दहा-एक वर्षांपूर्वी बिल्डींगमध्ये कुणी नवीन टीव्ही, मशीन, फ्रीझ असं काही घेतलं की
त्याची चर्चा सुरु व्हायची! 'पहिल्या मजल्यावरच्या शिंदेंकडे आलेल्या
नव्या टीव्हीला १०० चॅनेल्स आहेत' किंवा 'बाजूच्या नाडकर्णीनीपण आपल्यासारखंच
सिंगल टब ऑटोमॅटिक मशीन घेतलंय' हे साधारण गप्पांचे विषय! (या सगळ्या
वाक्यांमध्ये कौतुकाचा भाग कमी आणि असूया किंवा अपेक्षा जास्त हे आलंच!) मग
'काळ बदलतो' का काय म्हणतात ते झालं आणि फ्रीझ, मशीन अशा गृहोपयोगी वस्तू
एकूणच कॉमन आणि अशा चर्चांसाठी दुय्यम झाल्या..असूया, अपेक्षा तशाच होत्या
पण गप्पांचे विषय, वस्तू मात्र चंगळवादी झाले. 'मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा
बघणं', 'परफ्युम्स आणि गॉगल्स' किंवा 'मोबाइल फोन्स' हे मिरवायचे, खिजवायचे
विषय झाले. यापैकी मोबाईल फोनचा उल्लेख चंगळवादी वस्तूंमध्ये करायचा की
नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो पण मोबाईल फोन हा लोकांच्या चर्चेचा,
लाईफस्टाईलचा अविभाज्य घटक झालाय हे खरंय..बाय द वे फोन मीन्स 'स्मार्टफोन'
बरं का!! माणसं स्मार्ट असोत वा नसोत, फोन स्मार्ट असणं आवश्यक झालंय.
'खिडक्या,यंत्रमानव….'
असं वरकरणी अर्थहीन वाटणारं शीर्षक वाचून स्मार्ट लोकांना लिखाणाचा
विषय लक्षात आलाच असेल. पण जे स्मार्ट नाहीयेत (नथिंग पर्सनल बरं
का!) त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण- स्मार्ट फोनची दिवसेंदिवस वाढणारी
बाजारपेठ सध्या चार मुख्य प्रकारच्या फोन्सनी व्यापली आहे! खिडक्या अर्थात
'विंडोस' फोन, यंत्रमानव म्हणजे ऍन्ड्रोइड फोन्स, सफरचंद म्हणजे ऍपलचा iफोन (न्यूटनचं सफरचंद नाही स्टीव्ह जॉब्सचं) आणि काळबेरं हा मी ब्लॅकबेरी
फोनसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे (या फळासाठीचा मराठी प्रतिशब्द
कुणाला माहित असल्यास सांगावा). सहा-सात वर्षांपूर्वी भारतात फार
थोड्या लोकांकडे नोकियाचा ९३०० अर्थात कम्युनिकेटर असायचा (आत्मस्तुती:
माझ्याकडे पण होता). आपल्याकडे वापरला गेलेला तो पहिला स्मार्टफोन…पण तो
स्मार्टफोन कमी आणि 'शोफोन' जास्त होता कारण त्याचा वापर दिखाव्यासाठीच जास्त व्हायचा. या फोनचे व्यावहारिक,तांत्रिक फायदे कुणी घेतलेले मी ऐकले
नाहीयेत किंवा त्याच्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हतं
(इंटरनेट, थ्रीजी, वाय-फाय वगैरे). मग साधारण २००८ च्या आसपास स्मार्टफोनचा
iगवगवा सुरु झाला. मोबाइल फोन ही गोष्ट एव्हाना कॉमन झाली होती पण iफोन
प्रकार नवीन होता. स्टीव्ह जॉब्सने "मोबाइल फोन निव्वळ बोलण्यासाठी नसतो
आणि त्याचा वापर इतर गोष्टींसाठी व्हायला हवा! फोन जीवनशैलीचा भाग व्हायला
हवा" असं विधान iफोनसंदर्भात केल्याचं वाचलेलं आठवतंय! मला जेव्हा
पहिल्यांदा iफोनच्या तंत्रज्ञानाबद्दल कळलं तेव्हा मला
त्याचं अजिबात कौतुक वाटलं नव्हतं..कारणं पुन्हा एकदा- फोन वापरायला
आवश्यक तंत्रज्ञानाचा अभाव आणि अवाजवी किंमत! माझ्या दृष्टीने तेव्हा
नोकियाचे चांगले कॅमेरे असणारे किंवा सोनीचे गाणी ऐकायला बनवलेले फोन्स ही
मोबाइल विषयक अपेक्षांची लिमिट होती! मग शिक्षणानिमित्त अमेरिकेला आलो आणि
स्मार्टफोन लोकांच्या जीवनशैलीचा भाग होताना पाहिलं. सगळ्यांनी घेतला
म्हणून, स्वस्तात मिळतोय म्हणून, गरज आहे म्हणून अशी वेगवेगळी कारणं
स्वतःलाच देत शेवटी स्मार्टफोन घेतला आणि स्टीव्ह जॉब्सला मनातल्या मनात
नमस्कार केला.
