इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून त्यांचा मोठेपणी व्यवहारात काही फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात आलेले अनुभव, भेटलेली माणसं लक्षात घेता पंचतंत्र, इसापनीतीमधले धडे न घेता त्यात लिहिल्याच्या उलट किंवा अजूनच काहीतरी भलतं जगात घडतं या मताचा मी झालोय.. म्हणून या वर्षी एक नवीन प्रयोग सुरु केला. वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नवीन स्वरूपात! आवडतायत का ते नक्की सांगा आणि आपल्या भल्या-बुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवायची जबाबदारी मी वाचणाऱ्या लोकांवर सोपवतो आहे! या प्रयोगातली
ही दुसरी गोष्ट. (पहिली गोष्ट इथे वाचा)
'लबाडी-धूर्तपणा
आणि हुशारी-चतुरपणा यांच्यातला फरक नेमका कसा ठरवायचा बरं?' कोल्हा सकाळपासून
याच विचारात गुंतला होता. कोल्हा या प्राण्याची जगात काय इमेज आहे हे अलीकडेच
त्याला एका घुबडाकडून कळलं होतं. मागे एकदा त्याच्या एका पूर्वजाने जेव्हा
एका सिंहाच्या गुहेबाहेरचे पायाचे ठसे पाहून आपला जीव वाचवला तेव्हा कोल्ह्यांना
सगळे 'चतुर कोल्हा' म्हणायला लागले पण जेव्हा त्यांच्याच एका दुसऱ्या भाऊबंदाने कुठल्यातरी दोन
प्राण्यांच्या भांडणानंतर त्यांची शिकार पळवली तेव्हा त्यांच्या जमातीचं नाव 'लबाड', 'धूर्त' असं पडलं. बुद्धिवादी
कोल्ह्याला कुठल्यातरी एका प्रसंगामुळे त्याच्या जमातीची झालेली बेअब्रू सहन होत
नव्हती.
"बाळा, कसल्या विचारात
गुंतला आहेस?" त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं.
त्याने वडिलांना घुबडाने सांगितलेली
हकीकत सांगितली. ते ऐकून वडील विचारात पडले.
"आपण कोल्ह्यांनी
कधीच काही का केलं नाही? जंगलात आपली प्रतिमा किती मलीन झालीय माहितीय?" त्याने तावातावाने विचारलं.
"तुला काय वाटलं की
आपल्या आधीच्या पिढ्यांनी प्रयत्न केले नाहीत? आपण काहीही बोलायला गेलो तर सगळ्यांना आपण
धूर्तपणे काहीतरी योजना आखतोय असलंच काहीतरी वाटतं. तुला सांगतो, ती शिकार 'चोरण्याची' दुर्दैवी घटना
घडण्यापूर्वी आपल्या जातीला, आपल्या बुद्धीला खूप मान होता. एका अर्थाने
त्या अस्वल आणि लांडग्याच्या भांडणाचा फायदा घेणारा आपला भाईबंद आपल्यामध्ये उपजत
असणाऱ्या बुद्धिमत्तेचं उदाहरण नाही का?"
"ते सगळं जरी खरं
असलं तरी हा युक्तिवाद तर्कशुद्ध नाही ना?जी आपल्याला
हुशारी वाटते ती जगाला लबाडी वाटते.."
"बाळा, जगातल्या प्रत्येक
प्रकारच्या जाती-जमातीच्या प्रत्येक श्रद्धा, समजुती, विचार तर्कशुद्ध आहेत असं वाटतं तुला?"
त्याने थोडा विचार केला. वडील म्हणतायत ते
बरोबर आहे हे त्याला पटलं.
"मला कळतंय बाबा
तुम्ही म्हणताय ते..पण मला प्रश्न पडलाय की आपल्या बाबतीतल्या या संकल्पना, समजुती वगैरे
आल्या कुठून? आणि त्याचं मुळ तरी तर्कशुद्ध होतं का?"
"हे सगळं जे काही
घडलंय ना ते त्या इसाप नावाच्या एका माणसामुळे घडलंय..काही हजार वर्षांपूर्वी तो जंगलात राहायला
आला, प्राण्यांनी त्याचं गोड बोलणं ऐकून त्याला इथे आश्रय दिला, नंतर त्याने
इथल्या गोष्टी इतर मनुष्यांना जाऊन सांगितल्या. तरी नशीब त्या वेळी ते 'हे' नव्हतं..काय
म्हणतात ते..ग्लोबल-"
"वॉर्मिंग??" कोल्ह्याने भाबडेपणाने विचारलं.
"वॉर्मिंग नाहीरे...ग्लोबल-लाय..झे...शन..हं..ग्लोबलायझेशन
झालं नव्हतं ना तेव्हा....!त्यामुळे इसापच्या या बातम्या जगभर पोहोचायला काही शतकं
लागली...आधी जगभरातल्या माणसांपर्यंत इथल्या गोष्टी पोहोचल्या आणि मग हळूहळू जगातल्या इतर
प्राण्यांपर्यंत..बरं झालं असं की- इसापने एकाला 'एक' गोष्ट
सांगितली..एकाने दुसऱ्याला सांगताना स्वतःच्या अकलेने त्यात भर घातली..असं करत
इसापच्या मुळ गोष्टी भलत्याच तात्पर्यांसकट लोकांनी ऐकल्या.."
"आता याला माणसांची
लबाडी म्हणायचं की चतुरपणा?"
"तुला आपल्या अजून
एका पूर्वजाची गोष्ट सांगतो..ती ऐकून तुझं तूच ठरव की माणूस चतुर आहे की लबाड??की मूर्ख?"
