Pages

Wednesday, August 8, 2012

जस्ट लाईक दॅट ६


आत्तापर्यंत:

"काका, तुम्ही काळजी करू नका..तशी इथे आम्हाला खूप कंपनी आहे! आमचं थोडसं टायमिंग चुकलं यायचं आणि आम्हाला एकत्र राहावं लागलं!"
"ठीके रे! तुम्ही दोघे तिथे आणि आम्ही इथे! तिथले प्रॉब्लेम्स, अडचणी तुम्हाला बेटर माहिती..सो तुम्ही असा निर्णय घेतलात! आणि तुम्ही दोघे लहान नाही, त्यामुळे जे निर्णय घेताय ते शांत डोक्याने घ्या, भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका एवढंच.."
"हो सर आय मीन काका...नक्की.."
आदित्यने फोन ठेवला आणि सुस्कारा सोडला. रमा त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती.
"ओह सॉरी..तुला बोलायचं होतं का?" त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. तिने मानेनेच नकार दिला.
"मग डोळे मोठे करून का बघते आहेस?" त्याने फोनची स्क्रीन पुसत विचारलं. ती सावध झाली.
"नाही..तू एवढा मोठा सुस्कारा सोडलास म्हणून..." ती म्हणाली.
"त्याचं काये..मी अमेरिकेला पहिल्यांदाच येऊन दोनेक आठवडे झालेत...आल्यानंतरच्या चार दिवसात मी एका मुलीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला..जवळपास १० दिवस एकत्र राहिल्यावर आत्ता मी 'ओळख ना पाळख माझं नाव टिळक' च्या अविर्भावात सुरुवात करून तिच्या वडलांशी गेली १० मिनिटं बोलत होतो. मी अजून काय करणं अपेक्षित आहे फोन झाल्यावर?" तो फोन तिच्या हातात देत म्हणाला.
"काय म्हणाले बाबा?"
"तू मला त्यांनी तुला जे काही सांगितलं म्हणून म्हणालीस ते सगळं"
"मला वाटलंच होतं. बाबा तसे फॉरवर्ड आहेत..पण चार-दोन उपदेशाचे शब्द ऐकवायला त्यांना भयंकर आवडतं"
"गुड..आणि आईला काय सांगितलं आहेस?"
"मी एका अदिती नावाच्या मुलीबरोबर राहते"
"शी..शी..अदिती?धत तेरी..जरा छान नाव तरी सांगायचं"
"आदित्य ते अदिती..आय लाईक टू कीप इट सिम्पल.. आणि हो..रमाकांतपेक्षा बेटर आहे..."
"माझा रूममेट साउथचा आहे..त्यामुळे ते नाव सूट होतं..त्याला हिंदीसुद्धा नीट येत नाही असं मी घरी बोललोय..मला काहीच ऑप्शन नव्हता म्हणून मी त्याच्याबरोबर राहतो आहे असं सांगितल्यामुळे मातोश्री तो कसा दिसतो हे सुद्धा विचारायच्या फंदात पडल्या नाहीत.." आदित्य चहाचं आधण ठेवत हसत म्हणाला.
"वा..वा..छान"
"तुझ्या बाबांनी तुझं लग्न ठरवलं आहे काय गं?" आदित्यने विचारलं. रमाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. 
"अ..का रे? एकदम अ..असं का विचारलंस?" 
"तुझ्या बाबांचे प्रश्न एकदम स्पेसिफिक होते...मी एखाद्या प्रश्नाला काहीतरी थातुरमातुर उत्तर दिलं तरी त्यांचं लक्ष विचलित न होता ते मला ठरवल्यासारखे प्रश्न विचारत होते..माझ्या एका भावाच्या सासऱ्याला पहिल्यांदा भेटायला तो गेला तेव्हा मी बरोबर होतो, माझा दादा काहीही भंपक उत्तरं द्यायला लागला की ते त्याचा फोकस रिसेट करायचे..मगाशी त्याची आठवण झाली.."
