Pages

Saturday, November 12, 2011

तारखा!

तारखा! लोकांना अलीकडे कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटायला लागलं आहे! ११-११-११ या तारखेत नाविन्य किंवा कौतुक वाटण्यासारखं काय आहे असा मला प्रश्न पडतो. मान्य आहे की ११-११-११ ही तारीख एकदाच येते पण त्याच लॉजिकने ११-१२-११ ही तारीख पण किंवा इतर कुठलीही तारीख एकदाच येते नाही का? मध्यंतरी बातमी वाचली की भारतात लोकांना लग्न करायला, मुलांना जन्म द्यायला (?) हीच तारीख हवी होती. आधी लोकांच्या वेडेपणाची चेष्टा केली आणि मग सहज जुन्या आठवणींमध्ये हरवून मी गेल्या काही वर्षातल्या महत्वाच्या तारखा आठवत बसलो. बऱ्याच गोष्टींची वर्षंपण आठवत नाहीयेत पण त्या तारखा लक्षात राहिल्या...त्यातल्या काहींचा हा लेख-जोखा!!

२६ जानेवारी..बहुदा २०००..भारताच्या लक्षात राहिला त्याचं कारण गुजरातमध्ये झालेले भूकंप. माझ्या लक्षात राहिला कारण त्यादिवशी मी शाळेच्या दोन दिवसाच्या कॅम्पसाठी कर्जतला निघालो होतो. आम्ही चर्चगेट स्टेशन का व्हीटी स्टेशनला असताना भूकंपाची बातमी कळली. मी तेव्हा नववीत असेन. तेव्हा त्या भूकंपाच महत्व कळायचं किंवा त्या भूकंपामुळे झालेल्या जीव-वित्तहानीबद्दल हळहळ करायची अक्कल असायचं वय नव्हतं. मला आणि माझ्याबरोबरच्या कित्येकांना आता कॅम्प जाणार का नाही हाच प्रश्न पडला असेल. जुन्या बॅचच्या मुलांनी त्यांच्या कॅम्पस मध्ये केलेले किस्से सगळ्यांनी ऐकले होते. वर्गातली अमुक मुलगी किंवा मुलगा रात्र झाली की भेटणार आहेत, हे हे सर रात्री दारू पितात वगैरे वगैरे गोष्टींबद्दल आम्ही काथ्याकुट केली होती. शाळेतल्या ओळखीच्या लोकांबरोबर अनोळखी ठिकाणी राहायला जाण्याचा, कॅम्पफायरचा, शाळेतल्या सरांना आणि बाईंना जेवण करताना बघण्याचा, त्यांच्याच बरोबर बसून जेवण्याचा पहिला अनुभव म्हणून २६ जानेवारी नेहमी लक्षात राहिला.

२००४ चा १५ ऑगष्ट...वर्ष नीट आठवतंय कारण त्याच वर्षी १२वी पूर्ण झालं. सगळे लोक स्वातंत्रदिनाची सुट्टी एन्जॉय करत असताना मीसुद्धा स्वातंत्राच्या वाटेवर होतो. याचं दिवशी पुढच्या जवळपास चार वर्षांसाठी अस्मादिक शिरूर नामक गावी दाखल झाले. तेव्हा डोक्यात घराबाहेर पडल्याच्या, आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करण्याच्या कल्पना होत्या. पुढच्या चार वर्षात सगळं सगळं बदललं. त्या दिवशी मात्र या गोष्टीची पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. श्री. विशाल मधुकर शिंदे यांना खाबिया हॉस्टेलवर पहिल्यांदा भेटलो तो याच दिवशी!

११ जुलै..मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले हे सगळ्यांच्या लक्षात आहे. पुणे विद्यापीठातसुद्धा त्याच दिवशी झालेल्या स्फोटांचा फारसा कुणाला पत्ता नव्ह्ता. त्याच दिवशी संध्याकाळी पुणे विद्यापीठाने फार्मसीचे रिझल्ट्स नेटवर डिक्लेअर केले होते. मी तेव्हा वसईत होतो. बाकी सगळे वर्गातले लोक शिरूरमध्ये. सेकंड यीअर हे फार्मसीमधलं काळं वर्षं आहे. आमच्या वर्गातली १३ मुलं नापास झाली. अनेकांना केट्या लागल्या. मलासुद्धा रिझल्टचं भयानक टेन्शन होतं. घरी न सांगताच मी सायबर कॅफेला पळालो होतो. सगळ्यात आधी माझा रिझल्ट बघितला. फर्स्ट क्लासमध्ये नंबर पाहिल्यावर जीवात जीव आला. शिरूरमध्ये पहिला फोन मी कुणाला केला ते आठवत नाही पण रिझल्ट लागलाय आणि मी सायबरमध्ये आहे हे कळल्यावर शिरुरमधून मला फोनवर फोन यायला सुरुवात झाली. ज्यांचे नंबर्स फर्स्ट क्लास, सेकंड क्लासच्या लिस्टमध्ये होते त्यांना आनंदाची बातमी द्यायला काही वाटत नव्हतं पण ज्यांचे नंबर सापडत नव्हते (म्हणजे अर्थातच हे सगळे ...) त्यांना उत्तर द्यायला मात्र जाम वाईट वाटत होतं. घरी आलो तेव्हा आई-बाबा मी कुठे गेलोय याचा विचार करत बसले होते. टीव्ही सुरु होता आणि मुंबई लोकलमधल्या स्फोटाच्या बातम्या सुरु होत्या.

