१९२५ साली अमेरिकेतील टेनेसी राज्यात 'स्कोपेस मंकी ट्रायल' नावाचा खटला गाजला होता. स्कोपेस नावाचा शिक्षक शाळेतल्या मुलांना 'इवल्युशन' अर्थात उत्क्रांती विषय शिकवत होता म्हणून राज्य सरकारने त्याच्याविरुद्ध खटला भरला आणि त्यात तो दोषीही ठरला. 'बटलर' नावाच्या कायद्यानुसार बायबलमधल्या नोंदींच्या विरोधात जाऊन माणसाच्या अस्तित्वाबद्दल/जन्माबद्दल/उगमाबद्दल सरकार प्रमाणित शाळा किंवा विद्यापीठांमध्ये शिकवणं कायद्याने गुन्हा होता. आज अचानक या खटल्याबद्दल आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडे लागलेला देवकणाचा अर्थात 'हिग्ग्स बॉसोन' नावाच्या 'गोष्टीचा' शोध! जगाच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचं काम बहुतेक जगाच्या उत्पत्तीपासून सुरु असावं! पण गेल्या शतकात माणसाने विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती केली आणि अखेर संशोधन फळाला येऊन त्याला 'देवकण' गवसला. सोप्या शब्दात जर का या बॉसोनच्या तयार होण्याबद्दल सांगायचं तर एकमेकांच्या दिशेने येणारे दोन वेगवान शक्तीस्त्रोत जर का एकमेकांवर आदळले तर त्यातून वास्तविक अस्तित्व असणारे, वस्तुमान असणारे पदार्थ निर्माण होतील. परंतु या पदार्थांचं अस्तित्व जाणवून, त्यांचं वस्तुमान काढेपर्यंत हे पदार्थ टिकत नाहीत कारण ते खूप अस्थिर असतात. शिवाय त्यांचं वस्तुमान काढण्याइतका मोठा कण जर का मिळवायचा असेल तर टक्कर होणारे स्त्रोत तितकेच शक्तिशाली असले पाहिजेत. अलीकडे लागलेल्या शोधात स्थिर बॉसोन शोधण्यात शास्त्रज्ञाना यश आलं आहे.
हा शोध कसा केला गेला?कुणी केला?कधी केला?त्याचं महत्व काय? वगैरे वगैरे प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी हे संशोधन करणाऱ्या मंडळींनी दिली आहेत. पण माझा प्रश्न फार मुलभूत आहे. कदाचित त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर मिळणं अवघड आहे. प्रश्न वस्तुनिष्ठ असण्यापेक्षा जास्त तत्वनिष्ठ म्हणता येईल कदाचित...तर 'नमनाला घडाभर तेल' घालून झाल्यावर प्रश्न काय तेही सांगतो- हा बॉसोन शोधण्याचा अट्टाहास का? म्हणजे जगाच्या निर्मितीचं रहस्य जाणून घेण्यात माणसाला रस आहे हे जरी मला संपूर्णपणे मान्य असलं तरी हा शोध जगापुढे इतकी प्रसिद्धी देऊन मांडण्यात मिडीयाने, संशोधकांनी काय साधलं असा प्रश्न मला पडतो. संशोधक म्हणतात की आत्तापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. पण जगातल्या तमाम जनतेला हा शोध नीट कळला आहे का या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल. काही दशकांपूर्वी जेव्हा इलेक्ट्रोनचा शोध लागला तेव्हासुद्धा लोकांना त्या शोधाचं महत्व कळलं नव्हतं पण आज आपण पाहत असलेली तांत्रिक प्रगती ही त्या एका शोधामुळे झाली असं स्पष्टीकरण तज्ञ देताना दिसतायत. याच प्रकारे येत्या काळात बॉसोनच्या शोधानेसुद्धा क्रांतिकारी बदल होतील अशी अपेक्षा आपण करूया असं त्यांना म्हणायचं आहे. भौतिकशास्त्र हा विषयाबद्दल माझा आकस नाही परंतु गेल्या शतकातला सगळ्यात मोठा शोध म्हणून आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताकडे पाहिलं जातं. पण त्या सापेक्षता सिद्धांताचा आपण व्यावहारिक (Applied) जगात नेमका काय उपयोग केला? हॉलीवूडला काही अफलातून साय-फाय सिनेमे निर्माण करायला मिळालेला एक विषय सोडून विशेष काहीच नाही. या बॉसोनच्या शोधाच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येत नाही.
