Pages

Sunday, June 24, 2012

जस्ट लाईक दॅट ३


आत्तापर्यंत :
                                                                          **
काही पेपरवर्क पूर्ण करायला आदित्यला दुसऱ्या दिवशी लगेच युनिवर्सिटीत  जायचं होतं. जीत आणि राज दोघेही बिझी होते. रमाला घेऊन मेघा जाणार आहे हे कळल्यावर त्यांनी आदित्यची त्या दोघींबरोबर जायची व्यवस्था करून टाकली. राजने त्याला अपार्टमेंटची एक किल्ली देऊन ठेवली. ते त्याला दुपारनंतर भेटणार होते.  
"ही मेघा..हा आदित्य" राजने ओळख करून दिली आणि तो पळाला. 
"हाय..झोप झाली का?" मेघाने पहिला प्रश्न विचारला.
"हो व्यवस्थित.."
"गुड..रमा आवरून खाली उतरते आहे..राजला घाईत जायचं होतं म्हणून त्याने मला लौकर बोलावून घेतलं..आपलं हार्डली १० मिनिटांचं काम आहे..मग परत येऊ आपण"
"अ..हो..मला कितीही वेळ लागला तरी चालेल..काही कामच नाहीये.."
"हो ते बरोबरच...तिथे ऑफिसमध्ये काही तमिळ आणि तेलगु पब्लिक पण येणारे..या सेमलाच आलेले लोक आहेत...तुम्ही दोघे भेटून घ्या..."
"हो..नक्की"
"नितीन येणार नाहीये या सेमला..त्याला एक्स्टेन्शन मिळालं आहे..तुला राज-जीत काही बोलले का?"
"हो..सकाळीच त्यांनी बॉम्ब टाकला..पण म्हणाले टेन्शन नको घेऊ..काहीतरी सोय होईल"
"हो रे..टेन्शन नको घेऊ..रमाचाही तोच घोळ होणारे...तिची पार्टनर म्हणून जी मुलगी येणार होती तिचा विसा रिजेक्ट झाला"
"ओह.."
"तुझा विसा झाला ना नीट?"
"अ..हो...काहीच प्रॉब्लेम नाही आला मला.." उत्तर देताना आदित्यच्या मनाने पुन्हा सगळ्या गोष्टींची उजळणी केली. 'छे! आपल्या आयुष्यातलं सगळंच इतकं निवांत झालं आहे...मग विसा कीस झाड की पत्ती??आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्लान केल्यासारखी निवांत झाली आहे!'
तितक्यात रमा आली. 
'काल माझी खरंच अर्धवट झोप झाली असेल किंवा ही मुलगी पण प्रवासामुळे दमून जास्त वेंधळी वाटली असेल..खरंच छान दिसते ही...अमुपेक्षा थोडीशी जास्तच!' आदित्यने मनात म्हटलं.
"हाय" रमाने सुरुवात केली. 
"तुम्ही भेटला आहात ना एकमेकांना?" मेघाने विचारलं.
"ओह..येस येस!!" आदित्यने उत्तर देऊन रमाकडे हसून पाहिलं.  
आपापसात तमिळ आणि तेलगुमध्ये बोलणारे तीन-चार लोक त्यांना इंडियन स्टुडन्टस कमिटीच्या ऑफिसमध्ये भेटले. काही मास्टर्सला आले होते. त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था नक्की झाली होती. त्यातल्या एका मुलाने आदित्यला रूम-मेट हवाय का विचारलंसुद्धा. त्याने राज-जीतशी बोलून सांगतो असं उत्तर दिलं. परत येताना मेघाने दोघांना वाटेत सोडलं आणि ती कॉलेजला गेली.
"सो..आता काय करणारेस?" आदित्यने रमाला विचारलं.
"काहीच नाही..मेघाच्या घरी जाईन..दर्शुपण नाहीये..काहीतरी वाचत बसेन..त्या दोघी येतील दोन तासात..मग त्या अपार्टमेंटसच्या केअर टेकरकडे जायचंय.."
"ओह..ओके ओके..मला तो राघव म्हणत होता की इथला केअरटेकर खूप फ्रेंडली नाहीये.."
"अवघड आहे मग..एकट्याला एक अख्खं अपार्टमेंट खूप खर्चिक होईल ना..."
"हो. पण हे सगळे म्हणतायत ना की होईल काहीतरी.."
"ते पण खरंच..तू काय करणारेस आत्ता?"
"विशेष काहीच नाही...मी पण बसून बोर होणारे..तू येतेस का? बसून काहीतरी विचार करू.."