"ओह..ओके ओके.."
"आणि जर का त्यांनी तुझं लग्न ठरवलं असेल तर आधीच सांग नाहीतर नंतर मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलायला लावशील तू.." 
फोन वाजला आणि संभाषण थांबलं. दोन मिनिटात फोन ठेवून रमा म्हणाली- "चहा वाढव...मेघा येतेय...त्या ५००४ कोर्सच्या नोट्स घेऊन"
"मग तर तिला चहाबरोबर गोडच दिलं पाहिजे.." आदित्यने मान डोलवत उत्तर दिलं.
"हं..."
"पण प्रश्न तसाच राहिला..तुझं लग्न ठरलंय का?"
"ठरलं असलं तर काय होणारे?आणि आज अचानक हा प्रश्न? या प्रश्नाच्या उत्तराने काही फरक पडला असता तर तू मला १० दिवस आधीच विचारलं असतंस"
"तू मला नाही विचारलंस म्हणून मी तुला नाही विचारलं" आदित्य दुधाचा कॅन फ्रीजमध्ये ठेवत म्हणाला. रमाचं गेल्या आठ दिवसात फोनवर काढलेले फोटो पाहण्यातलं लक्ष त्याच्या बोलण्याकडे गेलं.
"काय?म्हणजे तुझं लग्न ठरलंय?" तिने चमकून विचारलं.
"नाही नाही...ठरता ठरता राहिलं.." 
"डीटेल्स? द्यायला हरकत नसेल तर-" रमा स्वर शक्य तितका नॉर्मल ठेवत म्हणाली.
"अगं..गम्मत करतोय..तू पण..काही खरं वाटतं तुला" तिने खांदे उडवत काहीच न वाटल्यासारखं दाखवत पुन्हा फोनमध्ये डोकं घातलं.
"पण रमा, आपण एक विकेंड निवांत बसुया..एकमेकांशी एकमेकांबद्दल बोलूया..आपण एकत्र राहतो आहोत..एकत्र राहायचा निर्णय जरी निव्वळ तडजोड म्हणून घेतला असला तरी त्याचे भले-बुरे परिणाम आपण 'भोगतोय'...लोकांनी काहीही निष्कर्ष काढले तरी म्हणायला आपण चांगले मित्र-मैत्रीण वगैरेपण नाही..म्हणून मी असा विचार केला की रूममेट्स म्हणून तरी आपल्याला एकमेकांबद्दल थोडी माहिती असायला हवी..जसं की आपले आई-वडील, शाळा, छंद, घराबद्दलच्या कल्पना-घरातल्या लोकांबद्दलच्या कल्पना..थोडक्यात एकत्र राहताना एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा, तुझ्या जीवश्च-कंठश्च मैत्रिणी आणि माझे जीवश्च-कंठश्च मित्र, तू तुझ्या घरी माझ्याबद्दल आय मीन अदितीबद्दल काय सांगितलं आहेस? मी रमाकांतबद्दल काय बोललोय?आणि हो.. आपण निव्वळ रूम-मेट्स म्हणून एकत्र राहायचं ठरवलं आहे त्यामुळे लग्न, एक्स-बॉयफ्रेंड, गल्फ्रेंड असे विषय टाळलेले बरे..असं मला वाटतं..आपले हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहेत म्हणून मी हे बोलू शकतोय..कारण एकमेकांबद्दल सहवासाने जाणून घ्यायला आपण काही इतका काळ एकत्र राहणार नाही आणि विचार करायलासुद्धा मला ते मला लग्न झालेल्या जोडप्यासारखं वाटतं..म्हणून हे गप्पा मारण्याचं प्रयोजन..चालेल??" तो चहाचा कप घेऊन तिच्या समोर येऊन बसला.
"तू एवढं डिटेलिंग केल्यावर मी नाही म्हणणारे का?" ती बोलत असतानाच बेल वाजली आणि रमा उठुन गेली. 