सर्वप्रथम काळबेरं फोन आणि खिडक्या फोन याविषयी-
आकडे काहीही सांगोत, मी तरी यंत्रमानव आणि सफरचंद फोन्सच्या तुलनेत बोटावर
मोजता येतील इतक्याच लोकांनी हे दोन प्रकारचे फोन वापरणारे लोक पाहिले
आहेत! काळ्याबेऱ्या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे कॉम्प्युटरला असतो तसा अख्खा
'की-बोर्ड' या फोन्सला असायचा! या 'की-बोर्ड' च्या बटनांच्या रचनेमुळेच
त्या फळाचं नाव या फोनला दिलं गेलं. २०१० च्या शेवटाकडे आयफोनने बाजारपेठ
व्यापून टाकण्यापूर्वी हे फोन्स अनेक सरकारी, कॉर्पोरेट जगात ऑफिशिअली
वापरले जायचे. 'काळ्याबेऱ्या संवाद'प्रकारची जबर हवा होती. या फोनच्या
वेडाची तुलना अमली पदार्थांच्या व्यसनाशी केली गेली. हे फोन घेऊन फिरणारे
लोक 'श्या…तुझ्याकडे बीबी मेसेजिंग नाहीये?' वगैरे विचारायचे! पण काळाच्या
ओघात (म्हणजे अवघ्या वर्ष-दीड वर्षात) ह्या फोनची बाजारपेठ कमी झाली. आता
हे फोन घेऊन फिरणाऱ्या लोकांना 'श्या…तुझ्याकडे अजून बीबीच आहे?' असं ऐकून
घ्यावं लागतं! नवीन आलेल्या काही काळ्याबेऱ्या फोन्सना पारंपारिक
'की-बोर्ड नाही'…आता याला व्यावसायिक स्पर्धेत स्वतःची ओळख विसरणं म्हणायचं
की स्पर्धेत टिकण्यासाठी बदलणं म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! खिडक्या
फोन या प्रकाराविषयी मला तशी बरीच कमी माहिती आहे! या प्रकारचे फोन्स गेली
कित्येक वर्ष अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत पण आधुनिक म्हणता
येतील असे खिडक्या फोन गेल्या दोन-तीन वर्षातले! गेल्या सहा महिन्यात आपली
लाडकी कंपनी 'नोकिया' ने खिडक्या सिस्टम असलेले काही चांगले फोन बाजारात
आणलेत आणि निव्वळ सफरचंद किंवा यंत्रमानव फोन घ्यायचा नाही म्हणून मी
लोकांना हे नोकियाचे फोन विकत घेताना बघतोय!निव्वळ तांत्रिक बाबींबाबत बोलायचं तर
खिडक्यावाले फोन्स तोडीस तोड नसले
तरी बऱ्यापैकी आधुनिक आहेत! सफरचंद आणि यंत्रमानव फोन्समध्ये असणाऱ्या
प्रत्येक नव्या 'फिचर'ला सिमिलर 'फिचर' या फोन्समध्ये आहे. पण या इतक्या
झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात या फोन्सनी आघाडी घेणं सध्यातरी अवघडच
दिसतंय!
