Pages

Friday, September 21, 2012

तू खपवून घेतोस!

         लहानपणी मी झोपलो नाही की आजी 'चिंतामणीचा चित्तपंगती' असं काहीतरी गाणं म्हणून मला झोपवायची. गणपती बाप्पाशी झालेली ओळख तेव्हापासूनची! मला खात्री आहे की आपल्यातल्या प्रत्येकाची गणपतीशी ओळख अशीच कळायला लागायच्या आधीच झाली असेल..'मोरया मोरया मी बाळ तान्हे' आजपर्यंत किती वेळा मनात, परवच्यात, प्रार्थनेत म्हटलं असेल याचा काउंट नाही! यंदा मी फेसबुक गणेशोत्सव साजरा करतोय...प्रत्येकाने टाकलेले गणपतीचे फोटोस आनंदाने आणि असूयेने पाहतोय! आता सण साजरे करायला न मिळणं हे काही नवीन राहिलेलं नाही...पण यंदा लोक बहुतेक जास्त उत्साहात आहेत आणि गेले कित्येक दिवस फालतू राजकीय सटायर फोटोसनी भरलेलं, रटाळ झालेलं फेसबुक कलरफुल, ग्रेसफुल झालंय. गेल्या शंभर वर्षात तंत्रज्ञानाने केलेली प्रगती अचाट, अफाट आहे पण या सगळ्यात श्रद्धा, भक्ती या गोष्टी आजही टिकाव धरून आहेत. त्यांचं स्वरूप बदललेलं असलं तरी सुद्धा! मला एका अमेरिकनने एकदा विचारलं होतं..'भारत कसा देश आहे थोडक्यात सांगशील का?' मी म्हटलं की 'थोडक्यात सांगणं खूप कठीण होईल पण एवढं नक्की सांगू शकतो की वि लव अवर फेस्टिवल्स...वी लव सेलेब्रेशन्स' हो, दिवाळी, दसरा ते नागपंचमी, बैलपोळ्यापर्यंत भारतात सगळं दणक्यात साजरं होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक सेलिब्रेशनचा कळस..सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन शंभरेक वर्षं उलटून गेली,! स्पर्धा आल्या, करमणूक आली, सजावट आली...या सगळ्याचं स्वरूपसुद्धा कितीतरी बदललं (सॉरी लोकमान्य..मला माहितीय की तुम्हाला हे असलं काही चाललं नसतं)   पण या सगळ्यामुळे गणपती निव्वळ देव राहिला नाहीये तर तो आस्तिक-नास्तिक, राजा-रंक प्रत्येक आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलाय. म्हणूनच 'जग कितीही पुढारलं तरी गणपतीला पर्याय असूच शकणार नाही' हे विधान मला मुळीच अंडरस्टेटमेंट वाटत नाही!

        गणपती आपल्या नसानसांमध्ये इतका भिनलाय की दगडात, झाडाच्या खोडात, ढगात कुठेही आपल्याला जरा सोंडेचा आकार दिसला की आपल्याला गणपतीचा भास होतो..हत्तीचा नाही! गणपतीचं एकही चित्र कधीच काढलं नाही असा एकही जण माझ्या माहितीत नाही...लांब सोंड, 'U' आकाराचं गंध, सुळे, पोट, चार हात त्यातही एका हातात ऑलमोस्ट त्रिकोणी आकाराचा मोदक आणि त्याच आकाराचा मोठा मुकुट आणि पायाशी काढलेला चार पायांचा उंदीर! पाय चार म्हणून उंदीर समजायचा नाहीतर बाकी त्यात उंदीर वाटण्यासारखं काहीच नाही असं चित्र प्रत्येकाने काढलेलं असतं आणि ते भारीच असतं..मला 'सर्वोकृष्ट गणेश मूर्ती किंवा गणेश चित्र' स्पर्धा ही संकल्पनासुद्धा मंद वाटते. गणपती कसाही असो..तो भारीच असतो...त्याची कसली स्पर्धा घ्यायची आणि घेतलीच तर विनर ठरवायचा हक्क कुणाला? ऑन अ सेकंड थॉट, दसऱ्याला ती 'कॉम्प्लीकेटेड सरस्वती' काढण्याऐवजी असा सोप्पा गणपती काढला तर काय हरकते? शेवटी अभ्यासाची सुरुवात 'श्री गणेशाय नमः' म्हणून तर करायची असते. गणपतीची ही पण एक गम्मतच आहे राव...म्हणजे एकीकडे कुणी म्हणजे कुणीही माझ्यासारखा सोम्या-गोम्या सुद्धा गणपतीची चित्रं काढतो तर काही फार महान चित्रकार स्पेसिफिकली गणपतीची वेगवेगळ्या रूपातली, शैलीतली चित्रं काढतात. कन्क्लूजन- गणपती बाप्पाचा शोध अविरत सुरु आहे..!!

         आपलं आयुष्य आज गणपतीवर किती अवलंबून आहे याची थोडीशी उदाहरणं...गणपती आजघडीला कित्येक लोकांच्या पोटापाण्याचा एकमेव सोर्स आहे..ते भाग्य आपण इतर देवांना लाभू दिलेलं नाही...(बंगालमध्ये ते डिपार्टमेंट देवी दुर्गेने घेतलंय पण आय गेस तेवढा एकच अपवाद)...ओकेजनल सत्यनारायण आणि वास्तुशांती सोडल्या तर गणपती हा कित्येक भटा-बामणांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करतो. बाय फार, गणेशोत्सव सर्वाधिक रेवेन्यु जनरेटिंग फेस्टिवल आहे. होतकरू गायक, कलाकार, नकलाकार, लावणीवती सॉरी 'लावण्यवती' नृत्यांगना यांना हक्काचं व्यासपीठ गणपती उपलब्ध करून देतोय. देशातील सगळ्यात जास्त देवस्थानं बाप्पाची आहेत (पुरावा: महाराष्ट्र टाईम्स मला आठवतंय तेव्हापासून 'आजचा गणपती' टाकतायत..) समर्थ रामदासांपासून ते जावेद अख्तरपर्यंत सगळ्यांनी गणपतीवर 'गेय' (गाणं, आरती, कविता) लिहायची कामगिरी पार पाडलीय..तर अजय-अतुल ते शंकर-एहसान-लॉयपर्यंत सगळ्यांनी गणपतीवर गाणं करायची हौस पुरवून घेतलीय..महागुरुनी पिळगावकरांनी (क्या बाथ वाले महागुरू वेगळे) ऑलरेडी गणपतीच्या जीवावर दोन सिनेमे बनवले आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टने मुंबईतला एक महत्वाचा रस्ता ऑलमोस्ट टेकओव्हर केलाय आणि या घडीला ते देशातल्या सगळ्यात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. अष्टविनायक यात्रा, अष्ट-गणेश यात्रा या सारख्या यात्रानी अनेक लोकांना धंदा सुरु करायचं एक नवं क्षेत्र खुलं करून दिलंय...सारी सारी त्या गजाननाची कृपा! पण सगळ्यात महत्वाचं- गणपतीने आपल्याला आधार दिलाय, आनंद दिलाय..वर्षभराच्या राम-रगाड्यात थोडीशी उसंत घेऊन त्याच्या नावावर सुट्टी घेण्याची, त्याला आणताना- विसर्जन करताना नाचण्याची, ढोल ताशे वाजवायची, आरडाओरडा करण्याची ते पार रडण्याची मुक्त सोय करून दिलीय...आणि हेच आम्हाला हवंय...आम्ही पुढारलेपणाचा कितीही आव आणला, गणपतीच्या नावावर होणाऱ्या श्रद्धेच्या बाजाराला कितीही नावं ठेवली तरी आम्ही मखरात बसवलेला, पानाफुलांनी मढवलेला, नटवलेला, सुखकर्ता, दुखहर्ता आमची भावनिक गरज आहे. 

            गणपतीला काही प्रार्थना करायची तर इतकंच म्हणेन की 'तू खपवून घेतोस! येस...वर्षानुवर्षं चालत आलेल्या प्रथा-परंपरा, धिंगाणे-तमाशे पाहिले की जाणवतं ते हेच की तू खपवून घेतोस! आम्ही 'अन्याय माझे कोट्यानुकोटी' म्हणतो आणि तुझं ते भलं  मोठ्ठ पोट आमची पापं भरून घ्यायला अजून समर्थ आहे...आणि हेच दुःख आहे बाप्पा..वी नीड अ पंच इन द फेस. तुला वाटत असेल की मी माझ्या देशाची, जगाची वाताहत चाललीय आणि तू शांत पाहतो आहेस म्हणून काहीतरी म्हणेन...पण नाही ते आमचं नशीब झालं..पण तुझा प्रश्न येतो तेव्हासुद्धा तू शांतच असतोस..आम्ही तुला विनाकारण दुध पाजलं आणि तू खपवून घेतलंस, दिवेआगरमधला तुझा सुरेख सोन्याचा मुखवटा कुठल्यातरी कर्मदळीद्री लोकांनी चोरला आणि चार पैशांसाठी वितळवला??आणि तू तेसुद्धा खपवून घेतलंस...देव, देश, धर्म या तीन गोष्टींची नेमकी ऑर्डर टू फोलो काये तेही मला तुला विचारायचं आहे..सांगशील? म्हणजे असं बघ की आम्ही मखर सजवतो, मग आरास करतो...कुणी शिवाजीने औरंगजेबाला मारल्याचा देखावा करतं तेव्हा जातीय दंगे उसळतात...आणि तू तेसुद्धा खपवून घेतोस! तुझ्या विसर्जनाला पोलीस सिक्युरिटी...म्हणजे दहा दिवस आम्ही तुला आम्हाला सुखी ठेव आणि आमचं रक्षण कर म्हणायचं आणि बाराव्या दिवशी तुला संरक्षणाला पोलीस...तू देव..तुला खरंतर कुणी डिफेंड करायची गरज नाही, तुला आम्ही आणतो तेसुद्धा मी वर लिहिलं तसं आमच्या मानसिक समाधानासाठी...मग हे सगळं तू कसं काय खपवून घेतोस? मी हिंदी सिनेमे बघत मोठा झालोय...आमच्या बऱ्याचशा सिनेमात एन्डला हीरोला मोरल साक्षात्कार वगैरे होतात...तसे तुझ्या बाबतीतले साक्षात्कार आम्हाला कधी होणारेत? तुझा शोध अविरत चाललाय खरा पण आम्ही रिसर्चमध्ये म्हणतो तसं- एखादा मेजर ब्रेकथ्रू तरी हवा ना? मिळेल का तो?'


ता.क.: 'राधेय' मध्ये पुस्तकाच्या सुरुवातीला एक सुरेख वाक्य आहे..'प्रत्येकाच्या मनामनात एक कर्ण असतो..हा माझ्या मनातला...' तसाच प्रत्येकाच्या मनामनात दरघडीला, दरवर्षी उलगडत जाणारा, घुटमळत राहणारा, मार्ग दाखवणारा एक गणपतीसुद्धा असतो..हा या क्षणाला माझ्या मनात असणारा गणपती बाप्पा!

चैतन्य  

ता. फो. गेल्या वर्षी आम्ही अमेरिकेत गणेश चतुर्थी साजरी केली होती..पार उकडीचे मोदक..मोठमोठ्याने आरत्या वगैरे करून. तेव्हाचा एक फोटो. छायाचित्र सौजन्य: हर्षवर्धन देशमुख