डॉक्टर सलील कुलकर्णी नेमके कोण आहेत? म्हणजे नाव वाचून वाटतं की ते डॉक्टर आहेत, मग असं लक्षात येतं की ते संदीप खरेंच्या कवितांना चाली लावतात..(हां तेच ते संगीतकार वगैरे!)ते गायक असल्याचं देखील स्मरतं (नसतेस घरी तू जेव्हा, हे भलते अवघड असते वगैरे वगैरे)...मग ते सारेगमपचे परीक्षक म्हणून भेटतात..एकीकडे मराठी संगीताला पुन्हा बरे दिवस आले आहेत(?) म्हणत असताना सध्या मराठी संगीतकारांनी सूत्रसंचालन करण्याचा ट्रेंड आलाय!त्यामुळे कुलकर्णींनीसुद्धा सूत्रसंचालन सुरु केलेलं दिसतंय! "मधली सुट्टी" अशा नावाच्या एका नवीन कार्यक्रमाचा एक भाग नुकताच पहिला. कार्यक्रम पाहून बरेच प्रश्न पडले..पडलेला पहिला प्रश्न मी पहिल्या ओळीत लिहिला आहे..आता बाकीचे आणि महत्वाचे प्रश्न..(ज्या मंडळींना हा ब्लॉग या कार्यक्रमाची चिरफाड करायला लिहिला आहे असं वाटतंय त्यांनी कृपया इथेच वाचन थांबवावं)..एपिसोडच्या पहिल्या काही मिनिटात 'डॉ.कु' काही मुलांशी संवाद साधत होते. नाशिकसारख्या शहरात दिल्ली बोर्डाची शाळा दाखवून, अमराठी मुलांना मराठीत संवाद साधायला लावायचं प्रयोजन कळलं नाही.काही महाराष्ट्रीयन वाटणाऱ्या मुलांचं 'मराठी' ऐकून मराठीच्या भविष्याविषयी काळजी वाटायला लागली.
माझी मावस बहिण दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवीत शिकते. तिला मराठी मिडीयममध्ये न घालता इंग्लिश मिडीयम आणि त्यातही दिल्ली बोर्डाच्या शाळेत घाल असा सल्ला मीच मावशीला दिला होता. मी मराठी माध्यमातून शिकलो असलो तरी मी मराठीबद्दल फारसा आग्रही वगैरे नव्हतो. मराठी माध्यमात शिकून धड मराठी येत नाही आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षणात इंग्रजीत शिकलो नाही म्हणून बोंब होते. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता 'कालाय तस्मै नमः' म्हणत इंग्रजी शाळा बरी असा साधा, सोप्पा दृष्टीकोण होता. हे 'इंग्रजी माध्यमातून शिक्षण' वालं विधान जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा श्री आणि सौ तीर्थरूप चिडले होते. 'तुला मराठी शाळेत घालून तुझं नुकसान झालं का?' असा अपेक्षित प्रश्न त्यांनी विचारला. "नुकसान झालं नाही पण फायदाही झाला नाही" असं उलट विधान करून मी मोकळा झालो. पण आज तो कार्यक्रम पहिला आणि थोडं टेन्शन आलं-काही महिन्यांपूर्वी पाचवीतल्या बहिणीशी झालेलं बोलणं आठवलं-तिने बोलता बोलता वाक्य टाकलं होतं- "आम्ही फ्रेंड्स 'हमेशाच' मस्ती करतो"- माझी विकेट गेली होती तेव्हा! 'हमेशा?'..आज तो कार्यक्रम पहिला आणि लगबगीने मावशीला फोन केला. तिला बाकी सगळं सोडून 'मुक्ताला मराठी वाचायला/बोलायला शिकवते आहेस ना?' हाच प्रश्न विचारला. त्यावर मिळालेलं उत्तर काहीसं आनंदी धक्का देणारं होतं- दिल्ली बोर्डाच्या शाळेत पाचवी इयत्तेला मराठी विषयाला 'पाठ्यपुस्तक' म्हणून 'शामची आई' आहे!पाचवी-सहावी 'शामची आई' आणि सातवीत 'बनगरवाडी' असल्याचं कळलं.प्रत्येक धड्याच्या शेवटी प्रश्नोत्तरं नसतात आणि सबंध पुस्तकच अभ्यासक्रम म्हणून वर्षभर असतं हे कळलं. 'तिला हळूहळू चिं.वि. जोशी किंवा पुलं दे वाचायला' असं म्हणून मी फोन ठेवला. मग मराठी माध्यमात शिकूनही मी बंडखोर विचारांचा कसा झालो ते माझं मला जाणवलं.
