इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून त्यांचा मोठेपणी व्यवहारात काही फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात आलेले अनुभव, भेटलेली माणसं लक्षात घेता पंचतंत्र, इसापनीतीमधले धडे न घेता त्यात लिहिल्याच्या उलट किंवा अजूनच काहीतरी भलतं जगात घडतं या मताचा मी झालोय.. म्हणून या वर्षी एक नवीन प्रयोग सुरु केला. वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नवीन स्वरूपात! आवडतायत का ते नक्की सांगा आणि आपल्या भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवायची जबाबदारी मी वाचणाऱ्या लोकांवर सोपवतो आहे! या प्रयोगातली ही तिसरी गोष्ट.
याआधी: ईशान्यनीती १, ईशान्यनीती २
**
दोन बायका असणारा नवरा (ईशान्यनिती ३)
एक आटपाट मेट्रो होतं. तिथल्या एका मोठ्या कंपनीच्या अलिशान ऑफिसमध्ये 'तो' काम करायचा. गेले काही दिवस तो बराच तणावात असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांना जाणवत होतं. चांगला तरुण मुलगा! जॉईन झाल्यावर पहिल्याच वर्षात तगडं प्रमोशन. मेहनती होता. आजूबाजूच्यांना मदतसुद्धा करायचा. त्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये फारशी न दिसणारी आपुलकी बरोबरच्यांना त्याच्याबद्दल होती. एक दिवस न राहवून त्याच्या बाजूच्या क्युबिकलमध्ये बसणाऱ्या चाळीशीच्या सहकाऱ्याने त्याला विचारलं-
याआधी: ईशान्यनीती १, ईशान्यनीती २
**
दोन बायका असणारा नवरा (ईशान्यनिती ३)
एक आटपाट मेट्रो होतं. तिथल्या एका मोठ्या कंपनीच्या अलिशान ऑफिसमध्ये 'तो' काम करायचा. गेले काही दिवस तो बराच तणावात असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांना जाणवत होतं. चांगला तरुण मुलगा! जॉईन झाल्यावर पहिल्याच वर्षात तगडं प्रमोशन. मेहनती होता. आजूबाजूच्यांना मदतसुद्धा करायचा. त्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये फारशी न दिसणारी आपुलकी बरोबरच्यांना त्याच्याबद्दल होती. एक दिवस न राहवून त्याच्या बाजूच्या क्युबिकलमध्ये बसणाऱ्या चाळीशीच्या सहकाऱ्याने त्याला विचारलं-
"तू एवढा तरुण, उत्साही..अलीकडे इतका उदास का असतोस?"
त्याने आधी खुलून बोलायला आढेवेढे घेतले पण आग्रह केल्यावर, इतर कुणाला न सांगायचं प्रोमीस केल्यावर बोलायला सुरुवात केली.
"माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागलेत.."
"अरे मग बरोबरच आहे की..आता इथे चांगला रुळला आहेस तू...आता सेटल होणार नाहीस तर कधी होणार?"
"माझी लग्न करायला हरकत नाहीये..पण मला ठरवून लग्न नाही करायचं..."
"अच्छा..आत्ता समजलं मला..तुला प्रेम-विवाह करायचा आहे..मग..कुणी भेटली नाही कधी? की भेटलीय तिला तू सांगितलं नाहीस अजून?"
"अ घोळ असा आहे की..अ..माझ्या आयुष्यात खरंतर दोन मुली आहेत.."
सहकाऱ्याने आ वासला आणि पाय जमिनीवरून वर उचलले. त्याची चाकं असणारी खुर्ची घरंगळत मागे गेली.
"काय सांगतोस काय लेका?शिंच्या यात उदास होण्यासारखं काय आहे?"
