Pages

Saturday, December 31, 2011

चहा!!


मला पुरेपूर कल्पना आहे की या पोस्टचं टायटल वाचून अर्धेअधिक लोक ही पोस्ट वाचणार नाहीत!!खरंतर 'एक गरम चाय की प्याली हो' असं शीर्षक द्यायचा विचार केला होता पण अन्नू मलिकची पब्लिसिटी माझ्या ब्लॉगवरून का??असा विचार करून तो मोह टाळला. 'चहा है तुझको चाहत से ज्यादा' असं काहीतरी 'चहा'टळ नाव देण्याचा मोह्सुद्धा मी खूप कष्टाने आवरला. चहा हा दीर्घ निबंध किंवा लहानशी चारोळीदेखील लिहिण्याचा विषय असू शकतो हेच कुणाला पटणार नाही.असो! मी मला आवडणाऱ्या विषयांवर लिहिणारे..त्यामुळे 'चहा'वर हा एक 'अख्खा' ब्लॉग!! (याच लॉजिकने 'झोप' या विषयावर एक ब्लॉग लिहायला लागेल, पण ते नंतर कधीतरी..)
           'कॉफी विथ करन' या नावाचा शो हिट झाल्यावर भविष्यात 'चाय विथ चैतू' असा एक कार्यक्रम सुरु करण्याचा माझा कित्येक वर्षं मनसुबा होता. अमेरिकेत आल्यावर दोन महिन्यात मी तो प्लान रद्द केला. कारण माझा अमेरिकन प्रोफेसर..!!माझ्या नावात जोडाक्षर आहे यात त्याची बिचाऱ्याची तरी काय चूक? त्याला माझं नाव घेता येत नाही म्हणून त्याने मला हाक मारायला 'चाय' असं सोप्पं शोर्ट नेम निवडलं. मी सुद्धा "त्वमेव माता पिता त्वमेव' म्हणत ते मान्य केलं. त्यामुळे अमेरिकन लोकांना मी माझं नाव 'चाय' सांगायला लागलो. काही देसी लोकांनी 'चाय' हे 'चाय'नीज नाव वाटतं असं म्हणून माझी थट्टादेखील करून झाली!!पण नंतर बोलण्यात कधीतरी कळलं की माझ्या प्रोफेसरला 'चाय' म्हणजे चहा आवडतो आणि माझ्यासाठी याहून दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नव्हती!'चाय विथ चैतू' सुरु करण्याचा रद्द केलेला बेत मी पुन्हा ठरवलाय मात्र नाव थोडं बदललं- आता माझ्या शोचं नाव असेल 'चाय विथ चायतन्य' 
           ....तर सुरा-असुरांच्या युद्धानंतर समुद्रमंथनातून जे 'अमृत' नामक पेय निघालं ते 'चहा' असू शकतं इतका मी त्याच्या प्रेमात आहे..(राक्षसांना देवांनी अमृत पिऊ दिलं नव्हतं त्यामुळे चहा 'न' आवडणारी सगळी मंडळी माझ्यामते राक्षसच..). पाणी, दुध, चहा पावडर आणि साखर इतक्या कमी गोष्टींपासून बनणाऱ्या या पेयाबद्दल कसं आणि किती लिहिणार? गम्मत अशी आहे की घरोघरी निव्वळ हेच सगळे जिन्नस वापरून बनणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळी असते. काही ठिकाणी मिट्ट गोड चहा, काही ठिकाणी अगोड चहा, काही ठिकाणी दुधाचा चहा, काही ठिकाणी पांचट चहा, लाल-भडक चहा (असा चहा पिणारी माणसं प्रेमाने त्याला कडक चहा म्हणतात), तर चहाच्या नावाखाली साखर घातलेलं गरम गोड पाणीदेखील मी प्यायलो आहे...चहाचे असेही प्रकार असतात बरं का...साध्या स्वैपाकाचा विषय निघाला की साधीभोळी माणसं लगेच आईच्या हातच्या जेवणाचा उल्लेख करतात!पण चहाचा विषय निघाला की अट्टल चहाबाज नेहमी कुठल्यातरी गाडीवाल्या भैय्याच किंवा एखाद्या इराणी हॉटेलचं नाव घेतात..अर्थात आईच्या हातचा चहा आवडत नाही अशातला भाग नसतो..पण भैयाच्या टपरीवरचा किंवा इराण्याच्या हॉटेलमधला ambiance घरात मिळत नाही हेच खरं! 
            ambiance वरून आठवलं- चहा कधी, कसा, किती, कशाबरोबर प्यायचा याबद्दलसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात..काही लोकांना फक्त सकाळी चहा लागतो आमच्यासारखे मात्र कधीही चहा पितात..(मला एक पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये )  काही लोकांना गरम चहा बशीत ओतून त्यात 'फुर्रर फुर्रर' करून गार करून पिण्यात मजा येते तर काहींना कपमधून स्टाइलमध्ये फुरके मारत प्यायला आवडतं..चहा कशाबरोबर प्यायचा याबद्दलतर टोकाची मतभिन्नता आहे..सिगरेट ते पुस्तक अशी टोकाच्या गोष्टी लोकांना चहा'बरोबर' लागतात..पेपर, ग्लुकोज बिस्किटे या सर्वसाधारण लोकांना आवडणाऱ्या गोष्टी...पुण्यातल्या लोकांना 'अमृततुल्य' नावाचा प्रकार ठाऊक असेल- पुण्यातल्या प्रत्येक गल्ली-कोपऱ्यांवर अशी अमृततुल्य दुकानं आहेत! बहुतेक सगळीच भल्या पहाटे सुरु होतात आणि रात्री बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालू असतात.. दुकानात शिरल्यावर दिसणारा एक लांब-लचक ओटा, त्यावर मांडून ठेवलेली पितळेची लखलखीत भांडी, लेंगा झब्बा घातलेला सदैव चहा बनवत असणारा एक माणूस हे दृश्य जवळपास सगळ्या अमृततुल्यमध्ये दिसतं.या कलंदर लोकांची स्पेशालिटी म्हणजे यांच्याकडे सकाळी पहिल्यांदा बनणाऱ्या आणि संध्याकाळी शेवटच्या बनणाऱ्या चहाची चव तंतोतंत सारखी असते. अलीकडे या दुकानांची संख्या कमी व्हायला लागल्याचं मला खूप पुणेकरांनी सांगितलं- फार वाईट वाटलं! कॉफी कल्चर रुजवणाऱ्या 'कॅफे कॉफी डे', 'बरिस्ता' अशा साखळ्यांचा रागही आला. कुठे ती कडवट 'एक्स्प्रेसो' कॉफी आणि कुठे 'अमृततुल्य' चहा...!!
           मुंबई-पुण्यात चहा कल्चर आलं त्याला अजून एक महत्वाचं कारण म्हणजे 'इराणी' हॉटेल्स! चिकन बिर्याणीसाठी इराणी हॉटेल्स जेवढी प्रसिद्ध नाहीत तेवढी चहासाठी आहेत. आम्ही 'नॉन-वेज' खात नाही असं शिष्टपणे म्हणणारे ब्राह्मण लोकसुद्धा निव्वळ चहासाठी इराणी हॉटेलची पायरी चढतातच!चर्नी रोड इस्टला स्टेशनच्या समोर एक टिपिकल इराणी हॉटेल आहे, नाव आत्ता अजिबात आठवत नाहीये!! साधारण हॉटेलची झकपक तिथे अजिबात नाही(हे विधान मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो त्यावरून करतोय..आताचं माहित नाही) पण तिथे ब्रिटीश साहेबांसारख्या थाटात चहा मिळतो. एका किटलीत काळा चहा, दुध आणि साखर वेगळं, ३-४ लहान-लहान कप बशा वगैरे आणि तेसुद्धा १५-२० रुपयात. लहानपणी बाबांनी निव्वळ अशा थाटात चहा प्यायला कौतुकाने तिथे नेलेलं आठवतंय..पुण्यात राहिलो तेव्हा 'गुडलक'ची फेरी कधीच चुकवली नाही. (स्वतःला पुणेकर म्हणवणारे पण 'गुडलक'मध्ये न गेलेले लोक मी पहिले आहेत आणि मी त्यांना पुणेकर मानतच नाही). गुडलकचा चहा आणि बन-मस्का खाऊन दिवसाची सुरवात करणं काय किंवा दिवसभराची कामं आटपून दुपारी जेवणाची वेळ टळून गेली की गुडलकला जाणं काय, दोन्हीची मजा तेवढीच!(काही वेळी आजूबाजूला असणाऱ्या अग्निहोत्रींचा त्रास होतो खरा..पण चालायचंच!! शब्दार्थ: चहाबरोबर सिगरेट लागणारे लोक म्हणजे अग्निहोत्री..). अजून दोन ठिकाणाचे चहा मला नेहमी आठवतात!! एक अर्थात शिरूरमध्ये चार वर्षं प्यायलेला भाईजानचा चहा आणि दुसरा दादर स्टेशनवर प्यायलेला 'बबन की चॉकलेट चाय'. बँक,लायब्ररी यानंतर मी जर का कुठे खातं उघडलं असेल तर ती जागा होती 'भाईजान कट्टा'..भाईजान म्हणायचा की "तुम्ही रोजच्यारोज चहाचे दोन रुपये देणार यात मला काहीच मिळत नाही. अकौंट(?) उघडा!! महिन्याला एकदम पैसे दिलेत की बरं पडेल"...मला त्याच्या या बोलण्यातलं लॉजिक आजपर्यंत कळलेलं नाही. नंतर पन्नास-शंभर थकले की कटकटसुद्धा करायचा. हां..पण चहा मात्र चोख बनवायचा!सकाळी एकदा-आणि संध्याकाळी एकदा चक्कर व्हायची..लोक चहा प्यायला यायचेच पण भाईजानचा कट्टा आमच्या कॉलेजचं रेडीओ केंद्र होतं. सिनिअर-ज्युनिअर्स-लेक्चरर्स-गा
वातले लोक- सगळ्यांच्या खबरा तिथे बसल्यावर मिळायच्या! परीक्षांच्या दिवसांमध्ये तर तिथे घालवलेला वेळ हा अमूल्य विरंगुळा होता. बबनच्या चहाच्या गोष्टी त्याच्याही आधीच्या- दहावी-बारावीच्या काळातल्या!! अनिसकडे मी, गौरव, अनुप रात्री अभ्यासाला जमायचो..आम्ही अभ्यास केल्याचं मला अजिबात आठवत नाही पण मध्यरात्री उठुन माहीम स्टेशन ते दादर स्टेशन हे अंतर तंगड्या तोडत फक्त चहा प्यायला गेल्याचं नीट आठवतंय!! आता चहा आम्हाला घरी बनवता येणार नव्ह्ता का??पण तेव्हा चहा पिणं हे निव्वळ वेळ घालवायचं उत्तम निमित्त होतं..त्या चहाची स्तुतीसुद्धा काय वर्णावी? प्लास्टिकच्या त्या लहानशा कपात, ट्रेनच्या आवाजात आणि असंख्य फेरीवाल्यांच्या आणि लोकांच्या गर्दीत त्या चहावाल्याला हुडकून 'चॉकलेट'च्या चवीचा चहा पिण्याची गम्मत वेगळीच! मी ती मजा नंतर कित्येकदा अनुभवली. पण ते दहावी-बारावीचे दिवस आठवले की मस्त वाटतं!  
                 माझी एक फॅंटसी आहे.एक मस्त आरामखुर्ची असावी..मऊ, गुबगुबीत...प्रदीप दळवी किंवा शिरवळकरांची एखादी कादंबरी किंवा टीव्हीवर क्रिकेट मॅच असावी...एक मोठ्ठा मग भरून अर्ध दुध-अर्ध पाणी, एक चमचा चहा पूड, दीड चमचा साखर घालून केलेला हलकी उकळी आलेला वाफाळता चहा..जो दुसऱ्या कुणीतरी करून पार हातात आणून दिलेला असावा..असं जर का झालं तर तो सोनियाचा दिनू होईल राव!!
                 शेवटी इतकंच म्हणेन की चहा न पिणारी, कॉफी पिणारी, कुठलीच 'मादक' पेय न पिणारी किंवा निव्वळ अति'मादक'च पेये पिणाऱ्या मंडळींचा मला अपमान करायचा नाही..पण ज्या वातावरणात मी वाढलो, जे समज कळायला लागल्यावर रूढ झाले, जी श्रद्धास्थानं निर्माण झाली त्यातलं 'चहा' हे पेय फार महत्वाचं नाव आहे.आता काळ बदलला असं लोक म्हणतात- हे विधान करायला माझी चाळीशीदेखील उलटली नाहीये..पण का कुणास ठाऊक- 'A lot can happen over a coffee' अशी मनोवृत्ती अजून तरी झाली नाहीये!! आम्ही चहाबाज अजूनही 'चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो' याचं मनोवृत्तीशी ठाम आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाच्या 'घड्याळ', 'बस', 'पाऊस' अशा कित्येक गोष्टींशी काही ना काही आठवणी निगडीत असतात! जरा नीट आठवून बघा- कुठलीतरी आठवण चहाशी नक्की निगडीत असेल याची मला खात्री आहे.. 


