Pages

Thursday, January 3, 2013

उपाय, उपक्रम, प्रतिबंध: पण मुद्द्याला धरून!

अल्बर्ट आईनस्टाईनचं एक वाक्य आहे- "माझ्याकडे एखादा प्रश्न सोडवायला जर का एक तास असेल तर मी ५५ मिनिटं प्रश्नावर विचार करेन आणि ५ मिनिटं त्याच्या उत्तरावर विचार करण्यात घालवेन..." आपल्या इथे थोडं वेगळं आहे! आपल्याला प्रश्न ५ मिनिटात नाही १ मिनिटातच कळलाय आणि उत्तरसुद्धा ५ नाहीतर १० गेला बाजार २० मिनिटात मिळेल...पण सगळं संपून जाइल ना? मिडीयाला ब्रेकिंग न्युज कशा मिळतील? आम्ही जागरूकता कशी दाखवणार? फेसबुकवर, ट्विटरवर आम्ही आमचा संताप, आमच्या परसेप्शनस कशा काय पोस्ट करणार? हो मी दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेबद्दल बोलतोय! मी या विषयावर लिहायचं मुद्दाम टाळत होतो कारण घटनेचे डीटेल्स वाचून काहीही लिहायचं धारिष्ट्यच होत नव्हतं. वाढत्या प्रसारमाध्यमांमुळे आणि आपल्या हक्काच्या वैश्विक गुंत्यांमुळे (फेसबुक, ट्विटर इत्यादी) अलीकडे बातमी चटकन जुनी होत नाही. त्यात ही घटना लौकर जुनी होण्यासारखी नव्हतीच. स्त्रीला स्वतःच्या 'असण्याचीच' असुरक्षितता वाटावी यासारखी शरमेची गोष्ट नाही. सगळे दोषी  नराधम पकडले गेले आणि त्या दुर्दैवी मुलीवर दिल्लीमध्ये उपचार सुरु झाले. देशातला असंतोष, चीड, उद्वेग बाहेर यायला लागला. त्या मुलीला वाचवण्यासाठी सिंगापोरला पाठवलं गेलं. मग ती दुर्दैवी मुलगी 'गेली' आणि इथे गोंधळ सुरु झाला. तसा तो हे प्रकरण समोर आल्यापासून सुरूच होता पण गेल्या चार दिवसात तो वाढला आणि मूळ मुद्दा भरकटला. मला आठवते आहे तशी गोंधळाची यादी-

१) 'सचिन तेंडुलकरची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती' हे सरकारने त्याला करायला लावलेलं बलिदान असून बलात्कार प्रकारावरचा मिडिया फोकस कमी व्हावा म्हणून म्हणे सरकारने त्याला तसं करायला लावलं.     मुळात क्रिकेट, तेंडुलकर, बलात्कार प्रकरण, सरकार हे चारही सर्वस्वी भिन्न मुद्दे आहेत. (येस..क्रिकेट आणि 'सचिन तेंडुलकर' हेसुद्धा एका अर्थाने भिन्न मुद्देच!त्याबद्दल पुन्हा केव्हातरी). पण काहीतरी बातमी काढायची म्हणून ट्विटरवर कुणीतरी पिल्लू सोडतं आणि चर्चा सुरु! ट्विटर या माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी किती होतो आणि त्यातून वादग्रस्त छायाचित्र, कमेंट्स किती पोस्टल्या जातात हासुद्धा एक चांगला सामाजिक संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो.असो! जर हे दुर्दैवी प्रकरण घडलं नसतं तर मोदींच्या गुजरात विजयाला कमी कव्हरेज मिळावं म्हणून सरकारने सचिनला निवृत्ती घ्यायला लावली असा सूर याच माणसांनी लावला असता!

२) २६ जानेवारीचं सेलिब्रेशन आणि मग न्यू-यिअर सेलिब्रेशन: बलात्काराच्या निषेधार्थ २६ जानेवारी साजरा करायचा नाही असा फतवासुद्धा निघाला होता. मुळात गेल्या ६२ वर्षात कधी नवीन कपडे घालून, फटाके फोडून, कौतुकाने आपण २६ जानेवारी साजरा करत होतो की आता एकदम निषेध म्हणून त्याच्या साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उभी करतोय? मी मुद्दाम २६ जानेवारी आणि ६२ वर्षं लिहिलं....कारण २६ जानेवारी म्हणजे नेमका स्वातंत्र दिन असतो की प्रजासत्ताक दिन असतो हेसुद्धा कित्येकांना माहित नसतं...मी दर वर्षी १५ ऑगस्टला लोकांना रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना बघतो आणि २६ जानेवारीला इंडिपेंडस डे! मग सोशियल नेटवर्क नावाचं कोलीत हातात मिळाल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली हीच सगळी माणसं(कडं) जेव्हा बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून २६ जानेवारी साजरा 'न' करण्याचं ठरवतात तेव्हा त्या घटनेइतकाच संताप होतो. मग कुणीतरी असंही सुचवलं की करायचाच आहे तर ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला विरोध करा म्हणून म्हणे यंदा ३१ च्या रात्री मुंबईत काही 'हजार' तळीराम कमी पकडले गेले. मलातरी दिल्ली घटनेच्या निषेधार्थ ३१ डिसेंबर साजरा केला नाही असं जाहीर करणारा कुणी दिसला नाही.

