Pages

Sunday, October 21, 2012

जस्ट लाईक दॅट १४

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३

"सो आपण सुरुवात कुठून करायची आहे?" आदित्यने तळहात एकमेकावर चोळत विचारलं.
"आदि, हे जास्त ऑकवर्ड होत चाललंय...आपण त्या दिवशी रात्रीच का नाही हा विषय बोलून टाकला??"
"दोन गोष्टी..एक तर मी रेडी नव्हतो...दुसरी गोष्ट...मला असं लक्षात आलं की बऱ्याच दिवसांनी आपल्याला एकमेकांबद्दल नवीन वाटण्यासारखं काहीतरी आहे...तुला गंमत वाटेल पण त्याच दिवशी संध्याकाळी मला जीतने ऐकवलं होतं की नाविन्याच्या अभावामुळे तुझ्या आणि रमामध्ये एक प्रकारचं..काय बरं....हां...अनइझीनेस आलाय..मग त्या दिवशी रात्री जेव्हा तू हा विषय बोलायचा का म्हणून विचारलंस तेव्हा मला पुन्हा ते नाविन्य रीज्युविनेट झाल्यासारखं वाटलं...तूच बघ ना..आपण दोघेही त्या दिवसापासून एकमेकांची प्रत्येक हालचाल बारकाईने पाहतोय आणि त्यावरून आज आपण एकमेकांना काय गोष्ट सांगू? कुणाबद्दल सांगू?याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय...माणसाचा जनरल स्वभाव आणि चौकसपणा!! मला तरी मजा आली या सगळ्यात..पण मी कबूल करतो की तू काय सांगशील याचा मी जराही अंदाज बांधू शकलेलो नाही!!" 
"हं...कुठल्या पुस्तकात वाचले होतेस असे प्रयोग?" रमाने थट्टेच्या स्वरात विचारलं.
"आठवत नाही गं..गमती गमतीत खूप वाचन झालं माझं! तिला कधीच आवडलं नव्हतं" आदित्य बोलून गेला. रमाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. 
"आता आपण बोलणारच आहोत ना या विषयावर" आदित्य खजील होत म्हणाला    
"ओके..मग आता 'नमनाला घडाभर तेल'?की करायची सुरुवात?"
"क्या बात है! तू एक मराठी म्हण योग्य ठिकाणी वापरली आहेस..."
"योग्य ठिकाणी वापरली आहे म्हणजे तुला त्याचा अर्थ कळला असं समजते मी...आणि तुझ्याबरोबर राहून असलं बोलायची सवय लागलीय मला" ती हसत म्हणाली.

पुण्यात स.प.कॉलेजच्या मागे असणारं सी.सी.डी! आदित्यचा मित्र लोकेश कुठल्यातरी कल्चरल इव्हेंटचा कोऑर्डीनेटर होता. अमृता त्यासंदर्भात काहीतरी विचारायला एक दिवस तिथे आली तेव्हा तिची आणि आदित्यची पहिल्यांदा ओळख झाली. मग दुसऱ्या वर्षी डिव्हिजनस चेंज झाल्या आणि ती त्याच्या वर्गात आली. ८-१० जणांचा एक मोठा ग्रुप बनला. ग्रुपमधले बरेच पुण्याच्या बाहेरचे होते. ते सुट्ट्या लागल्या की घरी पळायचे.त्या सुट्टीतल्या भेटीगाठींमुळे आदित्य आणि अमृताची मैत्री घट्ट झाली. 
"आय कान्ट बिलीव्ह ३ वर्षं संपली..." अमृता सी.सी.डीच्या सोफ्यावर तिची पर्स फेकत म्हणाली.
"हं..मी टू" आदित्य मागून येऊन तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. 
"सगळे इतक्या घाईघाईने घरी पळतील असं वाटलं नव्हतं"
"घरची ओढ ती घरची ओढ...आपण त्यांना ब्लेम करू शकत नाही"
"मे बी...मी कधीच पुण्याबाहेर राहायला गेले नाही...सो मला अजिबात कल्पना नाही या गोष्टीची"
"मी तीन वेळा घर बदललंय गेल्या १२ वर्षांत! मला उलट या वर्षी खूप भारी वाटतंय की घर बदलायला माझं शाळा किंवा कॉलेजचं वर्ष संपायची कुणी वाट बघत नाहीये" आदित्य टेबलवरच्या मेनुकार्डशी चाळा करत म्हणाला. 
"सो काय प्लान?" अमृताने विचारलं.
"कफे लाते आणि चीज टोस्ट" 
"अरे इथलं नाही रे...जनरल पुढे" ती त्याला वेड्यात काढल्याच्या स्वरात म्हणाली.
"माहितीय गं..मी गंमत करत होतो...पुढे प्लान विचारशील तर माहीत नाही"
"म्हंजे?"
"म्हंजे बाबा म्हणत होते की एमबीए कर...पण मी सीइटी दिली नाहीये..मग त्यात एक वर्ष जाईल..मग माझा मामा म्हणाला की आधी एमएससी करून घे...ते संपता संपता सीईटी दे...एखाद वर्ष जास्त जाईल पण करिअरला बरं"
"अरे मुला, सीइटी द्यायची होती तर या वर्षी दिली असतीस ना...आपण एकत्र अभ्यास नसता का केला? मी दिली तेव्हा बोलला असतास तर.."
"पण माझा काही प्लान नव्हता तेव्हा"
"हं"
"पण तुला काय वाटतं?? हा आधी पीजी आणि मग एमबीए हा प्लान ओके आहे ना?"
"मी कसं सांगू? तू ठरव...तुला लाईफमध्ये काय करायचंय त्याच्यावर अवलंबून आहे..."
"हे ठरवणं वगैरे मला जमत नाही"
"अरे आदित्य..म्हणजे तुला नंतर काय टाईपचा जॉब करायचाय? पुण्यात राहणारेस की बाहेर मुंबई, बँगलोरला वगैरे जायची तयारी आहे तुझी?"
"मुंबईत मी राहिलोय..सो मला चालेल.बँगलोर...न्यू प्लेस...पायाला चाकं तर कळायला लागल्यापासून लागली आहेत...सो-"
"इन शॉर्ट...माहित नाही" ती हेटाळणीच्या स्वरात म्हणाली. त्याने खांदे उडवले. वेटर ऑर्डर घ्यायला आला आणि विषय थांबला.

"आदि, आपण अलीकडे खूप जास्त वेळ फोनवर बोलतो असं नाही वाटत का तुला?"
"रिअली?मला नाही जाणवलं आत्तापर्यंत" आदित्य हसत म्हणाला.
"अरे, माझ्या परीक्षा झाल्यात..तुझी परवा व्हायवा आहे..सो आपण बोलल्याने तुझा वेळ वाया जात असेल तर सांग मला असं म्हणत होते मी.."
"वेळ वाया जातोय का ते आत्ता नाही सांगता येणार!"
"म्हंजे?"
"अमु, आपला वेळ सत्कारणी लागलाय की वाया गेलाय हे कळायलासुद्धा काही वेळ जावा लागतो" अमृताला एवढं अवघड वाक्य झेपलं नाही!
"आदि प्लीज..तुझं बाबांच्या दुकानात बसणं अलीकडे खूप वाढलंय..तिथे बसून तू जेवढी पुस्तकं विकत नसशील तेवढी वाचतोस बहुतेक" 
"हं..खरंय!"    
"आय विश...सीमाचं अफेअर सुरु झालं नसतं..." तिने नवीन विषय काढला. 
"का बरं??" 
"आम्ही पूर्वीइतकं बोलत नाही आता...तिचा सगळा वेळ तिच्या 'बेबी'ला सांभाळण्यात जातो"
"ती तिच्या बॉयफ्रेंडला बेबी म्हणते?विचारलं पाहिजे तिला..." आदित्यने भोळेपणाचा आव आणत भंपक प्रश्न विचारला.  
"आदि, कम ऑन...तू तिला काहीही विचारणार नाहीयेस!"
"अमु, तू मला असली काही हाक मारणार नाहीस ना कधी?" आदित्यने विचारलं.
"नाही..बेबी नक्की नाही म्हणणार..पण तू हेवी पुस्तकी डायलॉगस मारत राहिलास तर आजोबा नक्की म्हणेन"   

