Pages

Thursday, October 18, 2012

जस्ट लाईक दॅट १३

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२


...........'जीत, ती माझ्याशी खोटं बोलली! तिने मला फसवलं असं मी नाही म्हणणार पण तिने माझा विचार नाही केला'
'तू तेच केलंस आदि! तू तरी कुठे तिचा विचार केलास? तू तिच्याशी खोटं बोलला नाहीस पण तिला खरं  सांगितलं नाहीस. जेव्हा सांगितलंस तेव्हा ते तुझ्या वैयक्तिक मनःशांतीसाठी! गिल्टी वाटून नाही..रिअली सॉरी आदित्य पण मला अजिबात कल्पना नव्हती की तू 'असा' वागशील...बरं...या सगळ्यात रमाचं काय?'......

आदित्य दचकून जागा झाला. डायनिंग टेबलवरच त्याला झोप लागली होती.
"काय रे? काय झालं?" समोर बसलेल्या रमाने विचारलं.
"काही नाही...सकाळी लौकर उठून अभ्यास करत होतो.सध्या झोप नाही होते ना नीट..सो होतं असं कधीतरी"
"ओके" रमाने जास्त चौकशी केली नाही.
गेले काही दिवस ते फारसे बोललेच नव्हते. सकाळचा चहा असो किंवा रात्रीचं जेवण करणं असो, जेवढ्यास तेवढे संवाद होत होते. रमा लौकर उठून कॉलेजला निघून जायची, आदित्यला त्याच्या लॅबमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत काम असायचं. त्यात मिडटर्म्स जवळ आल्या होत्या. दोघे अभ्यासातही बिझी होते. इथे आल्यावरची पहिलीच 'मोठी' परीक्षा होती आणि इतर कुठल्याही मुला-मुलीसारखं त्याला-रमाला चांगल्या ग्रेड्स मिळवून प्रोफेसर्सच्या नजरेत राहायचं होतं. अमृताशी बोलणं झाल्यापासून आदित्य बऱ्यापैकी डिस्टर्ब होता. पण 'आपल्याला आवडणाऱ्या मुलीने आपल्याऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी मुलाची निवड केली' म्हणून जग थांबवून ठेवता येत नाही या गोष्टीची त्याला पुरेपूर कल्पना होती. आदित्यने अमृताचा निर्णय कळण्याआधीच तो रमाबरोबर राहत असल्याचं तिला सांगितलं असतं तर त्याला नंतर 'तो प्रामाणिक होता' असं म्हणायला जागा राहिली असती. या परिस्थितीत कसं वागायला पाहिजे हे सांगणाऱ्या कुणाचीतरी त्याला खूप गरज होती. पण दुर्दैवाने तेही शक्य नव्हतं. रमाने त्याला 'तुझं काही बिनसलंय का?' म्हणून विचारलं होतं पण त्यानेच 'नाही सांगता येणार' असं उत्तर देऊन तिला गप्प केलं होतं. त्या दिवसानंतरच रमा विचित्र वागते आहे असं त्याला वाटलं पण तो नॉर्मल वागत नाहीये म्हणून त्याला तिचं वागणं विचित्र वाटतंय असा निष्कर्षसुद्धा त्याचा त्याने काढला. आदित्यला अमृताबद्दल जीतशी बोलायची इच्छा होत होती पण जीतची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज आल्यावर त्याने तोही विचार झटकला. दुसरीकडे रमा भलत्याच कारणाने अस्वस्थ होती. श्रीला आदित्यबद्दल सांगून तिने अपराधीपणाची भावना दूर केली होती. पण श्री बाबांना जाऊन भेटेल आणि बाबा असे रिऍक्ट होतील याची तिने अजिबात कल्पना केली नव्हती. 'मिडटर्म्स झाल्या की आदित्यशी बोलेन' असं तिने बाबांना सांगितलं होतं.

