Pages

Wednesday, March 28, 2012

४७ सेकंद

         "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, जरी तर्कशुद्ध नसला तरी असतो! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?" कॅसल बेकेटला विचारतो. 


मी पाहत असलेल्या अनेक सीरिअल्समधली एक सीरिअल- 'कॅसल'. एक खून-रहस्यकथा लिहिणारा लेखक एका शहरातल्या पोलिसांच्या टीमला गुन्हे सोडवायला मदत करतो ही त्या शोची जनरल थीम. काल त्याचा '४७ सेकंद' नावाचा एपिसोड पाहिला. न्यूयॉर्कमधल्या कुठल्याशा निदर्शनांच्या दरम्यान एक बॉम्ब फुटतो आणि ५ लोक ठार आणि २८ जखमी होतात. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांमध्ये बॉम्ब फुटलेल्या ठिकाणी काढला गेलेला एक ४७ सेकंद आधीचा फोटो असतो. नेमकं त्या ४७ सेकंदात काय घडलं? बॉम्ब कुणी ठेवला? का ठेवला? वगैरे वगैरे शोधून काढणं म्हणजे सगळा एपिसोड. कॅसलचे या आधी मी कित्येक चांगले एपिसोड पहिले आहेत मग अचानक कालच्या एपिसोडवर अख्खा ब्लॉग का?    
कालच्या एपिसोडने मला थोडं अंतर्मुख केलं. माझ्याबरोबर हा शो पाहणाऱ्या कुणाला काही विशेष वाटलं नसावं कारण शोच्या फेसबुक पेजवर भलतीच चर्चा सुरु होती. म्हणून ब्लॉग लिहिण्यापूर्वीसुद्धा खूप विचार केला. खरंच लिहावं का म्हणून?असं तर वाटणार नाही की उगाच काहीतरी विषय काढायचा आणि लिहित सुटायचं म्हणून लिहिलंय? सध्या मराठी ब्लॉगिंग हा प्रकार थोडासा वादग्रस्त झाला असल्याने साशंकता होती. पण मग म्हटलं की कुणाला काय वाटायचं आहे ते वाटून दे..मी माझ्या डोक्यात येतंय ते सांगायचा प्रयत्न करतोय. ज्यांना पटेल ते वाचतील इतरांनी फु.गो.घ्या.
तर- कॅसलचा काल भर जितका तपासावर होता तितकाच स्फोटामुळे व्यक्तिरेखांच्या मनावर होणाऱ्या परिणामांबद्दल होता. स्फोट मेलेल्या लोकांपैकी कुणाला टार्गेट करून तर झाला नाही ना याचा तपास करण्याचा प्रयत्न होतो. मरण पावलेल्या पाच लोकांमध्ये एक शहर फिरायला आलेला टूरिस्ट असतो, एक दोन मुलांची आई असते, एक त्याच्या कुटुंबातला कॉलेजला गेलेला पहिलाच मुलगा असतो वगैरे. सगळ्यातून हाच निष्कर्ष निघतो की सगळे मरण पावलेले लोक अहेतुक गेले. निराश होऊन कॅसल बेकेटला म्हणतो "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, काहीवेळी तर्कशुद्ध नसला तरी हेतू असतोच! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?एका क्षणात त्यांचं भविष्य, त्यांचे प्लान्स सगळे नाहीसे झालेत."
मला त्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या सिरिअस होण्याने आधी नवल वाटलं. ५ ठार २८ जखमी? मुंबईत गेल्या काही वर्षात आपण इतके स्फोट अनुभवले आहेत त्यामुळे स्फोट झाला ना?त्यात काय एवढं?अमेरिकन शो असला म्हणून एका स्फोटाचं इतकं काय उदात्तीकरण सुरु आहे असे सगळे विचार डोक्यात येऊन गेले. मग अचानक स्वतःच्याच निर्ढावलेपणाचा राग आला. शांतपणे बसून आठवत होतो की आपल्याकडे हल्ला झाला की किती दडपण असतं ते! कळायला लागल्यापासून ११ जुलै, २६ नोव्हेंबर अशा मुंबईत झालेल्या सगळ्या हल्ल्यांच्या वेळी मी तो अनुभव खूप जवळून घेतलाय. वर्षाच्या काही ठराविक तारखा दिनविशेष असल्यासारख्या आपण एखाद्या बॉम्ब-स्फोटासाठी लक्षात ठेवतो याला दुर्दैव म्हणायचं की