Pages

Wednesday, June 11, 2014

नाईटमेअर भाग २

भाग १ वरून पुढे-

श्रीकांत एकटक त्याच्याकडे बघत होता. अनुपम दचकला.
"अहो श्रीकांत सर….घाबरलो ना मी…कधी जागे झालात तुम्ही?" त्याने क्षणात स्वतःला सावरलं.
"झोपलो नव्हतोच मी…झोप कसली येणारे? हा भिकारचोट पाऊस थांबतोय कुठे? आणि त्यात या वीजा…." श्रीकांतचा सूर अजूनही वैतागलेलाच होता.
"पाऊस नाही हो… आपण भिकारचोट…माझं नशीबच भिकारचोट जे अडकलो या पावसात…कुठला मुहूर्त शोधून मी बाहेर पडलो होतो कुणास ठाऊक?" अनुपमने एक घोट घेत म्हटलं.
'चांगल्या घरचा दिसतोय….असल्या भयाण काळोखाची, एकटेपणाची सवय नसेल त्याला' श्रीकांत मनात म्हणाला. 'आता ही ब्याद पाऊस थांबेपर्यंत आपल्याला चिकटली आहेच तर आपणही थोडं सैल व्हायला काय हरकते…?? नाहीतर एरव्ही आपल्याशी बोलायला कुणाला रस असतो?' असा विचार त्याने केला.
"मुहूर्त योग्यच होता की…अमावास्या आहे आज…." श्रीकांत मंद हसत बोलला.
"क्काय?ककक्कशावरून?…." अनुपमने आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत विचारलं. त्याला क्षणात अमावस्या, भुतं, प्रेतात्मे, हडळी अशा सगळ्या गोष्टी आठवल्या. श्रीकांतला त्याच्या आवाजातला बदल जाणवला…
"म्हणजे काय? नाहीतर आज मी इथे या भयाण शेडखाली तुम्हाला का भेटलो असतो! आजचाच दिवस तर असतो माझ्यासारख्या भूताखेतांना मोकळं हिंडायला…झपाटायला एखादं झाड शोधायला…" श्रीकांत हसत म्हणाला.
अनुपमला घाम फुटला. त्याच्या हातातला ग्लास खाली पडला.
"त…तत…तु…तुम्ही खरंच भूत आहात?" त्याने भेदरलेल्या आवाजात विचारलं.
श्रीकांतने अनुपमला झटक्यात घाबरलेलं पाहिलं आणि त्याला हसू फुटलं-
"अहो कामत, एवढे बिचकू नका…मी नाहीये भूत-बित…मी गंमत करत होतो" श्रीकांत हसत म्हणाला. त्याचा एकूण अवतार आणि त्याचं खदाखदा हसणं यांच्या एकत्रित परिणामाने अनुपम शांत व्हायच्या ऐवजी अजूनच अस्वस्थ झाला. गेले एक-दीड तास त्याच्याबरोबर शेडमध्ये असणारा माणूस आणि गेल्या अर्ध्या मिनिटातला माणूस यांच्यात खूप जास्त फरक होता. असा फरक सध्या माणसात नाही होऊ शकत…'हा म्हणतो तसा खरंच मुंज्या किंवा अतृप्त प्रेतात्मा स्पिरीट वगैरे काहीतरी असला पाहिजे'
"अ..अ.…आधी थट्टा करत होतात क….की आत्ता थ…थट्टा करताय?" त्याने घाबरून विचारलं.
"कामत अहो…मी खरंच थट्टा करत होतो…"
"म…म…मग आज अमावस्या आहे हे तुम्हाला कसं ठाऊक?"
"अहो त्यात काय अवघड आहे? जरा आकाशाकडे बघा…दिसतोय का कुठे चंद्र किंवा चंद्राच्या आकाराचं काही??" श्रीकांतने विचारलं.
अनुपमने मागे वळून वाकून मान वर करत शेडच्यावर आकाशात पाहिलं. चंद्र काही दिसला नाही पण आपण नेमके कोणत्या दिशेला पाहतोय हेही त्याला माहित नव्हतं. त्याने त्या सुसाट पावसात आकाशात चंद्र शोधण्याचा निर्णय रद्द केला.
"हट…चंद्र कसला बघू??…इतक्या पावसात चंद्र दिसतो का?" अनुपमची भीती थोडी कमी झाल्यासारखी वाटली.
"बरं मग माझ्यावर विश्वास ठेवा….आज आहे अमावास्या…पण मी भूत नाहीये…घाबरू नका एवढे…" श्रीकांतने पुढे होत त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जवळ जायचा प्रयत्न केला. अनुपम दचकुन मागे सरकला.
"कामत…अहो माझ्या हातात काही नाहीये!"
"हातात काही असायची गरजच काये? तुम्ही ते झपाटायला झाड वगैरे शोधत असता ना?"
अनुपमच्या शंकांनी श्रीकांतला अजूनच हसायला येत होतंच पण हळूहळू त्याला अनुपमच्या भेकडपणाचा रागही यायला लागला होता…'समजा आलंच एखाद्याच्या समोर भूत…तर काय एवढं आचरटासारखं वागायचं असतं का? आणि ही अनुपमसारखी उच्चभ्रू व्हाईट कॉलर मंडळी म्हणे देश बदलणार आहेत!'
"अहो… असं काही नसतं हो…मी क्षणापुरती थट्टा केली तर तुम्ही आता इतके बिचकताय की मला माझ्याच थट्टेचा राग येतोय…चुकलंच माझं!"

