आत्तापर्यंत:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७
सेमेस्टरच्या फाईनल एक्झाम्स जवळ आल्या होत्या. पुन्हा एकदा असाईनमेंटस,रिपोर्ट्स, प्रेसेंटेशनस वगैरेची धावपळ सुरु झाली होती. सगळेजण अभ्यासात बिझी होऊन गेले होते. आदित्यचा लॅब रोटेशनचा प्रोजेक्ट संपत आला होता त्यामुळे तो जास्तच गडबडीत होता. रमाशी अभ्यास आणि जुजबी गोष्टी सोडून बाकी गप्पा होत नव्हत्या. अजून महिनाभराने कोण कुठे राहणारे ही चर्चा त्या दोघांनी सोडून इतर सगळ्यांनी करून झाली होती. दोघांनी अर्थात जाणून-बुजून तो विषय एकमेकांशी बोलायचा टाळला होता. एक दिवस संध्याकाळी लॅबमधून घरी येताना आदित्यला जीत भेटला. दिवाळी नाईट झाल्यावर पहिल्यांदाच त्याला आदित्य एकटा सापडला होता.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७
सेमेस्टरच्या फाईनल एक्झाम्स जवळ आल्या होत्या. पुन्हा एकदा असाईनमेंटस,रिपोर्ट्स, प्रेसेंटेशनस वगैरेची धावपळ सुरु झाली होती. सगळेजण अभ्यासात बिझी होऊन गेले होते. आदित्यचा लॅब रोटेशनचा प्रोजेक्ट संपत आला होता त्यामुळे तो जास्तच गडबडीत होता. रमाशी अभ्यास आणि जुजबी गोष्टी सोडून बाकी गप्पा होत नव्हत्या. अजून महिनाभराने कोण कुठे राहणारे ही चर्चा त्या दोघांनी सोडून इतर सगळ्यांनी करून झाली होती. दोघांनी अर्थात जाणून-बुजून तो विषय एकमेकांशी बोलायचा टाळला होता. एक दिवस संध्याकाळी लॅबमधून घरी येताना आदित्यला जीत भेटला. दिवाळी नाईट झाल्यावर पहिल्यांदाच त्याला आदित्य एकटा सापडला होता.
"ठाकूर बुवा, तुम्ही आत्ता घरी? मला वाटलं की बराच बिझी आहेस रिसर्चमध्ये"
"अरे फाईनल्स आहेत ना.मग सध्या रुटीनमधून ३-४ दिवस ब्रेक घेतलाय"
"हं...रुटीन ही एक गमतीशीर गोष्ट आहे..म्हणजे रुटीन चालू असतं तेव्हा आपल्याला त्यातून सुट्टी हवी असते आणि जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा आपण रुटीन मिस करतो"
"आदित्य, दरवेळी भेटल्यावर काहीतरी बोलायला हवंच का?" जीतने हसत विचारलं.
"अरे खूप दिवसात मी काहीच बोललेलो नाहीये..अभ्यासातून वेळच नाहीये.."
"कसा चाललाय अभ्यास?"
"ठीक..तू बोल..तू कधी फ्री होतोयस?"
"एक्झाम लौकर होऊन जाणारे...पण रिपोर्ट सेमच्या लास्ट डेला डयू आहे...म्हणजे मी तो नक्की आधी सबमिट करत नाही...सो मी लास्ट डे पर्यंत बिझी..असो, माझा दिवाळीचा फराळ फायनली आलाय काल..तर येऊन जा नंतर" जीत आळस झटकत म्हणाला.
"अरे वा! झकास! खारे शंकरपाळे आहेत का त्यात?"
"आहेत की...राजने संपवले नसतील तर"
"चल आत्ताच येतो मग"
आदित्य जीतच्या घरी आला.
"राजसाहेब कुठायत?"
"इंटेन्स रिसर्च...त्यांनी एक पेपर सबमिट केलेला..करेक्शनस आलेत...त्याचं काम सुरु आहे..कियोमी आणि राज दोघे को-ऑथर आहेत"
"मग तर तो काही एवढ्यात येत नाही..बाकी अजून काय खबर?" आदित्यने हसत विचारलं.
