Pages

Saturday, January 4, 2020

पर्सन ऑफ इन्टरेस्ट: उहापोह आणि चिंतन (भाग १)

        
 
(Image From: https://cutt.ly/drhUAXm)
  जोनाथन नोलन हा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा भाऊ. ख्रिस्तोफर नोलनचा गाजलेल्या पहिल्या सिनेमाची- 'मेमेंटो'ची मूळ कथा जोनाथनची होती. नंतर 'द प्रेस्टिज', 'डार्क नाईट', 'डार्क नाईट रायझेस', आणि 'इंटरस्टेलर' अशा ख्रिस्तोफर नोलनच्या कित्येक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथांवर त्याने काम केलंय. जोनाथनच्या या सगळ्या कामांचा उल्लेख इथे करण्याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या तोडीस तोड असूनही, त्याची संकल्पना असणाऱ्या 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' (POI)ला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. निव्वळ करमणूक सोडून बुद्धिजीवी लोकांना विचार करायला लावणारा, प्रचंड गुंतागुंत असणारा, भविष्याचा वेध घेणारा, प्रसंगी अचाट वा अशक्य गोष्टी आणि त्या गोष्टी करणाऱ्या 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा असणारा शो म्हणून मला POI कायमच खूप आवडलाय. तो का आवडला किंवा त्यातल्या विचार करायला लावणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल लिहायचं खूप महिने मनात होतं. आज फायनली मुहूर्त सापडलाय...
            ११ सप्टेंबर २००१ ला न्यूयॉर्कच्या 'ट्विन टॉवर्स'वर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिका हादरली आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण, सुरक्षा, दळणवळण अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर दूरगामी परिणाम झाले. मध्य पूर्वेतली युद्धं अमेरिकेला नवीन नव्हती पण देशांतर्गत सुरक्षाप्रणालीत घोषित-अघोषित अनेक बदल झाले ते ९/११ नंतर. 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' हा टीव्ही शो सुरु झाला २०११ मध्ये पण त्यात दाखवलेल्या गोष्टीची सुरुवात झाली ती २००१ मध्ये. शोच्या 'पायलट' अर्थात पहिल्या पर्वाच्या/सिझनच्या पहिल्या भागात आपण भेटतो जॉन रीसला. हा जॉन आधी सैन्यात होता, मध्यपुर्वेचे दौरे करून आला, नंतर सीआयएचा हेरसुद्धा होता- आता मात्र तो स्वतःला दारूमध्ये बुडवून, कुठलंतरी न सांगता येण्यासारखं दुःख कवटाळून बेघर भटकतोय. कुठल्याश्या लहानश्या मारामारीत त्याला पोलीस पकडतात आणि जेलमध्ये टाकतात. तेव्हा त्याची सुटका एक अनोळखी, एकलकोंडा आणि काहीसा अनाकलनीय माणूस- हॅरल्ड फिंच करतो. हॅरल्ड फिंच या माणसाची सरकारदफ्तरी कुठली नोंद नाही, त्यालासुद्धा जॉनसारखा कुणीही जवळचा नातेवाईक नाही. POIला शीर्षक गीत नाही. त्याऐवजी या हॅरल्डच्याच आवाजातलं एक निवेदन आहे जे साधारण शोची संकल्पना आपल्याला सांगतं. ते निवेदन ढोबळमानाने असं-

"तुमच्यावर पाळत ठेवली जातेय.
सरकारकडे एक गुप्त यंत्रणा, एक 'मशीन' आहे जे दर क्षणाला तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे.
मला मशीनबद्दल माहितीय कारण ते मीच बनवलंय.
मी मशीन बनवलं ते दहशतवादी घातपातांच्या घटनांवर लक्ष ठेवायला,
पण मशीनचं लक्ष तर सगळ्या(जगा)वरच आहे, सगळ्या हिंसक गुन्ह्यांवर!
