आणि नवीन गाणी त्यात चपखल बसतात- शंकर-एहसान-लॉयची गाणी पं. जितेंद्र अभिषेकींच्या गाण्यांबरोबर बेमालूम मिसळून एका चित्रपटात किंवा अल्बममध्ये एकसंध वाटू शकतात हे मला काही वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर माझा अजिबात विश्वास बसला नसता-पण 'मन मंदिरा', 'दिल की तपिश', कव्वाली ही गाणी अफाट आहेत! 'या भवनातील गीत पुराणे' ऐवजी त्याच इमोशनचं 'सूरसंगिनी' सुंदरच! शेवटचा उल्लेख शंकर महादेवन, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचा--हे तिघं जर गायला नसते तर 'कट्यार-' आहे त्या उंचीचा सिनेमा झाला नसता. महेश काळेच्या आवाजातलं शेवटचं गाणं, त्याचे शब्द, संगीत यांनी केलेला शेवट जबर! मराठी शास्त्रीय संगीतातलं पहिलं 'RAP' गाणं म्हणून या गाण्याचा यापुढे उल्लेख करायला हरकत नाही!

अर्थात सिनेमात सगळंच भारी होतं असंही नाही! सिनेमातल्या खांसाहेबांना आवाज वसंतरावांचा डायरेक्ट वारसा असणाऱ्या राहुल देशपांडेंचा- पण नाटकाच्या तुलनेत त्यांच्या पात्राला गाणी कमी! राहुल देशपांडेंचा चाहता म्हणून त्यांच्या आवाजात अजून एखाद गाणं आवडलं असतं- अर्थात इथेही लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा 'दिल की तपीश', 'सूरसंगिनी' अशी दोन नवीन गाणी त्यांनी सुपर्ब गायली आहेत तर नाटकातली जवळपास सगळी जुनी गाणी शंकर महादेवन (पंडितजी) गातात! सिनेमात स्त्री पात्रांना व्यवस्थित भूमिका जरी असल्या तरी कुठलीही गाणी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीत- उलट फातिमा नाचताना दिल की तापिश गुणगुणते तेव्हाचं 'लीप सिंक' अजिबात जमलेलं नाही! इतर आलाप आणि ताना असलेल्या सगळ्या गाण्यांना इतकं व्यवस्थित 'लीप सिंक' असल्याचं कौतुक वाटत असतानाच अशी चूक खटकते आणि लक्षात राहते! सदाशिवचं एकूण पात्र जरी इथे जास्त पटणारं असलं तरी त्याची पार्श्वभूमी चित्रपटात फारशी नाही- तो मधली वर्षं कुठे होता वगैरेचा उल्लेख नाही! नाटकातले चांद-उस्मान निदान साथ द्यायला का होईना पण गातात, सिनेमातले चांद-उस्मान खुनशी, बिनडोक वाटतात- ते कधीच गाताना दिसत नाहीत. उमा, सदाशिव, झरिना पात्रांमधला व्यक्त-अव्यक्त प्रेम त्रिकोण थोडा अनावश्यक वाटतो. युट्युबवर वारंवार गाण्याचे व्हिडिओ पाहताना कळलेली आणि मग कायम खटकलेली गोष्ट- हे अगदीच बारीक आहे पण-- 'सूर निरागस हो' मधील गणपतीचं जानवं 'अपसव्य' आहे आणि I have seen it so I can't 'unsee' it!

अजून बरंच काही आठवतंय, लिहावसं वाटतंय पण तूर्तास एवढं पुरे! या चित्रपटाची खूप प्रशंसा, समीक्षा आधीच झालीय आणि पुढेही होत राहील तेव्हा त्यात माझ्या इतक्याच पोस्टची भर पुरे! नाटक, सिनेमा हा रंगभूमीच्या किंवा कॅमेराच्या चौकटीत बसवायचा असतो आणि मग लेखक-दिग्दर्शक म्हणून व्यक्त होण्यावर बंधनं असतात. नाटकाला ही बंधनं सर्वाधिक लागू होतात. एखादी कथा-कल्पना नाटकातून लोकांपुढे मांडताना त्याला असणारी रंगभूमीच्या लांबी-रुंदीची बंधनं, नाटक किती प्रेक्षकांकडे पोहोचू शकतं याची बंधनं, दीर्घकाळ प्रयोग करायला नट-नट्यांच्या उपलब्धतेवर बंधनं, लांबवर खेड्यापाड्यात जाऊन नाटक करायचं तर दळणवळणाच्या साधनांची बंधनं! कपडेपट, नेपथ्य यांची मेंटेनन्स-- एक ना दोन शेकडो प्रश्न! नाटकाचं यशापयश हे या सगळ्या-सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं--कधी नाटकाचे विषय कालबाह्य होतात कधी कलाकार-- आणि मग पुढच्या पिढीला सांगायला फक्त आठवणी असतात! चित्रपट हा त्या मानाने दीर्घायुषी प्रकार आहे- एकदाच काय ते काम करायचं पण ते अशा दर्जाचं हवं की अजून काही दशकांनी तो चित्रपट तेव्हाच्या पिढ्यांना तेवढ्याच ताकदीचा वाटायला हवा! 'कट्यार काळजात घुसली' सारख्या कलाकृतीचा चित्रपट होण्याचा मला सगळ्यात मोठा हाच फायदा वाटतो. ही कलाकृती बनवल्याबद्दल सुबोध भावे, झी मराठी आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
सुबोध भावे, तुम्ही बालगंधर्व, लोकमान्य टिळक मध्ये अभिनयाने आणि कटयारच्या दिग्दर्शनाने स्वतःकडून खूप अपेक्षा वाढवून घेतल्या आहेत! सो पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! 


तळटीपा:
*राहुल देशपांडेंनी साकारलेले (भावेंनीच दिग्दर्शित केलेले) खांसाहेबसुद्धा 'एज क्लोस एज इट गेट्स'-- पण तो प्रयोग पाहण्याचा योग अजून आलेला नाही!
**पुष्कर श्रोत्रींच्या काविराजाच्या केशभुषेवर मात्र कमीत कमीत वेळ आणि पैसा खर्च झालाय असं वाटलं एवढाच एक न-सन्माननीय अपवाद!

Monday, March 11, 2013

न-लोकोत्तर! अ-आदरणीय!!

                                      ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।  

गेल्या अनेक शतकांच्या इतिहासात कला-क्रीडा-राजकारण या सगळ्या क्षेत्रात अनेक श्रेष्ठ मंडळी भारताच्या इतिहासात होऊन गेली. आपल्या राजकारणाला आर्यचाणक्याचा वारसा आहे, कलेच्या क्षेत्रात कालिदासाच्या ग्रंथसंपदेपासून ते दादासाहेब फाळकेंच्या सिनेसृष्टीपर्यंत आपल्याकडे मिरवण्यासारख्या खंडीभर गोष्टी आहेत! क्रीडा क्षेत्रात खूप प्राचीन नावं नसली तरी हॉकीचा जादुगार ध्यानचंद ते क्रिकेटचा देवबाप्पा सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडू या देशासाठी खेळले आहेत! मात्र गेल्या दशकाकडे जरा तिरकस नजरेने पाहिलं की या सगळ्या क्षेत्रात काही अफाट 'न-लोकोत्तर', 'अ-आदरणीय' मंडळी वावरताना दिसतायत (मराठी व्याकरणात न-लोकोत्तर आणि अ-आदरणीय हे शब्द नाहीत हे मला माहितीय पण तरी मी मुद्दाम लिहिलेत. स्पष्टीकरण पुढे लिहीनच). यातल्या काही  'रत्नां'बद्दल लिहिण्याचा हा खटाटोप! राजकारण क्षेत्रात राजपुत्र चि. राहुल गांधी, क्रीडा क्षेत्रात श्री श्री श्री सर रवींद्रसिंहजी जडेजा, आणि कलाक्षेत्रात (?) थुसार कपूर (यांना श्री. , कु., चि. यातलं नेमकं काय लागू होतं याची कल्पना नसल्याने ? लिहिलं असून एका आकडेज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावाचा उच्चार आम्ही 'थुसार' असा करतो) हीच ती न-लोकोत्तर, अ-आदरणीय मंडळी! (मी हे नमूद करू इच्छितो की या तिन्ही क्षेत्रात अशी माणसं शेकड्याने असतील पण या तिघांवर माझा 'विशेष जीव' आहे)

या प्रत्येकाने काहीही विशेष करतासुद्धा यांच्याबद्दल जेवढं लिहिलं, बोललं जातं ते पाहून मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रीय स्तरावर लोकांना माहीत असलेली ही तिन्ही माणसं निष्क्रिय माणसं आहेत का? उत्तर 'नाही'..पण यातल्या कुणीतरी प्रचंड कौतुकास्पद कामगिरी केलीय का? उत्तर 'नाही'..ही सगळी हुशार, जिनियस माणसं आहेत का? उत्तर 'नाही'.. ही सगळी मठ्ठ माणसं आहेत का? तर याचंही उत्तर 'नाही'! यातल्या कुणीच अनादर वाटावा, चीड यावी अशी कामगिरी (अजूनतरी) केलेली नाही पण म्हणून त्यांच्यातल्या कुणाबद्दलच मला जरासुद्धा आदर वाटत नाही म्हणून अ-आदरणीय. या सगळ्यांचीच आत्तापर्यंतची कामगिरी पाहून, वक्तव्यं ऐकून कधी गालातल्या गालात तर कधी पोट धरधरून हसायला येतं, यदाकदाचित यातल्या कुणीही काही कर्तुत्व गाजवलं तरी ते 'लक बाय चान्स' असेल असं मला वाटतं म्हणून हे तिघे एकविसाव्या शतकातले 'न-लोकोत्तर' पुरुष आहेत!  

