Pages

Saturday, January 28, 2012

'दोन लवस्टोरीज'

            'शाळा' सिनेमा पाहिल्यावर त्याच्या 'फेसबुक' पेजवर बऱ्याच जणांनी त्याचा 'सिक्वेल' पण काढायला हवा अशी मतं मांडलेली दिसली. बहुतेक यातल्या कित्येक मंडळींनी शाळा वाचलेलं नसावं किंवा टिपिकल भारतीय मनोवृत्तीप्रमाणे त्यांना 'ऑल वेल' शेवट अपेक्षित असावा!! मीसुद्धा सहज विचार केला की 'शाळा'चा पुढचा भाग बोकीलांनी लिहायचं ठरवलं तर त्यात काय असेल? जोश्याला त्याची शिरोडकर भेटेल?कधी?कशी?कुठे??वगैरे वगैरे...मे बी कॉलेजमध्ये...कॉलेज लाईफमध्ये जोशी, सुऱ्या, शिरोडकर कसे असतील? प्रश्नाचं उत्तर मिळायला फार वेळ लागला नाही कारण मला एकदम एका दुसऱ्या अफाट कादंबरीची आठवण झाली...'शाळा' यायच्या जवळपास दोन दशकं आधीची कॉलेजमधली प्रेमकथा. अर्थात 'दुनियादारी'!! सुहास  शिरवळकर यांनी अक्षरशः शेकडो कादंबऱ्या लिहिल्या, पण माझ्या मते 'दुनियादारी' लिहून त्यांनी तमाम दुनियेवर उपकार करून ठेवले आहेत! 
          'शाळा' बद्दल थोडक्यात सांगायचं तर एक नववीतला मुलगा, त्याचा टपोरी मित्र, दोघांना आवडणाऱ्या मुली, शाळेतल्या शिक्षकांचा,घरच्यांचा या वयात विचारसरणीवर असणारा प्रभाव, आणीबाणीसारखी अस्थिर सामाजिक परिस्थिती वगैरे! 'दुनियादारी'मध्ये असाच एक कॉलेजमधला मुलगा, त्याचा टपोरी मित्र आणि अख्खी टोळी अर्थात कट्टा गॅंग!, त्याला आवडणारी मुलगी इनफॅक्ट दोन मुली आणि त्याचा गोंधळ, आसपासच्या मुलांमुळे आणि अर्थात आई-वडिलांच्या विक्षिप्त वागण्याने त्याच्या आयुष्यात होणारी गुंतागुंत. दोन्ही कथानकं जरी संपूर्णपणे वेगळ्या सामाजिक, भौगोलिक आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या पात्रांविषयी असली तरी मला त्यात कित्येक समान धागे सापडले. 
          दुनियादारी खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं पण आजही हातात घेतलं की पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही! गोष्ट सुरु होते तेव्हा मुंबईहून निव्वळ आई-वडिलांपासून लांब जायचं म्हणून पुण्याला आलेल्या श्रेयस तळवळकरशी आपली ओळख होते. मग डी.एस.पी अर्थात दिग्या पाटील गोष्टीत येतो, कॉलेजमध्ये एक मोठी मारामारी होते, श्रेयसची दिग्या आणि कुप्रसिद्ध कट्टा  गॅंगशी  ओळख आणि मैत्री होते तोपर्यंत आपण कधी गोष्टीत गुरफटलो ते आपल्यालाच कळत नाही. सुशिंनी गोष्टीत लिहिलेल्या जागांपैकी जवळपास सगळ्या जागा आजही पुण्यात 'शाबूत' आहेत! त्यामुळे पुस्तकाची पारायणं झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा एस.पी, टिळक रोड, बादशाही बोर्डिंग वगैरे पाहिलं तेव्हा धन्य वाटलं होतं. कॉलेज म्हटलं की मित्र आले, प्रेम अर्थात आलंच मग त्या अनुषंगाने येणारे हेवेदावे आले, एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या टोळ्या आल्या. हे सगळं सगळं दुनियादारीमध्ये येतं! शाळेबद्दल बोलायचं तर अभ्यास, मारकुटे किंवा प्रेमळ शिक्षक आणि मुलांमध्ये होणारं त्यांचं कौतुक किंवा थट्टा, अभ्यासू आणि 'ढ' असे न पाडता पडलेले दोन गट, मुलींबद्दल वाटणारं आकर्षण, पौंगडावस्थेत पडणारे प्रश्न हे सगळं 'शाळा'मध्ये वाचायला मिळतं! 