करंटेपणा? अमेरिकेत बॉम्ब-स्फोट होत नाहीत का काय याचा शोध घ्यायला मी विकिची मदत घेतली. गेल्या साधारण तीन वर्षात सगळ्या अमेरिकेत मिळून निव्वळ एका हल्ल्याची नोंद अशी होती जिथे काही लोक मरण पावले. कित्येक नोंदी तर अशादेखील होत्या की बॉम्ब सापडला आणि डिफ्युस केला गेला, फक्त एका माणसाचा एक पाय गेला वगैरे. याउलट त्याच लिस्टमध्ये भारतात जवळपास दर महिन्याला होणाऱ्या एका स्फोटाची नोंद आहे. दर स्फोटात लोक मेले आहेत, जखमी झाले आहेत. 
फार जास्त लिहिण्यापूर्वी मी स्पष्ट नमूद करतो की मला या ब्लॉगमधून कुठलेही निष्कर्ष काढायचे नाहीत. उलट प्रश्न पडलेत आणि त्यांचा फार गुंता झालाय. निदान लोकांनी वाचून काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. मुंबईत गेल्या वर्षी दादरमध्ये झालेल्या स्फोटानंतर शी. चीडब्रम (नावाचा असा उल्लेख टाईप करतानाच्या चुकीने झालेला नाही) या आपल्या गृहमंत्र्यांनी उधळलेली मुक्ताफळं आठवली आणि भारतीय असण्याची लाज वाटली (वाक्य लिहायला खूप जड गेलं पण दुर्दैवाने ते खरं आहे). अमेरिकन लोकांचा खूप हेवा वाटला मला. वेनसडेमधला नसीर आठवला जो म्हणतो की सकाळी कामाला बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का याची खात्री घरातल्या बाईला नसते. हे सगळं कधी थांबणार? अमेरिकेत एक ९/११ चा हल्ला झाला आणि त्यांनी आज दहा वर्षांनीसुद्धा अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णपणे हलवलेलं नाही. आपण मात्र कसाबची सरकारी पाहुणा असल्याच्या थाटात सरबराई करतोय. अमेरिकेच्या धोरणाचं कौतुक करण्याचा अजिबात हेतू नाहीये पण याच ब्लॉगच्या अनुषंगाने आठवलं- माझ्याबरोबर जॉन नावाचा एक अमेरिकन काम करतो. त्याच्याशी परवा गप्पा सुरु होत्या. अमेरिकन राजकारणाचा विषय निघाला. लौकरच निवडणुका होतील. इथे अध्यक्ष निवडून येण्यापूर्वी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीसुद्धा प्रत्येक पक्षातर्फे वेगळी निवडणूक होते. प्रत्येक उमेदवार त्याचे अजेंडे मांडतो वगैरे. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. तो बोलता बोलता सहज म्हणाला- "चैतन्य, सामान्य अमेरिकन माणसाला कुठल्या उमेदवाराची आंतरराष्ट्रीय धोरणं काय आहेत याच्याशी घेणं-देणं नाही. ९/११ झाल्यानंतर अगदी आजपर्यंत आमचे अधिकारी एखाद्याला दहशदवादाच्या निव्वळ संशयाखाली अटक करताना दिसतात.सामान्य माणसाला पुरेपूर कल्पना आहे की आमचं सैन्य इराक किंवा अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून बसलंय. आम्हाला मात्र असंच वाटतं की त्यांनी त्यांच्या देशात सुरक्षित असावं. माझ्या देशाची दहशतवादाविरुद्ध काहीही धोरणं असोत मला माझ्या सरकारने माझ्या देशात फक्त सुरक्षित ठेवणं अपेक्षित आहे." मी मनात म्हटलं होतं- "आम्हा भारतीयांना तरी काय वेगळं वाटतं असणारे? पण आमच्या सरकारची ना दहशतवादाबद्दल काही ठोस धोरणं असल्याचं आम्हाला जाणवतं आणि सुरक्षितता? वेल, कल्पना चांगली वाटते नाही ऐकायला?" पाश्चात्य संस्कृती (वाचा अमेरीकन) कायम चंगळवाद आणि भौतिक सुखं यांच्यावर भर देणारी असल्यामुळे त्याची तांत्रिक भरभराट जास्त झाली या अर्थाचं वाक्य कुठेतरी वाचलं. पण अमेरिकेत आल्यापासून गेल्या दोन वर्षात जे जाणवलं ते हेच की इथे माणसाला, त्याच्या जीवाला किंमत आहे ज्यामुळे चंगळवाद आणि भौतिक सुखं सारख्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष होतं. ब्लॉग लिहिताना एकीकडे लोकसत्ता उघडला तर गडचिरोलीमध्ये नक्षलवादी स्फोटात १२ जवान शहीद झाल्याची बातमी वाचली आणि अजूनच निराश झालो. 
