Pages

Thursday, November 1, 2012

जस्ट लाईक दॅट १५

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११,भाग १२,भाग १३, भाग १४

त्याला जाग आली तेव्हा बाहेरच्या खोलीत कुणीतरी गप्पा मारत असल्याचं त्याला जाणवलं. उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये त्याने वेळ पहिली. खोलीत अंधार होता. त्याने बेडमधून बाहेर पडून खिडकीचा पडदा उघडला. आपण पाहिलेली वेळ पहाटेची नसून संध्याकाळची आहे याची त्याला जाणीव झाली. मग सगळं आठवलं. रविवारची निवांत दुपार होती. मजबूत जेवण झालेलं होतं.सगळ्या असाईनमेंटस, रिपोर्ट्स, होमवर्क्स करून झालं होतं. आडवं पडून गाणी ऐकताना त्याला झोप लागली होती.झोपेतच कधीतरी त्याने पांघरूण अंगाभोवती लपेटून घेतलं होतं. अशा निवांत झोपेतून उठलं की काळ-वेळाचं भान यायला वेळ लागतो.
आदित्य बाहेर आला तेव्हा मेघा,दर्शु आणि रमा गप्पा मारत बसल्या होत्या. तो अजूनही झोपेतच होता.
"गुड मॉर्निंग" रमा हसत म्हणाली.
"परचुरे, तुम्ही तुमच्याच अपार्टमेंटमध्ये आहात" मेघा 
"पाटकर बाई, कळलं मला ते" त्याने उत्तर दिलं.मेघाने चेहरा कसानुसा केला. 
"बाय द वे, तुमच्यापैकी हे अपार्टमेंट कोण ठेवणारे?" दर्शुने विचारलं.
"म्हणजे?" आदित्यचा चमकून प्रश्न.
"अरे, आता सेम संपली की तुमच्यापैकी एकजण बाहेर पडेल ना?" मेघा पुन्हा संवादात आली. रमाने आणि आदित्यने नुसतं एकमेकांकडे पाहिलं आणि उत्तर द्यायचं टाळलं. मेघा आणि दर्शुनेसुद्धा एकमेकींकडे दोघींनाच कळतील एवढ्याच भुवया वर करत पाहिलं.पण त्यांच्या दुर्दैवाने ते आदित्य आणि रमा दोघांच्याही लक्षात आलं.
"दोघेही उत्तर देत नाहीयेत...तुम्ही कायम एकत्र राहायचं ठरवलं आहे का?" मेघाच्या चौकश्या संपत नव्हत्या. अशा प्रश्नांना उत्तरं देताना एकटा आदित्य असता तर तो गडबडला असता पण गांगरून जाणं, कन्फ्युस होणं हे वाक्प्रचार रमाच्या शब्दकोशात कधीच नव्हते. ती दहा-वीस मेघांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला किंवा निदान प्रश्नाकडे दुर्लक्ष करायला समर्थ होती. 
"सध्या तरी मी चहा करायचं ठरवलं आहे. आदित्य पण उठलाय...तुम्ही दोघी चहा घेणारात ना?" ती उठून किचनकडे गेली. दर्शना आणि मेघाने यावेळी मात्र त्या दोघांच्या नकळत एकमेकींकडे पाहून माना डोलावल्या. रमा गेल्यावर तिघेजण अवघडल्यासारखे शांत बसून राहिले.
"सो..तुम्ही दोघी आज अचानक इथे कशा?" आदित्यने ताण हलका करायला प्रश्न विचारला.
"का...तुला आम्ही आलेलं आवडत नाही का?" दर्शुने विचारलं. तिच्या वाढदिवसाला आदित्यचं अस्वस्थ असणं तिला अजून लक्षात होतं.
"अगं नाही ग..आणि मला माहितीय की तू मला टोमणा मारते आहेस...तू तुझ्या बर्थडे पार्टीचं म्हणत असलीस तर-" रमा आधणात साखर घालता घालता थांबली. तिचे कान आदित्य काही अनपेक्षित बोलत नाहीये ना याकडे होते."- मला त्या दिवशी बरं वाटत नव्हतं. त्या दिवशी काम पण खूप झालं होतं. रमा आणि मेघा तुझ्या बर्थडे बद्दल खूप एक्साइटेड होत्या. मला माझ्या बरं न वाटण्याने त्यांच्या उत्साहावर विरजण घालायचं नव्हतं" दर्शुचं समाधान व्हायला एवढं पुरेसं होतं. 
'एखादी लहान गोष्ट कठीण मराठीत कशी सांगायची हे आदिला बरोब्बर जमतं' रमा मनात म्हणाली. 
"आणि तुला हवं तर आपण पुन्हा पार्टी करू आमच्या घरीच...आणि हां..सेम संपण्यापूर्वी बरं का...म्हणजे फक्त आपण ७च जण.."
'याची काहीही गरज नाहीये' रमाचं सगळं लक्ष आदित्यच्या बोलण्याकडे होतं. 
