Pages

Sunday, August 21, 2011

युगंधर

शिवाजी सावंतांनी लिहिलेलं सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणतं? असं विचारलं तर बरेचसे मराठी वाचक 'मृत्युंजय' असं नाव क्षणात घेतील. पण माझ्या मते त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणजे "युगंधर". भगवान श्रीकृष्णाची जीवनगाथा सांगणारी ही जवळपास १००० पानांची गोष्ट! मी खूप वाचन केलंय वगैरे दावा मला करायचा नाही पण मी वाचलेल्या पुस्तकांपैकी खूप अभ्यास करून लिहिलेली, गुंतवून ठेवणारी, कधी चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा आणणारी तर शेवटी डोळे पाणावायला लावणारी अफाट कादंबरी म्हणून मी नेहमी युगंधराचा उल्लेख करतो. भगवान श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा संपूर्ण वेगळ्या परिमाणांमध्ये आपण वाचतो. पुस्तक खाली ठेवायची इच्छा तर नसतेच पण डोकं, मन कृष्णाने व्यापून टाकलेलं असतं. आजपर्यंत अनेकदा मी हे पुस्तक वाचलं. दरवेळी काहीतरी नवीन शिकलो. आज गोकुळाष्टमी, दहीकाल्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाचे खूप फोटो पाहायला मिळाले आणि मला खूप जास्त भावलेल्या कृष्णाच्या जीवनकालाबद्दल लिहायची इच्छा झाली.
         आपल्यापैकी बरेचजण लहानपणी नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी यांनी साकारलेला श्रीकृष्ण पाहून मोठे झालोय. दुपारच्या वेळी सिरिअल्स पाहणाऱ्या बायकांना "सारथी" मधला राजेश शृंगारपुरे आठवेल. त्यामुळे पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हीच मंडळी होती. पहिली काही पानं वाचल्यावर मनातल्या या प्रतिमा पुसल्या गेल्या होत्या आणि तिथे कधीच न पाहिलेल्या एका अपूर्व व्यक्तिमत्वाचं अनोखं चित्र साकार झालं होतं. मी कालियामर्दन, पुतनावध, कंसवध इथपासून ते अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणाऱ्या सुदर्शनधारी श्रीकृष्णाच्या सगळ्या गोष्टी वाचल्या होत्या. माझ्या डोक्यात कृष्ण म्हणजे एक 'चमत्कार करणारा देव' अशीच कल्पना होती.