लिहिता लिहिता २६ नोव्हेंबर आणि ११ जुलैच्या घटना आठवल्याच. ९३चे स्फोट झाले तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण या दोन घटना नीट आठवतायत. ११ जुलैला स्फोट झाले आणि १२ जुलैला सगळे चाकरमानी जीव मुठीत धरून कामावर रुजू झाले. भीती, दुःख व्यक्त करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. आजपर्यंत त्या हल्ल्यामागे हात असणाऱ्या कुणाला ठोस पुराव्यानिशी पकडून शिक्षा झाल्याचं माहित नाही. २६ नोव्हेंबरनंतर आठवडाभराने गेटवेला झालेला 'पीस-मार्च' आठवतो आहे. 'पीस-मार्च' असला तरी जमाव इतका संतप्त झाला होता की पोलिसांना परिस्थिती ताब्यात घ्यावी लागली होती. आणि आज साडेतीन वर्षांनी? कसाबला शिक्षा होईल ही आशा हळूहळू लोकांनी सोडून दिलीय. मिडीयाला कव्हर करायला सध्या इतर अनेक ब्रेकिंग न्युज आहेत. पेपरला स्फोटाची बातमी वाचली की आपण ४७ सेकंदसुद्धा विचार करतो का नाही हा प्रश्न आहे! अक्षरधाम, भारतीय संसदेपासून दिल्ली, वाराणसी, आसामपर्यंत झालेल्या कुठल्याही हल्ल्यासाठी कुणालाच ठोस शिक्षा झालेली मला माहित नाही. इथे मला धर्म, देश, राजकीय पक्ष अशा कोणत्याच गोष्टी उपस्थित करायच्या नाहीत कारण माझ्या मते सुरक्षिततेचा मुद्दा असला की कोणत्याही धर्माच्या लोकांच्या, राजकीय पक्षाशी संबंधित लोकांच्या आणि कुठल्याही देशाच्या लोकांच्या भावना सारख्याच असतात.  प्रॉब्लेम असा आहे की सध्या कोणत्याही सज्जन माणसासमोर  महागाई, भ्रष्टाचार, गर्दी असे इतके प्रश्न असतात की सुरक्षितता या मुलभूत गरजेचा आणि हक्काचा विचार करायला वेळ आहेच कुठे? 
               कॅसलपासून विषय सुरु करून तो भरकटवत कुठेतरी नेऊन सोडण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण कालपासून डोक्यात वर लिहिलेलं वाक्य घोळत होतं आणि राहून राहून वाटत होतं की आजपर्यंत झालेले हल्ले, त्यात गेलेले लोक, त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न, भविष्य यांचा विचार करायलासुद्धा आज आपल्याला वेळ नाहीये. इतकं निर्ढावलेलं असून चालणार नाही. कारण जर का जो दगडपणा मला ४७ सेकंदांसाठी का होईना माझ्यात आलेला मला जाणवला तो जर का प्रत्येकामध्ये आला तर अवघड आहे. आणि माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न तसाच आहे- खरंच आपण सुरक्षित आहोत का? 


ता. क. : अजून एक: वाचणाऱ्या काही लोकांच्या डोक्यात एक मुद्दा येईल की हा माणूस अमेरिकेला गेलाय आणि तिथे बसून उगाच हे असले लेख लिहितो आहे. त्याला इथल्या सुरक्षिततेशी काय देणं-घेणं आहे? तर अशा लोकांना माझा इतकाच निरोप आहे की भारतात नसलो तरी नाळ शेवटी तिथेच जोडलेली आहे. माझे आई-वडील, नातेवाईक, मित्र, शेजारी-पाजारी आजही त्याच वातावरणात राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीने हे सगळं लिहिलं असं समजा. हेही खोटं वाटत असेल तर खड्ड्यात जा! 

चैतन्य

No comments: