Pages

Monday, September 17, 2012

जस्ट लाईक दॅट १०


आत्तापर्यंत: 

रमा अस्वस्थपणे जवळ पडलेल्या एका एन्वलपवर पेनाने रेघोट्या ओढत होती. 
"दहा-पंधरा मिनिटात सांगून होईल ना?" श्रीने विचारलं.
"डिपेंडस..तुला कुठे जायचंय का?"
"हो एका इंटरव्युला जायचंय..तुला सांगायला विसरलो..आणि आज तू जागी कशी अजून?"
"असंच..झोप येत नव्हती...एक रिपोर्टपण लिहिते आहे"
"बरं..हां, एक आठवलं..मी तुझ्या घरी चक्कर मारेन या एक-दोन विकस मध्ये..आईला सांगून ठेव.."
"काही विशेष?"
"अ..हो..माझ्या आईने तुझी पत्रिका मागितली होती.."
"पत्रिका? कशाला? तू घरी लग्नाचा विषय काढलास का?"
"रमा, देवाशप्पथ मी काहीही विषय काढलेला नाही...हे पत्रिकेचं गेले महिनाभर सुरु झालंय..मी ते टाळायचा प्रयत्न करतोय.."
"माझी पत्रिका नाहीये असं सांग.."
"असं कसं सांगू? आई पत्रिका बनवून घ्यायला लावेल तुझी..किंवा माझं नाव कुठल्यातरी संस्थेत नोंदवेल ती.. तिने तुला फोन करून ऑकवर्ड सिचुएशनमध्ये टाकण्यापेक्षा हे बरं नाहीये का?"
"तुला योग्य वाटेल ते कर श्री"
"रमा..प्लीज..मी कुठलीही गोष्ट लादत नाहीये तुझ्यावर..."
"हं..."
"तू काहीतरी महत्वाचं बोलणार होतीस"
"अ हो..."
"मग बोल ना..मला जायचं पण आहे"
"श्री, तुझा इंटरव्यू झाला की फोन कर मला...मग बोलू"
"त्याला अजून दोन तास लागतील..तू झोपशील तोवर नक्की..."
"नाही मी जागी आहे...मला रिपोर्ट पूर्ण करायचाय..सो मी जागी असेन" 
"ओके..करतो..."

वयाच्या पंचविशीच्या आसपास जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात एक 'पॅच' येतो.मुलींच्या आयुष्यात पंचीविशीच्या थोडं अलीकडे तर मुलांच्या बाबतीत पलीकडे. होतं असं की अचानक जवळच्या मित्र-मैत्रिणींची, समवयस्क भावंडांची लग्नं ठरायला सुरुवात होते. जस्ट लाईक दॅट!  लहानपणी ज्या ताई-दादांबरोबर खेळून मोठे होतो त्यांना मुलं झालेली असतात. नवीन मित्र किंवा मैत्रिणी बनण्यापेक्षा काका-मामा किंवा मावशी-आत्या हाका मारणारी कंपनी आयुष्यात येते. अजिबात तयारी नसताना आपण त्यात ओढले जातो. डोक्यात अजिबात काही नसताना लग्न, संसार, मुलं वगैरेचा विचार करायला लागतो. 'सिरीअसली?' रमाने स्वतःला प्रश्न विचारला. आजच मनीषाच्या लगीनघाईची गोष्ट ऐकून ती भांबावली होती. आपल्या घरून अजून लग्नाला कुणी प्रेशराईज करत नाहीये म्हणून तिला हायसं वाटलं होतं. आदित्यबरोबर राहण्याचा निर्णय बाबांनी मान्य केला होता पण त्या निर्णयाने इतर मानसिक, सामाजिक परिणाम काय होतील याची कल्पना तिला तेव्हा आली नव्हती. जेव्हा या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या तेव्हा तिने सगळं कबूल करायचा मार्ग निवडला होता. पण श्रीने पत्रिकेचा विषय काढला आणि ती चक्रावली. 'आधी पत्रिका जुळवणं होणार..मग लग्नाचा विषय..लग्न तर करायलाच लागेल..पण श्रीबरोबर लग्न?..लग्न,सहजीवन या संकल्पना कायेत नक्की? एकत्र राहण्यापुरता प्रश्न असला तर मी आदिबरोबर राहतेय..आम्ही तर तडजोड म्हणून राहतोय एकत्र..पण ही तडजोड स्वतःच्याही नकळत चांगली वाटायला लागलीय..आणि हे चूक आहे!' हे तिच्याबाबतीत खूप लहानपणापासून घडत आलं होतं. तिचं हुशारीचं, वेगळेपणाचं तिला दडपण यायचं. श्रीचा पुन्हा फोन आला की त्याला सगळं खरं खरं सांगायचं आणि मोकळं व्हायचं असं तिने ठरवलं. तिला कोणताही रिपोर्ट लिहायचा नव्हता. ती ऑनलाईन टाईमपास करत बसली. 
"तू जागी आहेस?" तिला आदिने मेसेज केला.
"हो आणि तू बाजूच्या खोलीतून माझ्याशी चॅट करतो आहेस?"
"हो.मला तू ऑनलाईन दिसलीस..नक्की तूच आहेस की तुझं अकाउंट हॅक झालंय ते चेक केलं.."
"बरं.."
"झोपली नाहीस?"
"घरून फोन येणारे..वाट बघतेय..."
"ओके.."
पाचेक मिनिटं गेली.
"तू का झोपला नाहीयेस?"
"मी कधी एवढ्या लौकर झोपतो?"
"हं.."
पुन्हा काही वेळ गेला.
"बाहेर येतेयस?"
"कुठे?" 
"न्यूयॉर्कला ट्रीपला जाऊन येऊ..कसला बावळट प्रश्न आहे!! बाहेरच्या खोलीत!"
"ओह आलेच"