असे गुन्हे ज्यात तुमच्यासारखे लोक गुंतलेले असू शकतात,
असे गुन्हे ज्याला सरकार काही महत्व देत नाही,
सरकार काही करत नाही म्हणून मी (गुन्हे थांबवायला) काहीतरी करायचं ठरवलं..
पण मला या कामात एक जोडीदार हवा होता (जॉन रीस इथे पडद्यावर दिसतो), ज्याच्याकडे असे गुन्हे थांबवण्यासाठी लागणारी तंत्रं असतील...
यंत्रणा आमच्या मागावर आहेत, (म्हणून) आम्ही गुप्तपणे काम करतो..
तुम्ही आम्हाला शोधू शकणार नाही....
पण तुम्ही जर का (संभाव्य) गुन्हेगार किंवा गुन्ह्याला बळी पडणार असाल तर आम्ही तुम्हाला शोधू..."


गुन्हेविश्वावर आधारित टीव्ही शो अर्थात 'Crime Procedural' ही संकल्पना अजिबातच नवीन नाही. आजपर्यंत जगभरात शेकड्याने असे कार्यक्रम बनले असावेत ज्यात भागाच्या सुरुवातीला खून (कधीतरी चोरी) वगैरे होतो आणि वेगवेगळे स्टायलिश लोक आपापल्या पद्धतीने खुनी, चोर वगैरे शोधतात. POI चा पहिला सिझन हा एकूणच प्रत्येक भागाची स्वतंत्र कथा असणाऱ्या 'Crime Procedural' प्रकारात येत असला तरी गुन्ह्याची उकल करण्यापेक्षा 'गुन्हा थांबवणं' हा त्याची मुख्य 'थीम' आहे. त्यात 'मशीन'च्या कार्यपद्धतीमुळे नेहमी गुन्ह्याशी 'संलग्न व्यक्ती' अर्थात 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' गुन्हा करणारे की गुन्ह्याला बळी पडणारे हे रीस किंवा फिंचला माहित नसतं. तेव्हा ते शोधणं हा ही एक रहस्याचा भाग! जॉन रीस फिंचच्या मदतीनं, निनावी राहून, पोलिसांपासून लपत-छपत, टिपटॉप सुटाबुटात फिरून न्यूयॉर्क शहरात घडणारे गुन्हे थांबवायला सुरुवात करतो. न्यूयॉर्कच्या पोलीस, गुन्हेगारांपासून ते पार एफबीआय, सीआयएपर्यंत 'सुटातला माणूस' अशा हास्यास्पद (पण चपखल) नावाने प्रसिद्ध होतो. सोबतच्या उपकथानकांमध्ये दोन पोलीस अधिकारी सहकारी पात्रं म्हणून दर भागात दिसतात. यातली एकजण 'जोस कार्टर' प्रामाणिक, निष्ठावंत डिटेक्टिव्ह आहे जिला 'सुटातल्या माणसाला' पकडायचंय आणि दुसऱ्या काहीश्या चांगल्या वृत्तीच्या पण भ्रष्ट्र डिटेक्टीव्ह 'लायनल फस्को'ला जॉनने त्याच्याविरुद्धचे काही पुरावे लपवून ठेवत स्वतःच्या बाजूला करून घेतलंय. न्यूयॉर्कमधल्या भ्रष्ट पोलिसांची एक संघटना जिचं नाव HR, तिथल्या गुन्हेगारी फॅमिलीज आणि त्यांच्यातला संघर्ष हेसुद्धा अगदी सहज या सिझनमध्ये येतं. मी वर लिहिलेली गुंतागुंत, भविष्याचा वेध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्याचा आयुष्यावर होऊ शकणारा परिणाम असे क्लिष्ट मुद्दे या पहिल्या सिझनमध्ये नाहीत. यातली लहान-मोठी उपकथानकं, इतर पात्रं चांगली असली तरी तोंड भरून कौतुक वगैरे करण्याजोगी नाहीत. जवळपास सगळे भाग स्वतंत्र आहेत आणि फक्त कार्यक्रमाची संकल्पना माहित असेल तर आधीचा भाग बघितलाच पाहिजे असं नाही. यातही 'जजमेंट', 'विटनेस', आणि 'बेबी ब्लु' हे माझे आवडते एपिसोड्स आहेत.