"तू मला आधी प्लान सांगितला असतास मी जरा चांगले कपडे घालून आले असते" अमु चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळून घेत म्हणाली.
"मला माहित नव्हतं बाईसाहेब..लोक्याचा फोन आला की सम्या आलाय पुण्यात...त्याने सुप्रियाला पण शेवटच्या क्षणाला कळवलं...ती डायरेक्ट ऑफिसमधून येणार होती.."
"सुप्रिया हाफ डे टाकून घरी जाऊन आली...मी एकटीच अवतारात होते त्या अख्ख्या हॉटेलात!" ती वैतागत बाईकच्या आरश्यात बघून स्कार्फ नीट करत म्हणाली.  
"सॉरी..चुकलं माझं! तू बसतेस का आता?" त्याने बाईकला किक मारली.
"आदि..हे तुझं नेहमीचं आहे!" म्हणत ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत मागे बसली.
"जेवण भारी होतं ना..."
"घरी सांगायचं का चिरंजीव काय जेवले ते...??" अमु अजून रागातच होती.
गाडी रस्त्याला लागल्यावर आदिने पुन्हा नवीन विषय काढला.
"सम्याचं बरंय ना...बाबांनी धंदा टाकलाय तो सांभाळायचाय...लग्नासाठी स्थळं बघतायत..."
"तूसुद्धा ते करू शकतोस...पण तुमच्याकडचे 'स्वकष्टाने' 'स्वयंपूर्ण' व्हायचे संस्कार आहेत असं काहीतरी तू मला मागे ऐकवलं होतंस..." ती शब्दांमधल्या 'स्व' वर जोर देत म्हणाली. 
"अमृता आपण नको बोलायला हा विषय..."
"आदित्य..हाच घोळ आहे...तुला समीर सेटल होताना दिसतोय तर तुला वाईट वाटतंय..तूसुद्धा होऊ शकतोस...पण तुला व्हायचं नाहीये...आता एमएससी संपल्यावर तुझे एमबीएचे प्लान्स आहेत...म्हणजे अजून दोन वर्षं..."
"मग मी काय करायला हवंय?? आदित्य वैतागला.
"दरवेळी मी का सांगायचं तुला?" अमृता आधीच उचकली होती.
"मग कुणाला विचारू?" 
तिने काही उत्तर दिलं नाही आणि त्यानेही पुन्हा नवीन विषय काढला नाही. त्याने तिला घराच्याजवळ कोपऱ्यावर सोडलं.
"घरी जाऊन सेटल झालो की फोन करतो.."
"आदि...आज नको फोन" त्याच्या कपाळावर आठ्या आल्या.
"काय झालं?"
"मला मम्मी विचारत होती की रोज रात्री बाल्कनीमध्ये उभं राहून कुणाशी बोलत असतेस..."
"मग तू काय सांगितलंस?"
"काय सांगू? पप्पापण समोर होते..मी आतल्या रूममध्ये काहीतरी आणायच्या नावाखाली गेले ती बाहेरच आले नाही..."
"ओह"
"निघू मी...नाहीतर आता कुणीतरी बघेल आपल्याला.."
"बरं.. मीपण निघतो! बाय.."
"गुड नाईट" 

आदित्य आठवणीत हरवून गेला होता.त्याच्या डोळ्याच्या कडा त्याला पाणावल्यासारख्या वाटल्या. रमासमोर आपल्याला रडायला यायला नको म्हणून त्याने तिला करंगळी दाखवून खुण केली आणि रेस्टरूममध्ये गेला. आरशासमोर उभं राहून स्वतःकडेच थोडा वेळ पाहत राहिला. अमृताशी असणारं त्याचं नातं पहिल्यांदाच कुणालातरी त्याने इतकं खोलात जाऊन सांगितलं होतं.मुळात नातं ही मोजमाप लावायची गोष्ट असू शकत नाही. नातं असतं किंवा नसतं! माणूस जन्माला येण्याआधीपासुनच नाती त्याला चिकटलेली असतात. मग तो जसा मोठा होत जातो तशी नवीन नाती बनत जातात आणि बनलेली जुनी नाती इव्होल्व्ह होतात. पण इव्होल्व्ह झालेल्या नात्याला दर टप्प्याला नवीन नावं कुठून आणायची? मग माणसाच्या आयुष्याची जशी बालपण,तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व अशी ढोबळ विभागणी केलेली आहे तशी नात्यांनाही ढोबळ नावं दिली जातात. तोंडओळख, मैत्री, घट्ट मैत्री, प्रेम असा चढता क्रम! या ढोबळ विभागणीनेच सगळा घोळ करून ठेवलाय!! आदित्यला जाणवलं - तो आणि अमृता एकमेकांना आवडत होते. पण घट्ट मैत्रीच्या पुढचं डिफाईन्ड नातं डायरेक्ट 'प्रेम' असल्यामुळे त्यांनी बिचकून त्यांच्या नात्याला आधीही धड नाव दिलं नाही आणि आताही तीच परिस्थिती होती..फक्त उलट क्रमाने! नुसती तोंडओळख म्हणण्याइतकं नातं तकलादू नव्हतं आणि मैत्री म्हणावं तर त्या नात्याची बेसिक विश्वासार्हता राहिली नव्हती!  
"तू काय करते आहेस?आपला सेकंड हाफ राहिलाय नाही का?" त्याने किचनमध्ये गेलेल्या रमाला विचारलं.
"हो...कॉफी करतेय...झालीच आहे...आले दोन मिनिटात.."
"आपल्या घरात कॉफी आहे?" त्याने हसत विचारलं. 
"हो आहे...मी आणली होती इंडियाहून येताना...मला वाटलं होतं की इथे चहाची थट्टा होईल..."
"पण तुला मी भेटलो..."
"हं" रमाच्या डोळ्यासमोरून गेले ३ महिने झर्रकन सरकून गेले. पण आता तिला खूप मागे जायचं होतं. निदान ४-५ वर्षं मागे!

कॉलेज कॉरिडॉरमधून चालत असताना रमाला मागून येऊन एका मुलाने थांबवलं.
"रमा फडके? राईट?"
"येस??"
"मी श्रीधर. आपण सेम क्लासमध्ये आहोत"
"आय नो..मी बघितलंय तुला क्लासमध्ये" रमाच्या आवाजातला प्रश्नार्थक स्वर अजून गेला नव्हता. 
"ओह..ग्रेट" तो स्वतःशीच खुश होत हसत तिथे उभा राहिला. रमाला त्याला काय हवंय ते कळेनाच! तिने काही सेकंद वाट पाहिली आणि ती पुढे चालायला लागली. श्रीला ते लक्षात आल्यावर त्याने गडबडीने तिला थांबवलं.
"हे..हे रमा...वेट..मला बायोकेमच्या नोट्स हव्या होत्या..मला तुझी पार्टनर तनुजाने तुला विचारायला सांगितलं आहे"
"ओह..ओके..पण आत्ता माझ्याकडे नाहीयेत नोट्स"
"हरकत नाही..आपण परत भेटू ना..." त्याने तत्काळ पर्याय काढला. रमाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं "आय मीन..पुढच्या वीकमध्ये..."  
"चालेल..किंवा मी तनुला देऊन ठेवते..तू झेरॉक्स करून घे.."
"अ..नाही..नको..मी डायरेक्ट तुझ्याकडूनच घेईन..इफ यु डोंट माइंड"
"शुअर...मंडे वर्कस?"
"या..."
"सी यु देन"
"सी यु..श्रीध-"
"कॉल मी श्री..कीप्स इट सिम्पल"
"ओके" म्हणून ती पुढे चालायला लागली. संध्याकाळी तिने तनुजाला फोन केला.
"तू बायोकेमच्या नोट्स पब्लिक का करते आहेस?" रमाने विचारलं.
"मी काय केलं?"
"मला आज श्रीधर भेटला होता आपल्या वर्गातला..त्याने माझ्याकडे नोट्स मागितल्या"
"रमा, तुला कुणाला नोट्स द्यायच्या नसतील तर सांग मला...आय मीन मला त्या चांगल्या वाटल्या म्हणून मी श्रीला सांगितलं होतं.बाकी कुणाला बोलले नाहीये.. तो माझ्या सोसायटीत राहतो" 
"हरकत नाही गं ..तो एकदम विचारायला आला म्हणून मला प्रश्न पडला.."
"रमा..चांगला मुलगा आहे तो...माझ्या भावासारखा आहे...मी लहानपणापासून ओळखते त्याला.."
"अगं..इट्स ओके..मला काही प्रॉब्लेम नाहीये.."
पुढच्या आठवड्यात नोट्सची देवाणघेवाण करायला तनु, रमा आणि श्री कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेटले.
"तनु तुला तर कॉफी..रमा तू चहा की कॉफी?" श्रीने विचारलं.
"अ..चहा आय गेस..."
"कॅफिन कॉनशिअस???" त्याने विचारलं.  
"चहामधलं कॅफिन पुरतं मला" तिने उत्तर दिलं.

"आज आपण कॉफी का पिणारे?"
"तुझा मेंदू थकल्याचं मला जाणवलं..माझंही तेच होईल बहुतेक...सो गोड कॉफी केली...जास्त कॅफिन आणि जास्त साखर" 
"ओके..इंटर्वल संपला...लेट द स्टोरी बिगीन"
"आदि, हे पुस्तकं, गोष्टी वगैरे तुझं काम...म्हणजे मला असं प्रसंग उभं करून वगैरे सांगणं जमणार नाही....मी सोप्पं सांगते...त्याचं नाव श्रीधर...सगळे त्याला श्री म्हणतात...म्हणजे हे मी 'बेबी' सारखं ठेवलेलं निकनेम नाही.आम्ही फर्स्ट यिअरला भेटलो. माझी पार्टनर त्याच्या कॉलनीत राहते. तिच्यामुळे आमची ओळख झाली. तिची सेकंड यिअरला डिव्हिजन चेंज झाली पण श्री आणि मी एकाच वर्गात राहिलो. नंतर मी एमएससी केलं आणि त्याने मुंबईतच एमबीए केलं..मार्केटिंग! गेल्याच महिन्यात त्याने जॉब चेंज केलाय....त्याचे आई-बाबा दोघेही जॉब करतात. मी ओळखते त्यांना-" 
"ओ....वेट वेट...तू त्याच्या घरच्यांना भेटली आहेस?"
"हो..का?"
"भारी आहे...मी कधी माझ्या कुठल्या मैत्रिणीला माझं घर लांबून पण दाखवलं नाही..."
"ते तुझ्या गोष्टीतून कळलं मला..."
"आणि मला काहीच मजा येत नाहीये...म्हणजे तू त्याच्या घरी गेलीस...कधी?का?पहिल्यांदा गेलीस तेव्हा काय झालं?मला जरा डीटेल्स सांग ना.."
"आदि, मला नाही जमत रे.."
"अगं..प्रयत्न कर...जमेल..."