साधारण चौथीपर्यंतचा बालभारतीचा काळ मला नीटसा आठवत नाही. चौथीत 'आई' कविता होती. तिचा अर्थ सांगताना गवाणकर बाई रडल्या होत्या आणि कारण माहित नसताना वर्गात सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आल्याचं आठवतंय!पाचवीत काय मराठी शिकलो ते अजिबात आठवत नाही. सहावीत 'दमडी' नावाचा पहिला धडा होता. 'दमडी' नावाच्या एका मुलीची जगण्यासाठीची धडपड वगैरे, तिला बाजारात तळली जाणारी शेव दिसणं, स्वप्नात डोक्यावर गवताच्या पेंडीच्या जागी शेवेचा भारा दिसणं असा काहीसा धडा होता. निव्वळ कथा म्हणून त्याहूनही जास्त मुल्यकथा म्हणून ही गोष्ट वाचणं, शिकणं वेगळं आणि दमडीच्या फाटक्या कपड्यांची वर्णनं करायला लागणारी उत्तरं गृहपाठाला किंवा पेपरात लिहिणं वेगळं. सहावीत हे कळायचं वय नव्हतं. सहावी वसईतल्या शाळेतलं शेवटचं वर्ष! शिकवायला जोशी बाई होत्या. त्या प्रत्येक कवितेला छान चाल लावायच्या. त्यामुळे सहावीतल्या कविता आजही बऱ्यापैकी पाठ आहेत.अगदी 'सोबती तुम्ही मिळुनी चालणे' पासून ते 'मी फुल तृणातील इवले' पर्यंत बहुतेक सगळ्या. पण त्यातला अर्थ तेव्हा कितपत 'कळला' हा खूप महत्वाचा प्रश्न आहे..(यात सावरकरांची अजरामर 'सागरास' सुद्धा होती). सातवीपासून दहावीपर्यंतच्या मराठीत उल्लेखनीय असं काही विशेष आठवतच नाही. हां...एक शैली होती या सगळ्या पुस्तकांची..गद्य विभाग कुठल्यातरी बखर किंवा इतिहासकालीन कठीण मराठीतल्या धड्याने सुरु व्हायचा आणि 'नवसाहित्य' गटात मोडणाऱ्या कुठल्यातरी निबंधाने वगैरे संपायचा. पद्य विभाग सुद्धा असाच..कुठलातरी अभंग वगैरे आणि फटके, सुनितं करत मुक्तछंद टाईप कवितेत संपायचा. शिक्षण बोर्डाला आम्ही नेमकं काय शिकणं अपेक्षित होतं? शोकांतिका हीच आहे की मराठीच्या पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा किंवा कविता एखादा अपवाद वगळता लक्षात नाही. ना.सि. फडके हे कितीही थोर लेखक असले तरी त्यांचा 'काळे केस' हा लेख आम्ही अभ्यास म्हणून का वाचला?त्यावर प्रश्नोत्तरं का लिहिली? आज मागे वळून पाहताना वाटतं की मराठीच्या पेपरमध्ये एका वाक्यात उत्तरं, दिर्घोत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरण हे प्रश्न असणंच फोल होतं. पत्रलेखन शिकताना आमचा पत्राच्या तपशिलावर कमी भर आणि निरर्थक गोष्टींकडे जास्त लक्ष..उदा. उजव्या कोपऱ्यात अ.ब.क. असे लिहून पत्ता लिहिणे, आईला पत्र लिहिताना प्रिय आणि बाबांना, शिक्षकांना आदरणीय लिहिणे जणू काही बाबा, शिक्षक प्रिय नसतातच! सहावी ते दहावीच्या काळात एकतरी आवडीचा पक्षी, प्राणी, अभिनेता, प्रवास असं सगळं असणं ही परीक्षेची गरज होती. अकरावी-बारावीत मराठी 'सेकंड लॅंग्वेज' होती. साठ्येमध्ये मराठीला 'ट्युटोरियल' नावाचा एक लेक्चर प्रकार चिकटवला होता. त्यात व्याकरण, अलंकार वगैरे शिकवायचे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरला मास्तर गोष्ट सांगायला लागले-'बालकवी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता डोंगरावर फिरायला गेले. तिथे त्यांना बगळे उडताना दिसले आणि मग त्यांना अचानक सुचलं- बलाकमाला उडता भासे...' त्या गोष्टीतली सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न न करता मी ती ट्युटोरियलस अटेंड करणं बंद केलं.