"बोल..काही विशेष?" रमाने बाहेर येत विचारलं.
"तू चक्क नीट जागी आहेस असं जाणवलं म्हणून बोलावलं..चला निघूया का?"
"कुठे?"
"कॉफी पिऊन येऊ.."
"आत्ता?"
"हो..ते राज आणि जीत नेहमी जातात...मेघा आणि दर्शु सकाळी सकाळी फिरायला जातात..आपण रूम पार्टनर्स म्हणून काहीच केलं नाहीये कधी!"
"ओह...ते सगळं ठीके..पण मी अशी येणार नाहीये.." रमाने कानावरून पुढे आलेली बट मागे करत म्हटलं.
"अशी म्हणजे कशी? अगं खरंच न्यूयॉर्कला कॉफी प्यायला नाही जाते आपण..इथे जवळच जायचंय"
"ठीके..पण मी निदान तोंडावर पाणी मारून येते.."
"ओके..मी थांबलोय"
रमा आवरून आली तेव्हा आदित्य कपडे बदलून तयार होता.
"हे काय? तू तर रेडी झालास?"
"हो, आपण हे फार वेळा करणार नाहीये..सो विचार केला की जरा मेमोरेबल होऊ दे...हा माझा फेवरेट टी आहे"
रमाने खांदे उडवले.

एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यापासून दररोज, दर क्षणाला दोघेही काहीतरी नवीन अनुभवत होते. रात्री ते राहतात त्या कॉम्पलेक्सच्या पार्किंगमध्ये एवढ्या गाड्या असतात हे रमाला पहिल्यांदाच लक्षात आलं. रमा मुंबईत असतानासुद्धा फार कमी वेळा रात्री बाहेर पडायची. तिचं फ्रेंड सर्कल खूप छोटं होतं. दोन-तीन जवळच्या म्हणता येणाऱ्या मैत्रिणीसुद्धा तिच्या सोसायटीमध्ये राहायच्या. त्यांची शाळा-कॉलेजेस तिच्यापेक्षा वेगळी होती आणि त्यांची शैक्षणिक किंवा बौद्धिक तुलना रमाशी कधीच झाली नव्हती म्हणून कदाचित त्यांची मैत्री इतकी वर्षं टिकली. मग हे रात्री बाहेर फिरणं, नाईट आउट्स वगैरे करायला कधी संधीच मिळाली नाही. म्हणायला गेलं तर श्रीच तेवढा काय तो जवळचा मित्र. तो तिला भेटल्या दिवसापासून आजपर्यंत बरोबर होता आणि यापुढे असेल की नाही हे रात्री फोन झाल्यावर ठरणार होतं. 
"आपण नुसते चालणार आहोत की काही बोलणार आहोत?" आदिने विचारलं.
"माहित नाही..."
"म्हणजे?"
"म्हणजे रात्री या वेळी कॉफी प्यायला मी पहिल्यांदाच बाहेर पडलीय..सो तूच सांग काय करायचं असतं?"
"साधारणपणे मित्र-मैत्रिणी असे रात्री बाहेर पडले की शिळोप्याच्या गप्पा मारतात..आपण ते ट्राय करू शकतो" आदित्य हसत म्हणाला. दोघे अचानक गप्प झाले. आदित्यने गमतीत का होईना पण एकमेकांचा मित्र-मैत्रीण म्हणून उल्लेख केला होता. दोन महिन्यात 'तडजोड करून राहणारे रूम पार्टनर्स' सोडून नात्याला दिलेलं हे नाव ओळखीचं असलं तरी नवीन वाटत होतं. 
ऑकम'स रेझर नावाचा एक अर्थशास्त्र, मानसशास्त्रात वापरला जाणारा प्रसिद्ध नियम आहे. या नियमाप्रमाणे 'एखाद्या प्रश्नाचं, समस्येचं गुंतागुंतीच्या उत्तरांपेक्षा सगळ्यात सोप्पं उत्तर योग्य ठरतं.' रमाला आजच एका लेक्चरला झालेली चर्चा आठवली. 
'आम्ही एकमेकांचे फ्रेंड्स आहोत..ग्रेट! एकत्र राहतो..एकत्र चहा पितो..एकत्र जेवतो..एकत्र कॉलेजला जातो...आणि एकत्र एका घरात राहतो...' ऐकायला सोप्पं होतं. लोकांना सांगायला बेष्ट होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्मनाचे वाद थांबवायला उत्तर होतं. 
"आदि, कॉफीचे पैसे मी देते..."
"का बरं? आपलं नेहमीचं टी टी एम एम बरं आहे की.."
"तू मागे एकदा म्हणाला होतास आठवतंय..आपण एक दिवस बसुया, एकमेकांशी एकमेकांबद्दल बोलूया. आपण तडजोड म्हणून एकत्र राहतोय..पण आपली धड ओळखसुद्धा नाही...आपण एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण पण नाही वगैरे वगैरे"
"हं.."
"ती चर्चा कधी झालीच नाही. पण त्या दिवसापासून आज रात्री शिळोप्याच्या गप्पा मारत कॉफी प्यायला बाहेर पडेपर्यंत आपण एकत्र आहोत..एकमेकांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी कळलंय..निदान एकत्र राहून एकमेकांना बेअर करण्यापर्यंत..सो आपल्या मैत्रीच्या पहिल्या नाईट आउटिंगला तुला आहे तसं काहीतरी मेमोरेबल माझ्यासाठी पण" 
"तुला अशा मेमरीज हव्या असतील तर माझं पुढच्या महिन्याचं रेंटपण भरलंस तरी चालेल..." तो हसत म्हणाला.
"एवढी हेवी मेमरी सहन नाही होणार मला. त्यात अजून या महिन्याचा पे-चेक बँकेत टाकायचा राहिलाय..पुढच्या आठवड्यात माईक रेंट घ्यायला हजर होईलच"
"हं..पण रमा, मला खरंच वाटत नाहीये की आपल्याकडे आठवायला आठवणी आहेत...आय मीन...दोन महिने उलटून गेलेसुद्धा?"
"हो ना.."
शांत, निर्मनुष्य रस्ता होता. एरवी तुरळकच दिसणारी रहदारी आत्ता अजिबात नव्हती. अशा वेळी शांततासुद्धा ऐकू येते. दोघे येताना विशेष काही न बोलताच घरी आले. आदित्यला आज नक्की शांत झोप लागणार होती. रमाची मनःस्थिती थोडी बेटर झाली असली तरी तिला अजून श्रीचा फोन यायचा होता. त्यावर बरंच काही अवलंबून होतं.

