आत्तापर्यंत:
दुसऱ्या दिवशी सकाळी रमाला नेहमीच्या वेळी जाग आली. ती खोलीबाहेर आली तर आदल्या रात्रीची पसरलेली अंथरुणं, उश्या तशाच होत्या. आदित्य उठलाच नव्हता आणि उठायची शक्यता नव्हती. असं होतं साधारण..आदल्या रात्री काही विशेष घडलेलं असलं की दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्याउठल्या त्याची आठवण नसते. दिवस सुरु होतो तसं तसं सगळं आठवायला लागतं. रमाचं तेच झालं. तिला काल घडलेलं सगळं 'नीट' आठवलं आणि ती जागी झाली. तिने सगळं आवरलं. नंतर विशेष काही काम नव्हतं त्यामुळे ती न आवरता लॅपटॉप उघडून मेल्स चेक करत बसली.
'चहा करावा की आदित्य उठायची वाट बघत थांबावं?' तिचा निर्णय होत नव्हता. त्याला जाऊन हाक मारावी असंही वाटलं तिला एक दोनदा!
तिच्या मनात गोंधळ सुरु झाला-
'तू फार अल्लडपणे वागते आहेस..त्याच्यासाठी चहा करायला वाट कशाला बघितली पाहिजे? हा काय बावळटपणा चाललाय? जरा सेन्सिबल वाग...'
'चहासाठी थांबलेय यात बावळटपणा कुठाय? आम्ही एका घरात राहतो..कित्येक वेळा एकत्र चहा पितो..सो आजपण मी थांबलेय..'
'तो त्याचा चहा करून घेऊ शकत नाही का?'
हे असले भावनिक आवेग आणि अंतर्मनाचे वाद वगैरे आपलं काम नाही हे तिला जाणवलं आणि तिने उठुन निमूट चहा करायला घेतला. एक प्लान न केलेला निर्णय घेतल्यामुळे सगळं बिघडलं होतं.
चहा होईपर्यंत वेळ मिळेल तेव्हा श्रीला फोन करायचा तिचा निर्णय पुन्हा एकदा पक्का झाला. श्रीशी ती काय बोलणार होती हे मात्र तिला कळत नव्हतं.
तिने चहाचा कप तोंडाला लावला तेव्हा चहा सपशेल 'भलताच' झाल्याचं तिला जाणवलं. ती स्वतःवर अजूनच वैतागली.
तेवढ्यात त्याच्या खोलीचं दार उघडून आदित्य बाहेर आला.
"किती वाजले?" त्याने आळस देत विचारलं.
"साडेनऊ...तुला कुठे जायचंय का?"
"नाही..तसं जायचं नाहीये..अभ्यास करणार होतो..."
"बरं.." ती हसत म्हणाली.
"तू चहा केलास?" तो तिने तिथे घडी करून ठेवलेलं अंथरूण उचलून अंगाभोवती लपेटून घेत जांभई देत म्हणाला.
"हो..मी थांबले होते बराच वेळ तू उठशील म्हणून..शेवटी आत्ता केला.."
"ओह..म्हणजे थोडा थंड झाला असेल...मी गरम करून घेतो..." तो जागचा उठत म्हणाला.
"सॉरी..मी तुझ्यासाठी नाही केलाय.." रमा हळू आवाजात म्हणाली.
"हं" म्हणून तो पुन्हा तिथेच बसला.
"मला वाटलं की तू आज अकरापर्यंत उठणार नाहीस..तू म्हणाला होतास मला मागे एकदा की मुव्ही बघून उशिरा झोपलास की लौकर उठत नाहीस म्हणून.."
"हं.."
त्याचे हुंकार ऐकून तिला अजूनच गिल्टी वाटत होतं.
'एवढं कसं सुचलं नाही आपल्याला..चहासाठी थांबलो त्यापेक्षा चहा करून ठेवला असता तर..आदि काही चार तासाने उठणार नव्हता त्या चहाची चव जायला..'
दोनेक मिनिटं गेली. तो उठला.
"मी जरा फ्रेश होऊन येतो...मग चहा करतो...तू घेशील ना थोडा परत?"
ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. तो उठुन गेला. अंतर्मनाचा वाद पुन्हा सुरु व्हायची चिन्हं होती.
बेसिनवरच्या आरशात बघून दात घासताना आदित्य जागा झाला. त्यालासुद्धा काल रात्रीचं सगळं आठवलं आणि त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं.
'आपण रमाशी जे वाटतं ते बोलायचं ठरवून झोपलो होतो...आत्ता तितकं काही वाटत नाहीये! ही रात्रीची वेळच अवघड असते..रमा सुखी आहे..तिला असं काही वाटत नाही...केवढी कंपोस्ड आणि ऑर्गनाईझड असते ती..नाहीतर मी..मला काहीही कळत नाही!! अमृता म्हणायची तेच खरं...मला कुठल्या सिचुएशनमध्ये कसं वागायचं ते अजिबात कळत नाही! मी माझ्या व्यूमधून सगळं बघत असतो..'
