Pages

Saturday, December 31, 2011

चहा!!


मला पुरेपूर कल्पना आहे की या पोस्टचं टायटल वाचून अर्धेअधिक लोक ही पोस्ट वाचणार नाहीत!!खरंतर 'एक गरम चाय की प्याली हो' असं शीर्षक द्यायचा विचार केला होता पण अन्नू मलिकची पब्लिसिटी माझ्या ब्लॉगवरून का??असा विचार करून तो मोह टाळला. 'चहा है तुझको चाहत से ज्यादा' असं काहीतरी 'चहा'टळ नाव देण्याचा मोह्सुद्धा मी खूप कष्टाने आवरला. चहा हा दीर्घ निबंध किंवा लहानशी चारोळीदेखील लिहिण्याचा विषय असू शकतो हेच कुणाला पटणार नाही.असो! मी मला आवडणाऱ्या विषयांवर लिहिणारे..त्यामुळे 'चहा'वर हा एक 'अख्खा' ब्लॉग!! (याच लॉजिकने 'झोप' या विषयावर एक ब्लॉग लिहायला लागेल, पण ते नंतर कधीतरी..)
           'कॉफी विथ करन' या नावाचा शो हिट झाल्यावर भविष्यात 'चाय विथ चैतू' असा एक कार्यक्रम सुरु करण्याचा माझा कित्येक वर्षं मनसुबा होता. अमेरिकेत आल्यावर दोन महिन्यात मी तो प्लान रद्द केला. कारण माझा अमेरिकन प्रोफेसर..!!माझ्या नावात जोडाक्षर आहे यात त्याची बिचाऱ्याची तरी काय चूक? त्याला माझं नाव घेता येत नाही म्हणून त्याने मला हाक मारायला 'चाय' असं सोप्पं शोर्ट नेम निवडलं. मी सुद्धा "त्वमेव माता पिता त्वमेव' म्हणत ते मान्य केलं. त्यामुळे अमेरिकन लोकांना मी माझं नाव 'चाय' सांगायला लागलो. काही देसी लोकांनी 'चाय' हे 'चाय'नीज नाव वाटतं असं म्हणून माझी थट्टादेखील करून झाली!!पण नंतर बोलण्यात कधीतरी कळलं की माझ्या प्रोफेसरला 'चाय' म्हणजे चहा आवडतो आणि माझ्यासाठी याहून दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नव्हती!'चाय विथ चैतू' सुरु करण्याचा रद्द केलेला बेत मी पुन्हा ठरवलाय मात्र नाव थोडं बदललं- आता माझ्या शोचं नाव असेल 'चाय विथ चायतन्य' 
           ....तर सुरा-असुरांच्या युद्धानंतर समुद्रमंथनातून जे 'अमृत' नामक पेय निघालं ते 'चहा' असू शकतं इतका मी त्याच्या प्रेमात आहे..(राक्षसांना देवांनी अमृत पिऊ दिलं नव्हतं त्यामुळे चहा 'न' आवडणारी सगळी मंडळी माझ्यामते राक्षसच..). पाणी, दुध, चहा पावडर आणि साखर इतक्या कमी गोष्टींपासून बनणाऱ्या या पेयाबद्दल कसं आणि किती लिहिणार? गम्मत अशी आहे की घरोघरी निव्वळ हेच सगळे जिन्नस वापरून बनणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळी असते. काही ठिकाणी मिट्ट गोड चहा, काही ठिकाणी अगोड चहा, काही ठिकाणी दुधाचा चहा, काही ठिकाणी पांचट चहा, लाल-भडक चहा (असा चहा पिणारी माणसं प्रेमाने त्याला कडक चहा म्हणतात), तर चहाच्या नावाखाली साखर घातलेलं गरम गोड पाणीदेखील मी प्यायलो आहे...चहाचे असेही प्रकार असतात बरं का...साध्या स्वैपाकाचा विषय निघाला की साधीभोळी माणसं लगेच आईच्या हातच्या जेवणाचा उल्लेख करतात!पण चहाचा विषय निघाला की अट्टल चहाबाज नेहमी कुठल्यातरी गाडीवाल्या भैय्याच किंवा एखाद्या इराणी हॉटेलचं नाव घेतात..अर्थात आईच्या हातचा चहा आवडत नाही अशातला भाग नसतो..पण भैयाच्या टपरीवरचा किंवा इराण्याच्या हॉटेलमधला ambiance घरात मिळत नाही हेच खरं! 