चि. राहुल गांधी हे राजघराण्यात जन्माला आले हे त्यांचं कर्तुत्व नाही (मणिशंकर अय्यर यांना तसं वाटू शकतं). दाढीचे खुंट वाढलेला चेहरा घेऊन आणि खादीचे कपडे घालून आजी-पणजोबांच्या पुण्याई(?)वर संपूर्ण देशभर भटकणाऱ्या ४३ अ-संसारी, युवा पुढाऱ्यामध्ये आदर वाटावा असं काहीच नाही! त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्यांच्या नागरिकत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत. देशाच्या अजून अस्तित्वात असलेल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची धुरा (उपाध्यक्ष) त्यांना देण्यात आली आणि या पक्षाच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी जीव- तोडून उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला पण पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही. त्यांनी या पराभवाची जबाबदारी मान्य केली (लॉल) आणि पुन्हा त्यांचा उदोउदो झाला. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काही चांगलं केलं तरी कौतुक होत नाही..पण राजपुत्राची गोष्टच वेगळी..त्याच्या हरण्याचं पण कौतुक करायला लोक तयार असतात ही शोकांतिका! भ्रष्टाचार, दहशतवाद या महत्वाच्या विषयांवर त्यांनी कधीच ठोस मतं मांडलेली नाहीत. तूर्तास ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी तयारी करत असल्याचं समजतं. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशातल्या निकालांची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होवो अशी माझी अपेक्षा आहे (पण याचबरोबर मुलायम-माया-करुणा-ममता असे सोज्वळ शब्द नावात असलेल्या कोणत्याही नेत्याच्या पक्षाकडे देशाच्या राजकारणाच्या नाड्या जाऊ नयेत ही कळकळीची प्रार्थनासुद्धा आहे)

थुसार कपूर हेसुद्धा घराणेशाही कोट्यातून सिनेसृष्टीत आलेल्या फरदीन-उदय-झायेद-हर्मन यांच्यातलं एक नाव, जे बालाजीच्या कृपेने आजही तग धरून आहे! 'मुझे कूच कहना है' अशा नावाच्या सिनेमातून चंदेरी दुनियेत आलेल्या थुसारला काय सांगायचं होतं ते अजून इतक्या वर्षांनीसुद्धा कुणाच्या बहुतेक लक्षातच आलेलं नाहीये. गोलमाल नामक चित्रपट मालिकेत केलेली मूक-बधिर 'लकी'ची भूमिका लोकांमध्ये बरीच फ़ेमस आहे. या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा पुरस्कार वगैरे पण मिळालाय जे बघून त्याच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे आपण पाहिलंय (लॉल). खरंतर त्याचा केकाटणे-गोंगाट स्वरूपी अभिनय पाहून 'अभी नय' भाई बस करो असं म्हणायची खूप इच्छा होते पण पुन्हा एकदा आपलं ऐकायला कुणीच नसतं ही शोकांतिका! 'खाकी' हा त्याची  भूमिका असलेला एकमेव चित्रपट सोडून मी त्याचा एकही चित्रपट सिरीयसली बघू शकलेलो नाही..'शूटआउट एट लोखंडवाला' नामक सिनेमात त्याला कुख्यात शार्प शूटर दिलीप बुवाची भूमिका करताना पाहणं हा माझ्या मते त्या गुंडाचा अपमान होता. तर असे गुंडाचे आणि हिरोचे 'जबरदस्त' रोल करणाऱ्या थुसारला अमेरिकेत कुठल्यातरी पब का क्लबच्या बाहेर तो 'अंडर-एज' असल्याचा संशय येउन अडवलं होतं हे वाचल्याचं आठवून पण मी 'लोळतो'! स्वतःच्या नावामध्ये एक निष्कारण 'h' घालून तो थांबलेला नाही..नुकतंच त्याच्या सांगण्यावरून एका चित्रपटाचं नाव "ब"जाते रहो ऐवजी "भ"जाते रहो केलं गेलंय… (पुन्हा लॉल). सरतेशेवटी थुसार हा एक 'अभिनेता'(?) आहे आणि तो ज्या कुठल्या भूमिका करेल त्याला तो त्याच्या अनोख्या,विनोदी शैलीतच करणार हे मी गृहीत धरलंय आणि त्याला कधीतरी काहीतरी जमेल ही शक्यता बाद केली आहे.      

सरतेशेवटी, लास्ट बट ऑफकोर्स नॉट द लीस्ट- श्री श्री श्री सर रविन्द्रजी जडेजा! मुळात मी या महा-पुरुषांबद्दल आत्ता अचानक लिहायला घेतलं याचं मुख्य कारण 'सर' आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतर्क्य, अचाट, अफाट, अबब कामगिरीने मला इतक्या दिवसांनी लिहायला प्रोत्साहन दिलंय! त्यांच्या केशरचनेपासून त्यांच्या नृत्यकौशल्यापर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालंय. निव्वळ ३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'बॉल ऑफ द सेन्चुरी' टाकलाय आणि समस्त क्रिकेट विश्वाला 'आर्ट ऑफ लिविंग' चा धडा घालून दिलाय! स्थानिक कसोटी सामन्यात त्यांनी ३०० धावांचा बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी धावा केल्या नाहीत की त्यांची चेष्टा होते जी त्यांच्या पंख्यांना मान्य नाही! सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 'जड्डू' नावाचं एक हॉटेल पण काढलंय. सर बहुचर्चित IPLच्या पहिल्या सिझनमध्ये विजेत्या राजस्थान रॉयल संघात होते. हा संघ इतर सगळ्यांपेक्षा 'लिंबूटिंबू' मानला गेला होता पण तेव्हा सरांबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. सरांमुळे राजस्थान जिंकलं. सर भारतीय संघात आल्यापासून आपण एकही कसोटी सामना हरलेलो नाही. थुसार आणि चि. गांधी यांची इतकी थट्टा केल्यावर मी सर जडेजा यांच्याबद्दल असं काहीतरी लिहू शकेन अशी मला अपेक्षा होती. पण माझी हिम्मतच होत नाहीये..शेन वॉर्न सारखा महान खेळाडू सरांना 'रॉकस्टार' म्हणतो तर मी बापडा त्यांना काय विशेषणं लावणार? (मराठीत 'रॉक' म्हणजे दगड नाही का?)  

अशा काही घटना आहेत ज्या कधीच घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. १) सर जाडेजांना 'विस्डेन' चा 'क्रिकेटर ऑफ द यिअर' पुरस्कार मिळणं २) थुसार कपूरला अभिनयाचं ऑस्कर मिळणं..आणि ३) चि. राहुल गांधींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणं. या सर्व अ-आदरणीय लोकांची गेल्या पाच-सात वर्षातली कामगिरी आणि मी उल्लेख केलेल्या सर्व पुरस्कारांची गेल्या कित्येक दशकांमधली क्रेडिबिलीटी पाहता या सगळ्या गोष्टी अशक्यच वाटतायत..पण काही गोष्टी मात्र नक्की शक्य आहेत. १) सर जडेजा १५-२० कसोट्या आणि अजून ३०-४० वन डे खेळून आधी कमेंटेटर आणि नंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष बनणार २) थुसार कपूरला २०२० साली पद्म पुरस्कार आणि २०३५ सालचा अभिनयाचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळणार आणि ३) चि. गांधींना इतर जवळपास सर्व माजी 'खांग्रेस' पंतप्रधानांसारखा 'भारतरत्न' मिळणार (ही शेवटची गोष्ट कधीच होऊ नये अशी खरंच खूप खूप जास्त इच्छा आहे म्हणून ती लिहिणार पण नव्हतो पण गेल्या सहा-सात दशकातला कारभार पाहता या सगळ्या विनोदी कल्पनांमध्ये भीषण वास्तवाचा उल्लेख असावा असं वाटलं म्हणून लिहिली) 

मला शाळेत नेहमी शिकवलं गेलंय की कोणत्याही लिखाणाची सुरुवात आणि शेवट चांगला असला तर वाचणाऱ्यांच्या मनात त्याचा 'ठसा' उमटतो. हे डोक्यात ठेवून लिहायची सुरुवात करताना चाणक्य, तेंडुलकर ही नावं लिहिली. पण शेवट गोड कसा करू? कडू, खारट असं काही चुकून खाल्लं गेलं की साखर खाऊन तोंड गोड करता येतं पण चुकून खूप गरम चहा-कॉफीचा घोट घेऊन जीभ भाजली की काहीच करता येत नाही…पुढचे काही तास, दिवस कशालाच चव लागत नाही. थुसार, सर जडेजा आणि चि. गांधी यांची इतकी स्तुती वाचून कुणी शेवटपर्यंत हे सगळं वाचणारे का याचीच खात्री नाहीये! पण इतकंच म्हणतो की आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात एकतरी अशी व्यक्ती सापडते जिच्याशी आपलं कधीच पटत नाही. जिव्हाळा नसतो, भांडणंदेखील नसतात पण तरी उगाचच आपल्याला काहीतरी खटकत राहतं! अशा मला खटकणाऱ्या माणसांबद्दल जाहीर मंचावर 'स्तुती' करण्याची माझी हौस मी भागवून घेतली. त्यांची उघडपणे थट्टा करण्यात कोणाच्याही आणि 'कोणत्याही' भावनांना ठेच लागली असली तर सॉरी पण 'नो सॉरी'!! येत्या काळात ही मंडळी देशाचं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचं अतोनात नुकसान न करता आपल्याला (स्पेसिफिकली मला) अशीच हसवत राहतील अशी बालाजीचरणी प्रार्थना!