"ओके" कोल्हा
मान डोलवत म्हणाला. त्याचे बाबा गोष्ट सांगायला लागले.
"एक कोल्हा एकदा
फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात पोहोचला.."
"द्राक्षं?म्हणजे माणूस दारू
का वाईन बनवायला वापरतो तीच फळं ना?"
"हो हो..तीच! तर तो
बिचारा खूप थकला होता. त्याला तहान-भूक लागली होती आणि माणसांच्या प्रदेशात
असल्याने 'मुक्तपणे' खायला-प्यायला काही मिळायची सोय नव्हती. त्या द्राक्षाच्या मळ्यात उंचावर
द्राक्षं लागली होती. आता आपल्याकडे ना जिराफासारखी उंच मान आणि ना माकडांसारखी
उड्या मारण्याची कला. तरी त्याने बिचाऱ्याने बराच वेळ उड्या मारून पंजाला काही
द्राक्षं लागतात का ते पाहिलं. बराच वेळ प्रयत्न करून अपयश आल्याने तो तिथून निघून गेला. जाताना तो स्वतःशीच पुटपुटला- 'तशीही ती द्राक्षं आंबटच होती'. मग मळ्यातल्या
कुठल्याशा कावळ्याकडून ही गोष्ट इसापला कळली. हुशार इसापने जाऊन जगाला सांगितली.
जगातल्या थोर विचारवंतांनी निष्कर्ष काढला की कोल्ह्याला द्राक्षं खायला जमली
नाहीत म्हणून तो त्यांना 'आंबट' म्हणून मोकळा झाला"
"ही गोष्ट तर त्या
शिकार-चोरीच्या वर झाली" छोटा कोल्हा संतापला होता "मुळात आपण कोल्हे
द्राक्षं खायला का जाऊ हा विचार कुणी केला नाही का?"
"अरे बाळा, त्या काळी म्हणे
आपण सगळं खायचो..आपल्याला द्राक्षं तर विशेष आवडत असत म्हणे..महत्वाचा मुद्दा हा
आहे की ही गोष्ट घडली की नाही याचा पुरावा नाहीयेच काही"
"म्हणजे??असं काही घडलंच नव्हतं?"
"त्याबद्दल पण खूप
रुमर्स आहेत..कुणी म्हणतं ती कोल्ह्याने द्राक्षं खाल्ली आणि ती खरंच आंबट होती पण
लोकांना काहीतरी मूल्यशिक्षण मिळावं म्हणून त्यांना खोटी गोष्ट सांगितली गेली.कुणी म्हणतं की तो कोल्हा खूप उपाशी होता, त्याला द्राक्षं
मिळाली नाहीत म्हणून त्याने स्वतःची समजूत काढण्यासाठी 'द्राक्षं आंबट
होती' असा शेरा मारला. आता जर का असं झालं असेल तर त्या बिचाऱ्या उपाशी कोल्हयाचं
काय चुकलं? मग जगात नवीन विचारांचं वारं आलं, द्राक्षं न मिळालेल्या कोल्ह्याची गोष्ट 'बौद्धिक विरोधाभास
सिद्धांता'चं सर्वोत्तम उदाहरण ठरलं. त्याला द्राक्षं हवी तर होती पण ती न मिळू शकल्याने
अपराधी भावनेने किंवा चिडून आपली कमजोरी झाकायला त्याने मार्ग शोधला अशी आपल्या
कोल्ह्यांच्या मनोवृत्तीची विश्लेषणं माणसाने केली"
"पण बाबा, नक्की यातली कुठली
गोष्ट किंवा थिअरी खरी मानायची??"
"ते ज्याचं त्याने
ठरवायचं...तू जगातल्या समजुतींची पाळं-मुळं तर्कशुद्ध आहेत का विचारलंस ना? म्हणून तुला हे
सगळं सांगितलं. पण इतका विचार कर की सिंहाच्या गुहेच्या समोरचे पावलाचे ठसे पाहून
स्वतःचा जीव वाचवणारा चतुर कोल्हा, लांडगा आणि अस्वलाच्या भांडणाचा फायदा घेणारा
धूर्त कोल्हा असं म्हणता म्हणता तोच कोल्हा हा प्राणी द्राक्षांसाठी इतका हतबल
होईल का?मला माणूस या प्राण्याची खूप गम्मत वाटते..आकाश निळ्या रंगाचं का ते त्याने
शोधलं, झाडं हिरवी का ते त्याने शोधलं, पण आपल्या मुलांना इतर प्राणिमात्रांच्या
गोष्टी सांगताना हवी तशी लिबर्टी घेतली. असो! आपल्या लहान पिलांना इतर प्राणी
संस्कार वर्गांमध्ये वगैरे येऊन देत नाहीत. आज तूच विषय काढलास आणि आपल्या
गप्पांमध्ये मी तुझ्यावर करायचे बऱ्यापैकी संस्कार आज पूर्ण
झाले असं मला वाटतं...ओढ्यावर जाऊन यायचं का?अंधारसुद्धा पडलाय आणि मला खूप बोलून तहान
लागलीय.."
विचारात गढलेला छोटा कोल्हा
शून्यात पाहत वडिलांच्या मागे ओढ्याच्या दिशेने चालायला लागला. त्याचा प्रश्न अजून
तसाच होता-
'लबाडी-धूर्तपणा
आणि हुशारी-चतुरपणा यांच्यातला फरक नेमका कसा ठरवायचा बरं?'
No comments:
Post a Comment