सेकंड यिअरची दिवाळी. रमा पहिल्यांदा श्रीच्या घरी गेली होती. घराची बेल वाजवताना रमाच्या मनात धाकधूक होती. श्रीने येऊन दार उघडलं.
"फायनली..आलीस तू..तनु कधीच आलीय.."
"सॉरी...रिक्षा मिळाली नाही लगेच"
"फोनपण लागत नव्हता तुझा"
"अरे..आज लाईन्स बिझी असणारेत..."
"हो..ते आलं माझ्या लक्षात"
"तनु कुठाय?"
"आत आईला हेल्प करते आहे"
रमाला तो स्वैपाकघरात घेऊन गेला. 
"मातोश्री...ही रमा" रमाने वाकून नमस्कार केला आणि बाजूला उभ्या तनुला हात केला.
"मोठी हो..आणि हॅप्पी दिवाली"
"सेम टु यु काकू"
"श्री...या दोघींना घेऊन बाहेर जा..तनु तुझी मदत खूप झाली..." श्रीच्या आईने तिघांना बाहेर पाठवलं.
थोड्या वेळात समोर फराळाच्या डिशेस आल्या.
"तुला गोड आवडतं की तिखट??"
"तिखट" प्रश्न कुठलाही असो, तिचं उत्तर तयार असायचं.
"आमचा श्री गोड्या आहे...म्हणजे एवढं सगळं करून त्याला रसगुल्ले खायचे होते...बाबा लेकाचा हट्ट पुरवायला लगेच बाहेर गेलेत...या दिवाळीला ते घरी आहेत...त्यांनी तर फटाके पण आणलेत.."
"बाबा..गेल्या काही वर्षांत दिवाळीला घरी नसायचेच...कायम कुठेतरी टूर चालू..."
"हं" तेवढ्यात बेल वाजली. 
"विद्याधर आला वाटतं..." म्हणून त्याची आई दार उघडायला गेली. श्रीचे बाबा आत आले. श्री दिसायला त्याच्या बाबांची कार्बन कॉपी होता.
"विद्या...या श्रीच्या मैत्रिणी..."
"अरेच्या...श्रीला फक्त मैत्रिणी आहेत? मित्र कुठे गेले?" बाबांनी चेष्टा करायला श्रीकडे पाहत विचारलं.
"बाबा, सगळे संध्याकाळी यायचे आहेत...मग आम्ही इथून पुढे निखिलच्या घरी जाणारोत..."
"बरं...आणि आपण फटाके आणलेत त्याचं काय?"
"बाबा, मी रात्री वेळेवर घरी येईन परत फटाके फोडायला"
"मग हरकत नाही"
रमाची श्रीच्या बाबांशी ओळख झाली. ती कुठे राहते, घरी कोण असतं वगैरे जुजबी चौकश्या झाल्या.
"तुम्ही एका वर्गात आहात तर"
"अ..हो बाबा...आम्ही एका प्रोजेक्टवर एकत्र काम करतोय"
"छान..करा करा...बरं..अगं यांना रसगुल्ले दे की..मी गेलो एवढा घाईने आणि या दोघी न खाताच जातील.तनुजाचं ठीके एक वेळ..हाक मारली की हजर होईल"
"अरे रमा गोड आवडत नाही म्हणते...तनुला देते मी...ती आता काही हाक मारल्यावर लगेच यायच्या वयातली राहिली नाहीये..."
"काय गं मावशी...मी येते बरं का.." तनुजाने स्वतःला डिफेंड केलं.
"हरकत नाही...तू यांना रसगुल्ले दे...रमाला पण दे...एखाद्या रसगुल्ल्याला नाही कोण म्हणणारे? आणि श्री...मी जरा आत जाऊन मेल्स चेक करतो..तुम्ही गप्पा मारा...रमा येत जा गं अधून मधून" रमाने मान डोलावली.

श्रीसुद्धा नंतरच्या सहा महिन्यात रमाकडे येऊन गेला. रमाच्या आईला तो आवडला होता. श्री येऊन गेला त्या दिवसापासून आईने 'तुझ्या लग्नासाठीचं सगळ्यात मोठं काम संपलं' हे रमाला तीन-चार वेळा तरी ऐकवलं होतं. रमा शिकायची थांबत नाहीये हे बघून तिची आई हताश होऊन तिच्याशी भांडली होती. रमाचं अमेरिकेला यायच्या आधी सगळ्यात मोठं भांडण तिच्या आईशी झालं.
"रमा, खूप शिकलीस...काय गरज आहे आता उठून चार-पाच वर्ष अमेरिकेला जायची?"
"आई, खूप चांगली संधी आहे...नवीन गोष्टी शिकायला मिळतील..बरं तुला आणि बाबांना मला डॉक्टर करायचं होतं ना? मग आता मी डॉक्टर होणारे.."
"रमा, ते वेगळं होतं..तेव्हा तू १८-१९ वर्षांची होतीस...तुला डॉक्टर व्हायचं नव्हतं...चांगले मार्क मिळाल्यावर सगळे मेडिकल आणि इंजिनिरिंग करतात म्हणून तू बीएससी केलंस..."
"आई..डॉक्टर असणाऱ्या माणसाला अनोळखी लोकांशी नीट कनेक्ट होता आलं पाहिजे...मी ओळखीच्या वातावरणात कधी कनेक्ट झाले नाही..मी चांगली डॉक्टर होऊ शकले नसते" 
"आत्ता तो विषय नाहीये रमा..आत्ता विषय हा आहे की आता अमेरिकेला जाऊन डॉक्टर होण्यात तू काय अचीव करणारेस?"
"विषय तोच आहे...मी आत्ता तेच करतेय जे मला अचीव्ह करायला जमू शकतं.."
"मग इथे कर ना पीएचडी"
"आई, मी मुंबईच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकले...तिथल्या डिपार्टमेंटचा हेड जर का मला अमेरिकेला जायला सांगतो आहे तर नक्कीच काहीतरी कारण असेल ना?"
"मला ते काही माहित नाही...मला तुझं हे अमेरिकेला उठून जाणं पसंत पडलेलं नाहीये"
"मला तुझा विरोध पसंत पडलेला नाही" रमा उठून निघून गेली.
थोड्या वेळाने तिचा मोबाईल वाजला. श्रीचा फोन होता.
"श्री, आत्ता मी अजिबात मूडमध्ये नाहीये"
"माहितीय मला...काकुंशी भांडलीस ना?"
"तुला कसं कळलं?"
"काकूंकडे माझा नंबर आहे-" श्रीला रमाने पूर्ण बोलून दिलं नाही. 
"श्री...डोंट इव्हन ट्राय...आपण ऑलरेडी या विषयावर भांडून झालं आहे.." त्यांचं थोड्या दिवसापूर्वीच रमाचं अमेरिकेला जाणं आणि लग्नाचा विचार नसण्यावरून भांडण झालं होतं.
"मी भांडायला फोन नाही केलाय रमा...आणि तुला समजवायला तर नाहीच नाही..."
"मग फोन का केलास?"
"जस्ट टू बी विथ यु.." काही वेळ फोनवर कुणीच काही बोललं नाही. मग एकदम श्रीने विचारलं.
"रमा, आईला व्हिडिओ चॅटिंग शिकवलंस का गं?"
"नाही..."
"मग प्लीज शिकव तिला..ती खूप मिस करणारे तुला...खरंतर आम्ही सगळेच खूप मिस करणारोत तुला"
"श्री..तुला काय वाटतं की मला सगळ्यांपासून लांब जायला खूप मजा येतेय? पण मला हे करायचं आहे...तू पण ट्रेनिंगसाठी दिल्लीला गेला होतास ना सहा महिने...मी ४ वर्ष जातेय एवढंच"
"रमा..." श्रीने वाक्य अर्धवट सोडून दिलं.
"काय?"
"जस्ट टेक केअर..काही बोलावसं वाटलं तर फोन कर..बाय"