पुन्हा एकदा-
                             ।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।

Tuesday, September 4, 2012

लेहानच्या कथांचे शिणेमे

               आपल्याकडे 'हार्डकोर' इंग्लिश नोव्हेल्स वाचणारे लोक तसे कमी आहेत पण त्या मानाने हॉलीवूडचे शिणेमे 'भयंकर' आवडीने पाहणारे असंख्य आहेत..अस्मादिक अशाच लोकांपैकी एक! (हे सांगण्यात मला कोणताही अभिमान किंवा वैषम्यही वाटत नाही). प्रसिद्ध पुस्तकांवरून शिणेमा बनवणं हा प्रकार नवीन नाही. बऱ्याच वेळा 'पुस्तकच भारी आहे रे..मुव्ही ओके' अशा कमेंट्ससुद्धा आपण सर्रास ऐकतो. मराठमोळ्या 'शाळा'पासून 'दा विन्ची कोड' पर्यंत सगळीकडे हाच प्रकार. पुस्तक वाचताना आपल्या मनाचा पडदा असतो आणि वाचणारा त्याला वाटेल तसं कथानकाचं काल्पनिक चित्र मनात उभं करत असतो. लेखकांच्या दृष्टीकोनातून बोलायचं तर प्रदीप दळवींनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं- 'नाटक, सिनेमा या माध्यमांना बरीच बंधनं असतात..सगळ्या कल्पना चित्रित करणं, सादर करणं शक्य नसतं..म्हणून कादंबरी हे माध्यम मला आवडतं..त्यात मनसोक्तपणे हवं ते लिहिता येतं'. निव्वळ याचं कारणाने आपली कल्पना पूर्ण ताकदीने पडद्यावर मांडता यायला तेवढं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर जेम्स कॅमेरोन 'अवतार' बनवायला काही वर्षं थांबला होता. मग पुस्तकांवरून चांगले सिनेमे बनतच नाहीत का? असं मुळीच नाहीये! नाहीतर 'लॉर्ड ऑफ द रिंग्स' मालिकेतले ३ आणि 'हॅरी पॉटर' मालिकेतले ८ सिनेमे बनले नसते, त्यांचा उदोउदो झाला नसता! डेनिस लेहान हा 'नवीन जगा'तला प्रसिद्ध 'बेस्टसेलर' लेखकु. त्याची बोस्टन शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली जवळपास डझनभर पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने ती वाचायचा योग कधी आला नाही पण त्याच्या तीन पुस्तकांवरून बनलेले सिनेमे मात्र मी आवडीने पहिले आणि पुस्तकांवरून नक्कीच चांगले सिनेमे बनू शकतात हे जाणवलं. मिस्टिक रिव्हर, गॉन बेबी गॉन आणि शटर आयलंड हे ते तीन सिनेमे. तिन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी बनवलेले! कथावस्तू वेगळ्या! कलाकार वेगळे. मुळात हॉलीवूडचा 'शिणेमा' पाहत असताना त्याचा लेखकू कोणे याचा फार कुणी विचार करतो का हेसुद्धा मला माहित नाही. केलाच तर त्या लेखकुचं एकही पुस्तक न वाचता त्याच्या पुस्तकांवर आणि त्यांच्यावर बनलेल्या 'शिणेमां'वर असा ब्लॉग लिहावा की नाही तेसुद्धा माहित नाही! पण तरी मी लिहितोय. 


'गॉन बेबी गॉन' हे लेहानने पॅट्रिक किंझी आणि  ऍन्जलो जेनेरो या गुप्तहेर द्वयींवर लिहिलेलं चौथं पुस्तक (टोटल अर्धा डझन आहेत). अमेंडा नावाच्या चार वर्षाच्या मुलीचं अपहरण होतं. मुलीची मामी परिस्थितीचं गांभीर्य वाढवून पोलीस तपास करत असतानासुद्धा ही केस पॅट्रिक आणि  ऍन्जलोला देते आणि पोलिसांना या दोघांना सहकार्य करणं भाग पडतं. मुलीची आई 'सिंगल मॉम', ड्रग्स घेणारी, सिगरेट-दारू पिणारी थोडक्यात मुलीबद्दल फारशी आपुलकी नसणारी बाई आहे. मामा आणि मामीने आईच्या गैरहजेरीत अमेंडाची पोटच्या पोरीसारखी काळजी घेतलीय. दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी या केसमध्ये तपास करतायत. पॅट्रिक आणि ऍन्जीने केसवर काम करायला सुरुवात केल्यावर बोस्टनच्या ड्रग सर्कलमधले काही व्यवहार आणि त्यातली अमेंडाच्या आईची गुंतवणूक असे मुद्दे प्रकाशझोतात येतात. वरकरणी अमेंडाचा तपाससुद्धा लागतो परंतु तिला ताब्यात घेण्याच्या वेळी अनपेक्षित घटना घडतात आणि छोट्या अमेंडाला एका कड्यावरून संशयास्पद रीतीने फेकून देण्यात येतं. या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षीला असतात. कड्याखालच्या पाणवठ्यात अमेंडाचा मृतदेह मिळत नाही पण तिला मृत घोषित करतात. लहानग्या मुलीच्या झालेल्या अपहरण आणि मृत्यूमुळे गुंतलेले सगळेच पोलीस अधिकारी, पॅट्रिक, ऍन्जी सगळेच अस्वस्थ होतात. काही काळ जातो आणि अजून एका लहान मुलाचं अपहरण होतं. त्याचाही तपास लागतो. पण तो तरी जिवंत परत येतो का? हे सगळं पहायचं असेल तर शिणेमा पाहायला हवा! मी कथानक फारच ढोबळ लिहिलं आहे, मुख्य चित्रपट (कथा) मी लिहिलंय त्याच्या नंतर येते..पण तो भाग सस्पेन्स ओपन करेल म्हणून लिहिला नाही. गांभीर्याने विचार केला तर व्यक्तिरेखा एककल्ली आहेत असं लक्षात येतं आणि कदाचित म्हणून कथानकाचा शेवट पटला नाही तरी योग्य वाटतो. बेन अफ्लेक मला अभिनेता म्हणून कधीच थोर वाटला नव्हता..पण इथे त्याने दिग्दर्शक म्हणून चांगलं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही!  बाकी अभिनयाचं म्हणायचं तर फ्रीमन आजोबा, एड हॅरीस ही बाप मंडळी आहेत..त्यांचं वेगळं काय कौतुक करणार? एमी रायनला हेलीनच्या (अमेंडाची आई) भूमिकेसाठी ऑस्कर मिळालं म्हणून तिचा विशेष उल्लेख! 


'गॉन बेबी गॉन'च्या चारेक वर्ष आधी अजून एक 'लीजंड' क्लिंट इस्टवूड आजोबांनी लेहानच्या एका बेस्टसेलर पुस्तकावर, 'मिस्टिक रिव्हर' वर, त्याच नावाचा शिणेमा बनवला. बऱ्याच ऑस्कर्ससाठी नामांकन मिळालेल्या या चित्रपटासाठी अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता हे दोन पुरस्कार अनुक्रमे शॉन पेन आणि टीम रॉबिन्स यांना मिळाले. गोष्ट तीन मित्रांची! लहानपणी गल्लीत खेळत असताना त्यातल्या एकाला दोन विकृत लोक धरून नेतात आणि त्याचं लैंगिक शोषण करतात. तो तिथून कसाबसा पळून जातो पण त्या घटनेने अर्थातच त्याचं आयुष्य बदलून जातं. गोष्ट २५ वर्षं पुढे जाते. आता त्यातला एकजण पोलीस ऑफिसर आहे, दुसरा काही लहानसहान गुन्ह्यांसाठी शिक्षा होऊन जेलची हवा खाऊन आलाय आणि एक दुकान चालवतो. तिसरा (हो..तोच..लहानपणी....) आपल्या बायको आणि एका मुलाबरोबर राहतोय..त्याचा व्यवसाय नीटसा कळला नाही. दुकान चालवणाऱ्या मित्राच्या १९ वर्षाच्या मुलीचा खून होतो. त्याचा तपास पोलीस मित्र करत असतो. खून झालेल्या रात्री तिसरा मित्र रक्तबंबाळ होऊन घरी येतो. बायकोने विचारल्यावर एका पाकीटमाराने हल्ला केला आणि आपणही विरोध म्हणून त्याला मारून आलो म्हणून सांगतो..पण त्याची उत्तरं त्याच्या बायकोला विश्वासार्ह वाटत नाहीत. एव्हाना अंदाज आलाच असेल की गोष्ट पुढे कशी सरकणारे? बट लेम्मी टेल यु ऑल..हे सगळं दिसतं तितकं सोप्पं नाही..असतं तर ते लेहानने लिहिलं नसतं आणि इस्टवूडने  त्याच्यावर शिणेमा बनवला नसता! चित्रपट/कथा अर्थात मर्डर मिस्ट्री आहे पण त्याहीपेक्षा तिघांची भिन्न जीवनशैली, एकमेकांशी इतक्या वर्षांनी बदललेले संबंध, लहानपणी  घडलेली ती घटना आणि याशिवाय इतरही अनेक उप-कथानकं कथेत येतात आणि उत्तरार्धात ती महत्वाची होत जातात. गोष्ट संघर्षाबद्दल आहे..मित्राशी मित्राच्या, बायकोशी नवऱ्याच्या, बाप-लेकीच्या, आणि सगळ्यात महत्वाचं..स्वतःशी स्वतःच्या! लेहानच्या मिस्टिक कथानकाला आपला सलाम बुवा!


