आत्तापर्यंत:
अमेरिकेत गेल्यावर काही गोष्टी
काळाच्या ओघात अंगवळणी पडून जातात. रस्ता क्रॉस करताना आधी डावीकडे मग उजवीकडे
बघणं, तारीख लिहिताना आधी महिना मग तारीख
लिहिणं, दोन ठिकाणांमधलं अंतर मैलात सांगणं, घड्याळ बघून भारतात किती वाजलेत ते
अचूक सांगणं आणि त्याच्यावरून तिथे कुणाला फोन करायचा की नाही ते ठरवणं. भारतात
कुणाला वाढदिवसाला रात्री १२ वाजता विश करायला फोन करायचा तर आदल्या
दिवशीच्या दुपारी फोन लावणं हा त्यातलाच एक भाग!
शुक्रवारची दुपार. आदित्यने बराच वेळ
विचार करून फोन लावला. अमृताला गेल्या तीन महिन्यात तो पहिल्यांदाच फोन करत होता.
त्याने आत्तापर्यंत एक-दोन मेल्स केल्या होत्या पण तिने रिप्लाय केला नव्हता. आज
तिचा वाढदिवस होता सो इगो बाजूला ठेवून तिच्याशी आजच्या दिवशी बोलायला हवं असा
विचार आदित्यने केला. तिचा फोन वेटिंगवर होता.
'मला तिला सगळ्यात
पहिलं विश करायचं होतं...पण सहाजिक आहे..खूप लोक फोन करत असतील
तिला आत्ता! अजून थोड्या वेळाने करतो..पहिलं विश केलं काय आणि शेवटचं केलं काय?विश करण्याला महत्व
आहे! माझ्या कॉलने तिला झोपेतून उठायला लागलं तरी तिला राग येणार नाही'
अर्धा-पाउण तास वाट बघून त्याने
पुन्हा फोन लावला. अजूनही तिचा फोन वेटिंगवर होता. 'ही इतक्या वेळ
कुणाशी बोलते आहे??'
त्याला पुण्यातले दिवस आठवले.
तोसुद्धा कित्येकदा तिच्याशी रात्री तासनतास बोलला होता. काळाच्या ओघात गप्पा
मारायचे विषयच संपून गेले. ती तिच्या जॉबमध्ये, तो त्याच्या रुटीनमध्ये बिझी झाला. 'कदाचित आपण आज एकत्र नाही याचं हेही
एक कारण असू शकेल'. साधारण अजून पाउण तासाने फोन लागला.
तिने बराच वेळ रिंग वाजल्यावर उचलला.
"अमु, आदित्य बोलतोय.."
"ओह...बोल"
तिचा पेंगुळलेला आवाज आला.
"वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा"
"थॅंक्स"
"झोपली होतीस?"
"हो..आत्ताच झोप
लागली होती..."
"सॉरी..मी आधीपण दोन
वेळा फोन ट्राय केला.."
"हं...फोन चालू असेल
तेव्हा माझा..."
"हो..वेटिंगवर
होता...कशी आहेस?"
"बरीये..." अमु
जेवढ्यास तेवढी उत्तरं देत होती आणि आदित्य डिस्टर्ब होत होता.
"तुला मी मेल्स पण
केलेल्या एक-दोन..तुझा रिप्लाय आला नाही"
"मी बरेच दिवस मेल्स
चेक केल्या नाहीयेत" 'बरेच दिवस??महिने झाले...' त्याला काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं होतं.
"सॉरी..मी तुला
झोपेतून उठवलं.."
"इट्स ओके..."
"तुला नंतर फोन करू
का?" त्याने विचार केलेला त्यापेक्षा हे
जास्त अवघड होत चाललं होतं.
"नंतर कधी?"
"उद्या
वगैरे.."
"नाही...बोल
आत्ताच...मी जागी झालीय..."
"हं.." मग काही
सेकंद एक विचित्र शांतता
फोनवर होती.
