**
गेल्या महिन्यात आमच्या युनिवर्सिटीतल्या १०-१५ जणांना घेऊन आम्ही
सहलीला गेलो होतो. साधारण तास-दीड तासाचा प्रवास! संध्याकाळी परत येताना
साहजिकच 'अंताक्षरी'चा कार्यक्रम झालाच. किती वर्ष लोटली असतील अंताक्षरी
खेळून…पण भसाड्या आवाजात गाणारे (??) आम्ही सगळेच ९०च्या दशकात मोठे झालेलो
आहोत आणि मेंटली आम्ही अजूनही ९०च्याच दशकात अडकलोय (निदान अंताक्षरी
खेळण्याच्या बाबतीत तरी) हे आमचं आम्हालाच जाणवलं-- 'मैने प्यार तुम्ही से
किया है', 'रात के बारा बाजे दिन निकलता है' अशी एकूणच दुय्यम आणि कालबाह्य
गाणीच आम्हाला आठवत होती. ९०च्या गाण्यांचा कोटा संपल्यावर सगळे ढेपाळले.
मग काही चांगली गाणी म्हणून झालीच नाहीत असा विचार करून आम्ही राजेश
खन्नाची गाणी म्हणायला लागलो.
अचानक एक जण म्हणाला--"जरा छान गाणी म्हणूया की…"
"अजून छान गाणी?म्हणजे कुठली बाबा?" मी विचारलं. 'कहीं दूर जब दिन ढल जाये' नुकतंच म्हणून झालं होतं. अचानक एक जण म्हणाला--"जरा छान गाणी म्हणूया की…"
"भाई,
एक 'यो यो' हो जाये" त्याचं उत्तर! मग मी बंद पडलो…डोकं बधीर झालं होतं!!
बाकी सगळ्यांनी त्याला हो म्हणून 'बिभत्स' रसातलं कुठलंसं गाणं म्हणून
होईपर्यंत मी बंदच होतो. त्याच्या त्या एका वाक्याचा गेले महिनाभर विचार
करूनही 'क्लोजर' मिळू शकलेलं नाही म्हणून मी शेवटी ते इथे वैश्विक
चव्हाट्यावर मांडायचं ठरवलं---
'भाई, एक यो यो हो
जाये?'….आय मीन सिरीयसली? तर--यो यो म्हणजे 'हनी सिंग अर्थात यो यो हणी
सिंग' नावाचा स्वतःला गायक-संगीतकार म्हणवणारा एक इसम! हनी सिंग काय
मोहम्मद रफी किंवा किशोर कुमार वगैरे आहे का की त्याच्या गाण्याची
'फर्माईश' व्हावी? जगातले सगळे गायक, संगीतकार संपलेत का? गेला बाजार तो
'एक अन्नू मलिक किंवा बाबा सेहगल हो जाये' असं म्हणाला असता तरी चाललं असतं
असं मला वाटायला लागलं. मग मला अन्नू मलिक 'बरा' पर्याय वाटावा हे जाणवून
स्वतःचाच राग आला! मग पुन्हा शांतपणे विचार केला-- मला हनी सिंगची गाणी का
आवडू नयेत? का? का? ज्या अमेझिंग माणसाच्या तुफान गाण्यांनी लाखो लोकांना
वेड लावलंय त्या तानसेनाच्या आधुनिक अवताराचं संगीत मला का आवडू नये? ज्या
काही गोष्टी सुचल्या त्या शक्य तितक्या सुटसुटीतपणे मांडायचा प्रयत्न
करतोय!
१. गाणं किंवा एकूणच संगीतावर अधिकाराने टिप्पणी
करायला मी तानसेन तर नाहीच पण चांगला 'कान'सेन तरी आहे का माहित नाही---पण
मला हणी सिंगची कुठलीही गाणी आवडत नाहीत. माझ्यामते एखादं गाणं आवडण्याची
मुख्य कारणं असतात गाण्याची चाल आणि त्याचे शब्द!! 'चार बोतल वोडका काम
मेरा रोज का' किंवा 'लुंगी डान्स' वगैरे शब्दात आवडण्यासारखं काय असू शकतं
हे मला अजूनही कळलेलं नाही! राहता राहिला गाण्यांच्या चालींचा प्रश्न-- तर
सार्वजनिक गणपतीला जमलेले शेकडो लोक जास्त सुरात, चालीत आरत्या म्हणतात हे
माझं मत आहे. मॉरल ऑफ द स्टोरी- यो यो हणी सिंगच्या गाण्यांशी मी इमोशनली
कनेक्ट होऊच शकत नाही!