'समटाईम्स इट्स मॅटर ऑफ टाइम'..म्हणजे लिटरली!! 'नेहमी खरं बोलावं' असं लिहायला, सांगायला छान वाटतं पण नेहमी खरं बोलणं शक्य नसतं आणि जेव्हा बोलायचं तेव्हा वेळ अचूक असावी लागते.खरं बोलायची वेळ आणि माणूस चुकला तर पश्चाताप पदरात पडतो. दुसरीकडे 'खोटं बोलून किंवा खरं न सांगून जर का कुणाचं भलं होत असेल तर तसं करायला हरकत नाही' असंही कुणीतरी म्हणून ठेवलंय!पण खोटं  बोलण्याची किंवा खरं न सांगण्याची वेळसुद्धा करेक्ट असावी लागते. ती चुकली तर गोंधळ होणं अपरिहार्य असतं! जस्ट लाईक दॅट! आदित्य वेळेवर खरं न सांगून चुकला होता आणि रमा नको त्या वेळी खरं बोलून अडकली होती. गंमत म्हणजे एकाच टेबलवर समोरासमोर बसून विचारात गढलेल्या दोघांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती.

परीक्षा झाल्याच्या संध्याकाळी जीत आणि राज आदित्यला भेटले. परीक्षेविषयी जनरल चर्चा झाल्यावर राजने त्याच्या नेहमीच्या शैलीत भोचकपणा केलाच!
"काय रे आदित्य, तुझं आणि रमाचं पुन्हा वाजलंय वाटतं.." आदित्यच्या कपाळावर आठ्या आल्या.
"हा प्रश्न आहे की निरीक्षक कमेंट? आणि वाक्यातल्या 'पुन्हा'चा काय संदर्भ?" त्याने तिरकस प्रतिप्रश्न केला.
"वेल! खरंतर निरीक्षक कमेंट आहे..पण आडाखे बांधण्यापेक्षा सरळ विचारलेलं बरं म्हणून विचारून टाकलं"
"तुझी निरीक्षण शक्ती बकवास आहे...थिसीसचे सगळे ऑब्सर्वेशनस असेच आहेत की काय? डिग्री मिळणार नाही अशाने"
"तू चिडलास..म्हणजे खरंच काहीतरी बिनसलंय" जीतनेसुद्धा ओळखलं. आदित्यने हताशपणे मान डोलावली. 'जीतच्या एका वाक्यावर आदित्य कबूल झाला आणि आपण सरळ, स्पष्ट विचारलं तर तिरकस उत्तर दिलं' यामुळे राजला जीतचा हेवा वाटणं आणि राग येणं सायमलटेनिअसली झालं. आदित्यला रमाबरोबर राहायला मिळत असल्याचा त्याला जेवढा हेवा वाटला होता त्याहून किंचित जास्तच जीत आणि आदित्यच्या परस्पर समजुतीचा वाटला. राज त्याच्या विचारात गढलेला असताना आदित्यने बोलून झालं होतं. जीत त्याला समजावत होता.
"अरे तुम्ही हे विनाकारण मिडटर्म्सचं टेन्शन घेतलंत ना म्हणून घोळ आहे..म्हणजे तुमचा काही वाद झालेला नाही! पण हे ते 'अतिपरिचयात..' म्हणतात ना तसं झालंय! आणि खूप नॉर्मल गोष्ट आहे ही..तुम्ही समझोता म्हणून एकत्र राहायला लागतात..साहजिक तुम्हाला एकमेकांची सवय झाली..तुमची मैत्री झाली..मैत्रीत मजा करून झाली..भांडून झालं..तुम्ही एकमेकांना इतके ओळखायला लागले आहात की नाविन्याच्या अभावामुळे हा थोडा अनइझीनेस आलाय..सो चिल...हो, मिडटर्म पण झाली...पुढचा हाफ छोटा असतो..तो संपतोय न संपतोय तोच नितीन येईल आणि तिला पार्टनर म्हणून कोण ती मुलगी यायचीय ती येईल..थोडे दिवस राहिलेत"
