Pages

Thursday, January 13, 2011

श्रद्धांजली...

साधारण दहावीत असताना मी माझा आवडता अभिनेता या विषयावर निबंध लिहिला होता. तो लिमये बाईंनी वर्गात वाचून दाखवला होता... आज जे सगळं आठवायचं कारण म्हणजे पंतांच्या निधनाची वाईट बातमी..!तोच निबंध आठवून आठवून लिहितोय..त्यांना माझी हीच आदरांजली...

"माझा आवडता अभिनेता अर्थातच आमीर खान"...सहावीत शाळेत Inspectionला आलेल्या सरांना मी थाटात उत्तर दिलं होत. त्यावेळी त्या प्रश्नातला आणि उत्तरातला गंभीरपणा कळायचं वय नव्हतं. पुढे शाळेच्या नाटकात काम करायची संधी मिळाली, चांगल्या शिक्षकांमुळे नाटक, संगीत, चित्रपट सगळ्याच गोष्टीत काहीसा रस निर्माण झाला. "अभिनय कशाशी खातात??" याची थोडीशी का होईना कल्पना यायला लागली..म्हणूनच आज जर का मला कोणी माझा आवडता अभिनेता कोण विचारलं तर मी क्षणाचाही विलंब न करता नटश्रेष्ट 'प्रभाकर पणशीकर' यांचच नाव घेईन...!

१३-१४ वर्षांचा मुलगा नाटकाच्या वेडापायी घरातून पळून जातो..अभिनय क्षेत्रात धडपड करत असताना आचार्य अत्र्यांचं एक अजरामर नाटक करतो....त्या नाटकाचे हजारो प्रयोग होतात..अत्र्यांची लेखणी आणि कोणत्याही नटाची रंगभूमीवरची पहिलीच पंचरंगी भुमिका..आणि मग अशाच अनेकविध भुमिका स्वतःच्या अनोख्या अभिनय शैलीत करून  पुढची अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो...आणि तरीही हाच नट लोकांच्या लक्षात राहतो "तो मी नव्हेच" म्हणून...कमाल आहे नाही का??

प्रभाकर पणशीकर यांचा रंगभूमीवरचा प्रवास खरंच असाच अद्भुत आहे! इथे ओशाळला मृत्यू मधला राग यावा असा "औरंगजेब", किंवा अश्रूंची झाली फुले मधला प्राध्यापक "विद्यानंद", नंतर भटाला दिली ओसरी, मला काही सांगायचंय अशा अनेकविध नाटकातून प्रभाकर पणशीकर  रसिकांना भेटत राहिले..पण त्यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरली ती अर्थातच तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडेंची भुमिका! त्यांनी स्थापन केलेली "नाट्यसंपदा" आजही नाट्यक्षेत्रात गाजते आहे. अभिनयाची अनोखी शैली, स्पष्ट संवादफेक आणि रुबाबदार व्यक्तिमत्व ही पंतांची अभिनय वैशिष्ट्ये...

काही डझन नाटकं आणि त्यांचे हजारो प्रयोग ही पंतांची आजपर्यंतची भरीव कामगिरी..आता पंत थकलेत पण त्यांची गादी चालवणारा समर्थ लखोबा किंवा औरंगजेब अजूनही रंगभूमीला मिळायचाय..येत्या काळात पंतांकडून नवं काहीतरी पाहायला मिळावं अशी अपेक्षा त्यांच्या इतर सगळ्या चाहत्यांप्रमाणे मी देखील करतो आहे! देवाने त्यांना दीर्घायुष्य द्यावं अशी त्याच्याकडे मी प्रार्थना करतो.

शेवटच वाक्य ८ वर्षापूर्वीच्या निबंधात होत..आत्ता लिहिताना हात थरथरला... सध्या मी घरापासून लांब आहे,रंगभूमीवर नेमकं काय चाललंय याची नीटशी कल्पना नाहीये..त्यामुळे कदाचित "पंत नाहीयेत" हे feeling येतच नाहीये.. मला अजूनही वाटतंय की घरी जावं, "तो मी नव्हेच" ची VCD काढावी आणि पंतांचा अभिनय पाहावा ते गेले नाहीयेत अशी कल्पना करत...!

शतशः वंदन आणि श्रद्धांजली..