           नायकांच्या 'फिलोसोफर-गाईडस' चा पुस्तकांच्या एकूण कथानकात खूप महत्वाचा वाटा आहे! आई आणि बहिणीशी नीटसं पटत नसलं तरी 'नरूमामा'शी मुकुंदाचं छान पटतं.दोघे इंग्लिश पिच्चर बघतात, मुकुंदा मामाला शाळेतल्या पोरींबद्दल सांगतो. मित्र लाईन मारतात ते सांगतो, मामा त्याला त्याच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगतो वगैरे! 'फेम इस द फ्रेग्रंस ऑफ हेरोईक डीड्स' (Fame is the fragrance of heroic deeds) असा गुरुमंत्र मुकुंदाला नरुमामाकडूनच मिळतो. दुनियादारीमध्ये श्रेयसला 'एम.के. श्रोत्री' भेटतो. त्याच्या कुटुंबाची कुणाला नीटशी माहिती नाही, पुण्यातल्या ठराविक बारमध्ये भर दुपारीसुद्धा सापडतो, श्रेयसला वेळोवेळी भेटत राहतो. श्रेयस आणि एम.के मध्ये एक अव्यक्त आकर्षण आहे. एम.के आयुष्याची तत्वज्ञानं मांडतो की जी श्रेयसला पटत राहतात. नरुमामापेक्षा एम.के चं पात्र दुनियादारीत जास्त अधोरेखित होतं आणि निराशसुद्धा करतं! याशिवाय मुकुंदाच्या बाबांनी त्याला समजून घेणं, कधी तरी आई आणि बहिणीने त्याची बाजू घेणं असे प्रसंग तुरळक असले तरी येतात, दुनियादारीमध्येसुद्धा 'रानी मा' आणि 'डॅडी' जसे वागतात तसे का वागतात याचं स्पष्टीकरण येतं तेव्हा 'माणूस चूकतोय की बरोबर आहे हे निव्वळ परिस्थिती ठरवते' हे पटल्यावाचून राहत नाही.  
           जोशी आणि श्रेयस हे कथेचे नायक असले तरी भाव खाऊन जातात ते सुऱ्या म्हात्रे आणि दिग्या पाटील. सुऱ्या, दिग्या ही 'टपोरी' विशेषण पक्कं सूट होणारी मंडळी! सुऱ्या जोश्याचा वेळोवेळी सल्ला घेतो तर दिग्या श्रेयसचा. दोघांनाही अभ्यासात काडीचा रस नाही. मित्रांसाठी वाटेल ते करण्याची तयारी, बाहेरून कितीही रफ-टफ वाटत असली तरी मनाने खूप हळवी असणारी, आवडणाऱ्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारी ही दोन पात्रं! केवडाने 'अजिबात नाही, वाट सोड' म्हटल्यावर निराश होणारा सुऱ्या आणि सुलेखाचं लग्नानंतर आलेलं पत्र वाचून शिवीगाळ करत रडणारा दिग्या. 'लई' म्हणजे 'लई' वाईट वाटतं ते वाचल्यावर. अर्थात दोन्ही गोष्टी इथे थांबत नाहीत कारण अजून 'हिरो'च्या गोष्टीचा शेवट झालेला नसतो. हिरोचा विचार करण्यापूर्वी थोडं हिरोईनकडे वळतो. 'शाळा'ची नायिका निर्विवादपणे 'शिरोडकर' तर दुनियादारीमध्ये श्रेयसला दोन मुली आवडत असल्या तरी नायिका मात्र 'शिरीन'च. मी मुद्दाम हे नमूद करू इच्छितो की 'शिरीन' हे आत्तापर्यंत मी वाचलेल्या मराठी पुस्तकांमधलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं 'स्त्री' पात्र आहे! श्रेयसच्या आधीच खूप वैयक्तिक गुंतागुंत असलेल्या आयुष्यात शिरीन येते, तिचंही वैयक्तिक आयुष्य गुंतागुंतीचंच! श्रेयसला खरंतर मिनू आवडत असते, तिलाही तो आवडत असतो, तिने बिचारीने तर तिच्या प्रेमाची कबुली पण देऊन टाकलेली असते पण श्रेयस शिरीनमध्ये गुंतलेला! शिरीन त्याच्यापेक्षा दोन वर्षं मोठी, तिचं लग्न ठरलेलं पण तरीही तीसुद्धा श्रेयसमध्ये अडकतेच. त्याने तिच्या जवळ येण्याचा केलेला प्रयत्न, तिने त्याला दिलेला मूक होकार आणि नंतर बेभान झालेल्या श्रेयसला थांबवणं, समजावणं आणि गोष्ट संपता संपता भरला संसार टाकून त्याच्याकडे परत यायचा प्रयत्न करणं. हे सगळं होऊनसुद्धा ती कधीच अश्लील, लफडेबाज किंवा श्रेयसला लटकवत ठेवणारी टाईपची वाटत नाही. शिरवळकरांनी 'शिरीन' च्या तोंडी लिहिलेले संवाद तिच्यात अडकायला भाग पाडतात. 'शाळा' मधली शिरोडकर अर्थात उत्कट वगैरे नाही कारण तिचा वयोगटच वेगळा आहे. सबंध 'शाळा' पुस्तक ही जोश्याने सांगितलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे शिरोडकरबद्दल आपण ऐकतो ते त्याच्याच तोंडून. अर्थात बोकीलांनी शाळकरी मुलाच्या वयाचा, समजुतीचा विचार करून 'शिरोडकर' इतकी सुंदर मांडली की सुजय डहाकेंना त्यांची 'शिरोडकर' आठवून सिनेमा काढावासा वाटला. तिला फारसे संवाद नाहीतच पण मोजक्या संवादात ती मनात बसून जाते. खरंतर तिचं पात्र वास्तविक प्रसंगांमध्ये असण्यापेक्षा जास्त जोशीच्या विचारात आणि त्याच्या बोलण्यातच आहे. पण वाचणाऱ्या प्रत्येकाला त्याचा शाळेतला 'फर्स्ट क्रश' आठवला नाही तर तो ठोकळा माणूस आहे किंवा तो मुलगा नसून 'मुलगी' आहे असं समजायला हरकत नाही! 