'रमा चहासाठी पण थांबली नाही..पण तिने का थांबावं..किंवा तिने का चहा करावा? आपण तडजोड करून निव्वळ रूममेट्स म्हणून एकत्र राहतो आहोत..ध्यानात आहे ना? त्यामध्ये हे असे बेनिफिट्स येत नाहीत..'
'आदि, तू नेहमीसारखा फाफलू नकोस..तुला काय करायचं ते कळायला हवं..डिसिजन्स घेता यायला हवेत' असं स्वतःला म्हणत तो बाहेर आला. रमा कपात चहा गाळत होती.
'डिसिजन्स..चहा झाल्यावर' त्याने विचार क्षणात बदलला.
"रमा, तुझ्या इटालियन स्वैपाककौशल्याचं माहित नाही पण चहा मात्र एकच नंबर...करेक्ट साखर पडलीय" आदित्य चहाचा घोट घेत म्हणाला.
"नेहमी होत नाही काही असा चांगला चहा..आत्ता झालाय हे खरं.." वाक्य जरी तिने आदित्यला म्हटलं असलं तरी ते खरंतर स्वतःलाच उद्देशून होतं.
"मग..झोप नीट झाली ना?" आदित्यने विचारलं.
"अ..हो..तुझी नाही झाली का?"
"छे छे..सुखाने झोपलो मी..स्वप्नात वूडी आणि बझ* आलेले माझ्या"
"काहीही.."
"काहीही नाही...असं असतं..आय मीन माझ्या बाबतीत होतं असं"
"झोपताना कुठले मुव्हीस बघतोस नेहमी ते एकदा तपासलं पाहिजे.." रमा हसत म्हणाली.
"ते महत्वाचं नाहीये...मला प्रश्न आहे की कुणी टॉय स्टोरी बघताना झोपू कसं शकतं?"
"कोण झोपलं?" रमा त्याच्याकडे न बघता उठून किचनकडे वळली.
पाठमोऱ्या रमाकडे बघत आदित्य मंद हसला. त्याने विषय न वाढवता स्वतःशीच नकारार्थी मान डोलावली.
दुपारी रमा मेघा आणि दर्शुकडे गेली होती.
"रमा, एक सही न्युज आहे.."
"बोल ना"
"अगं..मनीचं लग्न ठरतंय..." -मेघा
"भारी..कसं..कुठे?काय?"
"अगं..काल तिला रात्री घरून फोन आलेला आठवतंय??तो तेवढ्यासाठीच होता.."
"हो..पण कोण मुलगा? काय?"
"अगं ती मुंबईत ज्याच्याबरोबर राहायची ना तोच!! गेली दोन-अडीच वर्षं संपर्कात होते दोघे जण..गेल्या वर्षी तो ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेत आलेला ३ महिने..तर हिला भेटायला बोलावलं..तिकीट पाठवलं वगैरे..मनीषा गेली होती ७-८ दिवस" -दर्शु
"छान..मग कधी लग्न??"
"ती या डिसेंबरमध्ये जाईल घरी..बहुतेक तेव्हा लग्न करूनच येईल.."
"इतक्या लगेच??"
"हो..घरचे मागे लागलेलेच असतात आपल्या..आता मुलगा पण रेडी तर थांबतील कशाला?त्यात तो परत अमेरिकेला यायचाय म्हणे पुढच्या वर्षी..कदाचित दोन-तीन वर्षांसाठी..मग मनिषाचं पी.एचडी होईस्तोवर असेल तो पण इथे...मग दोघे जातील परत"
"हं.."
"आणि त्यात हे एकत्र राहिलेले वगैरे मनीच्या आईला माहितीय...आता लग्न ठरलंय म्हणजे ती लग्न लावल्याखेरीज ऐकणारच नाही असं मनीषा म्हणतेय.."
रमाने याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
"तू काय विचार करते आहेस?" मेघाने विचारलं.
"अ..काही नाही.."
दर्शु आणि मेघाने एकमेकींकडे पाहिलं. अचानक दर्शनाच्या लक्षात आलं. तिने मेघाकडे भुवया उंचावून पाहिलं.
"रमा..." तिने रमाला हाक मारली.
"बोल ना..ऐकतेय.." रमा खिडकीबाहेर बघत होती.
"इकडे बघ...हे मनीषाच्या लग्नाचं तुला जनरल सांगितलं..म्हणजे तू काही गैरसमज नाही करून घेतेस ना?" दर्शनाने विचारलं. रमाने तिच्याकडे पाहिलं.
"गैरसमज...??कशाबद्दल?"