"विशेष काही नाही.तुम्ही बोला.तुला नितीनने फोन केला का?" जीतने त्याला शंकरपाळ्यांचा पुडा दिला.
"नाही अजून तरी"
"हं"
"मला एका गोष्टीचं अलीकडे खूप नवल वाटायला लागलं आहे...आपण सेम अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतो, एकाच कॅम्पसमध्ये शिकतो आणि तरी आठवडा-आठवडा आपल्याला एकमेकांचं काय चाललंय याचा नीट पत्ता नसतो"
"चालायचंच! बाय द वे, त्या अनिताचा विसा झाला का?"
"नाही माहित रे...गेल्या सोमवारी विसा इंटरव्यू होता म्हणे..नंतर तिने काही कळवलं नाहीये"
"राजला अपेक्षा आहे की अजून एक बरी मुलगी यावी" जीत किचनकडे वळत म्हणाला.
"तू एकट्या राजच्या अपेक्षेचं बोलू नकोस..मी आलो त्या दिवशी पण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दोघांनीही रमाची चौकशी केली होतीत"
आदित्यला तो अमेरिकेला आला तो दिवस आठवला.
"मला आता तो दिवस आठवून पण हसायला येतं,तुम्ही दोघे रमाची चौकशी करत होतात.मला तिच्याबद्दल काहीच माहित नव्हतं, आम्ही एका फ्लाईटने आलो हेसुद्धा मला इथे आल्यावर कळलं होतं"
"आणि आता?" जीतने बाहेर येत एकदम विचारलं.
"आता काय?"
"आदित्य, तू आणि रमा? सगळं नॉर्मल आहे ना? आय मीन नॉर्मलवालं नॉर्मल?"
"ते काय असतं?"
"दिवाळी नाईटला तू त्यांचा अख्खा डान्स फक्त रमाकडे बघत पाहिलास..एकूणच तुझं लक्ष नव्हतं त्या दिवशी"
"नाही रे तसं काही नाही..म्हणजे झालं असं की ज्या मुलीबरोबर मी एका घरात राहतो तिला 'असं' बघायची सवय नाहीये ना मला" जीतकडे काही बोलायला हरकत नव्हती.
"ओह..." जीत मान डोलवत म्हणाला.
"आणि ती चांगली दिसत होती रे त्या दिवशी" आदित्यने अजून एक वाक्य टाकलं.
"परचुरे,ती नेहमीच चांगली दिसते. पण तुला हे अचानक लक्षात आलंय हे नॉर्मल आहे की?" आदित्यला क्षणभर मनात आलं की सगळं बोलून टाकावं.जीतने कदाचित काहीतरी चांगला सल्लासुद्धा दिला असता. पण मग त्याच्या डोक्यात रमाचा विचार आला. रमाला जीतकडे त्याने असलं काही बोललेलं आवडलं नसतं. त्याने नकारार्थी मान डोलावली. जीत पुन्हा बोलायला लागला.
"हे बघ, मला कल्पना आहे की माझ्या अशा चौकशा करण्याने तुला माझा राग आला असेल. पण मी तुला आपल्यातलं अंडरस्टॅंडिंग कंसिडर करून स्पष्ट विचारणं प्रिफर केलं. अनोळखी असताना तुम्ही दोघांनी परक्या देशात येऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला याचा सगळयांना कितीही हेवा,कौतुक वाटलं तरी प्रत्येकाला आपापले डाऊट्स आहेत. तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नव्हता. आता असणारे आणि आता तुम्ही काय निर्णय घ्याल यावर सगळ्यांचं लक्ष असणारे. म्हणून मी तुला विचारलं की तू आणि रमामध्ये सगळं नॉर्मल आहे ना?"