जगाच्या रहाटगाडग्याकडे पाहण्याचे लोकांचे ठराविक दृष्टीकोण आहेत. काही अखंड कर्मयोगाची कास धरतात, त्यांना जगाच्या निर्मितीशी काही घेणं-देणं नसतं. रोजची आठ तासाची मेहनत, दोन वेळेचं जेवण, स्पर्धा-असूया-कौतुक, आठ तासाची झोप आणि इतर वेळेत मनोरंजन, नामस्मरण वगैरे करणं हा त्यांचा आयुष्याकडे, जगाकडे पहायचा दृष्टीकोण. दुसऱ्या प्रकारचे लोक स्पिरिचुअल, रिलिजिअस टाईप मध्ये येतात. जगाला कंट्रोल करणाऱ्या कुठल्यातरी शक्तीची ते उपासना करतात आणि त्या शक्तीशी कनेक्ट होणं हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ठ असतं. जगनियत्यांच्या योजनेत आपल्याला एक भूमिका राखून ठेवली आहे आणि जगाचा कर्ता-करविता आपली काळजी घेणार आहे याची या दैववादी लोकांना खात्री असते. तिसऱ्या प्रकारचे बुद्धिवादी असतात.त्यांची कर्मवाद किंवा दैववाद अशी विशेष भूमिका नसते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी करायला आवडतात. ते करत असलेल्या प्रत्येक कृतीचं समर्थन करता येणं त्यांना शक्य असतं. जर का जगातल्या लोकांचे ढोबळपणे पडणारे हे तीन प्रकार आपण मान्य केले तर आता पुन्हा मुळ विषयावर येतो. यापैकी कुठल्याही प्रकारच्या मंडळींना बॉसोनच्या शोधाने काय विशेष फायदा होणारे?
काही वेळासाठी आपण असं गृहीत धरूया की जगाची उत्पत्ती हे रहस्य कधीच नव्हतं किंवा जगाची निर्मिती कशी झाली हे शोधण्याचा अट्टाहास बाजूला ठेवून जर का जगाकडे निव्वळ एक साधं नियंत्रित, अखंड कार्यरत यंत्र (Simple Perpetual Controlled Machine) म्हणून पाहिलं आणि त्याची उत्पत्ती कशी झाली हे शोधायचं थांबवलं तर जगात आजघडीला महत्वाच्या कितीतरी समस्या आहेत. ग्लोबल वॉर्मिंग याच वेगाने सुरु राहिलं तर जगच राहणार नाही, एड्स आणि कॅन्सरने आज जगात निर्माण केलेली भीती जर का नष्ट करायची असेल तर या आजारांवर उपाय शोधणं जास्त महत्वाच आहे, आण्विक युद्धाची टांगती तलवार डोक्यावर लटकते आहे. मला असलेल्या अल्प-स्वल्प माहितीप्रमाणे या कुठल्याच समस्येवर हा बोसॉन उत्तर देऊ शकणार नाही. आईनस्टाईनला आपण गेल्या शतकातला सर्वात मोठा भौतिक शास्त्रज्ञ मानतो. त्याने न्यूटनच्या भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समूळ बदलल्या. लोकांना काळ या चौथ्या मितीबद्दल कळलं. पण या शतकातल्या सर्वात मोठ्या शोधाकडे- बोसॉनकडे या काळ संकल्पनेबद्दल आणि त्यापुढे पर्यायाने विचारल्या जाणाऱ्या काल भ्रमण यंत्राबद्दल (टाईम मशीन) कुठलीही उत्तरं नाहीत. गेली काही शतकं माणूस चंद्रापासून ते सगळ्या आकाशगंगेत कुठली जीवसृष्टी, पाणी किंवा तत्सम काहीही आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण बिचारा बोसॉन या बाबतीतसुद्धा काही उपयोगाचा नाही. मग त्याला शोधण्याचा अट्टाहास का? त्यासाठी अब्जावधीने पैसा खर्च करणं का?कशासाठी?