            ambiance वरून आठवलं- चहा कधी, कसा, किती, कशाबरोबर प्यायचा याबद्दलसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात..काही लोकांना फक्त सकाळी चहा लागतो आमच्यासारखे मात्र कधीही चहा पितात..(मला एक पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये )  काही लोकांना गरम चहा बशीत ओतून त्यात 'फुर्रर फुर्रर' करून गार करून पिण्यात मजा येते तर काहींना कपमधून स्टाइलमध्ये फुरके मारत प्यायला आवडतं..चहा कशाबरोबर प्यायचा याबद्दलतर टोकाची मतभिन्नता आहे..सिगरेट ते पुस्तक अशी टोकाच्या गोष्टी लोकांना चहा'बरोबर' लागतात..पेपर, ग्लुकोज बिस्किटे या सर्वसाधारण लोकांना आवडणाऱ्या गोष्टी...पुण्यातल्या लोकांना 'अमृततुल्य' नावाचा प्रकार ठाऊक असेल- पुण्यातल्या प्रत्येक गल्ली-कोपऱ्यांवर अशी अमृततुल्य दुकानं आहेत! बहुतेक सगळीच भल्या पहाटे सुरु होतात आणि रात्री बऱ्यापैकी उशिरापर्यंत चालू असतात.. दुकानात शिरल्यावर दिसणारा एक लांब-लचक ओटा, त्यावर मांडून ठेवलेली पितळेची लखलखीत भांडी, लेंगा झब्बा घातलेला सदैव चहा बनवत असणारा एक माणूस हे दृश्य जवळपास सगळ्या अमृततुल्यमध्ये दिसतं.या कलंदर लोकांची स्पेशालिटी म्हणजे यांच्याकडे सकाळी पहिल्यांदा बनणाऱ्या आणि संध्याकाळी शेवटच्या बनणाऱ्या चहाची चव तंतोतंत सारखी असते. अलीकडे या दुकानांची संख्या कमी व्हायला लागल्याचं मला खूप पुणेकरांनी सांगितलं- फार वाईट वाटलं! कॉफी कल्चर रुजवणाऱ्या 'कॅफे कॉफी डे', 'बरिस्ता' अशा साखळ्यांचा रागही आला. कुठे ती कडवट 'एक्स्प्रेसो' कॉफी आणि कुठे 'अमृततुल्य' चहा...!!
           मुंबई-पुण्यात चहा कल्चर आलं त्याला अजून एक महत्वाचं कारण म्हणजे 'इराणी' हॉटेल्स! चिकन बिर्याणीसाठी इराणी हॉटेल्स जेवढी प्रसिद्ध नाहीत तेवढी चहासाठी आहेत. आम्ही 'नॉन-वेज' खात नाही असं शिष्टपणे म्हणणारे ब्राह्मण लोकसुद्धा निव्वळ चहासाठी इराणी हॉटेलची पायरी चढतातच!चर्नी रोड इस्टला स्टेशनच्या समोर एक टिपिकल इराणी हॉटेल आहे, नाव आत्ता अजिबात आठवत नाहीये!! साधारण हॉटेलची झकपक तिथे अजिबात नाही(हे विधान मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो त्यावरून करतोय..आताचं माहित नाही) पण तिथे ब्रिटीश साहेबांसारख्या थाटात चहा मिळतो. एका किटलीत काळा चहा, दुध आणि साखर वेगळं, ३-४ लहान-लहान कप बशा वगैरे आणि तेसुद्धा १५-२० रुपयात. लहानपणी बाबांनी निव्वळ अशा थाटात चहा प्यायला कौतुकाने तिथे नेलेलं आठवतंय..पुण्यात राहिलो तेव्हा 'गुडलक'ची फेरी कधीच चुकवली नाही. (स्वतःला पुणेकर म्हणवणारे पण 'गुडलक'मध्ये न गेलेले लोक मी पहिले आहेत आणि मी त्यांना पुणेकर मानतच नाही). गुडलकचा चहा आणि बन-मस्का खाऊन दिवसाची सुरवात करणं काय किंवा दिवसभराची कामं आटपून दुपारी जेवणाची वेळ टळून गेली की गुडलकला जाणं काय, दोन्हीची मजा तेवढीच!(काही वेळी आजूबाजूला असणाऱ्या अग्निहोत्रींचा त्रास होतो खरा..पण चालायचंच!! शब्दार्थ: चहाबरोबर सिगरेट लागणारे लोक म्हणजे अग्निहोत्री..). अजून दोन ठिकाणाचे चहा मला नेहमी आठवतात!! एक अर्थात शिरूरमध्ये चार वर्षं प्यायलेला भाईजानचा चहा आणि दुसरा दादर स्टेशनवर प्यायलेला 'बबन की चॉकलेट चाय'. बँक,लायब्ररी यानंतर मी जर का कुठे खातं उघडलं असेल तर ती जागा होती 'भाईजान कट्टा'..