तो अमृताला खूप पूर्वी म्हणाला होता
"अमु, पुढे-मागे जर का
आपण काही महिने, वर्षं जरी एकमेकांना भेटू
शकलो नाही तरी आपण जेव्हा पुन्हा भेटू-बोलू तेव्हा आपल्याला विषय कमी पडायचे
नाहीत...वि कनेक्ट वेल यु नो.." तिने त्याच्यावर हसून मान डोलावली होती. पुढे
मैत्री नुसती मैत्री राहिली नाही आणि आता बहुतेक काहीच उरलं नव्हतं.
"आदित्य, तुला बोलायचं होतं.."
"अ..हो...विशेष काही
नाही..हेच...उद्या दिवसभराचा प्लान काय?पार्टी कुठे आणि कुणाबरोबर? ऑफिसमधल्या
फ्रेंड्सबरोबर की सोसायटीमधल्या मैत्रिणी?"
"यातल्या कुणाबरोबरच
नाही.."
"ओह..म्हणजे घरीच
जंगी मेनू दिसतोय...पप्पांनी चिकन आणलं असेल आणि मम्मी करणार असेल..."
"नाही...नॉट
रिअली.."
"मग?"
"आदित्य...माझं लग्न
ठरतंय" ती एका दमात म्हणाली. आदित्य सुन्न झाला होता. तो काहीच बोलला नाही.
"हॅलो....आहेस का?"
"अ...हो
आहे..बोल.."
"आदित्य, मला हे सांगायला खूप ऑक्वर्ड
वाटतंय...पण सॉरी..मला तुला मेल करून हे कळवायची हिम्मत होत नव्हती"
"हे सगळं कधी झालं?"
"गेल्या
महिन्यात..."
"मी गेल्यावर
दोन-तीन महिन्यात तुझं लग्न ठरलं?"
"ठरलं नाहीये पण
ठरेल...तो भेटणारे माझ्या घरच्यांना या महिन्यात..आदित्य...अ..आपण नको बोलायला हा
विषय...मला खूप अवघड जाईल..सगळं सांगायला..."
"नाही अमृता..माझ्या
मते मला एवढं जाणून घेण्याचा हक्क आहे..."
"ठीके..तुझी
मर्जी..मी त्याला एका लग्नात भेटले..मग ऑनलाईन भेटले...तुझी तेव्हा अमेरिकेला
जायची धावपळ सुरु झालेली...आपण पुढे जाण्यात आधीच प्रॉब्लेम्स कमी नव्हते..त्यात
तू अमेरिकेला जायला निघालास..तेव्हा मला जाणवलं होतं की आपण एकमेकांसाठी थांबून
राहणं वेडेपणा होईल..तू नेहमी प्रत्येक गोष्टीत विचारतोस तसंच 'अमेरिकेला जाऊ ना?' असंसुद्धा विचारलं होतंस..मी 'हो' म्हटलं. मी तुला अडवून ठेवू शकत नव्हते. त्याच दरम्यान मला त्याने
लग्नासाठी विचारलं. त्याची नोकरी इथेच पुण्यात आहे. आमची कास्ट सेम आहे. घरी पण
चाल-"
"बास..अमृता..कळलं
मला...विश यु अ व्हेरी हॅप्पी बर्थडे अगेन..ठेवतो मी आता..."
"आदि..एक
मिनिट..." अमृताला त्याने एकदम निरोपाचं बोलणं अपेक्षित नव्हतं.
"अजून काही सांगायचं
राहिलंय?"
"हो...तुला मी फसवलं
असं वाटत असेल या क्षणाला. मला माहितीय...पण मी मुद्दाम नाही वागले असं..मी
सिरीअसली तुझा विचार करत होते...तुला खोटं वाटेल पण मी त्याला सुरुवातीला भेटले
तेव्हा तुझी खूप आठवण झालेली मला.."
"इझ दॅट आईसिंग ऑन द
केक?" आदित्यने वैतागून विचारलं.
"तू बदलला आहेस
आदि..तुझ्याकडून मला अशी कमेंट अपेक्षित नव्हती.." ती नाराज होत म्हणाली.