रमाला एव्हाना रडायला यायला लागलं होतं. ती उठून आत जायला लागली. ती आदित्यला काही म्हणणार तेवढ्यात आदित्य म्हणाला-
"रेस्टरूम ना?" तिने मान डोलावली. "एक काम कर...इथेच बस...मी बाहेर फेरी मारून येतो..." ती काहीच बोलली नाही. तो उठून निघून गेला.
थोड्या वेळाने तो परत आला. तेव्हा रमा शांतपणे शून्यात पाहत बसली होती.
"आलास?"
"हो, मगाशी आपण बोलायला सुरुवात केली तेव्हा मी तुझी गोष्ट ऐकायला रेडी होतो. पण कुणालातरी आपली गोष्ट सांगताना आपणच पुन्हा त्यात समोरच्यापेक्षा इतके जास्त गुंतून जात असू हे मला माहित नव्हतं. इट वॉस लाईक...लिविंग इट ऑल ओव्हर अगेन"
"खरंय" 
"रमा, लोक डायऱ्या लिहितात...मला ती आतापर्यंत जगातली सगळ्यात युसलेस साहित्यनिर्मिती वाटायची...म्हणजे आपणच आपल्या मनातलं आपल्यालाच वाचायला लिहायचं...माझा प्रश्न असायचा कुणाला वाचायला द्यायचं नाहीये तर लिहिता कशाला? पण आत्ता जाणवतंय की डायरी हे जगातलं सगळ्यात प्राईसलेस लिटरेचर रायटिंग आहे...ते तुम्हांला दाखवत राहतं की तुम्ही कोण होतात?मोर ओव्हर तुम्ही 'काय' होतात..?" 
रमाने त्याच्याकडे खिन्नपणे हसत पाहिलं.  
"सो..तुझ्या घरच्यांना माझी गोष्ट सांगायची की नाही ते तू ठरव..किंवा तुझी हरकत नसेल तर आपण दोघे ठरवू.पण आत्ता नको. आपण दोघेही दमलोय...आपल्याला कॉफीपेक्षा काहीतरी डेंजर प्यायची किंवा करायची गरज आहे..." आदित्य मुठी आवळत म्हणाला.
"विचार काये परचुरे??" रमाने विचारलं.
"अ..बिअर..अ...म्हणजे...थंडी पण खूप वाढायला लागलीय ना..."
"आदि..पांचट सोल्युशन्स नकोत.."
"ठीके राहिलं..मग अजून काय करता येईल...??' त्याने तिच्याकडे एक भुवई वर करून पाहत विचारलं.
"तुला काय करावसं वाटतंय अजून?"
दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिलं. दिवसभराच्या स्वतःच्याच लाईफ रीकॅपमधून बाहेर यायला दोघांना एकमेकांचं बरोबर असणं या क्षणाला पुरेसं होतं. 

क्रमशः 

Thursday, October 18, 2012

जस्ट लाईक दॅट १३

आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२


...........'जीत, ती माझ्याशी खोटं बोलली! तिने मला फसवलं असं मी नाही म्हणणार पण तिने माझा विचार नाही केला'
'तू तेच केलंस आदि! तू तरी कुठे तिचा विचार केलास? तू तिच्याशी खोटं बोलला नाहीस पण तिला खरं  सांगितलं नाहीस. जेव्हा सांगितलंस तेव्हा ते तुझ्या वैयक्तिक मनःशांतीसाठी! गिल्टी वाटून नाही..रिअली सॉरी आदित्य पण मला अजिबात कल्पना नव्हती की तू 'असा' वागशील...बरं...या सगळ्यात रमाचं काय?'......

आदित्य दचकून जागा झाला. डायनिंग टेबलवरच त्याला झोप लागली होती.
"काय रे? काय झालं?" समोर बसलेल्या रमाने विचारलं.
"काही नाही...सकाळी लौकर उठून अभ्यास करत होतो.सध्या झोप नाही होते ना नीट..सो होतं असं कधीतरी"
"ओके" रमाने जास्त चौकशी केली नाही.
गेले काही दिवस ते फारसे बोललेच नव्हते. सकाळचा चहा असो किंवा रात्रीचं जेवण करणं असो, जेवढ्यास तेवढे संवाद होत होते. रमा लौकर उठून कॉलेजला निघून जायची, आदित्यला त्याच्या लॅबमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत काम असायचं. त्यात मिडटर्म्स जवळ आल्या होत्या. दोघे अभ्यासातही बिझी होते. इथे आल्यावरची पहिलीच 'मोठी' परीक्षा होती आणि इतर कुठल्याही मुला-मुलीसारखं त्याला-रमाला चांगल्या ग्रेड्स मिळवून प्रोफेसर्सच्या नजरेत राहायचं होतं. अमृताशी बोलणं झाल्यापासून आदित्य बऱ्यापैकी डिस्टर्ब होता. पण 'आपल्याला आवडणाऱ्या मुलीने आपल्याऐवजी दुसऱ्या कुठल्यातरी मुलाची निवड केली' म्हणून जग थांबवून ठेवता येत नाही या गोष्टीची त्याला पुरेपूर कल्पना होती. आदित्यने अमृताचा निर्णय कळण्याआधीच तो रमाबरोबर राहत असल्याचं तिला सांगितलं असतं तर त्याला नंतर 'तो प्रामाणिक होता' असं म्हणायला जागा राहिली असती. या परिस्थितीत कसं वागायला पाहिजे हे सांगणाऱ्या कुणाचीतरी त्याला खूप गरज होती. पण दुर्दैवाने तेही शक्य नव्हतं. रमाने त्याला 'तुझं काही बिनसलंय का?' म्हणून विचारलं होतं पण त्यानेच 'नाही सांगता येणार' असं उत्तर देऊन तिला गप्प केलं होतं. त्या दिवसानंतरच रमा विचित्र वागते आहे असं त्याला वाटलं पण तो नॉर्मल वागत नाहीये म्हणून त्याला तिचं वागणं विचित्र वाटतंय असा निष्कर्षसुद्धा त्याचा त्याने काढला. आदित्यला अमृताबद्दल जीतशी बोलायची इच्छा होत होती पण जीतची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज आल्यावर त्याने तोही विचार झटकला. दुसरीकडे रमा भलत्याच कारणाने अस्वस्थ होती. श्रीला आदित्यबद्दल सांगून तिने अपराधीपणाची भावना दूर केली होती. पण श्री बाबांना जाऊन भेटेल आणि बाबा असे रिऍक्ट होतील याची तिने अजिबात कल्पना केली नव्हती. 'मिडटर्म्स झाल्या की आदित्यशी बोलेन' असं तिने बाबांना सांगितलं होतं.

'समटाईम्स इट्स मॅटर ऑफ टाइम'..म्हणजे लिटरली!! 'नेहमी खरं बोलावं' असं लिहायला, सांगायला छान वाटतं पण नेहमी खरं बोलणं शक्य नसतं आणि जेव्हा बोलायचं तेव्हा वेळ अचूक असावी लागते.खरं बोलायची वेळ आणि माणूस चुकला तर पश्चाताप पदरात पडतो. दुसरीकडे 'खोटं बोलून किंवा खरं न सांगून जर का कुणाचं भलं होत असेल तर तसं करायला हरकत नाही' असंही कुणीतरी म्हणून ठेवलंय!पण खोटं  बोलण्याची किंवा खरं न सांगण्याची वेळसुद्धा करेक्ट असावी लागते. ती चुकली तर गोंधळ होणं अपरिहार्य असतं! जस्ट लाईक दॅट! आदित्य वेळेवर खरं न सांगून चुकला होता आणि रमा नको त्या वेळी खरं बोलून अडकली होती. गंमत म्हणजे एकाच टेबलवर समोरासमोर बसून विचारात गढलेल्या दोघांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती.

