- - -
"महत्वाचं, तो आमच्यापेक्षा जास्त संयमी होता"- गिलेस्पी"मला क्रिकेट खेळताना भेटलेला बहुतेक तो सर्वोत्तम (नाईसेस्ट) माणूस होता-बहुतेक नव्हे तोच सर्वोत्तम होता" शेन वॉटसन
"भरून निघायला खूपच मोठी पोकळी तयार झालीय" सुनील गावस्कर
"एकच राहुल द्रविड होता आणि आहे" सचिन तेंडुलकर
- - -
एखादा खेळाडू किंवा कलाकार निव्वळ त्याच्या खेळासाठी किंवा कलेसाठी प्रसिद्ध होऊ शकतो पण आदरणीय होऊ शकत नाही. भारतीय क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं तर सौरव गांगुलीला हे विधान लागू पडतं. पण द्रविड, तेंडुलकर ही मंडळी खेळाडू म्हणून जितकी थोर आहेत त्याहीपेक्षा त्यांचं वेळोवेळी मैदानावर आणि बाहेर दिसलेलं 'माणूस'पण त्यांचा आदर करायला भाग पाडतं!नुकताच सन्मित बाळ यांचा लेख वाचला आणि द्रविडचं खेळाच्या पुढे जाऊन असणारं 'माणूस'पण किंवा क्रिकेटच्या भाषेतलं "character" जाणवलं. गेल्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये सपशेल मार खाल्लेल्या भारतीय संघाच्या अपयशाला एकमेव द्रविडच्या एकहाती सातत्याची तेवढी चंदेरी किनार होती. जिथे उरलेले दहा खेळाडू मिळून धड २०० धावा सुद्धा करु शकत नव्हते तिथे एकट्या द्रविडने तीन शतकं ठोकली. त्यातल्या शेवटच्या कसोटीत संघाच्या ३०० धावांपैकी नाबाद १४६ धावा त्याच्या होत्या.
इंग्लंडमध्येच त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली. निवृत्त होण्याचा विचार काही काळापासून करत असलेल्या द्रविडसाठी 'निवृत्त' होण्यासाठी इंग्लंडमधली 'ही' अद्भुत खेळी योग्य क्षण होता.पण त्याने तसं केलं नाही. ऑस्ट्रेलियाचा दौरा त्याला दिसत होता.एखादा 'टोकाचा आशावादी'सुद्धा त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा इंग्लंडपेक्षा उजवा ठरेल असा वर्तवायला धजावला नसता! पण कांगारूंना त्यांच्या देशात हरवण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याची त्याला कल्पना होती.म्हणून संघाला आपली साथ असावी म्हणून त्याने निवृत्ती पुढे ढकलली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मैदानावर उल्लेखनीय असं काहीच त्याने केलं नाही. उलट कित्येकदा सारख्या प्रकारच्या बॉलवर त्रिफळाचीत होऊन 'भिंत' डळमळीत झाल्याची टीका करण्याची आयती संधीच त्याने लोकांना दिली. पण तरी ऑस्ट्रेलियातल्या चाहत्यांना तो कायम लक्षात राहील त्याच्या २०११ च्या 'ब्रॅडमन ओरेशन' मधील भाषणासाठी. त्याचं सदतीस मिनिटांचं भाषण हे गेल्या काही वर्षातील क्रिकेटबद्दलचं सर्वोत्तम भाषण होतं असं कित्येकांचं मत आहे. ते भाषण करायची संधी मिळालेला तो पहिला अ-ऑस्ट्रेलियन (अ-भारतीय प्रमाणे) खेळाडू. क्रिकेटबद्दलचा अभ्यास, त्याच्या खास आवडत्या कसोटीला जगवायची कळकळ,आणि एकूणच त्याच्या खेळाशी असलेल्या प्रामाणिकपणामुळे उपस्थितांनी त्याचं भाषण संपल्यावर उभं राहून टाळ्या वाजवल्या.(भारतातल्या रियालिटी शो च्या जमान्यात लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवणं खूप स्वस्त झालं असलं तरी इतर कुठे हे फारसं होत नाही म्हणुन त्याचं महत्व जास्त!).
राहुल द्रविड भारतीय संघात आला ९६ साली. कसोटीत मिळालेल्या पहिल्या संधीचं त्याने सोनं केलं आणि इंग्लंडमध्ये त्याने पहिल्या डावात ९५ धावा केल्या. शतक हुकल्याची बोच त्याला कायम राहिली पण 'मी पेला अर्धा भरला आहे' असा विचार करत आलो असं तो नंतर म्हणाला. गांगुलीने याच कसोटीत पदार्पण करून शतक ठोकल्याने द्रविड झाकोळला गेला. आज मी जेव्हा त्याची कारकीर्द पुन्हा पाहिली तेव्हा मला जाणवलं की त्याने स्वतःला सिद्ध केलेले, जिंकवून दिलेले, वाचवलेले, लाज राखलेले सामने अर्थातच खूप आहेत पण माझ्या मते संघातल्या दुसऱ्या कुठल्यातरी खेळाडूला एका बाजूने खंबीर साथ देण्यात त्याच्या चांगल्या खेळ्या झाकोळल्या गेल्या. (राहवत नाहीये म्हणून अभिनेता सुशांत सिंगचा किंवा सुदेश बेरीचा उल्लेख इथे करावासा वाटतो..त्यांची आणि द्रविडची अर्थात तुलना नाही पण ही मंडळी बऱ्याच भूमिकांमध्ये कायम हिरो/हिरोईनला मोठं करण्यात किंवा वाचवण्यात शहीद झाली आहेत). या विधानाला पुष्टी द्यायला 'द्रविडने १८हुन अधिक खेळाडूंबरोबर जवळपास ८० शतकी भागीदाऱ्या केल्या' हे आकडे. (आठवा: लक्ष्मणबरोबरची कोलकात्यातली खेळी आणि सेहवागबरोबर लाहोरला ४०० धावांची भागीदारी). त्याची कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातली पहिली शतकं अशीच..२-० असा सपाटून मार खाल्लेल्या ९८च्या आफ्रिका दौऱ्याच्या ३ऱ्या कसोटीत द्रविडने पहिलं शतक ठोकलं पण अपुऱ्या प्रकाशामुळे सामना "ड्रॉ' झाला आणि आफ्रिका हरायची राहिली. नंतर सईद अन्वर नावाच्या फक्त भारताविरुद्ध चांगल्या खेळणाऱ्या एका माणसाने एकदा कुंबळे, प्रसाद यांची गोलंदाजी फोडून काढत १९४ धावा केल्या. तो स्कोर सचिन बाप्पाने दोनेक वर्षापूर्वी समूळ मोडून काढेपर्यंत भारतीय गोलंदाजीवरचा एक काळा डाग होता, विश्वविक्रम होता! तर- त्या सामन्यात द्रविडने झुंज देत पाहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. अन्वरच्या विक्रमाने दबून गेलेल्या भारतीय संघासाठी द्रविडचं शतक इतका एकच आशेचा किरण होता. द्रविड बाद झाला आणि आपण सामना हरणार यावर शिक्कामोर्तब झालं. (एव्हाना द्रविडने कित्येकदा लाज राखली असं मी लिहिलं ते का याचा अंदाज आला असेल)
नंतर जवळपास ५-६ वर्षांचा काळ द्रविड पाय 'घट्ट' रोवून उभा राहिला. सगळ्यांना आठवत असेल- डोनाल्ड, ब्रेट ली, शोएब असे ताशी ८५-९० मैलांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारे लोक होते. भारतीय फलंदाजी अशा सगळ्यांसमोर 'नांगी' टाकायची आणि मग त्या काळी पेपरमध्ये एक वाक्य नियमितपणे वाचायला मिळायला लागलं- द्रविडने खेळपट्टीवर 'नांगर' टाकला, तो कधी बाद होईल असं वाटायचंच नाही. गोलंदाजांची दया यायची. हीच शैली द्रविडची ओळख बनली. तो भारताची अभेद्य भिंत झाला- 'द वॉल'. आज निवृत्ती जाहीर करायच्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला या विशेषणाबद्दल विचारलं तेव्हा तो त्याच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे म्हणाला की "मी या विशेषणाचा फारसा गांभीर्याने कधी विचारच केला नाही, हे विशेषण वर्तमानपत्रांमध्ये लिहायला छान होतं, लोक मला लाडाने 'या' विशेषणाने संबोधतात याबद्दल मी त्याचा आदर करतो". जागतिक दर्जाचा फलंदाज म्हणून त्याचं श्रेष्ठत्व तोपर्यन्त बहुतेक क्रिकेट जगाने मान्य केलं होतं. पण त्याच्या खेळाची शैली एकदिवसीय क्रिकेटशी जुळणारी नाही अशी टीका व्हायची. म्हणता म्हणता ९९ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ४६१ धाव्या काढल्या आणि सगळ्यांची तोंडं बंद केली. २००१ सालचा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि कोलकात्याची दुसरी कसोटी कोण विसरेल?२००३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने फलंदाजीसोबत यष्टीरक्षकाची भूमिकादेखील पार पाडली. गरज पडेल त्या क्रमांकावर फलंदाजीला येणं, वेळ पडेल तेव्हा यष्टिरक्षण, गांगुलीच्या वादग्रस्त गच्छंतीनंतर कर्णधाराचा काटेरी मुकुट घालून घेणं या सगळ्यामुळेच तो "मिस्टर डिपेन्डेबल" झाला. २००४ साली बांगलादेशातल्या कसोटी सामन्यात त्याने शतक ठोकलं आणि जगातल्या सगळ्या कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये शतक करण्याचा आगळा-वेगळा, आजही अबाधित असलेला विक्रम त्याने केला. २००४ साली ICC ने वार्षिक पुरस्कार सुरु केले तेव्हा द्रविड पहिल्याच वर्षाचा "क्रिकेटर ऑफ द यिअर" होता यातच सगळं आलं. या ५-६ वर्षांच्या काळात कसोटी आकडेवारीच्या बाबतीत तो तेंडुलकरला तोडीस-तोड किंवा त्याच्यापेक्षा कांकणभर सरसच होता.
गांगुली-चॅपेल वाद, नंतर गळ्यात पडलेली कर्णधारपदाची माळ वगैरे त्याच्या कारकिर्दीतले महत्वाचे टप्पे ठरण्याऐवजी वादग्रस्तच ठरले. मुलतानला तेंडुलकर १९४ धावांवर नाबाद असताना घोषित केलेला डाव सचिनप्रेमी विसरलेले नाहीत. २००७ चा विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेला पराभव आणि साखळी फेरीतच स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की या गोष्टी द्रविड कर्णधार असताना घडल्या. या सगळ्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग किती हा निराळा मुद्दा आहे! वाडेकरांच्या संघानंतर ३५ वर्षांनी वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये जिंकलेले कसोटी सामने हे द्रविडच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतले सुखावणारे "हायलाईट्स".
द्रविडच्या साधारण १५-१६ वर्षातल्या दीर्घ कारकिर्दीबद्दल लिहायचं तर ते एका लेखाच्या आणि माझ्या चाहता/हौशी लेखकपणाच्या आवाक्याबाहेरचं आहे. वर उल्लेख केलेले सगळे सामने सोडून त्याच्या लक्षात राहणाऱ्या कित्येक खेळी आहेत! त्यांचं चांगल्या-वाईट-उत्तम-अफाट असं वर्गीकरण करणं खुद्द द्रविडला आवडत नाही. म्हणूनच तर त्याची आवडती 'एक' खेळी कोणती असा प्रश्न त्याला आज विचारला गेला तेव्हा त्याने ५-६ डावांची नोंद करत 'आईने तिचं आवडतं मूल कोणतं?' याचं कसं बरं उत्तर द्यायचं अशी प्रतिक्रिया दिली. आजच श्री. सुनंदन लेले यांनी फेसबुकवर व्यक्त केलेलं "भारतीय क्रिकेटची आई रिटायर होतेय" हे विधान खूप सार्थ आहे आणि आईची किंमत ती नसताना कळते तसंच द्रविडच्या बाबतीत झालंय आणि होणारे! सध्या वाढत्या T20 च्या काळात कसोटी सामने लुप्त होत आहेत. कुणी मानो अथवा न मानो पण भारतीय नियामक मंडळ IPL आयोजित करून या कसोटीच्या पडझडीला मदतच करतंय. द्रविडच्या रिटायर होण्याने जगातील कित्येक कसोटी क्रिकेटप्रेमींच्या दुःखात भर पडली असणारे. ज्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी कसोटी क्रिकेट ओळखले जाते त्याचा शेवटचा भारतीय शिलेदार आज धारातीर्थी पडला.
पाकिस्तानच्या दौऱ्यात हडप्पा, मोहेंजोदडो पहायची इच्छा असणारा द्रविड, तेंडुलकर विशेषांकात मानधनाचा विचार न करता लेख लिहिणारा द्रविड, ब्रॅडमन ओरेशनमधला द्रविड, जाहिरातीतला द्रविड, दुखापतीशिवाय सलग ९३ कसोटी सामने खेळणारा द्रविड आणि या प्रत्येक रुपात जाणवत राहणारा त्याचा साधेपणा, समतोल कुणालाही हेवा वाटावा असा! काही दशकांनी कदाचित असं लिहिलं जाईल- "ऐन भरातल्या भारतीय संघात देवबाप्पा सचिन होता, आक्रमक इंद्रदेव गांगुली होता, लक्ष्मण, कुंबळेसारखे गंधर्व होते आणि राहुल द्रविड नावाचा एक 'ऋषी' होता."
राहुल, गेली कित्येक वर्षं तू केलेल्या मनोरंजनाबद्दल मी तुझा शतशः ऋणी आहे..TAKE A BOW!
चैतन्य
मी क्रिकेटचा चाहता असलो तरी 'आकडेतज्ञ' नाही, त्यामुळे या ब्लॉगमध्ये केलेल्या जवळपास सगळ्या नोंदींचा संदर्भ क्रिकेटच्या आंतरजालावरील बायबल साईटवरून (इथून) घेतलेल्या आहेत.
- - -
2 comments:
छान ! राहुल द्रविड ची उणीव भारतीय कसोटी संघाला नक्कीच जाणवेल !
धन्यवाद निनाद!
Post a Comment