आदित्यने खिन्न हसून मान डोलावली.जीत म्हणत होता ते सगळं त्याला पटलं होतं पण जीतच्या शेवटच्या वाक्यांनी तो अस्वस्थ झाला.
'रिअली? रमाशिवाय रहायचं?' त्याने स्वतःलाच विचारलं.
आपण जसे परंपरांचे पाईक असतो ना तसे सवयींचे गुलामसुद्धा असतो..एखादी गोष्ट आपण एका पद्धतीने करायला शिकतो. मग त्या गोष्टीची सवय होते. अचानक ती पद्धत बदलणारे हे कळल्यावर क्षणभर सैरभैर व्हायला होतं. सेमिस्टर संपणार म्हणजे आपलं रमाबरोबर एकत्र राहणं संपणार याची आदित्यला जाणीव झाली.
"तुम्ही काय डिस्कस करताय?" त्याने राजला विचारलं.
"तुझी तंद्री भंग होण्याची वाट बघत होतो खरंतर"
"राज मस्करी नको..सिरीअसली सांग! मी आत्ता कसं वागणं अपेक्षित आहे?"
"मिस्टिक रिव्हरमधल्या टीम रॉबिन्ससारखं*" राज खदाखदा हसत म्हणाला.
"कधीतरी धड उत्तरं  देना"
"आदित्य..समटाइम्सस द बेस्ट थिंग टू डू इज बि नॉर्मल" जीत म्हणाला.
आदित्यने दोन क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि हसत त्याला सॅल्युट केला. जितने हसत मान झुकवून त्याचा सॅल्युट कबुल केला. पुन्हा एकदा राज 'सात्विक' संतापला. पण या वेळी चूक त्याचीच होती. आदित्यने त्याला विचारलं  होतं. स्वतःवरच थोडा चिडत वरवरचं हसत तो त्या दोघांच्या हसण्यात सामील झाला. पुन्हा संभाषणात येण्यासाठी त्याने विषय काढला-
"आणि हां आदि..आम्ही मगाशी मुव्हीला जायचा प्लान करत होतो..तू येतो आहेस असं  गृहीत धरलंय! रमाला विचार..ती आली तर मेघा पाटकर येणार..दर्शु कॉन्फरन्सला गेलीय.."
"आज नको रे...तुम्ही सगळे जा हवं तर..मला जरा झोप काढायची आहे..पण मी रमाला सांगतो..ती येईल"
"तुला का नाही यायचंय यार?" राज हक्क दाखवत म्हणाला.
"नाही रे..खरंच नको! कंटाळलोय...थेटरमध्ये जाऊन झोपण्यासाठी डॉलर खर्च करायची माझी अजिबात इच्छा नाहीये.." राजने जीतकडे पाहिलं. तो अजिबात आग्रह करत नव्हता.
"ठीके..हरकत नाही..परत जाऊ कधीतरी...तू रमाला विचार आणि कळव मला.." आदित्य नसताना रमा त्यांच्याबरोबर यायची पहिलीच वेळ असणार होती.
आदित्य जायला वळल्यावर राज जीतकडे बघत म्हणाला.
"सो...तू, मी, रमा आणि पाटकर बाई"
"चक इट राज...आदित्य नाही रमा नाही, रमा नाही तर मेघा नाही...नेहमीसारखे आपण दोघेच असणारोत.." जीत त्याच्या खोलीकडे वळत म्हणाला.
"ते तर मला माहितीय रे...पण यु नेव्हर नो.."

'समटाइम्सस द बेस्ट थिंग टू डू इज बि नॉर्मल' वाक्य मनात घोळवतच आदित्य घरी आला. रमाच्या खोलीचं  दार नेहमीसारखं बंद होतं पण ती घरात आहे की नाहीये याचा अंदाज येत नव्हता. त्याने आवरून चहा करायला घेतला आणि सहज म्हणून हाक मारली- "अहो फडके...". ती तिच्या खोलीचं दार उघडून बाहेर आली.
"काय रे?" तिने मागून येऊन विचारलं. तो दचकला.
"ओह सॉरी..मला माहित नव्हतं की तू घरात आहेस"
"ओके...काही काम होतं का?"
"नाही गं सहज हाक मारली होती..."
"ठीके..मग जाते मी..."
"अरेच्या...एक मिनिट..थांब..तू आहेस हे कळलं मला...मी चहा ठेवलाय...तुझ्यासाठी पण करतो.."
"ओके..झाला की सांग मला.." ती तिच्या खोलीत जायला वळली. रमा गेले काही दिवस अशीच वागत होती पण आदित्यने नॉर्मल वागण्याचा चंग बांधला होता.
"रमा..काये..तुला काही काम आहे का?"
"नाही..का?"
"अगं मग बस ना..बरेच दिवस आपण या मिडटर्म्सच्या भानगडीत बोललो पण नाहीये नीट"
"हं.." रमा बाहेर सोफ्यावर जाऊन बसली. आदित्यने स्वैपाकघरातून डोकावून बाहेर पाहिलं.
"मला कळेना...तू बाहेर जाऊन बसलीस की 'हं' म्हणून तुझ्या खोलीत गेलीस.."
आदित्य चहाचे मग घेऊन बाहेर आला. दोघेही समोरासमोर बसून काहीही न बोलता चहा प्यायला लागले.
"तुझ्या घरी कसे आहेत सगळे?" आदित्यने विषय काढायला विचारलं.
"छान..."
"हं..बाबा काय म्हणतायत?? त्यांना परत माझ्याशी बोलायचं नाहीये ना?" रमा चपापली. "पण आता काय धड दोनेक महिन्याचासुद्धा प्रश्न नाहीये...एकदा का सेमिस्टर संपलं की प्रॉब्लेम संपतोय...नाही का?"
रमाने काहीच उत्तर दिलं नाही. सेमिस्टर संपत आल्याचं  तिलाही आत्ताच जाणवलं. आदित्य नेहमीसारखा वागत होता. बहुतेक इतके दिवस परीक्षेच्या टेन्शनमुळे तो विक्षिप्त वागत असावा असा तिने तर्क केला. दोन महिन्यांनी आपण एकत्र राहणार नाहीये हे त्याने 'जस्ट लाईक दॅट' डिक्लेअर करून टाकलं होतं.
"रमा तू काही बोलणारेस का?" आदित्यचा पेशंस संपला.
'काय बोलू आदि??माझ्याकडे नाहीये काही" ती वैतागून म्हणाली.
"ओह..ओके.."
"सॉरी.."
"ठीके.."
"चहा चांगला झालाय..."
"इझ दॅट द बेस्ट यु गॉट टू से?
"म्हणजे?"
"म्हणजे...आपल्यात काही प्रॉब्लेम झालाय का?म्हणजे मला आठवत नाहीये रमा...मी भांडी वेळेवर घासतो...माझा ब्रश बेसिनवर एकही दिवस विसरलो नाहीये...एक दिवस खिचडीची फोडणी करपली माझ्याहातून...तू दोन वेळा हिटर चालू करून हॉलची खिडकी अर्धवट उघडी ठेवली होतीस तीसुद्धा मी बंद केलीय...मग आपण नीट का बोलत नाहीये? इज देअर समथिंग वी शुड डिस्कस?"
"आदि..असं  काहीही नाहीये...सगळं  नॉर्मल आहे..."
'कदाचित नॉर्मल आहे म्हणूनच सगळे घोळ आहेत' ती मनात म्हणाली.
"बरं..असो..तू म्हणतेयस तर असेल..."
"रात्री जेवायला काय करायचंय?"
"ते ठरवण्याआधी...तुला राजने मुव्हीला येणारेस ना विचारलंय...मुव्ही बघून बाहेरच काहीतरी खाऊन यायचा प्लान आहे! तू असलीस तर मेघा असेल..दर्शु-"
"हं..मला माहितीय...ती नाहीये इथे..."
"मग त्याला मी कळवतो कि तू येणारेस म्हणून"
"ओके"