मग त्याने सगळं सविस्तर सांगितलं. दोन्ही मुली त्याच्या गेली कित्येक वर्षं चांगल्या मैत्रिणी होत्या. ब्रेन आणि ब्युटी कधीच एकत्र नसतात असं म्हणतात म्हणे. त्या दोघींच्या बाबतीत ते तंतोतंत खरं होतं. एक दिसायला फारशी बरी नव्हती पण खूप हुशार होती. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची तिला नोकरी होती. दुसरी दिसायला खूप सुंदर पण बुद्धीला बेताची. तिच्या रुपामुळे तिला एकवेळ नोकरी मिळाली असती पण आपल्या बायकोला तिच्या सुंदर दिसण्याने नोकरी मिळालीय हे कोण पुरुष सहन करेल? तिलासुद्धा नोकरी करण्यात वगैरे फारसा रस नव्हताच पण घरी राहून संसार बरा असता केला तिने. दोघीही त्याच्याशी लग्न करायला तयार होत्या. त्याने शांत डोक्याने निर्णय घेतलाही असता पण अलीकडे झालेल्या एका घटनेने तो बराच उदास झाला होता. झालं असं की पंचविशी उलटल्यावर अनुवंशिक कारणांनी त्याचे केस गळायला लागले. अलीकडे केस जाणाऱ्या माणसांसाठी खूप नवीन पद्धती आणि औषधं निघाली आहेत. त्याने त्या उपायांची चौकशी केल्याचं त्या दोघींना सांगितलं. पहिलीने त्याला अशी कोणतीही शस्त्रक्रिया करून घेण्यास किंवा औषधं घेण्यास विरोध केला. त्याने जे नैसर्गिक आहे ते मान्य करावं असं तिचं मत होतं. तर दुसरीने त्याला पूर्ण टक्कल पडण्याआधी तत्काळ उपाय करून घ्यायला सांगितलं. देवाने दिलेला सुंदर चेहरा केस गेल्याने काहीसा विद्रूप होऊ नये असं तिचं म्हणणं होतं. आपला जोडीदार आपल्या रुपाला साजेसा असावा अशी दोघींच्या मनात असणारी इच्छा त्याने ओळखली होती आणि त्यानेच तो उदास झाला होता.
सहकाऱ्याने त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि खो-खो हसायला लागला.
"अहो, मी खरंच गंभीरपणे या गोष्टीचा विचार करतोय आणि तुम्ही हसताय?"
"अरे हसू नाही तर काय..आजच सकाळी माझ्या ८ वर्षाच्या मुलाला माझी आई एक इसापनीतीतली गोष्ट सांगत होती. दोन बायका असणाऱ्या नवऱ्याची. एक बायको म्हातारी, दुसरी तरुण. माणसाचे केस पांढरे व्हायला लागले तर आपल्या रुपाला तो शोभावा म्हणून तरुण बायको त्याचे पांढरे केस उपटायला लागली आणि म्हातारी काळे! बिचारा टकला झाला शेवटी!!" सहकारी अजून खोखो हसतच होता.
"काहीतरीच काय? अशी गोष्ट इसापनीतीत आहे?"
"अलबत.."
"इसाप काय नितीमुल्य शिकवतो या गोष्टीतून?"
"तो कसला डोंबलाची मूल्य शिकवतोय? त्याचं एक पण लग्न झालं नव्हतं...उगाच नितीमुल्य शिकवायला दोन बायका असणारा पुरुष म्हणे..त्याला या गोष्टीतून म्हणे हे सांगायचं होतं की सगळ्यांना सुखी ठेवण्याच्या प्रयत्नात कुणालाच सुखी ठेवता येत नाही"
"खरं आहे की मग ते.."
"कसलं खरं..? हे बघ, प्रश्न टक्कल पडण्याचा असेल तर तुला एकही लग्न न करता पडलंय आणि मला समवयस्क बायको असूनही टक्कल पडलंय..मुळात सध्या 'एका माणसाच्या दोन बायका' काही अपवाद* सोडल्यास पाहायला मिळत नाहीत कारण तसे सेन्सिबल नियम केलेले आहेत. पण लहान मुलांना गोष्ट म्हणून सांगायलासुद्धा मला ही संकल्पना युसलेस वाटते..तुला माहितीय गोष्ट ऐकल्यावर माझा मुलगा काय म्हणे? 'मी तर तरुण असतानाच दोन लग्न करेन..माझ्या दोन्ही बायका माझ्याच वयाच्या असतील..दोघीपण खुश राहतील"..सांग, आता काय बोलायचं याच्यावर? आपल्याला तर गोष्टच नाही पटली बुवा..एकीकडे आपण मुलांना रात्री झोपताना प्रार्थना करायला लावायची की देवाला सांगा सगळ्यांना सुखात, आनंदात ठेव..आणि दुसरीकडे तुम्ही सगळ्यांना सुखात ठेवू शकत नाही हे शिकवायचं?..बरं त्यातही पुढे जाऊन बायकोला सुखी ठेवायचा विषय-" सहकारी गप्प झाला.