श्रीकांत पुन्हा बाकावर जाउन बसला. अनुपम अस्वस्थपणे विचार करत तिथेच उभा राहिला. पुन्हा काही वेळ असाच गेला. श्रीकांत पुन्हा पेंगायला लागल्याचं बघून अनुपमला थोडं हायसं वाटलं.
"ओ श्रीकांत सर….पुन्हा झोपलात का?" अनुपमने कंटाळून त्याला हाक मारली.
"झोपलो नाहीये हो मी….किती वेळा सांगितलं….काही हवंय का तुम्हाला?"
"नाही हो…ते आपलं एकटं बसून कंटाळा आला म्हणून--"
"हो पण मी भूत आहे नाही का? मग भूताशी बोलायला तुम्हाला भीती नाही वाटते? मी तुम्हाला झपाटलं तर-" श्रीकांत वैतागल्या सुरात म्हणाला.
"सॉरी बरं का…पण रात्रीच्या अंधारात निरर्थकपणे बसून राहिलं की स्वतः 'भूत' असल्यासारखं वाटतं…त्या एकटेपणापेक्षा एखाद्या खऱ्या भुताची कंपनी काय वाईट?" अनुपमने पावसाकडे बघत उत्तर दिलं.
"आयला…म्हंजे मी भूत आहे हे तुम्ही पक्कं केलेलं दिसतंय…आणि तसं असेल तर तुम्ही हा तुमचा भूतासारखा एकांत कवटाळून बसा….माझ्या वाटेला येऊ नका" --श्रीकांत.
"अहो सॉरी…मला तसं नव्हतं म्हणायचं…तुम्ही भूत-बित कुणी नाही आहात याची खात्री पटलीय माझी"
"अरे वा तुमचं हार्दिक अभिनंदन" श्रीकांतच्या आवाजातला खोचकपणा पुन्हा बाहेर आला पण यावेळी तो चेहऱ्यावरून बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत होता.
"आता तुम्ही अभिनंदन करताच आहात तर माझा गाढवपणा सेलिब्रेट करूयात….घेणार का थोडी थोडी?" अनुपमने हसत विचारलं.
"छान…कुणाचातरी गाढवपणा सेलिब्रेट करायला पहिल्यांदा पिणारे मी…चालेल थोडीशी" श्रीकांतने उत्तर दिलं.
अनुपमने बाटली बाहेर काढली. श्रीकांतसाठी अजून एक ग्लास काढला. दोघांचे पेग भरले आणि शेडच्या कडेला उभं राहून त्यात पावसाचं पाणी पडू दिलं.
"घ्या….चीअर्स" त्याने श्रीकांतला ग्लास पुढे केला.
"ब्लू लेबल….? तुम्ही खूपच शौकीन दिसताय…" श्रीकांतने बाटलीवरचं नाव बघून ग्लास घेत प्रश्न विचारला.
"असं शौक वगैरे काही मी मानत नाही हो…असं काही नसतंच…चांगल्या प्रतीच्या वस्तू वापरायच्या म्हणजे त्यांची जास्त किंमत द्यावी लागते…आता याला लोक 'शौक' वगैरे शब्द जोडून समोरच्याला चंगळवादी डिक्लेअर करून टाकतात हा भाग वेगळा…आता मला साधं सांगा…तुम्हाला सिनेमा पहायचा आहे…सुंदर, नेत्रसुखद सिनेनट्या असणारा 'जवानी दिवानी' अशा काहीतरी नावाचा सिनेमा जवळच्या मल्टीप्लेक्समध्ये लागलाय आणि बाजूच्या जुन्या टॉकीजमध्ये 'वैनीचं मंगळसूत्र'वाली रडारड सुरु आहे…तुम्हाला करमणूक हवी आहे…तुम्ही एक वेळ दोन पैसे जास्त खर्चून मल्टीप्लेक्समध्ये जाल किंवा सिनेमा पहायला जाणारच नाही… जर का तुम्ही मल्टीप्लेक्समध्ये गेलात ते चंगळ करायच्या हेतूने गेलात का? नाही! तुम्ही सिनेमाचे दर्दी 'शौकीन' आहात म्हणून गेलात का? नाही!  निखळ करमणूक करून घेणं हा तुमचा हेतू होता जो तुम्ही साध्य केलात…चांगल्या करमणुकीला चांगली किंमत…हे ब्लू लेबलचं म्हणाल तर तसंच आहे…असो…आपण सेलिब्रेशन डिले नको करायला…चीअर्स" अनुपम बाकाच्या एका कडेला बसत म्हणाला.
श्रीकांतला त्याचा क्षणभर हेवा वाटला- 'करमणूक करून घ्यायची इच्छा असो वा नसो…आमच्या नशिबात कायम 'वैनीच्या मंगळसूत्रा'ची रडारडच' त्याच्या मनात विचार आला.
त्याने ब्लू लेबलचा कप तोंडाला लावला. दारूचा गरम स्पर्श त्याच्या जिभेला जाणवला. एकीकडे दारूचा घोट घसा आणि अन्ननलिका जाळत पोटात गेला आणि लगोलग एक शिरशिरी मेंदूपर्यंत पोहोचली. डोळ्यांची बुब्बुळं मोठी झाली, खांद्याचे स्नायू ताठरले आणि त्याने घट्ट डोळे मिटून मान जोरात हलवली.
"काय आवडली का?" अनुपमने श्रीकांतचे हावभाव बघत प्रश्न विचारला.
"झकास…मझा आ गया…तुमचं ते 'जवानी दिवानी'चं उदाहरण खरं आहे राव….आम्ही साला भिकारचोट क्वालिटीचंच कायम पीत आलो…कर्मदळिद्र म्हणायचं दुसरं काय!" श्रीकांतच्या डोक्यातली शिरशिरी अजून कमी झाली नव्हती.
"एक गंमत सांगतो- ही ब्लू लेबल म्हणजे जॉनी वॉकरचा ब्रांड! हा जॉनी खरंतर एक किराणा माल विक्रेता होता…पण सुरेख दारू बनवायचा…त्याने बनवलेली दारू पंचक्रोशीत प्रसिद्ध होती…तो मेल्यावर त्याच्या पुढच्या पिढ्यांनी दारूचा धंदा वाढवला, जगप्रसिद्ध केला. पण ज्याच्या नावाने आज ही मंडळी धंद्याचं दुकान चालवतायत त्या जॉनी वॉकरने कधीच दारू प्यायली नाही! बोला- आता कर्मदळीद्री कोण?तुम्ही का तो?"
"यडा म्हणायचा का खुळा?? ज्याला आयुष्यात आपण काय घडवलं ते साधं चाखून पाहता आलं नाही तो खरा कमनशिबी…जॉनी वॉकर" श्रीकांतने एक मोठ्ठा घोट घेऊन पेग संपवला. अनुपम हळूहळू घुटके घेत होता. त्याचा पेग संपून त्याने पुन्हा 'पेग भरू का?' विचारेपर्यंत त्याचं तोंड बघत बसणं भाग होतं.
"हां…तर या एवढ्या पावसात निघाला कुठे होतात तुम्ही?" अनुपमने पुन्हा नको तो प्रश्न विचारला.
अलीकडच्या काळात एकवेळ खाल्या मिठाला माणूस जागला नाही तर चालतं पण प्यायला दारूला तो जागलाच पाहिजे!
'काय सांगायचं याला? खरं सांगायचं…? पण याला खरंच आपल्या शोधात कुणी पाठवलं असेल तर?? ही दारू पाजणं वगैरे सगळा बहाणा तर नाहीये ना आपल्याला अडकावायचा? छे छे…याला कुणी पाठवला असेल असं नाही वाटत…नाहीतर मगाशी मी भूत आहे असं सांगितल्यावर ढुंगणाला पाय लावून पाळायची तयारी केली नसती त्याने. आणि याला सगळं सांगितलंच तरी काय फरक पडणारे? कुणीतरी म्हटलंच आहे…अनोळखी माणसाला आपले प्रॉब्लेम्स सांगण्यासारखं बेस्ट काही नाही… आपल्या आयुष्यातल्या इतर कुणालाच तो ओळखत नसल्याने तो आपल्या गोष्टीकडे आपण सांगू त्याच दृष्टीकोनातून पाहतो…त्याला आपलं दुःख कळू शकतं…आपल्यालासुद्धा हलकं वाटतं…सांगूयात….फार खोलात जाउन विचारायला लागला तर मग संशयी वाटेल थोडं…हट साला…मगाशी बोबडी वळली होती तेव्हाच पळवून लावलं असतं तर- काय करावं सुचत नाहीये हेच खरं"