तुमचा,
'चाय'तन्य 
(ता.क. : पाऊस, चहा, भजी किंवा प्रवासातला चहा वगैरेसुद्धा खूप किस्से आहेत..ते कदाचित नंतर कधीतरी..तूर्तास इतकं चहा-पुराण पुरे!!)

Friday, December 23, 2011

वा..क्या चोरी हय...


              अमेरिकेत राहायला आल्यापासून 'लाईफस्टाइल' मध्ये वाढलेली एक गोष्ट म्हणजे इंग्लिश मालिका आणि चित्रपट पाहणे! चित्रपट असो किंवा मालिका- या मंडळींनी कथा, संवाद, निर्मितीमूल्य यांचा इतका जास्त विचार केलेला असतो की भारतीय चित्रपट खूपच खुजे वाटायला लागतात. हिंदी-मराठी सास-बहु मालिकांचा इथे उल्लेख करणं म्हणजे मला अमेरिकन कार्यक्रमांचा अपमान वाटतो. असो. बरेच चित्रपट पाहताना सहज जाणवलं की अरेच्या अमुक अमुक हिंदी चित्रपट याच सिनेमावरून ढापला होता की..’ आता हिंदी चित्रपट सृष्टीने संगीत, कथा चोरून चित्रपट बनवणं काही आपल्याला नवीन नाही, पण हा ब्लॉग लिहायचं कारण होतं काही चांगल्या चोऱ्यांबद्दल लिहिणं..हो..असेही काही हिंदी चित्रपट आहेत जे पाहून त्यांच्या उचलेगिरीला दाद द्यायची इच्छा झाली.

             सगळ्यात पहिला उल्लेख करेन तो चेंजिंग लेन्स (Chaging Lanes) आणि टॅक्सी नं. ९२११चा. बेन अफ्लेक आणि सॅम्युअल जॅक्सन यांची एका दिवसाची जुगलबंदी ही Chaging Lanesया चित्रपटाची कथा. आपल्यातल्या बऱ्याच जणांना हा चित्रपट फारसा माहीत नाही. पण सॅम्युअल जॅक्सनची फॅन असणारी काही मंडळी आहेत त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा. हिंदी चित्रपटाची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर दाखवून लेखक-दिग्दर्शक मंडळींनी त्याला करेक्ट 'देसी' टच दिला आहे. सगळ्याच चांगल्या गाण्यांमध्ये विशेष उल्लेख 'शोला है या है बिजुरिया...' या गाण्याचा. अनेक वर्षांनी बप्पीदाच्या आवाजात उडतं गाणं ऐकताना मजा येते. जॉन अब्राहमने साकारलेला बड्या बापाचा बिघडलेला पोरगा आणि नाना पाटेकरचा छक्के-पंजे करणारा टॅक्सीचालक ही पात्रं मुळ चित्रपटापेक्षा खूप वेगळी आहेत आणि ती दोघांनी मस्त साकारली आहेत! दोन्ही प्रमुख पात्रांचा एकाच दिवशी वाढदिवस असणं, नाना पाटेकरला भेटलेला लॉकर ऑफिसमधला मठ्ठ अधिकारी अशा काही निव्वळ फिल्मी गोष्टी वगळता बाकी नावं ठेवण्यासारखं मला काही वाटलं नाही. दोन्ही चित्रपट जरूर पहा! कथावस्तू जरी सारखी असली तरी दोन चांगले सिनेमे पाहिल्याचं समाधान नक्की मिळेल.   

            अजून असाच एक उत्तम इंग्रजी चित्रपट आणि त्याचं चांगलं हिंदी व्हर्जन म्हणजे 'सेव्हेन' आणि 'समय'. शहरात अनाकलनीय खून व्हायला लागतात आणि त्याचा तपास करायला नवीन अधिकारी येतो. एक जुना अधिकारी तेव्हाच निवृत्त होणार असतो. दोघांचे वेगवेगळे स्वभाव, खुनांचा सात प्रकारच्या 'पापां'शी (Seven Deadly Sins) लागणारा संदर्भ आणि सुरु होणारा तपास अशी इंग्रजी चित्रपटाची साधारण कथा. ब्रॅड पीट आणि मॉर्गन फ्रिमन या सशक्त अभिनेत्यांनी दोन मुख्य भूमिका साकारल्या आहेत! चित्रपटाचा भर खुनाच्या तपासापेक्षा जास्त व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंध आणि स्वभावविशेषांवर आहे. उत्तरार्धात केविन स्पेसी सारखा अजून एक तगडा अभिनेता या गोष्टी अधोरेखित करण्यात भरच घालतो. हिंदी चित्रपटात तपास करणाऱ्या दोन पोलिसांऐवजी एकच स्त्री व्यक्तिरेखा दाखवली गेली आहे! सुश्मिता सेन हिने जसं सौदर्य स्पर्धांमध्ये तिच्या समकालीन प्रतिस्पर्धी मंडळींना मागे टाकत बाजी मारली होती तशीच बाजी तिने अभिनयाच्या बाबतीत मारली. भले ऐश्वर्या रायसारखी प्रसिद्धी तिच्या वाट्याला आली नसेल, पण तिने 'समय' सारख्या भूमिकेचं सोनं केलं असं मला वाटतं. सेव्हेन डेडली सिन्स ऐवजी हिंदी चित्रपटात घड्याळ या संकल्पनेचा आधार घेतला गेला. शहरात होणाऱ्या खुनांमध्ये मृतदेहांच्या हातांची स्थिती घड्याळाच्या काट्यांकडे निर्देश करते. पहिल्या हत्येचं तर मर्डर वेपन पण सापडत नसतं. चित्रपटाचा बहुतांश भाग तपासावर भर असणारा आहे. ज्यांनी हा चित्रपट पहिला नाहीये त्यांना शेवट सांगून त्यांचा रसभंग करण्याची माझी इच्छा नाही, परंतु इतकं जरूर सांगेन की इंग्रजी सेव्हेनच्या तोडीस तोड शेवट हिंदी चित्रपटात आहे. सुश्मिताची व्यक्तिरेखा हाच या चित्रपटाचा मुळ गाभा आहे आणि तिने संपूर्ण चित्रपट उत्तम पेलला आहे यात शंका नाही!  
  