"जीत,तू स्पष्टपणे सांगितलंस ते बरं झालं..पण खरंच सगळं ओके आहे. राहण्याच्या अरेंजमेंटबद्दल मी रमाशी बोललेलो नाही.अनिताचं यायचं कन्फर्म होईपर्यंत मी विषय न काढायचं ठरवलं आहे. सध्या अभ्यासाची गडबड पण आहे. अनयुज्वल गोष्टी होत का होईना पण गेल्या सेमला सगळं नीट झालंच ना? कुणास ठाऊक या सेमला अजून नवीन गोष्टी घडतील...अजून नवीन ट्रेंड्स सेट होतील"
"हं"
"चलो...मी निघतो...घरी सांग तुझ्या की शंकरपाळे झकास होते..उरले तर परत खायला येईन..."
"हे काय? तू चहा न पिता निघतोयस?"
"नेकी और पूछ-पूछ?"
"साखर कमी चालेल का?" जीतने हसत चहा ठेवत विचारलं.
जीत म्हणत होता ते खरं होतं. जर का अनिता आली तर एकत्र राहण्याचं काही कारणच उरत नव्हतं. पण रमाशिवाय राहायचं आदित्यला मनापासून मान्यच होत नव्हतं.
लहानपणापासून आत्तापर्यंत रमाने कायम तिच्या 'वेगळं' असण्याचं, हुशार असण्याचं दडपण घेतलं होतं. लहानपणी वादविवाद स्पर्धेत बक्षिसं मिळवणारी रमा काळाच्या ओघात बरीच अलिप्त होऊन गेली. आई-वडलांनी तिला हवं ते शिकू दिलं पण आपल्या कुठल्याच करीअर चोईसबद्दल ते कधीच समाधानी नव्हते याची तिला कायम बोच राहिली. पुढे श्री भेटला. भेटल्या दिवसापासून त्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय हे तिला जाणवलं होतं. त्याने तिला वेळोवेळी मदतसुद्धा केली. तीसुद्धा त्याच्यात गुंतली. मग अचानक अमेरिकेला जायची संधी आली. तेव्हा श्रीला ते आवडलं नाही. त्याचा रमावर हक्क आहे हे समजून त्याने तिच्या जाण्याबद्दल नाखुशी दाखवली. अमेरिकेला आल्या आल्या तिला आदित्य भेटला. कन्फ्युस्ड, अन्प्लांड! त्याने कायम रमाच्या अभ्यासाचं,तिच्या प्लानिंगचं कौतुक केलं. आयुष्यात पहिल्यांदाच तिला हवं तसं शिकायला मिळत होतं आणि तिच्या हुशारीने माणसं जवळ येत होती. प्रश्न विचारणारं, नापसंती दर्शवणारं कुणी नव्हतंच! आदित्यबरोबर राहायच्या तिच्या निर्णयाचा बाकी मुलींना थोडासा हेवा वाटलाच होता. आई-बाबा जवळ नव्हते. मुंबईचा गोंगाट, ट्रेन्स, सण-वार काहीसुद्धा नव्हतं. पण काहीतरी चांगलं शिकत असल्याचं समाधान होतं आणि आदित्य या सगळ्यात पहिल्यापासून बरोबर होता. तिच्या अपेक्षेपेक्षा पहिल्यांदाच घरापासून लांब काढलेले ५ महिने खूपच चांगले गेले होते. म्हणूनच आदित्य यापुढे आपल्याबरोबर नसेल हा विचार करून तिला अस्वस्थ व्हायला होत होतं. अलीकडे श्रीने फोन केला की तो आधी रमाच्या अभ्यासाची चौकशी करायचा. मग त्याचं नवीन ऑफिस, तिथलं काम, तिथले लोक अशा जुजबी गोष्टी सांगायचा. शेवटी हळूच विषय काढायला मिळाला तर मग तो आदित्यची चौकशी करायचा. रमाच्या ते लक्षात आलं होतं.त्यामुळे ती त्याला आदित्यबद्दल विचारायची कमीत कमी संधी द्यायची. श्रीबरोबर त्याच्या नवीन ऑफिसमध्ये एक मुलगी जॉईन झाली होती. तो रमाला तिच्याबद्दल सांगुन तिच्याकडून काही प्रतिक्रिया मिळायची अपेक्षा करायचा. पण रमा त्याला पुरून उरायची. या सगळ्या गोंधळात तिची इच्छा नसतानाही तिची पत्रिका श्रीच्या घरी पोहोचली होती. त्यामुळे अजून महिना-दीड महिन्यात पत्रिका जुळवणं होणार आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी सुरु होणार हे तिच्या लक्षात आलं होतं. गेल्याच आठवड्यात आदित्यला अमृताचा फोन येऊन गेल्याचं त्याने रमाला सांगितलं. अमृताचा साखरपुडा होणार होता. त्या दोघांनी एकमेकांना सॉरी म्हणून झालं होतं. आदित्य तिच्या विचारातून बाहेर पडल्याचं त्याच्या बोलण्यातून रमाला जाणवलं पण त्यामुळे आपल्याला का मनोमन बरं वाटतंय याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. आदित्यच्या घरून कुणी त्याच्या लग्नासाठी मागे लागलेलं नव्हतं. तिला त्याचा या बाबतीत हेवा वाटला. श्रीच्या बाबतीत असं का नाहीये हा विचारही तिच्या डोक्यात येऊन गेला.
रात्री झोपण्यापूर्वी रमा बाहेर आली तर आदित्य अभ्यासाला बसला होता.
"तू रात्रभर अभ्यास करणारेस का?"
"नाही गं झोपेन थोड्या वेळाने. मला कळतच नाहीये की हा विषय संपवावा कसा?" त्याने सुस्कारा सोडला.
"हं..आदि,तुला एक नेहमी विचारावसं वाटतं मला..म्हणजे बघ. आपल्याकडे घडणाऱ्या प्रत्येक सिचुएशनवर तुझ्याकडे काहीतरी लॉजिकल उत्तरं,कमेंट्स असतात. पण जेव्हा तुझा अभ्यास,तुझा रिसर्च, तुझे मित्र-मैत्रिणी असे तुझ्याशी संबंधित विषय येतात तेव्हा तू गोंधळून कसा जातोस?"
आदित्यने तिच्याकडे पाहून त्याला काहीच कळलं नसल्याच्या थाटात खांदे उडवले.
"काय?" तिने पुन्हा विचारलं. त्याने पुन्हा काहीच उत्तर दिलं नाही.
"बघ...पुन्हा तुझ्याशी रिलेटेड प्रश्न आहे..तर तुझ्याकडे उत्तर नाही. काहीतरी सुचत असेल ना तुला?"
"अ..रमा आता तुला उत्तर हवंच असेल तर मला जे सुचतंय ते सांगतो..मला लहानपणापासून कुणी माझे निर्णय घ्यायला शिकवलं नाही. बाबांची बदली झाली की माझी शाळा बदलली. एका काकाने चौथीत असताना सायकल भेट दिली म्हणून मी सायकल चालवायला शिकलो. माझ्या एका मामाला सिनेमांची खूप आवड आहे. त्याच्याबरोबर राहून सिनेमे पाहायला शिकलो. बाबांनी पुस्तकांचं दुकान सुरु केलं आणि पुस्तकं वाचायला शिकलो. यातलं काहीच मला आवडलं म्हणून करायला मी सुरुवात केलीच नाही. घरी विचारशील तर माझ्या घरी टूथपेस्ट कुठली आणायची ते उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं हे निर्णय आईच घ्यायची, बाबा ऐकून घ्यायचे. घरचा कारभार चालवणं हे आईचं डिपार्टमेंट आहे हे बाबांनी बहुतेक संसार थाटल्यापासून मान्य केलं. बाबांची बदली झाली की आई न कुरूकुर करता घर हलवायची कारण बाबांची फिरतीची नोकरी तिने बायको म्हणून मान्य केली होती. आम्ही पुण्यात सेटल झालो तेसुद्धा बऱ्याच नातेवाईकांच्या सल्ल्याने. असं सगळं आयडियल ऐकून मी यांत्रिक किंवा काल्पनिक जगात राहिलो की काय असा तुला संशय येईल पण हे सगळं खरं आहे. आमच्याकडेही कुरबुर, तक्रारी असतात पण इन जनरल कुठल्या गोष्टीला विरोध होणं, वाद होणं मी फारसं पाहिलंच नाही. या सगळ्या सगळ्यामुळे असेल कदाचित पण आपल्याला आई-बाबा, काका,मामा, दादा जे काही सांगतायत ते ऐकायची सवय लागली मला. मी खूप आज्ञाधारक, आदर्श होतो असंही नाही. अमृताबद्दल,माझ्या नॉन-व्हेज खाण्याबद्दल मी कधी घरी सांगितलं नाही. तुझ्याबरोबर राहतोय हेसुद्धा मी घरी बोललेलो नाही"
"आदि, तुला असं म्हणायचंय का की तू रेबेल वगैरे आहेस?"
