Pages

Wednesday, March 28, 2012

४७ सेकंद

         "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, जरी तर्कशुद्ध नसला तरी असतो! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?" कॅसल बेकेटला विचारतो. 


मी पाहत असलेल्या अनेक सीरिअल्समधली एक सीरिअल- 'कॅसल'. एक खून-रहस्यकथा लिहिणारा लेखक एका शहरातल्या पोलिसांच्या टीमला गुन्हे सोडवायला मदत करतो ही त्या शोची जनरल थीम. काल त्याचा '४७ सेकंद' नावाचा एपिसोड पाहिला. न्यूयॉर्कमधल्या कुठल्याशा निदर्शनांच्या दरम्यान एक बॉम्ब फुटतो आणि ५ लोक ठार आणि २८ जखमी होतात. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांमध्ये बॉम्ब फुटलेल्या ठिकाणी काढला गेलेला एक ४७ सेकंद आधीचा फोटो असतो. नेमकं त्या ४७ सेकंदात काय घडलं? बॉम्ब कुणी ठेवला? का ठेवला? वगैरे वगैरे शोधून काढणं म्हणजे सगळा एपिसोड. कॅसलचे या आधी मी कित्येक चांगले एपिसोड पहिले आहेत मग अचानक कालच्या एपिसोडवर अख्खा ब्लॉग का?    
कालच्या एपिसोडने मला थोडं अंतर्मुख केलं. माझ्याबरोबर हा शो पाहणाऱ्या कुणाला काही विशेष वाटलं नसावं कारण शोच्या फेसबुक पेजवर भलतीच चर्चा सुरु होती. म्हणून ब्लॉग लिहिण्यापूर्वीसुद्धा खूप विचार केला. खरंच लिहावं का म्हणून?असं तर वाटणार नाही की उगाच काहीतरी विषय काढायचा आणि लिहित सुटायचं म्हणून लिहिलंय? सध्या मराठी ब्लॉगिंग हा प्रकार थोडासा वादग्रस्त झाला असल्याने साशंकता होती. पण मग म्हटलं की कुणाला काय वाटायचं आहे ते वाटून दे..मी माझ्या डोक्यात येतंय ते सांगायचा प्रयत्न करतोय. ज्यांना पटेल ते वाचतील इतरांनी फु.गो.घ्या.
तर- कॅसलचा काल भर जितका तपासावर होता तितकाच स्फोटामुळे व्यक्तिरेखांच्या मनावर होणाऱ्या परिणामांबद्दल होता. स्फोट मेलेल्या लोकांपैकी कुणाला टार्गेट करून तर झाला नाही ना याचा तपास करण्याचा प्रयत्न होतो. मरण पावलेल्या पाच लोकांमध्ये एक शहर फिरायला आलेला टूरिस्ट असतो, एक दोन मुलांची आई असते, एक त्याच्या कुटुंबातला कॉलेजला गेलेला पहिलाच मुलगा असतो वगैरे. सगळ्यातून हाच निष्कर्ष निघतो की सगळे मरण पावलेले लोक अहेतुक गेले. निराश होऊन कॅसल बेकेटला म्हणतो "दरवेळी आपण ज्या खुनांचा तपास करतो तेव्हा मेलेल्या व्यक्तीला मारण्यामागे खुन्याचा काहीतरी हेतू असतो, काहीवेळी तर्कशुद्ध नसला तरी हेतू असतोच! पण या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांचं काय?एका क्षणात त्यांचं भविष्य, त्यांचे प्लान्स सगळे नाहीसे झालेत."
मला त्या सगळ्या व्यक्तिरेखांच्या सिरिअस होण्याने आधी नवल वाटलं. ५ ठार २८ जखमी? मुंबईत गेल्या काही वर्षात आपण इतके स्फोट अनुभवले आहेत त्यामुळे स्फोट झाला ना?त्यात काय एवढं?