शटर आयलंड हा लेहानच्या पुस्तकावरून बनलेला लेटेस्ट (२०१०) सिनेमा. मिस्टिक रिव्हर लिहून झाल्यावर लेहानला जाणवलं की आपण बोस्टनच्या पार्श्वभूमीवर एखादी खून, अपहरण अशी गोष्ट लिहिणार हे बहुतेक वाचकांना अपेक्षित असावं. म्हणून त्याने भिन्न स्थळ, काळ, हॉरर आणि रोमान्स कम्बाईन करणारं 'गॉथिक' जॉनर अशी सगळी भट्टी जमवून शटर आयलंड लिहिल्याचं म्हटलं आहे. तो पुढे म्हणतो की 'या कथानकाचं वेगळेपण म्हणजे मी ही संपूर्ण कथा एका रात्रीतच कशी पूर्ण करायची हे लिहायला सुरुवात केल्यावर लगेच ठरवलं होतं जे मी आधी कधीच केलं नव्हतं.' गोष्ट अशी की १९५४ साली टेडी हा यु.एस. मार्शल ऑफिसचा अधिकारी त्याच्या नवीन साथीदारासह, 'चक' सह, बोस्टनजवळ एका बेटावर असणाऱ्या मनोरुग्णालयात येतो. तिथली रेचल नावाची रुग्ण हरवल्यासंदर्भात चालू असणाऱ्या चौकशीसाठी दोघे आलेले असतात. दोघे तिथल्या डॉक्टर कॉलीला भेटतात. त्यांच्याकडून किंवा इतर कुणाकडूनच त्या दोघांना तपासकार्यात कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. वादळ येऊन गेल्याने वातावरण खराब झालेलं असतं म्हणून त्या दोघांना बेट सोडून परतसुद्धा जाता येत नसतं. या दरम्यान टेडीला विचित्र स्वप्नं पडायला लागतात. स्वप्नात त्याला त्याची बायको दिसते जी लेडीस नावाच्या माणसाने लावलेल्या आगीत जाळून मेलीय, ती स्वप्नात त्याला लेडीस त्याच रुग्णालयात असल्याचं सांगते. त्याला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागतो. अचानक रेचलच्या सापडण्याने वातावरण निवळायच्या ऐवजी अजून गूढ होत जातं. टेडीला रुग्णालयात चालणाऱ्या चित्र-विचित्र प्रयोगांबद्दल समजतं, आपण खरी रेचल आहोत सांगणारी बाई भेटते, चक गायब होतो. या सगळ्यामुळे आपण कुठल्यातरी मोठ्या गुप्त कटाचा बळी ठरतो आहोत हे त्याला जाणवतं. मग खरं काय असतं? ते कळायला हवं तर पुस्तक वाचा किंवा शिणेमा बघा! पुन्हा एकदा मी ढोबळ कथाच सांगितलीय. दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसीचा लिओनार्डो कॅप्रीओ बरोबरचा अजून एक चित्रपट. बरोबर मार्क रफेलो, सर बेन किंग्सले अशी तगडी स्टारकास्ट..स्वतः लेहान चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक! शिणेमा वाईट असेलच कसा...?? 


तीन चांगले चित्रपट काही न ठरवता थोड्या कालावधीत पाहिले गेले. आवडले म्हणून गुगलिंग केलं तर लेहान हा त्यातला समान धागा सापडला. इथे चित्रपटांचं किंवा पुस्तकांचं समीक्षण करण्याचा माझा हेतू नाहीये पण लेहानचे (त्याच्या पुस्तकांवर बनलेले) सगळे चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या कथानकात बोस्टन हा समान धागा सोडला तर विशेष सारखं काही नाही. सारांश म्हणून विचार केला तेव्हा लेहानच्या कथांबद्दल लक्षात आलं ते हे की 'बरेचदा एखादी गोष्ट चूक का बरोबर ते परिस्थिती ठरवते..मग परिस्थिती चूक का बरोबर ते नितीमुल्य ठरवतात..नितीमुल्य चूक का बरोबर ते माणूस ठरवतो..आणि माणूस चूक की बरोबर हे पुन्हा परिस्थिती ठरवते. न संपणारं चक्र आहे! आयुष्यातले शेवट कधीच काळे-पांढरे असे टोकांचे नसतात..त्याला नेहमीच ग्रे (राखाडी) छटा असते हे खरं.' मागे एकदा झालेल्या चर्चेत असा मुद्दा डिस्कस झालेला की कथेतून लेखक दिसला पाहिजे, कथेतल्या पात्रांपेक्षा तो मोठा वाटला पाहिजे! लेहानचे चित्रपट पाहून तरी मी त्यातल्या लेखकाच्या प्रेमात आहे. देव करो आणि त्याची पुस्तकं लौकर वाचायला मिळोत ही अपेक्षा! 


~सारी चित्रे विकीवरून साभार .

Saturday, April 14, 2012

जळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'

जात, धर्म, भाषा यांच्या नावाखाली माणसांमध्ये सतत होणारा संघर्ष हा काही नवीन विषय नाही! भारतात जन्माला आलो की या सगळ्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणतो की गेल्या काही दशकांमध्ये समाजसुधारणा झाली. प्रथा-परंपरा बदलल्या. कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले. पण खरंच आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला शिकलो आहे का? या प्रश्नाला १००% होकारार्थी उत्तर मिळणं कठीण आहे! याच विषयावर चर्चा सुरु असताना एक मित्र म्हणाला "आपण फक्त ठणाणा बोंबा मारायच्या बघ..आपण मारे कितीही सुधारणांच्या गप्पा मारल्या तरी वर्षानुवर्षांचे संस्कार (चुकीचे असले तरी) पार 'जीन्स' (GENES)मध्ये इतके भिनलेले असतात की हिंदूंना मुसलमानांबद्दल आणि मुसलमानांना हिंदूंबद्दल तेढ कायम राहणार; ब्राह्मणाची गांधी, आंबेडकर यांच्याबद्दलची मतं बदलायची नाहीत की शेड्युल कास्टवाल्यांची ब्राह्मणांबद्दलची आणि सावरकरांबद्दलची! कधी राजकारण, कधी समाजकारण आड येणार आणि हे असंच चालू राहणार! ब्राह्मण म्हणून तुझ्या घरी तुझ्यावर 'शाखेचे'च संस्कार होणार..तुझ्या आई-वडिलांनी केले नाहीत तर इतर लोक करणार" वगैरे वगैरे..तेव्हा वाटलं होतं की या देशात जन्माला येऊन फार मोठी चूक झाली. तिकडे दूर देशी (म्हणजे अर्थात अमेरिकेत वगैरे) जन्माला आलो असतो तर निदान हे प्रश्न तरी सहन करावे लागले नसते..आडनाव वाचून लोकांनी संस्कार आणि स्वभाव यांचे ताळेबंद तरी बांधले नसते. पण धत तेरे की-..तेव्हा तिकडे दूर देशी अस्तित्वात असणाऱ्या 'वर्ण द्वेषाच्या' दाहक वास्तवाची कल्पनाच नव्हती मुळी!अर्थात तिथे देखील संघर्ष झाला, सुधारणा झाल्या, प्रथा बदलल्या, कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले आणि आज दिसायला तरी वर्णभेद नसणारा, सगळ्या जगाला प्रेमाने आपलंसं करणारा देश म्हणून अमेरिका आपल्याला माहितीय! हे सगळं रिकामटेकडं तत्वज्ञान सुचण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'मिसिसिपी बर्निंग' हा सिनेमा.अमेरिकेत १९६० च्या सुमारास जो नागरी लढा झाला त्यादरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेचं काल्पनिक-वास्तव चित्रण करणारा हा सिनेमा. 

१९६०चा काळ. वर्णद्वेष दक्षिणेकडील विशेषतः मिसिसिपी, अलाबामा या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात होता. कृष्णवर्णियांना हीन, अस्पृश्य वागणूक मिळायची! मग सर मार्टिन ल्युथर किंग सारखी माणसं आली आणि त्यांनी वर्णभेद नष्ट करायला राष्ट्रीय नागरी लढा सुरु केला. अमेरिकेतील निग्रोंना, आफ्रिकन-अमेरिकन लोकांना मतदानाचा हक्क मिळावा, इतर हक्क मिळावे यासाठी हा लढा होता. (इथे मुद्दाम नमूद करावसं वाटतं की हा लढा समान हक्कांसाठी होता, शैक्षणिक किंवा सरकारी सवलती मिळाव्या म्हणून नाही आणि हे वाक्य संस्कारापेक्षा जास्त बुद्धीवादातून आलं आहे.)  गौरवर्णीयांचे सामाजिक, राजकीय अधिपत्य कायम राहावे म्हणून झटणाऱ्या 'कु क्लक्स क्लान' नावाच्या संस्था अस्तित्वात होत्या (खरंतर आजही आहेत) ज्यांचे मिसिसिपीमधले गट नागरी लढ्यादरम्यान कार्यरत होते.मिसिसिपी राज्यातल्या नेशोबा कौंटीतले काही वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील या गटांचे सदस्य होते. कौंटीमध्ये १९६४च्या जून महिन्यात तीन समाजसेवकांची निर्घृण हत्या करण्यात आली. यातले दोन गौरवर्णी, ज्यू होते आणि एक कृष्णवर्णी होता. दोन्ही ज्यू मुलं उत्तरेकडून वर्ण समानता काँग्रेसकडून वर्णभेदाविरुद्ध प्रचार करायला आली होती. क्लानचे सदस्य आणि पोलीस अधिकारी यांनी मिळून या हत्या घडवून आणल्या. यासंबंधीची विस्तृत माहिती इथे वाचायला मिळेल. या हत्यानंतर राष्ट्रीय गहजब झाला. हत्यांची चौकशी करायला देशाच्या सरकारला मिसिसीपीला फेडरल ब्युरोचे लोक पाठवायला लागले आणि याच दरम्यान अमेरिकेतला वर्णभेदावर बंदी आणणारा 'कायदा' मंजूर झाला. इकडे मिसिसिपीत ब्युरोच्या लोकांनी जंगजंग पछाडूनदेखील काही तपास लागत नव्हता. शेवटी माहिती मिळवण्यासाठी पैशांच्या बक्षिसाचं आमिष दाखवायला लागलं. समाजसेवकांचे मृतदेह सापडले. नंतर सुरु झालेला खटला अनेक महिने चालला, गाजला, बंद पडला, पुन्हा सुरु झाला, शेवटी एकदाची काही लोकांना शिक्षा झाली. उणी-पुरी ४० वर्षं गेली या सगळ्यात. या सत्यघटनांवर बेतलेल्या काल्पनिक सिनेमात सगळा भर सामाजिक विषमता, वर्णद्वेष आणि त्याचे लोकांवर होणारे परिणाम यावर आहे. सिनेमामध्ये गुन्हेगार शेवटी पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते असं दाखवलं आहे.'गुड कॉन्कर्स इवील' असा सकारात्मक संदेश पोहोचणं अपेक्षित असावं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा घटनेमागे असलेली राजकीयता लक्षात ठेवून त्यात कोणतीच मुळ नावं वापरलेली नाहीत. 