भाईजान म्हणायचा की "तुम्ही रोजच्यारोज चहाचे दोन रुपये देणार यात मला काहीच मिळत नाही. अकौंट(?) उघडा!! महिन्याला एकदम पैसे दिलेत की बरं पडेल"...मला त्याच्या या बोलण्यातलं लॉजिक आजपर्यंत कळलेलं नाही. नंतर पन्नास-शंभर थकले की कटकटसुद्धा करायचा. हां..पण चहा मात्र चोख बनवायचा!सकाळी एकदा-आणि संध्याकाळी एकदा चक्कर व्हायची..लोक चहा प्यायला यायचेच पण भाईजानचा कट्टा आमच्या कॉलेजचं रेडीओ केंद्र होतं. सिनिअर-ज्युनिअर्स-लेक्चरर्स-गा
वातले लोक- सगळ्यांच्या खबरा तिथे बसल्यावर मिळायच्या! परीक्षांच्या दिवसांमध्ये तर तिथे घालवलेला वेळ हा अमूल्य विरंगुळा होता. बबनच्या चहाच्या गोष्टी त्याच्याही आधीच्या- दहावी-बारावीच्या काळातल्या!! अनिसकडे मी, गौरव, अनुप रात्री अभ्यासाला जमायचो..आम्ही अभ्यास केल्याचं मला अजिबात आठवत नाही पण मध्यरात्री उठुन माहीम स्टेशन ते दादर स्टेशन हे अंतर तंगड्या तोडत फक्त चहा प्यायला गेल्याचं नीट आठवतंय!! आता चहा आम्हाला घरी बनवता येणार नव्ह्ता का??पण तेव्हा चहा पिणं हे निव्वळ वेळ घालवायचं उत्तम निमित्त होतं..त्या चहाची स्तुतीसुद्धा काय वर्णावी? प्लास्टिकच्या त्या लहानशा कपात, ट्रेनच्या आवाजात आणि असंख्य फेरीवाल्यांच्या आणि लोकांच्या गर्दीत त्या चहावाल्याला हुडकून 'चॉकलेट'च्या चवीचा चहा पिण्याची गम्मत वेगळीच! मी ती मजा नंतर कित्येकदा अनुभवली. पण ते दहावी-बारावीचे दिवस आठवले की मस्त वाटतं!  
                 माझी एक फॅंटसी आहे.एक मस्त आरामखुर्ची असावी..मऊ, गुबगुबीत...प्रदीप दळवी किंवा शिरवळकरांची एखादी कादंबरी किंवा टीव्हीवर क्रिकेट मॅच असावी...एक मोठ्ठा मग भरून अर्ध दुध-अर्ध पाणी, एक चमचा चहा पूड, दीड चमचा साखर घालून केलेला हलकी उकळी आलेला वाफाळता चहा..जो दुसऱ्या कुणीतरी करून पार हातात आणून दिलेला असावा..असं जर का झालं तर तो सोनियाचा दिनू होईल राव!!
                 शेवटी इतकंच म्हणेन की चहा न पिणारी, कॉफी पिणारी, कुठलीच 'मादक' पेय न पिणारी किंवा निव्वळ अति'मादक'च पेये पिणाऱ्या मंडळींचा मला अपमान करायचा नाही..पण ज्या वातावरणात मी वाढलो, जे समज कळायला लागल्यावर रूढ झाले, जी श्रद्धास्थानं निर्माण झाली त्यातलं 'चहा' हे पेय फार महत्वाचं नाव आहे.आता काळ बदलला असं लोक म्हणतात- हे विधान करायला माझी चाळीशीदेखील उलटली नाहीये..पण का कुणास ठाऊक- 'A lot can happen over a coffee' अशी मनोवृत्ती अजून तरी झाली नाहीये!! आम्ही चहाबाज अजूनही 'चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो' याचं मनोवृत्तीशी ठाम आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाच्या 'घड्याळ', 'बस', 'पाऊस' अशा कित्येक गोष्टींशी काही ना काही आठवणी निगडीत असतात! जरा नीट आठवून बघा- कुठलीतरी आठवण चहाशी नक्की निगडीत असेल याची मला खात्री आहे.. 


तुमचा,
'चाय'तन्य 
(ता.क. : पाऊस, चहा, भजी किंवा प्रवासातला चहा वगैरेसुद्धा खूप किस्से आहेत..ते कदाचित नंतर कधीतरी..तूर्तास इतकं चहा-पुराण पुरे!!)

1 comment:

Vishal Naikwadi said...

arvind kade tea maker ahe........:)