अमेरिकन शो असला म्हणून एका स्फोटाचं इतकं काय उदात्तीकरण सुरु आहे असे सगळे विचार डोक्यात येऊन गेले. मग अचानक स्वतःच्याच निर्ढावलेपणाचा राग आला. शांतपणे बसून आठवत होतो की आपल्याकडे हल्ला झाला की किती दडपण असतं ते! कळायला लागल्यापासून ११ जुलै, २६ नोव्हेंबर अशा मुंबईत झालेल्या सगळ्या हल्ल्यांच्या वेळी मी तो अनुभव खूप जवळून घेतलाय. वर्षाच्या काही ठराविक तारखा दिनविशेष असल्यासारख्या आपण एखाद्या बॉम्ब-स्फोटासाठी लक्षात ठेवतो याला दुर्दैव म्हणायचं की करंटेपणा? अमेरिकेत बॉम्ब-स्फोट होत नाहीत का काय याचा शोध घ्यायला मी विकिची मदत घेतली. गेल्या साधारण तीन वर्षात सगळ्या अमेरिकेत मिळून निव्वळ एका हल्ल्याची नोंद अशी होती जिथे काही लोक मरण पावले. कित्येक नोंदी तर अशादेखील होत्या की बॉम्ब सापडला आणि डिफ्युस केला गेला, फक्त एका माणसाचा एक पाय गेला वगैरे. याउलट त्याच लिस्टमध्ये भारतात जवळपास दर महिन्याला होणाऱ्या एका स्फोटाची नोंद आहे. दर स्फोटात लोक मेले आहेत, जखमी झाले आहेत. 
फार जास्त लिहिण्यापूर्वी मी स्पष्ट नमूद करतो की मला या ब्लॉगमधून कुठलेही निष्कर्ष काढायचे नाहीत. उलट प्रश्न पडलेत आणि त्यांचा फार गुंता झालाय. निदान लोकांनी वाचून काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. मुंबईत गेल्या वर्षी दादरमध्ये झालेल्या स्फोटानंतर शी. चीडब्रम (नावाचा असा उल्लेख टाईप करतानाच्या चुकीने झालेला नाही) या आपल्या गृहमंत्र्यांनी उधळलेली मुक्ताफळं आठवली आणि भारतीय असण्याची लाज वाटली (वाक्य लिहायला खूप जड गेलं पण दुर्दैवाने ते खरं आहे). अमेरिकन लोकांचा खूप हेवा वाटला मला. वेनसडेमधला नसीर आठवला जो म्हणतो की सकाळी कामाला बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप घरी येईल का याची खात्री घरातल्या बाईला नसते. हे सगळं कधी थांबणार? अमेरिकेत एक ९/११ चा हल्ला झाला आणि त्यांनी आज दहा वर्षांनीसुद्धा अफगाणिस्तानातून सैन्य पूर्णपणे हलवलेलं नाही. आपण मात्र कसाबची सरकारी पाहुणा असल्याच्या थाटात सरबराई करतोय. अमेरिकेच्या धोरणाचं कौतुक करण्याचा अजिबात हेतू नाहीये पण याच ब्लॉगच्या अनुषंगाने आठवलं- माझ्याबरोबर जॉन नावाचा एक अमेरिकन काम करतो. त्याच्याशी परवा गप्पा सुरु होत्या. अमेरिकन राजकारणाचा विषय निघाला. लौकरच निवडणुका होतील. इथे अध्यक्ष निवडून येण्यापूर्वी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीसुद्धा प्रत्येक पक्षातर्फे वेगळी निवडणूक होते. प्रत्येक उमेदवार त्याचे अजेंडे मांडतो वगैरे. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. तो बोलता बोलता सहज म्हणाला- "चैतन्य, सामान्य अमेरिकन माणसाला कुठल्या उमेदवाराची आंतरराष्ट्रीय धोरणं काय आहेत याच्याशी घेणं-देणं नाही. ९/११ झाल्यानंतर अगदी आजपर्यंत आमचे अधिकारी एखाद्याला दहशदवादाच्या निव्वळ संशयाखाली अटक करताना दिसतात.