            सरतेशेवटी कथेचे नायक...मुकुंद जोशी उर्फ जोश्या आणि श्रेयस तळवळकर उर्फ यश. गोष्टींमध्ये कित्येकदा गोंधळलेले वाटणारे नायक अचानक जबाबदार होतात, कधी हळवे होतात, रडतातसुद्धा! पण संपूर्ण कथा ही या दोन पात्रांच्या दृष्टीकोनातून लिहिल्या असल्याने त्यांचं कुठलंच वागणं कधीच अतार्किक वाटत नाही! 'As you become more and more personal, it becomes more and more universal' असं वपुंनी लिहिलंच आहे. याच विधानाला अनुसरून वाचताना आपण जोशी आणि श्रेयसशी जास्तीत जास्त कनेक्ट होतो, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. जोशीचा उत्स्फूर्तपणा, शिरोडकर आवडणं, सुऱ्याला सल्ले देणं, मामाशी गप्पा, पुस्तकाच्या शेवटाला नेटाने अभ्यास करणं वगैरे इतकं आदर्शवादी वाटत जातं की त्याचा काहीसा हेवासुद्धा वाटतो. दुसरीकडे श्रेयसचं कौटुंबिक, सामाजिक आणि काही अंशी शैक्षणिक आयुष्य जवळपास बरबाद होताना पुस्तकात दिसतं. पण तरीही त्याच्याशी जवळीक वाटत राहते. दिग्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी खोटं बोलणारा यश रस्त्यात पडलेल्या बेवड्याला लुटायच्या उन्मेष अर्थात उम्याच्या प्लानला विरोध करतो तेव्हा तो नैतिकतेचा पुतळा वाटला नाही तरच नवल. 
            'शाळा' पुस्तक संपायच्या आसपास त्याचा शेवट चांगला होईल अशी एक आशा असते पण तसं होत नाही. फावड्या, सुऱ्या, चित्र्या, शिरोडकर या सगळ्यांचंच अचानक जोश्याच्या आयुष्यातून निघून जाणं चटका लावतं. जोशीचं इतर मुलांपेक्षा असलेलं वेगळेपण गोष्टीतून वेळोवेळी जाणवत असलं तरी त्याचं 'एकटेपण' शेवटी अधोरेखित होतं आणि गोष्ट संपते. दुनियादारीमध्ये 'गोड' शेवट वगैरे नसणारे याची कल्पना आधीच आलेली असते. नेमकी गोष्ट कुठे थांबेल इतकीच काय ती उत्कंठा..पण गोष्ट अशीच थांबली तर मग ती शिरवळकरांची कादंबरी कसली...?? गोष्टीच्या शेवटच्या ओळीत एक 'ट्विस्ट' येतो आणि कुणीतरी थोड्या वेळापूर्वी कानफटात वाजवून सुन्न केलेल्या गालावर पुन्हा जोरात चापट मारल्यासारखं होतं..मग अनाहूतपणे आपण पुन्हा त्या एका ओळीचा आधी गोष्टीत आलेला संदर्भ हुडकून काढायला पुन्हा कादंबरी चाळायला घेतो आणि नकळत पुन्हा वाचायला लागतो.  
             या दोन्ही कादंबऱ्यांची तुलना करण्याइतकी माझी लायकी नाही पण एक वाचक म्हणून आणि या दोन्ही गोष्टींचा निस्सीम चाहता म्हणून हे लिहावसं वाटलं. दोन्हीपैकी कोणतं पुस्तक जास्त चांगलं वगैरे प्रश्न मला पडला नाही आणि ज्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचली आहेत त्यांना हे नक्की माहित असेल की 'दोन्हीपैकी एक' ठरवणं वेडेपणा असेल. 'शाळा' सिनेमा अजून तरी पाहिला नाहीये पण लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया ऐकून बघायची उत्कंठा वाढली आहे हे नक्की! दुनियादारीवर सतीश राजवाडे यांनी एक मालिका सुरु केली होती पण संजय नार्वेकर, शर्वेरी जमेनीस, विनय आपटे अशी मोठी नट मंडळी असून ती चालली नाही. मुळ कथेची त्यात फार मोडतोड झाली असं मला वाटतं. येत्या काळात दुनियादारीवरसुद्धा एखादा चांगला चित्रपट येईल अशी मी आशा करतोय!