"...म्हणजे मी या सगळ्यातून काय अर्थ काढायचा रमा? मी आज तुला पत्रिकेचं विचारलं तर तू मला हे सगळं सांगते आहेस?" श्री चिडला होता.
"श्री शांत हो..पत्रिकेच्या विषयाचा संबंध नाहीये इथे..मी तुला हे सांगणारच होते.."
"रमा, मी कसा विश्वास ठेवू? जी मुलगी शक्य असेल तर २० वर्षांचं प्लानिंग करायला रेडी असते ती अचानक असा निर्णय घेते? कुठल्यातरी अनोळखी मुलाबरोबर राहायचा?"
"मला माहितीय श्री की मी अशी नाहीये...पण मला त्या निर्णयाचा पश्चाताप होत नाहीये..तसं असतं तर मी तुला आजसुद्धा काही सांगितलं नसतं..."
"म्हणजे तुला म्हणायचंय की तुझं छान चाललंय?"
"छान म्हणजे? हे बघ मी इतर कुठल्याही मुलीबरोबर राहिले असते तरी तिची आणि माझी रूम वेगळी असली असती...आम्ही एकत्र जेवलो असतो, कॉलेजला गेलो असतो...यापेक्षा वेगळं तर आत्ता काही होत नाहीये.."
"त्याच्या गल्फ्रेंड किंवा होणाऱ्या बायकोला माहितीय का हे सगळं?"
"त्याला असं कुणी आहे का तेसुद्धा मला माहित नाही.."
"म्हणजे?"
"आमचे हेतू स्वच्छ आहेत श्री..आम्ही एकमेकांच्या रिलेशनशिप आणि त्यातले क्रायसिस डिस्कस करत नाही.."
"असा कोण मुलगा आहे हा? मला बोलायचंय त्याच्याशी.."
"काय म्हणून?"
"जनरल..तुझा होणारा-"
"श्री--"
"ओके ओके..तुझा मित्र म्हणून!! निदान ही अपेक्षा तरी मी ठेवू शकतो ना?"
"बघू..हे बघ श्री..तो एक चांगला मुलगा आहे..मी माझ्या स्वभावाविरुद्ध जाऊन एक निर्णय घेतला..जे मी माझ्या आईलासुद्धा अजून सांगितलं नाहीये ते मला तुला सांगणं महत्वाचं वाटलं..सो मी सांगितलं..याउपर तुझी जी काही प्रतिक्रिया असेल ती तुला मला शांत विचार करून दे..मी झोपते आता..उद्या क्लास आहे मला!"
"ओके.."
"आणि इंटरव्युचं काय झालं कळव मला.."
"कळवेन ना.दोनेक महिन्यांनी..." तो हेटाळणीच्या सुरात म्हणाला.
"बाय श्री..गुड डे.." म्हणत रमाने फोन ठेवला. तिला खूप मोकळं वाटत होतं. श्रीला तिने सगळं सांगून एक मोठ्ठ ओझं डोक्यावरून बाजूला केलं होतं. तिचा रूम-पार्टनर, 'मित्र' आदित्य बाजूच्या खोलीत शांत झोपला होता. तिने स्वतःशीच हसत दिवा बंद केला आणि पांघरूण अंगावर ओढून घेतलं.

ऑकम इतकंच म्हणून गेला की 'एखाद्या प्रश्नाचं, समस्येचं गुंतागुंतीच्या उत्तरांपेक्षा सगळ्यात सोप्पं उत्तर योग्य ठरतं'..पण प्रश्न बदलला तर? दुसरं सोप्पं उत्तर शोधायला लागतं. आपण एकमेकांचे मित्र आहोत हे उत्तर आत्तापुरतं ठीक होतं पण लौकरच मैत्री अपुरी पडणार होती. अपेक्षा बदलणार होत्या. रमा आणि आदित्यची गोष्ट इतकी सोप्पी संपणार नव्हती. 

क्रमशः

भाग ११ इथे वाचा 

3 comments:

nik said...

good. waiting for the next part......

nik said...

जरा लवकर टाका की राव next part.

Chaitanya Joshi said...

Nik:
सॉरी...थोडा उशीर झाला..पुढचा भाग पोस्ट केलाय :) आवडेल अशी अपेक्षा..प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!
अशीच भेट देत राहा!