"ठीके रे...परत पार्टी वगैरे नको..रमा काही आमच्याकडे फिरकत नाही. म्हणजे तुमचे वाद झाले की तू निदान जीत आणि राजकडे तरी जातोस..ती काही आमच्याकडे येत नाही" मेघाचं वाक्य ऐकलं तेव्हा चहाबरोबर रमाचा रागही उतू जायच्या परिस्थितीत होता. आदित्य गडबडला आणि त्याने उत्तर द्यायचं टाळलं. मनात त्याने राजला हजारो शिव्या घातल्या. पुन्हा एक ऑकवर्ड सायलेन्स.
रमा चहाचे कप घेऊन आली आणि वातावरण निवळलं.  
"वा वा वा...झोपेतून उठल्यावर असा छान रंगाचा, आलं घातलेला चहा...रमा फडके, डेव्ह तुमचं कल्याण करो..."
"तुला देव म्हणायचं आहे का?" दर्शना.
"अंहं...डेव्ह...!!"  
"अगं, आपला प्रोफेसर डेव्हिड केम्प...तो मला नेहमी चांगले रिमार्क्स देतो रिपोर्ट्सवर...त्यावरून हा थट्टा करत असतो.."
"ओह.."
"मगाशी तू आमच्या गप्पांच्या आवाजाने उठलास का रे?" दर्शनाने विचारलं.
"नाही...का?"
"कारण आता पुढचे दोन आठवडे मी दर विकेंडला येणारे..आणि मनीषासुद्धा" दर्शना त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने न बघताच मान डोलावली. 
"हो...हिने मला दिवाली नाईटला डान्स करायला कन्व्हिन्स केलंय" रमा. 
"डान्स?दिवाली नाईट? पण दिवाळीला अजून महिना आहे" आदित्यने विचारलं.
"इथे यंदा लौकर** आहे..." मेघाने थट्टा करत म्हटलं. 
"अमेरिकेचं मला कौतुक वाटतं...म्हणजे यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहेच...पण यांनी त्यांचा स्वातंत्रदिन सोडला तर बाकी सगळे सण-वार सोयीने करून घ्यायची पद्धत ठेवली आहे...म्हणजे बघ ना...त्यांचा प्रत्येक सण कुठल्यातरी महिन्याचा गुरुवार, शुक्रवार किंवा सोमवार असतो..म्हणजे विकेंड जोडून सुट्टी साजरी करता आली पाहिजे..." दर्शना म्हणाली.
"म्हणून आपण दिवाळी पण सोयीने साजरी करायची?" मेघाचा पुन्हा प्रश्न.
"हो...इथे राहतो...म्हणजे इथलं कल्चर फॉलो केलं पाहिजे..सोमवार ते शुक्रवार कुणाला वेळ आहे?" दर्शनाचा रिप्लाय.
"खरंय..मला पटलं" आदित्यने कपमध्ये फुंकर घालत वाक्य टाकलं.
"तू तिचीच बाजू घे" मेघा चिडली "मागे जेव्हा गणपतीचा विषय होता तेव्हा तुला भारतातला गणपती चांगला वाटला होता आणि आता तुला इथे साजरी होणारी दिवाळी चुकीची वाटत नाही? कमाल झाली तुझी.."
"अगं तू का चिडतेयस इतकी?" रमा मध्ये पडली.
"रमा,एक मिनिट...मी बोलतो...मेघा,तो विषय वेगळा होता. गणपती श्रद्धेचा भाग होता आणि त्याची पूजा-अर्चा करायला एक शास्त्रोक्त पद्धत आहे, दिवाळीमध्ये श्रद्देपेक्षा सण साजरा करण्याला महत्व आहे..आणि सेलिब्रेशनच करायचं तर सगळ्यांना वेळ असायला नको? मान्य आहे की दिवाळी साजरी करायचे आपले प्रोटोकॉल्स आहेत...पण ते फॉलो करायला काहीच लागत नाही. नरक चतुर्दशीला भल्या पहाटे उठ, अंघोळ कर, घरून आलेला फराळ खा,देवाचं दर्शन घे, भाऊबीजेला माझ्याकडे ये,मला ओवाळ, आपण नवीन कपडे घालून जमू, मेणबत्त्या,पणत्या जे असेल ते लावू...विषय संपला...आणि हे आपण स्पेसिफिकली दिवाळीच्या दिवशी करू..ओके?" त्याने हसत विचारलं.मेघाने हसत होकार दिला.
"आणि दर्शु, मी तुझी बाजू घेतली ते ठीके. म्हणजे वेळ काढून सण करायला माझी हरकत नाहीये..पण दिवाळीला आपण अमेरिकन्सना चिकन खायला घालतो ना...ते मला नाही पटलं"
"आदित्य, बऱ्याच गोष्टी इच्छा नाही किंवा पटत नाही म्हणून करायच्या टाळल्या तर अवघड होईल" दर्शनाने अचानक एक 'परचुरीझम' टाईप वाक्य टाकलं.
"दर्शु या भाषेत कधी बोलायला लागली?"रमाने मेघाला विचारलं.
"हो ना...मलाही तोच प्रश्न पडलाय" मेघाने बाजूला बसलेल्या दर्शुला चिमटा काढला. दर्शुने हसू आवरत तिला दटावलं. 
मुलींनी आपली चेष्टा सुरु केलीय हे कळल्यावर आदित्य गप्प बसून राहिला.