              काही हॉलीवूडचे सिनेमे हे माझ्या मते 'वेडझ*पणा' या प्रकारात मोडतात. 'फोनबूथ' हा त्यातलाच एक प्रकार! निव्वळ एका फोनबुथमध्ये दीड-पावणे दोन तासाचा चित्रपट बनवणं सोप्पी गोष्ट नव्हे! एक लुच्चेगिरी करत राहणारा, बायकोला फसवून बाहेर लफडी करणारा एक माणूस. तो एका फोनबुथमध्ये फोन करायला उभा असताना फोन वाजतो आणि समोरच्याने त्याच्यावर बंदुकीचा नेम धरल्याचं समजतं. पुढच्या जवळपास दोन तासाच्या काळात फोन करणारा मनुष्य या माणसाकडून जगापुढे तो करत असणाऱ्या सगळ्या लांड्या-लबाड्यांची कबुली घेतो आणि त्याला प्रामाणिक आयुष्य जगण्याची संधी देतो अशी साधारण गोष्ट. किफर सदरलॅंडचा फोनवरचा खोल, घाबरवणारा आवाज आणि आधी वैतागलेला आणि नंतर प्रचंड घाबरलेला 'स्टु' कॉलीन फेरेल!! सारासार विचार करता हा सिनेमा फक्त वैयक्तिक नितीमुल्य, प्रामाणिकपणा, उद्धार अशा गोष्टी अधोरेखित करतो. याच चित्रपटाचं देसी वर्जन म्हणजे 'नॉक आउट'. फोन करणाऱ्याची भूमिका साकारली होती संजय दत्तने तर फोन उचलणाऱ्या लुच्च्या माणसाच्या भूमिकेत इरफान खान. हा सिनेमा सुरुवातीला जरी नितीमुल्य, प्रामाणिकपणा अशा गोष्टीवर सुरु झाला तरी तो हळूहळू भ्रष्टाचार, नेत्यांचा काळा पैसा असा सामान्य माणसाला फार महत्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नांकडे वळतो आणि 'भारतीय' होतो. मग कंगना राणावत, सुशांत सिंग, गुलशन ग्रोव्हर अशा अनेक व्यक्तिरेखा त्या अनुषंगाने येतात. १६ डिसेंबर, टॅंगो चार्लीसारखे सिनेमे बनवणाऱ्या मणी शंकर या दिग्दर्शकाने त्याच्या लौकिकाला साजेसा चित्रपट केला. फोनबूथ सारख्या चित्रपटाची संकल्पना घेऊन स्वतःच्या तऱ्हेचा सिनेमा बनवणं हे त्याला जमलं म्हणून त्याचं कौतुक. अभिनय म्हणून उल्लेख करायचा तर अर्थात इरफान खानचा. ती व्यक्तिरेखा दुसऱ्या कुणाला शोभणार नाही इतकी सुरेख त्याने पडद्यावर उतरवली आहे. 

                   'अ फ्यु गुड मेन' नावाचा इंग्रजी सिनेमा आणि 'शौर्य' नावाचा हिंदी सिनेमा. दोन्ही चित्रपट सैन्यविषयक असले तरी 'ड्रामा' प्रकारात येतात. सैन्यातील एका अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून/अधिकाऱ्यांकडून होणारी हत्या, मारेकऱ्याला/मारेकऱ्यांना झालेली अटक आणि त्यांच्यावर चालणारा खटला हा या चित्रपटांचा मुळ विषय. दोन्ही चित्रपट सैन्याची शिस्त, नियमांचं पालन, उल्लंघन, निष्ठा अशा मुद्द्यांवर खल करतात. इंग्रजी चित्रपट हिंदी होताना त्यात हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, दहशतवाद असे मुद्दे येतात जे चित्रपटाचं इंग्रजीतून हिंदीत झालेलं रुपांतर सहज स्वीकारायला लावतात. टॉम क्रुझ आणि राहुल बोस हे दोघेही आपापल्या चित्रपटसृष्टीतले 'अंडरयुस्ड' अभिनेते आहेत असं मला वाटतं. त्यांना 'अभिनय' करताना पाहणं हा एक सुखद अनुभव. दोन्ही चित्रपटांना लौकिकार्थाने व्हिलन नाही. हॉलीवूडमध्ये काही फार आदरणीय अभिनेते आहेत. जॅक निकलसन हे त्यातलच एक नाव! त्यांनी '..गुड मेन' मध्ये मोजक्याच परंतु अत्यंत महत्वाच्या प्रसंगांमध्ये केलेली नकारात्मक भूमिका पाहणं हा त्यांच्या अभिनयक्षमतेचा आदर करणाऱ्या लोकांसाठी पर्वणी होती. हिंदीत हीच भूमिका के के मेननने केली. हनिमून ट्रॅवल्स, सरकारसारख्या भूमिकानंतर त्याने साकारलेली शौर्यमधली व्यक्तिरेखा त्याच्याकडच्या अपेक्षा वाढवते. आपलं दुर्दैव हेच आहे राहुल बोस किंवा के के सारख्या अभिनेत्यांच्या अभिनयक्षमता समोर येतील असे चित्रपट आपल्याकडे निघतच नाहीत! शौर्यमधला के के काही लोकांना निकल्सनपेक्षा उजवा वाटला. मला इंग्रजी सिनेमा जास्त आवडण्याची कारणं दोन- राहुल बोस आणि के के हे दोघे साधारण एका वयाचे आणि एका तोडीचे अभिनेते आहेत तर इंग्लिश सिनेमात निकल्सनसमोर टॉम क्रुझला पाहण्यात मला जास्त मजा आली, आणि दुसरं कारण- 'शौर्य' चा शेवट काहीसा वैयक्तिक सुडाकडे झुकणारा आहे जे '...गुड मेन' मध्ये होत नाही.   
                   आजपर्यंत हिंदीत अनेक सिनेमे चोरून बनले, हिंदी निर्माते त्यांना चोरी नव्हे तर प्रेरणा घेणं म्हणतात. या सिनेमांची यादी खूप मोठी आहे आणि त्यांची नुसती यादी करणंसुद्धा या ब्लॉगच्या आवाक्याबाहेरच आहे. थांबता थांबता काही चांगल्या/बऱ्या उचलेगिरीचा उल्लेख- 'स्कारफेस' ते 'अग्निपथ', 'गॉड्फादर' ते 'सरकार', 'हीच' ते 'पार्टनर' वगैरे. राहवत नाहीये म्हणून काही अत्यंत बंडल चोऱ्यांची नोंद करतोय- 'ब्रूस ऑलमाइटी' ते 'गॉड् तुस्सी ग्रेट हो', 'रेनमन' ते 'युवराज', 'एन अफेअर तो रिमेम्बर' ते 'मन' वगैरे वगैरे..अलीकडेच 'पर्स्यूट ऑफ हॅप्पिनेस'चं अत्यंत टाकाऊ असं 'अंकगणित आनंदाचं' नावाचं मराठीकरण बघितलं आणि कीव आली. सांगायचं इतकंच आहे की चोरी करायचीच आहे तर ती अभिमान वाटावा अशी तरी करा..शेवटी पिकासो म्हणूनच गेलाय- “Good artists copy; great artists steal”

चैतन्य 


Saturday, November 12, 2011

तारखा!

तारखा! लोकांना अलीकडे कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटायला लागलं आहे! ११-११-११ या तारखेत नाविन्य किंवा कौतुक वाटण्यासारखं काय आहे असा मला प्रश्न पडतो. मान्य आहे की ११-११-११ ही तारीख एकदाच येते पण त्याच लॉजिकने ११-१२-११ ही तारीख पण किंवा इतर कुठलीही तारीख एकदाच येते नाही का? मध्यंतरी बातमी वाचली की भारतात लोकांना लग्न करायला, मुलांना जन्म द्यायला (?) हीच तारीख हवी होती. आधी लोकांच्या वेडेपणाची चेष्टा केली आणि मग सहज जुन्या आठवणींमध्ये हरवून मी गेल्या काही वर्षातल्या महत्वाच्या तारखा आठवत बसलो. बऱ्याच गोष्टींची वर्षंपण आठवत नाहीयेत पण त्या तारखा लक्षात राहिल्या...त्यातल्या काहींचा हा लेख-जोखा!!

