'शाळा' सिनेमा पाहिल्यावर त्याच्या 'फेसबुक' पेजवर बऱ्याच जणांनी त्याचा 'सिक्वेल' पण काढायला हवा अशी मतं मांडलेली दिसली. बहुतेक यातल्या कित्येक मंडळींनी शाळा वाचलेलं नसावं किंवा टिपिकल भारतीय मनोवृत्तीप्रमाणे त्यांना 'ऑल वेल' शेवट अपेक्षित असावा!! मीसुद्धा सहज विचार केला की 'शाळा'चा पुढचा भाग बोकीलांनी लिहायचं ठरवलं तर त्यात काय असेल? जोश्याला त्याची शिरोडकर भेटेल?कधी?कशी?कुठे??वगैरे वगैरे...मे बी कॉलेजमध्ये...कॉलेज लाईफमध्ये जोशी, सुऱ्या, शिरोडकर कसे असतील? प्रश्नाचं उत्तर मिळायला फार वेळ लागला नाही कारण मला एकदम एका दुसऱ्या अफाट कादंबरीची आठवण झाली...'शाळा' यायच्या जवळपास दोन दशकं आधीची कॉलेजमधली प्रेमकथा. अर्थात 'दुनियादारी'!! सुहास शिरवळकर यांनी अक्षरशः शेकडो कादंबऱ्या लिहिल्या, पण माझ्या मते 'दुनियादारी' लिहून त्यांनी तमाम दुनियेवर उपकार करून ठेवले आहेत!
'शाळा' बद्दल थोडक्यात सांगायचं तर एक नववीतला मुलगा, त्याचा टपोरी मित्र, दोघांना आवडणाऱ्या मुली, शाळेतल्या शिक्षकांचा,घरच्यांचा या वयात विचारसरणीवर असणारा प्रभाव, आणीबाणीसारखी अस्थिर सामाजिक परिस्थिती वगैरे! 'दुनियादारी'मध्ये असाच एक कॉलेजमधला मुलगा, त्याचा टपोरी मित्र आणि अख्खी टोळी अर्थात कट्टा गॅंग!, त्याला आवडणारी मुलगी इनफॅक्ट दोन मुली आणि त्याचा गोंधळ, आसपासच्या मुलांमुळे आणि अर्थात आई-वडिलांच्या विक्षिप्त वागण्याने त्याच्या आयुष्यात होणारी गुंतागुंत. दोन्ही कथानकं जरी संपूर्णपणे वेगळ्या सामाजिक, भौगोलिक आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या पात्रांविषयी असली तरी मला त्यात कित्येक समान धागे सापडले.
दुनियादारी खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं पण आजही हातात घेतलं की पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही! गोष्ट सुरु होते तेव्हा मुंबईहून निव्वळ आई-वडिलांपासून लांब जायचं म्हणून पुण्याला आलेल्या श्रेयस तळवळकरशी आपली ओळख होते. मग डी.एस.पी अर्थात दिग्या पाटील गोष्टीत येतो, कॉलेजमध्ये एक मोठी मारामारी होते, श्रेयसची दिग्या आणि कुप्रसिद्ध कट्टा गॅंगशी ओळख आणि मैत्री होते तोपर्यंत आपण कधी गोष्टीत गुरफटलो ते आपल्यालाच कळत नाही. सुशिंनी गोष्टीत लिहिलेल्या जागांपैकी जवळपास सगळ्या जागा आजही पुण्यात 'शाबूत' आहेत! त्यामुळे पुस्तकाची पारायणं झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा एस.पी, टिळक रोड, बादशाही बोर्डिंग वगैरे पाहिलं तेव्हा धन्य वाटलं होतं. कॉलेज म्हटलं की मित्र आले, प्रेम अर्थात आलंच मग त्या अनुषंगाने येणारे हेवेदावे आले, एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या टोळ्या आल्या. हे सगळं सगळं दुनियादारीमध्ये येतं! शाळेबद्दल बोलायचं तर अभ्यास, मारकुटे किंवा प्रेमळ शिक्षक आणि मुलांमध्ये होणारं त्यांचं कौतुक किंवा थट्टा, अभ्यासू आणि 'ढ' असे न पाडता पडलेले दोन गट, मुलींबद्दल वाटणारं आकर्षण, पौंगडावस्थेत पडणारे प्रश्न हे सगळं 'शाळा'मध्ये वाचायला मिळतं!
नायकांच्या 'फिलोसोफर-गाईडस' चा पुस्तकांच्या एकूण कथानकात खूप महत्वाचा वाटा आहे! आई आणि बहिणीशी नीटसं पटत नसलं तरी 'नरूमामा'शी मुकुंदाचं छान पटतं.दोघे इंग्लिश पिच्चर बघतात, मुकुंदा मामाला शाळेतल्या पोरींबद्दल सांगतो. मित्र लाईन मारतात ते सांगतो, मामा त्याला त्याच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगतो वगैरे! 'फेम इस द फ्रेग्रंस ऑफ हेरोईक डीड्स' (Fame is the fragrance of heroic deeds) असा गुरुमंत्र मुकुंदाला नरुमामाकडूनच मिळतो. दुनियादारीमध्ये श्रेयसला 'एम.के. श्रोत्री' भेटतो. त्याच्या कुटुंबाची कुणाला नीटशी माहिती नाही, पुण्यातल्या ठराविक बारमध्ये भर दुपारीसुद्धा सापडतो, श्रेयसला वेळोवेळी भेटत राहतो. श्रेयस आणि एम.के मध्ये एक अव्यक्त आकर्षण आहे. एम.के आयुष्याची तत्वज्ञानं मांडतो की जी श्रेयसला पटत राहतात. नरुमामापेक्षा एम.के चं पात्र दुनियादारीत जास्त अधोरेखित होतं आणि निराशसुद्धा करतं! याशिवाय मुकुंदाच्या बाबांनी त्याला समजून घेणं, कधी तरी आई आणि बहिणीने त्याची बाजू घेणं असे प्रसंग तुरळक असले तरी येतात, दुनियादारीमध्येसुद्धा 'रानी मा' आणि 'डॅडी' जसे वागतात तसे का वागतात याचं स्पष्टीकरण येतं तेव्हा 'माणूस चूकतोय की बरोबर आहे हे निव्वळ परिस्थिती ठरवते' हे पटल्यावाचून राहत नाही.
जोशी आणि श्रेयस हे कथेचे नायक असले तरी भाव खाऊन जातात ते सुऱ्या म्हात्रे आणि दिग्या पाटील. सुऱ्या, दिग्या ही 'टपोरी' विशेषण पक्कं सूट होणारी मंडळी! सुऱ्या जोश्याचा वेळोवेळी सल्ला घेतो तर दिग्या श्रेयसचा. दोघांनाही अभ्यासात काडीचा रस नाही. मित्रांसाठी वाटेल ते करण्याची तयारी, बाहेरून कितीही रफ-टफ वाटत असली तरी मनाने खूप हळवी असणारी, आवडणाऱ्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारी ही दोन पात्रं! केवडाने 'अजिबात नाही, वाट सोड' म्हटल्यावर निराश होणारा सुऱ्या आणि सुलेखाचं लग्नानंतर आलेलं पत्र वाचून शिवीगाळ करत रडणारा दिग्या. 'लई' म्हणजे 'लई' वाईट वाटतं ते वाचल्यावर. अर्थात दोन्ही गोष्टी इथे थांबत नाहीत कारण अजून 'हिरो'च्या गोष्टीचा शेवट झालेला नसतो. हिरोचा विचार करण्यापूर्वी थोडं हिरोईनकडे वळतो. 'शाळा'ची नायिका निर्विवादपणे 'शिरोडकर' तर दुनियादारीमध्ये श्रेयसला दोन मुली आवडत असल्या तरी नायिका मात्र 'शिरीन'च. मी मुद्दाम हे नमूद करू इच्छितो की 'शिरीन' हे आत्तापर्यंत मी वाचलेल्या मराठी पुस्तकांमधलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं 'स्त्री' पात्र आहे! श्रेयसच्या आधीच खूप वैयक्तिक गुंतागुंत असलेल्या आयुष्यात शिरीन येते, तिचंही वैयक्तिक आयुष्य गुंतागुंतीचंच! श्रेयसला खरंतर मिनू आवडत असते, तिलाही तो आवडत असतो, तिने बिचारीने तर तिच्या प्रेमाची कबुली पण देऊन टाकलेली असते पण श्रेयस शिरीनमध्ये गुंतलेला! शिरीन त्याच्यापेक्षा दोन वर्षं मोठी, तिचं लग्न ठरलेलं पण तरीही तीसुद्धा श्रेयसमध्ये अडकतेच. त्याने तिच्या जवळ येण्याचा केलेला प्रयत्न, तिने त्याला दिलेला मूक होकार आणि नंतर बेभान झालेल्या श्रेयसला थांबवणं, समजावणं आणि गोष्ट संपता संपता भरला संसार टाकून त्याच्याकडे परत यायचा प्रयत्न करणं. हे सगळं होऊनसुद्धा ती कधीच अश्लील, लफडेबाज किंवा श्रेयसला लटकवत ठेवणारी टाईपची वाटत नाही. शिरवळकरांनी 'शिरीन' च्या तोंडी लिहिलेले संवाद तिच्यात अडकायला भाग पाडतात. 