आयुष्यात बरेचदा खूप अवघड क्षण येतात. आपण केलेली एखादी गोष्ट, किंवा घेतलेला एखादा निर्णय चुकीचा होता की बरोबर होता हे ठरवता येईनासं होतं पण आपलं कन्फ्युजन कुणाला बोलूनही दाखवता येत नाही. काही सामाजिक,मानसिक संस्कारांची बंधनं आपण कळत-नकळत स्वतःला घालून घेतलेली असतात. ती बंधनं बरोबर की या क्षणाला वाटतेय ती भावना बरोबर असा विचार कित्येकदा येऊन जातो. परिस्थिती जितकी गुंतागुंतीची होत जाते तितकी भावनेची उत्कटता वाढत जाते आणि अर्थात प्रॉब्लेमसुद्धा तसाच वाढत जातो. आदित्य आणि रमाची एकूण परिस्थिती सध्या अशीच होती. दोघांना एकमेकांबद्दल सगळं माहिती होतं. सहवासाने स्वभाव माहिती झाले होते. श्री रमाला योग्य जोडीदार ठरेल असं प्रायमरी कन्क्लूजन आदित्यने काढलं होतं पण तो ही गोष्ट तिला सांगू शकत नव्हता. त्याच्याबाबतीत अमृता जे वागली तसलं काही रमा-श्रीच्या बाबतीत होऊ नये अशी त्याची मनापासून इच्छा होती. अमृता आदित्यशी जे काही वागली ते रमाला पटलं नव्हतं, आदित्य कितीही कन्फ्युस्ड, अन्प्रिपेअर्ड मुलगा असला तरी त्याच्याबरोबर चांगलं काहीतरी व्हायला हवं होतं हे तिला मनोमन वाटत होतं. गोची म्हणजे एकमेकांमध्ये झालेली भावनिक गुंतवणूक या वेळेला कबूल करताही येत नव्हती कारण पुन्हा एकदा तोच 
नात्याला नावं देण्याचा प्रश्न!! बऱ्याच गोष्टी इच्छा आहे पण करता येत नाहीत म्हणूनसुद्धा अवघड होतं बरेचदा. हल्ली दोघांनी एकमेकांना प्रश्न-प्रतिप्रश्न करणं बंद केलं होतं. दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींच्या अपडेट्स एकमेकांना देऊन आपल्या आयुष्यात काय घडतंय हे दुसऱ्याला माहित असेल याची काळजी ते घेत होते.  
मेघा आणि दर्शना निघून गेल्यावर बराच वेळ रमा काही न बोलता बसून राहिली. न राहवून आदित्यने रमाला विचारलं-
"तू चिडली आहेस का? म्हणजे पुन्हा काही बिनसलंय का?"
"का? बिनसलं असेल तर तू राज आणि जीतकडे जाणारेस का?आदि, मला प्रश्न पडलाय की आपले असे कोणते वाद होतात की जे तू राज आणि जीतकडे जाऊन 'मांडतोस'??" मगाचचं मेघाचं वाक्य रमाने ऐकलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
"रमा सॉरी, तू मला असाईनमेंट दिली नाहीस त्या दिवशी संध्याकाळी जीतकडे गेलो होतो, तेव्हा जनरल गप्पा झाल्या होत्या. राज झोपला होता..त्याने काहीतरी अर्धवट ऐकलं आणि सांगून सांगून सांगितलं कुणाला? तर समाजसेविका मेघा पाटकरला?" आदिने सारवासारव केली.
"आदि, प्लीज हे परत होऊन देऊ नकोस...आपण परफेक्ट पार्टनर्स नसू कदाचित पण आपण वरचेवर भांडलोसुद्धा नाहीये. त्यात नशीब की मेघाने तुला डायरेक्ट विचारलं,मला विचारलं असतं तर मला नक्की राग आला असता" रमाला विषय संपवायचा होता. त्याने मान डोलावली.
"तू नवरात्र मिस करत नाहीयेस यंदा?" त्याने विषयांतर करायला विचारलं.