२६ जानेवारी..बहुदा २०००..भारताच्या लक्षात राहिला त्याचं कारण गुजरातमध्ये झालेले भूकंप. माझ्या लक्षात राहिला कारण त्यादिवशी मी शाळेच्या दोन दिवसाच्या कॅम्पसाठी कर्जतला निघालो होतो. आम्ही चर्चगेट स्टेशन का व्हीटी स्टेशनला असताना भूकंपाची बातमी कळली. मी तेव्हा नववीत असेन. तेव्हा त्या भूकंपाच महत्व कळायचं किंवा त्या भूकंपामुळे झालेल्या जीव-वित्तहानीबद्दल हळहळ करायची अक्कल असायचं वय नव्हतं. मला आणि माझ्याबरोबरच्या कित्येकांना आता कॅम्प जाणार का नाही हाच प्रश्न पडला असेल. जुन्या बॅचच्या मुलांनी त्यांच्या कॅम्पस मध्ये केलेले किस्से सगळ्यांनी ऐकले होते. वर्गातली अमुक मुलगी किंवा मुलगा रात्र झाली की भेटणार आहेत, हे हे सर रात्री दारू पितात वगैरे वगैरे गोष्टींबद्दल आम्ही काथ्याकुट केली होती. शाळेतल्या ओळखीच्या लोकांबरोबर अनोळखी ठिकाणी राहायला जाण्याचा, कॅम्पफायरचा, शाळेतल्या सरांना आणि बाईंना जेवण करताना बघण्याचा, त्यांच्याच बरोबर बसून जेवण्याचा पहिला अनुभव म्हणून २६ जानेवारी नेहमी लक्षात राहिला.

२००४ चा १५ ऑगष्ट...वर्ष नीट आठवतंय कारण त्याच वर्षी १२वी पूर्ण झालं. सगळे लोक स्वातंत्रदिनाची सुट्टी एन्जॉय करत असताना मीसुद्धा स्वातंत्राच्या वाटेवर होतो. याचं दिवशी पुढच्या जवळपास चार वर्षांसाठी अस्मादिक शिरूर नामक गावी दाखल झाले. तेव्हा डोक्यात घराबाहेर पडल्याच्या, आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करण्याच्या कल्पना होत्या. पुढच्या चार वर्षात सगळं सगळं बदललं. त्या दिवशी मात्र या गोष्टीची पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. श्री. विशाल मधुकर शिंदे यांना खाबिया हॉस्टेलवर पहिल्यांदा भेटलो तो याच दिवशी!

११ जुलै..मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले हे सगळ्यांच्या लक्षात आहे. पुणे विद्यापीठातसुद्धा त्याच दिवशी झालेल्या स्फोटांचा फारसा कुणाला पत्ता नव्ह्ता. त्याच दिवशी संध्याकाळी पुणे विद्यापीठाने फार्मसीचे रिझल्ट्स नेटवर डिक्लेअर केले होते. मी तेव्हा वसईत होतो. बाकी सगळे वर्गातले लोक शिरूरमध्ये. सेकंड यीअर हे फार्मसीमधलं काळं वर्षं आहे. आमच्या वर्गातली १३ मुलं नापास झाली. अनेकांना केट्या लागल्या. मलासुद्धा रिझल्टचं भयानक टेन्शन होतं. घरी न सांगताच मी सायबर कॅफेला पळालो होतो. सगळ्यात आधी माझा रिझल्ट बघितला. फर्स्ट क्लासमध्ये नंबर पाहिल्यावर जीवात जीव आला. शिरूरमध्ये पहिला फोन मी कुणाला केला ते आठवत नाही पण रिझल्ट लागलाय आणि मी सायबरमध्ये आहे हे कळल्यावर शिरुरमधून मला फोनवर फोन यायला सुरुवात झाली. ज्यांचे नंबर्स फर्स्ट क्लास, सेकंड क्लासच्या लिस्टमध्ये होते त्यांना आनंदाची बातमी द्यायला काही वाटत नव्हतं पण ज्यांचे नंबर सापडत नव्हते (म्हणजे अर्थातच हे सगळे ...) त्यांना उत्तर द्यायला मात्र जाम वाईट वाटत होतं. घरी आलो तेव्हा आई-बाबा मी कुठे गेलोय याचा विचार करत बसले होते. टीव्ही सुरु होता आणि मुंबई लोकलमधल्या स्फोटाच्या बातम्या सुरु होत्या.

२६ जुलै. पावसाने फायनली एकदाची मुंबई सपशेल बंद पाडली. २५ जुलैपासून धो-धो पाउस कोसळत होता. मी मुंबईहून शिरूरला जायला नेमका हाच दिवस निवडला होता. पावसामुळे हवा थंड होती. मला पुण्याला जायला कुठलीतरी ट्रेन मिळाली होती. बहुदा मुंबईतून पुण्याला आलेली ती त्या दोन दिवसातली शेवटची ट्रेन असावी. लोणावळा स्टेशन जवळपास पाण्याखाली होतं. मला ट्रेनमध्ये झोप लागली. पुण्यात पोहोचलो तेव्हा पाउस होता का ते आठवत नाही..पण आईने कौतुकाने करून दिलेली चिवडा आणि शंकरपाले असलेली पिशवी गायब झाली होती. नंतर आईने कधीतरी फोनवर विचारलं- कसा झाला होता चिवडा?मी काय उत्तर देणार? २६ जुलै आजही आठवला की मला आठवतं ते पाण्यात बुडलेलं लोणावळा स्टेशन आणि आईने दिलेला आणि मी कधीच न खाल्लेला चिवडा!

३० नोवेम्बर..कारण आठवत नाही पण लोकांनी डेक्कन क्वीन पेटवली होती. दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईत फार्मसीच्या एका इवेन्टला जायचं होतं. बहुतेक पुण्यात दंगली झाल्या किंवा तत्सम काहीतरी घडलं होतं खरं!!मुंबई-पुणे बसेस चालू आहेत की नाही ते माहित नाही! पण मला आणि स्नेहाला मुंबईला एकत्र जायची ती पाहिलीच संधी मिळाली होती. आम्ही अट्टाहास करून निघालो. स्वारगेटला चक्क बससुद्धा मिळाली. या घटनेचे संपूर्ण डीटेल्स या ब्लॉगच्या आवाक्याबाहेरचे आहेत पण हो..तुम्ही असलेल्या बसवर दगडफेक झाली तर साधारण मनःस्थिती, वातावरण काय असू शकतं याचा अंदाज त्या दिवशी आला. कर्वे रोड का कुठेतरी आमची बस अचानक रस्त्यात थांबली. "झुको झुको" असा कुणीतरी ओरडलं आणि बसच्या काचा फुटण्याचा आवाज, बायकांचं किंचाळणं, लहान मुलांचं रडणं या सगळ्या प्रकारात घाबरलेलं नसतानासुद्धा स्वतःच्या छातीचे ठोके स्वतःलाच जाणवतात. मला तिथे थांबायचं होतं, तो दगडफेक करणारा हरामखोर कोण ते पहायचं होतं, त्याला लोकांनी धरला आणि हाणला तर हात साफ करायची इच्छासुद्धा होती. पण तसं काहीच झालं नाही. स्नेहाने बाजूच्या कुठल्यातरी बोळात मला ऑलमोस्ट ओढत नेलं. त्या बोळात, संध्याकाळच्या त्या वेळी आम्हाला एक रिक्षासुद्धा मिळाली. पुढच्या दोन मिनिटात आम्ही संपूर्ण सुरक्षित आणि पापभिरू सदाशिव पेठेच्या वाटेला होतो. सदाशिव पेठेसारखा पुण्यातला भुलभुलैय्या असणारा भाग, शनिवार पेठेतल्या मोदी गणपतीपासून नातुबागेत स्नेहाच्या घरी पायी रस्ता शोधात पोहोचणं मी त्या रात्री केलं. नंतरच्या वर्षांमध्ये पुण्यातले रस्ते ओळखीचे झाले. माणसं ओळखीची झाली, पण त्या सगळ्याची लौकिकार्थाने सुरुवात त्या दिवशी झाली.

आज ११-११-११..आज माझ्या दृष्टीने विशेष असं काही घडलं नाही. काल रात्री म्हणजे जवळपास आज पहाटे झोपल्यामुळे मी लौकर उठायची शक्यता नव्हती. दुपारी साडेबाराच्या सुमारास रॉकी उठवायला आला ते 'टेक स्टेशन'चं पाणी गेल्याची बातमी घेऊन!( मी राहतो त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं नाव टेक स्टेशन आणि हो अमेरिकेत पाणी जातं!!). स्विमिंग पूलवर अंघोळ करायला जायचं का विचारायला तो आला होता. गेल्याच आठवड्यात एका लेक्चरमध्ये आमचे एक प्राध्यापक जीन गोर्ड म्हणाले होते- "कतरिना येऊन गेल्यावर मी वीज, फोन, गॅस अशा सगळ्याशिवाय राहायला शिकलो..(कतरिना हे लुझियाना राज्यात काही वर्षापूर्वी झालेल्या वादळाचं नाव आहे..गैरसमज नकोत) पण वाहत्या पाण्याशिवाय राहणं मला नाही शक्य"...काल रात्री कुणाचं तोंड बघून झोपलो असा विचार करत उठलो. रॉकी आणि मी पूलवर आंघोळ करून आलो. नंतरचा दिवस नेहमीसारखाच होता...आत्ता रात्रीचे बारा वाजून गेलेत..अजून पाणी आलेलं नाही..ते कधी येईल ते ठाऊक नाही..पण ११-११-११ ही तारीख लक्षात ठेवायची ठरवलंच तर या पाणी प्रश्नासाठी लक्षात राहील.

उगाचच काहीतरी लिहावं म्हणून हा ब्लॉग लिहिला नाही! हेतू इतकाच आहे की सगळ्यांना ही जाणीव व्हावी की जगासाठी एखाद्या तारखेचे काहीही दिनविशेष असोत..आपल्याकडे काय आहे?याचा विचार करूया! जर का आपले 'पर्सनालाईझड' दिनविशेष असतील तर आठवूयात आणि नसले तर आठवणींमध्ये अशा अजब गोष्टींची मोलाची भर पाडता येईल का ते पाहूया!! 


चैतन्य 

Sunday, August 21, 2011

युगंधर

शिवाजी सावंतांनी लिहिलेलं सर्वोत्कृष्ट पुस्तक कोणतं? असं विचारलं तर बरेचसे मराठी वाचक 'मृत्युंजय' असं नाव क्षणात घेतील. पण माझ्या मते त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणजे "युगंधर". भगवान श्रीकृष्णाची जीवनगाथा सांगणारी ही जवळपास १००० पानांची गोष्ट! मी खूप वाचन केलंय वगैरे दावा मला करायचा नाही पण मी वाचलेल्या पुस्तकांपैकी खूप अभ्यास करून लिहिलेली, गुंतवून ठेवणारी, कधी चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा आणणारी तर शेवटी डोळे पाणावायला लावणारी अफाट कादंबरी म्हणून मी नेहमी युगंधराचा उल्लेख करतो. भगवान श्रीकृष्ण ही व्यक्तिरेखा संपूर्ण वेगळ्या परिमाणांमध्ये आपण वाचतो. पुस्तक खाली ठेवायची इच्छा तर नसतेच पण डोकं, मन कृष्णाने व्यापून टाकलेलं असतं. आजपर्यंत अनेकदा मी हे पुस्तक वाचलं. दरवेळी काहीतरी नवीन शिकलो. आज गोकुळाष्टमी, दहीकाल्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाचे खूप फोटो पाहायला मिळाले आणि मला खूप जास्त भावलेल्या कृष्णाच्या जीवनकालाबद्दल लिहायची इच्छा झाली.
         आपल्यापैकी बरेचजण लहानपणी नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी यांनी साकारलेला श्रीकृष्ण पाहून मोठे झालोय. दुपारच्या वेळी सिरिअल्स पाहणाऱ्या बायकांना "सारथी" मधला राजेश शृंगारपुरे आठवेल. त्यामुळे पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हीच मंडळी होती. पहिली काही पानं वाचल्यावर मनातल्या या प्रतिमा पुसल्या गेल्या होत्या आणि तिथे कधीच न पाहिलेल्या एका अपूर्व व्यक्तिमत्वाचं अनोखं चित्र साकार झालं होतं. मी कालियामर्दन, पुतनावध, कंसवध इथपासून ते अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणाऱ्या सुदर्शनधारी श्रीकृष्णाच्या सगळ्या गोष्टी वाचल्या होत्या. माझ्या डोक्यात कृष्ण म्हणजे एक 'चमत्कार करणारा देव' अशीच कल्पना होती.

         युगंधरातल्या कृष्णाने जन्माला आल्यापासून एकही चमत्कार केला नाही. त्याला नंदाघरी आणल्यावर गर्ग मुनींना बोलवून त्याची पत्रिका मांडली गेली. गोकुळातल्या गोपजनांमध्ये त्याचं थाटामाटात बारसं झालं आणि त्याचं नाव "कृष्ण" ठेवण्यात आलं. पहिल्यांदाच मला कृष्ण शब्दाचा कधीच माहित नसलेला अर्थ कळला- आकर्षून टाकणारा, मोहून टाकणारा! दिसामासी मोठा झाल्यावर बलरामदादा आणि बाकीच्या मित्र-मंडळींबरोबर त्यानेही अनेक गमती-जमती केल्या. अगदी शिंकाळ्यावर हंडीत असणारं लोणी, दही मित्रांबरोबर चोरून खाल्लं. त्याने खोड्या केल्या की आई त्याला ओरडायची, त्याने यमुनेच्या डोहाकडे जाऊ नये म्हणून त्याला वारंवार सांगायची. यमुनेचा डोह कृष्णाला कायम आकर्षित करायचा.आपल्यापैकी कित्येक लोकांना पाणी आवडतं, पोहायला आवडतं. गोष्टीतल्या श्रीकृष्णाला यमुना आवडणं तितक्याच सहजपणे पटून गेलं. यमुनेच्या डोहात एक मोठा साप का नाग राहतो म्हणून गोकुळातले लोक तिथे जायला घाबरायचे.  पण या कृष्णाने डोहात उडी मारून 'कालियामर्दन' वगैरे केलं नाही. नदीच्या बाजूला एक कुरण होतं म्हणे. थंडीत एका दिवशी त्या कुरणातल्या गवतात तो साप दिवसा उन खायला येऊन पडला होता. कृष्ण आणि त्याच्या मित्रांनी ते कुरण पेटवून दिलं आणि तो साप जळून मेला. लहानपणी एखाद्या चावऱ्या, बेवारशी कुत्र्याला फटाके वाजवून, काठ्या दाखवून, पळवून लावलं होतंत का कधी? कृष्ण तितक्याच गमतीत त्या सापाचा निकाल लावतो. गावाजवळच्या एका मोठ्ठ्या झाडाचे "भांडीरवृक्षा"चे संदर्भ गोष्टीत अधेमध्ये येतात. त्या झाडाचं महत्व गोकुळात खूप पाउस पडल्यावर अधोरेखित होतं. गोकुळात एकदा खूप पाऊस पडतो, यमुनेला पूर येतो. आपल्याकडे २६ जुलै झालं होतं अगदी तसंच! आणि मग सगळे गावकरी त्या भांडीरवृक्षाच्या आश्रयाला जाऊन राहतात. इतकं मोठं झाड हे निव्वळ साहित्यिक लिबर्टी असली तरी गोवर्धन उचलून चमत्कार करणाऱ्या कृष्णापेक्षा ही लिबर्टी दाद घेऊन जाते.  कृष्णाला गोपदीक्षा दिली जाते तो प्रसंग, त्याचं गाई-गुरांना घेऊन जाणं, बासरी शिकणं, वाजवणं हे सगळं एका छान लाडात वाढत असलेल्या आपल्यासारख्या मुलासारखं वाटत. त्याला काका-काकू, आजी-आजोबा, दादा अशी सगळी माणसं आहेत! आणि या सगळ्यात राधासुद्धा आहे. पण कृष्ण कधीच लंपटपणा करत कुणाचे कपडे पळवत नाही की राधेबरोबर डोळ्यात डोळे घालून बसत नाही! कृष्ण आणि राधा वृन्दावनात रास खेळतात पण त्यात कुठेही त्याच्या "रासलीला" वगैरे लिहिलेल्या नाहीत. राधा इतर अनेक गोप-स्त्रियांसारखी एक बाई आहे. कृष्ण आणि ती एकमेकांच्या समोर असणारे काही खूप मोजके प्रसंग आहेत. राधेच्या नवऱ्याला कृष्णापासून "इनसिक्यूरीटी" वाटत असल्याचा उल्लेखसुद्धा गमतीत येतो. पण या कशालाच अवाजवी महत्व नाही. कृष्ण आणि त्याचे मित्र एक शिवलिंग बनवून त्याची नित्य-नेमाने पूजा करतात. तुम्हालासुद्धा लहानपणी केलेला मातीचा किल्ला, शिवपिंड, कॉलनीत कुठेतरी बांधलेलं देऊळ आठवतंच! त्याचे पोशाख, त्याला आवडणारा दही-भात, त्याच्या गाई, त्याची बासरी आपल्याला गुंगवून टाकतं.
        कृष्ण मोठा झाल्यावर त्याला मथुरेला यायचं बोलावणं येतं. तेव्हा तो गोकुळातून निघताना सगळ्या घरच्या लोकांचं दुःख, त्याला न जाण्याबद्दल सांगणं वाचून डोळ्याच्या कडा पाणावतात. मथुरेत त्याच्या स्वागताला उद्धव हजर असतो. तोच उद्धव जो पुढे अखंड आयुष्य त्याचा "भावविश्वस्त" बनतो. मथुरेत आल्यावर त्याचं झालेलं स्वागत, त्याला सामोरं जायला लागलेल्या मुष्टियुद्धाचा प्रसंग सुरेख रंगतात. कृष्ण आणि बलराम यांचं मुष्टियुद्ध जिंकणं अजिबात खटकत नाही कारण 'केलीनंद' काकाने घोटवून गेलेले कसरतीचे, व्यायामाचे, कुस्तीचे धडे आपण आधीच वाचलेले असतात. मग एक जाणीवेचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसा कृष्णाच्या आयुष्यात येतो आणि तो कंसाला सिंहासनावरून खेचून त्याचा 'वध' करतो. नंतर आई-बाबांना सोडवणं, आजोबांना पुन्हा सिंहासनावर बसवणं वाचलं की लहानपणी आई-वडिलांच्या छळ केलेल्या व्हीलनचा बदल घेण्याची गोष्टी हिंदी सिनेमात कशा रूढ झाल्या असतील याचं उत्तर मिळतं. कृष्ण सांदिपनी ऋषींच्या आश्रमात जातो, वर्गात बसून इतर मुलांसारखा शिकतो.वर्ग सुरु असताना इतर सगळ्यांसारखा शंका, प्रश्न विचारतो. त्याला मित्र आहेत त्यात एक गरीब सुदामा आहे, मोठा भाऊ बरोबर शिकतोय. सगळा अभ्यासक्रम तो इतरांबरोबर पूर्ण करतो. एक दिवस घरी जायची वेळ येते, तेव्हा तोसुद्धा भाव-विवश होतो. सकाळी-सकाळी पोहताना खुडून आणलेली कमळं तो गुरूंना देतो. मित्रांना निरोप देऊन घरी येतो. हा संपूर्ण कालखंड श्रीकृष्ण या व्यक्तिरेखेच्या तोंडून वाचायला खूप मस्त वाटलं. एका आदर्श मित्रासारखा कृष्ण मनात उभा राहिला जो आजतागायत तसाच आहे! 
      पुढे खूप मोठी गोष्ट आहे. कृष्णाच्या अंत्यसंस्कारापर्यंतची! त्याबद्दल लिहायचं तर एक वेगळं पुस्तक लिहावं लागेल. असो! पाहिली-दुसरीत असताना 'छान छान' गोष्टींमधून चमत्कार करणारा श्रीकृष्ण भेटला तरी हरकत नाही पण युगंधरमधला श्रीकृष्ण मोठं झाल्यावर वाचायलाच हवा. मूल्यशिक्षण, व्यक्तीमत्व विकास, कर्मयोग, राजकारण या सगळ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायला युगंधरासारखं समर्पक पुस्तक दुसरं कुठलं नाही असं मला वाटतं! जमलं तर नक्की वाचा. मला खात्री आहे की स्वतः शिवाजी सावंतांना लिहिताना जसे त्याच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पदर उमगत गेले तसे तुम्हालासुद्धा नक्की सापडतील.
||इति श्रीकृष्णार्पणमस्तु||


चैतन्य

Friday, July 29, 2011

...गुल्लू भाई!!!!

            फेसबुकवर नाळेशी बोलताना शिरूरचा विषय निघाला आणि इच्छा नसतानासुद्धा डोळ्यासमोरून तिथे घालवलेली चार वर्षं सरकून गेलीच!! तिथे असताना 'इथून कधी बाहेर पडतोय?' असं प्रत्येकाला होतं आणि आता ते दिवस आठवून खंत व्यक्त करणं हे बहुदा सगळ्याच नोकरीच्या रहाट-गाडग्यात अडकलेल्या लोकांचं होत असावं!असो. शिरूरने आम्हाला किती दिलं, किती शिकवलं याबद्दल निबंध लिहिण्यात मला गम्मत वाटत नाही. एवढंच म्हणेन की तिथे राहून 'फार्मसी'बद्दल फारसा शिकलो असं कधीच वाटलं नाही पण दुनियादारी, अक्कलदाढ, झोल-झाल या सगळ्या सगळ्या प्रकारांचं 'मास्टर्स' लेवलचं शिक्षण तिथे मिळालं. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलपासून गावात फिरणाऱ्या एका वेड्या माणसापर्यंत अनेकविध प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. शिरूर आजही आठवतं ते तिथल्या माणसांमुळे आणि या माणसांशी संबधित घटनांमुळे!
            असाच एक शिरूरला भेटलेला आणि आयुष्यभर लक्षात राहील असा माणूस म्हणजे गुल्लू भाई! गुल्लू-भाईची नम्रताच्या चौकात दाबेलीची गाडी! शेवटची जवळ जवळ दोन वर्षं मी नित्य नेमाने त्याच्याकडे जायचो! येणाऱ्या जाणाऱ्या कित्येक लोकांसारखा मी एक. पण मी त्याच्या का लक्षात राहिलो हे मलाही माहित नाही! गुल्लू भाई मुळचा UP चा. तिथे त्याचे दोन मोठे भाऊ आणि आई-वडील असतात. मोठा भाऊ शाळेत शिक्षक आहे. गुल्लू भाई तेव्हा संध्याकाळची दाबेलीची गाडी चालवायचा आणि सकाळी पावाचा धंदा करायचा. त्याला स्वतःची बेकरी सुरु करायची होती. मी त्याला चांगला श्रोता वाटलो बहुदा म्हणून त्याने मला त्याच्या घरची परिस्थिती, तो धंद्यातून किती कमवतो आणि त्याला या पैशातून बेकरी कशी विकत घेता येईल हे सगळं सगळं सांगितलं त्या काळात! मी बरेचदा खात खात स्नेहाशी फोनवर बोलत असायचो. एक दिवस त्याने विचारलंच- "किस्से बात करते रेहते हो?" मी त्यावर हसून नकारार्थी मान डोलावली. मग तो स्वतःच म्हणाला- "भाभी है?" मी पुन्हा हसून होकारार्थी मान डोलवली. मी कुठल्यातरी मुलीशी गप्पा मारतोय कळल्यावर तर मला त्याने त्याच्याबद्दल अजून पर्सनल गोष्टी सांगायला सुरुवात केली- एक दिवस त्याने विचारलं "भाभी सुंदर है?" आता यावर मी काय उत्तर देणार?? मग थोडसं लाजत म्हणाला- "मै इस साल गाव जाऊंगा तो घरवाले मेरा निकाह करने की सोच रहे है", मी विचारलं- "लडकी देख के रखी है?" त्यावर म्हणाला- "हां, मेरे ही गाव की है, पास ही में रेहती है, उसके घर पे बात करने गयी थी मेरी दीदी!" मी हसत म्हणालो- "क्या बात है गुल्लू भाई, तो अगले साल भाभी को लेके आओगे आप!कैसी है भाभी?" मग त्याने मला ती कशी दिसते त्याचं त्याच्या शब्दात वर्णन केलं. एका UP च्या खेड्यात टिपिकल मुसलमान कुटुंबात वाढलेल्या, महाराष्ट्रात येऊन शिरूरसारख्या ठिकाणी दाबेलीचा धंदा करणाऱ्या एका पंचवीस-तीस वर्षाच्या माणसाचे लग्न, प्रेम, होणारी बायको याबद्दल विचार नेमके काय असतील याबद्दल मला थोडीशी उत्सुकता होती! आणि त्याच्या तोंडून हे सगळं ऐकायला गम्मत पण वाटली. त्याच्या मते त्याच्या घरच्यांनी पाहिलेली मुलगी ही त्यांच्या गावातली सगळ्यात भारी दिसणारी मुलगी होती, त्याला यावर्षी तिच्याशी लग्न करायचं होतं आणि दोन वर्षात शिरूरमध्ये बेकरी काढून सेटल व्हायचं होतं, तिला इथे आणायचं होतं. त्याच्याबरोबर त्याचा बारा-चौदा वर्षांचा एक भाचा इथेच रहाट होता. घरी अभ्यास करत नाही म्हणून त्याच्या आईने त्याला या 'मामू' कडे पाठवलं होतं. गुल्लू भाईची इच्छा होती की त्याच्या भाच्याने गावी परत जावं, अभ्यास करावा. प्रायमरी शाळेत शिक्षक झालेल्या त्याच्या मोठ्या भावाचा त्याला खूप अभिमान होता. मध्यंतरी कधीतरी गुल्लू भाई गावाला गेला. तो गावी असताना इथे त्याचा धंदा सांभाळायला त्याचा गावचा कुणीतरी भाऊ इथे आला. गावी जाताना त्याला गुल्लू भाईने माझ्यासाठी स्पेशल दाबेली, sandwich बनवायची सूचना देऊन ठेवली होती. मला खूप शेवटी शेवटी कळलं की त्याने दाबेलीचा भाव वाढवलेला असूनही माझ्या कडून जास्त पैसे कधीच घेतले नाहीत. मी आग्रह करूनसुद्धा नाही!
           शिरूर सोडायचा आदला दिवस! सगळ्या मित्रांचा निरोप घेणं सुरु होतं. त्या शेवटच्या दिवसात रात्री दारूच्या पार्ट्या व्हायच्या, रडारड व्हायची! जुनी उणी-दुणी निकालात निघत होती. शिरूरमध्ये भेटलेल्या लोकांना, ठिकाणांना अलविदा म्हणणं सुरु होतं! आज शिरूरच्या आठवणी काढून हळहळणारे  करणारे आम्ही सगळेच तेव्हा मात्र परत इथे परत यायचं नाही हे ठरवूनच आवरा-आवरी करत होतो. मी रात्री निघणार होतो, संध्याकाळी अर्धवट "बुंगलेल्या" सुश्याला घेऊन मी गुल्लू भाईला भेटायला गेलो. मी शिरूरमधून निघून जाणारे याची कल्पना त्याला होती आणि मी भेटायला गेल्यावर त्याला ते चटकन लक्षात आलं. "क्या खाओगे?" त्याने विचारलं. त्या वेळी मला अजिबात भूक नव्हती. पण त्याचं मनही मोडवत नव्हतं. मी त्याला एक दाबेली द्यायला सांगितलं. त्याने आम्हाला दोघांना एक एक दाबेली दिली आणि sandwich करायला घेतलं. मी नको नको म्हणत असतानाही त्याने ते आमच्या पुढ्यात ठेवलंच. खाऊन झाल्यावर मी त्याला पैसे देऊ केले आणि अर्थात ते त्याने घेतले नाहीत जे मला अपेक्षित होतं. मी फारसा आग्रहसुद्धा केला नाही. पण खरी गोष्ट नंतर घडली. त्याने खिशातून शंभरची नोट काढून मला दिली. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. "ये किसलीये?" मी भारावून जात विचारलं. तो म्हणाला- " हम लोगो में रिवाज है, जब भी कोई छोटा भाई घर से बाहर निकलता है बडा भाई उसे कुच मदत करता है और आप मेरे छोटे भाई जैसे हो..मना मत करना" आता यावर मी काय उत्तर देणार? माझं आजूबाजूला लक्ष गेलं. बाजूला एक-दोन रिक्षावाले हा प्रकार बघत होते! येणाऱ्या-जाणाऱ्या एक दोघांनी त्याचं बोलणं ऐकलं होतं. एकीकडे माझं 'सोफेस्टीकेटेड' मन त्याच्याकडून पैसे घेणं कबूल करत नव्हतं."दाबेलीवाल्या भैय्याकडून पैसे?" तर दुसरीकडे आधीच सगळ्या मित्रांना निरोप देऊन हळवं झालेलं मन म्हणत होतं- "घे ते पैसे!" मी निमुटपणे पैसे घेतले आणि त्याला म्हटलं-" हम लोगो में भी एक रिवाज है, जब भी बडा कोई कुच देता है तो हम उसके पैर छुते है!" असं म्हणत मी शिरूरच्या त्या चौकात त्याच्या पाया पडलो. मला वर घेत तो म्हणाला- "एक बार गले मिलोगे?" मी काही ना बोलता त्याला मिठी मारली. बरोबर चार वर्षं शिकलेल्या प्रत्येक मित्राला निरोप देताना मनात ज्या भावना होत्या त्यापेक्षा काहीशा वेगळ्या भावना मनात आल्या होत्या! आज जवळजवळ ३ वर्षं उलटून गेलीयत पण त्या शब्दात नाही मांडता येणार! सुश्यानेसुद्धा पुढे होत त्याला मिठी मारली. 'फिर मिलेंगे' म्हणत निघालो. बोलायला काहीच सुचत नव्हतं. 

