पूर्वीच्या
हिंदी-मराठी सिनेमांमध्ये, मालिकांकडे बरेचदा 'नाक्यावरचे प्रेमवीर' असायचे. गळ्यात लाल किंवा तसलासा भडक रुमाल, तोंडात सिगरेट नाहीतर
'ईस्टाइल' म्हणून धरलेली काडी, कसातरी खोचलेला शर्ट, डोक्यावर टोपी किंवा
बांधलेला रुमाल वगैरे! अनिल कपूर (राम-लखन), जॅकी श्रॉफ (हिरो), आमीर खान (रंगीला), सलमान खान (तेरे नाम) या मंडळींनी अशा भूमिका लोकप्रिय केल्या.
आपल्या प्रेयसीवर किती उदात्त, वेड्यासारखं प्रेम करावं याचं या व्यक्तिरेखा मूर्तिमंत उदाहरणं होती. 'प्रेम करावं भिल्लासारखं...' वगैरे वगैरे कविता
सूट होतील त्यांच्या प्रेमाला! मी 'तेरे नाम' पहिला नाहीये म्हणजे 'मी प्रेम करायला नालायक आहे' असं देखील मला माझ्या
एका मित्राने सांगितलं होतं. मग शारूक, सैफ यांच्यासारखं चकचकीत, पॉश प्रेम करणारे
नायक आले. प्रेम व्यक्त करायच्या पद्धती बदलल्या. पण सगळं सुरळीत चालू होतं. मग
ऑर्कुट आलं, फेसबुक आलं आणि प्रेम
या विषयावर लोकांचा एकूणच व्यासंग भयंकर वाढला. नाक्यावरच्या प्रेमवीरांपासून आपली
'तांत्रिक' आणि 'सांस्कृतिक' प्रगती होऊन आज 'वर्चुअल' प्रेमवीर अशी एक नवीन
e-literate जमात उदयाला आलीय. या जमातीचे आणि त्यांच्या व्यासंगाचे
माझ्यासारख्या अल्पमती माणसाच्या 'सामाजिक गुंत्यावर' (सोशिअल नेटवर्क हो!!)
होणाऱ्या भल्या-बुऱ्या परिणामांची नोंद करायला हा खटाटोप..!
जीवनावश्यक वस्तू खूप महाग होत चालल्यात असं म्हणून एकीकडे
आपण हळहळत असतो दुसरीकडे प्रेम मात्र दिवसेंदिवस इतकं स्वस्त होत चाललंय की काही
वर्षांनी खरंच प्रेम खाऊन-पिऊन जगायची तयारी करावी लागणारे. लोक 'सिंगल' ते 'इन अ रिलेशनशिप' इतक्या सहज जातात की
ही माणसं लहानपणी डोक्यावर पडली होती अशी मला शंका आहे. 'इट्स कॉम्पलिकेटेड' म्हणजे नेमकं काये? एखादं सर्टीफिकेट
मिरवल्यासारखं लोकांना रिलेशनशिप स्टेटस ही गोष्ट मिरवण्यात काय मजा येते हेही मला
अजून उमगलेलं नाहीये. आपल्या प्रेयसीला नुसतं हृद्य नाही पण डोळा, किडनी, यकृत, फुफुस्से असे ऑलमोस्ट
सगळे अवयव दिलेल्या प्रियकरांच्या गोष्टी मी 'Please Read Carefully' किंवा 'जगातली सगळ्यात
दुर्दैवी प्रेमकथा' अशा शीर्षकाखाली वाचल्या आहेत. एक मुलगा छातीशी हात घट्ट धरून उभा
आहे, खाली रक्ताचं थारोळ झालंय आणि एक मुलगी त्याचं 'हार्ट' घेऊन पाठमोरी जातेय
अशा प्रकारची कित्येक हिंसक चित्रं लोकप्रिय आहेत. गुलाब, लाल बदाम, टेडी बेअर्स, चॉकलेट्स ही
पारंपारिक प्रेम व्यक्त करणारी प्रतीकं मागे पडली आहेत आणि त्यांची जागा आता हातावर 'ब्लेड्बाजी' केलेल्या, नसा कापून घेतलेल्या
फोटोंनी घेतली आहे. ‘ऍबस्ट्रॅक्ट’ आर्ट का काय म्हणतात
ते पूर्वी लोकांना कळायला कठीण जायचं, शतकानुशतकं पिकासोसारख्या मंडळींनी या
कलाप्रकारावर अधिराज्य गाजवलं. पण आता- 'वर्चुअल' प्रेमवीरांचा विजय असो! त्यांच्यामुळे
आपल्याला समजलं आहे की ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे काय!
एखाद्या स्वच्छ पृष्ठभागावर पडलेले चार पाण्याचे थेंब किंवा एकत्र जळणाऱ्या दोन
काड्या असे फोटोस जर का आपण काही वर्षांपूर्वी पाहिले असते तर 'रोल वाया घालवला' असं म्हणून आपण त्या
फोटोसची थट्टा केली असती किंवा न कळणारं ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणून विषय सोडून
दिला असता. पण आता आपण खात्रीने सांगू शकतो की ते पाण्याचे चार थेंब म्हणजे 'प्रेम', दोन जळणाऱ्या काड्या
म्हणजे 'प्रेम', वाळूवर उमटलेली पावलं म्हणजे 'प्रेम', समुद्राच्या लाटा, आकाश, जेवण, दगड, विमान, बोटी, सगळं सगळं
म्हणजे....करेक्ट कळलंय सगळ्यांना नाही का? प्रेमाचं मूर्तिमंत प्रतिक म्हटलं की
सगळं जग 'ताजमहाल' असं नाव घेतात पण ज्या लोकांवर वर्चुअल प्रेमवीरांच्या व्यासंगाचा
पगडा आहे ते चीनमधल्या कुठल्यातरी टेकडीत खोदलेल्या पायऱ्यांचीसुद्धा गोष्ट सांगतील. 'प्रेम पुरेसे आहे' किंवा 'दुसरे काळीज देईन
तोडायला' अशा वैविध्यपूर्ण नावांचे गट आज फेसबुकावर अस्तित्वात आहेत आणि
त्यांचा अभ्यास दांडगा आहे. माहितीचा अतिरेक म्हणजे गुगल किंवा विकिपीडिया नाहीच पण हे सगळे गट आहेत. तुम्हाला एखादी मुलगी/मुलगा आवडत असेल तर तुम्ही
कसं वागलं, बोललं पाहिजे याचं प्रतीकात्मक प्रशिक्षण आज फुकट उपलब्ध आहे. तुम्ही
प्रेमाची कबुली दिल्यावर तुम्हाला मिळू शकणारी आदर्श उत्तरं, नकारात्मक उत्तरं, त्यावर तुम्ही
द्यायची उत्तरं हेसुद्धा तुम्हाला इथे कळतं.
मला सगळ्यात जास्त अचंबित करतात ते
वर्चुअल प्रेमकवी. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या दिवसात 'प्रेम' म्हणजे काय असतं ही
अक्कल जरी नसली तरी पाडगावकरांची 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं' ही कविता माहित होती.
कवितेतल्या 'पाच मुलं झाली तरी प्रेम कधीच केलं नाही' या ओळीला कोपरखळ्या
व्हायच्या. नंतर खरे बुवा आले, त्यांची 'लव्ह लेटर' गाजली. नंतर या वर्चुअल वर्ल्डमध्ये प्रेमकवितांचा पाउस पडायला सुरुवात
झाली. गद्यकविता, स्फुटे, चारोळ्या, गजल अशा प्रकारांनी उच्छाद मांडला. आधी लिहिल्याप्रमाणे दगड, माती, पाणी सगळं प्रेम
असल्यामुळे या कवितादेखील तशाच..सुखं-दुःखं, ऊन-पाउस अशी साहित्यात पूर्वी सर्वसाधारण
आयुष्याला उद्देशून वापरली जाणारी रुपकं प्रेमासाठी वापरली जायला लागली. चारोळी या
काव्यप्रकाराने तर प्रत्येक इंग्लिश मिडीयमवाल्या मुलातसुद्धा दडलेला, त्याला कधीच न
उमगलेला आणि उमगण्याची शक्यता नसलेला कवीदेखील जिवंत केला. या चारोळ्या वाचल्या की पुलंच्या 'असा मी असामी' मधलं 'यात काही यमक आहे का
काव्य आहे?' हे वाक्य आठवलं नाही तर शपथ!!
तर या सर्व प्रेमवीरांबद्दल माझ्या मनात राग, लोभ, करुणा, प्रेम (?), दया, क्षमा अशा सगळ्या
भावना आहेत. त्यांच्या भावनांबद्दल मला आदरयुक्त राग आणि भीती आहे. त्यांनी
प्रेमाच्या जगातली त्यांची मुसाफिरी अशीच चालू ठेवावी आणि जगातल्या सगळ्या
प्रेमेच्छुक तरुण-तरुणींच्या ज्ञानात भर घालत राहावी. मात्र माझ्यासारख्या पामर
आणि प्रेमेच्छुक नसलेल्या माणसांच्या सामाजिक गुंत्यामधली गुंतागुंत अधिक वाढवू नये ही
प्रार्थना ही क्युपिडच्या (हो तोच तो प्रेमाचा 'उडता' एंजल) चरणी मी करत आहे.
ऑन अ सिरीयस नोट, मला खरंच असं वाटतं
की सोशिअल नेट्वर्किंगमुळे एकूणच समाजभान वाढलं आहे की सुटत चाललंय याचा विचार
प्रत्येकाने करायला हवाय. 'प्रेम' इतकं स्वस्त नसतं यार!! जगात खूप समंजस लोक आहेत यावर माझा
विश्वास आहे आणि जर का काही समंजस लोकांना प्रेमासारख्या गोष्टी चव्हाट्यावर
मांडाव्याशा वाटतात..तर-...वेल..सामाजिक गुंते वाढवताना भावनिक खच्चीकरण होतंय असं समजावं लागेल. माझं रिलेशनशिप
स्टेटस ध्यानात घेता मी हे नमूद करू इच्छितो की हा लेख मी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता
किंवा पक्षपातीपणा न करता एक साधारण मनुष्य या नात्याने लिहिला आहे. तो विरंगुळा
म्हणूनच वाचावा. त्यातून कुणाच्याही भावनेचा अपमान करायची इच्छा नाही. कुणी अपमान
करून घेतल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.
ता. क: हा ब्लॉग लिहिताना मी 'मैने तेरे लिये ही
सात रंग के' ऐकत होतो. मजा आली. बरेच दिवसात ऐकलं नसेल तर नक्की ऐका. आणि आता 'P.S. I love you' बघायचा बेत केलाय. खूप सुंदर 'लव-इस्टोरी' आहे ती! खाली एक चित्र देतोय...त्या चित्रातून मला काय म्हणायचं आहे हे लेख वाचून तुम्हाला कळलं असेलच!
चैतन्य