Pages

Showing posts with label ईशान्यनिती. Show all posts
Showing posts with label ईशान्यनिती. Show all posts

Tuesday, August 14, 2012

दोन बायका असणारा नवरा

इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून त्यांचा मोठेपणी व्यवहारात काही फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात आलेले अनुभव, भेटलेली माणसं लक्षात घेता पंचतंत्र, इसापनीतीमधले धडे न घेता त्यात लिहिल्याच्या उलट किंवा अजूनच काहीतरी भलतं जगात घडतं या मताचा मी झालोय.. म्हणून या वर्षी एक नवीन प्रयोग सुरु केला. वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नवीन स्वरूपात! आवडतायत का ते नक्की सांगा आणि आपल्या भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवायची जबाबदारी मी वाचणाऱ्या लोकांवर सोपवतो आहे! या प्रयोगातली  ही तिसरी गोष्ट. 
याआधी: ईशान्यनीती १ईशान्यनीती 
                                                                                **                                                                   
दोन बायका असणारा नवरा (ईशान्यनिती ३)

एक आटपाट मेट्रो होतं. तिथल्या एका मोठ्या कंपनीच्या अलिशान ऑफिसमध्ये 'तो' काम करायचा. गेले काही दिवस तो बराच तणावात असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांना जाणवत होतं. चांगला तरुण मुलगा! जॉईन झाल्यावर पहिल्याच वर्षात तगडं प्रमोशन. मेहनती होता. आजूबाजूच्यांना मदतसुद्धा करायचा. त्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये फारशी न दिसणारी आपुलकी बरोबरच्यांना त्याच्याबद्दल होती. एक दिवस न राहवून त्याच्या बाजूच्या क्युबिकलमध्ये बसणाऱ्या चाळीशीच्या सहकाऱ्याने त्याला विचारलं-
"तू एवढा तरुण, उत्साही..अलीकडे इतका उदास का असतोस?"
त्याने आधी खुलून बोलायला आढेवेढे घेतले पण आग्रह केल्यावर, इतर कुणाला न सांगायचं प्रोमीस केल्यावर बोलायला सुरुवात केली.  
"माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागलेत.."
"अरे मग बरोबरच आहे की..आता इथे चांगला रुळला आहेस तू...आता सेटल होणार नाहीस तर कधी होणार?"
"माझी लग्न करायला हरकत नाहीये..पण मला ठरवून लग्न नाही करायचं..."
"अच्छा..आत्ता समजलं मला..तुला प्रेम-विवाह करायचा आहे..मग..कुणी भेटली नाही कधी? की भेटलीय तिला तू सांगितलं नाहीस अजून?"
"अ घोळ असा आहे की..अ..माझ्या आयुष्यात खरंतर दोन मुली आहेत.."
सहकाऱ्याने आ वासला आणि पाय जमिनीवरून वर उचलले. त्याची चाकं असणारी खुर्ची घरंगळत मागे गेली.
"काय सांगतोस काय लेका?शिंच्या यात उदास होण्यासारखं काय आहे?"