चैतन्य   

Saturday, January 21, 2012

व्हर्चुअल स्वातंत्र्याची ऐशी तैशी!!


           भारतात मध्यंतरी कपिल सिब्बल विरुद्ध फेसबुकर्स अशी जुंपली होती. लोकपाल विधेयकाला सहाय्य करणाऱ्या आणि सरकारला, सरकारी धोरणांना, नेत्यांना विरोध करणाऱ्या तमाम फेसबुकर्सनी सरकारी नेत्यांची फेसबुकच्या माध्यमातून रेवडी उडवली. नेत्यांना मिरच्या झोंबल्या नसत्या तर नवल होतं आणि म्हणून कपिल सिब्बल यांनी सरकारचा चेहरा म्हणून फेसबुक बंद करू किंवा त्याच्या वापरावर बंधनं आणू वगैरे घोषित करून 'राग' दिले आणि अजून हसं करून घेतलं. त्यानंतर गेला आठवडाभर इंटरनेटवर 'सोपा' आणि 'पिपा' या अमेरिकन जुळ्या विधेयकांच्या विरोधात आगडोंब उसळला.भारतीय राजकारण्यांनी संसदेत लोकपाल मंजूर होण्याचा धसका घेतल्यासारखा प्रत्येक इंटरनेट युझरने या सोपा-पिपाचा धसका घेतला. ही दोन्ही विधेयके अमेरिकन सिनेटमध्ये मांडली गेली आणि विकिपीडिया, फेसबुक, याहू, गुगल अशा इंटरनेट 'जायंट्स'नी कोट्यावधी लोकांच्या माध्यमातून  त्याला विरोध दर्शवला. लोकांच्या विरोधाची दाखल घेत अखेर सिनेटने यावरचा निर्णय घेणं अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं आहे. हे कळल्यावर 'मरण' काही दिवस टळलं म्हणून लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