३) हनी सिंगची हानी: हनी सिंग नावाच्या एका गायकाचं मात्र मला विशेष वाईट वाटलं. त्याने सहा सात वर्षांपूर्वी काही खूप अश्लील, असभ्य शब्द असलेली काही गाणी गायली होती. त्यात 'मै बलात्कारी' नावाचं एक गाणं होतं. दिल्ली घटनेनंतर कुठल्यातरी 'समाजाभिमुख' मंडळींना हे जाणवलंय. अशा गाण्यांमुळे बलात्काराला प्रोत्साहन मिळतं म्हणून त्याच्यावर एक खटला दाखल करण्यात आलाय! ही गाणी गेले सहा वर्ष लोक लपून-छपून ऐकतायत मात्र ती अश्लील, असभ्य आहेत हे कळायला 'या' सद्पुरुषांना मात्र दिल्लीची घटना घडायची वाट बघावी लागली?? कालचीच अजून एक बातमी होती की मुंबईतल्या कुठल्यातरी बारमध्ये 'बलात्कारी' नावाचं ड्रिंक मिळतं म्हणून कुठल्यातरी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा काढला. याच लॉजिकने कित्येक गोष्टींवर निर्बंध आणावे लागतील, कित्येक लोकांवर खटले भरावे लागतील. प्रश्न असा आहे की हा सगळा खरंच संताप म्हणायचा की लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला प्रयत्न??   

४) मुलीच्या नावाचा कायदा: या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी सत्ताधारी पक्षाबद्दल काहीही लिहिलं नाही. कारण बलात्कारासारखी घटना कोणत्याही पक्षाचं सरकार असताना होऊ शकते असं मी (नाईलाजाने) गृहीत धरलंय आणि पकडलेल्या दोषी लोकांना शिक्षा देण्याचा प्रश्न असला की सरकार लोकशाहीच्या नावाखाली त्यांच्या (संथ) प्रक्रियेने जाणार हे मी आता (वैतागून) मान्य केलं आहे! तर- सरकार आता बलात्कार विरोधी कायदा कडक करणार आहे. म्हणजे नेमकं काय होणारे हे जाणून घेण्यात कुणाला रस नाहीये पण त्या नवीन कडक कायद्याला त्या मुलीचं नाव द्यायचं की नाही यावरून नवीन वाद सुरु झालाय. शशी थरूर नावाने वावरणाऱ्या एका इसमाने हा वाद सुरु केला आहे. किरण बेदींनी त्याला सपोर्ट पण केलाय. (तसं तर त्या अण्णा हजारेंना पण सपोर्ट करत होत्या पण तेव्हा त्यांच्या सपोर्टला काही किंमत नव्हती) या सगळ्यात मुलीच्या आई-वडिलांनी या कल्पनेला संमती दिलीय आणि आता या गोष्टीचा राजकीय मुद्दा करून त्याचं श्रेय लाटण्याचा एक नवीन खेळ सुरु झालाय. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही कित्येक लोक आरोपींना फाशी द्या, त्यांना नपुसंक करा या मागण्यांवर ठाम आहेत. मानवाधिकारवाल्यांनी ऑलरेडी बलात्काराचा निषेध करून फाशीला विरोध केला आहे (खरंतर मानवाधिकार ऐवजी पेटावाल्यांनी काहीतरी बोलणं अपेक्षित होतं). स्वातंत्रलढावाले हजारे, आंबा माणूस पार्टीचे केजरीवाल, योगावाले रामदेव सगळी मंडळी गायब आहेत. भाजपचा एखादा नेता नेहमीप्रमाणे काहीतरी बालिश कमेंट देऊन पूर्ण पक्षाचं हसं करतोय. देशात अजूनही बलात्कार होणं सुरूच आहे. किंवा कदाचित या घटनांना आता जास्त मिडिया कव्हरेज मिळतंय. सध्याची पत्रकारिता ही इतकी हीन दर्जाची झालीय की सगळं असंच चालू राहिलं तर व्हेदर फोरकास्ट सारखी ही मंडळी रेप फोरकास्ट करायला पुढे मागे पाहणार नाहीत. बलात्कार झाला हे दुर्दैवी सत्य आहे हे मान्य करून भविष्यात या घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या आहेत याचा कुणीच डोळसपणे, व्यापकपणे विचार करताना दिसत नाहीये. मीसुद्धा इथे निव्वळ माझ्या सामाजीक संवेदना प्रखर आहेत अशी बोंबाबोंब करून मुळीच थांबणार नाहीये. मला काही प्रतिबंध सुचवणं जास्त महत्वाचं वाटतं.

या घटनेचे एकूणच तीव्र पडसाद उमटल्यामुळे पोलिस संख्येत वाढ, गुन्हेगारांच्या मनात भीती,स्त्रियांच्या मानसिक आणि काही अंशी शारीरिक सबलीकरणासाठी सामाजिक उपक्रम येत्या काही महिन्यात राबवले जातील हे निश्चित. (नाही गेले तर मात्र खरंच २१ डिसेंबरला जग बुडायला हवं होतं अशी परिस्थिती निर्माण होईल) दूरदृष्टीने विचार करता, बलात्कारासारखी घटना जेव्हा घडते तेव्हा तीन मुद्दे विचारात घ्यावेसे वाटतात- शिक्षण, संस्कार, आणि संस्कृती. तिन्ही जड आणि व्यापक शब्द आहेत त्यामुळे थोडे सोप्पे करून उलगडण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणाचा अभाव ही आपल्याकडे कित्येक समस्या निर्माण होण्याच्या मागचं मूळ कारण आहे. नैतिक मुल्यशिक्षण नावाचा विषय अभ्यासात आणला गेला हे खरं पण तो शिकवला जात नाही आणि आचरणात आणणं होत नाही.  संस्कार ही यापुढची पायरी. आज कित्येक ग्रामीण आणि काही शहरी घरांमध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तिथे वाढणाऱ्या पिढ्या काय स्त्रीचा आणि तिच्या चारित्र्याचा आदर करणार? या मुद्द्यावर राहवत नाहीये म्हणून विषयांतर करतोय- सावंतांच्या युगंधरमध्ये कृष्णाच्या तोंडी एक सुरेख वाक्य आहे- 'स्त्री म्हणजे कन्या, पुत्र जन्माला घालणारं यंत्र नव्हे, स्त्री म्हणजेच वात्सल्य आणि वात्सल्य म्हणजेच स्त्री. स्त्री माता, भगिनी, पत्नी, कन्या, काकी, मामी, आत्या, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणून सर्वदा वंदनीयच असते' कदाचित असंच शिक्षणाचं, संस्कारांचं बाळकडू जर का प्रत्येकाला मिळालं तर काहीतरी चांगलं निश्चित होऊ शकतं.  शेवटचा मुद्दा संस्कृती. हा तर फार मोठा शब्द आहे. पण आपली संस्कृती -तेच ते इंग्लिशमधलं कल्चर- आपल्याला कुठलीही सामाजिक भीती घालत नाही. देशावर,देशाच्या संसदेवर हल्ला केलेले दहशतवादी अनेक वर्ष सरकारी पाहुणचार घेतात, राष्ट्रपती दयेच्या अर्जांकडे वर्षानुवर्ष ढुंकून बघतसुद्धा नाहीत तिथे बलात्कार करण्याची भीती कशाला वाटली पाहिजे? आमच्याकडच्या सिनेमांमध्ये रेप होतो आणि मग रेप करणारा त्या मुलीशी लग्न करतो. आमचा कायदापण अशी काहीतरी सूट देतो. हे झालं कायद्याचं, सरकारचं. दुसरीकडे अमेरिकन सिनेमे बघून त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे समाज म्हणून कळायला पाहिजे. ग्लोबलाईझ होणं म्हणजे कुठल्या बाबींमध्ये प्रगती आणि कुठे अधोगती झाली पाहिजे हेसुद्धा ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि हो, हा मुद्दा स्त्रियांना (टू बी स्पेसिफिक मॉडर्न तरुणींना) सुद्धा काही अंशी लागू होतो. स्त्री-पुरुषांनी एकमेकांच्या मुलभूत क्षमता आणि मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय, उपक्रम वगैरे करूनही काही करंट्या लोकांची सदसतविवेक बुद्धी त्यांना अशी हीन, बिभत्स कृत्य करायला प्रवृत्त करणार हे दुर्दैवी सत्य आहे. त्यावेळी शिक्षा काय असली पाहिजे याचं मात्र निःपक्ष उत्तर माझ्याकडे नाही हे मी कबूल करतो. मिडल-इस्टमधल्या अनेक देशातल्या शिक्षा मी वाचल्या आहेत पण लोकशाहीचं बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशाला हे करणं शक्य होणार नाही. देहांत शिक्षा देणं कदाचित योग्य पर्याय ठरणार नाही तर लिंग-छाटणं हा अघोरी पर्याय ठरेल. दिल्लीसारख्या अघोरी घटनांना कदाचित असा अघोरी उपाय करावासुद्धा लागेल पण योग्य शिक्षा नेमकी काय असली पाहिजे हे मी ठरवू शकलेलो नाही.