हे सगळं निव्वळ मराठी या विषयापुरतं..शाळेत विज्ञान आणि गणित मराठीतून शिकणं ही शिक्षा होती हे नंतर कॉलेजला गेल्यावर जाणवलं. नववी-दहावीतलं बरचसं जीवशास्त्र, रसायन, भौतिक, बीजगणित, भूमिती अकरावी-बारावीत थोडं थोडं येतं. 'हायपोटेनीयस' म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून त्रिकोणाचा 'कर्ण' किंवा 'फर्न' हे 'नेचे' या कठीण शब्दाचं सोप्पं नाव आहे हे कळण्यात अकरावी गेलं. आम्हाला अकरावीत एक लेक्चरर होते.त्यांनी मराठी मिडीयममधून अकरावीत आलेल्या मुलांचा प्रॉब्लेम नेमक्या शब्दात मांडला होता. "मराठी माध्यमाची मुलं दर वेळी 'मराठी'तून विचार करतात- म्हणजे फिजिक्सचा किंवा वेक्टरचा एखादा कन्सेप्ट इंग्रजीतून ऐकायचा, मनातल्या मनात भाषांतर करून भाषांतर समजून घ्यायचं, समजलेल्या भागाची पुढच्या भागाशी लिंक लागावी म्हणून परत मनातल्या मनात त्या भागाचं इंग्रजीकरण करायचं- या सगळ्यामध्ये शिकण्याची, विचार करण्याची क्रिया मंदावते किंवा थांबते" हे जेव्हा पटलं तेव्हापासून ठरवून टाकलं की जेव्हा कधी कुठल्या लहान भावंडांना किंवा पुढच्या पिढीतल्या कुणालाही शाळेत घालायची वेळ येईल तेव्हा इंग्रजीचा आग्रह धरायचा. मी तसा नशीबवान कारण घरी सगळ्यांना वाचायची सवय असल्याने पाहिली कादंबरी मी सहावीत असताना वाचली, पण ज्यांच्या घरी आई-वडील वाचत नसत त्या लोकांना कुसुमाग्रजांची 'कणा' सारखी अप्रतिम कविता अभ्यासाला असूनही पेपरच्या दिवशी सोडून इतर दिवशी त्यांचं पूर्ण नाव सांगता येत नाही हे माझ्या लक्षात आलं. या उलट माझा एक इंग्लिश मिडीयमला शिकणारा मित्र घरची मंडळी वाचक असल्याने मला जाडजूड 'मृत्युंजय' घेऊन बसलेला सापडला तेव्हा मी 'मराठी घरी शिकवलं जाऊ शकतं, शाळा मात्र इंग्रजी हवी' या मताशी अजूनच ठाम झालो.
वय वाढलं आणि समज आली(?) तसं अजून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या.धर्म आणि जात यांचा संदर्भ काळाच्या ओघात 'संस्कार' आणि 'जीवनशैली' वगैरे गोष्टींपुरता मर्यादित न राहता जसा राजकीय झाला तसंच काहीसं भाषेच्या विशेषतः मराठी भाषेच्याबाबतीत महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालं आहे. एक राजकीय मुद्दा म्हणून मराठीकडे पाहिलं जातं. वर्षाकाठी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 'अध्यक्षीय भाषणं' गेल्या काही वर्षात उगाळून उगाळून 'मराठीत बोला, मराठी जगवा' हे तेच तेच मुद्दे मांडताना दिसतात....विषय खूप भरकटलाय का? हां...तर...मुद्दा असा की मराठी जगवण्याचा आपला अट्टाहास कितीही प्रामाणिक असला तरी त्यासाठी कुठल्या पद्धती अवलंबवायच्या हा खूप महत्वाचा प्रश्न आहे! मराठी शाळा जगवणं हा मला मुळीच योग्य पर्याय वाटत नाही. चांगलं साहित्य लिहिलं जाणं, असलेलं आणि नवीन लिहिलं जाणारं साहित्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. मराठी कशी वाचवावी वगैरे ब्लॉगचा मुळ विषय नाहीचे..विषय होता म.मि.वा. अर्थात 'मराठी मिडीयमचं वास्तव'!!(म.मि.वा.चा अर्थ समजून घ्यायला ब्लॉग वाचायला घेतला असेल आणि डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचं फीलिंग आलं असेल तर सॉरी बरं का!!)- मराठी माध्यमातून शिकणं म्हणजे नेमकं काय होतं हे सांगायची इच्छा होती. भा. पो. असतील अशी अपेक्षा.
(एक प्रामाणिकपणे नमूद करतो की माझी शाळा या प्रकाराबद्दल किंवा कुठल्याही शिक्षकांबद्दल अजिबात तक्रार नाही..कदाचित चांगल्या शिक्षकांमुळेच यंत्रणेतला फोलपणा लक्षात यायला इतकी वर्ष लागली).
चैतन्य
12 comments:
आपल्या माहितीचा लाभ माझा ब्लॉग वाचणारे लोक जरूर उचलतील..ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
चैतन्य
खुपच छान लिहिले आहे :-)
माझ्या साईटचा पत्ता:
१)संपुर्ण मराठी फेसबुक http://www.marathifanbook.com
२)http://www.prashantredkarsobat.in
interesting article..