सिनेमा सुरु होतो तेव्हा दोन पाण्याचे नळ (फाउंटन्स) दिसतात. एक चांगल्या स्थितीत आहे आणि त्यावर 'व्हाईट' असा फलक आहे, दुसरा जुनाट नळ वाहतोय, त्यावर 'कलर्ड' असा फलक आहे. एक गौरवर्णी चांगल्या नळावर पाणी पिऊन जातो आणि एक लहान कृष्णवर्णी मुलगा वाहत्या नळावर. पुढे साधारण काय बघायला मिळणारे याची पुसटशी कल्पना इथेच येऊन जाते. श्रेयनामावली सुरु होते तेव्हा एक जळतं घर दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळी नावं दिसतात. सुरुवातीला त्या जळक्या घराचं महत्व फारसं अधोरेखित होत नाही पण नंतर संपूर्ण सिनेमात जेव्हा अशी घरं जाळण्याचे प्रसंग येतात तेव्हा ते दर वेळी जास्त जास्त अंगावर येतात. पहिल्याच प्रसंगात तीन किशोरवयीन समाजसेवक मुलांचा होणारा पाठलाग आणि त्यांचा खून चित्रित केलाय. पुढच्या प्रसंगात फेडरल ब्युरोचे दोन अधिकारी मिसिसिपीतल्या काल्पनिक 'जेसप' कौंटीला यायला निघालेले असतात. सिनेमामधलं नाट्य निर्माण झालंय ते दोन्ही अधिकाऱ्यांच्या वैचारिक मतभेदांमधून! तरुण वाटणारा अधिकारी 'ऍलन वॉर्ड' इन्चार्ज आहे,त्याला ब्युरोत तीनेक वर्षंच झाली आहेत, त्याचा पुस्तकी क्लुप्त्या, पद्धतींवर भर असणारे असं त्याच्या बोलण्यातून समजतं. दुसरीकडे वयस्कर वाटणारा अधिकारी ‘रुपर्ट ऍन्डरसन’ निवांत आहे, तो कधी काळी मिसिसिपीमध्ये कुठल्यातरी कौंटीचा शेरीफ (वरिष्ठ पोलीस अधिकारी) होता. त्याला पुढे काय वाढून ठेवलं असणारे याची कल्पना आहे, तो वॉर्डला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की सरळसोट मार्गांनी या केसचा निकाल लागणं शक्य नाही. जेसपमध्ये सगळे पोलीस अधिकारी गौरवर्णी आहेत आणि ते फेडरल ब्युरोकडून आलेल्या या दोन लोकांना अक्षरशः 'फाट्यावर' मारतात.(ब्युरोच्या लोकांना अशी वागणूक मिळालेली शक्यतो कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही.) मुलं गायब झाली आहेत किंवा त्यांचं अपहरण, खून असं काही झाल्याची शक्यतादेखील लोकल पोलीस मान्य करत नाहीत. ऍन्डरसन ’पेल’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोशी मैत्री(?) करण्याचा प्रयत्न करतो. तिची भूमिका सिनेमात हळूहळू मध्यवर्ती होत जाते.

ऍलन पार्कर या दिग्दर्शकाने सिनेमाचा वेग व्यवस्थित सांभाळला आहे. कुठलाच प्रसंग कंटाळवाणा किंवा अनावश्यक नाही. वॉर्ड इन्चार्ज असल्याने तो आणि ऍन्डरसन सुरुवातीला त्याच्याच मार्गांनी शोध घेत राहतात. त्यांच्यात त्यावरून उडणारे खटके हा एक भाग, दुसरीकडे ऍन्डरसन आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोमध्ये निर्माण होणारी जवळीक हाही एक महत्वाचा भाग आहे. तीन मुलांची गाडी सापडते पण प्रेतं सापडत नाहीत. वॉर्ड ब्युरोची १००-१५० माणसं कामाला लावून गाडी सापडलेल्या दलदलीच्या भागात शोधाशोध सुरु करतो. एकीकडे कृष्णवर्णीयांच्या घरांवर हल्ले सुरु असतात. अख्खं घर जाळून टाकायचं आणि लोकांना बेघर करायचं ही कुटील कल्पना. लोकल पोलिसांच्या आणि क्लानच्या भीतीने स्वतःचं घर जळताना पाहिलेली माणसंसुद्धा काही बोलायला तयार नाहीत हे बघून कीव येते. दोन्ही अधिकारी राहत असलेल्या हॉटेलवर देखील हल्ला होतो. तेव्हा वॉर्ड काम करायला शहरातलं एक थेटर भाड्याने घेतो. एका रात्री गायब असलेल्या तीन लोकांसारखं आणखी एका कृष्णवर्णीयाला त्रास द्यायचा प्रयत्न होतो. ऍन्डरसनला ‘बातमी’ मिळालेली असते. तो आणि वॉर्ड त्या मुलाला पळवणाऱ्या गाडीचा पाठलाग करतात. पण वॉर्डच्या बुजऱ्या पद्धतींमुळे त्यांना उशीर होतो आणि मुलाचा शारीरिक छळ होऊन त्याला टाकून देण्यात येतं. तरी तो मुलगा अधिकृत तक्रार करायला तयार नसतो. सिनेमावर टीका झाली ती त्यातल्या 'कृष्णवर्णी लोकांचं इतकं भेदरलेलं असणं' खुप टोकाचं (आणि अर्थातच अतिशयोक्त) दाखवलं आहे म्हणून. आजचे अमेरिकन कृष्णवर्णी पहिले तर ही टीका रास्त वाटते, अर्थात सिनेमात मात्र वेगवेगळ्या प्रसंगात वर्णभेदाविरुद्ध चाललेल्या एका मोर्चाला शिवीगाळ करणारे लोक, प्रार्थना करत असणाऱ्या एका लहान मुलाला मारणारे लोक, जाहीर सभांमध्ये गौरवर्णीयांचा आणि त्यांच्या वर्णश्रेष्ठपणाचा उदोउदो करणारे लोक पाहिले की गौरवर्णीय लोकांबद्दलची चीड वाढत राहते. एकीकडे वॉर्ड लोकल पोलिसांची तीन मुलं बेपत्ता असण्यासंदर्भात उलट तपासणी घ्यायला सुरुवात करतो. यावर उत्तर म्हणून शहराचा महापौर (मेयर) येऊन त्याला धमकावून जातो. वॉर्डची सहनशक्ती संपायला लागलेली असते. त्याला ऍन्डरसनचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. अजून एका घरावर हल्ला होतो. एक स्थानिक कृष्णवर्णी मुलाच्या साक्षीने तीन लोकांविरुद्ध खटला उभा राहतो पण कोर्ट त्यांना मुक्त करतं हा प्रसंग पाहून चीड येते. खटल्याचा निकाल लागल्यावर पुन्हा एक हल्ला होतो. यावेळी घर तर जाळलं जातंच शिवाय घराच्या मालकाला एका झाडाला लटकावून गळफास लावून मारतात. दुसरीकडे सगळ्या घटनांनी सैरभैर झालेली, ऍन्डरसनशी जवळीक निर्माण झालेली पेलची बायको त्याला तीन मुलांची प्रेतं कुठे पुरली आहेत ते सांगते. प्रेतं सापडतात आणि निव्वळ बेपत्ता असण्याची केस अधिकृतपणे 'मर्डर'ची केस बनते. पेलला सत्य कळल्यावर तो बायकोला मारहाण करतो. तिला हॉस्पिटलला ऍडमिट करतात. ऍन्डरसनचं डोकं फिरतं आणि तो वॉर्डच्या पद्धतींवर चिडत पेलला मारायला निघतो. दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला असंतोष उफाळून येतो आणि एक लहानशी मारामारी होते. शेवटी वॉर्ड ऍन्डरसनच्या पद्धतींनी केस पुढे चालवायला तयार होतो. त्या पद्धती काय असतात ते सांगितलं तर चित्रपट पाहण्याची गम्मत जाईल. पण मी आधी सांगितलं तसं- सत्य घटनेतला आणि सिनेमातला मुख्य फरक म्हणजे इथे गुन्हेगारांना शिक्षा झालेली दाखवली आहे त्याने सिनेमात गुंतलो असू तर 'सुख' वाटतं. शेवटच्या प्रसंगात मरण पावलेल्या समाजसेवकाच्या थडग्यासमोर शोकगीत गाणारे लोक उभे असल्याचं दृश्य आहे. लोकांमध्ये कृष्णवर्णी आणि गौरवर्णीसुद्धा आहेत. त्याच्याकडे लांबून पाहत काहीसे सर्द आणि भावूक वॉर्ड आणि ऍन्डरसन परत जायला निघतात. 