दोघांनाही विशेष काम नव्हतं. खरंतर बसून काही विचार, चर्चा वगैरे उपयोगी नव्हत्या, कारण त्यांना तिथलं विशेष काहीच माहित नव्हतं. नवीन देशात, नवीन वातावरणात कुणीतरी सोबतीला हवं असतं हेच खरं..रमा हो म्हणाली आणि दोघे राज-जीतच्या अपार्टमेंटवर गेले. 
मग दोघांनी एकमेकांची पार्श्वभूमी, इथे कसे पोचले अशा सगळ्या गोष्टी शेअर केल्या. गप्पांची गाडी पुन्हा राहायची व्यवस्था या स्टेशनवर येऊन थांबली. 
"मला काल राज आणि जीत सांगत होते की इथे आलं की शक्यतो आपली भाषा बोलणाऱ्या माणसांमध्येच रहावं..आपल्या सवयी, कल्चर वगैरे सेम असतं..मला ते फारसं पटलं नव्हतं..म्हणजे अमेरिकेत येऊ स्वतःला इंडियन म्हणवून घेत पुन्हा इथे प्रांतिक वाद घातल्यासारखं झालं हे.."
"खरंय तू म्हणतोस ते..पण काल मेघाच्या घरी मनीषा आणि प्रिया आल्या होत्या. एकटी प्रिया कन्नड. आम्ही सगळे ती संभाषणात असावी म्हणून हिंदीत बोलत होतो. तू तुझ्या घरच्यांशी हिंदीत बोलला आहेस का कधी?"
"नाही गं..पण मला वाटलं की तू मुंबईत राहतेस म्हणजे तुला हिंदी भाषेचं काही वावगं नसावं."
"प्रश्न मी कुठे राहते किंवा मला किती भाषा येतात हा नाहीये..आता अमेरिकन्सच बघ..त्यांना फक्त इंग्लिश येतं. त्यांच्यासमोर इतर भाषिकांनी इंग्लिशमध्ये म्हणजे त्यांच्या भाषेतच बोलावं अशी त्यांची अपेक्षा असते..मग आपण ती अपेक्षा आपण ज्या घरात २४ तास राहतो तिथे का ठेवू नये..??" 
"खरं आहे तू म्हणतेस ते..मी आधी सोलापूरला होतो लहानपणी त्यामुळे तिथे खूप कानडी पहिले. नंतर मुंबईत २ वर्षं होतो इथे सगळे गुजराती आणि राजस्थानी. आणि आता पुण्यात तर मला ३-४ टाईपचं मराठी ऐकायला मिळतं...त्यामुळे मला सवय आहे बहुभाषिक समाजात राहण्याची"
"मग चांगलं आहे की..तुला त्या राघवने विचारलं आहेच रूम-पार्टनरबद्दल ..तू हो म्हणून टाक त्याला..प्रश्न माझाच येणारे..मेघा आणि दर्शनाकडे राहिले तरी मी कुणाची बेडरूम शेअर करायची यावरून त्यांच्यात कुरकुर होईल..आणि मला ते नकोय..पण बहुतेक काही पर्यायच नसणारे"
"हे बघ...फार काही झालं ना..आणि एकट्या-एकट्याने अपार्टमेंट घेउन खूप खर्च होणार असेल तर आपण एकत्र अपार्टमेंट शेअर करू" आदित्य चटकन बोलून गेला. रमा एव्हाना त्याच्याशी बोलून थोडी 'सैलावली' होती. ती पुन्हा सावध झाली आणि गप्प बसून राहिली. आदित्यला अचानक आपण काहीतरी मुर्खासारखं बोललो आहोत याची आयडिया आली. 
'तुला कुणीच मुलगी मदत करणार नसेल तर मी तुला हेल्प करेन..लेट्स बी पार्टनर्स' श्रीसुद्धा सेकंड यीअरला हेच बोलला होता. रमाच्या मनात विचार येऊन गेला.
"सॉरी..अगं मी गम्मत करत होतो..पण असे राहतात इथे लोक..मुव्हीसमध्ये वगैरे पाहिलंय मी अशी मुलं-मुली एकत्र राहिलेली..तू बघत असशील ना इंग्लिश मुव्हीस?" आदित्यने विषय बदलायला प्रश्न टाकला.
"होरे..मला माहितीय...आणि काहीच पर्याय नसेल तर आपण करू बरं का या ऑप्शनचा विचार.." रमा हसत म्हणाली. आता गप्प व्हायची पाळी आदित्याची होती. पुढचे काही सेकंद दोघे एकमेकांकडे पाहत, कसेनुसे हसत तसेच बसले होते. नवीन देशात, नवीन वातावरणात एकमेकांबद्दल अजिबात माहिती नसलेले दोन लोक काही वेळाच्या गप्पांमध्येच अचानकच वर्षानुवर्ष ओळख असल्यासारखे वागायला लागतात. 'जस्ट लाईक दॅट!'
"काय रे झालं का काम?" राज आत येत म्हणाला. त्याने रमाला पाहिलं आणि तो सावध झाला.
"हाय मी राज"
"मी रमा"

क्रमशः 

भाग ४ इथे वाचा

No comments: