Pages

Saturday, April 14, 2012

जळता शोध: 'मिसिसिपी बर्निंग'

जात, धर्म, भाषा यांच्या नावाखाली माणसांमध्ये सतत होणारा संघर्ष हा काही नवीन विषय नाही! भारतात जन्माला आलो की या सगळ्या पाचवीला पुजलेल्या गोष्टी आहेत. इतिहास म्हणतो की गेल्या काही दशकांमध्ये समाजसुधारणा झाली. प्रथा-परंपरा बदलल्या. कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले. पण खरंच आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला शिकलो आहे का? या प्रश्नाला १००% होकारार्थी उत्तर मिळणं कठीण आहे! याच विषयावर चर्चा सुरु असताना एक मित्र म्हणाला "आपण फक्त ठणाणा बोंबा मारायच्या बघ..आपण मारे कितीही सुधारणांच्या गप्पा मारल्या तरी वर्षानुवर्षांचे संस्कार (चुकीचे असले तरी) पार 'जीन्स' (GENES)मध्ये इतके भिनलेले असतात की हिंदूंना मुसलमानांबद्दल आणि मुसलमानांना हिंदूंबद्दल तेढ कायम राहणार; ब्राह्मणाची गांधी, आंबेडकर यांच्याबद्दलची मतं बदलायची नाहीत की शेड्युल कास्टवाल्यांची ब्राह्मणांबद्दलची आणि सावरकरांबद्दलची! कधी राजकारण, कधी समाजकारण आड येणार आणि हे असंच चालू राहणार! ब्राह्मण म्हणून तुझ्या घरी तुझ्यावर 'शाखेचे'च संस्कार होणार..तुझ्या आई-वडिलांनी केले नाहीत तर इतर लोक करणार" वगैरे वगैरे..तेव्हा वाटलं होतं की या देशात जन्माला येऊन फार मोठी चूक झाली. तिकडे दूर देशी (म्हणजे अर्थात अमेरिकेत वगैरे) जन्माला आलो असतो तर निदान हे प्रश्न तरी सहन करावे लागले नसते..आडनाव वाचून लोकांनी संस्कार आणि स्वभाव यांचे ताळेबंद तरी बांधले नसते. पण धत तेरे की-..तेव्हा तिकडे दूर देशी अस्तित्वात असणाऱ्या 'वर्ण द्वेषाच्या' दाहक वास्तवाची कल्पनाच नव्हती मुळी!अर्थात तिथे देखील संघर्ष झाला, सुधारणा झाल्या, प्रथा बदलल्या, कायदे बदलले, कायदे करणारे लोक बदलले आणि आज दिसायला तरी वर्णभेद नसणारा, सगळ्या जगाला प्रेमाने आपलंसं करणारा देश म्हणून अमेरिका आपल्याला माहितीय! हे सगळं रिकामटेकडं तत्वज्ञान सुचण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'मिसिसिपी बर्निंग' हा सिनेमा.अमेरिकेत १९६० च्या सुमारास जो नागरी लढा झाला त्यादरम्यान घडलेल्या एका सत्य घटनेचं काल्पनिक-वास्तव चित्रण करणारा हा सिनेमा. 

१९६०चा काळ. वर्णद्वेष दक्षिणेकडील विशेषतः मिसिसिपी, अलाबामा या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात होता. कृष्णवर्णियांना हीन, अस्पृश्य वागणूक मिळायची! मग सर मार्टिन ल्युथर किंग सारखी माणसं आली आणि त्यांनी वर्णभेद नष्ट करायला राष्ट्रीय नागरी लढा सुरु केला. अमेरिकेतील निग्रोंना, आफ्रिकन-अमेरिकन लोकांना मतदानाचा हक्क मिळावा, इतर हक्क मिळावे यासाठी हा लढा होता. (इथे मुद्दाम नमूद करावसं वाटतं की हा लढा समान हक्कांसाठी होता, शैक्षणिक किंवा सरकारी सवलती मिळाव्या म्हणून नाही आणि हे वाक्य संस्कारापेक्षा जास्त बुद्धीवादातून आलं आहे.)  गौरवर्णीयांचे सामाजिक, राजकीय अधिपत्य कायम राहावे म्हणून झटणाऱ्या 'कु क्लक्स क्लान' नावाच्या संस्था अस्तित्वात होत्या (खरंतर आजही आहेत) ज्यांचे मिसिसिपीमधले गट नागरी लढ्यादरम्यान कार्यरत होते.मिसिसिपी राज्यातल्या नेशोबा कौंटीतले काही वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील या गटांचे सदस्य होते. कौंटीमध्ये १९६४च्या जून महिन्यात तीन समाजसेवकांची निर्घृण हत्या करण्यात आली. यातले दोन गौरवर्णी, ज्यू होते आणि एक कृष्णवर्णी होता. दोन्ही ज्यू मुलं उत्तरेकडून वर्ण समानता काँग्रेसकडून वर्णभेदाविरुद्ध प्रचार करायला आली होती. क्लानचे सदस्य आणि पोलीस अधिकारी यांनी मिळून या हत्या घडवून आणल्या. यासंबंधीची विस्तृत माहिती इथे वाचायला मिळेल. या हत्यानंतर राष्ट्रीय गहजब झाला. हत्यांची चौकशी करायला देशाच्या सरकारला मिसिसीपीला फेडरल ब्युरोचे लोक पाठवायला लागले आणि याच दरम्यान अमेरिकेतला वर्णभेदावर बंदी आणणारा 'कायदा' मंजूर झाला. इकडे मिसिसिपीत ब्युरोच्या लोकांनी जंगजंग पछाडूनदेखील काही तपास लागत नव्हता. शेवटी माहिती मिळवण्यासाठी पैशांच्या बक्षिसाचं आमिष दाखवायला लागलं. समाजसेवकांचे मृतदेह सापडले. नंतर सुरु झालेला खटला अनेक महिने चालला, गाजला, बंद पडला, पुन्हा सुरु झाला, शेवटी एकदाची काही लोकांना शिक्षा झाली. उणी-पुरी ४० वर्षं गेली या सगळ्यात. या सत्यघटनांवर बेतलेल्या काल्पनिक सिनेमात सगळा भर सामाजिक विषमता, वर्णद्वेष आणि त्याचे लोकांवर होणारे परिणाम यावर आहे. सिनेमामध्ये गुन्हेगार शेवटी पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते असं दाखवलं आहे.'गुड कॉन्कर्स इवील' असा सकारात्मक संदेश पोहोचणं अपेक्षित असावं. सिनेमा रिलीज झाला तेव्हा घटनेमागे असलेली राजकीयता लक्षात ठेवून त्यात कोणतीच मुळ नावं वापरलेली नाहीत. 

सिनेमा सुरु होतो तेव्हा दोन पाण्याचे नळ (फाउंटन्स) दिसतात. एक चांगल्या स्थितीत आहे आणि त्यावर 'व्हाईट' असा फलक आहे, दुसरा जुनाट नळ वाहतोय, त्यावर 'कलर्ड' असा फलक आहे. एक गौरवर्णी चांगल्या नळावर पाणी पिऊन जातो आणि एक लहान कृष्णवर्णी मुलगा वाहत्या नळावर. पुढे साधारण काय बघायला मिळणारे याची पुसटशी कल्पना इथेच येऊन जाते. श्रेयनामावली सुरु होते तेव्हा एक जळतं घर दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळी नावं दिसतात. सुरुवातीला त्या जळक्या घराचं महत्व फारसं अधोरेखित होत नाही पण नंतर संपूर्ण सिनेमात जेव्हा अशी घरं जाळण्याचे प्रसंग येतात तेव्हा ते दर वेळी जास्त जास्त अंगावर येतात. पहिल्याच प्रसंगात तीन किशोरवयीन समाजसेवक मुलांचा होणारा पाठलाग आणि त्यांचा खून चित्रित केलाय. पुढच्या प्रसंगात फेडरल ब्युरोचे दोन अधिकारी मिसिसिपीतल्या काल्पनिक 'जेसप' कौंटीला यायला निघालेले असतात. सिनेमामधलं नाट्य निर्माण झालंय ते दोन्ही अधिकाऱ्यांच्या वैचारिक मतभेदांमधून! तरुण वाटणारा अधिकारी 'लन वॉर्ड' इन्चार्ज आहे,त्याला ब्युरोत तीनेक वर्षंच झाली आहेत, त्याचा पुस्तकी क्लुप्त्या, पद्धतींवर भर असणारे असं त्याच्या बोलण्यातून समजतं. दुसरीकडे वयस्कर वाटणारा अधिकारी रुपर्ट ऍन्डरसन निवांत आहे, तो कधी काळी मिसिसिपीमध्ये कुठल्यातरी कौंटीचा शेरीफ (वरिष्ठ पोलीस अधिकारी) होता. त्याला पुढे काय वाढून ठेवलं असणारे याची कल्पना आहे, तो वॉर्डला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की सरळसोट मार्गांनी या केसचा निकाल लागणं शक्य नाही. जेसपमध्ये सगळे पोलीस अधिकारी गौरवर्णी आहेत आणि ते फेडरल ब्युरोकडून आलेल्या या दोन लोकांना अक्षरशः 'फाट्यावर' मारतात.(ब्युरोच्या लोकांना अशी वागणूक मिळालेली शक्यतो कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही.) मुलं गायब झाली आहेत किंवा त्यांचं अपहरण, खून असं काही झाल्याची शक्यतादेखील लोकल पोलीस मान्य करत नाहीत. ऍन्डरसन पेलनावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोशी मैत्री(?) करण्याचा प्रयत्न करतो. तिची भूमिका सिनेमात हळूहळू मध्यवर्ती होत जाते.