दुसऱ्या पर्वात POI मालिका म्हणून हळूहळू 'सीरियलाईज्ड' व्हायला लागते. ज्याला 'आर्टिफिशियल सुपरइंटेलिजन्स' (ASI) म्हणता येईल असं मशीन अस्तित्वात असल्याची चाहूल लागलेले लोक, मशिनचं अस्तित्व जगाला कळू नये म्हणून सरकारी यंत्रणांचे चालू असणारे अथक प्रयत्न (ज्यात मुखत्वे मशीनबद्दल ठाऊक असलेल्या लोकांना जीवे मारणं  हेच त्याचं अस्त्रित्व लपवण्याचा मार्ग आहे हे मानणारे अधिकारी) ही मुख्य उपकथानकं इथे येतात. फिंचचा भूतकाळ, त्याने नेमक्या रीसलाच का जोडीदार म्हणून नेमलं, मशीन फिंचशी किंवा फिंच मशीनशी संपर्क कसे साधतात? या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मशीनचा शोध लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हेतू आहेत- कुणाला ते नष्ट करायचं आहे, कुणाला त्याच्यावर ताबा हवाय वगैरे वगैरे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक 'मशीन' या यंत्रणेला एक पात्र म्हणून बघायला लागतो. दरम्यान पहिल्या पर्वात असणारी सहकारी पात्रं- कार्टर, फस्को, एलायस, रूट आता जास्त महत्वाची होतात. 'टीम मशीन' विस्तारते ज्यात आता रीस, फिंच सोडून कार्टर, फस्को, समीन शॉ सुद्धा सहभागी होतात. दुसऱ्या सिझनमध्येसुद्धा जवळपास प्रत्येक भागाला एक 'स्वतंत्र' कथानक आहे आणि काही प्रमाणात वर लिहिलेली उपकथानकं पुढे नेण्यावर भर आहे (जे पुढच्या सीझन्समध्ये अधिकाधिक होतं). एकूणच दुसरा सिझन मला आवडला असला तरी विशेष करून रीसला 'सुटातला माणूस' म्हणून एफबीआयचे लोक पकडतात तेव्हाचे २ भाग '2PiR' आणि 'प्रिसनर्स डायलेमा' मला खूपच आवडतात. सगळ्या १०३ एपिसोड्सपैकी जोनथन नोलनने दिग्दर्शित केलेला एकमेव, समीन शॉच्या पात्राची ओळख करून देणारा 'रिलेव्हन्स' नावाचा भागही जबर आहे!
२०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेन हे नाव जगाला माहित झालं. स्नोडेनने अमेरिकची 'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' जगभरात लोकांवर बेकायदेशीर पाळत ठेवायचे कार्यक्रम राबवत असल्याचे उल्लेख असणारी कागदपत्रं जगजाहीर केली. स्नोडेनच्या या कामगिरीचे पडसाद अमेरिकेतच नाही तर जगभरात उमटले. त्याने जाहीर केलेल्या कागदपत्रांमध्ये कित्येक टेलिकॉम कंपन्या आणि युरोपियन देशातल्या सरकारांचादेखील उल्लेख होता. हा सगळाच विषय 'POI' च्या मध्यवर्ती संकल्पनेला इतका 'रिलेवंट' असल्याने त्यावर उहापोह होणं अपेक्षित होतं आणि तो झालासुद्धा. दुसऱ्या सीझनमध्ये आपण 'मशीन'ला पात्र म्हणून ओळखायला लागतो तेव्हा त्याच्या 'कोडिंग'मध्ये अर्थात जडणीघडणीमध्ये हॅरल्डच्या जगाकडे बघायच्या दृष्टिकोनाचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात यायला लागलेलं असतं. तिसऱ्या सीझनपासून हे जास्तच अधोरेखित होतं. या सिझनमध्ये न्यूयॉर्क मधल्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेला संपुष्टात आणण्यासाठी कार्टर करत असलेली धडपड, लोकांवर सरकारने बेकायदेशीर पाळत ठेवायच्या बातम्या/अफवा पसरायला लागल्यावर त्याच्या विरोधात सक्रिय झालेली सशस्त्र नागरी संघटना आणि 'मशीन'वर ताबा मिळवणं अवघड आहे याची जाणीव झाल्यावर तसंच दुसरं मशीन बनवायच्या मागे लागलेले लोक ही तीन मुख्य कथानकं आहेत. तिसऱ्या सीझनमधला 'डेविल्स शेअर' हा भाग अफलातून आहे. याच सीझनमधला ४C नावाच्या एपिसोडचं लिखाण हे मला त्यातल्या एक-दोन अचाट सीन्समुळे थोडं वीक वाटतं. पण एकूणच या सीझनपर्यंत POI ची 'मायथॉलॉजी' आणि रीस-फिंचचं 'सुपरहिरो' असणं मी प्रेक्षक म्हणून मान्य केलेलं असतं सो निदान मनोरंजनात खंड पडत नाही.

POIच्या जवळपास प्रत्येक एपिसोडसमध्ये प्रभावी कथानकं, उपकथानकं आहेत. रोचक वाटावेत असे 'पर्सन्स ऑफ इंटरेस्ट' आहेत आणि प्रत्येक मुख्य पात्राचा शोमध्ये पहिल्यांदा दिसण्यापूर्वीचा भूतकाळसुद्धा वेगवेगळ्या एपिसोड्सच्या कथानुकानुसार दाखवला गेलाय. याच अनुषंगाने आता POI च्या पात्रांबद्दल थोडं (खरंतर POI चे एकूण पाच सीझन्स आहेत पण उरलेल्या दोन सीझन्सबद्दल नंतर लिहिणारे आणि त्याचं कारणसुद्धा तेव्हाच देईन). जिम कवीझल POIच्या आधी 'पॅशन ऑफ द ख्राईस्ट' या सिनेमातल्या जिझस ख्राईस्टच्या भूमिकेमुळे लोकांना माहीत होता. त्या 'जिझस'ला सुटाबुटात मारामाऱ्या करताना, सराईतपणे बंदुका वापरताना बघणं हे काही लोकांना धक्कादायक वाटल्याचं वाचलेलं आठवतंय. एका अर्थी ही व्यक्तिरेखा एककल्ली आहे, पहिल्या एपिसोडमधली काही मिनिटं सोडल्यास आपल्याला प्रेक्षक म्हणून रीस काय करेल किंवा भूतकाळात त्याने काय केलं असेल याचा पुरेपूर अंदाज येतो. त्याला असणारं, न सांगता येणारं दुःख कोणतं आहे याचा उलगडा नंतर होतो पण याच अनुषंगाने लहान मुलं किंवा छळ होणाऱ्या बायकांशी संबंधित गुन्हा असला तर रीसचे आविर्भाव पाहण्यासारखे आहेत. कवीझलची इथली भूमिका जिझसच्या भूमिकेपेक्षा वेगळी असली तरी एखाद्या एपिसोडच्या शेवटी कुणालातरी सल्ला किंवा नैतिक बळ देणारा कवीझल पाहिला की 'पॅशन'ची थोडीशी आठवण होतेच. एकीकडे सतत लोकांमध्ये असूनही एकाकी असणारा रीस आणि दुसरीकडे निव्वळ एखाद्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपपुढे बसून रीसशी फोनवर बोलताना दिसणारा 'अक्षरशः एकाकी' फिंच. फिंचची भूमिका करणाऱ्या मायकल इमर्सनला त्याच्या 'लॉस्ट' मधल्या नकारात्मक भूमिकेसाठी एमी मिळालं होतं. लॉस्टमधली त्याची आधी खलनायकी आणि शेवटी चांगुलपणाकडे झुकलेली भूमिका त्याने जबर केलीच होती पण इथे तो मला अभिनेता म्हणून प्रचंड आवडलाय. हॅरल्ड फिंचचं पात्र हे एका अर्थी 'POI' विश्वाची आणि पर्यायाने मशीनची नैतिकता ठरवतं . तो वस्तुनिष्ठ आहे तरी आशावादीसुद्धा आहे. जीवापाड प्रेम करणारी माणसं असूनसुद्धा एकाकी आहे. आपण मशीन बनवून चूक केलं का बरोबर या चिरंतर मानसिक द्वंदात आहे. हे द्वंद चौथ्या-पाचव्या सीझनमध्ये जास्त ठळकपणे  येतं. इमर्सनला ही भूमिका करताना बऱ्याचदा नुसते कॉम्प्युटरपुढे बसून संवाद म्हणायचे असायचे, फोनवर दुसऱ्या बाजूला रीस आहे असं आपण जरी एडिटेड एपिसोडमध्ये पाहिलं तरी इमर्सनचे हे सिन्स एकट्यानेच शूट व्हायचे हे लक्षात घेतलं तर त्याच्या फोनवरच्या संभाषणामधल्या 'रिऍक्शनस' अजून आवडायला लागतात. फिंचच्या पात्राला एका अपघातामुळे आलेलं अपंगत्व दाखवायला त्याने घेतलेलं बेरिंग फ्लॅशबॅकमधले, अपघाताआधीचे सीन्स आले की जास्त अधोरेखित होतं आणि दाद मिळवून जातं. 
                                                       (Image from: https://cutt.ly/SrhUHp1)
या दोघांशिवाय सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे सगळेच अभिनेते कमाल आहेत. एमी एकर अर्थात 'रूट'ची भूमिका ही सुरुवातीला केवळ एक-दोन स्वतंत्र भागांपुरती लिहिली होती पण पुढे तिची लांबी वाढून तिसऱ्या सीझनमध्ये तिला महत्व येतं. या व्यक्तिरेखेच्या परिस्थितीला रिऍक्ट व्हायच्या पद्धती अगदी शेवटपर्यंत काहीशा बेभरवशाच्या राहतात पण 'तुमच्या काम करण्याच्या पद्धतींपेक्षा काम करण्याचा हेतू किती शुद्ध आहे ते महत्वाचं' अशा साधारण तत्वांवर ती 'टीम मशीन'ची मेंबर बनते. अजून एक- एन्रिको कोलांटनीचा कार्ल एलायस- याच्या व्यक्तिरेखेचा ग्राफसुद्धा काहीसा रूटसारखा.आधी 'टीम मशीन' च्या विरोधात असणारा हा न्यूयॉर्कच्या गुन्हेगारी विश्वाचा बादशाह नंतर अज्ञातवासात राहून रीस-फिंचची मदत करतो ते काही सीन्स छान जमलेत. सरतेशेवटी उल्लेख लायनल फस्को अर्थात केविन चॅपमनचा. वाईट संगतीत राहून भ्रष्ट्र झालेला, पण वृत्तीने चांगला असणारा, सगळ्याच लार्जर दॅन लाईफ, जिनियस' पात्रांमध्ये काहीसा अर्धवट वाटणारा, 'टीम मशीन'साठी खूप सुरुवातीपासून मदत करूनही मशीनच्या अस्तित्वाबद्दल अगदी शेवटपर्यंत अनभिज्ञ असणारा फस्को हा सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करतो असं मानायला हरकत नाही. स्वतःतले गुण आणि मुख्यत्त्वे मर्यादा त्याला पुरेपूर ठाऊक आहेत आणि त्या बोलून दाखवायला त्याला अजिबात कमीपणा वाटत नाही. मी POIचे सगळे भाग ५-६ वेळा तरी पहिले असतील, पण लक्षात राहणाऱ्या बऱ्याचश्या पंचलाईन्स फस्कोच्या वाट्याला आल्यायत. आता हे खरंच संवांदांचं क्रेडिट आहे की केविन चॅपमनच्या अभिनयाचं हे पाहणाऱ्याने ठरवायचं. याशिवाय कार्टरच्या भूमिकेत तराजी हेन्सन उत्तम पण POI नंतर तिने इतर अनेक चांगल्या भूमिका केल्यामुळे आता मला तिच्या या भूमिकेचं विशेष कौतुक वाटत नाही. सारा शाहीच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख टाळत नाहीये पण मला त्यातल्या त्यात कमी आवडलेल्या व्यक्तिरेखांमध्ये ती येते एवढंच लिहीन. इथेही नमूद करण्याचा मुद्दा हा की POI च्या काही लँडमार्क एपिसोड्समध्ये (रिलेव्हन्स, इफ-देन-एल्स, ६,७४१) सारा शाहीची व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे.
        २१व्या शतकातली पहिली दोन दशकं संपली. आधीच्या २ शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाची जेवढी प्रगती झाली नसेल तेवढी गेल्या दोन दशकात झाली. आज जगातले बहुतांश लोक या न त्या मार्गाने टेक्नॉलॉजीवर दैनंदिन गरजांसाठी अवलंबून आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोन्स या दोन गोष्टींनी संपूर्ण जग लिटरली आपल्या बोटांशी आणून ठेवलंय. मित्रांशी संपर्कात राहण्यासारख्या मानसिक गरजांपासून ते बँकेचे व्यवहार करण्याच्या आर्थिक गरजांपर्यंत इंटरनेटवर आपण विसंबून आहोत. 'तुमच्या आईपेक्षा गुगलला तुमच्याबद्दल जास्त माहीतीय' असा आशयाचा मेसेज आपण काहीतरी नक्कीच वाचलाय! म्हणजे खरंच- गुगलला किंवा तत्सम कुठल्या सिस्टमला अशी खरंच पाळत ठेवता येत असेल? पाळत ठेवायची म्हणजे आपल्याविषयीची ही सगळी माहिती नुसती जमा नाही करायची तर तिचा सारासार अभ्यास करून त्यातून अनुमानं काढायची, पुढे काय घडू शकेल याचे ठोकताळे बांधायचे आणि त्याप्रमाणे पुढच्या घडामोडींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. या सिस्टमचं सर्वमान्य नाव म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच साधारण माहिती असेल. आपण मित्राला 'प्रायव्हेट' चॅटवर विचारलं की नवीन 'प्लेस्टेशन'चा रिव्ह्यु काय ए? या वर्षी चांगला सेल असेल तर घ्यायचा विचार आहे' की लगेच आपल्याला गुगल, फेसबुकवर प्लेस्टेशन, एक्सबॉक्स वगैरे जाहिराती दिसायला लागतात. आपल्या लाईफमध्ये काही 'प्रायव्हसी' राहिलीच नाहीये वगैरे सात्विक संताप करण्यापलीकडे आपली मजल जात नाही. काही लोक 'टेक्नॉलॉजी कसली डेव्हलप झालीये' म्हणून कौतुकंसुद्धा करतात. नाही म्हणजे कौतुक वाटायला काही हरकत नाहीये पण हे किती 'भीतीदायक' आहे याचा सिरियसली विचार केलाय का आपण? POIचा चौथा आणि पाचवा सिझन साधारण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. POI बद्दल भरभरून लिहावंसं वाटत होतं त्याला एकूणच एक चांगला टीव्ही शो बघितल्याचं कौतुक हा एक भाग होता आणि AI वर थोडं लाऊड थिंकिंग हा दुसरा हेतू होता.
काही वेळापूर्वी जाणवलं की हेच लिखाण बरंच लांबलंय म्हणून थोडा  ब्रेक घेऊन चौथ्या-पाचव्या सिझनबद्दल एक वेगळा भाग लिहितो. तूर्तास एवढंच पुरे!

क्रमशः