परीक्षा झाल्याच्या संध्याकाळी जीत आणि राज आदित्यला भेटले. परीक्षेविषयी जनरल चर्चा झाल्यावर राजने त्याच्या नेहमीच्या शैलीत भोचकपणा केलाच!
"काय रे आदित्य, तुझं आणि रमाचं पुन्हा वाजलंय वाटतं.." आदित्यच्या कपाळावर आठ्या आल्या.
"हा प्रश्न आहे की निरीक्षक कमेंट? आणि वाक्यातल्या 'पुन्हा'चा काय संदर्भ?" त्याने तिरकस प्रतिप्रश्न केला.
"वेल! खरंतर निरीक्षक कमेंट आहे..पण आडाखे बांधण्यापेक्षा सरळ विचारलेलं बरं म्हणून विचारून टाकलं"
"तुझी निरीक्षण शक्ती बकवास आहे...थिसीसचे सगळे ऑब्सर्वेशनस असेच आहेत की काय? डिग्री मिळणार नाही अशाने"
"तू चिडलास..म्हणजे खरंच काहीतरी बिनसलंय" जीतनेसुद्धा ओळखलं. आदित्यने हताशपणे मान डोलावली. 'जीतच्या एका वाक्यावर आदित्य कबूल झाला आणि आपण सरळ, स्पष्ट विचारलं तर तिरकस उत्तर दिलं' यामुळे राजला जीतचा हेवा वाटणं आणि राग येणं सायमलटेनिअसली झालं. आदित्यला रमाबरोबर राहायला मिळत असल्याचा त्याला जेवढा हेवा वाटला होता त्याहून किंचित जास्तच जीत आणि आदित्यच्या परस्पर समजुतीचा वाटला. राज त्याच्या विचारात गढलेला असताना आदित्यने बोलून झालं होतं. जीत त्याला समजावत होता.
"अरे तुम्ही हे विनाकारण मिडटर्म्सचं टेन्शन घेतलंत ना म्हणून घोळ आहे..म्हणजे तुमचा काही वाद झालेला नाही! पण हे ते 'अतिपरिचयात..' म्हणतात ना तसं झालंय! आणि खूप नॉर्मल गोष्ट आहे ही..तुम्ही समझोता म्हणून एकत्र राहायला लागतात..साहजिक तुम्हाला एकमेकांची सवय झाली..तुमची मैत्री झाली..मैत्रीत मजा करून झाली..भांडून झालं..तुम्ही एकमेकांना इतके ओळखायला लागले आहात की नाविन्याच्या अभावामुळे हा थोडा अनइझीनेस आलाय..सो चिल...हो, मिडटर्म पण झाली...पुढचा हाफ छोटा असतो..तो संपतोय न संपतोय तोच नितीन येईल आणि तिला पार्टनर म्हणून कोण ती मुलगी यायचीय ती येईल..थोडे दिवस राहिलेत"
आदित्यने खिन्न हसून मान डोलावली.जीत म्हणत होता ते सगळं त्याला पटलं होतं पण जीतच्या शेवटच्या वाक्यांनी तो अस्वस्थ झाला.
'रिअली? रमाशिवाय रहायचं?' त्याने स्वतःलाच विचारलं.
आपण जसे परंपरांचे पाईक असतो ना तसे सवयींचे गुलामसुद्धा असतो..एखादी गोष्ट आपण एका पद्धतीने करायला शिकतो. मग त्या गोष्टीची सवय होते. अचानक ती पद्धत बदलणारे हे कळल्यावर क्षणभर सैरभैर व्हायला होतं. सेमिस्टर संपणार म्हणजे आपलं रमाबरोबर एकत्र राहणं संपणार याची आदित्यला जाणीव झाली.
"तुम्ही काय डिस्कस करताय?" त्याने राजला विचारलं.
"तुझी तंद्री भंग होण्याची वाट बघत होतो खरंतर"
"राज मस्करी नको..सिरीअसली सांग! मी आत्ता कसं वागणं अपेक्षित आहे?"
"मिस्टिक रिव्हरमधल्या टीम रॉबिन्ससारखं*" राज खदाखदा हसत म्हणाला.
"कधीतरी धड उत्तरं  देना"
"आदित्य..समटाइम्सस द बेस्ट थिंग टू डू इज बि नॉर्मल" जीत म्हणाला.
आदित्यने दोन क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि हसत त्याला सॅल्युट केला. जितने हसत मान झुकवून त्याचा सॅल्युट कबुल केला. पुन्हा एकदा राज 'सात्विक' संतापला. पण या वेळी चूक त्याचीच होती. आदित्यने त्याला विचारलं  होतं. स्वतःवरच थोडा चिडत वरवरचं हसत तो त्या दोघांच्या हसण्यात सामील झाला. पुन्हा संभाषणात येण्यासाठी त्याने विषय काढला-
"आणि हां आदि..आम्ही मगाशी मुव्हीला जायचा प्लान करत होतो..तू येतो आहेस असं  गृहीत धरलंय! रमाला विचार..ती आली तर मेघा पाटकर येणार..दर्शु कॉन्फरन्सला गेलीय.."
"आज नको रे...तुम्ही सगळे जा हवं तर..मला जरा झोप काढायची आहे..पण मी रमाला सांगतो..ती येईल"
"तुला का नाही यायचंय यार?" राज हक्क दाखवत म्हणाला.
"नाही रे..खरंच नको! कंटाळलोय...थेटरमध्ये जाऊन झोपण्यासाठी डॉलर खर्च करायची माझी अजिबात इच्छा नाहीये.." राजने जीतकडे पाहिलं. तो अजिबात आग्रह करत नव्हता.
"ठीके..हरकत नाही..परत जाऊ कधीतरी...तू रमाला विचार आणि कळव मला.." आदित्य नसताना रमा त्यांच्याबरोबर यायची पहिलीच वेळ असणार होती.
आदित्य जायला वळल्यावर राज जीतकडे बघत म्हणाला.
"सो...तू, मी, रमा आणि पाटकर बाई"
"चक इट राज...आदित्य नाही रमा नाही, रमा नाही तर मेघा नाही...नेहमीसारखे आपण दोघेच असणारोत.." जीत त्याच्या खोलीकडे वळत म्हणाला.
"ते तर मला माहितीय रे...पण यु नेव्हर नो.."

'समटाइम्सस द बेस्ट थिंग टू डू इज बि नॉर्मल' वाक्य मनात घोळवतच आदित्य घरी आला. रमाच्या खोलीचं  दार नेहमीसारखं बंद होतं पण ती घरात आहे की नाहीये याचा अंदाज येत नव्हता. त्याने आवरून चहा करायला घेतला आणि सहज म्हणून हाक मारली- "अहो फडके...". ती तिच्या खोलीचं दार उघडून बाहेर आली.
"काय रे?" तिने मागून येऊन विचारलं. तो दचकला.
"ओह सॉरी..मला माहित नव्हतं की तू घरात आहेस"
"ओके...काही काम होतं का?"
"नाही गं सहज हाक मारली होती..."
"ठीके..मग जाते मी..."
"अरेच्या...एक मिनिट..थांब..तू आहेस हे कळलं मला...मी चहा ठेवलाय...तुझ्यासाठी पण करतो.."
"ओके..झाला की सांग मला.." ती तिच्या खोलीत जायला वळली. रमा गेले काही दिवस अशीच वागत होती पण आदित्यने नॉर्मल वागण्याचा चंग बांधला होता.
"रमा..काये..तुला काही काम आहे का?"
"नाही..का?"
"अगं मग बस ना..बरेच दिवस आपण या मिडटर्म्सच्या भानगडीत बोललो पण नाहीये नीट"
"हं.." रमा बाहेर सोफ्यावर जाऊन बसली. आदित्यने स्वैपाकघरातून डोकावून बाहेर पाहिलं.
"मला कळेना...तू बाहेर जाऊन बसलीस की 'हं' म्हणून तुझ्या खोलीत गेलीस.."
आदित्य चहाचे मग घेऊन बाहेर आला. दोघेही समोरासमोर बसून काहीही न बोलता चहा प्यायला लागले.
"तुझ्या घरी कसे आहेत सगळे?" आदित्यने विषय काढायला विचारलं.
"छान..."
"हं..बाबा काय म्हणतायत?? त्यांना परत माझ्याशी बोलायचं नाहीये ना?" रमा चपापली. "पण आता काय धड दोनेक महिन्याचासुद्धा प्रश्न नाहीये...एकदा का सेमिस्टर संपलं की प्रॉब्लेम संपतोय...नाही का?"
रमाने काहीच उत्तर दिलं नाही. सेमिस्टर संपत आल्याचं  तिलाही आत्ताच जाणवलं. आदित्य नेहमीसारखा वागत होता. बहुतेक इतके दिवस परीक्षेच्या टेन्शनमुळे तो विक्षिप्त वागत असावा असा तिने तर्क केला. दोन महिन्यांनी आपण एकत्र राहणार नाहीये हे त्याने 'जस्ट लाईक दॅट' डिक्लेअर करून टाकलं होतं.
"रमा तू काही बोलणारेस का?" आदित्यचा पेशंस संपला.
'काय बोलू आदि??माझ्याकडे नाहीये काही" ती वैतागून म्हणाली.
"ओह..ओके.."
"सॉरी.."
"ठीके.."
"चहा चांगला झालाय..."
"इझ दॅट द बेस्ट यु गॉट टू से?
"म्हणजे?"
"म्हणजे...आपल्यात काही प्रॉब्लेम झालाय का?म्हणजे मला आठवत नाहीये रमा...मी भांडी वेळेवर घासतो...माझा ब्रश बेसिनवर एकही दिवस विसरलो नाहीये...एक दिवस खिचडीची फोडणी करपली माझ्याहातून...तू दोन वेळा हिटर चालू करून हॉलची खिडकी अर्धवट उघडी ठेवली होतीस तीसुद्धा मी बंद केलीय...मग आपण नीट का बोलत नाहीये? इज देअर समथिंग वी शुड डिस्कस?"
"आदि..असं  काहीही नाहीये...सगळं  नॉर्मल आहे..."
'कदाचित नॉर्मल आहे म्हणूनच सगळे घोळ आहेत' ती मनात म्हणाली.
"बरं..असो..तू म्हणतेयस तर असेल..."
"रात्री जेवायला काय करायचंय?"
"ते ठरवण्याआधी...तुला राजने मुव्हीला येणारेस ना विचारलंय...मुव्ही बघून बाहेरच काहीतरी खाऊन यायचा प्लान आहे! तू असलीस तर मेघा असेल..दर्शु-"
"हं..मला माहितीय...ती नाहीये इथे..."
"मग त्याला मी कळवतो कि तू येणारेस म्हणून"
"ओके"

आदित्य येणार नाहीये हे रमाला शेवटच्या क्षणाला समजलं. सिनेमा म्हणजे आदित्य हमखास असेलच हे तिने गृहीत धरलं  होतं. त्याला आराम करायचा आहे असं कारण त्याने सगळ्यांना सांगितलं होतं.   तिकिट्स बुक करून झाली होती त्यामुळे ऐन वेळेला नाही म्हणून काही उपयोग नव्हता आणि सेम कारणाने आदित्यला 'चल' म्हणता येत नव्हतं. रात्री रमा घरी परत आली तेव्हा आदित्य बाहेर लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता.
"तू झोपणार होतास"
"हो..पण नाही आली झोप...जेव्हा इच्छा असते तेव्हा येत नाही...असो..मुव्ही कसा होता?"
"चांगला होता..राज म्हणाला रीव्युस पण चांगले आलेत...तू कसा काय मिस केलास?"
"खरंतर मला ती स्टोरी आवडली नव्हती..."
"अच्छा??? अजून काही???....निदान कबूल तरी कर..की उगाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून तू नाही म्हणालास.."
"ठीके..करतो कबूल! कधीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं वागावं यु नो..जस्ट लाईक दॅट..."
"हं.." रमाने मान डोलवली.