लन पार्कर या दिग्दर्शकाने सिनेमाचा वेग व्यवस्थित सांभाळला आहे. कुठलाच प्रसंग कंटाळवाणा किंवा अनावश्यक नाही. वॉर्ड इन्चार्ज असल्याने तो आणि ऍन्डरसन सुरुवातीला त्याच्याच मार्गांनी शोध घेत राहतात. त्यांच्यात त्यावरून उडणारे खटके हा एक भाग, दुसरीकडे ऍन्डरसन आणि पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोमध्ये निर्माण होणारी जवळीक हाही एक महत्वाचा भाग आहे. तीन मुलांची गाडी सापडते पण प्रेतं सापडत नाहीत. वॉर्ड ब्युरोची १००-१५० माणसं कामाला लावून गाडी सापडलेल्या दलदलीच्या भागात शोधाशोध सुरु करतो. एकीकडे कृष्णवर्णीयांच्या घरांवर हल्ले सुरु असतात. अख्खं घर जाळून टाकायचं आणि लोकांना बेघर करायचं ही कुटील कल्पना. लोकल पोलिसांच्या आणि क्लानच्या भीतीने स्वतःचं घर जळताना पाहिलेली माणसंसुद्धा काही बोलायला तयार नाहीत हे बघून कीव येते. दोन्ही अधिकारी राहत असलेल्या हॉटेलवर देखील हल्ला होतो. तेव्हा वॉर्ड काम करायला शहरातलं एक थेटर भाड्याने घेतो. एका रात्री गायब असलेल्या तीन लोकांसारखं आणखी एका कृष्णवर्णीयाला त्रास द्यायचा प्रयत्न होतो. ऍन्डरसनला बातमी मिळालेली असते. तो आणि वॉर्ड त्या मुलाला पळवणाऱ्या गाडीचा पाठलाग करतात. पण वॉर्डच्या बुजऱ्या पद्धतींमुळे त्यांना उशीर होतो आणि मुलाचा शारीरिक छळ होऊन त्याला टाकून देण्यात येतं. तरी तो मुलगा अधिकृत तक्रार करायला तयार नसतो. सिनेमावर टीका झाली ती त्यातल्या 'कृष्णवर्णी लोकांचं इतकं भेदरलेलं असणं' खुप टोकाचं (आणि अर्थातच अतिशयोक्त) दाखवलं आहे म्हणून. आजचे अमेरिकन कृष्णवर्णी पहिले तर ही टीका रास्त वाटते, अर्थात सिनेमात मात्र वेगवेगळ्या प्रसंगात वर्णभेदाविरुद्ध चाललेल्या एका मोर्चाला शिवीगाळ करणारे लोक, प्रार्थना करत असणाऱ्या एका लहान मुलाला मारणारे लोक, जाहीर सभांमध्ये गौरवर्णीयांचा आणि त्यांच्या वर्णश्रेष्ठपणाचा उदोउदो करणारे लोक पाहिले की गौरवर्णीय लोकांबद्दलची चीड वाढत राहते. एकीकडे वॉर्ड लोकल पोलिसांची तीन मुलं बेपत्ता असण्यासंदर्भात उलट तपासणी घ्यायला सुरुवात करतो. यावर उत्तर म्हणून शहराचा महापौर (मेयर) येऊन त्याला धमकावून जातो. वॉर्डची सहनशक्ती संपायला लागलेली असते. त्याला ऍन्डरसनचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. अजून एका घरावर हल्ला होतो. एक स्थानिक कृष्णवर्णी मुलाच्या साक्षीने तीन लोकांविरुद्ध खटला उभा राहतो पण कोर्ट त्यांना मुक्त करतं हा प्रसंग पाहून चीड येते. खटल्याचा निकाल लागल्यावर पुन्हा एक हल्ला होतो. यावेळी घर तर जाळलं जातंच शिवाय घराच्या मालकाला एका झाडाला लटकावून गळफास लावून मारतात. दुसरीकडे सगळ्या घटनांनी सैरभैर झालेली, ऍन्डरसनशी जवळीक निर्माण झालेली पेलची बायको त्याला तीन मुलांची प्रेतं कुठे पुरली आहेत ते सांगते. प्रेतं सापडतात आणि निव्वळ बेपत्ता असण्याची केस अधिकृतपणे 'मर्डर'ची केस बनते. पेलला सत्य कळल्यावर तो बायकोला मारहाण करतो. तिला हॉस्पिटलला ऍडमिट करतात. ऍन्डरसनचं डोकं फिरतं आणि तो वॉर्डच्या पद्धतींवर चिडत पेलला मारायला निघतो. दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला असंतोष उफाळून येतो आणि एक लहानशी मारामारी होते. शेवटी वॉर्ड ऍन्डरसनच्या पद्धतींनी केस पुढे चालवायला तयार होतो. त्या पद्धती काय असतात ते सांगितलं तर चित्रपट पाहण्याची गम्मत जाईल. पण मी आधी सांगितलं तसं- सत्य घटनेतला आणि सिनेमातला मुख्य फरक म्हणजे इथे गुन्हेगारांना शिक्षा झालेली दाखवली आहे त्याने सिनेमात गुंतलो असू तर 'सुख' वाटतं. शेवटच्या प्रसंगात मरण पावलेल्या समाजसेवकाच्या थडग्यासमोर शोकगीत गाणारे लोक उभे असल्याचं दृश्य आहे. लोकांमध्ये कृष्णवर्णी आणि गौरवर्णीसुद्धा आहेत. त्याच्याकडे लांबून पाहत काहीसे सर्द आणि भावूक वॉर्ड आणि ऍन्डरसन परत जायला निघतात. 


वॉर्डच्या भूमिकेत विलेम डॅफो (स्पायडरमनचा सिनियर ग्रीन गॉबलीन) आणि ऍन्डरसनच्या भूमिकेत जीन हॅकमन आहेत. त्यांनी आपापल्या भूमिका अर्थात सुरेख वठवल्या आहेत. सिनेमा वेगवेगळ्या ऑस्करससाठी नामांकित झाला. त्यापैकी सर्वोत्कृष्ठ छायाचित्रणाचं ऑस्कर त्याला मिळालं. उत्तम पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन या अजून काही जमेच्या बाजू. ऑस्कर सोहळ्याला बहुतेक कायम वर्णद्वेष या विषयाचं आकर्षण वाटत आलेलं आहे. म्हणूनच की काय २००४ मध्ये क्रॅ नावाच्या याचं विषयावरच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला. या वर्षी, याचं विषयाशी, याचं काळाशी (१९६०, मिसिसिपी) संबंधित गोष्टीवर बनलेला 'द हेल्प' ऑस्करच्या शर्यतीत होता. आपल्याकडे मिसिसिपी बर्निंगवर आधारित 'आक्रोश' बनवला (जुना नाही, प्रियदर्शनचा २०१०चा सिनेमा), क्रॅशवर बेतलेला 'ये मेरा इंडिया' एन. चंद्रांनी बनवला. हे चित्रपट चांगले नव्हते की ते कुणी पाहिलेच नाहीत कुणास ठाऊक!!(मी पण आक्रोश पहिला नाहीये). पण त्यांना खूप थंड प्रतिसाद मिळाला. याउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.

सिनेमा बघितल्यावर तो आवडणं वेगळं, तो पटणं वेगळं, त्याच्याशी रिलेट करता येणं अजून वेगळं! मिसिसिपी बर्निंगशी रिलेट व्हायला अर्थात गेल्या ४-५ वर्षात फार प्रतिष्ठेचा असलेला आरक्षणाचा मुद्दा होता. आपण भारतातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेबद्दल हळहळतो. मी आधी लिहिलं तसं- आडनाव वाचून माणसांबद्दल भली-बुरी मतं बनवून टाकतो. नावं बदलता येतात, धर्म बदलता येतो, पण शरीराच्या रंगाचं काय करायचं? तो कसा बदलणार? आणि तो बदलणं जर का शक्य नाही यावर सगळ्यांचं एकमत असेल तर शरीरांच्या आतली गोरी-काळी-तपकिरी-पिवळी माणसं कधी बदलणार?
***

*सारी चित्रे विकिवरून साभार.

4 comments:

Unsui said...

याउलट 'आरक्षण' नावाचा तद्दन बंडल सिनेमा ज्यात 'आरक्षण' हा मुद्दा सोडून सगळं आहे तो लोकांनी पहायची हिम्मत केली. असं झालं की मला नेहमी लोकांच्या उद्देशांबद्दल शंका यायला लागते.
>>
पद्धतशीर मार्केटिंगचा महिमा. आपल्याकडे (आणि हॉलीवूड मध्ये देखील कधीमधी) आगामी चित्रपट कसा स्फोटक आहे हे मिडीयाचा उपयोग करून रीतसर सर्वत्र पेरले जाते. टीव्ही वाहिन्यांवर उगीचच खोटी खोटी चर्चासत्र ( आरडा ओरडीचे सामने) घडवून आणले जातात, स्वयंघोषित "स-माज"धुरीण, बुद्धिवादी, प्रसारमाध्यम पंडित, राजकारणी, एकमेकांवर किंचाळत चर्चा करतात आणी तद्दन उथळ उद्देशाने बनवलेल्या सिनेमाची उगीचच हवा निर्माण होते. एक पायरी पुढे म्हणजे मणीरत्नम यांनी जन्माला घातलेला "बॉम्बे(मुंबई??)" फॉर्म्युला अवलंबला जातो बाळा-दादा-अण्णा-दीदी-अम्मा-ताई इत्यादिना चित्रपटाचे विशेष खेळ दाखवून त्यांचे मन (money) वळवण्याचे नाटक केले जाते, अश्या तऱ्हेने एका सुमार चित्रपटा बद्दल उगीचच ज्वलंत विषयावरील भाष्यबिष्य अशी उत्कंठा होते आणी आपला सवंग समाज बरोबर चित्रपटाच्या गळी लागतो.

Chaitanya Joshi said...

@Unsui :खरंय..हॉलीवूडमध्ये आरडओरडा होतो पण 'चित्रपट आणि वाद' भारतात जितके बघायला मिळतात तितके कुठेच मिळत नाहीत..तसं पाहायला गेलं तर जीवनशैलीचा एक चांगला भाग म्हणून चित्रपट पाहणारे रसिक भारतात संख्येने खूप कमी आहेत (हे विधान खोटं असलं असतं तर भारतात अर्थपूर्ण चित्रपट हिट झाले असते).पण वाद निर्माण करायचे तर 'आजा नचले' मधलं गाणंसुद्धा पुरतं, किंवा 'बिल्लू बार्बर' मधलं 'बार्बर' आक्षेपार्ह वाटतं (मला या दोन्ही चित्रपटांच्या दर्जावर काही मत व्यक्त करायचं नाही :P). चूक प्रसारमाध्यमांची? चित्रपट बनवणाऱ्याची?समाजाची?
शेवटी निष्कर्ष म्हणून 'दर वेळी उत्तरं परिस्थितीसापेक्ष असतात' असं जनरल विधानच करावं लागेल! :(

हेरंब said...

अल्टिमेट चित्रपट आहे.. अतिशय आवडला होता मला.. जीन हॅकमनने जब्बरदस्त काम केलंय.. जॉन ग्रिशमची पुस्तकं वाचली आहेस का? त्यात या प्रकारांची भयंकर वर्णनं आहेत !

Chaitanya Joshi said...

@हेरंब दादा: जॉन ग्रिशमचं 'द पार्टनर' सोडून अजून पुस्तकं वाचायचा योग आलेला नाही..पण मिळतील तशी नक्की वाचेनच!
मिसिसिपी बर्निंग मध्ये जीन हॅकमन जबरीच!