सामान्य माणसाला पुरेपूर कल्पना आहे की आमचं सैन्य इराक किंवा अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून बसलंय. आम्हाला मात्र असंच वाटतं की त्यांनी त्यांच्या देशात सुरक्षित असावं. माझ्या देशाची दहशतवादाविरुद्ध काहीही धोरणं असोत मला माझ्या सरकारने माझ्या देशात फक्त सुरक्षित ठेवणं अपेक्षित आहे." मी मनात म्हटलं होतं- "आम्हा भारतीयांना तरी काय वेगळं वाटतं असणारे? पण आमच्या सरकारची ना दहशतवादाबद्दल काही ठोस धोरणं असल्याचं आम्हाला जाणवतं आणि सुरक्षितता? वेल, कल्पना चांगली वाटते नाही ऐकायला?" पाश्चात्य संस्कृती (वाचा अमेरीकन) कायम चंगळवाद आणि भौतिक सुखं यांच्यावर भर देणारी असल्यामुळे त्याची तांत्रिक भरभराट जास्त झाली या अर्थाचं वाक्य कुठेतरी वाचलं. पण अमेरिकेत आल्यापासून गेल्या दोन वर्षात जे जाणवलं ते हेच की इथे माणसाला, त्याच्या जीवाला किंमत आहे ज्यामुळे चंगळवाद आणि भौतिक सुखं सारख्या गोष्टींकडे सहज दुर्लक्ष होतं. ब्लॉग लिहिताना एकीकडे लोकसत्ता उघडला तर गडचिरोलीमध्ये नक्षलवादी स्फोटात १२ जवान शहीद झाल्याची बातमी वाचली आणि अजूनच निराश झालो. 
लिहिता लिहिता २६ नोव्हेंबर आणि ११ जुलैच्या घटना आठवल्याच. ९३चे स्फोट झाले तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण या दोन घटना नीट आठवतायत. ११ जुलैला स्फोट झाले आणि १२ जुलैला सगळे चाकरमानी जीव मुठीत धरून कामावर रुजू झाले. भीती, दुःख व्यक्त करायलासुद्धा वेळ मिळाला नाही. आजपर्यंत त्या हल्ल्यामागे हात असणाऱ्या कुणाला ठोस पुराव्यानिशी पकडून शिक्षा झाल्याचं माहित नाही. २६ नोव्हेंबरनंतर आठवडाभराने गेटवेला झालेला 'पीस-मार्च' आठवतो आहे. 'पीस-मार्च' असला तरी जमाव इतका संतप्त झाला होता की पोलिसांना परिस्थिती ताब्यात घ्यावी लागली होती. आणि आज साडेतीन वर्षांनी? कसाबला शिक्षा होईल ही आशा हळूहळू लोकांनी सोडून दिलीय. मिडीयाला कव्हर करायला सध्या इतर अनेक ब्रेकिंग न्युज आहेत. पेपरला स्फोटाची बातमी वाचली की आपण ४७ सेकंदसुद्धा विचार करतो का नाही हा प्रश्न आहे! अक्षरधाम, भारतीय संसदेपासून दिल्ली, वाराणसी, आसामपर्यंत झालेल्या कुठल्याही हल्ल्यासाठी कुणालाच ठोस शिक्षा झालेली मला माहित नाही. इथे मला धर्म, देश, राजकीय पक्ष अशा कोणत्याच गोष्टी उपस्थित करायच्या नाहीत कारण माझ्या मते सुरक्षिततेचा मुद्दा असला की कोणत्याही धर्माच्या लोकांच्या, राजकीय पक्षाशी संबंधित लोकांच्या आणि कुठल्याही देशाच्या लोकांच्या भावना सारख्याच असतात.  प्रॉब्लेम असा आहे की सध्या कोणत्याही सज्जन माणसासमोर  महागाई, भ्रष्टाचार, गर्दी असे इतके प्रश्न असतात की सुरक्षितता या मुलभूत गरजेचा आणि हक्काचा विचार करायला वेळ आहेच कुठे? 
               कॅसलपासून विषय सुरु करून तो भरकटवत कुठेतरी नेऊन सोडण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण कालपासून डोक्यात वर लिहिलेलं वाक्य घोळत होतं आणि राहून राहून वाटत होतं की आजपर्यंत झालेले हल्ले, त्यात गेलेले लोक, त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न, भविष्य यांचा विचार करायलासुद्धा आज आपल्याला वेळ नाहीये. इतकं निर्ढावलेलं असून चालणार नाही. कारण जर का जो दगडपणा मला ४७ सेकंदांसाठी का होईना माझ्यात आलेला मला जाणवला तो जर का प्रत्येकामध्ये आला तर अवघड आहे. आणि माझ्या मनात निर्माण झालेला प्रश्न तसाच आहे- खरंच आपण सुरक्षित आहोत का? 


ता. क. : अजून एक: वाचणाऱ्या काही लोकांच्या डोक्यात एक मुद्दा येईल की हा माणूस अमेरिकेला गेलाय आणि तिथे बसून उगाच हे असले लेख लिहितो आहे. त्याला इथल्या सुरक्षिततेशी काय देणं-घेणं आहे? तर अशा लोकांना माझा इतकाच निरोप आहे की भारतात नसलो तरी नाळ शेवटी तिथेच जोडलेली आहे. माझे आई-वडील, नातेवाईक, मित्र, शेजारी-पाजारी आजही त्याच वातावरणात राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीने हे सगळं लिहिलं असं समजा. हेही खोटं वाटत असेल तर खड्ड्यात जा! 

चैतन्य

Friday, March 9, 2012

द्रविड


- - -
"महत्वाचं, तो आमच्यापेक्षा जास्त संयमी होता"- गिलेस्पी

"मला क्रिकेट खेळताना भेटलेला बहुतेक तो सर्वोत्तम (नाईसेस्ट) माणूस होता-बहुतेक नव्हे तोच सर्वोत्तम होता" शेन वॉटसन

"भरून निघायला खूपच मोठी पोकळी तयार झालीय" सुनील गावस्कर

"एकच राहुल द्रविड होता आणि आहे" सचिन तेंडुलकर

- - -

               ९ मार्च २०१२ चा शुक्रवार भारतीय क्रिकेटची भिंत पडल्याचा दिवस म्हणून कायम लक्षात राहील. राहुल द्रविडने आज निवृत्ती घोषित केली. बरेच दिवस सचिन बाप्पावर एक ब्लॉग लिहायचं मनात होतं, त्याचं 'मच अवेटेड' शंभरावं शतक झालं की लिहू असा विचार करत होतो (मला कल्पना आहे की बऱ्याच जणांचे सिमिलर ड्राफ्टस रेडी असतील). पण देवाच्या मनात भलतंच होतं बहुतेक! राहुल द्रविडचा मी एक खेळाडू म्हणून कितीही आदर करत असलो तरी मी त्याचा 'पंखा' कधीच नव्हतो. पण आज त्याने रिटायर व्हायची घोषणा केली आणि भारतीय क्रिकेटवरच्या प्रेमापोटी असेल किंवा निव्वळ 'द्रविड'च्या द्रविड असण्यामुळे असेल, थोडं इमोशनल वाटलं.न राहवून ब्लॉग लिहायला घेतला.
         एखादा खेळाडू किंवा कलाकार निव्वळ त्याच्या खेळासाठी किंवा कलेसाठी प्रसिद्ध होऊ शकतो पण आदरणीय होऊ शकत नाही. भारतीय क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं तर सौरव गांगुलीला हे विधान लागू पडतं. पण द्रविड, तेंडुलकर ही मंडळी खेळाडू म्हणून जितकी थोर आहेत त्याहीपेक्षा त्यांचं वेळोवेळी मैदानावर आणि बाहेर दिसलेलं 'माणूस'पण त्यांचा आदर करायला भाग पाडतं!नुकताच सन्मित बाळ यांचा लेख वाचला आणि द्रविडचं खेळाच्या पुढे जाऊन असणारं 'माणूस'पण किंवा क्रिकेटच्या भाषेतलं "character" जाणवलं. गेल्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये सपशेल मार खाल्लेल्या भारतीय संघाच्या अपयशाला एकमेव द्रविडच्या एकहाती सातत्याची तेवढी चंदेरी किनार होती. जिथे उरलेले दहा खेळाडू मिळून धड २०० धावा सुद्धा करु शकत नव्हते तिथे एकट्या द्रविडने तीन शतकं ठोकली. त्यातल्या शेवटच्या कसोटीत संघाच्या ३०० धावांपैकी नाबाद १४६ धावा त्याच्या होत्या.

           इंग्लंडमध्येच त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली. निवृत्त होण्याचा विचार काही काळापासून करत असलेल्या द्रविडसाठी 'निवृत्त' होण्यासाठी इंग्लंडमधली 'ही' अद्भुत खेळी योग्य क्षण होता.पण त्याने तसं केलं नाही. ऑस्ट्रेलियाचा दौरा त्याला दिसत होता.एखादा 'टोकाचा आशावादी'सुद्धा त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा इंग्लंडपेक्षा उजवा ठरेल असा वर्तवायला धजावला नसता! पण कांगारूंना त्यांच्या देशात हरवण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याची त्याला कल्पना होती.म्हणून संघाला आपली साथ असावी म्हणून त्याने निवृत्ती पुढे ढकलली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मैदानावर उल्लेखनीय असं काहीच त्याने केलं नाही. उलट कित्येकदा सारख्या प्रकारच्या बॉलवर त्रिफळाचीत होऊन 'भिंत' डळमळीत झाल्याची टीका करण्याची आयती संधीच त्याने लोकांना दिली. पण तरी ऑस्ट्रेलियातल्या चाहत्यांना तो कायम लक्षात राहील त्याच्या २०११ च्या 'ब्रॅडमन ओरेशन' मधील भाषणासाठी. त्याचं सदतीस मिनिटांचं भाषण हे गेल्या काही वर्षातील क्रिकेटबद्दलचं सर्वोत्तम भाषण होतं असं कित्येकांचं मत आहे. ते भाषण करायची संधी मिळालेला तो पहिला अ-ऑस्ट्रेलियन (अ-भारतीय प्रमाणे) खेळाडू. क्रिकेटबद्दलचा अभ्यास, त्याच्या खास आवडत्या कसोटीला जगवायची कळकळ,आणि एकूणच त्याच्या खेळाशी असलेल्या प्रामाणिकपणामुळे उपस्थितांनी त्याचं भाषण संपल्यावर उभं राहून टाळ्या वाजवल्या.(भारतातल्या रियालिटी शो च्या जमान्यात लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवणं खूप स्वस्त झालं असलं तरी इतर कुठे हे फारसं होत नाही म्हणुन त्याचं महत्व जास्त!).
              राहुल द्रविड भारतीय संघात आला ९६ साली. कसोटीत मिळालेल्या पहिल्या संधीचं त्याने सोनं केलं आणि इंग्लंडमध्ये त्याने पहिल्या डावात ९५ धावा केल्या. शतक हुकल्याची बोच त्याला कायम राहिली पण 'मी पेला अर्धा भरला आहे' असा विचार करत आलो असं तो नंतर म्हणाला. गांगुलीने याच कसोटीत पदार्पण करून शतक ठोकल्याने द्रविड झाकोळला गेला. आज मी जेव्हा त्याची कारकीर्द पुन्हा पाहिली तेव्हा मला जाणवलं की त्याने स्वतःला सिद्ध केलेले, जिंकवून दिलेले, वाचवलेले, लाज राखलेले सामने अर्थातच खूप आहेत पण माझ्या मते संघातल्या दुसऱ्या कुठल्यातरी खेळाडूला एका बाजूने खंबीर साथ देण्यात त्याच्या चांगल्या खेळ्या झाकोळल्या गेल्या. (राहवत नाहीये म्हणून अभिनेता सुशांत सिंगचा किंवा सुदेश बेरीचा उल्लेख इथे करावासा वाटतो..त्यांची आणि द्रविडची अर्थात तुलना नाही पण ही मंडळी बऱ्याच भूमिकांमध्ये कायम हिरो/हिरोईनला मोठं करण्यात किंवा वाचवण्यात शहीद झाली आहेत). या विधानाला पुष्टी द्यायला 'द्रविडने १८हुन अधिक खेळाडूंबरोबर जवळपास ८० शतकी भागीदाऱ्या केल्या' हे आकडे. (आठवा: लक्ष्मणबरोबरची कोलकात्यातली खेळी आणि सेहवागबरोबर लाहोरला ४०० धावांची भागीदारी). त्याची कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातली पहिली शतकं अशीच..