             नंतरच्या दिडेक वर्षात चार-पाचदा शिरूरला चकरा झाल्या. बहुतेक सगळ्याच कुठल्यातरी कागदपत्रांसाठी! बाकी सगळ्यांशी भेट झाली पण गुल्लू भाई काही भेटला नाही. कधी मी खूप घाईत होतो तर दोनदा तो गावी गेला होता. त्याला माझा इतकाच निरोप आहे की त्याच्यासारख्या लोकांमुळेच शिरूरला कधीतरी जायची माझी इच्छा अजूनही कायम आहे!आणि हो शिरूरला कधीतरी जावच लागेल, मगाशीच सागर म्हणत होता- 'भाईजानला मी ३ चहाचे पैसे द्यायचे आहेत म्हणे!!!"

चैतन्य

Tuesday, June 28, 2011

'It's all about..' गोष्टीचा पहिला काही भाग:

अजय:

 "शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले..प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले" सकाळी रेडिओ लागला होतादिवसाची सुरुवात अशी छान झाली ना तर दिवस चांगला जाणार याची खात्री सकाळीच पटून जाते आणि आजचा दिवस चांगला जाण फार महत्वाचं आहे. खूप कामं करायची आहेत आज!


"जया, शिरा करून ठेवलाय तो खा आणि मग जा कॉलेजला.मी निघते" आईची हाक. बाथरुममधून बाहेर पडताना सहज मनात विचार आला की या working women चं जितकं कौतुक व्हायला हवं तितकं होत नाही. गोची अशी असते की कामाच्या ठिकाणी त्यांची तुलना अविवाहित मुलींशी किंवा करीयरच्या नावाखाली संसार अक्षरशः ओवाळून टाकलेल्या विवाहित बायकांशी होते तर घर सांभाळण्याच्या बाबतीत त्यांना नेहमी हलकं माप दिलं जातं कारण निव्वळ घरी बसून दुपारी टीव्हीवरचे 'खवैय्ये' कार्यक्रम बघणाऱ्या, मुलांना सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण, संध्याकाळच दुध वेळेवर देणाऱ्या बायकांना लोक उत्तम गृहिणी मानतात! त्यात अलीकडे धोंडो केशव कर्वे आणि सावित्रीबाईंची जागा भाउजी आणि 'ककारी' मालिका निर्माती यांनी घेतलीय, त्यामुळे समाजप्रबोधन वगैरे जरा कठीणच दिसतंय!'असे बोजड विषय मनात आणायचे नसतात अजय" मी स्वतःलाच बजावलं!भरपूर बेदाणे घातलेला शिरा आणि कोको पावडर घातलेलं दुध घेऊन अस्मादिक कोचावर स्थानापन्न झाले आणि मी आजचा दिवस साधारण प्लान केला.
           दरवेळी ओळख करून देण्यापूर्वी असं लांबलचक प्रवचन करायची ही वाईट सवय लागलीय मला! असो..मी अजय. अजय सुनिता रमाकांत आजगावकर. मला माहितीय की तुम्हाला ऐकायला विचित्र वाटलं पण हो तेच माझं नाव आहे! मी दादरच्या J L कॉलेजला B Sc च्या शेवटच्या वर्षाला आहे! माझा अभ्यास सध्या अत्यंत हळूहळू चाललाय आणि बहुदा चांगले मार्क मिळण्यासाठी यंदा मला इच्छा आणि विश्वास दोन्ही नसताना देवापुढे हात जोडावे लागणारेत!
        मी खूपच कन्फ्युस करतोय असं तुम्हाला वाटतंय का?ठीके थोडं स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. माझ्या नावात मी आई आणि वडील असं दोघांचं नाव लावतो कारण वडिलांचं नाव लावायला कायदा आणि संस्कार दोन्ही भाग पाडतात तर आईचं नाव मी निव्वळ आदर आणि प्रेमापोटी लावतो! बाबांबद्दल प्रेम  किंवा आदर वाटायला आवश्यक सहवास कधी लाभलाच नाही अर्थात मला त्याचं अजिबात दुःख वाटत नाही! नशिबावर विश्वास असला तरी मी स्वतःला दैववादी म्हणवत नाही. 'Take life as it comes- आयुष्य जस येतंय तसच आपण त्याला समोर जाऊया" असं साध आणि सोप्पं तत्व आहे माझं. काही चांगलं घडलं तर मी देवाचे आभार मानत नाही आणि काही वाईट घडलं तर देवाला दोष देत नाही! ज्या गोष्टी मला मनापासून हव्या असतात त्या मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायची माझी तयारी असते. आणि मी हा असाच आहे..थोडासा हटवादी आणि बराचसा प्रयत्नवादीसुद्धा!
        कॉलेजला जायचं म्हटलं की अलीकडे कॉर्नरलाच आधी चक्कर होते. आजही तेच झालं! पाय सवयीने कॉर्नरला वळले! तमाम कॉलेजच्या मुलांची जिव्हाळ्याची जागा म्हणजे कट्टा, अड्डा, टपरी वगैरे...तसा हा आमचा कॉर्नर! कित्येक उन्हाळे-पावसाळे या कॉर्नरने पहिले असतील! तंबीच्या चहाचा आणि छोट्या गोल्ड फ्लेकचा वास कॉर्नरच्या श्वासात भिनलाय! रेडिओवरची गाणी आणि इथे बसून मुलांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या 'शेलकी'तल्या शिव्या ऐकायची सवय कॉर्नरला झालीय! अनेक कडू-गोड क्षणांचा, आंबट चर्चांचा हा कॉर्नर साक्षीदार आहे! आणि या सगळ्याचा तितकाच अविभाज्य भाग आहे आमचा 'तंबी' -चहावाला! मध्यंतरी पालिकेच्या मोहिमेत तंबीची गाडी गेलीच असती पण या विभागाचा नगरसेवक पूर्वीचा "कॉर्नरकर"! तंबीची गाडी वाचली आणि मायावतीच्या फोटोच्या शेजारी नगरसेवकाचा फोटो आला. आता गाडीवर मारुती, मायावती आणि नगरसेवक हे तीन फोटो आणि कुठल्यातरी दैनिकाच्या पुरवणीत तंबीच्या गाडीवर लिहिलेल्या लेखाची फ्रेम असे तब्बल चार फोटो आहेत!तंबीच्या हाताखाली सकाळी जग्या आणि दुपारनंतर मन्या अशी दोन मुलं कामाला असतात. 'तुम्ही मुले खूपच शोर करता" वगैरे मराठीपण तंबी हल्ली बोलायला शिकलाय. त्यामुळे रेडिओ बरोबर स्वतः तंबी पण मनोरंजक भाग झालाय कॉर्नरचा!