वॉर्डच्या भूमिकेत विलेम डॅफो (स्पायडरमनचा सिनियर ग्रीन गॉबलीन) आणि ऍन्डरसनच्या भूमिकेत जीन हॅकमन आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका अर्थात सुरेख वठवल्या आहेत. सिनेमा वेगवेगळ्या ऑस्करससाठी नामांकित झाला. त्यापैकी सर्वोत्कृष्ठ छायाचित्रणाचं ऑस्कर त्याला मिळालं. उत्तम पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन या अजून काही जमेच्या बाजू. ऑस्कर सोहळ्याला बहुतेक कायम ‘वर्णद्वेष’ या विषयाचं आकर्षण वाटत आलेलं आहे. म्हणूनच की काय २००४ मध्ये ‘क्रॅश’ नावाच्या याचं विषयावरच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला. या वर्षी, याचं विषयाशी, याचं काळाशी (१९६०, मिसिसिपी) संबंधित गोष्टीवर बनलेला 'द हेल्प' ऑस्करच्या शर्यतीत होता. आपल्याकडे ‘मिसिसिपी बर्निंग’वर आधारित 'आक्रोश' बनवला (जुना नाही, प्रियदर्शनचा २०१०चा सिनेमा), क्रॅशवर बेतलेला 'ये मेरा इंडिया' एन. चंद्रांनी बनवला. हे चित्रपट चांगले नव्हते की ते कुणी पाहिलेच नाहीत कुणास ठाऊक!!(मी पण आक्रोश पहिला नाहीये). पण त्यांना खूप थंड प्रतिसाद मिळाला. याउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.

सिनेमा बघितल्यावर तो आवडणं वेगळं, तो पटणं वेगळं, त्याच्याशी रिलेट करता येणं अजून वेगळं! ‘मिसिसिपी बर्निंग’शी रिलेट व्हायला अर्थात गेल्या ४-५ वर्षात फार प्रतिष्ठेचा असलेला आरक्षणाचा मुद्दा होता. आपण भारतातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेबद्दल हळहळतो. मी आधी लिहिलं तसं- आडनाव वाचून माणसांबद्दल भली-बुरी मतं बनवून टाकतो. नावं बदलता येतात, धर्म बदलता येतो, पण शरीराच्या रंगाचं काय करायचं? तो कसा बदलणार? आणि तो बदलणं जर का शक्य नाही यावर सगळ्यांचं एकमत असेल तर शरीरांच्या आतली गोरी-काळी-तपकिरी-पिवळी माणसं कधी बदलणार?
***

*सारी चित्रे विकिवरून साभार.

Wednesday, March 28, 2012

४७ सेकंद

         "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, जरी तर्कशुद्ध नसला तरी असतो! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?" कॅसल बेकेटला विचारतो. 


मी पाहत असलेल्या अनेक सीरिअल्समधली एक सीरिअल- 'कॅसल'. एक खून-रहस्यकथा लिहिणारा लेखक एका शहरातल्या पोलिसांच्या टीमला गुन्हे सोडवायला मदत करतो ही त्या शोची जनरल थीम. काल त्याचा '४७ सेकंद' नावाचा एपिसोड पाहिला. न्यूयॉर्कमधल्या कुठल्याशा निदर्शनांच्या दरम्यान एक बॉम्ब फुटतो आणि ५ लोक ठार आणि २८ जखमी होतात. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांमध्ये बॉम्ब फुटलेल्या ठिकाणी काढला गेलेला एक ४७ सेकंद आधीचा फोटो असतो. नेमकं त्या ४७ सेकंदात काय घडलं? बॉम्ब कुणी ठेवला? का ठेवला? वगैरे वगैरे शोधून काढणं म्हणजे सगळा एपिसोड. कॅसलचे या आधी मी कित्येक चांगले एपिसोड पहिले आहेत मग अचानक कालच्या एपिसोडवर अख्खा ब्लॉग का?    
कालच्या एपिसोडने मला थोडं अंतर्मुख केलं. माझ्याबरोबर हा शो पाहणाऱ्या कुणाला काही विशेष वाटलं नसावं कारण शोच्या फेसबुक पेजवर भलतीच चर्चा सुरु होती. म्हणून ब्लॉग लिहिण्यापूर्वीसुद्धा खूप विचार केला. खरंच लिहावं का म्हणून?असं तर वाटणार नाही की उगाच काहीतरी विषय काढायचा आणि लिहित सुटायचं म्हणून लिहिलंय? सध्या मराठी ब्लॉगिंग हा प्रकार थोडासा वादग्रस्त झाला असल्याने साशंकता होती. पण मग म्हटलं की कुणाला काय वाटायचं आहे ते वाटून दे..मी माझ्या डोक्यात येतंय ते सांगायचा प्रयत्न करतोय. ज्यांना पटेल ते वाचतील इतरांनी फु.गो.घ्या.
तर- कॅसलचा काल भर जितका तपासावर होता तितकाच स्फोटामुळे व्यक्तिरेखांच्या मनावर होणाऱ्या परिणामांबद्दल होता. स्फोट मेलेल्या लोकांपैकी कुणाला टार्गेट करून तर झाला नाही ना याचा तपास करण्याचा प्रयत्न होतो. मरण पावलेल्या पाच लोकांमध्ये एक शहर फिरायला आलेला टूरिस्ट असतो, एक दोन मुलांची आई असते, एक त्याच्या कुटुंबातला कॉलेजला गेलेला पहिलाच मुलगा असतो वगैरे. सगळ्यातून हाच निष्कर्ष निघतो की सगळे मरण पावलेले लोक अहेतुक गेले. निराश होऊन कॅसल बेकेटला म्हणतो "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, काहीवेळी तर्कशुद्ध नसला तरी हेतू असतोच! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?एका क्षणात त्यांचं भविष्य, त्यांचे प्लान्स सगळे नाहीसे झालेत."
मला त्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या सिरिअस होण्याने आधी नवल वाटलं. ५ ठार २८ जखमी? मुंबईत गेल्या काही वर्षात आपण इतके स्फोट अनुभवले आहेत त्यामुळे स्फोट झाला ना?त्यात काय एवढं?अमेरिकन शो असला म्हणून एका स्फोटाचं इतकं काय उदात्तीकरण सुरु आहे असे सगळे विचार डोक्यात येऊन गेले. मग अचानक स्वतःच्याच निर्ढावलेपणाचा राग आला. शांतपणे बसून आठवत होतो की आपल्याकडे हल्ला झाला की किती दडपण असतं ते! कळायला लागल्यापासून ११ जुलै, २६ नोव्हेंबर अशा मुंबईत झालेल्या सगळ्या हल्ल्यांच्या वेळी मी तो अनुभव खूप जवळून घेतलाय. वर्षाच्या काही ठराविक तारखा दिनविशेष असल्यासारख्या आपण एखाद्या बॉम्ब-स्फोटासाठी लक्षात ठेवतो याला दुर्दैव म्हणायचं की करंटेपणा? अमेरिकेत बॉम्ब-स्फोट होत नाहीत का काय याचा शोध घ्यायला मी विकिची मदत घेतली. गेल्या साधारण तीन वर्षात सगळ्या अमेरिकेत मिळून निव्वळ एका हल्ल्याची नोंद अशी होती जिथे काही लोक मरण पावले. कित्येक नोंदी तर अशादेखील होत्या की बॉम्ब सापडला आणि डिफ्युस केला गेला, फक्त एका माणसाचा एक पाय गेला वगैरे. याउलट त्याच लिस्टमध्ये भारतात जवळपास दर महिन्याला होणाऱ्या एका स्फोटाची नोंद आहे. दर स्फोटात लोक मेले आहेत, जखमी झाले आहेत. 
फार जास्त लिहिण्यापूर्वी मी स्पष्ट नमूद करतो की मला या ब्लॉगमधून कुठलेही निष्कर्ष काढायचे नाहीत. उलट प्रश्न पडलेत आणि त्यांचा फार गुंता झालाय. निदान लोकांनी वाचून काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. मुंबईत गेल्या वर्षी दादरमध्ये झालेल्या स्फोटानंतर शी. चीडब्रम (नावाचा असा उल्लेख टाईप करतानाच्या चुकीने झालेला नाही) या आपल्या गृहमंत्र्यांनी उधळलेली मुक्ताफळं आठवली आणि भारतीय असण्याची लाज वाटली (वाक्य लिहायला खूप जड गेलं पण दुर्दैवाने ते खरं आहे). अमेरिकन लोकांचा खूप हेवा वाटला मला. वेनसडेमधला नसीर आठवला जो म्हणतो की सकाळी कामाला बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का याची खात्री घरातल्या बाईला नसते. हे सगळं कधी थांबणार? अमेरिकेत एक ९/११ चा हल्ला झाला आणि त्यांनी आज दहा वर्षांनीसुद्धा अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णपणे हलवलेलं नाही. आपण मात्र कसाबची सरकारी पाहुणा असल्याच्या थाटात सरबराई करतोय. अमेरिकेच्या धोरणाचं कौतुक करण्याचा अजिबात हेतू नाहीये पण याच ब्लॉगच्या अनुषंगाने आठवलं- माझ्याबरोबर जॉन नावाचा एक अमेरिकन काम करतो. त्याच्याशी परवा गप्पा सुरु होत्या. अमेरिकन राजकारणाचा विषय निघाला. लौकरच निवडणुका होतील. इथे अध्यक्ष निवडून येण्यापूर्वी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीसुद्धा प्रत्येक पक्षातर्फे वेगळी निवडणूक होते. प्रत्येक उमेदवार त्याचे अजेंडे मांडतो वगैरे. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. तो बोलता बोलता सहज म्हणाला- "चैतन्य, सामान्य अमेरिकन माणसाला कुठल्या उमेदवाराची आंतरराष्ट्रीय धोरणं काय आहेत याच्याशी घेणं-देणं नाही. ९/११ झाल्यानंतर अगदी आजपर्यंत आमचे अधिकारी एखाद्याला दहशदवादाच्या निव्वळ संशयाखाली अटक करताना दिसतात.सामान्य माणसाला पुरेपूर कल्पना आहे की आमचं सैन्य इराक किंवा अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून बसलंय. आम्हाला मात्र असंच वाटतं की त्यांनी त्यांच्या देशात सुरक्षित असावं. माझ्या देशाची दहशतवादाविरुद्ध काहीही धोरणं असोत मला माझ्या सरकारने माझ्या देशात फक्त सुरक्षित ठेवणं अपेक्षित आहे." मी मनात म्हटलं होतं- "आम्हा भारतीयांना तरी काय वेगळं वाटतं असणारे? पण आमच्या सरकारची ना दहशतवादाबद्दल काही ठोस धोरणं असल्याचं आम्हाला जाणवतं आणि सुरक्षितता? वेल, कल्पना चांगली वाटते नाही ऐकायला?" पाश्चात्य संस्कृती (वाचा अमेरीकन) कायम चंगळवाद आणि भौतिक सुखं यांच्यावर भर देणारी असल्यामुळे त्याची तांत्रिक भरभराट जास्त झाली या अर्थाचं वाक्य कुठेतरी वाचलं. पण अमेरिकेत आल्यापासून गेल्या दोन वर्षात जे जाणवलं ते हेच की इथे माणसाला, त्याच्या जीवाला किंमत आहे ज्यामुळे चंगळवाद आणि भौतिक सुखं सारख्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष होतं. ब्लॉग लिहिताना एकीकडे लोकसत्ता उघडला तर गडचिरोलीमध्ये नक्षलवादी स्फोटात १२ जवान शहीद झाल्याची बातमी वाचली आणि अजूनच निराश झालो. 
लिहिता लिहिता २६ नोव्हेंबर आणि ११ जुलैच्या घटना आठवल्याच. ९३चे स्फोट झाले तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण या दोन घटना नीट आठवतायत. ११ जुलैला स्फोट झाले आणि १२ जुलैला सगळे चाकरमानी जीव मुठीत धरून कामावर रुजू झाले. भीती, दुःख व्यक्त करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. आजपर्यंत त्या हल्ल्यामागे हात असणाऱ्या कुणाला ठोस पुराव्यानिशी पकडून शिक्षा झाल्याचं माहित नाही. २६ नोव्हेंबरनंतर आठवडाभराने गेटवेला झालेला 'पीस-मार्च' आठवतो आहे. 'पीस-मार्च' असला तरी जमाव इतका संतप्त झाला होता की पोलिसांना परिस्थिती ताब्यात घ्यावी लागली होती. आणि आज साडेतीन वर्षांनी? कसाबला शिक्षा होईल ही आशा हळूहळू लोकांनी सोडून दिलीय. मिडीयाला कव्हर करायला सध्या इतर अनेक ब्रेकिंग न्युज आहेत. पेपरला स्फोटाची बातमी वाचली की आपण ४७ सेकंदसुद्धा विचार करतो का नाही हा प्रश्न आहे! अक्षरधाम, भारतीय संसदेपासून दिल्ली, वाराणसी, आसामपर्यंत झालेल्या कुठल्याही हल्ल्यासाठी कुणालाच ठोस शिक्षा झालेली मला माहित नाही. इथे मला धर्म, देश, राजकीय पक्ष अशा कोणत्याच गोष्टी उपस्थित करायच्या नाहीत कारण माझ्या मते सुरक्षिततेचा मुद्दा असला की कोणत्याही धर्माच्या लोकांच्या, राजकीय पक्षाशी संबंधित लोकांच्या आणि कुठल्याही देशाच्या लोकांच्या भावना सारख्याच असतात.  प्रॉब्लेम असा आहे की सध्या कोणत्याही सज्जन माणसासमोर  महागाई, भ्रष्टाचार, गर्दी असे इतके प्रश्न असतात की सुरक्षितता या मुलभूत गरजेचा आणि हक्काचा विचार करायला वेळ आहेच कुठे? 
               कॅसलपासून विषय सुरु करून तो भरकटवत कुठेतरी नेऊन सोडण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण कालपासून डोक्यात वर लिहिलेलं वाक्य घोळत होतं आणि राहून राहून वाटत होतं की आजपर्यंत झालेले हल्ले, त्यात गेलेले लोक, त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न, भविष्य यांचा विचार करायलासुद्धा आज आपल्याला वेळ नाहीये. इतकं निर्ढावलेलं असून चालणार नाही. कारण जर का जो दगडपणा मला ४७ सेकंदांसाठी का होईना माझ्यात आलेला मला जाणवला तो जर का प्रत्येकामध्ये आला तर अवघड आहे. आणि माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न तसाच आहे- खरंच आपण सुरक्षित आहोत का? 