           'सोपा' आणि 'पिपा'मुळे लोकांच्या 'बौद्धिक मालमत्तेचं' (intellectual property) चं रक्षण होईल आणि नेटवर सुळसुळाट झालेल्या 'पायरसी' नामक प्रकाराला आळा बसेल असा गंभीर आणि व्यापक हेतू विधेयक मांडणाऱ्यानी सांगितला. तर 'सोपा' आणि 'पिपा'चा आडोसा घेऊन सरकार लोकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालतंय असा उलटा सूर गुगल, याहू, फेसबुक अशा मंडळींनी लावला. दोन्ही बाजू शंभर टक्के खऱ्या नाहीत आणि खोट्याही नाहीत. गेल्या जवळपास दहाएक वर्षात वाढलेलं इंटरनेटचं प्रस्थ हे अर्थातच या सगळ्याचं मुलभूत कारण. आज कोट्यावधी लोक  बँकेच्या कामांपासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आंतरजालावर अवलंबून आहेत. या विधानाला पुरावा म्हणून सांगतो- ब्रिटनमध्ये असलेल्या एका भारतीय कुटुंबाने 'आम्ही कोथिंबीरसुद्धा ऑनलाईन विकत घेतो' असं मला एकदा सांगितलं होतं.  आंतरजालावरील मनोरंजनाबद्दलच बोलायचं तर खेळाचे सामने 'लाइव्ह' दाखवणाऱ्या साईट्स, युट्युब, मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटांच्या अनधिकृत प्रती, पुस्तकांच्या अनधिकृत प्रती असं सगळं सगळं आलं. जवळपास ९५% लोक या सगळ्यापैकी काही ना काहीतरी वापरत/पाहत असतील. सोपा आणि पिपा ही विधेयके जर का कायदा म्हणून लागू झाली तर वर लिहिलेलं अनधिकृत साहित्य जाहीर करणाऱ्या साईट्स धोक्यात येतीलच पण या साईट्सवर जाहिरात करणाऱ्या अधिकृत-अनधिकृत लोकांवर, या साईट्स वापरणाऱ्या युझर्सवर अशा कुणावरही 'सोपा'चा सोटा पडू शकतो. इंग्रजी चित्रपट, गाणी, गेम्स यांच्याशी संबंधित नसलेल्या मंडळींनी वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये कारण हा कायदा फक्त 'अमेरिकन बौद्धिक मालमत्ते'चं रक्षण करणार आहे. हिंदी, मराठी चित्रपट, गाणी वगैरेंशी त्यांना घेणं-देणं नाही. पायरसी हा प्रकार कला, साहित्य वगैरे पुरता मर्यादित राहिलेला नसून बोगस, अवैध औषधे विकणारी मंडळीसुद्धा जगात आहेत आणि म्हणून 'फायझर' सारखी जगातली सगळ्यात मोठी औषधे बनवणारी कंपनी 'सोपा' आणि 'पिपा'ला सहाय्य करणाऱ्या लॉबीमध्ये आहे. ही विधेयके मंजूर झाली तर? खरंच लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं येतील का?सरकार कुणालाही अटक करेल, खटला भरेल, दंड करेल वगैरे वगैरे...हे शक्य आहे का? तर्कशुद्ध उत्तर- नाही! कारण पाहिली गोष्ट- पायरेटेड गोष्टी 'पसरवणाऱ्या' लोकांना धरणं पर्यंत ठीक आहे पण सामान्य इंटरनेट युझरला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली तर सरकारलाच डोकेदुखी होईल. त्यांच्याकडे सध्या देशाची अर्थव्यवस्था, दिवाळखोर बँका असे काही जास्त महत्वाचे मुद्दे आहेत. दुसरा मुद्दा- पायरसी हा प्रकार इंटरनेट आल्यावर 'रूढ' झाला पण तो 'अस्तित्वात' त्यापूर्वीही होता फक्त पायरसी करायचे मार्ग वेगळे होते. बरं, 'तंत्रज्ञान' ही सदैव नवनवीन गोष्टींचा आधार घेत पुढे जाणारी गोष्ट आहे हे विधान खरं मानलं तर येत्या काळात कायद्यातून पळवाटा काढून पायरसी करण्याचं नवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येईल.  

             विकिपीडिया २४ तास बंद झालं आणि कित्येक लोकांचे दिवसभर अक्षरशः हाल झाले. बाकी याहू, गुगल, फेसबुक वगैरेंचा या विधेयकांना विरोध करताना स्वार्थ किती आणि 'व्यक्तीस्वातंत्र्य' वाला परमार्थ किती हासुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. (विकिपीडियाचं नाव यांच्यात मुद्दाम लिहित नाही. कारण जगातील सगळ्यात मोठा माहितीकोश म्हणून मी त्याचा आदर करतो आणि इतर कारणं आता स्पष्ट करणारे!). गुगल, फेसबुक आणि याहू हे या क्षणाला जगातले खूप मोठे 'डेटाबेसेस' आहेत. त्यांच्याकडे जगातल्या कोट्यावधी लोकांची असणारी माहिती ही लोकांनी स्वखुशीने दिलेली आहे. मध्यंतरी फेसबुकवर कुणीतरी लिहिलं होतं- 'लोकहो सावधान, फेसबुकला तुमच्याबद्दल तुमच्या आईपेक्षा जास्त माहिती असू शकते'. एकीकडे कायदा लोकांचं स्वातंत्र्य काढून घेतोय म्हणून आपण निराश होतो, विरोध करतो दुसरीकडे गुगल, फेसबुकला आपण स्वखुशीने स्वातंत्र्य बहाल करतो. "I have read and agreed to the terms and conditions" म्हणताना कुणीच काही वाचलेलं नसतं. जीमेल किंवा फेसबुकवर आपल्या इमेल किंवा मेसेजमध्ये बोलल्या गेलेल्या वस्तूंच्या, विषयांच्या जाहिराती आलेलं कधी पाहिलंय? ही सगळी मंडळी आपण त्यांना देत असलेली माहिती बाहेर विकू शकतात आणि हो, हा हक्क आपण त्यांना देतोय. सायबर गुन्हे वाढायला या साईट्स जबाबदार असल्याचं आपण ऐकलं देखील आहे. विकिपीडियाने २४ तास सेवा संपूर्ण बंद ठेवून आपला विरोध दर्शवला पण गुगल किंवा फेसबुक २४ मिनिटंदेखील बंद पडल्याचं मला माहित नाही. सरकारी धोरणांना विरोध करताना आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत नाहीये ना याची खात्री करावी लागेल. 