"छे छे...रेबेल वगैरे म्हणायला माझ्यावर कधी अन्याय, अत्याचार वगैरे झालेला नाही. माझ्यामते मुलांनी आई-वडलांशी खोटं बोलणं तीन लेव्हलला होतं. एकतर लहानपणापासून आई-वडील मनाविरुद्ध वागत आले म्हणून बंडखोरी, रेबेलीयन वगैरे.पण ते फार दिवस लपून राहत नाही.मुलांना आणि आई-वडलांना त्रासच होतो त्याचा. दुसरा प्रकार म्हणजे सद्सदविवेकबुद्धी गहाण ठेवून मूर्खपणा करायचा आणि लाजेखातर लपवाछपवी करायची. माझ्या मते तो छछोरपणा झाला.आणि तिसऱ्या लेव्हलचं लपवणं आदरापोटी होतं. संस्कारांची,कुटुंबाची किंमत आपल्याला कळत असते म्हणून आपण काही गोष्टी लपवतो. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की आपली लपवाछपवी कुठल्या लेव्हलची आहे हे जो तो स्वतः ठरवतो"
"मग तुझी लपवाछापवी लेव्हल तीनची ना?" तिने हसत विचारलं.
"अर्थात...रमा, आपण स्वतःबद्दलचे कुठलेही निर्णय ऑब्जेक्टीव्हली घेऊच शकत नाही आणि म्हणून तुझ्या ओरिजिनल प्रश्नाचं उत्तरसुद्धा हेच की मी स्वतःच्या बाबतीत लॉजिकल, ऑब्जेक्टीव्ह होऊ शकत नाही..डीप डाऊन मला 'केओटिक सेल्फ'ची सवय झालीय"
"आदि, मी झोपते..तू खूप अवघड बोलायला लागला आहेस.." ती हसत म्हणाली.
"ओके..गुड नाईट"
रमा झोपायला आत वळली तेव्हा तिला पुन्हा तिच्या आणि आदित्यच्या आयुष्यातला,विचार करण्यातला मुख्य फरक जाणवला. 'केओटिक सेल्फ' आवडणारा आदित्य तिच्या विरुद्ध टोकाचा होता. पण त्याचं बरोबर असणं तिला हवं होतं. दुर्दैवाने लॉजिकल, ऑब्जेक्टीव्ह विचारही होत नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी रमाचा फोन वाजला.
"बोल गं दर्शु"
"रमा, मेघाला आत्ताच अनिताचा फोन येऊन गेला. तिचा विसा झाला एकदाचा.. ती येतेय"
"ओह ओके.."
"आता आपण माईकशी जाऊन बोलायला हवं दुसऱ्या अपार्टमेंटचं.."
"अ..हो हो.." रमाने फोन ठेवला.
आदित्य आणि तिने एकत्र राहण्याचं मुख्य कारण बाद झाल्याचं तिला जाणवलं होतं.
क्रमशः
टीप: पुन्हा एकदा...मी गोष्ट लांबवत नाहीये...या भागानंतर फक्त शेवटचे दोन भाग असणारेत..गोष्ट वाचत असणाऱ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!