२६ जुलै. पावसाने फायनली एकदाची मुंबई सपशेल बंद पाडली. २५ जुलैपासून धो-धो पाउस कोसळत होता. मी मुंबईहून शिरूरला जायला नेमका हाच दिवस निवडला होता. पावसामुळे हवा थंड होती. मला पुण्याला जायला कुठलीतरी ट्रेन मिळाली होती. बहुदा मुंबईतून पुण्याला आलेली ती त्या दोन दिवसातली शेवटची ट्रेन असावी. लोणावळा स्टेशन जवळपास पाण्याखाली होतं. मला ट्रेनमध्ये झोप लागली. पुण्यात पोहोचलो तेव्हा पाउस होता का ते आठवत नाही..पण आईने कौतुकाने करून दिलेली चिवडा आणि शंकरपाले असलेली पिशवी गायब झाली होती. नंतर आईने कधीतरी फोनवर विचारलं- कसा झाला होता चिवडा?मी काय उत्तर देणार? २६ जुलै आजही आठवला की मला आठवतं ते पाण्यात बुडलेलं लोणावळा स्टेशन आणि आईने दिलेला आणि मी कधीच न खाल्लेला चिवडा!

३० नोवेम्बर..कारण आठवत नाही पण लोकांनी डेक्कन क्वीन पेटवली होती. दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईत फार्मसीच्या एका इवेन्टला जायचं होतं. बहुतेक पुण्यात दंगली झाल्या किंवा तत्सम काहीतरी घडलं होतं खरं!!मुंबई-पुणे बसेस चालू आहेत की नाही ते माहित नाही! पण मला आणि स्नेहाला मुंबईला एकत्र जायची ती पाहिलीच संधी मिळाली होती. आम्ही अट्टाहास करून निघालो. स्वारगेटला चक्क बससुद्धा मिळाली. या घटनेचे संपूर्ण डीटेल्स या ब्लॉगच्या आवाक्याबाहेरचे आहेत पण हो..तुम्ही असलेल्या बसवर दगडफेक झाली तर साधारण मनःस्थिती, वातावरण काय असू शकतं याचा अंदाज त्या दिवशी आला. कर्वे रोड का कुठेतरी आमची बस अचानक रस्त्यात थांबली. "झुको झुको" असा कुणीतरी ओरडलं आणि बसच्या काचा फुटण्याचा आवाज, बायकांचं किंचाळणं, लहान मुलांचं रडणं या सगळ्या प्रकारात घाबरलेलं नसतानासुद्धा स्वतःच्या छातीचे ठोके स्वतःलाच जाणवतात. मला तिथे थांबायचं होतं, तो दगडफेक करणारा हरामखोर कोण ते पहायचं होतं, त्याला लोकांनी धरला आणि हाणला तर हात साफ करायची इच्छासुद्धा होती. पण तसं काहीच झालं नाही. स्नेहाने बाजूच्या कुठल्यातरी बोळात मला ऑलमोस्ट ओढत नेलं. त्या बोळात, संध्याकाळच्या त्या वेळी आम्हाला एक रिक्षासुद्धा मिळाली. पुढच्या दोन मिनिटात आम्ही संपूर्ण सुरक्षित आणि पापभिरू सदाशिव पेठेच्या वाटेला होतो. सदाशिव पेठेसारखा पुण्यातला भुलभुलैय्या असणारा भाग, शनिवार पेठेतल्या मोदी गणपतीपासून नातुबागेत स्नेहाच्या घरी पायी रस्ता शोधात पोहोचणं मी त्या रात्री केलं. नंतरच्या वर्षांमध्ये पुण्यातले रस्ते ओळखीचे झाले. माणसं ओळखीची झाली, पण त्या सगळ्याची लौकिकार्थाने सुरुवात त्या दिवशी झाली.

आज ११-११-११..आज माझ्या दृष्टीने विशेष असं काही घडलं नाही. काल रात्री म्हणजे जवळपास आज पहाटे झोपल्यामुळे मी लौकर उठायची शक्यता नव्हती. दुपारी साडेबाराच्या सुमारास रॉकी उठवायला आला ते 'टेक स्टेशन'चं पाणी गेल्याची बातमी घेऊन!( मी राहतो त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं नाव टेक स्टेशन आणि हो अमेरिकेत पाणी जातं!!). स्विमिंग पूलवर अंघोळ करायला जायचं का विचारायला तो आला होता. गेल्याच आठवड्यात एका लेक्चरमध्ये आमचे एक प्राध्यापक जीन गोर्ड म्हणाले होते- "कतरिना येऊन गेल्यावर मी वीज, फोन, गॅस अशा सगळ्याशिवाय राहायला शिकलो..(कतरिना हे लुझियाना राज्यात काही वर्षापूर्वी झालेल्या वादळाचं नाव आहे..गैरसमज नकोत) पण वाहत्या पाण्याशिवाय राहणं मला नाही शक्य"...काल रात्री कुणाचं तोंड बघून झोपलो असा विचार करत उठलो. रॉकी आणि मी पूलवर आंघोळ करून आलो. नंतरचा दिवस नेहमीसारखाच होता...आत्ता रात्रीचे बारा वाजून गेलेत..अजून पाणी आलेलं नाही..ते कधी येईल ते ठाऊक नाही..पण ११-११-११ ही तारीख लक्षात ठेवायची ठरवलंच तर या पाणी प्रश्नासाठी लक्षात राहील.

उगाचच काहीतरी लिहावं म्हणून हा ब्लॉग लिहिला नाही! हेतू इतकाच आहे की सगळ्यांना ही जाणीव व्हावी की जगासाठी एखाद्या तारखेचे काहीही दिनविशेष असोत..आपल्याकडे काय आहे?याचा विचार करूया! जर का आपले 'पर्सनालाईझड' दिनविशेष असतील तर आठवूयात आणि नसले तर आठवणींमध्ये अशा अजब गोष्टींची मोलाची भर पाडता येईल का ते पाहूया!! 


चैतन्य