मग त्याने सगळं सविस्तर सांगितलं. दोन्ही मुली त्याच्या गेली कित्येक वर्षं चांगल्या मैत्रिणी होत्या. ब्रेन आणि ब्युटी कधीच एकत्र नसतात असं म्हणतात म्हणे. त्या दोघींच्या बाबतीत ते तंतोतंत खरं होतं. एक दिसायला फारशी बरी नव्हती पण खूप हुशार होती. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची तिला नोकरी होती. दुसरी दिसायला खूप सुंदर पण बुद्धीला बेताची. तिच्या रुपामुळे तिला एकवेळ नोकरी मिळाली असती पण आपल्या बायकोला तिच्या सुंदर दिसण्याने नोकरी मिळालीय हे कोण पुरुष सहन करेल? तिलासुद्धा नोकरी करण्यात वगैरे फारसा रस नव्हताच पण घरी राहून संसार बरा असता केला तिने. दोघीही त्याच्याशी लग्न करायला तयार होत्या. त्याने शांत डोक्याने निर्णय घेतलाही असता पण अलीकडे झालेल्या एका घटनेने तो बराच उदास झाला होता. झालं असं की पंचविशी उलटल्यावर अनुवंशिक कारणांनी त्याचे केस गळायला लागले. अलीकडे केस जाणाऱ्या माणसांसाठी खूप नवीन पद्धती आणि औषधं निघाली आहेत. त्याने त्या उपायांची चौकशी केल्याचं त्या दोघींना सांगितलं. पहिलीने त्याला अशी कोणतीही शस्त्रक्रिया करून घेण्यास किंवा औषधं घेण्यास विरोध केला. त्याने जे नैसर्गिक आहे ते मान्य करावं असं तिचं मत होतं. तर दुसरीने त्याला पूर्ण टक्कल पडण्याआधी तत्काळ उपाय करून घ्यायला सांगितलं. देवाने दिलेला सुंदर चेहरा केस गेल्याने काहीसा विद्रूप होऊ नये असं तिचं म्हणणं होतं. आपला जोडीदार आपल्या रुपाला साजेसा असावा अशी दोघींच्या मनात असणारी इच्छा त्याने ओळखली होती आणि त्यानेच तो उदास झाला होता.
सहकाऱ्याने त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि खो-खो हसायला लागला.
"अहो, मी खरंच गंभीरपणे या गोष्टीचा विचार करतोय आणि तुम्ही हसताय?"
"अरे हसू नाही तर काय..आजच सकाळी माझ्या ८ वर्षाच्या मुलाला माझी आई एक इसापनीतीतली गोष्ट सांगत होती. दोन बायका असणाऱ्या नवऱ्याची. एक बायको म्हातारी, दुसरी तरुण. माणसाचे केस पांढरे व्हायला लागले तर आपल्या रुपाला तो शोभावा म्हणून तरुण बायको त्याचे पांढरे केस उपटायला लागली आणि म्हातारी काळे! बिचारा टकला झाला शेवटी!!" सहकारी अजून खोखो हसतच होता.   
"काहीतरीच काय? अशी गोष्ट इसापनीतीत आहे?" 
"अलबत.."
"इसाप काय नितीमुल्य शिकवतो या गोष्टीतून?"
"तो कसला डोंबलाची मूल्य शिकवतोय? त्याचं एक पण लग्न झालं नव्हतं...उगाच नितीमुल्य शिकवायला दोन बायका असणारा पुरुष म्हणे..त्याला या गोष्टीतून म्हणे हे सांगायचं होतं की सगळ्यांना सुखी ठेवण्याच्या प्रयत्नात कुणालाच सुखी ठेवता येत नाही"
"खरं आहे की मग ते.."
"कसलं खरं..? हे बघ, प्रश्न टक्कल पडण्याचा असेल तर तुला एकही लग्न न करता पडलंय आणि मला समवयस्क बायको असूनही टक्कल पडलंय..मुळात सध्या 'एका माणसाच्या दोन बायका' काही अपवाद* सोडल्यास पाहायला मिळत नाहीत कारण तसे सेन्सिबल नियम केलेले आहेत. पण लहान मुलांना गोष्ट म्हणून सांगायलासुद्धा मला ही संकल्पना युसलेस वाटते..तुला माहितीय गोष्ट ऐकल्यावर माझा मुलगा काय म्हणे? 'मी तर तरुण असतानाच दोन लग्न करेन..माझ्या दोन्ही बायका माझ्याच वयाच्या असतील..दोघीपण खुश राहतील"..सांग, आता काय बोलायचं याच्यावर? आपल्याला तर गोष्टच नाही पटली बुवा..एकीकडे आपण मुलांना रात्री झोपताना प्रार्थना करायला लावायची की देवाला सांगा सगळ्यांना सुखात, आनंदात ठेव..आणि दुसरीकडे तुम्ही सगळ्यांना सुखात ठेवू शकत नाही हे शिकवायचं?..बरं त्यातही पुढे जाऊन बायकोला सुखी ठेवायचा विषय-" सहकारी गप्प झाला.