           'सोपा' आणि 'पिपा' हे कायदे वस्तुस्थितीत येणं निदान सध्यातरी शक्य वाटत नाहीये पण 'मेगाअपलोड' नावाच्या साईटच्या मालकांवर झालेली कारवाई 'सरकार सावधान आहे' याची जाणीव करून द्यायला पुरेशी आहे. त्यामुळे तूर्तास सरकार खुश आणि पब्लिक खुश अशी परिस्थिती असली तरी पुढील काळात सोपा आणि पिपाची कुठलीतरी पिल्लावळ पुन्हा नाक वर काढणार हे वेगळं लिहायला नकोच. या कायद्यांचा मुलभूत हेतू जरी 'सोपा' आणि चांगला असला तरी त्यातील मुद्दे हे बिनडोकपणे लिहिले गेलेले आहेत असं माझं मत आहे. बरं, 'अमेरिका' असली धोरणं राबवते मग आम्ही का नाही म्हणून जगातल्या इतर देशांमध्ये असे काहीतरी कायदे चर्चेत आले तरी कुणाला नवल वाटायला नको. (सिब्बलची तर तयारीदेखील सुरु झाली असेल). 'इंटरनेट आहे तसं राहू द्या..लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला येऊ देऊ नका' अशा अर्थाचे अनेक फोटोस सध्या सर्फिंगमध्ये बघण्यात येतायत. शांत डोक्याने विचार केला तेव्हा दोन मुद्दे सुचले: १. अमेरिकेपुढे, जगापुढे इतर अनेक महत्वाचे आणि लोकांच्या वैयाक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे मुद्दे आहेत, जगात अजूनही कित्येक कोट लोक उपाशी झोपतायत, त्याचा आधी विचार व्हावा.  २.'माळरानावर मोकळं सोडलेला बैल म्हणजे स्वातंत्र नव्हे..तर त्याच्या गळ्यात काही फुटांची एक दोरी घालून दोरीचं दुसरं टोक एखाद्या झाडाला बांधून त्या बैलाला तेवढं अंतर मोकळं सोडणं म्हणजे स्वातंत्र' अशा अर्थाचं काहीतरी विनोबा भावे म्हणून गेलेत. काहीसा असा निकष जर का 'व्हर्चुअल फ्रीडम'ला लावता आला तर ते योग्य होईल. स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे अमेरिकन लोकांना चांगलंच माहितीय त्यामुळे त्यांची काही काळजी नाही पण भारतीय लोकांना ते कसब जमवावं लागेल.


चैतन्य

ता. क. भारतातल्या खेडोपाड्यात 'विजेचा अभाव' हे वाढणाऱ्या लोकसंख्येचं महत्वाचं कारण आहे अशी एक विचारसरणी आहे. जर का इंटरनेट वापरावर बंधनं आली तर जागतिक लोकसंख्या वाढायची...तेव्हा निदान लोकसंख्येला आळा घालण्यासाठी का होईना पण असले बिनडोक कायदे आणू नका ही अंकल सॅमला विनंती!!

Sunday, January 8, 2012

ससा आणि कासव


--इसापनीती, हितोपदेश, पंचतंत्र मधल्या गोष्टी लहानपणी वाचून, ऐकून मोठेपणी व्यवहारात त्यांचा नेमका फायदा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही. उलट, गेल्या काही वर्षात भेटलेल्या माणसांमुळे, आलेल्या अनुभवांमुळे पंचतंत्र सांगतं त्याच्या उलट जगात घडतं या मताचा मी झालोय. म्हणून नवीन वर्षी एक नवीन प्रयोग सुरु करतोय! वर्षानुवर्ष ऐकलेल्या इसापाच्या गोष्टी नव्या स्वरूपात!! आवडतायत का नक्की सांगा आणि आपल्या भल्याबुऱ्या प्रतिक्रिया द्या. या गोष्टींचं तात्पर्य ठरवण्याची जबाबदारी मी वाचकांवर सोपवतो आहे!--

ससा आणि कासव (ईशान्यनिती १)