"नाही एवढं..कुणी दांडीयाचे फोटोस शेअर करत नाहीये फेसबुकवर इतकं"ती अजूनही थोडी रागात होती.    
"अरे हां फेसबुकवरून आठवलं अजून एक, मला श्रीधरची फ्रेंड रिक्वेस्ट आलीय.." रमाच्या रागाची जागा उत्सुकतेने घेतली..
"मग? तू रिजेक्ट केलीस की?"
"रिजेक्ट कशाला करू मी?हल्ली लोकांच्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारा प्रत्येकजण त्याचा फ्रेंड असलाच पाहिजे अशी गरज राहिलेली नाहीये. सोशियल नेटवर्किंगने आपले नाते-संबंध री-डिफाईन केलेत..आणि त्यात काही चुकीचं नाही.आपला सामाजिक गुंता वाढावा हाच तर हेतू आहे या प्रकाराचा! आपण ते चुकीचं वापरतो, आपण स्वतःच्या प्रत्येक कृतीबद्दल वैश्विक बोंबाबोंब करण्याची काहीच गरज नाहीये पण तरी आपण करतो..जुने मित्र-मैत्रिणी शोधा, नवीन माणसांशी मैत्री करा, तुमच्यासारखे विचार असलेली माणसं शोधा हा मूळ हेतू..पण लोक काय करतात माहितीय? ज्यांच्याशी कडाक्याचं भांडण झालंय त्यांची प्रोफाईल निरखत राहायची आणि त्यावरून त्याचं बरं चाललंय की वाईट चाललंय याचे अंदाज बांधायचे , आपल्याला कधी काळी आवडत असलेल्या मुलीचे आणि तिच्या आयुष्यात सध्या असलेल्या मुलाचे फोटो पहायचे...स्वतःच्याच नवीन गल्फ्रेंडच्या जुन्या अपडेट्स पहायच्या आणि त्यात कुणी तिचं फार कौतुक केलेलं दिसलं की त्याची झाडाझडती घ्यायची...कारण माहितीय या सगळ्या गमतीजमतींचं?" 
"काय?"
"कारण लोकांनी फेसबुकला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवलंय..सगळ्यांना असं वाटतं की आपण एखाद्याचे फ्रेंड झालो की आपण त्याच्या आयुष्याचा भाग बनतोय किंवा एखाद्याला फ्रेंड लिस्टमधून काढून टाकलं म्हणजे त्याला आपण आयुष्यातून बाद केलंय...म्हणजे मी या सगळ्याचा भाग आहे आणि म्हणून मला सर्वस्वी टीका करण्याचा काही अधिकार नाही..पण वर्चुअल आणि रिअल लाईफमधला फरक लोकांनी विसरू नये इतकं मात्र मला वाटतं!" आपलं मत प्रदर्शन खूप लांबतं आहे हे जाणवल्यावर आदिने बडबड थांबवली.
"मग या सगळ्यात श्रीने तुला का रिक्वेस्ट पाठवली आहे असं वाटतं तुला?"
"तो अंदाज घेत असेल की तू मला त्याच्याबद्दल सांगितलं आहेस का नाही? सांगितलं नसशील तर आता मी तुला विचारेन आणि तुला मला सांगावं लागेल..नंतर तो माझे फोटो निरखेल, आवडीनिवडी वाचेल आणि त्यावरून मी माणूस म्हणून कसा आहे ते ठरवण्याचा प्रयत्न करेल" रमा हसली.
"श्री हे सगळं करेल याचे इतके अचूक अंदाज तू कसे बांधलेस?" रमाने पुन्हा पुस्तकात डोकं घालत विचारलं.
"स्वानुभव...गेले दोन तीन आठवडे मी हेच करतोय..फक्त फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू का नको हे ठरत नव्हतं माझं" रमाने वाक्य ऐकलं आणि त्याच्याकडे पाहायला मान वळवली. त्याला समोर बसवून त्याच्याशी काहीतरी बोलण्याची तिला खूप इच्छा झाली पण तो त्याच्या खोलीत निघून गेला होता. ती हातात घेतलेलं पुस्तक मिटून काही वेळ शून्यात पाहत राहिली.