"सॉरी..यापेक्षा
बेटर काही सुचलं नाही..अमृता, मला कधीच खरंच वाटलं नव्हतं की आपलं नातं असं संपेल..इझ देर एनी
वे..आपण परत सगळं नीट करू शकतो?" त्याने हेल्पलेस होत विचारलं.
"आता तू परत
पहिल्यासारखं बोलायला लागला आहेस..आदि, मी तुला फसवलं नाही...तू जायच्या आधी आपण शेवटचं भेटलो तेव्हासुद्धा
मी तुला स्पष्ट कल्पना दिली होती की आपण लाँग-डिस्टंस रिलेशनमध्ये नाही राहू
शकत..."
"म्हणजे तेव्हा तू
ऑलरेडी दुसऱ्या कुणालातरी हो म्हणून झालं होतं.."
"नाही आदित्य..या
सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत...तुला वाटतंय की मी यातून खूप सहजपणे बाहेर
पडले..पण तसं नाहीये..तुझं नसणं मला खूप अवघड गेलंय. तू या क्षणाला ते अजून अजून अवघड करतो आहेस!"
"तू मगाशी म्हणालीस
ना अमृता...की मी बदललो आहे..खरंय ते...मी प्रयत्न करतो आहे बदलायचा..पण
तुझ्याकडून हे सगळं ऐकलं आणि मला नेहमीसारखं काय बोलायचं हेच कळत नाहीये.. मी
पुन्हा एकदा कन्फ्युस झालोय...मला हे सगळं असं संपवायचंसुद्धा नाहीये आणि मला 'जुना मी' अजिबात आवडत नाहीये.."
"आदित्य, मूव्ह ऑन..प्लीज.."
"मूव्ह ऑन?अमृता..इतकं सोप्पं
नाहीये.."
"मला माहितीय..पण
जमेल तुला...ठेवू का मी फोन??खूप उशीर झालाय..." तिने
विचारलं. ती त्याच्या उत्तराची वाट पाहायला लागली. तेवढ्यात आदित्यसमोर दार उघडून
रमा आत आली.
"हे काय??तू अजून इथेच?तुला डेव्हिसनकडे
मिटींगला जायचं होतं ना?" तिने विचारलं आणि त्याच्या हातातला फोन पहिला. "घरी बोलतो आहेस
का?" तिने हळू आवाजात जीभ चावत विचारलं.
त्याने नकारार्थी मान डोलावली. ती त्याचा गंभीर चेहरा
पाहून काही न बोलता तिच्या रूममध्ये गेली.
"आदित्य..ठेवू का मी
फोन? तू कुणाशी बोलतो आहेस का?" अमुने विचारलं.
त्या क्षणाला रमा घरात आहे या
फिलिंगनेसुद्धा आदित्यला खूप बरं वाटलं होतं. तो अमृताने दिलेल्या धक्क्यातून
सावरला होता. 'मीसुद्धा तिला एक
धक्का देऊन टाकतो..'
"अ हो..सॉरी बरं
का..माझी रूम पार्टनर आली घरी..."
"माझी रूम-पार्टनर?"
"अ हो..मी तुला
सांगणारच होतो...मी इथे एका मुंबईच्या मुलीबरोबर अपार्टमेंट शेअर करतो..आम्ही
दोन-तीन महिने एकत्र राहतोय..ती पण पी.एचडी करतेय..गेस व्हॉट..आमचीपण कास्ट सेम
आहे पण मी हा निर्णय 'मूव्ह ऑन' म्हणून नाही तर निव्वळ तडजोड म्हणून
घेतला...काहीसे अवघडूनच आम्ही निव्वळ रूम-मेट्स म्हणून
राहतोय..मलासुद्धा तुला यातलं काही मेलवर सांगायचं नव्हतं...अ..आपण नको बोलायला हा
विषय..मला समजावणं खूप अवघड जाईल..खूप उशीर झालाय..ठेवतो मी..बाय..गुड नाईट"
"...."
"मी बाय
म्हटलं..."