'शाळा' मधली शिरोडकर अर्थात उत्कट वगैरे नाही कारण तिचा वयोगटच वेगळा आहे. सबंध 'शाळा' पुस्तक ही जोश्याने सांगितलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे शिरोडकरबद्दल आपण ऐकतो ते त्याच्याच तोंडून. अर्थात बोकीलांनी शाळकरी मुलाच्या वयाचा, समजुतीचा विचार करून 'शिरोडकर' इतकी सुंदर मांडली की सुजय डहाकेंना त्यांची 'शिरोडकर' आठवून सिनेमा काढावासा वाटला. तिला फारसे संवाद नाहीतच पण मोजक्या संवादात ती मनात बसून जाते. खरंतर तिचं पात्र वास्तविक प्रसंगांमध्ये असण्यापेक्षा जास्त जोशीच्या विचारात आणि त्याच्या बोलण्यातच आहे. पण वाचणाऱ्या प्रत्येकाला त्याचा शाळेतला 'फर्स्ट क्रश' आठवला नाही तर तो ठोकळा माणूस आहे किंवा तो मुलगा नसून 'मुलगी' आहे असं समजायला हरकत नाही!
सरतेशेवटी कथेचे नायक...मुकुंद जोशी उर्फ जोश्या आणि श्रेयस तळवळकर उर्फ यश. गोष्टींमध्ये कित्येकदा गोंधळलेले वाटणारे नायक अचानक जबाबदार होतात, कधी हळवे होतात, रडतातसुद्धा! पण संपूर्ण कथा ही या दोन पात्रांच्या दृष्टीकोनातून लिहिल्या असल्याने त्यांचं कुठलंच वागणं कधीच अतार्किक वाटत नाही! 'As you become more and more personal, it becomes more and more universal' असं वपुंनी लिहिलंच आहे. याच विधानाला अनुसरून वाचताना आपण जोशी आणि श्रेयसशी जास्तीत जास्त कनेक्ट होतो, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. जोशीचा उत्स्फूर्तपणा, शिरोडकर आवडणं, सुऱ्याला सल्ले देणं, मामाशी गप्पा, पुस्तकाच्या शेवटाला नेटाने अभ्यास करणं वगैरे इतकं आदर्शवादी वाटत जातं की त्याचा काहीसा हेवासुद्धा वाटतो. दुसरीकडे श्रेयसचं कौटुंबिक, सामाजिक आणि काही अंशी शैक्षणिक आयुष्य जवळपास बरबाद होताना पुस्तकात दिसतं. पण तरीही त्याच्याशी जवळीक वाटत राहते. दिग्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी खोटं बोलणारा यश रस्त्यात पडलेल्या बेवड्याला लुटायच्या उन्मेष अर्थात उम्याच्या प्लानला विरोध करतो तेव्हा तो नैतिकतेचा पुतळा वाटला नाही तरच नवल.
'शाळा' पुस्तक संपायच्या आसपास त्याचा शेवट चांगला होईल अशी एक आशा असते पण तसं होत नाही. फावड्या, सुऱ्या, चित्र्या, शिरोडकर या सगळ्यांचंच अचानक जोश्याच्या आयुष्यातून निघून जाणं चटका लावतं. जोशीचं इतर मुलांपेक्षा असलेलं वेगळेपण गोष्टीतून वेळोवेळी जाणवत असलं तरी त्याचं 'एकटेपण' शेवटी अधोरेखित होतं आणि गोष्ट संपते. दुनियादारीमध्ये 'गोड' शेवट वगैरे नसणारे याची कल्पना आधीच आलेली असते. नेमकी गोष्ट कुठे थांबेल इतकीच काय ती उत्कंठा..पण गोष्ट अशीच थांबली तर मग ती शिरवळकरांची कादंबरी कसली...?? गोष्टीच्या शेवटच्या ओळीत एक 'ट्विस्ट' येतो आणि कुणीतरी थोड्या वेळापूर्वी कानफटात वाजवून सुन्न केलेल्या गालावर पुन्हा जोरात चापट मारल्यासारखं होतं..मग अनाहूतपणे आपण पुन्हा त्या एका ओळीचा आधी गोष्टीत आलेला संदर्भ हुडकून काढायला पुन्हा कादंबरी चाळायला घेतो आणि नकळत पुन्हा वाचायला लागतो.
या दोन्ही कादंबऱ्यांची तुलना करण्याइतकी माझी लायकी नाही पण एक वाचक म्हणून आणि या दोन्ही गोष्टींचा निस्सीम चाहता म्हणून हे लिहावसं वाटलं. दोन्हीपैकी कोणतं पुस्तक जास्त चांगलं वगैरे प्रश्न मला पडला नाही आणि ज्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचली आहेत त्यांना हे नक्की माहित असेल की 'दोन्हीपैकी एक' ठरवणं वेडेपणा असेल. 'शाळा' सिनेमा अजून तरी पाहिला नाहीये पण लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया ऐकून बघायची उत्कंठा वाढली आहे हे नक्की! दुनियादारीवर सतीश राजवाडे यांनी एक मालिका सुरु केली होती पण संजय नार्वेकर, शर्वेरी जमेनीस, विनय आपटे अशी मोठी नट मंडळी असून ती चालली नाही. मुळ कथेची त्यात फार मोडतोड झाली असं मला वाटतं. येत्या काळात दुनियादारीवरसुद्धा एखादा चांगला चित्रपट येईल अशी मी आशा करतोय!
चैतन्य
7 comments:
छान लेख चैतन्य.
शाळा चे ट्रेलर पहिले... भारताबाहेर असल्याने अजून चित्रपट पाहता आला नाही.
लवकरात लवकर पाहायचा आहे
Diego रोमेरो ची अप्रतिम cinematography
सुजय दहाकेचे उत्तम दिग्दर्शन..
सुजयच्या पाठी ठामपणे उभे राहिल्या बद्दल महेश मांजरेकरांचे विशेष आभार.
शाळा आणि दुनियादारी दोन्ही कथा मनात खोलवर रुतलेल्या आहेत.
आता, कुणीतरी "दुनियादारी" वर असाच सुंदर चित्रपट बनवावा!!!!!
@Nitin Nimbalkar:
Dhanyavaad!
mesuddha bharatabaher aslyane ajun shala pahila nahiye..:(
मला स्वतःला दुनियादारी विशेष आवडलं नाही. पण 'शाळा' चा मी अति अति वेड्यासारखा पंखा आहे. मागे लिहिलं होतं 'शाळा' वर..
http://www.harkatnay.com/2011/06/blog-post_16.html
@हेरंब दादा:
दादा म्हटलेलं चालेल ना?
मी शाळावरची पोस्ट वाचलीय..मस्तच आहे! शाळाचा पंखा मीदेखील आहेच!
कॉलेजमध्ये असताना दुनियादारीवर मी एक नाटक बसवलं होतं , त्यात काम पण केलेलं! सो म्हणून त्यावर विशेष प्रेम आहे! शिरीनमध्ये काहीशी भावनिक गुंतवणूक आहे :P
हेरंबदादा फार लांबलचक वाटतं यार.. हेरंब पटकन म्हणून (आणि लिहूनही होतं).. तूच ठरव आता ;)
माझ्या अत्यंत आवडत्या दोन कादंबऱ्या ! आणि मी प्रथम विकत घेतलेल्या याच त्या दोन.
सुरेख लेख लिहिला आहेस. शाळा विषयी माझ्या ब्लॉगवर वाचायला मिळेल.
दुनियादारी वर लिहित आहे. टाकेन लवकरच. आणि त्यावर चित्रपट येतोय हे कळले असेलच तुला.
आभार्स सागर! माझ्यावरसुद्धा दोन्ही कादंबऱ्यांचा जबर पगडा आहे. दुनियादारीवर चित्रपट येतोय ते वाचलं..कादंबरीवरून 'इन्स्पायर्ड' आहे असं संजय जाधवने म्हटलंय..त्याने चेकमेट चांगला केला होता. सो अपेक्षा आहेतच. तुझा ब्लॉगपण लौकरच वाचेन..अशीच भेट देत राहा :)
Post a Comment