Pages

Friday, December 25, 2015

लागी करेजवा कटार!

मी अकरावी-बारावीत असताना कधीतरी 'झी मराठी' ही तशी नवखीच असणारी वाहिनी एक अप्रतिम प्रयोग करायची- त्याचं नाव 'नक्षत्रांचे देणे'. आरती प्रभू, पुल, विंदा करंदीकर, श्रीनिवास खळे, पं. जितेंद्र अभिषेकी अशा कित्येक थोर थोर लोकांच्या समग्र कारकीर्दीची काही तासाची सफर! 'नक्षत्रांचे देणे'मुळे आमच्या पिढीच्या कित्येकांची नाट्यसंगीताशी, शास्त्रीय संगीताशी नव्याने ओळख झाली. मग जाणवलं- शास्त्रीय संगीत लहान असताना वाटायचं तेवढं काही बोरिंग नाहीये! पुढे काही वर्ष मराठी सारेगमप बघताना जुनी मराठी गाणी, नाट्यपदं पुन्हा पुन्हा ऐकायला मिळायला लागली आणि मग त्यात मजा यायला लागली! मग एखादा राहुल सक्सेनासारखा सुरेख आवाज असणारा अमराठी माणूस जेव्हा 'दाटून कंठ येतो' किंवा 'सुरत पिया की' गायचा तेव्हा आजी म्हणायची- "अरे वसंतरावांची सर कशी येईल त्याला?" मग घरातल्या मोठ्या पिढीकडून संगीत नाटकं, त्याचे तासनतास चालणारे प्रयोग, मंत्रमुग्ध करणारी गाणी वगैरे सगळं ऐकायला मिळायचं! तेव्हा कधीतरी प्रश्न पडला होता- की आपल्याला यातलं काही कधीच बघायला मिळणार नाही का? आणि मिळालं तर ते त्या तोडीचं, ताकदीचं असेल का? आज चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'च्या निमित्ताने त्या प्रश्नाला उत्तर मिळालंय! आणि उत्तर साधसुधं नाही- चांगलंच दमदार आहे!

वसंतराव नाही पण 'क्लोसेस्ट पॉसिबल'* चंद्रकांत लिमयेंच्या खांसाहेबांच्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकाचा व्हिडीओ 'प्रिझम' कंपनीमुळे 'युट्युबवर' मोफत उपलब्ध आहे! त्यातली गाणी ऐकायला नाटक मागे कधीतरी पाहिलं होतं. संगीताच्या बाबतीत तर कधी वाद नव्हताच पण तेव्हा नाटकाच्या कथेत काही मी विशेष रस घेतला नव्हता. नाटकातल्या सदाशिव या पात्राच्या शब्दबंबाळ लाडिकपणामुळे नाटकाची गोष्ट भिडली वगैरे नाहीच कधी! सिनेमा कट्यार आला-- डल्लास-फोर्टवर्थच्या महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने अमेरिकेत पहायलाही मिळाला! गाणी त्याआधी महिनाभर 'युट्युब' कृपेने घरात वाजत होतीच! सिनेमा बघून झाल्यावर पुन्हा एकदा घरी येउन नाटक पाहिलं-- यावेळी निव्वळ कथेसाठी! मग कळत-नकळत मनात दोन्हीची तुलना झाली- नाटक त्याच्याजागी कितीही श्रेष्ठ असलं तरी सिनेमा जास्त का आवडला, किंवा नाटकात काय जास्त चांगलं होतं  हे लक्षात आलं. सो डोक्यातलं सगळं काढून वैश्विक पटलावर मांडायला हा खटाटोप!