"अ हो...बाय"
त्याने फोन ठेवला. देव, विधाता किंवा जग चालवणारी जी कुठली
अदृश्य शक्ती आहे तिला एक गोष्ट अचूक जमते..समतोल! बॅलंस! आपल्या आयुष्यात खूप
सुरळीत सगळं चालू आहे असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा थोडं थांबायला हवं..कारण
जेव्हा काहीतरी चांगलं घडतं तेव्हा काहीतरी वाईट घडणार आहे याची खात्री बाळगली
पाहिजे.तुम्ही जगाशी चांगलं वागा, जग तुमच्याशी चांगलं वागेल..तुम्ही कुणालातरी फसवा, कुणीतरी तुम्हाला फसवेल...रमाबरोबर
राहत असल्याचं अमुला न सांगून आपण तिला फसवतो आहोत असं फिलिंग आदित्यला कित्येक
वेळा आलं होतं. आपण जेव्हा तिच्याशी बोलू तेव्हा तिला सगळं खरं सांगून टाकायचं आणि
मोकळं व्हायचं त्याने ठरवलं होतं. पण जेव्हा त्याने तिला सगळं खरं सांगितलं तेव्हा
मोकळं व्हायच्या ऐवजी सगळ्याचा अजूनच गुंता झाला होता. गिल्टी वाटून घ्यायला अमृता त्याच्या 'बरोबर' राहिलीच नव्हती. नेमकं चुकलं कोण? हेच त्याला ठरवता येत नव्हतं. तो विचार करतच दिवसभराच्या कामात बिझी झाला.
संध्याकाळी तो घरी आला तेव्हा रमा
बसून अभ्यास करत होती.
"ग्रेट..आलास
तू...खूप दमला नसशील तर हॉल आवरुया का प्लीज..?" आदित्यने आजूबाजूला पाहिलं. शेल्फमधली एक-दोन पुस्तकं एकमेकांवर
तिरकी पडली होती. फोनच्या चार्जरची वायर जमिनीवर पडली
होती. मागे त्याचे स्लीपर्स दोन दिशांना गेले होते आणि एक स्लीपर उलटी झाली होती.
"यात काय आवरायचं?" त्याने वैतागून विचारलं. एरवी त्याने
हा प्रश्न हसत विचारला असता पण आज त्याचा काहीच करण्याचा मूड नव्हता.
रमाला त्याच्या वैतागण्याचं कारण माहित नव्हतं. ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत
राहिली. आदित्यने सुस्कारा सोडला.
त्याने खांद्यावरची बॅग सोफ्यावर
टाकली. शेल्फमधली पुस्तकं नीट केली. चार्जर उचलून त्याची वायर गुंडाळून आत नेऊन
ठेवला. त्याचे स्लीपर्स गोळा करून दाराशी नीट ठेवले. रमा तो हे सगळं करत असताना
त्याच्याकडे पाहत होती. स्लीपर्स जागेवर ठेवून त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने
मानेनेच खूण करून त्याला सोफ्यावर पडलेली त्याची बॅग दाखवली. त्याने निर्विकार चेहऱ्याने बॅग उचलून त्याच्या
खोलीत ठेवली आणि तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. थोड्या वेळाने रमाने त्याला हाक मारली.
"आदि...अरे बरं
वगैरे नाहीये का तुला? जरा बाहेर जायचं होतं..ग्रोसरी घ्यायला..." तो बाहेर आला.
"ग्रोसरी...गेल्या
आठवड्यात तर गेलेलो आपण! संपलं सगळं?" त्याने विचारलं.
"अरे नाही...तसं
सगळं आहे! पण उद्या काहीतरी स्पेशल करायचं आहे सो..थोडी स्पेशल खरेदी.."
त्याला त्या आधी आठवड्यात तिच्याशी झालेलं संभाषण आठवलं.
"तू मला सांगणार
होतीस की ६ ऑक्टोबरला काये?" आदित्यने अस्वस्थपणे विचारलं. 'उद्या माझा वाढदिवस
आहे' हे उत्तर सोडून इतर काहीही त्याला
चाललं असतं.