"त्याचं काय?" त्याने सहकाऱ्याला तंद्रीतून बाहेर काढलं.
"अरे..काही आधुनिक तत्वज्ञ तर या गोष्टीचे वेगळेच निष्कर्ष काढतात..त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बायका पुरुषांकडून कायम काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करतात..दुसऱ्या एका व्हर्जनमध्ये तो माणूस कंटाळून दोघींना सोडून निघून जातो कारण त्या त्याच्या कलाने घेण्याऐवजी त्याला स्वतःच्या मनासारखं वागायला लावतात!"
"मग यातला बरोबर निष्कर्ष कुठला?"
"म्हटलं तर सगळेच नाहीतर कुठलाच नाही!"
"आता तुम्ही मला कन्फ्युस करताय..."
"ठीके..तू आत्ता योगायोगाने मेटाफोरिकली त्या माणसाच्या जागेवर आहेस! तू जो निर्णय घेशील तो कशाच्या आधारावर घेशील...?"
"कदाचित माझ्या स्वतःच्या आनंदाचा विचार करून..."
"करेक्ट...देअर यु आर...सगळ्यांना सुखी ठेवण्याआधी स्वतःचं सुख महत्वाचं...आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवति| हा श्लोक इसापनीतीत नाही पण कदाचित त्याहून जुना आहे. दुसरं..माझ्या एका तपाच्या लग्नाच्या अनुभवावरून सांगतो की बायका कॉम्प्लेक्स असतात पण दरवेळी त्या पुरुषांकडून काहीतरी काढूनच घेण्याचा प्रयत्न करतात हे मला एखाद्या मूर्ख पुरुषाने किंवा बाई असण्याची लाज वाटणाऱ्या बाईने केलेलं विधान वाटतं...आणि शेवटी लग्न, सहचर्य म्हणजे काय रे..एकमेकांना आनंदात ठेवणं, एकमेकांच्या गरजा भागवणं..बरोबर..?आणि तिसरं...तुझं दोघींशी पटत नाही, तू दोघींनाही आनंदी ठेवू शकत नाहीस म्हणून तू पळून जातोस..हा पलायनवाद झाला...ज्या दोन मुलींचा गेली काही वर्षं तू पोटेंशियल आयुष्याचा जोडीदार म्हणून विचार करतो आहेस त्या दोघींनाही तू सोडून देशील..??"
"कळले मला तुमचे मुद्दे..पण तुमचा नेमका राग गोष्टीवर आहे की त्याच्या वेगवेगळ्या निष्कर्षांवर?"
"कदाचित दोन्हीवर..इसापनीती म्हणजे मानवी आयुष्याच्या जवळ जाणाऱ्या नीतिकथा असं आपण नेहमी कौतुक ऐकतो..पण मला कायम त्या एककल्ली वाटतात! मानवी आयुष्यात इतकी टोकाची माणसं नसतात..माझं इतकंच मत आहे की काळाच्या ओघात गोष्टी बदलायला हव्यात, त्यातून मिळणारी नितीमुल्य बदलायला हवीत..आता याच गोष्टीचं म्हणालास तर 'बहुभार्या पद्धत चुकीची होती' हे कन्क्लूजन योग्य..बाकी ते सगळ्यांना सुखी ठेवता येत नाही हे शिकवायला इसापनीतीची गरजच नाहीये खरंतर..काय?!"
"हं..." त्याने मान डोलावली.
"मग जर का मी सांगितला तो निष्कर्ष पटला असेल तर टक्कल पाडून घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय लौकरात लौकर घे...काय?" सहकारी स्वतःच्या टकलावरून हात फिरवत हसत म्हणाला.
"हो..नक्की!" त्याने हसत उत्तर दिलं आणि दोघे कामाला लागले.
*हा ब्लॉग लिहिताना गुगलिंग करताना ही बातमी सापडली आणि आत्ता लिहिला तो निष्कर्ष लिहिला. बातमी वाचून हसायला आलं थोडं पण माझ्या निष्कर्षाला वास्तवाची जोड मिळाली. हा हा हा!
No comments:
Post a Comment