"म्हणजे मनीषाचं लग्न ती ज्या मुलाबरोबर राहायची त्याच्याशी होतंय..सो तुझ्याबाबतीत-"
"एक मिनिट...मला तुम्ही दोघी बोलताय त्यामुळे कोणताही गैरसमज नाही होते..मी आईला आदित्यबरोबर राहते आहे ते बोलले नाहीये...ते आठवलं एवढंच"
"मग ठीके ना..असंही एक-दीड महिना होऊन गेलाय..अजून चारेक महिने राहिलेत..पुढच्या सेमला कुणी नवीन मुलगी आली, नितीन परत आला की झालं..मग खोटं बोलायला नको.."
चार महिन्यांनी सगळं 'नीट' होणार होतं. जे चालू आहे असं अजून महिनाभर जरी चालू राहिलं तर नंतर कधीच काही 'नीट' होणार नाही अशी क्षणभर रमाला भीती वाटली.
"हो तेही खरंच..." तिने कसंनुसं हसत उत्तर दिलं.
"आदित्यने घरी सांगितलं आहे काय गं?" मेघाने विचारलं.
"तो रमाकांत नावाच्या तमिळ मुलाबरोबर राहतो..ज्याला हिंदीपण येत नाही...त्याच्या कुकिंग टर्नला तो नारळाएवढा भात आणि पातेलंभर सांबार करतो..तो भातात हाताची सगळी बोटं बुडवून जेवतो म्हणून आदित्य त्याच्याबरोबर जेवायला बसत नाही...पण रमाकांत खूप हुशार आहे...त्याच्या नावावर एक पेटंट आहे..." रमा सांगायला लागली आणि तिघींची हसून पुरेवाट झाली.
"आदित्यला गोष्टी लिहायला सांगितलं पाहिजे..कसलं डिटेलिंग आहे...कुणाला त्या रमाकांताला बघायची पण इच्छा होणार नाही..."
"तेच तर व्हायला हवंय..आणि गोष्टी लिहायचं नको बोलू बाई..आधीच काहीबाही वाचून काहीतरी बोजड बोलत असतो...त्याने काही लिहायला नको.."
"आदित्यला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो असा असेल असं वाटलं नव्हतं..." दर्शु
"असा म्हणजे?" रमा
"हेच...साहित्य, वाचन वगैरे...तो गेमिंग, सिनेमे अशा कॅटेगरीतला वाटलेला...."
"ते सगळं आहेच की...काल तुम्ही गेल्यावर पण त्याने तिसरा पार्ट अख्खा पाहिला"
"तुला कसं गं माहित? आम्ही गेल्यावर तू उठली होतीस की काय?" मेघाने शंका काढली.
काही वेळा अजिबात संबध नसणारा एखादा माणूस आपण लपवायचा प्रयत्न करत असलेली किंवा कुणालाही न सांगायचं ठरवलेली एखादी कृती किंवा बोललेलं एखादं वाक्य अचानक ओळखतो...जस्ट लाईक दॅट! त्या क्षणाला मनातून खजील व्हायला झालेलं असतं..पण कबूल कोण करणार? 'याला किंवा हिला कसं कळलं?' असा विचार करत आपण स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न करतो.
"मी कसली उठतेय??तोच सकाळी खूप उशिरा उठला..विचारलं तेव्हा कळलं की तुम्ही सगळे लौकर गेलात...राज थांबला होता बराच वेळ..मग तो पण गेला म्हणे..तरी आदित्यने सिनेमा पूर्ण संपवला मग झोपला तो"
"छंदिष्टच आहे" मेघाने कमेंट केली.
"अगं..मुलींनो तिसरा पार्ट खरंच खूप भारी आहे" दर्शुने पुन्हा मुव्हीचं कौतुक सुरु केलं.
"हिच्या आणि आदित्यच्या आवडी-निवडी कसल्या जुळतात ना...ही म्हणाली पण होती ना गं..? तो आवडला हिला म्हणून.." मेघाने थट्टा केली. रमा तोंडदेखलं हसली.
"एका सिनेमाच्या आवडी-निवडीवरून जोड्या जुळायला लागल्या तर एखादा सिनेमा बघून हजारोनी लग्न झाली असती..." दर्शुने उत्तर दिलं.
"पण खरंच..हॉबीज, आवडी-निवडी सारख्या असाव्यात...नाहीतर असा विचार कर की एखाद्या सिनेमे खूप आवडणाऱ्या व्यक्तीला सिनेमात अजिबात रस नसणारा पार्टनर मिळाला तर? तू अंधारात डोळे फाडून सिनेमा बघते आहेस आणि तुझा पार्टनर बाजूला डाराडुर झोपलाय..कसं वाटेल..??" मेघाने विचारलं.