"वाढदिवस आहे-"
'एक मिनिट...तुझा
उद्या वाढदिवस आहे??" त्याने तिला वाक्य पूर्ण करूच दिलं नाही.
"अरे..माझा
नाही..दर्शुचा..मेघा आणि मी आपल्याकडे सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे..जीत गाडी घेऊन
येतोय..आपण जाऊया सामान घ्यायला.." त्याने कुठल्यातरी
महान संकटातून सुटका झाल्याच्या अविर्भावात निःश्वास टाकला. दिवसभरात 'उद्या रमाचा वाढदिवस नाही' हीच त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी
होती.
"तू कुठल्यातरी
धर्मसंकटातून सुटका झाल्यासारखा सुस्कारा का टाकलास??" तिने विचारलं.
"काही नाही...असंच...रमा, तुला माहितीय की पेपरात येणारा
साप्ताहिक किंवा दैनिक भविष्य प्रकार श्रद्धेने वाचणारा एक मोठा वाचक वर्ग आहे."
"असेल..पण त्या
वर्गाचा आत्ता काय संबंध?"
"तर असं होतं..आपण
कधीतरी पेपरमध्ये आपल्या राशीला दिलेलं भविष्य गम्मत म्हणून वाचतो..खरंतर
लिहिणाऱ्याने जनरल ठोकताळे लिहिलेले असतात...पण नेमकं त्या दिवशी आपल्या राशीसाठी
लिहिलेल्या सगळ्या गोष्टी अचूक खऱ्या होतात आणि मग एका दिवसाच्या भल्या-बुऱ्या अनुभवावरून आपला त्या सदरातल्या
भविष्यावर विश्वास बसतो...जस्ट लाईक दॅट! माझ्या राशीचं भविष्य मी सकाळी गम्मत
म्हणून वाचलं होतं. 'आश्चर्यजनक बातम्या
समजतील' असं लिहिलं होतं.माझा त्याच्यावर
विश्वास बसला असता जर तुझा उद्या वाढदिवस असल्याचं कळलं असतं तर"
"तू काय बडबडतो आहेस?" तिने गोंधळून विचारलं.
"मलाच नाही माहित...चहा पिउयात...डोकं चालेल माझं थोडं.." त्याने विषय बदलला.
"मलाच नाही माहित...चहा पिउयात...डोकं चालेल माझं थोडं.." त्याने विषय बदलला.
दुसऱ्या दिवशी दर्शुच्या वाढदिवसाचा
केक कापायचा कार्यक्रम रमा आणि आदिच्या अपार्टमेंटवरच
होता. आदित्यचं अजिबात कुठल्याच कार्यक्रमात विशेष लक्ष नव्हतं. केक-कटिंग वगैरे
झाल्यावर रमाला दर्शुने बाजूला ओढलं.
"काय गं..काय झालं?"
"आदित्यला आवडला
नाहीये का माझा बर्थडे इथे केलेला?"
"नाही गं...असं काही
नाही...तुला असं का वाटलं?"
"नाही मला त्याचं
विशेष लक्ष होतं असं वाटलं नाही"
"चल गं
काहीतरीच" रमाला जाणवलं की आदित्य कालपासूनच थोडा विचित्र वागतोय. दर्शुला
अर्ध्या तासात ते जाणवावं आणि आपल्याला हा प्रश्न पडू नये याबद्दल तिला स्वतःचाच
थोडा राग आला.
"नक्की ना? मी विचारू का त्याला??"
"नको..मी बोलते
त्याच्याशी नंतर.."
रात्री सगळे गेल्यावर रमा आणि आदित्य
आवराआवर करायला लागले.
"तुझं काही बिनसलंय
का?" रमाने विचारलं. त्याने काहीच उत्तर
दिलं नाही.
"आदि. मी तुझ्याशी
बोलतेय...मी तुला न विचारता मेघाशी बोलून दर्शुचा बर्थडे इथे केला म्हणून तू चिडला
आहेस का?"
"नाही गं...असं कोण
बोललं तुला?"