'स्मार्टफोन' ही किती मोठी बाजारपेठ होऊ शकते हे
सर्वप्रथम सिद्ध करणारी कंपनी अर्थात सफरचंद! iफोनने २००७ मध्ये रिलीज
झाल्यापासून विक्रीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले. 'टचस्क्रीन' अर्थात
बोटाच्या स्पर्शाने वापरायचा फोन! स्टायलस वापरायचे फोन्स नवीन
असताना टचस्क्रीनने लोकांना अचंबित व्हायला लावलं (मी गेल्या काही महिन्यात
अनेक टचस्क्रीन फोन पहिले पण जो सहजपणा 'सफरचंदाच्या स्पर्शात' आहे तो
कुठल्याच फोनमध्ये नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो). बँकिंगपासून सोशियल
नेट्वर्किंगपर्यंत सगळं या फोनने लोकांच्या अक्षरशः हाताशी आणून
ठेवलं. अन्न, वस्त्र, निवारासारखी फोनला गरज बनवण्याचं श्रेय माझ्यामते
iफोनलाच! iफोनचे खंदे समर्थक आहेत तसे विरोधकसुद्धा आहेत. गमतीचा भाग असा
की या विरोधकांपैकी अर्ध्या लोकांनी तो कधी वापरलेलासुद्धा नाही. iफोनची किंवा सफरचंद कंपनीची मिळेल तेव्हा टीका करणारे लोक मला माहितीयत आणि
त्यांच्या अतिशहाणपणाची मला गम्मत वाटते. माझ्या मते iफोन हा जगातला
सगळ्यात सोप्पा फोन आहे. iफोनमध्ये किती फीचर्स कमी आहेत आणि वापरायला
किती कटकट आहे वगैरे iफोन न वापरणारे अधिकाराने बोलले की मला 'गेल्या अनेक
वर्षात घराबाहेर न पडलेल्या माणसाने वाढत्या ट्राफिकबद्दल चर्चा
केल्यासारखं वाटतं!' आजघडीला 'एलेगन्स,क्लास, सिम्पलीसिटी' हे तिन्ही शब्द
जर कुठल्या एका फोन प्रकाराला लागू होत असतील तर तो म्हणजे सफरचंद फोन!
हेसुद्धा नमूद करायला हवं की विरोधक करतायत ती सगळीच टीका निरर्थक नाहीये.
गेल्या ६ वर्षात सहा नवीन iफोन मॉडेल्स बाजारात आली पण त्यांच्या एकूण
बाह्यरूपात आणि अंतर्रुपात काहीच मोठे फरक पडलेले नाहीत! या फोनमार्फत
केलेल्या कित्येक गोष्टींवर कंपनीचं नियंत्रण आहे. फोन वापरण्यात काही
बंधनं आहेत. पण असं सगळं असतानासुद्धा एकूणच बाजारात सफरचंदी फोन्स
लोकप्रिय आहेत हे खरं!