थोड्या वेळाने रमा बाहेर येऊन आदित्यला म्हणाली-
"तू काही इतक्यात झोपायची शक्यता मला दिसत नाहीये..सो गुड नाईट"
"गुड नाईट..."
रमा खोलीकडे जायला वळली. आदित्यला काय सुचलं कुणास ठाऊक? त्याने तिला हाक मारली.
"काय?" तिने केस मानेवरून पुढे घेत एका बाजूला केले आणि ती वळली.
आदित्यला एव्हाना तिच्या त्या लकबीची सवय झाली होती. 
"काही नाही..असंच...आय गेस तू म्हणालीस तसं सगळं नॉर्मल आहे"तो हसत म्हणाला. रमाने आश्चर्याने हसत त्याच्याकडे पाहिलं. त्याचं वाक्य तिला जाणवलं आणि ती पुन्हा गंभीर झाली. मिडटर्म्स संपल्या होत्या. बाबांकडून आदित्यशी बोलायला घेतलेला वेळ संपला होता. खरं बोलायला एकदा उशीर झाला आणि सगळं बिनसलं होतं. तिला अजून उशीर करता येणं शक्य नव्हतं.
ती पुन्हा डायनिंग टेबलजवळ आली आणि आदित्यच्या बाजूच्या खुर्चीत बसली. त्याने लॅपटॉपमधून डोकं काढून प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत भुवया उंचावल्या.
"आदि, आपण एकत्र राहायला लागलो तेव्हा काही गोष्टी आपण एकमेकांशी बोलायच्या नाहीत असं ठरवलं होतं..आपले हेतू स्पष्ट आहेत म्हणून आपण ते करू शकलो...पण-"
वारुळातल्या मुंग्या सैरावैरा पळत सुटल्या होत्या. आदित्य गांगरला होता. रमा अचानक हा विषय काढेल असं त्याला अजिबात वाटलं  नव्हतं आणि तिने तसं करण्याचं कारणसुद्धा त्याला लक्षात येत नव्हतं.
"-पण आता आपल्याला बोलावं लागेल...मोर ओव्हर आपले हेतू स्पष्ट आणि शुद्ध आहेत हे प्रीटेन्स नाहीये आणि खरच तसं आहे हे प्रुव करायला आपण बोललो तर चालेल...???"
"अ....रमा..आय डोन्ट नो...माझा तुझ्या जजमेंटवर विश्वास आहे...तुला हा विषय काढणं गरजेचं वाटतंय तर बोलूया आपण याच्यावर..."
"मला तू हो म्हणालास हे ऐकून खूप रिलीव्हड वाटतंय..."
'मी खरं  बोलून चूक केली' हा रमाचा आदिपुढे डिफेन्स असणार होता. दुसरीकडे आदित्यने मनातल्या मनात 'समस्त अमृता कथना'ची मांडणी सुरु केली होती. त्याने ठरवलं  होतं की 'आपण खरं न सांगून चूक केली हे सगळ्यात आधी कबूल करून टाकायचं म्हणजे नंतर गिल्टी वाटायला नको'
"ओके...कधी बोलायचं आहे आपण?" त्याने विचारलं.
"आत्ता चालेल?"
"आत्ता?"


क्रमशः 


*मिस्टिक रिव्हर हा हॉलीवूडचा गाजलेला सिनेमा आहे.

Sunday, October 7, 2012

जस्ट लाईक दॅट १२


आत्तापर्यंत:

अमेरिकेत गेल्यावर काही गोष्टी काळाच्या ओघात अंगवळणी पडून जातात. रस्ता क्रॉस करताना आधी डावीकडे मग उजवीकडे बघणं, तारीख लिहिताना आधी महिना मग तारीख लिहिणं, दोन ठिकाणांमधलं अंतर मैलात सांगणं, घड्याळ बघून भारतात किती वाजलेत ते अचूक सांगणं आणि त्याच्यावरून तिथे कुणाला फोन करायचा की नाही ते ठरवणं. भारतात कुणाला वाढदिवसाला रात्री १२ वाजता विश करायला फोन करायचा तर आदल्या दिवशीच्या दुपारी फोन लावणं हा त्यातलाच एक भाग!
शुक्रवारची दुपार. आदित्यने बराच वेळ विचार करून फोन लावला. अमृताला गेल्या तीन महिन्यात तो पहिल्यांदाच फोन करत होता. त्याने आत्तापर्यंत एक-दोन मेल्स केल्या होत्या पण तिने रिप्लाय केला नव्हता. आज तिचा वाढदिवस होता सो इगो बाजूला ठेवून तिच्याशी आजच्या दिवशी बोलायला हवं असा विचार आदित्यने केला. तिचा फोन वेटिंगवर होता. 
'मला तिला सगळ्यात पहिलं विश करायचं होतं...पण सहाजिक आहे..खूप लोक फोन करत असतील तिला आत्ता! अजून थोड्या वेळाने करतो..पहिलं विश केलं काय आणि शेवटचं केलं काय?विश करण्याला महत्व आहे! माझ्या कॉलने तिला झोपेतून उठायला लागलं तरी तिला राग येणार नाही
अर्धा-पाउण तास वाट बघून त्याने पुन्हा फोन लावला. अजूनही तिचा फोन वेटिंगवर होता. 'ही इतक्या वेळ कुणाशी बोलते आहे??
त्याला पुण्यातले दिवस आठवले. तोसुद्धा कित्येकदा तिच्याशी रात्री तासनतास बोलला होता. काळाच्या ओघात गप्पा मारायचे विषयच संपून गेले. ती तिच्या जॉबमध्ये, तो त्याच्या रुटीनमध्ये बिझी झाला. 'कदाचित आपण आज एकत्र नाही याचं हेही एक कारण असू शकेल'. साधारण अजून पाउण तासाने फोन लागला. तिने बराच वेळ रिंग वाजल्यावर उचलला.
"अमु, आदित्य बोलतोय.."
"ओह...बोल" तिचा पेंगुळलेला आवाज आला.
"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
"थॅंक्स"
"झोपली होतीस?"
"हो..आत्ताच झोप लागली होती..."
"सॉरी..मी आधीपण दोन वेळा फोन ट्राय केला.."
"हं...फोन चालू असेल तेव्हा माझा..."
"हो..वेटिंगवर होता...कशी आहेस?"
"बरीये..." अमु जेवढ्यास तेवढी उत्तरं देत होती आणि आदित्य डिस्टर्ब होत होता.
"तुला मी मेल्स पण केलेल्या एक-दोन..तुझा रिप्लाय आला नाही" 
"मी बरेच दिवस मेल्स चेक केल्या नाहीयेत" 'बरेच दिवस??महिने झाले...त्याला काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं होतं.
"सॉरी..मी तुला झोपेतून उठवलं.."
"इट्स ओके..."
"तुला नंतर फोन करू का?" त्याने विचार केलेला त्यापेक्षा हे जास्त अवघड होत चाललं होतं.
"नंतर कधी?"
"उद्या वगैरे.." 
"नाही...बोल आत्ताच...मी जागी झालीय..." 
"हं.." मग काही सेकंद एक विचित्र शांतता फोनवर होती. 
तो अमृताला खूप पूर्वी म्हणाला होता "अमु, पुढे-मागे जर का आपण काही महिने, वर्षं जरी एकमेकांना भेटू शकलो नाही तरी आपण जेव्हा पुन्हा भेटू-बोलू तेव्हा आपल्याला विषय कमी पडायचे नाहीत...वि कनेक्ट वेल यु नो.." तिने त्याच्यावर हसून मान डोलावली होती. पुढे मैत्री नुसती मैत्री राहिली नाही आणि आता बहुतेक काहीच उरलं नव्हतं.   
"आदित्य, तुला बोलायचं होतं.."
"अ..हो...विशेष काही नाही..हेच...उद्या दिवसभराचा प्लान काय?पार्टी कुठे आणि कुणाबरोबरऑफिसमधल्या फ्रेंड्सबरोबर की सोसायटीमधल्या मैत्रिणी?"
"यातल्या कुणाबरोबरच नाही.."
"ओह..म्हणजे घरीच जंगी मेनू दिसतोय...पप्पांनी चिकन आणलं असेल आणि मम्मी करणार असेल..."
"नाही...नॉट रिअली.."
"मग?"
"आदित्य...माझं लग्न ठरतंय" ती एका दमात म्हणाली. आदित्य सुन्न झाला होता. तो काहीच बोलला नाही.
"हॅलो....आहेस का?"
"अ...हो आहे..बोल.."
"आदित्य, मला हे सांगायला खूप ऑक्वर्ड वाटतंय...पण सॉरी..मला तुला मेल करून हे कळवायची हिम्मत होत नव्हती"
"हे सगळं कधी झालं?"
"गेल्या महिन्यात..."
"मी गेल्यावर दोन-तीन महिन्यात तुझं लग्न ठरलं?"
"ठरलं नाहीये पण ठरेल...तो भेटणारे माझ्या घरच्यांना या महिन्यात..आदित्य...अ..आपण नको बोलायला हा विषय...मला खूप अवघड जाईल..सगळं सांगायला..."
"नाही अमृता..माझ्या मते मला एवढं जाणून घेण्याचा हक्क आहे..."
"ठीके..तुझी मर्जी..मी त्याला एका लग्नात भेटले..मग ऑनलाईन भेटले...तुझी तेव्हा अमेरिकेला जायची धावपळ सुरु झालेली...आपण पुढे जाण्यात आधीच प्रॉब्लेम्स कमी नव्हते..त्यात तू अमेरिकेला जायला निघालास..तेव्हा मला जाणवलं होतं की आपण एकमेकांसाठी थांबून राहणं वेडेपणा होईल..तू नेहमी प्रत्येक गोष्टीत विचारतोस तसंच 'अमेरिकेला जाऊ ना?' असंसुद्धा विचारलं होतंस..मी 'हो' म्हटलं. मी तुला अडवून ठेवू शकत नव्हते. त्याच दरम्यान मला त्याने लग्नासाठी विचारलं. त्याची नोकरी इथेच पुण्यात आहे. आमची कास्ट सेम आहे. घरी पण चाल-"
"बास..अमृता..कळलं मला...विश यु अ व्हेरी हॅप्पी बर्थडे अगेन..ठेवतो मी आता..."
"आदि..एक मिनिट..." अमृताला त्याने एकदम निरोपाचं बोलणं अपेक्षित नव्हतं.
"अजून काही सांगायचं राहिलंय?"
"हो...तुला मी फसवलं असं वाटत असेल या क्षणाला. मला माहितीय...पण मी मुद्दाम नाही वागले असं..मी सिरीअसली तुझा विचार करत होते...तुला खोटं वाटेल पण मी त्याला सुरुवातीला भेटले तेव्हा तुझी खूप आठवण झालेली मला.."
"इझ दॅट आईसिंग ऑन द केक?" आदित्यने वैतागून विचारलं.
"तू बदलला आहेस आदि..तुझ्याकडून मला अशी कमेंट अपेक्षित नव्हती.." ती नाराज होत म्हणाली.
"सॉरी..यापेक्षा बेटर काही सुचलं नाही..अमृता, मला कधीच खरंच वाटलं नव्हतं की आपलं नातं असं संपेल..इझ देर एनी वे..आपण परत सगळं नीट करू शकतो?" त्याने हेल्पलेस होत विचारलं.
"आता तू परत पहिल्यासारखं बोलायला लागला आहेस..आदि, मी तुला फसवलं नाही...तू जायच्या आधी आपण शेवटचं भेटलो तेव्हासुद्धा मी तुला स्पष्ट कल्पना दिली होती की आपण लाँग-डिस्टंस रिलेशनमध्ये नाही राहू शकत..."
"म्हणजे तेव्हा तू ऑलरेडी दुसऱ्या कुणालातरी हो म्हणून झालं होतं.."
"नाही आदित्य..या सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत...तुला वाटतंय की मी यातून खूप सहजपणे बाहेर पडले..पण तसं नाहीये..तुझं नसणं मला खूप अवघड गेलंय. तू या क्षणाला ते अजून अजून अवघड करतो आहेस!" 
"तू मगाशी म्हणालीस ना अमृता...की मी बदललो आहे..खरंय ते...मी प्रयत्न करतो आहे बदलायचा..पण तुझ्याकडून हे सगळं ऐकलं आणि मला नेहमीसारखं काय बोलायचं हेच कळत नाहीये.. मी पुन्हा एकदा कन्फ्युस झालोय...मला हे सगळं असं संपवायचंसुद्धा नाहीये आणि मला 'जुना मी' अजिबात आवडत नाहीये.."
"आदित्य, मूव्ह ऑन..प्लीज.." 
"मूव्ह ऑन?अमृता..इतकं सोप्पं नाहीये.."
"मला माहितीय..पण जमेल तुला...ठेवू का मी फोन??खूप उशीर झालाय..." तिने विचारलं. ती त्याच्या उत्तराची वाट पाहायला लागली. तेवढ्यात आदित्यसमोर दार उघडून रमा आत आली.
"हे काय??तू अजून इथेच?तुला डेव्हिसनकडे मिटींगला जायचं होतं ना?" तिने विचारलं आणि त्याच्या हातातला फोन पहिला. "घरी बोलतो आहेस का?" तिने हळू आवाजात जीभ चावत विचारलं. त्याने नकारार्थी मान डोलावली. ती त्याचा गंभीर चेहरा पाहून काही न बोलता तिच्या रूममध्ये गेली.  
"आदित्य..ठेवू का मी फोन? तू कुणाशी बोलतो आहेस का?" अमुने विचारलं.
त्या क्षणाला रमा घरात आहे या फिलिंगनेसुद्धा आदित्यला खूप बरं वाटलं होतं. तो अमृताने दिलेल्या धक्क्यातून सावरला होता. 'मीसुद्धा तिला एक धक्का देऊन टाकतो..'
"अ हो..सॉरी बरं का..माझी रूम पार्टनर आली घरी..."
"माझी रूम-पार्टनर?"
"अ हो..मी तुला सांगणारच होतो...मी इथे एका मुंबईच्या मुलीबरोबर अपार्टमेंट शेअर करतो..आम्ही दोन-तीन महिने एकत्र राहतोय..ती पण पी.एचडी करतेय..गेस व्हॉट..आमचीपण कास्ट सेम आहे पण मी हा निर्णय 'मूव्ह ऑन' म्हणून नाही तर निव्वळ तडजोड म्हणून घेतला...काहीसे अवघडूनच आम्ही निव्वळ रूम-मेट्स म्हणून राहतोय..मलासुद्धा तुला यातलं काही मेलवर सांगायचं नव्हतं...अ..आपण नको बोलायला हा विषय..मला समजावणं खूप अवघड जाईल..खूप उशीर झालाय..ठेवतो मी..बाय..गुड नाईट"
"...."
"मी बाय म्हटलं..."
"अ हो...बाय"
त्याने फोन ठेवला. देव, विधाता किंवा जग चालवणारी जी कुठली अदृश्य शक्ती आहे तिला एक गोष्ट अचूक जमते..समतोल! बॅलंस! आपल्या आयुष्यात खूप सुरळीत सगळं चालू आहे असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा थोडं थांबायला हवं..कारण जेव्हा काहीतरी चांगलं घडतं तेव्हा काहीतरी वाईट घडणार आहे याची खात्री बाळगली पाहिजे.तुम्ही जगाशी चांगलं वागा, जग तुमच्याशी चांगलं वागेल..तुम्ही कुणालातरी फसवा, कुणीतरी तुम्हाला फसवेल...रमाबरोबर राहत असल्याचं अमुला न सांगून आपण तिला फसवतो आहोत असं फिलिंग आदित्यला कित्येक वेळा आलं होतं. आपण जेव्हा तिच्याशी बोलू तेव्हा तिला सगळं खरं सांगून टाकायचं आणि मोकळं व्हायचं त्याने ठरवलं होतं. पण जेव्हा त्याने तिला सगळं खरं सांगितलं तेव्हा मोकळं व्हायच्या ऐवजी सगळ्याचा अजूनच गुंता झाला होता. गिल्टी वाटून घ्यायला अमृता त्याच्या 'बरोबर' राहिलीच नव्हती. नेमकं चुकलं कोण? हेच त्याला ठरवता येत नव्हतं. तो विचार करतच दिवसभराच्या कामात बिझी झाला. 