२. मला असं जाणवलं की त्या १०-१५
लोकांच्या घोळक्यात हनी सिंगची गाणी न आवडणारा किंवा त्याचं हिंग्लिश गाणं
माहित नसणारा मी एकटाच होतो. मला हनी सिंगची बिभत्स रसातली गाणी आवडत नाहीत
म्हणजे मी कालबाह्य झालोय का असा प्रश्न मला पडला. उडत्या चालीची, फार
मतितार्थ नसलेली किंवा यमक जुळवण्यासाठी वाटेल ते शब्द वापरलेली कुठलीच
गाणी मला आवडत नाहीत का? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे! 'मुन्नी
बदनाम हुई', 'अनारकली डिस्को चली', 'बिडी जलाइले', 'प्यार की पुंगी' अशी
कित्येक गाणी मी ऐकतो. काही आवडीने तर काही निव्वळ सवयीने! मग मला हनी
सिंगच का आवडू नये? त्याच्या गाण्याच्या चाली आरती म्हणण्यापेक्षा सोप्प्या
आहेत, मतितार्थाचं म्हणायचं तर 'छोटे ड्रेस में बॉम्ब लगदी मेनू'
यासारख्या गाण्यात खोल दडलेला अर्थ वगैरे शोधण्याची गरजही नाहीये पण तरी
मला ती गाणी आवडत नाहीत!
३.
लहानपणापासून घरातले संस्कार होते म्हणा, पुढे मित्रसुद्धा तसेच भेटले
म्हणून असेल पण माझा 'ऐकीव' गाण्यांच्या आवाका बऱ्यापैकी होता म्हणायला
हरकत नाही. म्हणजे फार नाही पण मराठीत पंडित अभिषेकी बुवा ते स्वप्नील
बांदोडकर, हृदयनाथ मंगेशकर ते अवधूत गुप्ते, हिंदीत किशोर कुमार ते अलीकडे
शफकत अमानत अली, किंवा एस.डी. बर्मन ते अमित त्रिवेदी अशा अशा सगळ्या
सगळ्या लोकांची गाणी ऐकत मी मोठा झालो, अजूनही ऐकतो. कळायला लागल्यावर
आपल्याला गाणं किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकत आलं नाही याची खंतसुद्धा
वाटली कधी कधी. प्रभाकर जोगांची व्हायोलीन ऐकताना मिळणारं समाधान किंवा
फ्युझोनचं शफकत अमानत अलीने गायलेलं 'मोरा सैय्या' ऐकताना जाणवणारा आर्त
स्वर म्हणजे संगीत, गाणं अशी माझी साधारण कल्पना होती, आहे! पण हनी सिंगचं
गाणं ऐकताना मला समाधानसुद्धा मिळत नाही आणि कुठलीही चांगली भावना जाणवत
नाही.…दुर्दैवाने त्यातला नकारात्मक स्वर किंवा हपापलेला भाव म्हणजे संगीत
अशी मी स्वतःची समजूत करून घेऊच शकत नाही! सॉरी पण मला हनी सिंगची गाणी
आवडत नाहीत.
४. पंडित भीमसेन जोशींना भारतरत्न मिळालं, रेहमानला ऑस्कर मिळालं--इतरही अनेकांना कित्येक राष्ट्रीय किंवा आंतर-राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.…पण 'मी यातला अमुक पुरस्कार मिळवणारच आहे' हे आजपर्यंत कुणीच जाहीर मुलाखतीत छातीठोकपणे सांगितलेलं मला माहीत नाही! याउलट 'यो यो मधाळ सिंग'ने मात्र 'मी ग्रॅमी अवोर्ड मिळवणार आहे' हे जाहीरपणे सांगितलं आहे! 'पार्टी ऑल नाईट', 'चार बोतल वोडका' आणि 'अल्कोहोलिक' अशी गाणी लिहून ग्रॅमी मिळवण्याची वल्गना करणाऱ्या या महापुरुषाबद्दल मला अत्यादर वाटायला हवा, त्याची गाणी आवडायला हवीत पण मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!
५. मी हनी
सिंगला पर्सनली ओळखत नाही. त्याच्याबद्दल माझा काही पूर्वग्रहसुद्धा नाही!
मागे दिल्ली दुर्घटनेच्या वेळी कुणातरी लोकांना अचानक साक्षात्कार झाला की
हनी सिंगच्या 'मै बलात्कारी' अशा काहीतरी गाण्याने हिंसक प्रवृत्ती बळावते
म्हणून त्याला अटक व्हावी. तेव्हा त्या लोकांची खिल्ली उडवून मी हनी
सिंगच्या बाजूने माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलंसुद्धा होतं. वैयक्तिक आयुष्यात
तो माणूस म्हणून कसा आहे याची मला अजिबात कल्पना नाही. एकूणच त्याच्या
गाण्यांचा मी व्यक्तीसापेक्ष विचार केलेला नाही! पण कितीही प्रयत्न करून
मला हनी सिंगची गाणी आवडत नाहीत!
६. हनी सिंगने खरंतर सध्याच्या पिढीतल्या पालकांचं काम सोप्पं केलं आहे. त्यांच्या मुलांना अगदी लहान वयातच
विविध प्रकारची मद्यं, मद्यपानाशी संबंधित गैरसमज, पार्ट्या, मुलींचे कपडे
अशा कित्येक कित्येक गोष्टींबद्दल कोणतीही माहिती त्यांना पुरवावी लागणार
नाहीये….अ-पंजाबी (अ-मराठी सारखं) मुलांना त्यांची मातृभाषा सोडून पंजाबी
भाषा, मोडकी-तोडकी इंग्लिश, हिंग्लिश अशा तीन भाषा शिकायला मिळणार आहेत. त्यांची मुलं उद्या जगात 'कुह्हल' (KEWL) म्हणवली जाणार आहेत. त्याच्या गाण्यांचे समाजावर एवढे उपकार असूनही मला त्याची गाणी आवडत नाहीत.
या सगळ्या गोष्टींमध्ये वरकरणी निव्वळ खवचटपणा दिसत असला तरी त्यातली माझी कळकळ खरंच प्रामाणिक आहे!! अजून किती कारणं देऊ? किती गोष्टींचा विचार करू? हनी सिंगची गाणी न आवडायला जर का एवढ्या गोष्टी पुरेश्या असल्या तर मग मला पडलेले पुढचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.
१. संगीत, गायन या जगातल्या सर्वोत्तम कला आहेत. त्यात कलाकाराला मुक्तपणे व्यक्त व्हायला अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे. पण मग नकारात्मक स्वराची किंवा हपापलेला भाव असलेली गाणी लिहिणाऱ्या कलाकाराचं कौतुक होणं बरोबर का चुकीचं? ज्या अर्थी हजारो लोकांना ही गाणी आवडतायत त्या अर्थी ती बनवणारा हनी सिंग १००% चुकीचा असूच शकत नाही. मग माणूस म्हणून, समाज म्हणून, रसिक म्हणून लोकांचा प्रवाह ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने सगळ्यांनी जाणं बरोबर आहे का? ती दिशा चुकीची असली तरी??
२. माझ्या पिढीने निदान कळत-नकळत का
होईना पण 'चाहुंगा मै तुझे सांज सवेरे' किंवा 'एक धागा सुखाचा' वगैरे गाणी
ऐकली. सांगीतिक संस्कार, सांस्कृतिक जडणघडण अशा गोष्टी व्यक्तिमत्व
विकासाला किती आवश्यक असतात हे मी अधिकाराने सांगू शकत नाही पण लहानपणी
'पार्टी ऑल नाईट' ऐकून येत्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार
करायची गरज आहे. नुसतं वाईट वाटून उपयोग नाही कारण खरंतर आपलीच जबाबदारी
वाढतेय. विचार करा--काही वर्षांनी एखादा मुलगा आपल्या आजोबांना विचारेल--"
ग्रॅन्डपा, व्हू इस थिस पंचम गाय? हिज म्युसिक साउन्डस सो आउटडेटेड…वॉझ ही
फेमस ऑर समथिंग विथ दॅट काइन्डा म्युसिक?". या संवादातला भयाणपणा जाणवतोय?
सो इथे एकदा नमूद करू इच्छितो की हा ब्लॉग निव्वळ एक हनी सिंगच्या गाण्यांवर टीका करायची या हेतूने लिहिलेलाच नाही! त्यामुळे त्याच्या कोणत्याही पंख्यांनी जर का धीर करून हा ब्लॉग इथपर्यंत वाचला असेल तर अजून त्रागा करून घेऊ नये! हनी सिंगच्या गाण्यांमध्ये ज्यांना गेय, अर्थ, संगीत दिसतं त्यांनी ते जरूर ऐकावं. माझ्या बाबतीत दुर्दैवाने "एक यो यो हो जाये" हे एक वाक्य ट्रिगर ठरलं आणि मला एवढा मोठा उहापोह करावासा वाटला. हे लिखाण निव्वळ वैतागातून आलं असल्याने ते एकांगी, बायस्ड वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं असल्यास तसं वाटणाऱ्या मंडळींनी दुसरी बाजू जरूर मांडावी…मी अतिशय फ़्लेक्सिबलपणे विचार करायला, ओपन एन्ड चर्चा करायला तयार आहे!
वाचणाऱ्या सर्व लोकांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! येणाऱ्या वर्षात सर्वावर हनी सिंगची किंवा त्याच्या गाण्यांशी चाल-भाव-शब्द अशा सगळ्या बाबतीत साधर्म्य असणारी कमीत कमी गाणी ऐकायला मिळोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना!!