"त्याचं काय?" त्याने सहकाऱ्याला तंद्रीतून बाहेर काढलं. 
"अरे..काही आधुनिक तत्वज्ञ तर या गोष्टीचे वेगळेच निष्कर्ष काढतात..त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बायका पुरुषांकडून कायम काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करतात..दुसऱ्या एका व्हर्जनमध्ये तो माणूस कंटाळून दोघींना सोडून निघून जातो कारण त्या त्याच्या कलाने घेण्याऐवजी त्याला स्वतःच्या मनासारखं वागायला लावतात!"
"मग यातला बरोबर निष्कर्ष कुठला?"
"म्हटलं तर सगळेच नाहीतर कुठलाच नाही!"
"आता तुम्ही मला कन्फ्युस करताय..."
"ठीके..तू आत्ता योगायोगाने मेटाफोरिकली त्या माणसाच्या जागेवर आहेस! तू जो निर्णय घेशील तो कशाच्या आधारावर घेशील...?"
"कदाचित माझ्या स्वतःच्या आनंदाचा विचार करून..."
"करेक्ट...देअर यु आर...सगळ्यांना सुखी ठेवण्याआधी स्वतःचं सुख महत्वाचं...आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवति| हा श्लोक इसापनीतीत नाही पण कदाचित त्याहून जुना आहे. दुसरं..माझ्या एका तपाच्या लग्नाच्या अनुभवावरून सांगतो की बायका कॉम्प्लेक्स असतात पण दरवेळी त्या पुरुषांकडून काहीतरी काढूनच घेण्याचा प्रयत्न करतात हे मला एखाद्या मूर्ख पुरुषाने किंवा बाई असण्याची लाज वाटणाऱ्या बाईने केलेलं विधान वाटतं...आणि शेवटी लग्न, सहचर्य म्हणजे काय रे..एकमेकांना आनंदात ठेवणं, एकमेकांच्या गरजा भागवणं..बरोबर..?आणि तिसरं...तुझं दोघींशी पटत नाही, तू दोघींनाही आनंदी ठेवू शकत नाहीस म्हणून तू पळून जातोस..हा पलायनवाद झाला...ज्या दोन मुलींचा गेली काही वर्षं तू पोटेंशियल आयुष्याचा जोडीदार म्हणून विचार करतो आहेस त्या दोघींनाही तू सोडून देशील..??"
"कळले मला तुमचे मुद्दे..पण तुमचा नेमका राग गोष्टीवर आहे की त्याच्या वेगवेगळ्या निष्कर्षांवर?"
"कदाचित दोन्हीवर..इसापनीती म्हणजे मानवी आयुष्याच्या जवळ जाणाऱ्या नीतिकथा असं आपण नेहमी कौतुक ऐकतो..पण मला कायम त्या एककल्ली वाटतात! मानवी आयुष्यात इतकी टोकाची माणसं नसतात..माझं इतकंच मत आहे की काळाच्या ओघात गोष्टी बदलायला हव्यात, त्यातून मिळणारी नितीमुल्य बदलायला हवीत..आता याच गोष्टीचं म्हणालास तर 'बहुभार्या पद्धत चुकीची होती' हे कन्क्लूजन योग्य..बाकी ते सगळ्यांना सुखी ठेवता येत नाही हे शिकवायला इसापनीतीची गरजच नाहीये खरंतर..काय?!"
"हं..." त्याने मान डोलावली.
"मग जर का मी सांगितला तो निष्कर्ष पटला असेल तर टक्कल पाडून घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय लौकरात लौकर घे...काय?" सहकारी स्वतःच्या टकलावरून हात फिरवत हसत म्हणाला.
"हो..नक्की!" त्याने हसत उत्तर दिलं आणि दोघे कामाला लागले.