ता. क. : अजून एक: वाचणाऱ्या काही लोकांच्या डोक्यात एक मुद्दा येईल की हा माणूस अमेरिकेला गेलाय आणि तिथे बसून उगाच हे असले लेख लिहितो आहे. त्याला इथल्या सुरक्षिततेशी काय देणं-घेणं आहे? तर अशा लोकांना माझा इतकाच निरोप आहे की भारतात नसलो तरी नाळ शेवटी तिथेच जोडलेली आहे. माझे आई-वडील, नातेवाईक, मित्र, शेजारी-पाजारी आजही त्याच वातावरणात राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीने हे सगळं लिहिलं असं समजा. हेही खोटं वाटत असेल तर खड्ड्यात जा! 

चैतन्य

Friday, December 23, 2011

वा..क्या चोरी हय...


              अमेरिकेत राहायला आल्यापासून 'लाईफस्टाइल' मध्ये वाढलेली एक गोष्ट म्हणजे इंग्लिश मालिका आणि चित्रपट पाहणे! चित्रपट असो किंवा मालिका- या मंडळींनी कथा, संवाद, निर्मितीमूल्य यांचा इतका जास्त विचार केलेला असतो की भारतीय चित्रपट खूपच खुजे वाटायला लागतात. हिंदी-मराठी सास-बहु मालिकांचा इथे उल्लेख करणं म्हणजे मला अमेरिकन कार्यक्रमांचा अपमान वाटतो. असो. बरेच चित्रपट पाहताना सहज जाणवलं की ‘अरेच्या अमुक अमुक हिंदी चित्रपट याच सिनेमावरून ढापला होता की..’ आता हिंदी चित्रपट सृष्टीने संगीत, कथा चोरून चित्रपट बनवणं काही आपल्याला नवीन नाही, पण हा ब्लॉग लिहायचं कारण होतं काही चांगल्या चोऱ्यांबद्दल लिहिणं..हो..असेही काही हिंदी चित्रपट आहेत जे पाहून त्यांच्या उचलेगिरीला दाद द्यायची इच्छा झाली.

             सगळ्यात पहिला उल्लेख करेन तो चेंजिंग लेन्स (Chaging Lanes) आणि टॅक्सी नं. ९२११चा. बेन अफ्लेक आणि सॅम्युअल जॅक्सन यांची एका दिवसाची जुगलबंदी ही Chaging Lanesया चित्रपटाची कथा. आपल्यातल्या बऱ्याच जणांना हा चित्रपट फारसा माहीत नाही. पण सॅम्युअल जॅक्सनची फॅन असणारी काही मंडळी आहेत त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा. हिंदी चित्रपटाची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर दाखवून लेखक-दिग्दर्शक मंडळींनी त्याला करेक्ट 'देसी' टच दिला आहे. सगळ्याच चांगल्या गाण्यांमध्ये विशेष उल्लेख 'शोला है या है बिजुरिया...' या गाण्याचा. अनेक वर्षांनी बप्पीदाच्या आवाजात उडतं गाणं ऐकताना मजा येते. जॉन अब्राहमने साकारलेला बड्या बापाचा बिघडलेला पोरगा आणि नाना पाटेकरचा छक्के-पंजे करणारा टॅक्सीचालक ही पात्रं मुळ चित्रपटापेक्षा खूप वेगळी आहेत आणि ती दोघांनी मस्त साकारली आहेत! दोन्ही प्रमुख पात्रांचा एकाच दिवशी वाढदिवस असणं, नाना पाटेकरला भेटलेला लॉकर ऑफिसमधला मठ्ठ अधिकारी अशा काही निव्वळ फिल्मी गोष्टी वगळता बाकी नावं ठेवण्यासारखं मला काही वाटलं नाही. दोन्ही चित्रपट जरूर पहा! कथावस्तू जरी सारखी असली तरी दोन चांगले सिनेमे पाहिल्याचं समाधान नक्की मिळेल.   