सरतेशेवटी, सर्व प्रकारच्या वैश्विक गुंत्यांवर या विषयावरील आपला संताप शिव्या देऊन, विरोध करून, काळ्या वर्तुळाचे फोटो लावून व्यक्त करणाऱ्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी कोणताही विरोध केला नाहीये किंवा ज्यांना या घटनेबद्दल काहीच माहित नाहीये त्यांच्याबद्दल मला कोणतीही सहानभूती, कौतुक किंवा रागसुद्धा नाही. पुन्हा एकदा डोळसपणे या घटनेकडे बघून मुळ विषयापासून न भरकटता, मुद्द्याला धरून काही सुचत असेल, लिहायचं असेल, करायचं असेल तर जरूर करा. हा मुद्दा राजकीय, भाषिक, पक्षीय, भ्रष्टाचारविषयक नसून त्यात प्रत्येक सुजाण माणसाने किमान जागरूकता, संवेदनशीलता आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन या मुद्द्यांबद्दल स्वतःकडेच सिंहावलोकन करावं अशी अपेक्षा आहे.
आणि हो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष सर्वाना आर्थिक भरभराटीचं आणि सुरक्षिततेचं जावो!


चैतन्य

2 comments:

hushari said...

चैतन्य तुम्ही शिक्षा काय व्हायला पाहिजे याबद्दल साशंक आहात परंतु मुळात शिक्षा होण्यासाठी गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. आणि अशा प्रकारचे गुन्हे शाबित होण्यासाठी तत्पर पोलीस यंत्रणा, पुरेशी forensic ची लोक, पुरेसे न्यायाधीश, कुठल्याही कारणाने न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप न करणारे राजकारणी ई. गोष्टींची आवश्यकता असते. तसेच कुठलेही गुन्हेगारीचे खटले ठराविक टाईम फ्रेम मधेच सुटले पाहिजे. आपल्याकडे तसे आहे हे म्हणणे धाडसाचे होईल.

दुसरे म्हणजे कोणत्याही प्रश्नाकडे आपण आपल्या आवडत्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो. फेसबुक, ट्विटर, अन्य काही मराठी अथवा इंग्लिश साईटवर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया (राजकारण्यांच्या प्रतिक्रिया मी इथे धरत नाही)साधारणतः अशा होत्या. कुणाच्या मते दिल्लीत काँग्रेसी असल्यामुळे असे झाले, तर काहींच्या मते ही मनुवादी संस्कृतीची पैदास आहे, काहींना शरीयाच सर्व जगाला तारून नेईल असे वाटते, काही जणांचे तर असे म्हणणे की ती मुलगी उच्च/मध्यम वर्गातली असल्यामुळे एवढी बोंबाबोंब झाली नाहीतर गरिबांसाठी कोण एवढा आवाज उठवेल.

Chaitanya Joshi said...

@हुशारी:
ब्लॉगवर स्वागत...तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहेच! मी हा सगळा विचार केला..स्वतःचीच शेपटी पकडायचा प्रयत्न करणाऱ्या कुत्र्यासारखं झालं माझं!! बलात्कार, खून, दहशतवाद असा कोणताही मुद्दा असो मी पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, लोकसंख्या वगैरेमध्येच अडकत होतो! :(
मग मी मुद्दाम त्या मुद्द्यांमध्ये शिरलोच नाही कारण निदान सध्याच्या प्रकरणाचा विचार करायचा तर सगळ्या दोषींनी आयदर कबुलीजबाब दिलाय किंवा ज्या एकाने दिला नाही त्याची ओळख परेड झालीय..
मी थोडं आशावादी होऊन अशा घटना होऊच नयेत म्हणून काय उपाय व्हावेत याचा विचार केला शेवटी...:)