सफरचंदी फोनची इतकी स्तुती केल्यावर मी अर्थात सफरचंदी फोन
वापरत असेन याचा तुम्ही अंदाज बांधला असेलच. पण तुमचा अंदाज चुकलाय…मी
सफरचंदी नाही तर यंत्रमानव फोन वपरतो. गेल्या दहा वर्षात आयटी क्षेत्राशी
संबंधित बहुतेक धंद्यांच्या यशात 'गुगल' नावाच्या अचाट कंपनीचा खूप मोठा
वाटा आहे! त्यामुळे स्मार्टफोन्स क्षेत्राशी गुगल संलग्न नसलं असतं तर नवल
होतं. यंत्रमानव फोन तंत्रज्ञान बनवणारी कंपनी गुगलने ८ वर्षांपूर्वी विकत
घेतली आणि जवळपास ५ वर्षांपूर्वी 'एचटीसी'नावाच्या कंपनीमार्फत या
फोन्सनी पदार्पण केलं. गेल्या पाच वर्षांत या फोन्सनी मागे वळून पाहिलेलंच
नाही! यंत्रमानव तंत्रज्ञान असलेले फोन्स आज अनेक महत्वाच्या कंपन्या बनवून
बाजारात आणतायत! यात सगळ्यात आघाडीवर आहे 'सॅमसंग'! सॅमसंग कंपनीचा फोन
घ्यायला लोक कधीकधी तयार नसतात कारण दर दोन महिन्यात जास्त आधुनिक नवा फोन
बाजारात येतो आणि 'आपण अत्याधुनिक किंवा लेटेस्ट फोन घेतला' या आपल्या
'अभिमाना'ला (वाचा: 'गर्व/माज') तडा जातो. गुगलचे जीमेल, गुगल प्लस, गुगल
टॉक, युट्युब असे अनेक प्रोडक्टस वापरताना मिळणारी फ्लेक्सिबिलीटी हे
फोन्स वापरताना मिळते. वेळ आल्यास फोन कोणत्याही कॉम्प्युटरला जोडून
आपल्याला डेटा ट्रान्स्फर करता येतो. आयफोनच्या तोडीस तोड किंवा कांकणभर
सरस तंत्रज्ञान या फोन्समध्ये दिसतंय! सॅमसंग आणि सफरचंद कंपन्यांमध्ये या
स्मार्टफोन प्रकाराशी संबंधित 'एकाधिकारा'वर (पेटंट) चाललेला खटला प्रसिद्ध
आहे. त्यात सफरचंदाने बाजी मारून अनेक कोटी डॉलर्स नुकसान भरपाई म्हणून
वसूल केलं. मात्र या प्रकाराने सॅमसंग जणू पेटून उठलं आणि गेल्या वर्षभरात
त्यांनी काही 'जबर' (दुसरा शब्दच नाही) फोन बाजारात आणले आहेत. आयफोनने
प्रस्थापित केलेली मक्तेदारी मोडून काढण्याची अपेक्षा फक्त यंत्रमानव
फोनकडून होतेय यातच सगळं आलं.
'घरात कुत्री असून त्याच्याबद्दल न बोलणारा मालक किंवा
मालकीण मला
अजून भेटायचा आहे' हे जसं पुलंनी म्हटलंय तसंच स्मार्टफोन असून त्याचं
अजिबात कौतुक न करणारा किंवा करणारी व्यक्ती मला भेटायची आहे. याला
मीसुद्धा अपवाद नाही. माझ्या सॅमसंग एस थ्रीचं मी उठसूट कौतुक करत असतो आणि
कुणाला नवीन फोन घ्यायचा असेल तर 'एस थ्रीच घे' असे फुकटचे सल्लेपण
देत असतो. पण अलीकडे अत्यावश्यक झालेला फोनचा वापर काही बेसिक प्रश्न
उपस्थित करतो- फोनला जीवनशैलीचा भाग मानलं तर तुमचा फोन तुमच्याविषयी
काय सांगतो? तुम्हाला तुमचा कमी फीचर्स असलेला जुना फोन परत वापरावा लागला
तर तुमची तयारी असेल का? आणि सगळ्यात महत्वाचं स्मार्टफोन लोकांची
बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता खालावायला कारण ठरतो आहे का? या प्रश्नाचं उत्तर
'हो' असेल तर मग स्मार्टफोनला चांगलं म्हणायचं का वाईट? (कुणी मराठी
शाळेत शिक्षक असाल तर पुढच्या चाचणी परीक्षेत निबंधाला हा एक विषय जरूर
ठेवा 'मोबाइल फोन: शाप की वरदान?'). पहिल्या प्रश्नाला कोणतंही तर्कशुद्ध
उत्तर नाही! फोनकडे बघून माणसाच्या व्यक्तीमत्वाविषयी तर्क करणं म्हणजे
'कुणी कुठले कपडे घातलेत याच्यावरुन तो सिगरेट ओढतो का नाही?' या असंबद्ध
प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं आहे! नवीन फोन वापरायला सुरुवात केली आणि
अचानक कुणाकडेतरी आपला जुना फोन दिसला की आपल्याला हसायला येतं. आपण
एकेकाळी हा 'फडतूस' फोन वापरायचो हे फिलिंग आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा
फोन बदलेल्या लोकांना नक्की येउन गेलं असणारे. पण अशा वेळी दोन क्षण थांबून
विचार करायला हरकत नाही. नवीन फोन घेऊन एक अचिव्हमेंट पूर्ण केल्याचा आनंद
साजरा करायला आणि वेळ आलीच तर जुना फोन परत वापरायला लागेल याबाबतीत
मनाची तयारी करायला हे दोन क्षण पुरेसे आहेत! शेवटचा प्रश्न- खालावती
बुद्धिमत्ता आणि नितीमत्ता. या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने 'हो' असं आहे.