२-० असा सपाटून मार खाल्लेल्या ९८च्या आफ्रिका दौऱ्याच्या ३ऱ्या कसोटीत द्रविडने पहिलं शतक ठोकलं पण अपुऱ्या प्रकाशामुळे सामना "ड्रॉ' झाला आणि आफ्रिका हरायची राहिली. नंतर सईद अन्वर नावाच्या फक्त भारताविरुद्ध चांगल्या खेळणाऱ्या एका माणसाने एकदा कुंबळे, प्रसाद यांची गोलंदाजी फोडून काढत १९४ धावा केल्या. तो स्कोर सचिन बाप्पाने दोनेक वर्षापूर्वी समूळ मोडून काढेपर्यंत भारतीय गोलंदाजीवरचा एक काळा डाग होता, विश्वविक्रम होता! तर- त्या सामन्यात द्रविडने झुंज देत पाहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. अन्वरच्या विक्रमाने दबून गेलेल्या भारतीय संघासाठी द्रविडचं शतक इतका एकच आशेचा किरण होता. द्रविड बाद झाला आणि आपण सामना हरणार यावर शिक्कामोर्तब झालं. (एव्हाना द्रविडने कित्येकदा लाज राखली असं मी लिहिलं ते का याचा अंदाज आला असेल)
               नंतर जवळपास ५-६ वर्षांचा काळ द्रविड पाय 'घट्ट' रोवून उभा राहिला. सगळ्यांना आठवत असेल- डोनाल्ड, ब्रेट ली, शोएब असे ताशी ८५-९० मैलांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारे लोक होते. भारतीय फलंदाजी अशा सगळ्यांसमोर 'नांगी'  टाकायची आणि मग त्या काळी पेपरमध्ये एक वाक्य नियमितपणे वाचायला मिळायला लागलं- द्रविडने खेळपट्टीवर 'नांगर' टाकला, तो कधी बाद होईल असं वाटायचंच नाही. गोलंदाजांची दया यायची. हीच शैली द्रविडची ओळख बनली. तो भारताची अभेद्य भिंत झाला- 'द वॉल'. आज निवृत्ती जाहीर करायच्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला या विशेषणाबद्दल विचारलं तेव्हा तो त्याच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे म्हणाला की "मी या विशेषणाचा फारसा गांभीर्याने कधी विचारच केला नाही, हे विशेषण वर्तमानपत्रांमध्ये लिहायला छान होतं, लोक मला लाडाने 'या' विशेषणाने संबोधतात याबद्दल मी त्याचा आदर करतो". जागतिक दर्जाचा फलंदाज म्हणून त्याचं श्रेष्ठत्व तोपर्यन्त बहुतेक क्रिकेट जगाने मान्य केलं होतं. पण त्याच्या खेळाची शैली एकदिवसीय क्रिकेटशी जुळणारी नाही अशी टीका व्हायची. म्हणता म्हणता ९९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ४६१ धाव्या काढल्या आणि सगळ्यांची तोंडं बंद केली. २००१ सालचा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि कोलकात्याची दुसरी कसोटी कोण विसरेल?२००३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने फलंदाजीसोबत यष्टीरक्षकाची भूमिकादेखील पार पाडली. गरज पडेल त्या क्रमांकावर फलंदाजीला येणं, वेळ पडेल तेव्हा यष्टिरक्षण, गांगुलीच्या वादग्रस्त गच्छंतीनंतर कर्णधाराचा काटेरी मुकुट घालून घेणं या सगळ्यामुळेच तो "मिस्टर डिपेन्डेबल" झाला. २००४ साली बांगलादेशातल्या कसोटी सामन्यात त्याने शतक ठोकलं आणि जगातल्या सगळ्या कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये शतक करण्याचा आगळा-वेगळा, आजही अबाधित असलेला विक्रम त्याने केला. २००४ साली ICC ने वार्षिक पुरस्कार सुरु केले तेव्हा द्रविड पहिल्याच वर्षाचा "क्रिकेटर ऑफ द यिअर" होता यातच सगळं आलं. या ५-६ वर्षांच्या काळात कसोटी आकडेवारीच्या बाबतीत तो तेंडुलकरला तोडीस-तोड किंवा त्याच्यापेक्षा कांकणभर सरसच होता.