आदित्य येणार नाहीये हे रमाला शेवटच्या क्षणाला समजलं. सिनेमा म्हणजे आदित्य हमखास असेलच हे तिने गृहीत धरलं  होतं. त्याला आराम करायचा आहे असं कारण त्याने सगळ्यांना सांगितलं होतं.   तिकिट्स बुक करून झाली होती त्यामुळे ऐन वेळेला नाही म्हणून काही उपयोग नव्हता आणि सेम कारणाने आदित्यला 'चल' म्हणता येत नव्हतं. रात्री रमा घरी परत आली तेव्हा आदित्य बाहेर लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता.
"तू झोपणार होतास"
"हो..पण नाही आली झोप...जेव्हा इच्छा असते तेव्हा येत नाही...असो..मुव्ही कसा होता?"
"चांगला होता..राज म्हणाला रीव्युस पण चांगले आलेत...तू कसा काय मिस केलास?"
"खरंतर मला ती स्टोरी आवडली नव्हती..."
"अच्छा??? अजून काही???....निदान कबूल तरी कर..की उगाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून तू नाही म्हणालास.."
"ठीके..करतो कबूल! कधीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं वागावं यु नो..जस्ट लाईक दॅट..."
"हं.." रमाने मान डोलवली.

थोड्या वेळाने रमा बाहेर येऊन आदित्यला म्हणाली-
"तू काही इतक्यात झोपायची शक्यता मला दिसत नाहीये..सो गुड नाईट"
"गुड नाईट..."
रमा खोलीकडे जायला वळली. आदित्यला काय सुचलं कुणास ठाऊक? त्याने तिला हाक मारली.
"काय?" तिने केस मानेवरून पुढे घेत एका बाजूला केले आणि ती वळली.
आदित्यला एव्हाना तिच्या त्या लकबीची सवय झाली होती. 
"काही नाही..असंच...आय गेस तू म्हणालीस तसं सगळं नॉर्मल आहे"तो हसत म्हणाला. रमाने आश्चर्याने हसत त्याच्याकडे पाहिलं. त्याचं वाक्य तिला जाणवलं आणि ती पुन्हा गंभीर झाली. मिडटर्म्स संपल्या होत्या. बाबांकडून आदित्यशी बोलायला घेतलेला वेळ संपला होता. खरं बोलायला एकदा उशीर झाला आणि सगळं बिनसलं होतं. तिला अजून उशीर करता येणं शक्य नव्हतं.
ती पुन्हा डायनिंग टेबलजवळ आली आणि आदित्यच्या बाजूच्या खुर्चीत बसली. त्याने लॅपटॉपमधून डोकं काढून प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत भुवया उंचावल्या.
"आदि, आपण एकत्र राहायला लागलो तेव्हा काही गोष्टी आपण एकमेकांशी बोलायच्या नाहीत असं ठरवलं होतं..आपले हेतू स्पष्ट आहेत म्हणून आपण ते करू शकलो...पण-"
वारुळातल्या मुंग्या सैरावैरा पळत सुटल्या होत्या. आदित्य गांगरला होता. रमा अचानक हा विषय काढेल असं त्याला अजिबात वाटलं  नव्हतं आणि तिने तसं करण्याचं कारणसुद्धा त्याला लक्षात येत नव्हतं.
"-पण आता आपल्याला बोलावं लागेल...मोर ओव्हर आपले हेतू स्पष्ट आणि शुद्ध आहेत हे प्रीटेन्स नाहीये आणि खरच तसं आहे हे प्रुव करायला आपण बोललो तर चालेल...???"
"अ....रमा..आय डोन्ट नो...माझा तुझ्या जजमेंटवर विश्वास आहे...तुला हा विषय काढणं गरजेचं वाटतंय तर बोलूया आपण याच्यावर..."
"मला तू हो म्हणालास हे ऐकून खूप रिलीव्हड वाटतंय..."
'मी खरं  बोलून चूक केली' हा रमाचा आदिपुढे डिफेन्स असणार होता. दुसरीकडे आदित्यने मनातल्या मनात 'समस्त अमृता कथना'ची मांडणी सुरु केली होती. त्याने ठरवलं  होतं की 'आपण खरं न सांगून चूक केली हे सगळ्यात आधी कबूल करून टाकायचं म्हणजे नंतर गिल्टी वाटायला नको'
"ओके...कधी बोलायचं आहे आपण?" त्याने विचारलं.
"आत्ता चालेल?"
"आत्ता?"


क्रमशः 


*मिस्टिक रिव्हर हा हॉलीवूडचा गाजलेला सिनेमा आहे.