स्मार्टफोन प्रकाराचा मी कितीही चाहता, पंखा असलो तरी स्मार्टफोन बनवणाऱ्या
कंपन्यांनी फोनच्या वापरावर वयाची आणि आय.क्यू. यांची किमान मर्यादा
ठेवण्याची सोय करावी असं माझं वैयक्तिक मत आहे! "सहा-सात वर्षांच्या आमच्या
मुलाला आय-फोन हवा म्हणून तो हट्ट करतोय आणि त्याला आयफोन थ्री दिला तर
त्याला तो नकोय, आयफोन फोरच हवाय" हे कौतुकाने सांगणारी अमेरिकन बाई मला
भेटली तेव्हा 'लटकनेसे हाईट नाही बढेगी,मम्मी को बोलो कॉम्प्लान पिलाये'
सारखं मला तिला 'स्मार्टफोन इस्तेमाल करनेसे अकल नही बढेगी, अपने बच्चे को
बेकार आदते ना लगाये' असं म्हणावसं वाटलं. स्मार्टफोनचा वापर जेवढा
चांगल्या गोष्टींसाठी होतो तेवढाच वाईट गोष्टींसाठी होतोय. स्मार्टफोन आणि
सोशियल नेटवर्किंग यांच्या कॉम्बीनेशनमुळे 'इंट्रोवर्ट' हा शब्द इंग्रजी
डिक्शनरीतून आणि 'अंतर्मुख' हा शब्द मराठी शब्दकोशातून काढून टाकायला हरकत
नाही. जगाला आरडाओरडा करून काय सांगायचं? काय दाखवायचं? याच्यावर निर्बंध
राहिलेले नाहीत. मोबाईल फोन हे या सगळ्या बदलाचं(?) मोठं कारण आहे. ऊस गोड
लागला म्हणून मुळासकट खत येत नाही तसंच स्मार्ट वाटला म्हणून आयुष्य
फोनच्या स्वाधीन करता येत नाही किंबहुना करूच नये! फोन, कॉर्डलेस
फोन,मोबाईल फोन, स्मार्ट फोन या बदलाचे आपण साक्षीदार आहोत आणि याचं मला
कौतुक आणि अभिमान आहे! पण मग अचानक नारळीकरांचं 'वामन परत न आला' आठवतं आणि
मग सहजच विचारसुद्धा येतो…नवीन कोनाद** तयार होण्याची स्मार्ट फोन ही
सुरुवात तर नाहीये ना?
**ज्यांनी 'वामन परत न आला' किंवा 'Return of Vaman" वाचलं नाहीये त्यांना हा संदर्भ कदाचित लक्षात येणार नाही… त्याबद्दल क्षमस्व!! पण मराठी ब्लॉग वाचणाऱ्या बहुतेकांनी नारळीकरांची पुस्तकं वाचली असावीत असा अंदाज आहे.
2 comments:
Blackberry = Kali maina
@Unknown:
आता तुम्ही इथे Blackberry = Kali maina लिहिल्यावर मला लक्षात आलंय!! पुढच्या वेळी काही या विषयावर काही लिहिलं तर नक्की 'काळबेरं' ऐवजी 'काळी मैना' वापरेन! :)
Post a Comment