Actually I had been strong propogator of Marathi medium in the early days of my career and I felt a pride kind of thing in telling people that though I had come from vernacular Medium, it didn't make any difference while pursuing college and higher education in English medium - only I had to toil a little more in the initial stage...
However, now (at a little more mature age of 32) I have feelings quite similar to those you have expressed.. More so, since, I have a kid now and am planning for his education... the approach you have mentioned seems more pratical...
(all in all, am still in dilemma... there is, of course, an emotional issue also attached with it, i must admit)....
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रशांत!
@सुदीप:
तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा तुमच्या-माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकलेल्या लोकांना भावनिक वाटू शकतो. तुम्ही वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा मोठे आहात! तुम्ही योग्य तो निर्णय घ्यालच!
प्रतिक्रियेबद्दल आभार! अशीच ब्लॉगला भेट देत राहा!:)
Chaitanyachya pratham marathi bhasha dinacha hardik shubhecha.Tuzya bhavana agdi yogya shabdat pohochlya.Marathi madhyamatun shiktana zalelya kahi parinamanchi sal tula bochte ahe ti kadhi kadhi malahi bochte karan ha anubhav mihi ghetla ahe.pan shevti maza ek anubhav tula sangavasa vatto te mhanje bhale mi marathi madhyamatun shikle asen pan amchya shikshakanchi khas karun amhala bhavishyat englishsathicha kahi tras hou naye mhanun khup dhadpad challeli asaychi ani nakkich amhala tyacha bhavishyat mahavidhyalayat gelyavar khup fayda zala..tyamule marathi madhyamacha ani bhashecha tar koni bau karu naye shevti ti apli matrubhasha ahe.
@देवयानी:
मी सुद्धा ब्लॉगमध्ये शेवटी हेच लिहिलंय की मलाही चांगले शिक्षक लाभले ज्यांच्यामुळे शाळा आणि एकूणच आयुष्य खूप सुखकर झालं. मलासुद्धा फार त्रास झाला अशातला भाग नाही. पण मला शाळेत इंग्रजी आणि मराठी शिकवणारे शिक्षक आणि आताचे शिक्षक, अभ्यासक्रम मध्ये इतक्या १० एक वर्षांच्या लहानश्या काळात खूप फरक पडलाय! आणि त्यामुळे मला राहून राहून असं वाटतं की अलीकडच्या काळातली शिक्षणपद्धती जर का विचारात घेतली तर मराठी शाळेपेक्षा इंग्रजी शाळांना "किंचित" का होईना पण झुकतं माप द्यावं लागेल!
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी "भयानक मराठी" बोलू लागलीय...
ह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात!!! हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...
तू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या "हमेशा" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..
सुज्ञ(?) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम? असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल
ह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....
चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी "भयानक मराठी" बोलू लागलीय...
ह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात!!! हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...
तू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या "हमेशा" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..
सुज्ञ(?) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम? असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल
ह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....
चैतन्य प्रयत्न स्तुत्य आहे ह्यात वाद नाही...
मुद्दा मलाही पटला पण इंग्रजीला झुकता माप देण्याच्या भानगडीत तरुण पिढी "भयानक मराठी" बोलू लागलीय...
ह्यांना माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात!!! हसावं कि रडावं अशी करुनावस्था झालीय सध्या आपल्या मायबोलीची...
तू म्हणालास तसं आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला चांगले शिक्षक लाभले आणि सत्य समजायला जास्त काळ गेला पण हल्ली इंग्रजीच्या आग्रहास्तव पालखी मुलांच्या "हमेशा" मस्ती करण्याकडे कानाडोळा करताहेत..
सुज्ञ(?) पालखी मग मुलांना महाराष्ट्रीय असून बेत तुझा नाव काय च्या ऐवजी व्हॉट इस युवर नेम? असा विचारतात; बारा त्याहून ह्रीदाय्द्रवक सत्य म्हणजे काका मामा मावशी आत्या ह्यांना सरसकट आण्टी आणि अंकल
ह्या एकाच मोजमापात बसवतात तेव्हा वीट येतो....
@प्रतिक्षा:
खरंय!! पण मग अशा वेळी हे संस्कार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणं हीसुद्धा आपलीच नैतिक जबाबदारी असते. मुळात घोळ हा आहे की अलीकडे भाषा विषय म्हणून किंवा जीवनशैलीचा भाग म्हणूनसुद्धा दुय्यम मुद्दा झालाय..त्यामुळे थोडं अवघड आहे!
असो, ब्लॉगवर स्वागत!
..अशीच येत राहा :D
Post a Comment