मला कधी कधी खूप नवल वाटतं. आपण आपल्यासमोर असणाऱ्या खऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी विश्व्युत्पत्ती, माणसाचा उगम या गोष्टींवर उहापोह करतो. संशोधक, लोकनेते, समाजाभिमुख माणसांनी भौतिक आयुष्यात येणाऱ्या समस्या आधी सोडवाव्यात. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध अजून ५०..१००...किंवा ५०० वर्षांनी लागला तरी हरकत नाही पण तोपर्यंत जग वाचवणारं संशोधन होणं आणि निसर्गात समतोल निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं विज्ञानाचं आहे तसंच आपल्या दैनंदिन आयुष्याचं! आपण रोजघडीला जगत असणारं आयुष्य जसंच्या तसं स्वीकारणं जास्त चांगलं. आपण करत असलेलं काम इमानेइतबारे, जगनिर्मात्याच्या कुठल्याही योजनेचा विचार न करता केलं तर सोप्पं जाणार नाही का? स्वतःशी, लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या नितीमुल्यांशी प्रामाणिक राहून, आजूबाजूच्या माणसांना, प्राण्यांना मदत केली तर असा कुणी जग निर्माता खरोखर असेल तर तो नक्की भेटेल आणि त्याची सिक्रेट योजना आणि त्यातली आपली भूमिका तो आपल्याला नक्की सांगेल. (हा परिच्छेदाचा दुसरा भाग आध्यात्मिक प्रगतीच्या गप्पा मारत जगरहाट समजावणाऱ्या मंडळींसाठी)
का?कसं?कधी?कोण? असे ककारी प्रश्न पडणं हे मनुष्याची बुद्धी शाबूत असल्याचं, जिवंत असल्याचं लक्षण आहे. नव्हे, इतर प्राणी आणि माणूस यांच्यातला तोच सगळ्यात मोठा फरक आहे. या फरकामुळेच आज जगावर माणसाची एकहाती सत्ता आहे. हा अखंड फाफटपसारा मांडल्यावर त्याचं नियंत्रण करणं आणि जगात समन्वय राखणं हे अर्थात माणसाचं काम आहे. तेव्हा ते कसं नीट करता येईल याकडे लक्ष देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. बॉसोनच्या बाबतीत बोलायचं तर हे संशोधन करावं किंवा त्यावर इतका अब्जावधी पैसा खर्च करावा की नाही यावर भाष्य करण्याचा मला अर्थार्थी अधिकार नाही परंतु मला असं जरूर वाटतं की जी प्रसिद्धी आज या संशोधनाला मिळाली तशीच प्रसिद्धी व्यावहारिक जगातल्या समस्यांच्या उपायांवर चाललेल्या संशोधनाला मिळायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग पासून ते पाणी प्रश्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी होत असलेलं संशोधन लोकांना कळायला हवं, त्यांचं महत्व कळायला हवं, त्यांची भीषणता जाणवायला हवी.
विज्ञान आणि धर्म यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काही शतकं जुनं झालंय. २१व्या शतकात शिक्षण झाल्यामुळे, चार बुकं वाचल्यामुळे मी अर्थात विज्ञानाच्या बाजूचा आहे. पण त्याचा अर्थ माझा देवावर विश्वास नाही असा होत नाही. जग चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे आणि तिच्यावर माझा विश्वास आहे. येत्या काळात आपल्याला विश्व कसं निर्माण झालं हे कळलं तर कदाचित पुढच्या पिढ्यांचा देवावर किंवा तत्सम कुठल्याही शक्तीवर विश्वास राहणार नाही अशी शंका वाटते. आपण राहतो ते जग समजून घेण्याचा हा 'बॉसोन' प्रयत्न म्हणूनच जास्त हास्यास्पद वाटतो.
टीप : खरंतर मी ब्लॉग समर्पित करायच्या भानगडीत पडत नाही परंतु या विषयावर माझ्या विना-अधिकार कल्पनांवर मैत्रीच्या अधिकाराने दिलखुलास टीका करणाऱ्या गौरवला हा ब्लॉग समर्पित! :D
चैतन्य
No comments:
Post a Comment