।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।
गेल्या अनेक शतकांच्या इतिहासात कला-क्रीडा-राजकारण या सगळ्या क्षेत्रात अनेक श्रेष्ठ मंडळी भारताच्या इतिहासात होऊन गेली. आपल्या राजकारणाला आर्यचाणक्याचा वारसा आहे, कलेच्या क्षेत्रात कालिदासाच्या ग्रंथसंपदेपासून ते दादासाहेब फाळकेंच्या सिनेसृष्टीपर्यंत आपल्याकडे मिरवण्यासारख्या खंडीभर गोष्टी आहेत! क्रीडा क्षेत्रात खूप प्राचीन नावं नसली तरी हॉकीचा जादुगार ध्यानचंद ते क्रिकेटचा देवबाप्पा सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडू या देशासाठी खेळले आहेत! मात्र गेल्या दशकाकडे जरा तिरकस नजरेने पाहिलं की या सगळ्या क्षेत्रात काही अफाट 'न-लोकोत्तर', 'अ-आदरणीय' मंडळी वावरताना दिसतायत (मराठी व्याकरणात न-लोकोत्तर आणि अ-आदरणीय हे शब्द नाहीत हे मला माहितीय पण तरी मी मुद्दाम लिहिलेत. स्पष्टीकरण पुढे लिहीनच). यातल्या काही 'रत्नां'बद्दल लिहिण्याचा हा खटाटोप! राजकारण क्षेत्रात राजपुत्र चि. राहुल गांधी, क्रीडा क्षेत्रात श्री श्री श्री सर रवींद्रसिंहजी जडेजा, आणि कलाक्षेत्रात (?) थुसार कपूर (यांना श्री. , कु., चि. यातलं नेमकं काय लागू होतं याची कल्पना नसल्याने ? लिहिलं असून एका आकडेज्योतिषाच्या सांगण्यानुसार त्यांच्या नावाचा उच्चार आम्ही 'थुसार' असा करतो) हीच ती न-लोकोत्तर, अ-आदरणीय मंडळी! (मी हे नमूद करू इच्छितो की या तिन्ही क्षेत्रात अशी माणसं शेकड्याने असतील पण या तिघांवर माझा 'विशेष जीव' आहे)
या
प्रत्येकाने काहीही विशेष करतासुद्धा यांच्याबद्दल जेवढं लिहिलं, बोललं
जातं ते पाहून मला आश्चर्य वाटतं. राष्ट्रीय स्तरावर लोकांना माहीत असलेली
ही तिन्ही माणसं निष्क्रिय माणसं आहेत का? उत्तर 'नाही'..पण यातल्या
कुणीतरी प्रचंड कौतुकास्पद कामगिरी केलीय का? उत्तर 'नाही'..ही सगळी हुशार,
जिनियस माणसं आहेत का? उत्तर 'नाही'.. ही सगळी मठ्ठ माणसं आहेत का? तर
याचंही उत्तर 'नाही'! यातल्या कुणीच अनादर वाटावा, चीड यावी अशी कामगिरी
(अजूनतरी) केलेली नाही पण म्हणून त्यांच्यातल्या कुणाबद्दलच मला जरासुद्धा
आदर वाटत नाही म्हणून अ-आदरणीय. या सगळ्यांचीच आत्तापर्यंतची कामगिरी
पाहून, वक्तव्यं ऐकून कधी गालातल्या गालात तर कधी पोट धरधरून हसायला येतं,
यदाकदाचित यातल्या कुणीही काही कर्तुत्व गाजवलं तरी ते 'लक बाय चान्स' असेल
असं मला वाटतं म्हणून हे तिघे एकविसाव्या शतकातले 'न-लोकोत्तर' पुरुष
आहेत!
चि. राहुल गांधी हे राजघराण्यात जन्माला आले हे त्यांचं कर्तुत्व नाही (मणिशंकर अय्यर यांना तसं वाटू शकतं). दाढीचे खुंट वाढलेला चेहरा घेऊन आणि खादीचे
कपडे घालून आजी-पणजोबांच्या पुण्याई(?)वर संपूर्ण देशभर भटकणाऱ्या ४३
अ-संसारी, युवा पुढाऱ्यामध्ये आदर वाटावा असं काहीच नाही! त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्यांच्या नागरिकत्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत. देशाच्या अजून अस्तित्वात असलेल्या सगळ्यात
जुन्या राजकीय पक्षाची धुरा (उपाध्यक्ष) त्यांना देण्यात आली आणि या
पक्षाच्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झालं. त्यांनी जीव- तोडून उत्तर
प्रदेशमध्ये प्रचार केला पण पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही. त्यांनी या पराभवाची जबाबदारी मान्य केली (लॉल) आणि पुन्हा त्यांचा उदोउदो झाला. आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काही चांगलं केलं तरी कौतुक होत नाही..पण राजपुत्राची गोष्टच वेगळी..त्याच्या हरण्याचं पण कौतुक करायला लोक तयार असतात ही शोकांतिका! भ्रष्टाचार, दहशतवाद या महत्वाच्या विषयांवर त्यांनी कधीच ठोस मतं मांडलेली नाहीत. तूर्तास ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकींसाठी तयारी करत असल्याचं समजतं. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशातल्या निकालांची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होवो अशी माझी अपेक्षा आहे (पण याचबरोबर
मुलायम-माया-करुणा-ममता असे सोज्वळ शब्द नावात असलेल्या कोणत्याही
नेत्याच्या पक्षाकडे देशाच्या राजकारणाच्या नाड्या जाऊ नयेत ही कळकळीची
प्रार्थनासुद्धा आहे)
थुसार कपूर हेसुद्धा
घराणेशाही कोट्यातून सिनेसृष्टीत आलेल्या फरदीन-उदय-झायेद-हर्मन यांच्यातलं
एक नाव, जे बालाजीच्या कृपेने आजही तग धरून आहे! 'मुझे कूच कहना है' अशा
नावाच्या सिनेमातून चंदेरी दुनियेत आलेल्या थुसारला काय सांगायचं होतं ते
अजून इतक्या वर्षांनीसुद्धा कुणाच्या बहुतेक लक्षातच आलेलं नाहीये. गोलमाल
नामक चित्रपट मालिकेत केलेली मूक-बधिर 'लकी'ची भूमिका लोकांमध्ये बरीच फ़ेमस
आहे. या भूमिकेसाठी त्याला अभिनयाचा पुरस्कार वगैरे पण मिळालाय जे बघून
त्याच्या वडलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे आपण पाहिलंय (लॉल). खरंतर
त्याचा केकाटणे-गोंगाट स्वरूपी अभिनय पाहून 'अभी नय' भाई बस करो असं
म्हणायची खूप इच्छा होते पण पुन्हा एकदा आपलं ऐकायला कुणीच नसतं ही
शोकांतिका! 'खाकी' हा त्याची भूमिका असलेला एकमेव चित्रपट सोडून मी त्याचा
एकही चित्रपट सिरीयसली बघू शकलेलो नाही..'शूटआउट एट लोखंडवाला' नामक
सिनेमात त्याला कुख्यात शार्प शूटर दिलीप बुवाची भूमिका करताना पाहणं हा
माझ्या मते त्या गुंडाचा अपमान होता. तर असे गुंडाचे आणि हिरोचे 'जबरदस्त'
रोल करणाऱ्या थुसारला अमेरिकेत कुठल्यातरी पब का क्लबच्या बाहेर तो
'अंडर-एज' असल्याचा संशय येउन अडवलं होतं हे वाचल्याचं आठवून पण मी
'लोळतो'! स्वतःच्या नावामध्ये एक निष्कारण 'h' घालून तो थांबलेला
नाही..नुकतंच त्याच्या सांगण्यावरून एका चित्रपटाचं नाव "ब"जाते रहो ऐवजी
"भ"जाते रहो केलं गेलंय… (पुन्हा लॉल). सरतेशेवटी थुसार हा एक 'अभिनेता'(?)
आहे आणि तो ज्या कुठल्या भूमिका करेल त्याला तो त्याच्या अनोख्या,विनोदी
शैलीतच करणार हे मी गृहीत धरलंय आणि त्याला कधीतरी काहीतरी जमेल ही शक्यता
बाद केली आहे.
सरतेशेवटी, लास्ट बट ऑफकोर्स नॉट द लीस्ट- श्री श्री श्री सर रविन्द्रजी जडेजा! मुळात मी या महा-पुरुषांबद्दल आत्ता अचानक लिहायला घेतलं याचं मुख्य कारण 'सर' आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतर्क्य, अचाट, अफाट, अबब कामगिरीने मला इतक्या दिवसांनी लिहायला प्रोत्साहन दिलंय! त्यांच्या केशरचनेपासून त्यांच्या नृत्यकौशल्यापर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालंय. निव्वळ ३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 'बॉल ऑफ द सेन्चुरी' टाकलाय आणि समस्त क्रिकेट विश्वाला 'आर्ट ऑफ लिविंग' चा धडा घालून दिलाय! स्थानिक कसोटी सामन्यात त्यांनी
३०० धावांचा बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात
त्यांनी धावा केल्या नाहीत की त्यांची चेष्टा होते जी त्यांच्या पंख्यांना
मान्य नाही! सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी 'जड्डू' नावाचं एक हॉटेल पण काढलंय. सर
बहुचर्चित IPLच्या पहिल्या सिझनमध्ये विजेत्या राजस्थान रॉयल संघात होते.
हा संघ इतर सगळ्यांपेक्षा 'लिंबूटिंबू' मानला गेला होता पण तेव्हा
सरांबद्दल कुणालाच माहीत नव्हतं. सरांमुळे राजस्थान जिंकलं. सर भारतीय संघात आल्यापासून आपण एकही कसोटी सामना हरलेलो नाही. थुसार आणि चि. गांधी यांची इतकी थट्टा
केल्यावर मी सर जडेजा यांच्याबद्दल असं काहीतरी लिहू शकेन अशी मला अपेक्षा
होती. पण माझी हिम्मतच होत नाहीये..शेन वॉर्न सारखा महान खेळाडू सरांना
'रॉकस्टार' म्हणतो तर मी बापडा त्यांना काय विशेषणं लावणार? (मराठीत 'रॉक'
म्हणजे दगड नाही का?)
अशा काही घटना आहेत ज्या कधीच घडू नयेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. १) सर जाडेजांना 'विस्डेन' चा 'क्रिकेटर ऑफ द यिअर' पुरस्कार मिळणं २) थुसार कपूरला अभिनयाचं ऑस्कर मिळणं..आणि ३) चि. राहुल गांधींना नोबेल शांतता पुरस्कार मिळणं. या सर्व अ-आदरणीय लोकांची गेल्या पाच-सात वर्षातली कामगिरी आणि मी उल्लेख केलेल्या सर्व पुरस्कारांची गेल्या कित्येक दशकांमधली क्रेडिबिलीटी पाहता या सगळ्या गोष्टी अशक्यच वाटतायत..पण काही गोष्टी मात्र नक्की शक्य आहेत. १) सर जडेजा १५-२० कसोट्या आणि अजून ३०-४० वन डे खेळून आधी कमेंटेटर आणि नंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष बनणार २) थुसार कपूरला २०२० साली पद्म पुरस्कार आणि २०३५ सालचा अभिनयाचा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार मिळणार आणि ३) चि. गांधींना इतर जवळपास सर्व माजी 'खांग्रेस' पंतप्रधानांसारखा 'भारतरत्न' मिळणार (ही शेवटची गोष्ट कधीच होऊ नये अशी खरंच खूप खूप जास्त इच्छा आहे म्हणून ती लिहिणार पण नव्हतो पण गेल्या सहा-सात दशकातला कारभार पाहता या सगळ्या विनोदी कल्पनांमध्ये भीषण वास्तवाचा उल्लेख असावा असं वाटलं म्हणून लिहिली)
मला शाळेत नेहमी शिकवलं गेलंय की कोणत्याही लिखाणाची
सुरुवात आणि शेवट चांगला असला तर वाचणाऱ्यांच्या मनात त्याचा 'ठसा' उमटतो.
हे डोक्यात ठेवून लिहायची सुरुवात करताना चाणक्य, तेंडुलकर ही नावं लिहिली.
पण शेवट गोड कसा करू? कडू, खारट असं काही चुकून खाल्लं गेलं की साखर खाऊन
तोंड गोड करता येतं पण चुकून खूप गरम चहा-कॉफीचा घोट घेऊन जीभ भाजली की
काहीच करता येत नाही…पुढचे काही तास, दिवस कशालाच चव लागत नाही. थुसार, सर
जडेजा आणि चि. गांधी यांची इतकी स्तुती वाचून कुणी शेवटपर्यंत हे सगळं
वाचणारे का याचीच खात्री नाहीये! पण इतकंच म्हणतो की आपल्याला माहित
असलेल्या प्रत्येक क्षेत्रात एकतरी अशी व्यक्ती सापडते जिच्याशी आपलं कधीच
पटत नाही. जिव्हाळा नसतो, भांडणंदेखील नसतात पण तरी उगाचच आपल्याला काहीतरी
खटकत राहतं! अशा मला खटकणाऱ्या माणसांबद्दल जाहीर मंचावर 'स्तुती'
करण्याची माझी हौस मी भागवून घेतली. त्यांची उघडपणे थट्टा करण्यात
कोणाच्याही आणि 'कोणत्याही' भावनांना ठेच लागली असली तर सॉरी पण 'नो
सॉरी'!! येत्या काळात ही मंडळी देशाचं, त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचं
अतोनात नुकसान न करता आपल्याला (स्पेसिफिकली मला) अशीच हसवत राहतील अशी
बालाजीचरणी प्रार्थना!
।।श्री श्री श्री न-लोकोत्तर अ-आदरणीय महा-पुरुषाय(?) न-नमः।।
2 comments:
सरांचा अपमान म्हणजे आमचा अपमान.. त्यामुळे जोरदार णी शे ढ !!
तुसशार कपूर बद्दल अस्मादिकांनीही चार ओळी खरडल्या होत्या :)
http://www.harkatnay.com/2011/04/blog-post_15.html
धन्यवाद हेरंब! सरांचा अपमान केल्याबद्दल मंडळ जाहीर दिलगिरी व्यक्त करत आहे!
थुसार वरचा लेख वाचतो आता…त्याच्या 'टायलेंट'बद्दल आपलं एकमत असणारे याची खात्री आहे मला :) :)
Post a Comment