सूर्य डोक्यावर आला होता. दूरवर पक्षांचा गुंजारव कानावर पडत होता. नदीकिनारी असणारी हिरवीगार झाडं संथ वाऱ्यावर लयीत हलत होती. पाण्यावर हलकेच उठणारे तरंग, मधूनच उड्या मारणारे मासे यामुळे नदी जिवंत असल्याचा भास होत होता. ससा ऐटीत उड्या मारत नदीवर पोहोचला. नुकतंच कुठूनतरी उकरून काढलेल्या गाजराने त्याचा पोटोबा भरला होता. तहान भागवावी आणि कुठेतरी सावली शोधून निवांत पडावं असा त्याचा प्लान होता. पाणी पिऊन मागे वळताना त्याला कुणीतरी शुक-शुक केलं. त्याने दचकून आजूबाजूला पाहिलं. कुणीच न दिसल्यामुळे तो थोडा घाबरला. पुन्हा कुणीतरी शुक-शुक केलं. यावेळी त्याने कान टवकारून आवाजाच्या दिशेने पाहिलं. त्याची नजर समोरच्या एका मोठ्या दगडावर पडली. नीट पाहिल्यावर त्याला लक्षात आलं की तो दगड नसून एक मोठ्ठ कासव आहे! सशाने आसपास बघत स्वतःच्या छातीवर हात ठेवत विचारलं-
"मी?"
"हो तूच.."
"माफ करा..मी आपल्याला ओळखलं नाही.."
"हो..मला कल्पना आहे त्याची..जवळपास ३-४ हजार वर्षांपूर्वी आपल्या दोन पूर्वजांमध्ये भांडण झालं होतं, तेव्हापासून पुढच्या शेकडो पिढ्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं"
"काय सांगताय?मी तर कधीच कुणाकडून कुठल्याच 'खानदानी दुष्मनी' बद्दल ऐकलं नाहीये"
"असं म्हणतोस..??आश्चर्य आहे!"
"कशावरून झालं होतं आपल्या पूर्वजांचं भांडण?क्युरिओसिटी वाटली म्हणून विचारतोय बरं का.." सशाने कासवाकडे संशयी नजरेने पाहत विचारलं. कासवाने इसापनीतीतली सगळ्यांनी पिढ्यान-पिढ्या ऐकलेली गोष्ट त्याला सांगितली. 
"आमचं वयोमान तुमच्यापेक्षा जरा जास्त असतं ना..ती शर्यत जिंकलेलं कासव म्हणजे माझ्या खापर खापर पणजोबांचे चुलत चुलत खापर खापर पणजोबा.." कासवाने कौतुकाने सांगितलं. सशाने गोष्ट ऐकली आणि तो पोट धरधरून हसायला लागला. कासव काहीच न कळल्यासारखं त्याच्याकडे टकामका बघत राहिलं. दोनेक मिनिटांनी ससा हसू आवरत म्हणाला-
"इतकी विनोदी गोष्ट मी माझ्या आयुष्यात ऐकली नाही"
"विनोदी काय होतं त्यात? तुमचा पूर्वज हरला हे मान्य कर"
"ओके..ओके..करतो..हरला असेल बुवा.." ससा खिदळत म्हणाला "आणि तुम्ही म्हणताय की तुमचे कोण ते पणजोबा जिंकल्याचं जगाला माहितीय?"
"अलबत..त्या काळी इसाप नावाचा एक माणूस होता..त्याला जंगलातल्या सगळ्या बातम्या माहित असायच्या..त्याने जगाला त्या गोष्टी सांगितल्या, नितीमत्तेचे धडे दिले आणि तो फेमस झाला"
"खरंच?" प्रश्न विचारताना ससा अंतर्मुख झाला.
"आम्हा कासवांना खोटं बोलता येत नाही" कासव फणकाऱ्याने म्हणालं. 
"अस्सं..माझी एक विनंती आहे!" ससा अपेक्षेने कासवाकडे पाहत म्हणाला.
"बोल.."
"आपण परत शर्यत करायची??" 
कासवाने आत्तापर्यंत कायम 'त्या' शर्यतीबद्दल ऐकलं होतं. 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे त्याच्या मनावर कायम ठसवलं गेलं होतं. आज हजारो वर्षानंतर ससा पुन्हा हरणार याची त्याला खात्री होती. त्याने क्षणाचाही विचार न करता 'हो' म्हटलं. 
"आर यु शुअर?" सशाने पुन्हा विचारलं. कासवाने मान डोलावली. नदीकिनारी शर्यत सुरु करून दूर जंगलात माळरानावर एका पिंपळाच्या झाडाखाली संपवायची असं ठरलं. एक-दोन-साडेमाडेतीन म्हणत शर्यत सुरु झाली. कासव चालायला का पळायला लागलंय याची खात्री झाल्यावर ससा उड्या मारत निघाला. अर्ध्या तासात तो पिंपळाच्या झाडापाशी पळत पोहोचला.