सर्वप्रथम मराठी चित्रपटाचा एवढा भव्य-दिव्य अवतार बघून कौतुक वाटलं- छायाचित्रण, पेहराव, ब्रिटीशपूर्व भारताचं चित्रण (इन्क्लुडिंग शाही दरबारातला इंग्रज अधिकारी), पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा** सर्वच काही अप्रतिम! पात्रं आणि लोकेशन्सच नव्हे तर नाटकात कुठल्याही बाजूने पाहिली तरी 'शाही' न वाटणारी कट्यार सिनेमात मात्र सुरेख सादर केलीय- तिला शाही म्हणावसं वाटतं! नाटकाच्या कथेत खांसाहेब सर्वेसर्वा आहेत तर चित्रपटात पंडितजींनाही जवळपास बरोबरीचा रोल मिळालाय. मगाशी लिहिलं तसं- नाटकातला सदाशिव त्याच्या निरागसपणामुळे डोक्यात जातो- तर सिनेमातला काहीसा आक्रमक सदाशिव 'हिरो' म्हणून आवडून जातो! नाटकाची संपूर्ण कथा जरी दोन घराण्यांच्या द्वंदाबद्दल असली तरी त्यात संगीत 'जुगलबंदी' प्रकार फारसा वापरलेला नाही-- त्यामुळे दोन्ही गायकीतला फरक ठळकपणे अधोरेखित व्हायला माझ्यासारख्या शास्त्रीय संगीतात निरक्षर असणाऱ्या माणसाला जड जातं- उलट चित्रपटात दोन प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष जुगलबंदी झकास झालीय. संगीत शैलीतला फरक, कव्वालीतल्या शब्दांमुळे सहज स्पष्ट होणारा दोन्ही व्यक्ती-प्रवृत्तीमधला फरक हे छानच अधोरेखित झालंय! 'आफताब हुसेन बरेलीवाले' नाटकात छान मराठी मराठी बोलतात- 'या भवनातील गीत पुराणे', 'तेजोनिधी लोहगोल' वगैरे अस्खलित मराठी गाणी गातात हेच न पटण्याजोगं आहे! याउलट सिनेमात खांसाहेब एकही वाक्य मराठीत बोलत नाहीत, 'घेई छंद'चा अपवाद सोडल्यास मराठी गाणंही गात नाहीत-- हे रेट्रोस्पेक्टीव्ह तुलना करताना जास्त आवडून जातं. मोजक्या ठिकाणी खांसाहेबांचा अपवाद सोडला तर नाटकातली सगळीच पात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एककल्ली-एकमितीय वाटतात- सिनेमात मात्र पंडितजी, सदाशिव आणि खांसाहेबांचे भावनिक चढ-उतार कमी-अधिक प्रमाणात ठळकपणे येतात. शाही मैफिली असोत किंवा पंडितजींच्या गाणं न म्हणता निघून जाण्यातलं गूढ असो- यांनी सिनेमा मनोरंजक करण्यात, त्यातल्या नाट्यमयतेत भरच पडलीय! दरबारातल्या इंग्रजाचा, आपल्याकडे कुप्रसिद्ध ब्रिटीश नीतीचा झकास वापर सिनेमात झालाय- त्यासाठी पटकथाकारांचं विशेष अभिनंदन. सिनेमाची कथा पाहता त्यात खांसाहेबांच्या बेगमचं पात्र आवश्यक होतं- आणि त्या पात्राला स्क्रीनटाईम मिळाल्यामुळे निदान आपल्याला त्याचा 'पॉइन्ट ऑफ व्यू' कळतो (चुकीचा वाटला तरीही). सदाशिवाने खांसाहेबांकडे 'गडी' म्हणून काम करत गाणं 'शिकणं' हा धागा जरी सिनेमा आणि नाटकात सारखा असला तरी कथेला त्या वळणापर्यंत आणणाऱ्या घटना वेगळ्या आहेत आणि पुन्हा एकदा चित्रपटातलं स्पष्टीकरण- कथेच्या आणि पात्रांच्या दृष्टीकोनातून योग्य वाटतं- उलट नाटकातला सदाशिवाला गळ्याच्या वर कुठला अवयव आहे की नाही असा प्रश्न पडावा असा त्याचा वावर आहे. नाटक आणि सिनेमाच्या शेवटाचा भावार्थ जरी सारखा असला तरी नाटकात ना खांसाहेबांबद्दल सहानभूती वाटते ना सदाशिवबद्दल- उलट सिनेमात कडूगोड शेवट आहेच पण खांसाहेबांना पण माफ करून टाकायची इच्छा होते.