"रमा, मी सारखा सारखा विषय काढला नाहीये पण तुझी मिडटर्म होऊन आठवडा उलटून गेला..तू आदित्य परचुरेशी बोलणार होतीस.."
"श्री,पहिली गोष्ट की मी बाबांशी हा विषय बोलणार होते..तुझ्याशी नाही! पण शेवटी ते तुला कळणारच आहे तर तुलाच सांगूनसुद्धा टाकते..आम्ही बोललो"
"मग? काय म्हणाला तो?"
"तूच विचार की त्याला..तुझा ऑनलाईन फ्रेंड आहे ना तो.."रमाने टोमणा मारला. श्री काहीच बोलला नाही. "मला तू असलं काहीतरी करशील याची कल्पना होती म्हणून मी तुला त्याचं नाव सांगितलं नव्हतं"
"रमा, प्लीज..मी काहीही जगावेगळं केलेलं नाही.."
"हो..हेसुद्धा मला आदित्यने सांगितलं"
"म्हणजे?"
"म्हणजे..तोसुद्धा तेच करतोय सध्या...त्याच्या आयुष्यात असणाऱ्या मुलीने कुणाशीतरी लग्न करायचं ठरवलंय..सो तो हेच करतोय..." श्रीला काय प्रतिक्रिया द्यायची तेच कळेना.   
"म्हणजे...त्याचं लग्न मोडलंय?"
"श्री, लग्न वगैरेचा विचारसुद्धा त्याने केला नव्हता..प्रचंड कन्फ्युस, अन्प्लांड आहे तो...सध्या फसवलं गेल्याच्या फिलींगने निराश आहे"
"मला त्या मुलीची चूक वाटत नाही...तो तुझ्याबरोबर राहत असल्याचं तिला कळल्यावर तिने काय करावं?"
"त्याने तिला काहीच सांगितलं नव्हतं...तिने त्याला सोडण्याचा त्याने माझ्याबरोबर घर रेंट करण्याशी काही संबंध नाही"
"आणि हे सगळं त्याने तुला सांगितलं?"
"तुला काय म्हणायचंय?"
"तुला कळतंय की मला काय म्हणायचं आहे..रमा, त्याने तिला तुझ्याबरोबर तो राहत असल्याचं सांगितलं असणारे आणि म्हणून तिने निराश होऊन कुठल्यातरी लग्नाला होकार दिला असणारे...आणि ही गोष्ट परचुरे तुला फिरवून सांगतोय.."
"तू काहीही बरळतो आहेस श्री..तो जर का तुला समजून घेऊ शकतो तर तू त्याला समजून घेऊ शकत नाहीस? आणि समजून घेणं लांब राहिलं तू त्याच्यावर आरोप करतो आहेस?"
"रमा,तुला त्याच्या निराशेची पडलीय..माझ्या निराशेची नाही याचं मला वाईट वाटतंय..."
"मी तुला फसवलं नाहीये श्री...इनफॅक्ट तुला मी सगळं खरं सांगितलं म्हणून आपण ही इन फर्स्ट प्लेस ही चर्चा करतोय...रिमेम्बर?"
"त्याबद्दल आभारी आहे मी तुझा पण हेही सांगतो की तुला गिल्टी वाटलं म्हणून तू मला खरं सांगितलस" रमा गप्प झाली. 
"काय..आता का गप्प झालीस?"
"विचार करत होते...गिल्टीनेस डिफाईन करणं सब्जेक्टीव्ह असतं असं मला तूच मागे एकदा म्हणाला होतास.."
"शब्दात अडकवू नकोस रमा"
"अडकवत नाहीये श्री..माझी चूक मी कबुल केलीय..पण मला ती गोष्ट पुन्हा पुन्हा बोलून दाखवायला लावून माझ्या आयुष्यात तुला असणारं महत्व वदवून घेऊ नकोस"  
"ठीके...आदित्यचं काय?"
"त्याचं काय?"
"तो काय करणारे पुढे? तू बोलली आहेस का त्याच्याशी काही?"
"श्री, मला त्याच्याशी काही बोलणं गरजेचं वाटत नाही...पण तुझा नेमका प्रॉब्लेम काये? म्हणजे आपला विषय झाला आता आदि.."
"तू त्याला आदि हाक मारतेस का?" श्रीने आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत विचारलं.
"हो..आता यातही काही चुकतंय का माझं श्रीधर?" तिने  त्याच्या नावातल्या 'धर'वर जोर देत विचारलं.  
"नाही...ठीके"
"श्री-"
"रमा ठीके...मी काहीच म्हणत नाहीये...म्हणजे तू वागते आहेस ते सगळं बरोबर...मीच काय तो चुकतोय..मी लग्नाची मागणी घातल्यावर गेले ५ वर्ष बरोबर असणारी मुलगी मला 'नंतर बघू' म्हणून अमेरिकेला गेली..दोन महिन्यांनी कळलं की ती तिथे काही राहण्याचे घोळ झाले म्हणून एका मुलाबरोबर राहायला लागली. त्या मुलाचे मी डीटेल्स विचारले तर मी चुकतोय...तू आदित्यला आदि म्हणतेस...तरी मीच  चुकतोय-"
"एक मिनिट...एकच सांग...तू ज्या मुलीची गोष्ट सांगतो आहेस त्या मुलीने तुला गिल्टी वाटून किंवा अजून काही वाटून जर का सगळं खरं सांगितलं आहे तर तिच्यावर विश्वास ठेवावा असं एक क्षणसुद्धा वाटत नाहीये का तुला? उलट तुझे एकामागोमाग एक प्रश्न, आरोप, आर्ग्युमेंटस सुरूच आहेत...तू मला मिडटर्म्स कशा झाल्या? अभ्यास झाला होता का? तु ज्या शिकण्याच्या उत्कंठेने अमेरिकेला गेली होतीस ती पूर्ण होतेय का? हे आजपर्यंत एकदाही विचारलेलं नाहीस..." श्री गप्प झाला. "तुझ्याशी आत्ता लग्न करायला मी ज्या कारणाने नाही म्हणाले ते बेसिक कारण तू विसरून गेलास..तुला माहितीय श्री, त्याची गोष्ट सांगून झाल्यावर त्याने मला आपली सगळी गोष्ट सांगायला लावली. आपण भेटलो तेव्हापासून आत्तापर्यंत सगळ्याची. पुस्तकांमध्ये असते तशी. त्याला गोष्ट सांगताना तुला मी सगळं खरं का सांगितलं असेल, तू इतका महत्वाचा कधी झालास ते माझं मलाच जाणवलं होतं.." 
"सॉरी रमा, चुकलं माझं. मी पुन्हा शांतपणे सगळ्याचा विचार करेन..आता तू मला गिल्टी वाटायला लावू नकोस" श्री खजील होत म्हणाला.
"ठीके..माझी इतकीच इच्छा आहे की सगळं नीट व्हावं..माझ्या निर्णयांना तू आत्तापर्यंत ख़ुशी-नाखुशीत सपोर्ट केला आहेस...तसाच यापुढेही करशील अशी माझी अपेक्षा आहे" 
"हो,नक्की करेन.."

दुसऱ्या दिवशी क्लासला जाताना रमाने आदित्यकडे विषय काढला.
"आदि, मी काल श्रीला बोलले सगळं"
"सगळं?"त्याने चमकून पाहिलं.
"हो..त्याचं समाधान झालंय बहुतेक..पर्यायाने बाबांचंसुद्धा होईल.."
"गुड"
हल्लीच्या दिनक्रमाप्रमाणे रमाने आदित्यला जनरल अपडेट दिली आणि त्यानेही खोदून चौकश्या केल्या नाहीत.दिवसभर दोघे एकत्र असायचे, एकत्र क्लासला जायचे, एकत्र जेवायचे, बाकी सगळ्यांना कायम एकत्र दिसायचे. घरी पोहोचल्यावर एकदा आदित्य त्याच्या खोलीत आणि रमा तिच्या खोलीत गेली की त्यांची विश्वं वेगळी होऊन जायची. खोलीत आडवं पडल्यावर रमाचा, तिच्याबरोबर राहण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार आदित्यने केला नाही असा एकही दिवस गेला नव्हता. दुसरीकडे रमाला पहिल्यापासूनच तिचा एकूण स्वभाव आणि आदित्यबद्दलची तिची मतं, तिचं वागणं यातला विरोधाभास कोड्यात टाकायचा. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तिचं असं पहिल्यांदाच होत असल्याने तिला कारणमीमांसा करता येत नव्हती. 
सेमेस्टर संपायला दीड महिना राहिला होता.


क्रमशः 

8 comments:

RASHMI KULKARNI said...

khup mast lihitos :) pudcya bhagachi vat pahat ahe..

nik said...

very good. waiting for next part.

Aditya Joshi said...

Waiting for next one!

Whats in the name...! said...

Far chan lihile aahes ..Kaal tuza blog mala trace zala aani salag hi story vachun kadhli..Mast..
Keep it up.. Waiting for next parts.

Happy writing.

Atul

Chaitanya Joshi said...

@Rashmi Kulkarni: ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! अशीच भेट देत राहा.

Chaitanya Joshi said...

@Nik: Thanks once again. Have just posted the next part.hope you like it.

Chaitanya Joshi said...

@Aditya: Thanks again to you too.
Keep visiting :)

Chaitanya Joshi said...

@Atul: ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अशा प्रतिक्रियांनी लिहायची उमेद आणि चांगलं लिहायची जबाबदरी दोन्ही वाढतेय :)
अशीच भेट देत राहा :)