मावळतीच्या सुमारास हलत-डुलत कासव माळरानावर पोहोचलं. लांब पिंपळाच्या झाडापाशी बसलेल्या पांढऱ्या शुभ्र सशाला बघून त्याला धक्का बसला. ते थोडसं वेग वाढवत त्याच्या जवळ जाऊन पोहोचलं. दुपारी भेटलेला हाच तो ससा असल्याची त्याने खात्री केली आणि हताशपणे म्हणालं-
"तरी मला आई म्हणाली होती की उगाच कुठल्या भेटलेल्या सशाशी शर्यत करायला जाऊ नकोस..हरशील.."
"ठीके रे कासवा..चालायचंच.."ससा दुपारपासून पहिल्यांदाच कासवाशी एकेरीत बोलत होता.
"म्हणजे तुला पूर्वी झालेली शर्यत माहिती होती आणि म्हणून यावेळी तू विश्रांती घेऊन झोपला नाहीस..बरोबर??" 
"तेव्हा काय झालं होतं तुला सांगू का?" सशाने विचारलं. कासवाने तोंड पाडत मान डोलावली.
"मुळात तुझ्या त्या आजोबा का पणजोबांशी तरी शर्यत लावल्याचा माझ्या पूर्वजाला पश्चाताप झाला. म्हणून त्याने शर्यत पूर्ण न करता अर्धवट सोडून दिली. आमच्या नंतरच्या प्रत्येक पिढीला हेच शिकवलं गेलं की शर्यत ही दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये होऊ शकते..आज तुझ्याशी बोलताना त्या शर्यतीचे लोकांनी काय निष्कर्ष काढले ते मला कळलं म्हणून मी मुद्दाम तुझ्याशी शर्यत लावली"
"खोटं सांगतोयस तू.." कासव चिडून म्हणालं.
"खोटं कशाला सांगू? मला सांग..त्या शर्यतीतून लोकांनी काय अर्थ काढला? 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' बरोबर?"
"हो.."
"तुला 'हेड स्टार्ट' नावाची गोष्ट माहितीय??एखाद्या शर्यतीत, स्पर्धेत जर का कुणाला सुरुवातीलाच मोठी आघाडी मिळाली की लोक त्याला हेड स्टार्ट म्हणतात..जी माणसं 'स्लो एण्ड स्टेडी विन्स द रेस' हे आपल्या शर्यतीच तात्पर्य शिकून मोठी झाली त्यांना नंतर त्यातला फोलपणा कळला. त्या गोष्टीने किती नुकसान होतंय त्यांचं ठाउके तुला? शिक्षण, करीअर अशा महत्वाच्या ठिकाणी सुरवातीला महत्वाचा असणारा हेड स्टार्ट कुणी घेतच नाही..तुझे ते पणजोबा आदर्श सगळ्यांचा!!" कासव मुकाट्याने ऐकत होतं.
"आणि मित्रा, अलीकडच्या काळात तर ही स्पर्धा ससा-कासव अशीसुद्धा पाहिलेली नाही. चेतन भगत नावाच्या इसापासारख्या नितीमुल्याचे धडे देणाऱ्या माणसाने 'उंदरांची स्पर्धा' अशी नवीन गोष्ट रूढ केलीय..त्यामुळे तुमची सद्दी संपली बुवा..हजारो वर्षं चालत आलेल्या गोष्टी कधी ना कधी बदलतातच नाही का? त्यामुळे माझ्या मते आपलीही गोष्ट बदलायची वेळ आली आहे.."
"खरंय तुझं..तू ही शर्यत जिंकून 'फास्ट एण्ड स्टेडी विन्स द रेस' असा नवीन धडा शिकवलास..." कासवाने मनापासून पराभव मान्य करत म्हटलं.
"तुला आधी म्हटलं तसं..आपण तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही मित्रा..मी शर्यत पूर्णच केली नाहीये..."
"काय?" कासवाने आश्चर्याने तो कुठे उभा आहे ते पाहिलं. ससा पिंपळाच्या झाडापासून दोन हात अंतरावर उभा होता.
"मग आता?" कासवाने पुन्हा विचारलं.
"गेल्या वेळी आपल्या शर्यतीचे निष्कर्ष लोकांनी काढले. तुझे पूर्वज अमर झाले. यावेळी काय होईल तेसुद्धा तू आणि लोकांनी ठरवायचं"  असं म्हणत ससा मावळतीच्या दिशेला उड्या मारत निघून गेला. कासव त्याच्याकडे आणि पिंपळाच्या झाडाकडे आळीपाळीने पाहत राहिलं.
**