*हा ब्लॉग लिहिताना गुगलिंग करताना ही बातमी सापडली आणि आत्ता लिहिला तो निष्कर्ष लिहिला. बातमी वाचून हसायला आलं थोडं पण माझ्या निष्कर्षाला वास्तवाची जोड मिळाली. हा हा हा! 

Monday, February 6, 2012

कोल्हा आणि द्राक्षं

इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून त्यांचा मोठेपणी व्यवहारात काही फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात आलेले अनुभव, भेटलेली माणसं लक्षात घेता पंचतंत्र, इसापनीतीमधले धडे न घेता त्यात लिहिल्याच्या उलट किंवा अजूनच काहीतरी भलतं जगात घडतं या मताचा मी झालोय.. म्हणून या वर्षी एक नवीन प्रयोग सुरु केला. वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नवीन स्वरूपात! आवडतायत का ते नक्की सांगा आणि आपल्या भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवायची जबाबदारी मी वाचणाऱ्या लोकांवर सोपवतो आहे! या प्रयोगातली  ही दुसरी गोष्ट. (पहिली गोष्ट इथे वाचा)
                                                                              **
कोल्हा आणि द्राक्षं (ईशान्यनिती  )


'लबाडी-धूर्तपणा आणि हुशारी-चतुरपणा यांच्यातला फरक नेमका कसा ठरवायचा बरं?' कोल्हा सकाळपासून याच विचारात गुंतला होता. कोल्हा या प्राण्याची जगात काय इमेज आहे हे अलीकडेच त्याला एका घुबडाकडून कळलं होतं. मागे एकदा त्याच्या एका पूर्वजाने जेव्हा एका सिंहाच्या गुहेबाहेरचे पायाचे ठसे पाहून आपला जीव वाचवला तेव्हा कोल्ह्यांना सगळे 'चतुर कोल्हा' म्हणायला लागले पण जेव्हा त्यांच्याच एका दुसऱ्या भाऊबंदाने कुठल्यातरी दोन प्राण्यांच्या भांडणानंतर त्यांची शिकार पळवली तेव्हा त्यांच्या जमातीचं नाव 'लबाड', 'धूर्त' असं पडलं. बुद्धिवादी कोल्ह्याला कुठल्यातरी एका प्रसंगामुळे त्याच्या जमातीची झालेली बेअब्रू सहन होत नव्हती. 
"बाळा, कसल्या विचारात गुंतला आहेस?" त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं.
त्याने वडिलांना घुबडाने सांगितलेली हकीकत सांगितली. ते ऐकून वडील विचारात पडले. 
"आपण कोल्ह्यांनी कधीच काही का केलं नाही? जंगलात आपली प्रतिमा किती मलीन झालीय माहितीय?" त्याने तावातावाने विचारलं.
"तुला काय वाटलं की आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्रयत्न केले नाहीत? आपण काहीही बोलायला गेलो तर सगळ्यांना आपण धूर्तपणे काहीतरी योजना आखतोय असलंच काहीतरी वाटतं. तुला सांगतो, ती शिकार 'चोरण्याची' दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी आपल्या जातीला, आपल्या बुद्धीला खूप मान होता. एका अर्थाने त्या अस्वल आणि लांडग्याच्या भांडणाचा फायदा घेणारा आपला भाईबंद आपल्यामध्ये उपजत असणाऱ्या बुद्धिमत्तेचं उदाहरण नाही का?" 