        अमित, महेश, सचिन अशा सगळ्यांचं झकास चाललंय! लास्ट यीअरच्या टेन्शनच्या नावाखाली महेश हल्ली दिवसाला सिगारेट्स ओढतो. आम्ही त्याला अग्निहोत्री म्हणून हाक मारतो! माझा सध्या थोडा वेगळाच प्रॉब्लेम झालाय. तुमचे दोन सर्वात चांगले मित्र- मैत्रीण एकमेकांच्या प्रेमात पडले तर? म्हणजे परिस्थिती प्रेमाचा त्रिकोण वगैरे अशीही काही नाहीये!मी माझ्या जगात अपार सुखी आहे आणि ती दोघं एकमेकांच्या! आणि नेमका हाच माझा प्रॉब्लेम आहे! ते दोघे एकेमेकांच्याच जगात इतके सुखी आहेत की त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये! मी खरंच सांगतोय अशा परिस्थितीत राहणं खूप कठीण आहे! सध्याची ठळक बातमी इतकीच आहे की निशांत परुळकर आणि मानसी आठवले हे दोघेजण बेपत्ता आहेत! शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ते  प्रेमाच्या आणा-भाका घेत एकमेकांतच हरवले होते
         निशांत आणि मी अर्ध्या चड्डीत फिरायचो तेव्हापासूनचे छान मित्र! मानसी माझी अकरावीपासूनची पार्टनर! या दोघांची अकरावीत ओळख पहिल्यांदा मीच करून दिली!आज चार वर्षांनी ही वेळ आलीय की मी चारेक दिवसात दोघांना भेटलोही नाहीये! निशांत आज भेटणार होता म्हणून मी कॉर्नरला थांबलो. खूप वेळ वाट पाहूनही तो आला नाही म्हणून मी तंबीकडे निरोप ठेवून, निशांतला मनातून शिव्या देत 'Physics' dept गाठलं. वास्तविक माझा आणि फिजिक्सचा अजिबात संबंध नाही. पण तिथले करमरकर सर आम्हाला बरीच मदत करायचे. आम्हा कॉलेजच्या काही मुलाचा लायन्स, रोटरीसारखा एक छोटा क्लब होता. आम्ही गरजू लोकांना, विद्यार्थ्यांना जमेल तशी आर्थिक मदत करायचो. तेजस पाटील नावाच्या एका मुलाच्या वडिलांचं ऑपरेशन होणार होतं. घरची परिस्थिती अर्थातच बिकट! आम्ही कॉलेजमधून काही पैसे जमा करायचा प्रयत्न करत होतो. अशा कामांसाठी करमरकर सरांचा कायम पाठींबा आणि हातभार असायचा!
"सर, आले का हो थोडेतरी पैसे?" मी सरांना गेल्यागेल्या विचारलं.
" का रे? आज एकदम आल्या आल्या असा प्रश्न?" सरांनी मला उलटा प्रश्न टाकला
" तसं काही विशेष नाही सर,महागाई इतकी वाढलीय की कुणालाही मदत करण्यापूर्वी शंभरदा विचार करतात लोक आणि त्यात त्यांचीही काही चूक नाही"
" खरंय तू म्हणतोस ते, पण यावेळी झालेत थोडेफार फंड्स जमा
" ग्रेट! सर, संध्याकाळी हॉस्पिटलला जाईन म्हणतोय, उद्या ऑपरेशन आहे
"हरकत नाही. दुपारनंतर येऊन जा, मी तुला सगळे पैसे 'बंदे' करून देतो
मी सरांचा निरोप घेतलाअशा सगळ्या कामांमधून आम्ही लोकांना मदत करत नाही पण पब्लिसिटीच जास्त करतो असा काही लोकांचा समज होता! निव्वळ स्वतःशी असलेल्या प्रामाणिकपणामुळेच आम्ही ही कामं सुरु ठेवू शकलो होतो.
कॉर्नरला परत पोहोचलो तेव्हा चक्क निशांत येऊन पोहोचला होता
"क्या बात,क्या बात,क्या बात! साधू संत दिसती कॉर्नरला तोची दिवाळी दसरा!" मी त्याचं स्वागत केलं
" अज्या, भेटल्या भेटल्या मारायलाच हवी का?" निश्याचा प्रश्न.
" मी का मारू? माझा friend-philosopher-guide मला जवळपास आठवडाभराने दर्शन देतोय! स्वागत नको करायला?" मला त्याच्यावरचा सगळा राग काढायचा होता.
" ok तुझं स्वागतपर भाषण संपलं असेल तर आपण चहापानाकडे वळूया का?"
"हरकत नाही"
तंबीकडून वाफाळते चहाचे 'ग्लास' घेऊन आम्ही बसलो!
"काय मग परुळकर??काय म्हणताय?"
"काय म्हणू अज्या?"
"निश्या, भडव्या तू चार दिवस मला भेटला नाहीयेस, कुठे होतास, काय करत होतास, मानसी कशी आहे?अशी जुजबी माहिती पुरवलीस तरी खूप झालं"
"ओह ओके, ऐक. मानसी मस्त आहे. ती उद्या तिच्या मावसबहिणीच्या लग्नाला पुण्याला चाललीय. तिला बरीच खरेदी करायची होती.नवीनच बॉयफ्रेंड झालेलो असल्याने मी सगळीकडे तिच्या बरोबर हिंडत होतो!"
" च्यायला निश्या, तू मानसीबरोबर खरेदी करत फिरलास?"  
" हो फिरलो खरा..तुला सांगतो अज्या,मी आतापर्यंत आयुष्यात खरेदीला जितका वेळ लावला नसेल ना तितका  तिने एक साडी आणि ड्रेस विकत घायला लावला"
"काही खरं नाही! फारच साळसूद आणि आज्ञाधारक प्रियकर आहेस राव तू" मी पुन्हा त्याची थट्टा केली!
"अज्या मला माहितीय की मी गेले चार दिवस तुला भेटलो नाहीये त्याचा राग तू चेष्टा करून काढतो आहेस
" नाहीरे अगदीच तसं काही नाही! पण मला प्रश्न पडलाय की प्रेमात पडल्यावर असंच होतं का?"
"माहित नाही, ज्याचा त्याचा दृष्टीकोण आहे रे
" निशांत, प्रेमात पडल्यावरही असं बोलतो आहेस?" आमच्या गप्पा थोड्या गंभीर झाल्या.
" खरं ते सांगतोय! म्हणजे हेच बघना.मी मानसीबरोबर तिची खरेदी करायला चार दिवस हिंडलो त्याचं मला काहीच विशेष वाटत नाही! नवीन नवीन अफेअर असल्याने मी असं म्हणतोय असं तुला वाटेल पण मानसी माझी गलफ्रेंड नसती आणि तिने मला तिच्याबरोबर यायला सांगितलं असतं तरी मी गेलो असतो आणि अजून सहा-सात वर्षांनी बायको म्हणून विचारलं तरी मी जाईन.त्यासाठी मला ती माझी गलफ्रेंड असणं जरुरीचं वाटत नाही! त्यामुळे माझ्या दृष्टीने मी जे केलं ते प्रेम व्यक्त करायला केलं असही मी म्हणणार नाही किंवा तिला 'एकटी जा' असं म्हणताना मला insecurity वाटते असंही काही नाहीये! हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत असू शकतं. रोज एकमेकांना ५० वेळा "लव यु" म्हणणारी पण दुसऱ्या मुलाचा/मुलीचा विचार करणारी जोडपी असतात आणि महिनोंमहिने एकमेकांना भेटता सुद्धा एकमेकांशी एकनिष्ठ असणारी जोडपी असतात! आणि मित्रा, तू काहीही म्हण पण हे सगळेच लोक आपापल्या जोडीदारावर कमी-जास्त प्रमाणात प्रेम करतातचं रे! प्रेम फुटपट्टीने किंवा वजन काट्यावर मोजता नाही ना येत! म्हणून म्हणतोय की प्रेम करणं म्हणजे नेमकं काय?किती प्रेम करायचं?कसं करायचं? हे ज्याचं त्याने ठरवायचं" 
"This material should not be copied, duplicated,reproduced or edited without the consent of the author"

©Chaitanya Joshi