         युगंधरातल्या कृष्णाने जन्माला आल्यापासून एकही चमत्कार केला नाही. त्याला नंदाघरी आणल्यावर गर्ग मुनींना बोलवून त्याची पत्रिका मांडली गेली. गोकुळातल्या गोपजनांमध्ये त्याचं थाटामाटात बारसं झालं आणि त्याचं नाव "कृष्ण" ठेवण्यात आलं. पहिल्यांदाच मला कृष्ण शब्दाचा कधीच माहित नसलेला अर्थ कळला- आकर्षून टाकणारा, मोहून टाकणारा! दिसामासी मोठा झाल्यावर बलरामदादा आणि बाकीच्या मित्र-मंडळींबरोबर त्यानेही अनेक गमती-जमती केल्या. अगदी शिंकाळ्यावर हंडीत असणारं लोणी, दही मित्रांबरोबर चोरून खाल्लं. त्याने खोड्या केल्या की आई त्याला ओरडायची, त्याने यमुनेच्या डोहाकडे जाऊ नये म्हणून त्याला वारंवार सांगायची. यमुनेचा डोह कृष्णाला कायम आकर्षित करायचा.आपल्यापैकी कित्येक लोकांना पाणी आवडतं, पोहायला आवडतं. गोष्टीतल्या श्रीकृष्णाला यमुना आवडणं तितक्याच सहजपणे पटून गेलं. यमुनेच्या डोहात एक मोठा साप का नाग राहतो म्हणून गोकुळातले लोक तिथे जायला घाबरायचे.  पण या कृष्णाने डोहात उडी मारून 'कालियामर्दन' वगैरे केलं नाही. नदीच्या बाजूला एक कुरण होतं म्हणे. थंडीत एका दिवशी त्या कुरणातल्या गवतात तो साप दिवसा उन खायला येऊन पडला होता. कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी ते कुरण पेटवून दिलं आणि तो साप जळून मेला. लहानपणी एखाद्या चावऱ्या, बेवारशी कुत्र्याला फटाके वाजवून, काठ्या दाखवून, पळवून लावलं होतंत का कधी? कृष्ण तितक्याच गमतीत त्या सापाचा निकाल लावतो. गावाजवळच्या एका मोठ्ठ्या झाडाचे "भांडीरवृक्षा"चे संदर्भ गोष्टीत अधेमध्ये येतात. त्या झाडाचं महत्व गोकुळात खूप पाउस पडल्यावर अधोरेखित होतं. गोकुळात एकदा खूप पाऊस पडतो, यमुनेला पूर येतो. आपल्याकडे २६ जुलै झालं होतं अगदी तसंच! आणि मग सगळे गावकरी त्या भांडीरवृक्षाच्या आश्रयाला जाऊन राहतात. इतकं मोठं झाड हे निव्वळ साहित्यिक लिबर्टी असली तरी गोवर्धन उचलून चमत्कार करणाऱ्या कृष्णापेक्षा ही लिबर्टी दाद घेऊन जाते.  कृष्णाला गोपदीक्षा दिली जाते तो प्रसंग, त्याचं गाई-गुरांना घेऊन जाणं, बासरी शिकणं, वाजवणं हे सगळं एका छान लाडात वाढत असलेल्या आपल्यासारख्या मुलासारखं वाटत. त्याला काका-काकू, आजी-आजोबा, दादा अशी सगळी माणसं आहेत! आणि या सगळ्यात राधासुद्धा आहे. पण कृष्ण कधीच लंपटपणा करत कुणाचे कपडे पळवत नाही की राधेबरोबर डोळ्यात डोळे घालून बसत नाही! कृष्ण आणि राधा वृन्दावनात रास खेळतात पण त्यात कुठेही त्याच्या "रासलीला" वगैरे लिहिलेल्या नाहीत. राधा इतर अनेक गोप-स्त्रियांसारखी एक बाई आहे. कृष्ण आणि ती एकमेकांच्या समोर असणारे काही खूप मोजके प्रसंग आहेत. राधेच्या नवऱ्याला कृष्णापासून "इनसिक्यूरीटी" वाटत असल्याचा उल्लेखसुद्धा गमतीत येतो. पण या कशालाच अवाजवी महत्व नाही. कृष्ण आणि त्याचे मित्र एक शिवलिंग बनवून त्याची नित्य-नेमाने पूजा करतात. तुम्हालासुद्धा लहानपणी केलेला मातीचा किल्ला, शिवपिंड, कॉलनीत कुठेतरी बांधलेलं देऊळ आठवतंच! त्याचे पोशाख, त्याला आवडणारा दही-भात, त्याच्या गाई, त्याची बासरी आपल्याला गुंगवून टाकतं.
        कृष्ण मोठा झाल्यावर त्याला मथुरेला यायचं बोलावणं येतं. तेव्हा तो गोकुळातून निघताना सगळ्या घरच्या लोकांचं दुःख, त्याला न जाण्याबद्दल सांगणं वाचून डोळ्याच्या कडा पाणावतात. मथुरेत त्याच्या स्वागताला उद्धव हजर असतो. तोच उद्धव जो पुढे अखंड आयुष्य त्याचा "भावविश्वस्त" बनतो. मथुरेत आल्यावर त्याचं झालेलं स्वागत, त्याला सामोरं जायला लागलेल्या मुष्टियुद्धाचा प्रसंग सुरेख रंगतात. कृष्ण आणि बलराम यांचं मुष्टियुद्ध जिंकणं अजिबात खटकत नाही कारण 'केलीनंद' काकाने घोटवून गेलेले कसरतीचे, व्यायामाचे, कुस्तीचे धडे आपण आधीच वाचलेले असतात. मग एक जाणीवेचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसा कृष्णाच्या आयुष्यात येतो आणि तो कंसाला सिंहासनावरून खेचून त्याचा 'वध' करतो. नंतर आई-बाबांना सोडवणं, आजोबांना पुन्हा सिंहासनावर बसवणं वाचलं की लहानपणी आई-वडिलांच्या छळ केलेल्या व्हीलनचा बदल घेण्याची गोष्टी हिंदी सिनेमात कशा रूढ झाल्या असतील याचं उत्तर मिळतं. कृष्ण सांदिपनी ऋषींच्या आश्रमात जातो, वर्गात बसून इतर मुलांसारखा शिकतो.वर्ग सुरु असताना इतर सगळ्यांसारखा शंका, प्रश्न विचारतो. त्याला मित्र आहेत त्यात एक गरीब सुदामा आहे, मोठा भाऊ बरोबर शिकतोय. सगळा अभ्यासक्रम तो इतरांबरोबर पूर्ण करतो. एक दिवस घरी जायची वेळ येते, तेव्हा तोसुद्धा भाव-विवश होतो. सकाळी-सकाळी पोहताना खुडून आणलेली कमळं तो गुरूंना देतो. मित्रांना निरोप देऊन घरी येतो. हा संपूर्ण कालखंड श्रीकृष्ण या व्यक्तिरेखेच्या तोंडून वाचायला खूप मस्त वाटलं. एका आदर्श मित्रासारखा कृष्ण मनात उभा राहिला जो आजतागायत तसाच आहे! 
      पुढे खूप मोठी गोष्ट आहे. कृष्णाच्या अंत्यसंस्कारापर्यंतची! त्याबद्दल लिहायचं तर एक वेगळं पुस्तक लिहावं लागेल. असो! पाहिली-दुसरीत असताना 'छान छान' गोष्टींमधून चमत्कार करणारा श्रीकृष्ण भेटला तरी हरकत नाही पण युगंधरमधला श्रीकृष्ण मोठं झाल्यावर वाचायलाच हवा. मूल्यशिक्षण, व्यक्तीमत्व विकास, कर्मयोग, राजकारण या सगळ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायला युगंधरासारखं समर्पक पुस्तक दुसरं कुठलं नाही असं मला वाटतं! जमलं तर नक्की वाचा. मला खात्री आहे की स्वतः शिवाजी सावंतांना लिहिताना जसे त्याच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पदर उमगत गेले तसे तुम्हालासुद्धा नक्की सापडतील.
||इति श्रीकृष्णार्पणमस्तु||


चैतन्य