संध्याकाळी तो घरी आला तेव्हा रमा बसून अभ्यास करत होती. 
"ग्रेट..आलास तू...खूप दमला नसशील तर हॉल आवरुया का प्लीज..?" आदित्यने आजूबाजूला पाहिलं. शेल्फमधली एक-दोन पुस्तकं एकमेकांवर तिरकी पडली होती. फोनच्या चार्जरची वायर जमिनीवर पडली होती. मागे त्याचे स्लीपर्स दोन दिशांना गेले होते आणि एक स्लीपर उलटी झाली होती. 
"यात काय आवरायचं?" त्याने वैतागून विचारलं. एरवी त्याने हा प्रश्न हसत विचारला असता पण आज त्याचा काहीच करण्याचा मूड नव्हता. रमाला त्याच्या वैतागण्याचं कारण माहित नव्हतं. ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्यने सुस्कारा सोडला. 
त्याने खांद्यावरची बॅग सोफ्यावर टाकली. शेल्फमधली पुस्तकं नीट केली. चार्जर उचलून त्याची वायर गुंडाळून आत नेऊन ठेवला. त्याचे स्लीपर्स गोळा करून दाराशी नीट ठेवले. रमा तो हे सगळं करत असताना त्याच्याकडे पाहत होती. स्लीपर्स जागेवर ठेवून त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने मानेनेच खूण करून त्याला सोफ्यावर पडलेली त्याची बॅग दाखवली. त्याने निर्विकार चेहऱ्याने बॅग उचलून त्याच्या खोलीत ठेवली आणि तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. थोड्या वेळाने रमाने त्याला हाक मारली. 
"आदि...अरे बरं वगैरे नाहीये का तुला? जरा बाहेर जायचं होतं..ग्रोसरी घ्यायला..." तो बाहेर आला.
"ग्रोसरी...गेल्या आठवड्यात तर गेलेलो आपण! संपलं सगळं?" त्याने विचारलं.
"अरे नाही...तसं सगळं आहे! पण उद्या काहीतरी स्पेशल करायचं आहे सो..थोडी स्पेशल खरेदी.." त्याला त्या आधी आठवड्यात तिच्याशी झालेलं संभाषण आठवलं.
"तू मला सांगणार होतीस की ६ ऑक्टोबरला काये?" आदित्यने अस्वस्थपणे विचारलं. 'उद्या माझा वाढदिवस आहे' हे उत्तर सोडून इतर काहीही त्याला चाललं असतं. 
"वाढदिवस आहे-"
'एक मिनिट...तुझा उद्या वाढदिवस आहे??" त्याने तिला वाक्य पूर्ण करूच दिलं नाही.
"अरे..माझा नाही..दर्शुचा..मेघा आणि मी आपल्याकडे सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे..जीत गाडी घेऊन येतोय..आपण जाऊया सामान घ्यायला.." त्याने कुठल्यातरी महान संकटातून सुटका झाल्याच्या अविर्भावात निःश्वास टाकला. दिवसभरात 'उद्या रमाचा वाढदिवस नाही' हीच त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी होती.
"तू कुठल्यातरी धर्मसंकटातून सुटका झाल्यासारखा सुस्कारा का टाकलास??" तिने विचारलं.
"काही नाही...असंच...रमा, तुला माहितीय की पेपरात येणारा साप्ताहिक किंवा दैनिक भविष्य प्रकार श्रद्धेने वाचणारा एक मोठा वाचक वर्ग आहे."
"असेल..पण त्या वर्गाचा आत्ता काय संबंध?"
"तर असं होतं..आपण कधीतरी पेपरमध्ये आपल्या राशीला दिलेलं भविष्य गम्मत म्हणून वाचतो..खरंतर लिहिणाऱ्याने जनरल ठोकताळे लिहिलेले असतात...पण नेमकं त्या दिवशी आपल्या राशीसाठी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी अचूक खऱ्या होतात आणि मग एका दिवसाच्या भल्या-बुऱ्या अनुभवावरून आपला त्या सदरातल्या भविष्यावर विश्वास बसतो...जस्ट लाईक दॅट! माझ्या राशीचं भविष्य मी सकाळी गम्मत म्हणून वाचलं होतं. 'आश्चर्यजनक बातम्या समजतील' असं लिहिलं होतं.माझा त्याच्यावर विश्वास बसला असता जर तुझा उद्या वाढदिवस असल्याचं कळलं असतं तर"
"तू काय बडबडतो आहेस?" तिने गोंधळून विचारलं.
"
मलाच नाही माहित...चहा पिउयात...डोकं चालेल माझं थोडं.." त्याने विषय बदलला.

दुसऱ्या दिवशी दर्शुच्या वाढदिवसाचा केक कापायचा कार्यक्रम रमा आणि आदिच्या अपार्टमेंटवरच होता. आदित्यचं अजिबात कुठल्याच कार्यक्रमात विशेष लक्ष नव्हतं. केक-कटिंग वगैरे झाल्यावर रमाला दर्शुने बाजूला ओढलं.
"काय गं..काय झालं?" 
"आदित्यला आवडला नाहीये का माझा बर्थडे इथे केलेला?" 
"नाही गं...असं काही नाही...तुला असं का वाटलं?"
"नाही मला त्याचं विशेष लक्ष होतं असं वाटलं नाही"
"चल गं काहीतरीच" रमाला जाणवलं की आदित्य कालपासूनच थोडा विचित्र वागतोय. दर्शुला अर्ध्या तासात ते जाणवावं आणि आपल्याला हा प्रश्न पडू नये याबद्दल तिला स्वतःचाच थोडा राग आला.
"नक्की ना? मी विचारू का त्याला??" 
"नको..मी बोलते त्याच्याशी नंतर.."
रात्री सगळे गेल्यावर रमा आणि आदित्य आवराआवर करायला लागले.
"तुझं काही बिनसलंय का?" रमाने विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही.
"आदि. मी तुझ्याशी बोलतेय...मी तुला न विचारता मेघाशी बोलून दर्शुचा बर्थडे इथे केला म्हणून तू चिडला आहेस का?"
"नाही गं...असं कोण बोललं तुला?"
"हे मला नाही..दर्शुला वाटलं...तिचा बर्थडे होता आणि तुझ्या मूड-ऑफ चेहऱ्याने तिच्या वाढदिवशी तिचा मूड-ऑफ झाला!"
"खरंच सॉरी रमा, मला खरंच काही प्रॉब्लेम नव्हता तिच्या बर्थडेबद्दल...मी उद्या तिला भेटून सॉरी म्हणेन" आदित्यला जाणवलं की त्याने मूड-ऑफ तर अमुचाही तिच्या वाढदिवसालाच केला होता. त्याला अजूनच वाईट वाटायला लागलं.
"त्याची गरज नाहीये आदि...पण तिच्या बर्थडेबद्दल प्रॉब्लेम नव्हता तर प्रॉब्लेम काय होता नेमका?"
"मला नाही सांगता येणार..."
"का?"  
त्या क्षणाला आपण एकमेकांशी 'या' विषयावर बोलायचं नाही हे ठरवलेलं विसरून रमाला सगळं सांगायची त्याला इच्छा झाली. तो सांगायला सुरुवात करणार इतक्यात तिचा फोन वाजला. तिने फोनकडे पाहिलं.
"घरून कॉल आहे...आलेच मी थोड्या वेळात' म्हणत ती तिच्या रूममध्ये गेली.

"रमा, श्री घरी येऊन गेला काल रात्री..." 
"बरं...सहजच आला होता का?" 
"तो आला तेव्हा तुझी आई मावशीकडे गेलेली...मग माझ्याशी सगळं बोलला तो...तू त्याला आदित्य परचुरेबद्दल सांगितलस म्हणे.." 
"हो बाबा...मला त्याच्यापासून काही लपवायचं नव्हतं"
"आणि म्हणून तू त्याला आदित्यचं नावसुद्धा सांगितलं नाहीस.."
"नावाने काही फरक पडत नव्हता बाबा..."
"ठीके रमा, मी काही म्हणत नाहीये...त्याने तुझ्या पत्रिकेबद्दलपण विचारलं"
"काय? मी त्याला सांगितलं होतं की सध्या माझ्या घरी जाऊन पत्रिका वगैरे विषय काढू नकोस.." ती वैतागली.
"शांत हो..इतकं काही झालेलं नाहीये...हे पत्रिका वगैरे आपण लांबवू शकतो बेटा पण थांबवू शकत नाही"
"पण बाबा हे सगळं कशासाठी...?"
"तुला उत्तर माहितीय रमा. आणि एकीकडे तूच त्याच्याशी खोटं बोलायचं नाही म्हणून त्याला आदित्यबद्दल सांगितलंस आणि आता तो तुझी पत्रिका मागतोय तर तेसुद्धा तुला नकोय.."
"मला इतक्यात लग्न करायचं नाही बाबा...श्रीला मी सगळं खरं सांगितलं कारण तो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतो..त्याचा त्याने माझी पत्रिका मागण्याशी काही संबंध नाही" 
"बरं...आणि आदित्यचं लग्न ठरलंय का किंवा झालंय का याबद्दल तुला काहीच माहित नाही?"
"श्रीने बहुतेक तुम्हाला खूपच डिटेलिंग केलं...हो, मला माहित नाही की आदिचं लग्न ठरलंय..झालंय..होणारे..त्याला करायचं आहे की नाहीये..."
"आदि?"
"बाबा प्लीज..." 
"रमा, तू झोप आत्ता...बराच उशीर झालाय...आपण नंतर बोलू...तुला इच्छा नसेल पण मला आदित्य परचुरेबद्दल जाणून घेण्यात रस आहे...सो त्याच्याशी मी पुन्हा बोलू शकतो किंवा तू बोल आणि मला सांग...चालेल??"

क्रमशः