"तुमचा काही सांगायचा मूड दिसत नाही! जाउद्यात…आपण अजून एक पेग घेऊया…" श्रीकांत तंद्रीत असताना अनुपमने पुन्हा ग्लास भरले होते  आणि तो उठून पुन्हा पाणी भरायला शेडच्या कडेला जायला निघाला.
"तसं नाही हो…सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटायचं…आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला सांगायला लाज वाटतेय…" श्रीकांतने शरमिंदा होत ग्लास हातात घेतला.
"तुम्ही फार विचार करता हो…लाज वाटणं, अपराधी वाटणं या फार सापेक्ष भावना आहेत…जगाचा, आजूबाजूच्या लोकांचा फार विचार करत राहिलं की हे असं होतं.…इथे त्याची काही गरज नाही…माझ्यासमोर कसली लाज? त्यात तुम्ही दोन पेग डाऊन आणि मी तीन!! अशा वेळी जगजेत्ता असल्याचं माजोराडं वाटणारं फिलिंग आलं पाहिजे! दारू प्यायची कशाला…अशाच सापेक्ष क्षणांना विसरायला…जगाचा अजिबात विचार न करता मनात येईल ते बोलायला लावते दारू! बरोबर की नाही??" अनुपम जगज्जेता नाही पण तत्ववेत्ता नक्की झाला होता. म्हणजे तो नेहमीच असा असतो की हा दारूचा परिणाम आहे हे मात्र त्याला खात्रीने ठाऊक नव्हतं. शिरवळकरांच्या दुनियादारीत एक वाक्य होतं- 'दारू प्यायल्याच्या पहिल्या स्टेजला माणूस जगज्जेता असतो, दुसऱ्या स्टेजला महान तत्वज्ञ आणि तिसऱ्या स्टेजला स्वतःचं हगलं-मुतलं न कळणारं लहान मुल असतो'. म्हणजे अनुपम हा पेग संपता संपता ओकायला लागणार का काय? आणि त्याचं जाऊ दे पण आपल्याला ते 'फील्स लाइक्स दी किंग्स ऑफ दी वर्ल्डस' असं फिलिंग येतंय खरं! सांगूनच टाकू याला! काय फरक पडणारे….
"काय सांगू कामत साहेब तुम्हाला? मलाच ठाऊक नाही मी कुठे चल्लो---चाललोय….आठवतंय तेव्हापासून पळतोच आहे…कुठून निघालो धड आठवत नाही! कुठे जायचंय माहित नाही!"
"एवढा गोंधळ करू नका श्रीकांत राव…सोप्पं बोलू…मी तुम्हाला आठवायला मदत करतो-मगाशी तुम्ही बोल्लात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात--तुअम्च्य मनगटावर ही पट्टी…हे कसं काय बुवा?"
"हे?" श्रीकांत खिन्न हसला."साला….जगाची पण गंमत आहे नाही…जगणं नकोसं करून टाकतात आणि आपण आत्महत्येचा प्रयत्न केला की वाचवतात आणि पुन्हा कायद्याने शिक्षा करतात"
"म्हणजे?? ही पट्टी?" अनुपमने आश्चर्याने विचारलं.
"करेक्ट…मी जीव द्यायचा प्रयत्न केला होता…आत्महत्या…खुद की ख़ुशी के लिये खुद्खुशी….सुसाईड…."
"पण का??"
"खूप मोठ्ठी स्टोरी आहे"
"मग चालेल की…आपल्याकडे वेळ पण आहे आणि ब्लू लेबलपण" अनुपमने हातात बाटली नाचवत पावसाकडे बोट दाखवत म्हटलं.