"हे मला
नाही..दर्शुला वाटलं...तिचा बर्थडे होता आणि तुझ्या मूड-ऑफ चेहऱ्याने तिच्या
वाढदिवशी तिचा मूड-ऑफ झाला!"
"खरंच सॉरी रमा, मला खरंच काही प्रॉब्लेम नव्हता
तिच्या बर्थडेबद्दल...मी उद्या तिला भेटून सॉरी म्हणेन" आदित्यला जाणवलं की
त्याने मूड-ऑफ तर अमुचाही तिच्या वाढदिवसालाच केला होता. त्याला अजूनच वाईट
वाटायला लागलं.
"त्याची गरज नाहीये
आदि...पण तिच्या बर्थडेबद्दल प्रॉब्लेम नव्हता तर प्रॉब्लेम काय होता नेमका?"
"मला नाही सांगता
येणार..."
"का?"
त्या क्षणाला आपण एकमेकांशी 'या' विषयावर बोलायचं नाही हे ठरवलेलं विसरून रमाला सगळं
सांगायची त्याला इच्छा झाली. तो सांगायला सुरुवात करणार इतक्यात तिचा फोन वाजला.
तिने फोनकडे पाहिलं.
"घरून कॉल
आहे...आलेच मी थोड्या वेळात' म्हणत ती तिच्या रूममध्ये गेली.
"रमा, श्री घरी येऊन गेला काल
रात्री..."
"बरं...सहजच आला
होता का?"
"तो आला तेव्हा तुझी
आई मावशीकडे गेलेली...मग माझ्याशी सगळं बोलला तो...तू त्याला आदित्य परचुरेबद्दल
सांगितलस म्हणे.."
"हो बाबा...मला
त्याच्यापासून काही लपवायचं नव्हतं"
"आणि म्हणून तू
त्याला आदित्यचं नावसुद्धा सांगितलं नाहीस.."
"नावाने काही फरक
पडत नव्हता बाबा..."
"ठीके रमा, मी काही म्हणत नाहीये...त्याने तुझ्या
पत्रिकेबद्दलपण विचारलं"
"काय? मी त्याला सांगितलं होतं की सध्या
माझ्या घरी जाऊन पत्रिका वगैरे विषय काढू नकोस.." ती वैतागली.
"शांत हो..इतकं काही
झालेलं नाहीये...हे पत्रिका वगैरे आपण लांबवू शकतो बेटा पण थांबवू शकत नाही"
"पण बाबा हे सगळं
कशासाठी...?"
"तुला उत्तर माहितीय
रमा. आणि एकीकडे तूच त्याच्याशी खोटं बोलायचं नाही म्हणून त्याला आदित्यबद्दल
सांगितलंस आणि आता तो तुझी पत्रिका मागतोय तर तेसुद्धा तुला नकोय.."
"मला इतक्यात लग्न
करायचं नाही बाबा...श्रीला मी सगळं खरं सांगितलं कारण तो त्याच्या आयुष्यातल्या
सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतो..त्याचा त्याने माझी पत्रिका मागण्याशी
काही संबंध नाही"
"बरं...आणि आदित्यचं
लग्न ठरलंय का किंवा झालंय का याबद्दल तुला काहीच माहित नाही?"
"श्रीने बहुतेक
तुम्हाला खूपच डिटेलिंग केलं...हो, मला माहित नाही की आदिचं लग्न ठरलंय..झालंय..होणारे..त्याला करायचं
आहे की नाहीये..."
"आदि?"
"बाबा
प्लीज..."
"रमा, तू झोप आत्ता...बराच उशीर झालाय...आपण
नंतर बोलू...तुला इच्छा
नसेल पण मला आदित्य परचुरेबद्दल जाणून घेण्यात रस आहे...सो त्याच्याशी मी पुन्हा
बोलू शकतो किंवा तू बोल आणि मला सांग...चालेल??"
क्रमशः
2 comments:
मजा येतेय वाचायला.
Chalu dya.
By the way, older font was better
@Nik: Thanks a lot!
I have no clue why the font got changed..:(
Hope this time it is ok!! :)
Keep visiting!
Post a Comment