            अजून असाच एक उत्तम इंग्रजी चित्रपट आणि त्याचं चांगलं हिंदी व्हर्जन म्हणजे 'सेव्हेन' आणि 'समय'. शहरात अनाकलनीय खून व्हायला लागतात आणि त्याचा तपास करायला नवीन अधिकारी येतो. एक जुना अधिकारी तेव्हाच निवृत्त होणार असतो. दोघांचे वेगवेगळे स्वभाव, खुनांचा सात प्रकारच्या 'पापां'शी (Seven Deadly Sins) लागणारा संदर्भ आणि सुरु होणारा तपास अशी इंग्रजी चित्रपटाची साधारण कथा. ब्रॅड पीट आणि मॉर्गन फ्रिमन या सशक्त अभिनेत्यांनी दोन मुख्य भूमिका साकारल्या आहेत! चित्रपटाचा भर खुनाच्या तपासापेक्षा जास्त व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंध आणि स्वभावविशेषांवर आहे. उत्तरार्धात केविन स्पेसी सारखा अजून एक तगडा अभिनेता या गोष्टी अधोरेखित करण्यात भरच घालतो. हिंदी चित्रपटात तपास करणाऱ्या दोन पोलिसांऐवजी एकच स्त्री व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे! सुश्मिता सेन हिने जसं सौदर्य स्पर्धांमध्ये तिच्या समकालीन प्रतिस्पर्धी मंडळींना मागे टाकत बाजी मारली होती तशीच बाजी तिने अभिनयाच्या बाबतीत मारली. भले ऐश्वर्या रायसारखी प्रसिद्धी तिच्या वाट्याला आली नसेल, पण तिने 'समय' सारख्या भूमिकेचं सोनं केलं असं मला वाटतं. सेव्हेन डेडली सिन्स ऐवजी हिंदी चित्रपटात घड्याळ या संकल्पनेचा आधार घेतला गेला. शहरात होणाऱ्या खुनांमध्ये मृतदेहांच्या हातांची स्थिती घड्याळाच्या काट्यांकडे निर्देश करते. पहिल्या हत्येचं तर मर्डर वेपन पण सापडत नसतं. चित्रपटाचा बहुतांश भाग तपासावर भर असणारा आहे. ज्यांनी हा चित्रपट पहिला नाहीये त्यांना शेवट सांगून त्यांचा रसभंग करण्याची माझी इच्छा नाही, परंतु इतकं जरूर सांगेन की इंग्रजी सेव्हेनच्या तोडीस तोड शेवट हिंदी चित्रपटात आहे. सुश्मिताची व्यक्तिरेखा हाच या चित्रपटाचा मुळ गाभा आहे आणि तिने संपूर्ण चित्रपट उत्तम पेलला आहे यात शंका नाही!  
  
              काही हॉलीवूडचे सिनेमे हे माझ्या मते 'वेडझ*पणा' या प्रकारात मोडतात. 'फोनबूथ' हा त्यातलाच एक प्रकार! निव्वळ एका फोनबुथमध्ये दीड-पावणे दोन तासाचा चित्रपट बनवणं सोप्पी गोष्ट नव्हे! एक लुच्चेगिरी करत राहणारा, बायकोला फसवून बाहेर लफडी करणारा एक माणूस. तो एका फोनबुथमध्ये फोन करायला उभा असताना फोन वाजतो आणि समोरच्याने त्याच्यावर बंदुकीचा नेम धरल्याचं समजतं. पुढच्या जवळपास दोन तासाच्या काळात फोन करणारा मनुष्य या माणसाकडून जगापुढे तो करत असणाऱ्या सगळ्या लांड्या-लबाड्यांची कबुली घेतो आणि त्याला प्रामाणिक आयुष्य जगण्याची संधी देतो अशी साधारण गोष्ट. किफर सदरलॅंडचा फोनवरचा खोल, घाबरवणारा आवाज आणि आधी वैतागलेला आणि नंतर प्रचंड घाबरलेला 'स्टु' कॉलीन फेरेल!! सारासार विचार करता हा सिनेमा फक्त वैयक्तिक नितीमुल्य, प्रामाणिकपणा, उद्धार अशा गोष्टी अधोरेखित करतो. याच चित्रपटाचं देसी वर्जन म्हणजे 'नॉक आउट'. फोन करणाऱ्याची भूमिका साकारली होती संजय दत्तने तर फोन उचलणाऱ्या लुच्च्या माणसाच्या भूमिकेत इरफान खान. हा सिनेमा सुरुवातीला जरी नितीमुल्य, प्रामाणिकपणा अशा गोष्टीवर सुरु झाला तरी तो हळूहळू भ्रष्टाचार, नेत्यांचा काळा पैसा असा सामान्य माणसाला फार महत्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नांकडे वळतो आणि 'भारतीय' होतो. मग कंगना राणावत, सुशांत सिंग, गुलशन ग्रोव्हर अशा अनेक व्यक्तिरेखा त्या अनुषंगाने येतात. १६ डिसेंबर, टॅंगो चार्लीसारखे सिनेमे बनवणाऱ्या मणी शंकर या दिग्दर्शकाने त्याच्या लौकिकाला साजेसा चित्रपट केला. फोनबूथ सारख्या चित्रपटाची संकल्पना घेऊन स्वतःच्या तऱ्हेचा सिनेमा बनवणं हे त्याला जमलं म्हणून त्याचं कौतुक. अभिनय म्हणून उल्लेख करायचा तर अर्थात इरफान खानचा. ती व्यक्तिरेखा दुसऱ्या कुणाला शोभणार नाही इतकी सुरेख त्याने पडद्यावर उतरवली आहे. 

                   'अ फ्यु गुड मेन' नावाचा इंग्रजी सिनेमा आणि 'शौर्य' नावाचा हिंदी सिनेमा. दोन्ही चित्रपट सैन्यविषयक असले तरी 'ड्रामा' प्रकारात येतात. सैन्यातील एका अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून/अधिकाऱ्यांकडून होणारी हत्या, मारेकऱ्याला/मारेकऱ्यांना झालेली अटक आणि त्यांच्यावर चालणारा खटला हा या चित्रपटांचा मुळ विषय. दोन्ही चित्रपट सैन्याची शिस्त, नियमांचं पालन, उल्लंघन, निष्ठा अशा मुद्द्यांवर खल करतात. इंग्रजी चित्रपट हिंदी होताना त्यात हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, दहशतवाद असे मुद्दे येतात जे चित्रपटाचं इंग्रजीतून हिंदीत झालेलं रुपांतर सहज स्वीकारायला लावतात. टॉम क्रुझ आणि राहुल बोस हे दोघेही आपापल्या चित्रपटसृष्टीतले 'अंडरयुस्ड' अभिनेते आहेत असं मला वाटतं. त्यांना 'अभिनय' करताना पाहणं हा एक सुखद अनुभव. दोन्ही चित्रपटांना लौकिकार्थाने व्हिलन नाही. हॉलीवूडमध्ये काही फार आदरणीय अभिनेते आहेत. जॅक निकलसन हे त्यातलच एक नाव! त्यांनी '..गुड मेन' मध्ये मोजक्याच परंतु अत्यंत महत्वाच्या प्रसंगांमध्ये केलेली नकारात्मक भूमिका पाहणं हा त्यांच्या अभिनयक्षमतेचा आदर करणाऱ्या लोकांसाठी पर्वणी होती. हिंदीत हीच भूमिका के के मेननने केली. हनिमून ट्रॅवल्स, सरकारसारख्या भूमिकानंतर त्याने साकारलेली शौर्यमधली व्यक्तिरेखा त्याच्याकडच्या अपेक्षा वाढवते. आपलं दुर्दैव हेच आहे राहुल बोस किंवा के के सारख्या अभिनेत्यांच्या अभिनयक्षमता समोर येतील असे चित्रपट आपल्याकडे निघतच नाहीत! शौर्यमधला के के काही लोकांना निकल्सनपेक्षा उजवा वाटला. मला इंग्रजी सिनेमा जास्त आवडण्याची कारणं दोन- राहुल बोस आणि के के हे दोघे साधारण एका वयाचे आणि एका तोडीचे अभिनेते आहेत तर इंग्लिश सिनेमात निकल्सनसमोर टॉम क्रुझला पाहण्यात मला जास्त मजा आली, आणि दुसरं कारण- 'शौर्य' चा शेवट काहीसा वैयक्तिक सुडाकडे झुकणारा आहे जे '...गुड मेन' मध्ये होत नाही.   
                   आजपर्यंत हिंदीत अनेक सिनेमे चोरून बनले, हिंदी निर्माते त्यांना चोरी नव्हे तर प्रेरणा घेणं म्हणतात. या सिनेमांची यादी खूप मोठी आहे आणि त्यांची नुसती यादी करणंसुद्धा या ब्लॉगच्या आवाक्याबाहेरच आहे. थांबता थांबता काही चांगल्या/बऱ्या उचलेगिरीचा उल्लेख- 'स्कारफेस' ते 'अग्निपथ', 'गॉड्फादर' ते 'सरकार', 'हीच' ते 'पार्टनर' वगैरे. राहवत नाहीये म्हणून काही अत्यंत बंडल चोऱ्यांची नोंद करतोय- 'ब्रूस ऑलमाइटी' ते 'गॉड् तुस्सी ग्रेट हो', 'रेनमन' ते 'युवराज', 'एन अफेअर तो रिमेम्बर' ते 'मन' वगैरे वगैरे..अलीकडेच 'पर्स्यूट ऑफ हॅप्पिनेस'चं अत्यंत टाकाऊ असं 'अंकगणित आनंदाचं' नावाचं मराठीकरण बघितलं आणि कीव आली. सांगायचं इतकंच आहे की चोरी करायचीच आहे तर ती अभिमान वाटावा अशी तरी करा..शेवटी पिकासो म्हणूनच गेलाय- “Good artists copy; great artists steal”

चैतन्य