"ते सगळं जरी खरं असलं तरी हा युक्तिवाद तर्कशुद्ध नाही ना?जी आपल्याला हुशारी वाटते ती जगाला लबाडी वाटते.."
"बाळा, जगातल्या प्रत्येक प्रकारच्या जाती-जमातीच्या प्रत्येक श्रद्धा, समजुती, विचार तर्कशुद्ध आहेत असं वाटतं तुला?"
त्याने थोडा विचार केला. वडील म्हणतायत ते बरोबर आहे हे त्याला पटलं. 
"मला कळतंय बाबा तुम्ही म्हणताय ते..पण मला प्रश्न पडलाय की आपल्या बाबतीतल्या या संकल्पना, समजुती वगैरे आल्या कुठूनआणि त्याचं मुळ तरी तर्कशुद्ध होतं का?"
"हे सगळं जे काही घडलंय ना ते त्या इसाप नावाच्या एका माणसामुळे घडलंय..काही हजार वर्षांपूर्वी तो जंगलात राहायला आला, प्राण्यांनी त्याचं गोड बोलणं ऐकून त्याला इथे आश्रय दिला, नंतर त्याने इथल्या गोष्टी इतर मनुष्यांना जाऊन सांगितल्या. तरी नशीब त्या वेळी ते 'हे' नव्हतं..काय म्हणतात ते..ग्लोबल-"
"वॉर्मिंग??" कोल्ह्याने भाबडेपणाने विचारलं.
"वॉर्मिंग नाहीरे...ग्लोबल-लाय..झे...शन..हं..ग्लोबलायझेशन झालं नव्हतं ना तेव्हा....!त्यामुळे इसापच्या या बातम्या जगभर पोहोचायला काही शतकं लागली...आधी जगभरातल्या माणसांपर्यंत इथल्या गोष्टी पोहोचल्या आणि मग हळूहळू जगातल्या इतर प्राण्यांपर्यंत..बरं झालं असं की- इसापने एकाला 'एक' गोष्ट सांगितली..एकाने दुसऱ्याला सांगताना स्वतःच्या अकलेने त्यात भर घातली..असं करत इसापच्या मुळ गोष्टी भलत्याच तात्पर्यांसकट लोकांनी ऐकल्या.."   
"आता याला माणसांची लबाडी म्हणायचं की चतुरपणा?" 
"तुला आपल्या अजून एका पूर्वजाची गोष्ट सांगतो..ती ऐकून तुझं तूच ठरव की माणूस चतुर आहे की लबाड??की मूर्ख?"
"ओके" कोल्हा मान डोलवत म्हणाला. त्याचे बाबा गोष्ट सांगायला लागले.
"एक कोल्हा एकदा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात पोहोचला.."
"द्राक्षं?म्हणजे माणूस दारू का वाईन बनवायला वापरतो तीच फळं ना?"
"हो हो..तीच! तर तो बिचारा खूप थकला होता. त्याला तहान-भूक लागली होती आणि माणसांच्या प्रदेशात असल्याने 'मुक्तपणे' खायला-प्यायला काही मिळायची सोय नव्हती. त्या द्राक्षाच्या मळ्यात उंचावर द्राक्षं लागली होती. आता आपल्याकडे ना जिराफासारखी उंच मान आणि ना माकडांसारखी उड्या मारण्याची कला. तरी त्याने बिचाऱ्याने बराच वेळ उड्या मारून पंजाला काही द्राक्षं लागतात का ते पाहिलं. बराच वेळ प्रयत्न करून अपयश आल्याने तो तिथून निघून गेला. जाताना तो स्वतःशीच पुटपुटला- 'तशीही ती द्राक्षं आंबटच होती'. मग मळ्यातल्या कुठल्याशा कावळ्याकडून ही गोष्ट इसापला कळली. हुशार इसापने जाऊन जगाला सांगितली. जगातल्या थोर विचारवंतांनी निष्कर्ष काढला की कोल्ह्याला द्राक्षं खायला जमली नाहीत म्हणून तो त्यांना 'आंबट' म्हणून मोकळा झाला"
"ही गोष्ट तर त्या शिकार-चोरीच्या वर झाली" छोटा कोल्हा संतापला होता "मुळात आपण कोल्हे द्राक्षं खायला का जाऊ हा विचार कुणी केला नाही का?"
"अरे बाळा, त्या काळी म्हणे आपण सगळं खायचो..आपल्याला द्राक्षं तर विशेष आवडत असत म्हणे..महत्वाचा मुद्दा हा आहे की ही गोष्ट घडली की नाही याचा पुरावा नाहीयेच काही"
"म्हणजे??असं काही घडलंच नव्हतं?"
"त्याबद्दल पण खूप रुमर्स आहेत..कुणी म्हणतं ती कोल्ह्याने द्राक्षं खाल्ली आणि ती खरंच आंबट होती पण लोकांना काहीतरी मूल्यशिक्षण मिळावं म्हणून त्यांना खोटी गोष्ट सांगितली गेली.कुणी म्हणतं की तो कोल्हा खूप उपाशी होता, त्याला द्राक्षं मिळाली नाहीत म्हणून त्याने स्वतःची समजूत काढण्यासाठी 'द्राक्षं आंबट होती' असा शेरा मारला. आता जर का असं झालं असेल तर त्या बिचाऱ्या उपाशी कोल्हयाचं काय चुकलं? मग जगात नवीन विचारांचं वारं आलं, द्राक्षं न मिळालेल्या कोल्ह्याची गोष्ट 'बौद्धिक विरोधाभास सिद्धांता'चं सर्वोत्तम उदाहरण ठरलं. त्याला द्राक्षं हवी तर होती पण ती न मिळू शकल्याने अपराधी भावनेने किंवा चिडून आपली कमजोरी झाकायला त्याने मार्ग शोधला अशी आपल्या कोल्ह्यांच्या मनोवृत्तीची विश्लेषणं माणसाने केली"
"पण बाबा, नक्की यातली कुठली गोष्ट किंवा थिअरी खरी मानायची??"
"ते ज्याचं त्याने ठरवायचं...तू जगातल्या समजुतींची पाळं-मुळं तर्कशुद्ध आहेत का विचारलंस ना? म्हणून तुला हे सगळं सांगितलं. पण इतका विचार कर की सिंहाच्या गुहेच्या समोरचे पावलाचे ठसे पाहून स्वतःचा जीव वाचवणारा चतुर कोल्हा, लांडगा आणि अस्वलाच्या भांडणाचा फायदा घेणारा धूर्त कोल्हा असं म्हणता म्हणता तोच कोल्हा हा प्राणी द्राक्षांसाठी इतका हतबल होईल का?मला माणूस या प्राण्याची खूप गम्मत वाटते..आकाश निळ्या रंगाचं का ते त्याने शोधलं, झाडं हिरवी का ते त्याने शोधलं, पण आपल्या मुलांना इतर प्राणिमात्रांच्या गोष्टी सांगताना हवी तशी लिबर्टी घेतली. असो! आपल्या लहान पिलांना इतर प्राणी संस्कार वर्गांमध्ये वगैरे येऊन देत नाहीत. आज तूच विषय काढलास आणि आपल्या गप्पांमध्ये मी तुझ्यावर करायचे बऱ्यापैकी संस्कार आज पूर्ण झाले असं मला वाटतं...ओढ्यावर जाऊन यायचं का?अंधारसुद्धा पडलाय आणि मला खूप बोलून तहान लागलीय.."
विचारात गढलेला छोटा कोल्हा शून्यात पाहत वडिलांच्या मागे ओढ्याच्या दिशेने चालायला लागला. त्याचा प्रश्न अजून तसाच होता-
'लबाडी-धूर्तपणा आणि हुशारी-चतुरपणा यांच्यातला फरक नेमका कसा ठरवायचा बरं?' 
                                                                          ***
           