''हे काय लिहिलं आहेस तू अनु?'' अनुपमची डायरी हातात धरून बाबाने विचारलं होतं-
'
आयुष्य. जीवन. जिंदगी. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास! माणूस अकाली गेला की लोक म्हणतात- 'मरण कुणाला चुकलंय बाबा?' पण माणूस जास्त जगला की 'जगणं कुणाला चुकलंय' असं कुणी का म्हणत नाही? उलट 'म्हातारा मस्त जगतोय…मेला की सोनं होईल त्याचं' वगैरे म्हणून कौतुकच जास्त होतं! असं का? कशासाठी? जगण्याचा एवढा अट्टाहास का? मेल्यावर काय होतं पाहिलंय कुणी? Seriously......Who has seen the other side? कदाचित खूप प्लेझंट असेल ती बाजू आणि त्या बाजूचे लोक कदाचित आपण करतो त्याच्या एकदम विरुद्ध विचार करत असतील!'
''हे असलं काहीतरी लिहितोस तू? मला तुझी फार काळजी वाटते बुवा''
म्हातारा गेला. काळजी करत करत गेला एकदाचा!!

'हा श्रीकांत काय गोष्ट सांगणारे कुणास ठाऊक?' पुढचा घोट घेताना अनुपमच्या मनात विचार आला.


क्रमशः

3 comments:

gajanan chavan said...

खूप छान.
जवानी दिवानीच उदाहरण खूप आवडलं.
Waiting for next part.
hope u will post it soon :)

Chaitanya Joshi said...

@gajanan chavan:


प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्स! कमीत कमी वेळात लिहायचा प्रयत्न करत होतो पण नाही जमलं-- पुढचा भाग टाकलाय! आवडेल अशी अपेक्षा आहे!

Unknown said...

mast