निव्वळ सिनेमातल्या अभिनयाबद्दल बोलायचं तर सगळ्यांची कामं चोख--पण विशेष आणि पहिला उल्लेख सचिन पिळगावकरांचा-- गेल्या ५-६ वर्षात त्यांची आत्मकेंद्री, अहंकारी 'महागुरू' म्हणून जेवढी थट्टा झाली असेल तेवढंच या अहंकारी, आत्मकेंद्री भूमिकेसाठी त्यांचं भरभरून कौतुक करायला हवं- सचिन यांच्या उर्दू अभ्यासाचा एखाद्या भूमिकेसाठी एवढा योग्य वापर याआधी कधीच झाला नसेल- सो कास्टिंग टीमचं विशेष कौतुक! शंकर महादेवन यांचा अभिनय त्या ताकदीचा वगैरे नसला तरी या सिनेमापुरता उत्तम आहे. बाकी सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे यांना अभिनय जमतोच! अमृता खानविलकर मला एरवीही आवडतेच-- सो वेगळं बोलायला नकोच! सुबोध भावेंचं दिग्दर्शकीय पदार्पण जबरदस्त- त्यांना एक पूर्ण लांबीची भूमिका असल्याने असेल किंवा मी चित्रपटाच्या प्रमोशन्सबद्दल खूप वाचलं, पाहिलं आहे म्हणून असेल पण त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'वावर' चित्रपट पाहताना जाणवतो. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट- संगीत!! सगळंच लिहायचं, बोलायचं झालं तर गीतं आणि संगीत यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागेल- पण थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर जुनी गाणी अप्रतिम आणि नवीन गाणी त्यात चपखल बसतात- शंकर-एहसान-लॉयची गाणी पं. जितेंद्र अभिषेकींच्या गाण्यांबरोबर बेमालूम मिसळून एका चित्रपटात किंवा अल्बममध्ये एकसंध वाटू शकतात हे मला काही वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर माझा अजिबात विश्वास बसला नसता-पण 'मन मंदिरा', 'दिल की तपिश', कव्वाली ही गाणी अफाट आहेत! 'या भवनातील गीत पुराणे' ऐवजी त्याच इमोशनचं 'सूरसंगिनी' सुंदरच! शेवटचा उल्लेख शंकर महादेवन, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचा--हे तिघं जर गायला नसते तर 'कट्यार-' आहे त्या उंचीचा सिनेमा झाला नसता. महेश काळेच्या आवाजातलं शेवटचं गाणं, त्याचे शब्द, संगीत यांनी केलेला शेवट जबर! मराठी शास्त्रीय संगीतातलं पहिलं 'RAP' गाणं म्हणून या गाण्याचा यापुढे उल्लेख करायला हरकत नाही!

अर्थात सिनेमात सगळंच भारी होतं असंही नाही! सिनेमातल्या खांसाहेबांना आवाज वसंतरावांचा डायरेक्ट वारसा असणाऱ्या राहुल देशपांडेंचा- पण नाटकाच्या तुलनेत त्यांच्या पात्राला गाणी कमी! राहुल देशपांडेंचा चाहता म्हणून त्यांच्या आवाजात अजून एखाद गाणं आवडलं असतं- अर्थात इथेही लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा 'दिल की तपीश', 'सूरसंगिनी' अशी दोन नवीन गाणी त्यांनी सुपर्ब गायली आहेत तर नाटकातली जवळपास सगळी जुनी गाणी शंकर महादेवन (पंडितजी) गातात! सिनेमात स्त्री पात्रांना व्यवस्थित भूमिका जरी असल्या तरी कुठलीही गाणी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीत- उलट फातिमा नाचताना दिल की तापिश गुणगुणते तेव्हाचं 'लीप सिंक' अजिबात जमलेलं नाही! इतर आलाप आणि ताना असलेल्या सगळ्या गाण्यांना इतकं व्यवस्थित 'लीप सिंक' असल्याचं कौतुक वाटत असतानाच अशी चूक खटकते आणि लक्षात राहते! सदाशिवचं एकूण पात्र जरी इथे जास्त पटणारं असलं तरी त्याची पार्श्वभूमी चित्रपटात फारशी नाही- तो मधली वर्षं कुठे होता वगैरेचा उल्लेख नाही! नाटकातले चांद-उस्मान निदान साथ द्यायला का होईना पण गातात, सिनेमातले चांद-उस्मान खुनशी, बिनडोक वाटतात- ते कधीच गाताना दिसत नाहीत. उमा, सदाशिव, झरिना पात्रांमधला व्यक्त-अव्यक्त प्रेम त्रिकोण थोडा अनावश्यक वाटतो. युट्युबवर वारंवार गाण्याचे व्हिडिओ पाहताना कळलेली आणि मग कायम खटकलेली गोष्ट- हे अगदीच बारीक आहे पण-- 'सूर निरागस हो' मधील गणपतीचं जानवं 'अपसव्य' आहे आणि I have seen it so I can't 'unsee' it!

अजून बरंच काही आठवतंय, लिहावसं वाटतंय पण तूर्तास एवढं पुरे! या चित्रपटाची खूप प्रशंसा, समीक्षा आधीच झालीय आणि पुढेही होत राहील तेव्हा त्यात माझ्या इतक्याच पोस्टची भर पुरे! नाटक, सिनेमा हा रंगभूमीच्या किंवा कॅमेराच्या चौकटीत बसवायचा असतो आणि मग लेखक-दिग्दर्शक म्हणून व्यक्त होण्यावर बंधनं असतात. नाटकाला ही बंधनं सर्वाधिक लागू होतात. एखादी कथा-कल्पना नाटकातून लोकांपुढे मांडताना त्याला असणारी रंगभूमीच्या लांबी-रुंदीची बंधनं, नाटक किती प्रेक्षकांकडे पोहोचू शकतं याची बंधनं, दीर्घकाळ प्रयोग करायला नट-नट्यांच्या उपलब्धतेवर बंधनं, लांबवर खेड्यापाड्यात जाऊन नाटक करायचं तर दळणवळणाच्या साधनांची बंधनं! कपडेपट, नेपथ्य यांची मेंटेनन्स-- एक ना दोन शेकडो प्रश्न! नाटकाचं यशापयश हे या सगळ्या-सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं--कधी नाटकाचे विषय कालबाह्य होतात कधी कलाकार-- आणि मग पुढच्या पिढीला सांगायला फक्त आठवणी असतात! चित्रपट हा त्या मानाने दीर्घायुषी प्रकार आहे- एकदाच काय ते काम करायचं पण ते अशा दर्जाचं हवं की अजून काही दशकांनी तो चित्रपट तेव्हाच्या पिढ्यांना तेवढ्याच ताकदीचा वाटायला हवा! 'कट्यार काळजात घुसली' सारख्या कलाकृतीचा चित्रपट होण्याचा मला सगळ्यात मोठा हाच फायदा वाटतो. ही कलाकृती बनवल्याबद्दल सुबोध भावे, झी मराठी आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
सुबोध भावे, तुम्ही बालगंधर्व, लोकमान्य टिळक मध्ये अभिनयाने आणि कटयारच्या दिग्दर्शनाने स्वतःकडून खूप अपेक्षा वाढवून घेतल्या आहेत! सो पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! 


तळटीपा:
*राहुल देशपांडेंनी साकारलेले (भावेंनीच दिग्दर्शित केलेले) खांसाहेबसुद्धा 'एज क्लोस एज इट गेट्स'-- पण तो प्रयोग पाहण्याचा योग अजून आलेला नाही!
**पुष्कर श्रोत्रींच्या काविराजाच्या केशभुषेवर मात्र कमीत कमीत वेळ आणि पैसा खर्च झालाय असं वाटलं एवढाच एक न-सन्माननीय अपवाद!