           गांगुली-चॅपेल वाद, नंतर गळ्यात पडलेली कर्णधारपदाची माळ वगैरे त्याच्या कारकिर्दीतले महत्वाचे टप्पे ठरण्याऐवजी वादग्रस्तच ठरले. मुलतानला तेंडुलकर १९४ धावांवर नाबाद असताना घोषित केलेला डाव सचिनप्रेमी विसरलेले नाहीत. २००७ चा विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेला पराभव आणि साखळी फेरीतच स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की या गोष्टी द्रविड कर्णधार असताना घडल्या. या सगळ्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग किती हा निराळा मुद्दा आहे! वाडेकरांच्या संघानंतर ३५ वर्षांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये जिंकलेले कसोटी सामने हे द्रविडच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतले सुखावणारे "हायलाईट्स".
द्रविडच्या साधारण १५-१६ वर्षातल्या दीर्घ कारकिर्दीबद्दल लिहायचं तर ते एका लेखाच्या आणि माझ्या चाहता/हौशी लेखकपणाच्या आवाक्याबाहेरचं आहे. वर उल्लेख केलेले सगळे सामने सोडून त्याच्या लक्षात राहणाऱ्या कित्येक खेळी आहेत! त्यांचं चांगल्या-वाईट-उत्तम-अफाट असं वर्गीकरण करणं खुद्द द्रविडला आवडत नाही. म्हणूनच तर त्याची आवडती 'एक' खेळी कोणती असा प्रश्न त्याला आज विचारला गेला तेव्हा त्याने ५-६ डावांची नोंद करत 'आईने तिचं आवडतं मूल कोणतं?' याचं कसं बरं उत्तर द्यायचं अशी प्रतिक्रिया दिली. आजच श्री. सुनंदन लेले यांनी फेसबुकवर व्यक्त केलेलं "भारतीय क्रिकेटची आई रिटायर होतेय" हे विधान खूप सार्थ आहे आणि आईची किंमत ती नसताना कळते तसंच द्रविडच्या बाबतीत झालंय आणि होणारे! सध्या वाढत्या T20 च्या काळात कसोटी सामने लुप्त होत आहेत. कुणी मानो अथवा न मानो पण भारतीय नियामक मंडळ IPL आयोजित करून या कसोटीच्या पडझडीला मदतच करतंय. द्रविडच्या रिटायर होण्याने जगातील कित्येक कसोटी क्रिकेटप्रेमींच्या दुःखात भर पडली असणारे. ज्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी कसोटी क्रिकेट ओळखले जाते त्याचा शेवटचा भारतीय शिलेदार आज धारातीर्थी पडला.
           पाकिस्तानच्या दौऱ्यात हडप्पा, मोहेंजोदडो पहायची इच्छा असणारा द्रविड, तेंडुलकर विशेषांकात मानधनाचा विचार न करता लेख लिहिणारा द्रविड, ब्रॅडमन ओरेशनमधला द्रविड, जाहिरातीतला द्रविड, दुखापतीशिवाय सलग ९३ कसोटी सामने खेळणारा द्रविड आणि या प्रत्येक रुपात जाणवत राहणारा त्याचा साधेपणा, समतोल कुणालाही हेवा वाटावा असा! काही दशकांनी कदाचित असं लिहिलं जाईल- "ऐन भरातल्या भारतीय संघात देवबाप्पा सचिन होता, आक्रमक इंद्रदेव गांगुली होता, लक्ष्मण, कुंबळेसारखे गंधर्व होते आणि राहुल द्रविड नावाचा एक 'ऋषी' होता."
राहुल, गेली कित्येक वर्षं तू केलेल्या मनोरंजनाबद्दल मी तुझा शतशः ऋणी आहे..TAKE A BOW!


चैतन्य
- - -

मी क्रिकेटचा चाहता असलो तरी 'आकडेतज्ञ' नाही, त्यामुळे या ब्लॉगमध्ये केलेल्या जवळपास सगळ्या नोंदींचा संदर्भ क्रिकेटच्या आंतरजालावरील बायबल साईटवरून (इथून) घेतलेल्या आहेत. 
- - -