Sunday, January 8, 2012

ससा आणि कासव


--इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून मोठेपणी व्यवहारात त्यांचा नेमका फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात भेटलेल्या माणसांमुळे, आलेल्या अनुभवांमुळे पंचतंत्र सांगतं त्याच्या उलट जगात घडतं या मताचा मी झालोय. म्हणून नवीन वर्षी एक नवीन प्रयोग सुरु करतोय! वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नव्या स्वरूपात!! आवडतायत का नक्की सांगा आणि आपल्या भल्याबुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवण्याची जबाबदारी मी वाचकांवर सोपवतो आहे!--

ससा आणि कासव (ईशान्यनिती १)


सूर्य डोक्यावर आला होता. दूरवर पक्षांचा गुंजारव कानावर पडत होता. नदीकिनारी असणारी हिरवीगार झाडं संथ वाऱ्यावर लयीत हलत होती. पाण्यावर हलकेच उठणारे तरंग, मधूनच उड्या मारणारे मासे यामुळे नदी जिवंत असल्याचा भास होत होता. ससा ऐटीत उड्या मारत नदीवर पोहोचला. नुकतंच कुठूनतरी उकरून काढलेल्या गाजराने त्याचा पोटोबा भरला होता. तहान भागवावी आणि कुठेतरी सावली शोधून निवांत पडावं असा त्याचा प्लान होता. पाणी पिऊन मागे वळताना त्याला कुणीतरी शुक-शुक केलं. त्याने दचकून आजूबाजूला पाहिलं. कुणीच न दिसल्यामुळे तो थोडा घाबरला. पुन्हा कुणीतरी शुक-शुक केलं. यावेळी त्याने कान टवकारून आवाजाच्या दिशेने पाहिलं. त्याची नजर समोरच्या एका मोठ्या दगडावर पडली. नीट पाहिल्यावर त्याला लक्षात आलं की तो दगड नसून एक मोठ्ठ कासव आहे! सशाने आसपास बघत स्वतःच्या छातीवर हात ठेवत विचारलं-
"मी?"
"हो तूच.."
"माफ करा..मी आपल्याला ओळखलं नाही.."
"हो..मला कल्पना आहे त्याची..जवळपास ३-४ हजार वर्षांपूर्वी आपल्या दोन पूर्वजांमध्ये भांडण झालं होतं, तेव्हापासून पुढच्या शेकडो पिढ्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं"
"काय सांगताय?मी तर कधीच कुणाकडून कुठल्याच 'खानदानी दुष्मनी' बद्दल ऐकलं नाहीये"
"असं म्हणतोस..??आश्चर्य आहे!"
"कशावरून झालं होतं आपल्या पूर्वजांचं भांडण?क्युरिओसिटी वाटली म्हणून विचारतोय बरं का.." सशाने कासवाकडे संशयी नजरेने पाहत विचारलं. कासवाने इसापनीतीतली सगळ्यांनी पिढ्यान-पिढ्या ऐकलेली गोष्ट त्याला सांगितली. 
"आमचं वयोमान तुमच्यापेक्षा जरा जास्त असतं ना..ती शर्यत जिंकलेलं कासव म्हणजे माझ्या खापर खापर पणजोबांचे चुलत चुलत खापर खापर पणजोबा.." कासवाने कौतुकाने सांगितलं. सशाने गोष्ट ऐकली आणि तो पोट धरधरून हसायला लागला. कासव काहीच न कळल्यासारखं त्याच्याकडे टकामका बघत राहिलं. दोनेक मिनिटांनी ससा हसू आवरत म्हणाला-
"इतकी विनोदी गोष्ट मी माझ्या आयुष्यात ऐकली नाही"
"विनोदी काय होतं त्यात? तुमचा पूर्वज हरला हे मान्य कर"
"ओके..ओके..करतो..हरला असेल बुवा.." ससा खिदळत म्हणाला "आणि तुम्ही म्हणताय की तुमचे कोण ते पणजोबा जिंकल्याचं जगाला माहितीय?"
"अलबत..त्या काळी इसाप नावाचा एक माणूस होता..त्याला जंगलातल्या सगळ्या बातम्या माहित असायच्या..त्याने जगाला त्या गोष्टी सांगितल्या, नितीमत्तेचे धडे दिले आणि तो फेमस झाला"
"खरंच?" प्रश्न विचारताना ससा अंतर्मुख झाला.
"आम्हा कासवांना खोटं बोलता येत नाही" कासव फणकाऱ्याने म्हणालं. 
"अस्सं..माझी एक विनंती आहे!" ससा अपेक्षेने कासवाकडे पाहत म्हणाला.
"बोल.."
"आपण परत शर्यत करायची??" 
कासवाने आत्तापर्यंत कायम 'त्या' शर्यतीबद्दल ऐकलं होतं. 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे त्याच्या मनावर कायम ठसवलं गेलं होतं. आज हजारो वर्षानंतर ससा पुन्हा हरणार याची त्याला खात्री होती. त्याने क्षणाचाही विचार न करता 'हो' म्हटलं. 
"आर यु शुअर?" सशाने पुन्हा विचारलं. कासवाने मान डोलावली. नदीकिनारी शर्यत सुरु करून दूर जंगलात माळरानावर एका पिंपळाच्या झाडाखाली संपवायची असं ठरलं. एक-दोन-साडेमाडेतीन म्हणत शर्यत सुरु झाली. कासव चालायला का पळायला लागलंय याची खात्री झाल्यावर ससा उड्या मारत निघाला. अर्ध्या तासात तो पिंपळाच्या झाडापाशी पळत पोहोचला.
मावळतीच्या सुमारास हलत-डुलत कासव माळरानावर पोहोचलं. लांब पिंपळाच्या झाडापाशी बसलेल्या पांढऱ्या शुभ्र सशाला बघून त्याला धक्का बसला. ते थोडसं वेग वाढवत त्याच्या जवळ जाऊन पोहोचलं. दुपारी भेटलेला हाच तो ससा असल्याची त्याने खात्री केली आणि हताशपणे म्हणालं-
"तरी मला आई म्हणाली होती की उगाच कुठल्या भेटलेल्या सशाशी शर्यत करायला जाऊ नकोस..हरशील.."
"ठीके रे कासवा..चालायचंच.."ससा दुपारपासून पहिल्यांदाच कासवाशी एकेरीत बोलत होता.
"म्हणजे तुला पूर्वी झालेली शर्यत माहिती होती आणि म्हणून यावेळी तू विश्रांती घेऊन झोपला नाहीस..बरोबर??" 
"तेव्हा काय झालं होतं तुला सांगू का?" सशाने विचारलं. कासवाने तोंड पाडत मान डोलावली.
"मुळात तुझ्या त्या आजोबा का पणजोबांशी तरी शर्यत लावल्याचा माझ्या पूर्वजाला पश्चाताप झाला. म्हणून त्याने शर्यत पूर्ण न करता अर्धवट सोडून दिली. आमच्या नंतरच्या प्रत्येक पिढीला हेच शिकवलं गेलं की शर्यत ही दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये होऊ शकते..आज तुझ्याशी बोलताना त्या शर्यतीचे लोकांनी काय निष्कर्ष काढले ते मला कळलं म्हणून मी मुद्दाम तुझ्याशी शर्यत लावली"
"खोटं सांगतोयस तू.." कासव चिडून म्हणालं.
"खोटं कशाला सांगू? मला सांग..त्या शर्यतीतून लोकांनी काय अर्थ काढला? 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' बरोबर?"
"हो.."
"तुला 'हेड स्टार्ट' नावाची गोष्ट माहितीय??एखाद्या शर्यतीत, स्पर्धेत जर का कुणाला सुरुवातीलाच मोठी आघाडी मिळाली की लोक त्याला हेड स्टार्ट म्हणतात..जी माणसं 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे आपल्या शर्यतीच तात्पर्य शिकून मोठी झाली त्यांना नंतर त्यातला फोलपणा कळला. त्या गोष्टीने किती नुकसान होतंय त्यांचं ठाउके तुला? शिक्षण, करीअर अशा महत्वाच्या ठिकाणी सुरवातीला महत्वाचा असणारा हेड स्टार्ट कुणी घेतच नाही..तुझे ते पणजोबा आदर्श सगळ्यांचा!!" कासव मुकाट्याने ऐकत होतं.
"आणि मित्रा, अलीकडच्या काळात तर ही स्पर्धा ससा-कासव अशीसुद्धा पाहिलेली नाही. चेतन भगत नावाच्या इसापासारख्या नितीमुल्याचे धडे देणाऱ्या माणसाने 'उंदरांची स्पर्धा' अशी नवीन गोष्ट रूढ केलीय..त्यामुळे तुमची सद्दी संपली बुवा..हजारो वर्षं चालत आलेल्या गोष्टी कधी ना कधी बदलतातच नाही का? त्यामुळे माझ्या मते आपलीही गोष्ट बदलायची वेळ आली आहे.."
"खरंय तुझं..तू ही शर्यत जिंकून 'फास्ट एण्ड स्टेडी विन्स द रेस' असा नवीन धडा शिकवलास..." कासवाने मनापासून पराभव मान्य करत म्हटलं.
"तुला आधी म्हटलं तसं..आपण तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही मित्रा..मी शर्यत पूर्णच केली नाहीये..."
"काय?" कासवाने आश्चर्याने तो कुठे उभा आहे ते पाहिलं. ससा पिंपळाच्या झाडापासून दोन हात अंतरावर उभा होता.
"मग आता?" कासवाने पुन्हा विचारलं.
"गेल्या वेळी आपल्या शर्यतीचे निष्कर्ष लोकांनी काढले. तुझे पूर्वज अमर झाले. यावेळी काय होईल तेसुद्धा तू आणि लोकांनी ठरवायचं"  असं म्हणत ससा मावळतीच्या दिशेला उड्या मारत निघून गेला. कासव त्याच्याकडे आणि पिंपळाच्या झाडाकडे आळीपाळीने पाहत राहिलं.
**