रमा त्या दोघींचं संभाषण काही न बोलता ऐकत होती.
"मेघा पाटकर..तुम्ही योग्य बोलताय..पण आवडी-निवडीपेक्षा अंडस्टॅंडिंग महत्वाचं असं मला वाटतं..म्हणजे मला सिनेमाची आवड आहे म्हणून माझ्या पार्टनरने मला आडकाठी केली नाही म्हणजे झालं..म्हणजे असं बघ..की आवडी-निवडी, करिअर्स, आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोण सगळं सेम असणारी माणसं बरोबर असली तर..आधी त्यांना गम्मत वाटेल..आनंदही होईल...पण नंतर कंटाळा येईल एकमेकांच्या सारखं असण्याचं..या उलट पार्टनर्स विरुद्ध टोकाचे असावेत असं म्हणतात तेच याचं कारणाने! काय रमा, बरोबर ना?"
"ऐकतेय मी..मला काही फारसा अनुभव नाही या कशाचा.पण पटतंय मला तू म्हणते आहेस ते!"
रमा घरी परत आली तेव्हा आदित्य गेम खेळत बसला होता.
"तू बिझी आहेस का?"
"नाही..का गं?? काही काम आहे का?"
"नाही...तो तिसरा पार्ट बघायचा राहिला आहे ना..बघायचा??"
आदित्यने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं.
"खरंच?"
"तुला खोटं का वाटतंय?" विचित्र नजरा आणि शांततेत काही क्षण गेले.
"रमा..आपण नंतर कधीतरी बघू तो तिसरा पार्ट...मला एक सांग हे तिरामिसु काय असतं??" आदित्यने विचारलं.
"तिरामिसु..इटालियन स्वीट आहे ते..हे कुठे अचानक?"
"मला बेस्ट तीरामिसुची रेसिपी मिळाली आहे..आणि तिरामिसु चांगलं झालंय की नाही हे कसं ठरवायचं हे पण मी वाचलंय...फक्त खायला मिळायची वाट बघतोय.." तो खट्याळ हसत म्हणाला.
"ओके..सामान आणून दे..करूयात..."
"आजच आणून देतो...नंतर कधी वेळ मिळणार? विकेंडला गणपती दर्शनाला जायचंय"
"होच की...विसरलेच होते मी..."
ती चेंज करायला तिच्या खोलीत गेली.
'आवडी-निवडीपेक्षा अंडस्टॅंडिंग महत्वाचं असं मला वाटतं..पार्टनर्स विरुद्ध टोकाचे असावेत असं म्हणतात' तिला दिवसभर दर्शनाची वाक्य आठवत होती. रमाला वैचारिक ताण असण्याची सवय नव्हती. मनीषाच्या लग्नाच्या बातमीने तो ताण विनाकारण वाढला होता. 'मी आदिबरोबर राहतेय ते बाबांना माहितीय..त्यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही...आईची प्रतिक्रिया काय असेल त्याची कल्पनासुद्धा नाही येते...श्री त्यांना जावई म्हणून चालेल असं बाबा मागे म्हणाले होते..श्रीला तेच हवंय...मी त्याला यातलं काहीच न सांगून काही फार मोठी चूक तर करत नाहीये ना..??'
तिने श्रीला फोन लावायचं ठरवलं आणि अजून वेळ न घालवता त्याचा नंबर लावला. बराच वेळ रिंग वाजल्यावर त्याने फोन उचलला.
"श्री, रमा बोलतेय...तुला वेळ आहे का?? थोडं बोलायचं आहे!"
क्रमशः
7 comments:
अहो चैतन्य राव... ह्या Just like that चे किती पार्टस आहेत ???
छान चाललय.येउदेत कीतीही parts.मी वाचतोय.
फक्त जमले तर लवकर टाका.
@हृषीकेश:
इतकीच आशा आहे की ही कमेंट वैतागून आली नाहीये! नक्की किती पार्टस होतील हे मलाही नाही माहिती..पण मला सांगायची गोष्ट संपल्यावर मी उगाच पाणी ओतणार नाही याची खात्री देतो!!
@nik:
लौकरच पुढचा भाग टाकीन..प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! यापुढचे काही भाग फारसं अंतर न पडता पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन!
अशीच भेट देत राहा!
नाही रे दादा... वैतागातून नाही पोस्ट केली कमेंट. ज्या वेळी हा ब्लॉग सापडला त्याच वेळी सगळे पोस्ट केलेले पार्टस वाचले. म्हणून शेवटच्या पोस्ट वर कमेंट केली.
जर वैताग आला तर मी कमेंट करत बसत नाही .... :)80
@हृषीकेश:
तसं असेल तर हरकत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद्स! पुढचे काही पार्टस पोस्ट केलेत...आवडत असतील अशी अपेक्षा :)
Post a Comment