आदित्यला त्याच्या येण्याआधी काही दिवसांमध्ये अमृताशी झालेल्या भेटीगाठी आठवत होत्या. 'आपलं लग्न खरंच ठरता ठरता राहिलं' त्याने मनात विचार केला.
"हे बघ आदि, आधीच आपण एकत्र असणं यात प्रॉब्लेम्स कमी नाहीयेत..माझ्या घरी, तुझ्या घरी हे कधीच मान्य होणार नाहीये..त्यात तू उठुन अमेरिकेला चालला आहेस! मग हे लाँग डिस्टंस रिलेशन आपण कशाला वाढवायचं आहे?"
"अमु, आपलं काहीतरी नातं आहे हे तू कबूल केलंस याचा आनंद व्यक्त करू की तू ते संपवते आहेस म्हणून दुःख व्यक्त करू तेच कळत नाहीये मला!' तो हताश होऊन म्हणाला.
"तू पण कमाल करतोस..मला मान्य आहे की आपल्यातलं नातं मी कधीच बोलून दाखवलं नाही..पण म्हणून ते मी कधी अमान्य केलंच नव्हतं. माझा घोळ हा होता की तू ते कधी सिरीअसली घेतलं नाहीस..आदि, तू आयुष्याला कधी सिरीअसली घेणारेस? तुला कुणीतरी अमेरिकेला जा सुचवलं आणि तू निघालास..उद्या तिथे कुणीतरी सांगेल, आता परत ये..तू परत येशील..तुला स्वतःचं काही आहे की नाही?"
"तुझी तक्रार कशाबद्दल आहे? माझ्या अमेरिकेला जाण्याबद्दल? की मी आयुष्य सिरीअसली घेत नाही त्याबद्दल?"
"सगळ्याबद्दलच...आदि, उद्या आपण बरोबर असू-नसू..मला नाही माहित..पण एक गोष्ट लक्षात घे..मुलींना असा मुलगा पार्टनर म्हणून हवा असतो जो निर्णय घेऊ शकतो, जबाबदारी घेऊ शकतो..कुणी एकमेकांवर कितीही प्रेम-बिम केलं ना..तरी आत्ताच्या मुली इतक्या भावनेच्या आहारी जाणाऱ्या वगैरे मुळीच नसतात..भावनेला व्यवहाराची जोड असतेच..आणि ती हवीच! मला एक सांग..आज जर का तुझं अमेरिकेला जाणं हा विषय सोडून बाकी सगळं सुरळीत असतं तर तू मला तुझ्या घरी घेऊन गेला असतास का..?"
"हो..ते तर मी आत्ताही नेऊ शकतो!"
"वेड्यासारखं बोलू नकोस..तुला कळत नाही म्हणतेय मी ते हेच...आपल्या घरातली कल्चर्स वेगळी, परंपरा वेगळ्या, चाली-रिती वेगळ्या...माझं आडनाव ऐकून तुझ्या घरी माझ्याबद्दलच एक मत बनून जाईल.."
"तू माझ्या घरच्यांना न भेटता हे कसं ठरवलंस अमु?"
"तुझ्याकडे पाहून.."
"ग्रेट..म्हणजे यालासुद्धा मीच जबाबदार??"
"आदि, कधीतरी कबूल कर आणि जबाबदारी घे" 
"बरं..घेतो जबाबदारी..आता बोल..येतेस घरी?"
"पुन्हा तेच..आदि..तुला कळत नाहीये का?लाँग डिस्टंस रिलेशनशिप्स नेवर वर्क..मी ताईच्या वेळी हे जवळून पाहिलं आहे. आणि मी तो त्रास नाही सहन करू शकत!"
"तुझी तक्रार आहे ना अमृता..मी नेहमी दुसऱ्याचं ऐकून माझ्या आयुष्यातले निर्णय घेतो..खरं आहे ते..पण मग ताईच्या अनुभवावरून तू स्वतःला एखादी गोष्ट जमेल की नाही हे ठरवते आहेस तेव्हा तू वेगळं काय करतेयस?"
"...."
"हे बघ अमु, मी तुझ्यावर काहीही लादत नाहीये...ते माझ्या स्वभावातच नाही. हं, मात्र महत्वाचं..तुझा निर्णय ऐकून मी माझा निर्णय बदलतसुद्धा नाहीये...मी इतकंच म्हणतोय...लेट अस वेट..आपण थांबूया हवं तर थोडे दिवस..पुन्हा विचार करू..फ्रेश..चालेल..??"
तिने मान डोलावली आणि दोघे एकमेकांना बाय म्हणून निघून आले. त्यानंतर आठ दिवसांनी आदित्य अमेरिकेला आला. दोनेक आठवड्यात तो रमाबरोबर एका घरात राहायला लागला होता. ही गोष्ट त्याने अमृताला कळवली नव्हती. तिचाही इ-मेल किंवा कुठलाही मेसेज आला नव्हता.  गेल्या पंधरवड्यात येण्याच्या गडबडीत आणि इथे सेटल व्हायच्या धडपडीत त्याला विचार करायलासुद्धा वेळ नव्हता. रमाला पहिल्यांदा तो भेटला, तिच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अमृताचा चेहरा क्षणिक येऊन गेला तेवढंच! गेली पाच वर्ष असणारी मैत्री किंवा मैत्रीपेक्षा थोडसं जास्त गहिरं असणारं नातं कुणी इतक्या चटकन कसं विसरू शकतं..'जस्ट लाईक दॅट??
पण ते अमृताला जमलं होतं. आदित्यसुद्धा तेच जमवण्याचा मनोमन प्रयत्न करत होता.

"परचुरे..कुठे हरवलात?चहा गार झाला" मेघाने त्याला हलवलं. 
"नामस्मरण करत होतो.." तो हसत म्हणाला.
"..काहीपण"
"अगं खरंच! इंडियामध्ये एक नवीन बाबा फेमस झालेत..त्यांच्या नावाचा जप केला की पी.एचडी लौकर होते म्हणे.." तो गंभीर स्वरात म्हणाला.
"काहीही..असं असतं तर आम्ही हा जप कधीच केला असता" मेघा
"तू कुठे त्याच्याकडे लक्ष देतेस.." रमाने तिला चहा देत म्हटलं.
"अगं, हं या किंवा पुढच्या विकेंडला मुव्ही नाईट प्लान करतोय..आमच्या अपार्टमेंटवर..एनी मुव्ही सजेशन्स ??"
"अबाउट अ बॉय..." आदित्यने खिडकीतून बाहेर बघत उत्तर दिलं.
मेघा आणि रमाने मान डोलावली.

क्रमशः 

2 comments: